रॉय किणीकर मोठे ठरतात ते त्यांच्या जीवनदृष्टीमुळे. त्यांच्या जाणीवेला एकाच वेळी मानवी जीवनातले आदर्श आणि पाशवीपणासुद्धा दिसतो!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
श्रीनिवास जोशी
  • रॉय किणीकर आणि त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Mon , 18 March 2024
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो रॉय किणीकर Roy Kinikar उत्तररात्र Uttarratra रुबाया Rubaiya उमर खय्याम Omar Khayyam

रॉय किणीकर हे मराठी साहित्यातलं एक ‘अजब’ प्रकरण आहे. आणि त्याहून ‘गजब’ आहेत त्यांच्या कविता, त्यातही ‘रुबाया’. ‘उत्तररात्र’ हा त्यांच्या रुबायांचा संग्रह. वाचकप्रिय, समीक्षकप्रिय आणि लोकप्रिय ठरलेल्या या संग्रहातील रुबायांचं रसिलं रसग्रहण करणारी ही लेखमाला आजपासून द्वि-साप्ताहिक स्वरूपात - दर शुक्रवारी आणि सोमवारी...

.................................................................................................................................................................

३१)

‘बेसावध पदराआड भेटले डोळे

अन् टोक जिभेचे अधरावरूनी फिरले

रंगला रक्तचंदनी पदर अन् पोत

पान्हवली स्वप्ने भरलेल्या पदरात।।

प्रियकर आणि प्रेयसी ह्यांची नजरानजर झाली. तीसुद्धा प्रेयसी बेसावध असताना. तिच्या हृदयाचा ठोका चुकला. जीभ कोरड्या पडलेल्या ओठांवरून फिरली. त्या पाठोपाठ, भावनांचा कल्लोळ तिच्या हृदयात उडाला. छातीची धडधड वाढली. रक्तदाब उसळला! वाढलेल्या श्वासांमुळे पदर खालीवर होऊ लागला. ह्याच अर्थाने किणीकरांनी पुढची ओळ लिहिली आहे काय?

‘रंगला रक्तचंदनी पदर अन् पोत’

का ‘सेक्सच्युअल एक्साइटमेंट’मुळे छातीवर येणारे लाल पुरळ किणीकरांना अपेक्षित आहे?

पुढची ओळ तर फार बहारीची आहे. प्रणयाच्या अपेक्षेने स्तन तट्ट झालेले आहेत. प्रणयाच्या स्वप्नांनी त्यांना जणू पान्हा फुटला आहे.

पान्हवली स्वप्ने भरलेल्या पदरात’

कामभावनेचा इतका काव्यात्म आणि मुक्त आविष्कार मराठी कवितेने आजवर फार क्वचित पाहिला आहे!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

३२)

‘ते स्वप्न कालचे ठेव तिथे पायाशी

ते स्वप्न उद्याचे ठेव तिथेच उशाशी

हा भरला येथे स्वप्नांचा बाजार

घे हवे तुला ते, मिळते स्वप्न उधार।।’

पहिल्या तीन ओळी अगदी सरळ आहेत. हे जीवन म्हणजे स्वप्नांची एक मालिका आहे. इथे माणसाच्या मनात रोज नवनवीन स्वप्ने राहायला येतात. त्याप्रमाणे माणूस प्रयत्न करतो. कधी जिंकतो, कधी हरतो.

किणीकर सांगत आहेत स्वप्ने दूर ठेवा.

‘ते स्वप्न कालचे ठेव तिथे पायाशी

ते स्वप्न उद्याचे ठेव तिथेच उशाशी

ह्या जगात कितीतरी स्वप्ने आहेत. हे जग स्वप्नांनी भरलेले आहे. कितीतरी स्वप्ने. कर्तबगारीची, सुखाची, परोपकाराची, समाजसेवेची, शौर्य गाजवण्याची... कितीतरी प्रकारची स्वप्ने.

‘हा भरला येथे स्वप्नांचा बाजार

शेवटची ओळ थोडी वेगळी आहे.

घे हवे तुला ते, मिळते स्वप्न उधार।।’

हे स्वप्न उधार मिळण्याची काय भानगड आहे?

