‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
जीवन तळेगावकर
  • ‘द सीईओ माइण्डसेट’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 10 October 2025
  • ग्रंथनामा दखलपात्र द सीईओ माइण्डसेट The CEO Mindset शिव शिवकुमार Shiv Shivakumar

‘द सीईओ माइण्डसेट’ हे शिव शिवकुमार यांचे तिसरे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात २१ छोटी प्रकरणं आहेत. सीईओची मनोवृत्ती बाळगणे म्हणजे नेमके काय तर ‘CHARLIE’ (कम्युनिकेशन, होलिस्टिक थिंकिंग, अबसल्यूट स्टॅण्डर्ड, रिफ्रेमिंग ऑफ इश्युज, लेगसी थिंकिंग, इन्व्हेस्टिंग इन पीपल, एथिकल एक्झिक्युशन). यातील एकेका गुणावर टिप्पण्णी करताना लेखकाने अनेक उदाहरणं दिली आहेत. उदा. गॉल्फर टायगर वुड्सने त्याचा विजय कधी साजरा केला नाही. तो त्याच्या सहकाऱ्याला सांगायचा, “स्टीव्ह विलियम्स, पुढची स्पर्धा कधी आहे? मला अधिक चांगलं खेळावं लागेल.”

सीईओ हा काही केवळ ‘चीफ एक्झेकेटीव्ह ऑफिसर’ नसतो; त्याला चीफ इकोसिस्टिम ऑफिसर, चीफ एंगेजमेंट ऑफिसर, चीफ इमोशन्स ऑफिसर, चीफ एज्युकेशन ऑफिसर, चीफ एक्सप्लेनेशन ऑफिसर, चीफ एक्सपेक्टेशन्स ऑफिसर आणि कॅरेक्टर एक्साम्पल ऑफिसरदेखील असावं लागतं.

७० टक्के सीईओ हे बहुधा कंपनीने आपल्याच चांगल्या लोकांमधून निवडलेले असतात, २० टक्के असे असतात, ज्यांना त्या क्षेत्राचा अनुभव आहे (बहुधा बहुराष्ट्रीय कंपन्या या दोन तत्त्वांचा आश्रय घेतात) आणि १० टक्के असे असतात, जे निवडणाऱ्यांच्या ओळखीचे किंवा त्यांचे नातेवाईक असतात. असे बहुधा ‘कौटुंबिकप्रभुत्व’ असलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये होते.     

लेखक असेही म्हणतो की, सीईओ होण्यासाठी चांगल्या सवयी असाव्या लागतात किंवा त्या शिकाव्या लागतात. उदा. प्राधान्यक्रम, सराव, वेळेचे व्यवस्थापन. भारतात एका मंत्र्याच्या भेटीचा त्यांच्या ग्लोबल सीईओला आलेला अनुभव लेखकाने सांगितला आहे. ‘‘आधी वेळ घेऊनही या मंत्र्याने आमच्या ग्लोबल सीईओला एक तास ताटकळत ठेवले, नंतर दहा मिनिटांसाठी ते भेटले, पण नंतर तो सीईओ या भेटीला ‘किस-द-रिंग मिटिंग’ म्हणाला.” असे लोक स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवत असतात. या बाबतीत सीईओने सावध असायला हवे.

सीईओंना जेवढे माध्यमांसोबत संवाद साधायला आवडते, तेवढे आपल्या टीमसोबत आवडत नाही. हा अवगुण आहे, अशीही नोंद ते करतात. कुठे आणि किती वेळ द्यायला हवा, हे मात्र त्याला ठरवता आले पाहिजे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ तेवढाच असतो.

.................................................................................................................................................................

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा -  Pay Now

.................................................................................................................................................................

प्रत्येक सीईओने किमान दुसऱ्या एका कंपनीच्या कमिटीवर असलेच पाहिजे, असे लेखकाचे मत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतली दिग्गज मंडळी कसा विचार करतात याचा अनुभव येतो. सीईओने टीमवर्क कसे करावे, यासाठी खेळांचा आधार घेऊन त्यांनी काही मॉडेल्स मांडली आहेत- द गॉल्फर अँड कॅडी, द टेनिस डबल्स, द मिलिटरी कमांड अँड कंट्रोल, द फुटबॉल टीम, द आईस हॉकी, द हॉस्पिटल टीम, द एअर ट्राफिक कंट्रोल.

खेळात आणि व्यवसायामध्ये जे सर्वोत्तम खेळाडू असतात, ते चांगले कप्तान असतातच असे नाही; पण खेळात संघसदस्य एकमेकांवर लगेच विश्वास ठेवतात आणि सर्वस्व पणाला लावून खेळतात, तेव्हाच त्यांना विजय मिळतो. व्यवसायामध्ये एकमेकांचा विश्वास लगेच जिंकता येत नाही, त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो.  

सीईओने स्वतःचं प्रेझेंटेशन स्वतः बनवलं पाहिजे. निदान त्यातला मजकूर त्याला ठावूक असायला हवा. एखाद्या स्लाईडसंदर्भात नेमके काय सांगायचे आहे, हे त्याच्या डोक्यात पक्के हवे. किंबहुना काही सीईओ त्यांचे मेसेजेस कागदावर उतरवून ठेवतात, ही एक उत्तम सवय आहे. त्या स्लाईड्वर सीईओला कथा विणता आली पाहिजे. जर तुम्हाला यासाठी वेळ नसेल, तर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात बोलायची आलेली संधी नाकारलेली बरी, कारण सीईओकडून काहीतरी नवं ऐकायला मिळणार म्हणून लोक आलेले असतात. त्यांना तेच ते पुन्हा सांगून आपण आपलीच प्रतिमा मलिन करत असतो. सीईओच्या संभाषणात श्रोता स्वतःला शोधत असतो, त्याला स्पर्श होईल, असा संदेश देता यायला हवा.

