किणीकरांच्या कवितेतील आशयघनता पचवायची असेल, तर खूप विचार करायला लागतो. ह्या अर्थाने ते मर्ढेकरांच्या खूप जवळचे आहेत
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
श्रीनिवास जोशी
  • क्रौंच पक्ष्यांची जोडी, रॉय किणीकर आणि त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 22 March 2024
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो रॉय किणीकर Roy Kinikar उत्तररात्र Uttarratra रुबाया Rubaiya उमर खय्याम Omar Khayyam

४१)

‘या इथून गेले यात्रिक अपरंपार

पाठीवर ओझे - छोटासा संसार

किति शिणले दमले म्हणता माझे माझे

वाकले मोडले, गेले टाकुनि ओझे।।’

किती साधी आणि किती खरी रुबाई. मानवी जीवनाची संपूर्ण अर्थहीनता चार ओळीत आणली गेली आहे. आपण यात्रिक आहोत. हे जग एक धर्मशाळेसारखे आहे. रस्त्यात राहावे, तसे आपण ह्या जगात राहतो आहे. आपल्यासारखे किती यात्रिक आले आणि गेले ह्याला गणना नाही. आणि किती ओझे होते आपल्याला आपल्या छोट्याश्या संसाराचेदेखील! कारण आपण हे माझे, ते माझे, आणि तेही माझे असे ‘माझे माझे’ करत जगतो. आपण ह्या ओझ्यांमुळे पार दमून जातो. वाकून जातो, मोडून जातो. आणि शेवट काय तर आपल्याला हे सगळे ओझे इथेच टाकून जायचे असते. उमर खय्यामची अशीच एक रुबाई आहे -

‘Think, in this batter'd Caravanserai

Whose Portals are alternate Night and Day,

How Sultan after Sultan with his Pomp

Abode his destined Hour, and went his way.’

(हे जग म्हणजे आहे एक, उध्वस्त धर्मशाळा

दिवस रात्रीच्या आहेत, तिजला सताड खोल्या

गर्वोन्नत राहिले तरीही, नृपती कितीतरी येथे

मार्गास परंतू त्यांची, येता वेळ ते चालू पडले)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

४२)

‘ ‘मा निषाद’ शब्दाआधी सुटला बाण

रतिरमल - विधीने लिहिले होते मरण

आकान्त अश्रुचा कल्पान्ताला भिडला

नव मानव तमसेकाठी जन्मा आला।।

‘मा निषाद’ हा काय प्रकार आहे? हे समजले तरच ह्या रुबाईचा अर्थ कळतो. संस्कृतमध्ये लिहिला गेलेला पहिला श्लोक ‘मा निषाद’ ह्या शब्दांनी सुरू होतो. तो श्लोक असा आहे -

‘मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।

यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम् ॥

वाल्मिकी ऋषी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी उतरलेले असताना, त्यांना काममग्न क्रौंच पक्षाचे जोडपे दिसते. त्यांना अतिशय आनंद होतो. तेवढ्यात एक बाण येतो आणि त्यातील नराला लागतो. तो विद्ध होऊन खाली पडतो. मादी इकडेतिकडे उडत विलाप करू लागते. तेवढ्यात ज्याने बाण चालवलेला होता, तो निषाद तिथे येतो. त्याला बघून वाल्मिकी क्रुद्ध होतात आणि त्यांच्या मुखातून वरील शाप श्लोकरूपातून बाहेर पडतो.

त्या श्लोकाचा अर्थ असा – ‘हे निषादा, तुला अनंत कालपर्यंत प्रतिष्ठा (शांतता) न मिळो. कारण तू कामक्रीडेमध्ये मग्न अशा बेसावध जोडीतील एकाची हत्या केली आहेस.’