ह्या जगात तुम्हाला सगळेच उधार दिले गेले आहे. ही माया आहे. हातून स्वप्ने जशी झोप जाताच निसटून जातात, त्याप्रमाणे हे जगसुद्धा आपल्या हातातून निसटून जाते. तुमची माणसे, तुमचे मन, तुमच्या भावना - सगळे सगळे थोड्या काळासाठी दिले गेलेले आहे. ते सगळे तुमच्या हातातून निसटून जाणार आहे. हे सर्व जीवनच तुम्हाला उधार दिले गेलेले आहे. ते परत घेतले जाणार आहे.

तुमच्या जशा वासना आहेत - म्हणजे तुमच्या जन्मापासून तुम्हाला काही प्रवृत्ती आहेत, काही आवडी आहेत. त्याप्रमाणे तुमच्या मनात इच्छा तयार होतील. त्या इच्छांनुसार तुमच्या मनात विचार येतील. त्याप्रमाणे तुमच्या भवताली वातावरण तयार होईल. त्याप्रमाणे तुमच्या हातून कर्मे होतील आणि त्यातून पुन्हा काही वासना आणि प्रवृत्ती तयार होतील.

पण वासनांप्रमाणे तयार होणाऱ्या ह्या इच्छा, ही स्वप्ने ही उधार आहेत. ही स्वप्ने आणि त्यातून येणारे सुख-दुःखे दोन्ही तात्पुरती आहेत. येथे पाहिजे ते स्वप्न मिळेल, पण उधार मिळेल! उमर खय्याम अशीच भावना व्यक्त करताना दिसतो.

‘YESTERDAY This Day's Madness did prepare;

TO-MORROW's Silence, Triumph, or Despair:

Drink! for you not know whence you came, nor why:

Drink! for you know not why you go, nor where.’

(कालच्या दिवसात मुळे रोवली गेलीत आजच्या वेडाची

आणि उद्याच्या शांततेची, विजयांची आणि दुःखाचीही

प्या! माहीत नाही तुम्ही कोठून आलात आणि का ते,

माहीत नाही का जाणार तुम्ही येथून आणि कुठे ते ही!)

३३)

‘हा संसारी, स्वछंदी, हा संन्यासी

हा कैदी जाइल उद्या पहाटे फाशी

हा कर्मवीर, हा कुबेर, हा कंगाल

तळमळती स्वप्नासाठी डोळे लाल।।

ह्या जगात माणसे अनेक प्रकारच्या भूमिका वठवत असतात. संसारी आणि संन्यासी, कैदी आणि कर्मवीर, कुबेर आणि कंगाल - अशा कितीतरी विरोधाभासी व्यक्तिमत्त्वांनी हे जग भरलेले आहे.

विविध वासनांप्रमाणे स्वप्ने आणि कर्मे तयार होतात. त्याप्रमाणे भविष्ये तयार होतात. ह्या भूमिकांची अदला-बदल सुद्धा अपरिहार्य आहे. आजचा कंगाल उद्याचा कुबेर असू शकतो. आजचा कर्मवीर उद्याचा कैदी असू शकतो. आजचा संन्यासी उद्याचा संसारी असू शकतो.

ह्या सगळ्या लोकांमध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे हे सगळे स्वप्नांसाठी तळमळत आहेत. ह्यांच्यात विविध वासना भरून राहिलेल्या आहेत. त्यामुळे विविध स्वप्ने सातत्याने तयार होत राहतात. त्यामुळे विविध कर्मे सातत्याने तयार होत राहतात आणि त्यामुळे विविध भविष्ये सातत्याने तयार होत राहतात. जगण्याची इच्छा, स्वप्नांची तळमळ सगळ्यांमध्ये सारखीच आहे. ह्या जगात कोणी काहीही असो, वासनांच्या पातळीवर सगळे सारखेच आहेत. उमर खय्यामची ह्याच धर्तीवरची एक रुबाई आहे -

‘We are no other than a moving row

Of Magic Shadow-shapes that come and go

Round with the Sun-illumined Lantern held

In Midnight by the Master of the Show;’