सीईओला माध्यमांच्या समोर कसे जायचे, काय बोलायचे हे समजलेच पाहिजे, किंबहुना त्याने व्यवस्थित अभ्यास  करूनच जायला हवे, मुद्देसूद उत्तरे द्यायला हवीत, कोण आपली मुलाखत घेणार आहे, त्या व्यक्तीच्या आधीच्या पोस्ट्स, व्हिडीओज किंवा लेख पाहूनच जायला हवे, तरच चांगल्या पत्रकारांना व्यवस्थित हाताळता येते. सीईओंबद्दल पत्रकारांनी अभ्यास करून जावे हे जसे खरे, तसे सीईओनेही केले पाहिजे, हेही तितकेच खरे, असे शिव नि:संदग्धपणे सांगतात. प्रत्येकाचाच वेळ मौल्यवान आहे हा मूळ मुद्दा.   

सीईओ होण्यासाठी एमबीए असणे काही आवश्यक नाही, हा कळीचा मुद्दाही त्यांनी मांडला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ आपली छाप मागे सोडू शकतात, पण ज्या भारतीय कंपन्या अजूनही ‘लालाजी’ चालवतात तिथे केवळ मालकांचाच छापा चालतो, असेही मत त्यांनी मांडले आहे.

सीईओ हा चांगला ‘कोच’ही असला पाहिजे. त्याने आपल्या टीममधील सहकाऱ्यांना इतरांना ‘कोच’ करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यामुळे कंपनीत गतिशीलता येते. पण काही लोकांना शिकायचं नसेल, तर त्यांना शिकवण्याच्या भानगडीत न पडता समज देणे सीईओला करता आले पाहिजे.  

काही सीईओ असुरक्षित भावनेने काम करत असतात, कारण त्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावर आणि कौशल्यावर विश्वास नसतो. असे लोक आपल्या जवळच्या माणसांना स्वतःभोवती कोंडाळं करण्यासाठी बाळगत असतात. ते आपल्या सीईओचे प्रतिमासंवर्धन करतात. अशा कैक प्रवृती आज कॉर्पोरेट जगतात पाहायला मिळतात. त्यांना ‘इम्पोस्टर सिन्ड्रोम’ने पछाडलेले असते.     

प्रामाणिकपणे कंपनीचे नेतृत्व करणे हे सीईओचे काम आहे, पण आताशा काही वेगळेच कल दिसू लागले आहेत. त्यासंबंधी हे पुस्तक सावध करते. हे प्रकार कामाच्या अति-ताणामुळे, अति-स्पर्धेमुळे व अति-असुरक्षिततेमुळे निर्माण झाले आहे. त्यात मुख्यतः विनयापासून विमनस्कतेपर्यंत, सहयोगापासून असहकार्यापर्यंत, समावशकतेपासून धाकदपटशापर्यंत, ‘आपल्या’ माणसापासून ‘माझ्या’ माणसापर्यंत, आदरापासून अनादरापर्यंतच्या प्रवासामागच्या कारणांची लेखकाने थोडक्यात मीमांसा केली आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

जे सीईओ चांगलं काम करणाऱ्यांना प्रेरणा देतात आणि न करणाऱ्यांना प्रश्न विचारतात; ज्यांचे वेळापत्रक कितीही व्यग्र असले, तरी ते एकदा दिलेली वेळ पाळतात, जे कायम नवे शिकतात, वाचतात; जे आपल्या कंपनीतल्या लोकांना नावाने हाक मारतात, जे कायम प्रतिसाद देतात, एखाद्या सेलिब्रेशनमध्ये पूर्ण वेळ थांबता आले नाही, तरी डोकावून जातात, जे नव्या सहकाऱ्याला ‘हाय’ म्हणायला वेळ काढतात, त्यांना लेखकाने ‘रोल मॉडेल’ म्हटले आहे. 

थोडक्यात, भारतीय सहकाऱ्यांच्या मनातला सीईओ भारतासाठी काय चांगले आहे ते करणारा हवा, राजकारणी नको, समदृष्टी बाळगणारा हवा, हुशार हवा, प्रामाणिक हवा, निर्णयक्षम हवा, स्वतःच्या कर्तृत्वाने प्रेरित करणारा हवा, उत्तरदायी हवा, राजनीती धुरंधर हवा, ‘एस मॅन’ नसावा!  

लेखकाने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या किंवा केलेल्या शंभरेक सहकाऱ्यांना हे पुस्तक समर्पित केले आहे. त्यांची नावं दिली आहेत. हे पुस्तकाच्या जाहिरातीचं एक नवं तंत्रही समजायला हरकत नाही. या पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखतींतून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून वाचकांना विविध व्यवसायांतील कामांचा अनुभव जाणून घ्यायला मदत होऊ शकते. क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

सीईओ माइण्डसेट- शिव शिवकुमार | पेंग्विन, नवी दिल्ली | पाने – २०५ | मूल्य २६९ रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......