अजूनकाही
‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ हे अनिल जायभाये आणि पंचशील डावकर यांनी संपादित केलेलं पुस्तक म्हणजे बहुजन मुलींनी परिस्थितीशी दिलेल्या झुंजीची यशोगाथा आहे. खरं हा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश आहे. या पुस्तकात निशा शिंदे, संध्या वाडकर, प्राजक्ता लोंडाळ, स्नेहा चामले, भावना कदम, आशा पठाण, सुमेधा ढवळे, अंजली कुलकर्णी, जन्नत शेख, पुनम ढगे, स्वाती हाळसपुरे, वैशाली सोमवंशी, माया चव्हाण, अलका मस्के, छाया जगताप, प्रियंका लाडलापुरे, अलका समुखराव, विद्या हातोलकर, वैष्णवी राठोड, अंजना राठोड, अश्विनी साखरे, श्रद्धा शेळके, वैशाली थोरात, स्नेहा शिंदे, आम्रपाली कांबळे, राजश्री कांबळे, मोहिनी देशमुख, कावेरी माने, लक्ष्मी हवालदार, पंचशील डावकर या ३० विद्यार्थिनींनी त्यांच्या वाटेला आलेलं जीवन शब्दबद्ध केलं आहे.
बहुजन समाजातल्या मुलींना पावलागणिक संघर्ष करावा लागतो. त्यांच्या वाटा, काट्याकुट्याच्या, प्रचंड खाचखळग्याच्या आणि चढउताराच्या असतात. समाज काय म्हणेल? घरचे काय म्हणतील? या भीतीचे डोंगर त्यांच्याभोवती सतत उभे केले जातात. घरच्यांनी पाठिंबा दिला नाही, तर शिकता येणार नाही, अशी परिस्थिती असते. काहींच्या घरच्यांचा पाठिंबा असला, तरी सामाजिक सुविधांचा अभाव, बिकट आर्थिक परिस्थिती, मुलींच्या शिक्षणाबद्दलची सार्वजनिक उदासीनता, शैक्षणिक सुविधांचा अभाव ही आव्हानं असतात. पण याही परिस्थितीत पुढे जाणाऱ्याही काही कमी नाहीत. प्रवाहाविरुद्ध जाऊन इतरांसाठी दीपस्तंभ ठरू पाहणाऱ्याही खूप आहेत. त्यातल्या काही या पुस्तकात भेटतात.
या मुलींनी केलेला संघर्ष स्वतःच्या भाषेत मांडला आहे. ही भाषा त्यांना सहज उमगली नाही. संघर्ष करत करत ती त्यांना अवगत झाली. आज ती त्यांच्या ओठावर आली आणि लेखनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचली. या विद्यार्थिनी परिस्थितीशी न डगमगल्या दोन हात करत झुंजल्या. जे काही आपल्या वाट्याला आलं आहे त्याकडे संधी म्हणून बघणं, हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडलं. त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की, आम्ही कोणत्याही बाबतीत कमी नाही… ना ज्ञानाच्या, ना कष्टाच्या.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
चार-पाच पानांमध्ये आपला जीवनसंघर्ष मांडणं हे तसं कठीण काम, मात्र ज्यांनी संघर्ष भोगला त्यांना ते कठीण नसतं. यातील प्रत्येक विद्यार्थिनींचे दुःख, त्यांच्या वेदना, संवेदनशीलता परिस्थितीशी झगडणं, हे भिन्नभिन्न पातळीवरचं आहे. प्रत्येकीची कहाणी वेगळ्या धाटणीची आहे. अलीकडे असे अनुभव तरुण पिढीच्या वाट्याला येईलच असं नाही, मात्र आत्मभान येण्यासाठी या पुस्तकाचं आवर्जून वाचन करायला हवं. कठीण परिस्थितीतून कसा मार्ग काढावा, यासाठी हे आत्मचिंतन दिशादर्शक ठरणारं आहे. अगदी प्रामाणिक व कसलीही भीड न बाळगता केलेला हा प्रपंच जिवंत अनुभव देतो.