(आपण आहोत फक्त एक रांग रंगमंचावरच्या नटांची,

जादूभरल्या भूमिका जगत - फिरत राहतो आपण गोलगोल;

मध्ये उभा आहे 'तो', कंदिल सूर्याचा आपल्या हातात घेऊन

ऐन मध्यरात्री, निर्माता ह्या खेळाचा - सावरत सगळ्याचा तोल)

३४)

‘चोरून चालला डोळ्यांचा कांगावा

मोडला जरासा उजवा, भरला डावा

डळमळली हंडी, फुटे दुधाचा काला

वाहून चालला वसुदेवाचा पेला।।

ह्या रुबाईचा अर्थ लक्षात घ्यायचा असेल तर वसुदेव आणि वासुदेव ह्यातील फरक लक्षात घ्यायला पाहिजे. वसुदेव हे श्रीकृष्णाच्या वडिलांचे नाव. वासुदेव हे श्रीकृष्णाचे स्वतःचे नाव. वसुदेवाचा मुलगा तो वासुदेव. बाल श्रीकृष्णाच्या गोकुळामध्ये बाललीला सुरू आहेत. सगळा गोंधळ उडालेला आहे.

‘चोरून चालला डोळ्यांचा कांगावा

मोडला जरासा उजवा, भरला डावा’

तो क्षणात उजवा डोळा मिचकावून आपल्या छोट्या मित्रांना खोड्या काढण्यासाठी बोलावतो आहे. खोड्या पकडल्यावर त्याचा डावा डोळा अश्रूंनी भरून येतो आहे. एका डोळ्याने खोड्या रचायच्या आणि दुसऱ्या डोळ्याने रडून कांगावा करून सुटका करून घ्यायची, असा सर्व प्रकार सुरू आहे. रडून कांगावा करून सुटका करून घेतली की, पुढच्या क्षणी दह्या दुधाच्या हांड्या फुटत आहेत.

‘डळमळली हंडी, फुटे दुधाचा काला

वाहून चालला वसुदेवाचा पेला।।

प्रत्येक दही हंडी फुटल्यावर गवळणी प्रेमाने वैतागत आहेत. ही सारी लीला बघून वसुदेव संतोष पावत आहे. त्याच्या सुखाचा पेला भरून वाहतो आहे. किणीकरांनी रचलेली एक अप्रतिम रुबाई!

३५)

‘या इथे घेतली त्या दोघांनी शपथ

चुरगळले पदराआड जरासे हात

घातली मिठी आवळून दोन्ही बाहू

अडवून म्हणाली, नका नका ना जाऊ।।’

एक छोटा पण ‘इन्टेन्स’ भावनिक प्रसंग. एक नाट्यमय प्रसंग. प्रेमाची शपथ घेतल्यावर निघण्याचा प्रसंग आला. दुरावा काहीतरी कारणाने येणारच. लग्न होईपर्यंत दूर राहायचे असेल, संध्याकाळ संपली म्हणून आपापल्या घरी जायचे असेल. कदाचित काही काळ दुसऱ्या गावाला जायचे असेल. शिक्षणासाठी जायचे असेल. कदाचित कायमचे दूर जायचे असेल.

तिची बोटे अस्वस्थपणे पदरात गुंतली असतील. भावना अनावर होत असताना पदराच्या टोकाने हात स्वतःला आवरत असतील. एका क्षणी सगळे बांध सुटले आणि तिने आवेगाने त्याला मिठी मारली. आणि ती त्याला अडवत म्हणाली - नका ना मला सोडून जाऊ.

३६)

‘घेतली शपथ मावळत्या सूर्यफुलाची

घेतली शपथ सुकलेल्या निशिगंधाची

मोहाचे फुटले मोहळ संभोगार्थ

निर्माल्य प्रीतिचे झाले अश्रू तीर्थ ।।

ही खऱ्या प्रेमाविषयीची रुबाई आहे.