पुढे ध्यान करायला बसल्यावर त्यांच्या लक्षात आले की, आपल्या मुखातून ज्या ओळी बाहेर आल्या, त्यात आठ अक्षरांचे चार चरण आहेत. शब्दांच्या ह्या रचनेला त्यांनी श्लोक हे नाव दिले. पुढे त्याच ध्यानात त्यांना ‘रामायण’ लिहिण्याची प्रेरणा झाली. त्या संदर्भात किणीकर लिहीत आहेत-

‘ ‘मा निषाद’ शब्दाआधी सुटला बाण

रतिरमल - विधीने लिहिले होते मरण

त्या पक्षातील एकाचे मरण कामक्रीडा करताना बाणाने होणार, हे विधिलिखित होते. कारण ‘त्याच्या’ इच्छेशिवाय इथे काहीच होत नाही. त्या घटनेच्या मागोमाग पक्षिणीने आकांत केला.

‘आकान्त अश्रुचा कल्पान्ताला भिडला’

तो आकांत पाहून वाल्मिकी ऋषी क्रुद्ध झाले. त्यांनी अनंत कालपर्यंतच्या अशांततेची घोषणा केली. ह्या अर्थाने पक्षिणीच्या अश्रूंचा आकांत कल्पांतापर्यंत पोहोचला. पुढे किणीकर लिहितात -

‘नव मानव तमसेकाठी जन्मा आला।।’

अशा रीतीने त्या अशांततेचा प्रवाह जिथून सुरू झाला, त्या तमोमय प्रवाहाची सुरुवात जिथून झाली, त्या तीरावर नवा मानव जन्माला आला. नवा मानव अशासाठी की, ज्या क्षणी श्लोकाचा जन्म झाला, त्या क्षणी काव्याच्या जन्म झाला. मानव प्रगत झाला. मानवाने पुढच्या युगात उडी घेतली. पण ह्या नव्या मानवाच्या जन्माची सुरुवात अशांततेच्या शापाने झाली, हे विसरता येत नाही.

किणीकरांच्या कवितेतील आशयघनता पचवायची असेल, तर खूप विचार करायला लागतो. ह्या अर्थाने ते मर्ढेकरांच्या खूप जवळचे आहेत.

४३)

‘वाटा हो साखर घरात आला एक

वाढा हो भाकर दारी आला एक

एकलाच आला सोबत होते दोघे

एकलाच गेला, चौघे उरले मागे।।’

अतिशय साधी रुबाई. नवीन जन्म झाला, साखर वाटा. दारी भिकारी आला त्याला भाकर वाढा. दोन्ही आगमनेच. किणीकरांना त्यातला फरक जाचत असावा. दोन्ही माणसेच, मग त्या दोघांच्या आगमनात इतका फरक का असावा?

पुढे किणीकर मोठ्या सत्याकडे जातात. माणूस जन्माला येतो, त्या वेळी त्याच्या सोबत आई आणि बाप असे दोघे असतात. तो जातो त्या वेळी त्याच्या मागे चौघे उरतात. त्याला खांदा देणारे चौघे, किंवा मग त्याच्या कुटुंबाचा विस्तार झालेला असतो, ह्या अर्थाने चारचौघे.

माझे-तुझे करत, आपत्याला महत्त्व देत आणि भिकाऱ्याला बाहेरचं म्हणत चालत राहणारी जगरहाटी चालूच राहते. ही जगरहाटी चालवणारा गेला, तरी मागे उरलेले चारचौघे ती जगरहाटी चालवत राहतात.

४४)

‘विरघळून गेले अनंत काळोखात

वितळले संपले धगधगत्या राखेत

चाकात मोडली चढणावरची गाडी

गंगेत वाहते अजुनि चिमकुली काडी।।

मरण आले. हे शरीर धारण करून जो आत्मा  आला होता, तो मानवांच्या दृष्टीने काळोखात विरघळून गेला. सगळे अस्तित्व आगीत संपले. धगधगत्या राखेत त्याचा अंत झाला.

