अजूनकाही
समर्थ रामदास स्वामी ‘दासबोधा’च्या सोळाव्या दशकातल्या ‘पृथ्वीस्तवननिरूपण’ या तिसऱ्या समासात म्हणतात –
“बहुरत्न हे वसुंदरा । ऐसा पदार्थ कैचा दुसरा । अफट पडिलें सैरावैरा । जिकडे तिकडे ॥ २०॥
अवघी पृथ्वी फिरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे । दुजी तुळणा न साहे । धरणीविषीं ॥२१ ॥”
बहुरत्नांनी वसुंधरा नटलेली आहे, तिचा शोध घेणे कोण्या एकाचे काम नाही, म्हणून तो घेणाऱ्या कित्येक साहसी वीरांच्या किंवा शोधनायकांच्या गाथा होतात. त्या डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर यांनी ‘वसुंधरेचे शोधयात्री’ या आपल्या पहिल्याच माहितीपूर्ण पुस्तकात अभ्यासूपणे उलगडल्या आहेत.
मार्को पोलो, हेनरी द नेव्हिगेटर, जिल इएन्स, एफोन्सो गोन्सालव्हेस बलडाया, नुनो त्रिस्ताओ, डायनिझ डायझ, लान्सा रोते डी फ्रिटास, अल्वाईज कॅडामोस्तो, डिएगो गोम्स, डिएगो कॅओ, पेड्रो डी कोव्हिला, बार्थोलोम्यू डायस, वास्को द गामा, पेड्रो अल्वारेस, अल्फोन्से डी अल्बुकर्क, लैफ एरिक्सन, ख्रिस्तोफर कोलंबस, अमेरिगो व्हेस्पुसी, वास्को नुनेझ डी बाल्बोआ, जॉन कॅबट, फर्डिनांड मॅगेलान, हेनरी हडसन, आंद्रे डी उर्डानेटा, अलेन्सो डी अरेलेनो, विलेम जॅन्सझून, आबेल टास्मान, टेरा ऑस्ट्रेलिस, कॅप्टन कुक, रोआल्ड अमुंडसेन अशा मागील दोन हजार वर्षांतल्या प्रमुख शोधनायकांच्या गाथा या पुस्तकात आहे.
हे सगळे सामुद्री जगावर अधिराज्य गाजवणारे साहसीवीर. कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे तर विजिगीषू वृत्तीचे हे दर्यावीर नवशोधाच्या ध्येयाने, एका अतीव महत्त्वाकांक्षेने प्रेरित झाले होते, म्हणूनच ते समुद्राला आव्हान देऊ शकले.
लेखकाच्या मते हे लोक केवळ निर्भय नव्हते, तर अभ्यासू संशोधक होते. आपल्या देशापासून दूर स्वतःचे राज्य स्थापन करण्याची मनीषा बाळगणारे होते. व्यावसायिक होते, लढवय्ये होते आणि प्रसंगी स्वैराचारी व क्रूरही होते. प्रत्येकाचे काही एक वैशिष्ट्य होते.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
“वर्तमानाचे धागे नेहमीच इतिहासात गुंतलेले असतात आणि भूगोल समजल्याशिवाय इतिहास समजून घेता येत नाही... म्हणून हे खलाशी, वेडेपीर समजून घेणे आवश्यक आहे.”, असे लेखकाने मनोगतात म्हटले आहे. आणि तेच या पुस्तकाचे प्रयोजन असल्याने इतिहासाची भूगोलाशी सांगड घालत लिखाण केले आहे. मात्र ते रुक्ष न होता तरल झाले आहे, हे विशेष. वाचकाची जिज्ञासा जागृत राहील अशा पद्धतीने शास्त्रीय विषय मांडणे सोपे काम नक्कीच नाही, पण ते डॉ. लव्हेकरांनी यशस्वीपणे केले आहे.
पुस्तकाची मांडणी पाच भागांत केली आहे. ‘पार्श्वभूमी’, ‘आफ्रिकेचा धांडोळा’, ‘भारतात आगमन’, ‘अज्ञात खंडाचा अनपेक्षित शोध – अमेरिका’, ‘उर्वरित भूमीचा शोध व दोन्ही ध्रुवांपर्यंत मजल’, असे हे पाच भाग आहेत. यातल्या एकेका प्रकरणात पण बरेच विभाग आहेत. एकूण मांडणी फार सुटसुटीत आणि नेटकी आहे. लेखक ‘मेडिकल सायन्स’चे अभ्यासक आणि पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्यांनी या माहितीची विभागणी काटेकोर पद्धतीने केली आहे.