प्रेमाच्या शपथा घेतल्या गेल्या म्हणून प्रेम खरे असते का? मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून शपथ घेतली - सूर्याला अगदी सूर्यफूल म्हणण्याचे काव्य करून शपथ घेतली! पण म्हणून प्रेम खरे होते का? सुखाची रात्र घालवल्यानंतर सकाळी सुकलेल्या निशिगंधाच्या साक्षीनेसुद्धा शपथ घेतली गेली.

खरं तर संभोगसुखाच्या मोहाचे मोहोळ अंतर्मनात फुटलेले असते. त्या संभोगसुखाची आचच माणसाच्या बाह्य मनाला प्रेमाच्या शपथा घ्यायला लावत असते. एकदा पाहिजे तेवढे सुख मिळाले की, सूर्याचे फूल करून त्याच्या शपथा घेणारे 'प्रेम' ओसरते. प्रीतीच्या फुलाचे निर्माल्य होते. प्रीतीच्या फुलाचे अश्रूतीर्थ होते.

‘मोहाचे फुटले मोहळ संभोगार्थ

निर्माल्य प्रीतिचे झाले अश्रू तीर्थ ।।

प्रेम संपले, एक सुंदर अध्याय संपला, म्हणून त्याच्या निर्माल्यावर अश्रू पडतात. पण खरंच ते प्रेम, खरे प्रेम असते का? का फक्त मोहाच्या फुटलेल्या मोहोळाची गुणगुण असते?

३७)

‘ही प्रीती नाही दगडावरची रेघ

ती आहे चंचल पाण्यावरची आग

प्रीतीचा नसतो अक्षत अन्तरपाट

का वेड्या असते ती जन्माची गाठ।।

आमरण प्रेमाच्या शपथा वगैरे घेतल्या जातात. आजन्म प्रेमात राहण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. पण, प्रेम एवढी शाश्वत गोष्ट आहे का? ती दगडावरच्या रेघेसारखी टिकावू असते का?

‘ही प्रीती नाही दगडावरची रेघ’

ती दगडावरची रेघ नसेल तर मग, ती काय आहे?

‘ती आहे चंचल पाण्यावरची आग’

पाण्याच्या लाटांवर तरंगणाऱ्या आगीइतकी प्रीती अस्थिर असते. क्षणभंगूर असते. पाण्यावरची आग जेवढी सुंदर दिसते तेवढीच प्रीती सुंदर दिसते आणि असतेही. आग ‘इन्टेन्स’ असेल, तरच ती पाण्यावर किंवा पाण्यामध्ये टिकू शकते.

ज्वालामुखीचा लाव्हा समुद्रात तेजाळत राहतो. पण, कितीवेळ? हळूहळू पाण्याच्या स्पर्शाने त्याचाही दगड होतो. प्रीतीचेही तसेच असते. अतिपरिचयाच्या पाण्यामुळे म्हणा, कालाच्या पाण्यामुळे म्हणा, अतिशय सुंदर प्रीतीचाही दगड होतो. प्रीतीच्या अंतरपाटाला भोके पडतात, तो जीर्ण होऊन जातो.

‘प्रीतीचा नसतो अक्षत अन्तरपाट’

लग्न ही एकवेळ जन्माची गाठ आहे असे म्हणता येईल. पण, प्रेमाविषयी तसे कसे म्हणता येईल?

‘का वेड्या असते ती जन्माची गाठ’

आपण प्रेमात पडतो तेव्हा ते अमर आहे असे वाटते. पण, ती फक्त पाण्यावर लागलेली आग असते. अतिशय सुंदर, पण क्षणभंगूर!

३८)

‘बहरले झाड मोहाचे - त्याला शाप

वेटाळुन बसले त्यावर कांचन - सर्प

फळ तोडु नको ते सर्प धरितसे दंश

अमृतास येता साय होतसे वीष।।

फारच भरदार रुबाई आहे ही!

मानव मोहून जावा असे अनेक मोह ह्या जगात आहेत. किंबहुना, हे जगच मोहाने बनलेले आहे. हे जग म्हणजे एक मोहाचे झाडच आहे. हे जग म्हणजेच मोह आहे. पण मग त्याला वेटाळून बसलेले कांचन सर्प कोणते आहेत?