एखाद्या गाडीचे चाक चढणावर मोडावे, अशी अवस्था झाली. चालती गाडी अचानक चाकात मोडली. त्या गाडीची एक छोटी काडी गंगेत अजून वाहते आहे. मरणाऱ्याची राख गंगेत सोडली गेली, पाण्यात सोडली गेली, त्या राखेचे काही कण अजूनदेखील गंगेत वाहत असतील. गेलेल्या मानवाचे काही कर्तृत्व असते, ते मागे उरते. ह्या मानव्याच्या गंगेत ते काडीच्या रूपाने का होईना, वाहत राहते.

४५)

‘स्वर्गाची असते सोन्याची का माती

का व्यर्थ घालता नरकाची हो भीती

स्वर्गास असे नरकाचे आतुन दार

ते नाणे खोटे, खोटा तो बाजार।।’

स्वर्ग आणि नरक ही बक्षीस आणि भीती ह्या दोन गोष्टींवर अवलंबून असलेली व्यवस्था आहे. ह्या व्यवस्थेतील फोलपणा दाखवण्यासाठी किणीकर विचारतात -

‘स्वर्गाची असते सोन्याची का माती’

आम्हाला बक्षीसाची खोटी आशा का दाखवता?

‘का व्यर्थ घालता नरकाची हो भीती’

आम्हाला नरकाची खोटी भीती का घालता?

स्वर्ग आणि नरक हे माणसाच्या मनातच असतात. स्वर्गाची हाव धरायला जाल, तर मनाच्या नरकातच अडकून पडाल. आध्यात्मिक माणसांचा बक्षीस आणि भीती ह्या दोन्हीवर विश्वास नसतो. ह्या दोन गोष्टी वापरून लोकांना मार्गावर ठेवण्याच्या प्रयत्नात शेवटी ज्या व्यक्तीला मार्गावर आणायचे आणि ठेवायचे आहे, त्या व्यक्तीचे नुकसानच होते.

जी काही सुख-दुःखे ह्या आयुष्यात येतील, ती विनयाने भोगून पुढे जाण्यामुळेच तुम्ही शुद्ध चैतन्याच्या जवळ जाता, अशी आध्यात्मिक माणसाची धारणा असते.

स्वर्ग आणि नरक हे मनाला मोहवणारे आणि घाबरवणारे प्रकार आहेत. सत्य, देव, शुद्ध चैतन्य, हे सारे मनाच्या पलीकडचे आहे. स्वर्गात तुम्ही सुखे भोगणार, नरकात तुम्ही दुःखे भोगणार. म्हणजे तुम्ही मनाच्या पातळीवरच राहणार. म्हणजे शेवटी नरकच.

येथे सुख आणि आनंद ह्यातला फरक ध्यानात घ्यावा लागेल. सुख मनाचे असते. आनंद हा स्वयंभू असतो.

ह्या अर्थाने सुख कर्मात अडकवते, स्वर्ग कर्मात अडकवतो. आणि नरक तर काय कर्माचे विषारी फळच असते. ह्या अर्थाने स्वर्ग आणि नरक ही खोटी नाणी आहेत. बक्षीस आणि भीती ह्यांचा हा खोटा बाजार आहे.

४६)

‘कल्पवृक्ष भारी गेला पहा चुलीत

श्रीलक्ष्मी घाली खानावळ चौकात

दुर्गंध पसरला, अमृत सडले कुजले

स्वर्गात बिचारे देव निराश्रित झाले।।

काही रुबायांमध्ये किणीकर फार बंडखोरपणे अभिव्यक्त झाले आहे आहेत असे वाटते, पण ती अभिव्यक्ती पाखंडी बंडखोरीची नाही.

कल्पवृक्ष तुम्हाला काय देतो? तो तुमच्या मनाला पाहिजे ते देतो. म्हणजे तुम्हाला मनाच्या पातळीवर अडकवतो. तो तुम्हाला मनाच्या पार जाऊ देत नाही. म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने तो चुलीत घालण्याच्याच लायकीचा असतो. एखादी बाई खानावळ घालून भूक भागवते, त्याप्रमाणेच पैसा मानवाच्या विविध भुका भागवण्याचेच काम करतो. सुखे पुरवण्याचे काम करतो.