प्रस्तुत लेखनातील अनेक प्रसंग काळीज चिरणारे आणि संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करणारे आहेत. २१व्या शतकात स्त्रीशिक्षणाचा प्रसार-प्रचार आणि स्त्रियांचा शिक्षणातील सहभाग, याबाबतचे आपले ‘तयार’ समज या पुस्तकातील विद्यार्थिनीचे अनुभव वाचताना बदतात. स्त्रीशिक्षणाची बिकट स्थिती गंभीरपणे समजून घ्यावी लागेल. कुठे जन्म घ्यावा हे आपल्या हातात नाही, मात्र परिस्थिती बदलवण्याची ताकद आपल्यात आहे. यावरच प्रामुख्याने भर देणारे हे सारे जीवनप्रवास आहेत.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या विद्यार्थिनींचा जीवनप्रवास निश्चितच सोपा नव्हता. पावलागणिक आलेल्या प्रत्येक संकटाला न घाबरता त्यांनी परतवून लावलं आणि प्रत्येक वेळी त्या नव्या उमेदीनं व ताठ मानेनं उभ्या राहिल्या.म्हणूनच आज त्या इतरांनाही जगण्याचं बळ देणाऱ्या ठरल्या आहेत. यातील अनेकजणी आज समाजात मानाची पदं भूषवत आहेत. परिस्थिती बदलवण्याची ताकद आपल्या मनगटात असते, हे त्यांनी सिद्ध केलं आहे. जीवनात आलेले अस्सल अनुभव कोणत्याही प्रकारे न लपवता वा कुणी काही म्हणेल काय, याची भीड न ठेवता त्यांनी मांडले आहेत. त्यामुळे हा त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे.
उन्हातान्हातून आणि परिस्थितीतून तावूनसुलाखून निघालेल्या या सावित्रीच्या लेकींमध्ये आता प्रचंड ताकद आली आहे. आता त्या कोणत्याही संकटाला घाबरत नाहीत. संकट ही एक संधी मानून इतरांना प्रेरणा देत त्या पुढे जात आहेत. अशाच पद्धतीची निर्भयता समाजातील अनेक विद्यार्थिनींना यावी. त्यांचं मन आणि मनगट विवेकी विचारानं मजबूत व्हावं आणि समाजात स्वाभिमानाने, निर्भयपणे त्यांनी जीवन जगावं. एक प्राध्यापक/प्राध्यापिका म्हणून विद्यार्थिनींसोबत सामूहिकपणे लेखन-वाचन करणं आणि त्यातून जीवनप्रवासाची एक सामूहिक कलाकृती तयार करणं, ही कौतुकास्पद बाब आहे. त्यासाठी अनिल व पंचशील यांचं कौतुक करायला हवं.
प्रत्येक शिक्षक, प्राध्यापकाने हे पुस्तक यासाठी वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात. आपण त्यांना कोणत्या प्रकारचं शिक्षण देणं आवश्यक आहे, हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्याने हे पुस्तक यासाठी वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक यासाठी वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते. नवे नवे मार्ग काढता येतात, हे कळावं म्हणून.
या पुस्तकाला लेखनपाटीच्या पार्श्वभूमीवर असलेलं ‘काटेरी झाड’ हे मुखपृष्ठावरील चित्र पुस्तकाच्या आशयाला साजेसं असल्याने ते उठावदार आणि नेमकं आहे.
‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - संपादन : अनिल जायभाये आणि पंचशील डावकर
हरिती प्रकाशन, पुणे | पाने – ३०४ | मूल्य – ४०० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक प्रा.डॉ.प्रियदर्शन भवरे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना येथे समाजशास्त्राचे अध्यापन करतात.
bhawarepriyadarshan@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment