‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
अंजली प्रविण
  • ‘हार्ट लॅम्प’चे मुखपृष्ठ
  • Sun , 23 November 2025
  • ग्रंथनामा दखलपात्र हार्ट लॅम्प Heart Lamp बानू मुश्ताक Banu Mushtaq

‘संस्कृती’ हा शब्द आपण किती सहजपणे वापरतो, पण ही ‘संस्कृती’ नेमकी कुणासाठी असते आणि कुणाला गप्प बसवते? परंपरेच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली आणि कधी ‘संरक्षणा’च्या नावाखाली आपण स्त्रियांभोवती इतक्या भिंती उभ्या केल्या आहेत की, त्यांचं स्वतःचं अस्तित्व, आवाज आणि विचार जणू त्या भिंतींमागे हरवून जातात. अशा काळात ‘हार्ट लॅम्प’ हे बानू मुश्ताक यांचं पुस्तक हळुवारपणे धर्म आणि संस्कृतीचं धोतांड समोर मांडतं.

हे पुस्तक वाचताना आपल्याला जाणवतं की, भारतीय मुस्लीम महिलांच्या कथा केवळ त्यांच्या धर्मापुरत्या मर्यादित नाहीत; त्या आपल्या समाजाच्या एकूणच स्त्री-अनुभवाशी जोडलेल्या आहेत. धर्माच्या नावाचं लेबल वेगवेगळं असलं, तरी प्रत्येक धर्मातील ‘स्त्री’ची परिस्थिती एकसारखीच दिसून येते.

बानू मुश्ताक या मूलतः कन्नड लेखिका, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या कथासंग्रहात १९९० ते २०२३ या काळातल्या एकंदर १२ कथांचा समावेश आहे. या कथांमधून एका पिढीचा अनुभव व्यक्त झाला आहे. मुस्लीम स्त्रियांबद्दलच्या पूर्वग्रहांना मोडत, या कथा त्यांच्या जगण्याचं अंतरंग दाखवतात. प्रत्येक कथेतील स्त्रिया धर्माच्या शिकवणीत, कौटुंबिक साखळ्यांत आणि सामाजिक नजरेत अडकलेल्या असल्या, तरी त्यांच्या आत कुठेतरी स्वतःला ओळखण्याची झुंज सतत सुरू असते. बानू मुश्ताक यांची लेखणी त्या झुंजीला आवाज देते, त्यांना बोलायला शिकवते.या कथांमध्ये कोणताही बंडखोरीचा गाजावाजा नाही. त्यांच्या कथा शांत, साध्या पण धारदार आहेत.

‘ब्लॅक कोब्रा’ या कथेमध्ये एक शिक्षित महिला स्वतःच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते, पण समाज आणि कुटुंब तिच्यावर ‘शालीनते’चे आणि ‘मर्यादे’चे शिक्के मारतात. शिक्षणाचा उपयोग तिच्या स्वातंत्र्यासाठी नाही, तर तिच्या संस्कारशीलतेचा दाखला म्हणून दिला जातो.

‘हाय हील्स शू’ या कथेत भौतिक स्पर्धा आणि पुरुषांचे अहंकार स्त्रियांना कशा प्रकारे सतत आपलं रूप, कपडे आणि आचरणात बदल करायला भाग पाडतात, हे दाखवते. इस्फा ही नायिका फक्त हाय-हील घालते म्हणून तिचं जीवन बदलत नाही, पण त्या जोडीचं वजन तिच्या ओळखीवर किती जड होतं, हे कथेमधून उलगडतं.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

‘हार्ट लॅम्प’ या शीर्षककथेत बानू मुश्ताक यांनी स्वतःच्या आयुष्यातील निरीक्षणं गुंफली आहेत. या संग्रहातल्या काही कथा कामाच्या ठिकाणी शोषण सहन करणाऱ्या गरीब स्त्रियांच्या आहेत. काही कथांमधल्या मध्यमवर्गीय स्त्रिया आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या निवडीसाठी करू पाहतात आणि काही उच्चभ्रू घरातील स्त्रिया सामाजिक दिखाऊपणाच्या कैदेत अडकलेल्या आहेत. पण त्या सगळ्यांच्या मनात एकच आकांक्षा दिसते. ती म्हणजे ‘स्वतःला ओळखण्या’ची. ही ओळख केवळ वैयक्तिक नाही; ती समाजाशी संवाद साधणारी आहे.

मुस्लीम स्त्रिया म्हणजे फक्त बुरख्यातील महिला अशी एक रूढ प्रतिमा भारतीय समाजात तयार झाली आहे, पण मुश्ताक यांच्या कथांमधल्या स्त्रिया स्वतः विचार करतात, चूक करतात, प्रेम करतात आणि प्रश्न विचारतात. त्यांच्या कथा सांगतात की, धर्म आणि परंपरेच्या चौकटीत राहूनही आत्मबोध आणि स्वातंत्र्याचा शोध घेता येतो. या कथांमधील स्त्रिया मोठमोठ्या घोषणा देत नाहीत, पण छोट्या छोट्या कृतींनी आपला संसार बदलतात. एकीकडे त्या घर चालवतात, मुलं सांभाळतात आणि दुसरीकडे स्वतःच्या निर्णयांचा शोध घेतात. प्रत्येक कथेतून समाजात दडलेलं एक वास्तव येतं. या कथांमध्ये पराभवही आहे, पण फक्त हार नाही.

हा कथासंग्रह आपल्याला विचार करायला भाग पाडतो. स्त्री म्हणून या कथा वाचताना मनात अनेक प्रश्न उठतात. आपण ज्या स्त्रीला सशक्त म्हणतो, ती खरंच स्वतःच्या निर्णयांची मालकीण आहे का? की अजूनही समाजमान्यतेच्या शोधात आहे? आपण संरक्षणाच्या नावाखाली स्त्रियांना किती वेळा बंधनात ठेवलंय? तुझ्यासाठीच / तुझ्याच भल्याचं सांगतो, म्हणत किती वेळा त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे?

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं.

‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते. तो दिवा कधी ज्ञानाचा असतो, कधी बंडखोरीचा, कधी फक्त आत्मविश्वासाचा. पण प्रत्येक दिवा एक गोष्ट सांगतो – ‘मी इथं आहे आणि मी स्वतःसाठी जळत आहे.’

या संग्रहाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेची समाजशास्त्रीय दृष्टी. लेखिकेने प्रत्येक कथेत स्त्रियांच्या मनोवस्थेला सामाजिक रचनेशी जोडून पाहिलं आहे. ‘मुस्लीम महिला’ या ओळखीला केवळ बाह्य बंधन म्हणून न पाहता, त्याच्या आतल्या गुंतागुंतीत प्रवेश केला आहे. बानू  मुश्ताक सांगतात, बदल बाहेरून नाही, तर आतून यायला हवा. स्त्रियांनी स्वतःच आपल्या जीवनाचे निर्णय घ्यावेत. तेच खरं सशक्तीकरण आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या कथा वाचताना कर्नाटकातील ‘बंडाया साहित्यपरंपरे’चा प्रभावही स्पष्ट दिसतो. १९७०च्या दशकात कर्नाटकात सुरू झालेली ‘बंडाय चळवळ’ (Bandaya Movement) ही केवळ साहित्यिक नव्हे, तर सामाजिक-राजकीय उठावाचीही चळवळ होती. ‘बंडाय’ या शब्दाचा अर्थ आहे- बंड, विद्रोह, अन्यायाविरुद्धचा आवाज. ही चळवळ समाजातील वंचित, दलित आणि स्त्रिया यांच्या अनुभवांना केंद्रस्थानी आणणारी होती.

बानू मुश्ताक त्या परंपरेने प्रेरित झालेल्या लेखिका आहेत. त्यांच्या लेखणीत धर्म, पितृसत्ता, आणि वर्ग यांचं नातं गुंफलेलं आहे. त्यांच्या लेखणीत रोष आहे, पण तो एका प्रगल्भ विचारातून आलेला आहे. त्या समाजावर राग करत नाहीत, तर त्याला आरसा दाखवतात. त्यांचा हेतू दोषारोप नाही, तर संवाद सुरू करणं आहे. आणि हेच या संग्रहाचं बळ आहे.

हा संग्रह भारतीय साहित्यातील स्त्री-अनुभवाला एक नवं परिमाण देतो. समाजात आजही ‘मुलींसाठी योग्य’ आणि ‘मुलींसाठी नको’ अशा गोष्टींची लांबलचक यादी आहे. अशा वातावरणात ‘हार्ट लॅम्प’सारखं साहित्य आपल्याला ‘आपण अजून किती मागे आहोत?’ याचा विचार करायला भाग पाडतं. कारण स्त्रीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न फक्त धर्माशी संबंधित नाही; तो आपल्या मानसिकतेशी संबंधित आहे.

बानू मुश्ताक यांचं लेखन त्या मानसिकतेवर प्रकाश टाकतं, पण उपदेश देत नाही. ते ऐकायला लावतं, विचार करायला भाग पाडतं. त्यामुळे हे पुस्तक आरशासारखं आहे. आपल्या समाजात धर्मभेद नसले, तरी स्त्रीविरोधी संस्कार सर्वत्र सारखेच आहेत. घरातल्या मर्यादा, इज्जत, परंपरा या शब्दांनी किती आयुष्यं आणि पिढ्या गप्प झाल्या आहेत. बानू मुश्ताक यांच्या कथा सांगतात की, या मर्यादांमधून बाहेर पडणं म्हणजे समाजाच्या विरोधात जाणं नव्हे, तर स्वतःशी प्रामाणिक राहणं. एका कथेतली नायिका म्हणते, “मी देवावर विश्वास ठेवते, पण देवाने मला विचार करण्यासाठी दिलेला मेंदू वापरणं माझं कर्तव्य नाही का?” या वाक्यात या संपूर्ण पुस्तकाचं सार दडलेलं आहे.

हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो.

.................................................................................................................................................................

लेखिका अंजली प्रविण NALSAR युनिव्हर्सिटी फेअर ट्रायल प्रोग्रॅममध्ये डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. क्रिमिनल जस्टीस सिस्टीमच्या अभ्यासक आहेत.

amkar.anju@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘इंडिया आउट ऑफ वर्क’ : लेखकद्वय सरकारला प्रश्न विचारणारे आहेत. त्यामुळे अलीकडच्या आपल्या प्रथेनुसार त्यांच्यावर ‘अर्बन नक्षल’ असल्याचा शिक्का बसू शकतो

मात्र ते जे प्रश्न उपस्थित करत आहेत, ते टाळून भारताने २०४७मध्ये उच्च उत्पन्न गटात प्रवेश करण्याचे स्वप्न पूर्ण कसे होईल? रोजगार, अर्थव्यवस्था, शिक्षण यांमध्ये उत्पन्न झालेल्या या संकटाला लेखकद्वय ‘ट्रिपल ई क्रायसिस’ असे संबोधतात. प्रस्तुत पुस्तकाचा प्रमुख उद्देश भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशाची गणना उच्च मनुष्यबळ विकसित असलेल्या देशांमध्ये व्हावी हा आहे........

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......