मोहातून कर्मे तयार होतात. कर्मे आपल्याला ह्या, वरून मोहाच्या पण, मूलतः दुःखदायक जगात अडकवतात. ह्या अर्थाने ह्या मोहाच्या झाडाची फळे तोडायला आपण गेलो, तर कर्माचे सर्प आपला चावा घेतात.

हे सर्प कांचनाचे आहेत असे का म्हटले आहे? हे सर्पसुद्धा आकर्षक आहेत. मानवाला कर्मेसुद्धा आकर्षक वाटतात. त्यांची दारुण परिणीती कर्मे करताना लक्षात येत नाही. मोठ्या झोकात स्वतःला कर्मयोगी वगैरे म्हणवून घेत मानव कर्मे करतो. एखादा उद्योजक आपण आपल्या कर्मचाऱ्यांचे संसार चालवत आहोत ह्या झिंगेत अनेक आर्थिक गैरव्यवहार करत असतो. स्वतःला सुखासीन आयुष्यात डुबवत असतो.

काही लोकांना झाड, सर्प आणि विषाचा दंश वगैरे वाचून ख्रिश्चन धर्माची आठवण येते. पण तिथे फळ चाखायला लावणारा सर्प दंश करत नाही. फळ खाऊ नका असे सांगितले तरी खाल्ले म्हणून देवाने ईडनमधून हकालपट्टी केली आहे. ह्या रुबाईची शेवटची ओळ तर अफलातून आहे.

‘अमृतास येता साय होतसे वीष।।’

अमृताचा संदर्भ चिरंजीव असण्याशी आहे. आत्मा चिरंजीव आहे. पण त्याचा मायेशी संपर्क आला की, त्यावर मर्त्य देहाचे आवरण चढते. दूध द्रव आहे. त्याचा ऊष्णतेशी संपर्क आला की, त्यावर घन साय चढते.

आत्मा मायेच्या संपर्कात आला की, तो मृत्यूच्या संपर्कात येतो. ह्या अर्थाने अमृताचे विष बनते. किणीकरांची विविध विचारांवर किती पकड होती, आणि त्याच बरोबर काव्यावर किती पकड होती, हे ह्या रुबाई सारख्या रुबाया वाचल्या की, आपल्या लक्षात येते.

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

रॉय किणीकर रुबाईची परंपरागत ताकद आणि भारतीय आध्यात्मिक जीवनदृष्टी ह्यांच्या मिलाफातून एक वेगळेच जादूभरले रसायन तयार करतात…

रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

रॉय किणीकर ‘आधुनिक काळा’तील बंडखोर प्रवृत्तीचे कवी होते. म्हणून त्यांनी शारिरिक प्रेमाच्या रुबाया लिहिल्या...

.................................................................................................................................................................

३९)

‘देहाचे मीलन, निसर्ग घडवी पाप

अज्ञात मनातिल प्रियकर असतो बाप

ती सप्तपदी - स्वप्नांचे झुंबर सात

शत - दीप पेटतिल हलता त्यातिल ज्योत।।

देहांचे मीलन होते, पण जर स्त्रीच्या अज्ञात मनात त्या वेळी कोणी दुसरा प्रियकर असेल, तर होणाऱ्या अपत्याचा नक्की बाप कोण? हे पापाचे अपत्य नाही का? हे पाप नाही का?

स्त्रीच्या अज्ञात मनात काय आहे, हे तिलाही माहीत असणे शक्य नसते. आपल्याला नक्की कुठल्या पुरुषत्वाची ओढ आहे, हे तिलाच माहीत नसते. तिने ती पुरुष-प्रतिमा कुठल्यातरी पुरुषावर आरोपित केलेली असते. पुरुषाची जी आयडिया तिच्या मनात असते, ती तिने कुणाला तरी पूर्ण न ओळखता त्याच्यावर आरोपित केलेली असते. मग तो पुरुष खऱ्या अर्थाने त्या मीलनातून जन्माला येणाऱ्या अपत्याचा बाप आहे, असे म्हणता येईल का?

किंवा तिच्यात मीलनाची प्रेरणा भरणारा निसर्ग हाच खरा बाप नाही का?