अमृत तरी काय करते? तुम्हाला अमर बनवते. पण आत्मा अमरच असत नाही काय? म्हणजे अमृत तुम्हाला शरीरात अमर करते. तुम्हाला तुमचा आत्मा अमर आहे, हे पुरत नाही. तुमची शारीरिक अस्तित्वाची हौस भगवते इतकेच! शरीर म्हणजे दुर्गंधी, आणि कर्माची दुर्गंधीही शरीराच्या मोहापोटीच वाट्याला येते.

ह्या अमृताच्या मोहापोटी देव आणि दानवात किती मारामाऱ्या! देवलोकातील शरीरे दिव्य असतील, पण शारीर अस्तित्वाचा किती तो मोह! परमेश्वराच्या पातळीवर जायची कुणाला अजिबात इच्छा नसते. कल्पवृक्ष, श्री लक्ष्मी आणि अमृत ह्या सगळ्यात अडकल्यामुळे देवसुद्धा परमेश्वरापासून, सगळ्या विश्वाच्या बापापासून दुरावले, निराश्रित झाले.

४७)

‘दे लाथ, पेटवी कुजला हा देव्हारा

लागो न कुणाला देवाचाही वारा

थकलास बडवुनी कपाळ उंबरठ्याला

ना आई नाही बाप तुझ्या देवाला।।

रुबाईकार कर्मकांडाच्या विरुद्ध असतात. कर्मकांडे कुजलेल्या देव्हाऱ्यासारखी असतात. त्यांना नाकारण्यातच माणसाचे हित असते. ह्या देवाचा वारासुद्धा कुणाला न लागो, अशी अवस्था कर्मकांडी धर्मामुळे येते. परमेश्वर वेगळा, देव वेगळे हे आपण येथे लक्षात घ्यायला हवे. तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाच्या आहारी जाता. अध्यात्माच्या दृष्टीने पाहिले, तर तुमची कर्मे तुमच्या इच्छा पूर्ण होतील की नाही ते ठरवतात. देव कशाला कुणाच्या इच्छा पूर्ण करेल?

परम तत्त्व हे निराकार आहे. त्याला स्वतःला आई-बाप नाही. त्यामुळे ते तुमच्या इच्छांशी खऱ्या अर्थाने एकरूप होत नाही.

नामदेवाचे पिता दामाजीपंत नामदेवाला समजावून सांगत असतात की तू त्या विठ्ठलाच्या नादी लागू नकोस. कारण त्याचे आपले स्वतःचे असे कोणी नाहिये. तू कोणाशी परका भाव राखत नाहीस, तो कोणाशी आप-भाव राखत नाही. कसे जमणार तुमच्या दोघांचे? ते अभंगात म्हणतात -

‘तुज नाही पर। त्यास नाही आप।।’

कर्मकांडाच्या मागे लागलेल्या लोकांना, आणि देव आपल्या इच्छा पूर्ण करेल ह्यासाठी डोके आपटणाऱ्या लोकांना, किणीकर सांगत आहेत -

‘ना आई नाही बाप तुझ्या देवाला।’

४८)

‘कीर्तनात गातो- माझी माय विठाई

फिरवतो तिला जणु बाजारातिल बाई

ते मंदिर फोडा, फोडुनि टाका मूर्ति

लखलाभ असो भडव्यांना ती अपकीर्ती।।

कर्मकांडी लोक दांभिक असतात. त्यांचे देवावर प्रेम नसते. त्यांचे स्वतःवर प्रेम असते. कीर्तनकारबुवा पैसा आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून कीर्तन करतात. कीर्तनात जरी ते विठ्ठलाला विठाई - आई म्हणत असले तरी त्यांच्या दृष्टीतून तो देव पैसे मिळवून देण्याचेच साधन असतो. तुकारामाने विठ्ठलाला प्रेमाने आई म्हणणे वेगळे आणि कीर्तनकराने पैशासाठी विठ्ठलाला आई म्हणून गळा काढणे वेगळे!