वेगवेगळ्या प्रवाशांबद्दल लिहिताना लेखकाने त्यांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटनांबद्दल लिहिले आहे, त्यांची उपलब्ध चित्रे, प्रासंगिक रंगीत चित्रेही दिली आहेत. ‘व्हायकिंग एज’ हे असेच माहितीपूर्ण प्रकरण. मूळ ‘नॉर्स’ भाषा बोलणारे आताच्या स्कॅण्डिनेव्हियामधील पूर्वीचे ‘चाचे’ किंवा ‘पायरेट्स’. त्यांनी समुद्रावर अधिराज्य गाजवले, अनेक सागरी मार्ग शोधून काढले. त्यांच्या योगदानावर दोन प्रकरणे आहेत.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या पुस्तकात नकाशांना फार महत्त्व आहे. दर्यावर्दी साहसवीर आणि त्यांनी केलेला प्रवास समजून घेण्यासाठी या नकाशांचा उपयोग होतो. या नकाशांसाठी नेहा देशपांडे व तृप्ती देशपांडे यांनी घेतलेली मेहनत जागोजागी प्रत्ययास येते.
इ. स. ४०-६० दरम्यान ‘पेरिप्लस’, भटकंतीचा लेखाजोखा लिहिला गेला, पण तो सर्वथा खरा नव्हता, तरीही खलाशांसाठी मार्गदर्शक होता. सुरुवातीच्या मोहिमांना त्याचा आधार नक्कीच मिळाला. त्यातही भारताबद्दल माहिती येऊन जाते, असे लेखकाने काही उदाहरणांनिशी दाखवून दिले आहे. युरोपियनांच्या मनांत भारताबद्दल आकर्षण निर्माण होण्यास या अशा नोंदी व टिपणे, मिथके कारणीभूत ठरली.
सागरी शोधमोहिमा का सुरू झाल्या याचे विवेचन करताना कॉन्स्टॅन्टिनोपलचे भौगोलिक महत्त्व लेखकाने अधोरेखित केले आहे. व्यापारासाठी हे महत्त्वाचे बंदर होते. ‘प्राचीन सिल्क रूट’मध्ये याचा उल्लेख होता, म्हणून मध्य-आशिया व युरोपियन देशांमध्ये याबद्दल आकर्षण निर्माण झाले, आणि मग निरनिराळे व्यापारी मार्ग शोधण्याची मोहीमच सुरू झाली. महत्त्वाची चार धर्मयुद्धं झाली आणि ऑटोमन साम्राज्य अस्तित्वात आले. या प्रदेशाचे नाव ‘इस्तंबूल’ झाले. युरोपियनांना नवीन सागरी मार्ग शोधण्याची गरज भासू लागली. अशी पार्श्वभूमी लेखकाने या पुस्तकात मांडली आहे.
या सागरी संशोधक वा दर्यावर्दींमध्ये पोर्तुगीजांचा फार मोठा वाटा आहे, हे लक्षात येते. ते भारतात सागरी मार्ग धुडांळत आधी आले आणि सगळ्यात उशिरा परतले. त्यांच्यानंतर आले इंग्रज, नंतर डच, डॅनिश आणि शेवटी फ्रेंच; पण इंग्रजांनी जसा सामाज्यविस्तार केला, तसा कोणालाही करता आला नाही, याबद्दल लेखकाने सविस्तर विवेचन ‘युरोपियनांचा भारतातील सामाज्यविस्तार’ या प्रकरणात केले आहे.
लेखक निवेदनाच्या ओघात बरीच अद्भुत माहिती देतात. उदा., अननस, सीताफळे, पपई, पेरू, काजू, भुईमूग, काटेरी निवडुंग, कसावा, या गोष्टी पोर्तुगीजांनी अमेरिकेतून भारतात आणल्या. थोडक्यात, हे पुस्तक रोमांचक आहे.
या पुस्तकात निवडक संदर्भसूची आणि दोन परिशिष्टं आहेत, तीदेखील लेखकाच्या अभ्यासाची प्रचिती देणारी आहेत.
‘वसुंधरेचे शोधयात्री’ - डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर
राजहंस प्रकाशन, पुणे | पाने – ३५६ | मूल्य - ५५० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.

Post Comment