सप्तपदी हे किती आदर्श स्वप्न! सात पावले. एक अन्नासाठी, एक बलासाठी, एक धनासाठी, एक सुखासाठी, एक परिवारासाठी, एक ऋतुचर्येसाठी आणि शेवटचे मित्रतेसाठी! एक सात स्वप्नांचे झुंबरच! येऊ घातलेल्या सुखी आयुष्याच्या स्वप्नांचे सात पाकळ्यांचे झुंबर!

ह्या स्वप्नात एक मीलनाचा दीप लागला, एक प्रेमाचा दीप लागला, किंवा ह्या सप्तपदीच्या साहचर्यातून एका नवीन जिवाचा जन्म झाला की त्या सात पाकळ्यातले सर्व दीप पेटून उठतात! एक नवीन गोतावळा सुरू होतो, एका नवीन जिवाचे, एका नवीन कुटुंबाचे चक्र सुरू होते.

आता पहिल्या दोन ओळीतील आशय, खालच्या दोन ओळीतील आशयाच्या पुढे ठेवून बघा. कुटुंबाचे आणि साहचर्याचे आदर्श कुठल्या क्रूर खडकांवर उभे असतात हे आपल्या लक्षात येईल!

रॉय किणीकर मोठे ठरतात ते अशा जीवनदृष्टीमुळे. त्यांच्या जाणीवेला एकाच वेळी मानवी जीवनातले आदर्श आणि मानवी जीवनातील पाशवीपणासुद्धा दिसत असतो. आणि त्यांच्यातील तत्त्ववेत्ता ती सर्व तत्त्वे आपल्या काव्यप्रतिभेच्या साहाय्याने टिपत असतो.

उमर खय्याममध्ये तीव्र भावना आहेत, पण तो किणीकरांसारखा भाववविव्हल होत नाही. भावविव्हल तत्त्वज्ञ ही एक वेगळीच जात आहे. माझ्या मते हे लोक तत्त्वज्ञ म्हणून लोकांना जास्त आकर्षित करतात.

४०)

‘उत्तरेस कलला शुक्र, शिरशिरे गात्र

वेदना म्हणाली, कधी संपते रात्र

काजवा उडे पंखावर घेउनि स्वप्न

भैरवी रंगली, भिजे चांदणे नग्न ।।’

'रोमँटिक सेन्सिबिलिटी' मधून जन्मलेली रुबाई! स्वर्गीय प्रेमभावनेमधून जन्मलेली रुबाई.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

पाश्चात्य जगतातून रोमँटिक नवी कविता कशी आली, ते आपण पाहिले. त्या भावकवितेला अस्सल भारतीय साज कसा चढला ते आपल्याला ह्या कवितेत दिसते.

किती सुंदर रात्र आहे! उत्तरेस कललेला शुक्र आहे. गात्रांमध्ये शिरशिर भरलेली आहे. काजवा आपल्या पंखांवर स्वप्ने घेऊन उडत आहे. कसली स्वप्ने आहेत ही? मीलनाची? कसलीही असोत, पण ती सुंदर आहेत. भैरवी रंगलेली आहे. भैरवी हा पूर्णतेचा राग! संपूर्णतेची भावना, तृप्तीची भावना मनात काठोकाठ भरते, तेव्हा भैरवीचे शुद्ध आणि कोमल सूर लागतात. आणि चांदणे आपल्या सौंदर्यपूर्ण नग्नतेत भिजते आहे. का अजून कशात भिजते आहे? पहाटेच्या दवात की भैरवीच्या शुद्ध आणि कोमल सुरात? पण, ह्या सगळ्या अपूर्व सौंदर्याला शाप आहे. कवीच्या मनात त्या रात्री जागणाऱ्या वेदनेचा. त्यामुळे ही अपूर्व सौंदर्याने झगमगणारी रात्र कधी संपते आहे असे त्याला झाले आहे. पण कसली वेदना आहे? नग्न चांदण्याच्या संदर्भावरून वाटते आहे - ती विरहाची वेदना असावी. दुसऱ्या कुठल्या वेदनेला इतक्या अपूर्व सौंदर्याचा इतका त्रास होईल?

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......