ह्या बाजार म्हणून मांडलेल्या मंदिरांपासून आपण दूर जायला पाहिजे. बाजार म्हणून मांडलेल्या मूर्त्यांपासून आपण दूर जायला पाहिजे. मंदिरांचा आणि मूर्त्यांचा बाजार मांडणे, ही अपकीर्ती आहे. ती देवाचा वापर करणाऱ्या बडव्यांना लखलाभ असो!

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

रॉय किणीकर रुबाईची परंपरागत ताकद आणि भारतीय आध्यात्मिक जीवनदृष्टी ह्यांच्या मिलाफातून एक वेगळेच जादूभरले रसायन तयार करतात…

रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

रॉय किणीकर ‘आधुनिक काळा’तील बंडखोर प्रवृत्तीचे कवी होते. म्हणून त्यांनी शारिरिक प्रेमाच्या रुबाया लिहिल्या...

रॉय किणीकर मोठे ठरतात ते त्यांच्या जीवनदृष्टीमुळे. त्यांच्या जाणीवेला एकाच वेळी मानवी जीवनातले आदर्श आणि पाशवीपणासुद्धा दिसतो!

.................................................................................................................................................................

४९)

‘तो मृदंग खोटा, खोटी वीणा टाळ

जाळून तुळस, हा गळ्यात घाली माळ

नाचवी पताका काढ़ुनि यात्रा- दिंड

माउली होतसे याची रात्री रांड।।

काही लोकांच्या इच्छा आणि वासना इतक्या अनावर असतात की, त्यांच्या पूर्ततेसाठी ते लोक पराकोटीच्या दंभाने वागतात. असे दांभिक लोक सतत उदात्त भावनांचे प्रदर्शन करत असतात. इथे एक गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे - स्वतःमध्ये रमलेल्या माणसामध्ये उदात्त भावना कशा राहायला येतील?

हे लोक धर्माला आणि साक्षात देवाला ओलीस ठेवतात. वेठीला ठेवतात. ह्यांचे मृदुंग वाजवणे खोटे असते, भावहीन असते. ह्यांचे वीणावादन खोटे असते, भावहीन असते. ह्यांचे टाळ वाजवणे खोटे असते, ह्यांचे ताल धरणे खोटे असते. हे लोक पवित्र तुळस जाळून तिच्या लाकडापासून तुळशीची माळ तयार करतात. दिवसा दिंड्या-पताका नाचवून हे लोक पैसा मिळवतात आणि रात्री त्या पैशाने स्वतःचे नाही नाही तो शौक पुरे करतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

५०)

‘हा दिवसा घेतो संताचा सन्मान

अंधार उतरता होइल हा सैतान

बोंबलतो म्हणतो, सूर्याचा मी पणतू

सांडले वीर्य- वळवळला त्यातिल जन्तू।।

दंभाविषयी किणीकरांच्या मनात तीव्र द्वेष होता. दिवसा संत आणि रात्री हैवान बनणारे कितीतरी ‘साधू-संत’ समाजाने पाहिलेले असतात. दिवसा उदात्त भावनांचे प्रदर्शन करायचे आणि रात्री क्षुद्र आणि हिडीस वासनांच्या आहारी जायचे, हा प्रकार अनेक लोक करत असतात. खरं तर, रात्रीच्या मजेसाठी ते लोक दिवसा, जे जे काही दिव्य आणि उदात्त आहे त्याचा घोषा लावत असतात. 

सकाळी हे लोक आपण साक्षात चैतन्याचे अवतार आहोत, असे भासवत असतात. थोडे जवळ जाऊन पाहिले तर हे लोक रात्रीच्या वीर्य-स्खलनासाठीच हे सर्व करत असतात. स्वतःला सूर्याचा, साक्षात चैतन्याचा वंशज म्हणवणारे हे लोक स्खलित वीर्यात वळवळणारे जंतू असतात.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......