आयआयटी-बीएचयू सामूहिक बलात्कार प्रकरण : पोलिसांची निष्पक्षता आणि भाजपचं ‘चाल-चरित्र’, दोन्ही प्रश्नांच्या पिंजऱ्यात…
पडघम - देशकारण
विजय विनीत
  • आयआयटी-बीएचयूमधील विद्यार्थी आंदोलनाचं एक छायाचित्र
  • Thu , 04 January 2024
  • पडघम देशकारण आयआयटी-बीएचयू IIT-BHU

आयआयटी-बीएचयूमधील बीटेकच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले तीन आरोपी भाजपचे कार्यकर्ते आणि पक्षाच्या आयटी सेलचे अधिकारी होते. लंका पोलीस स्टेशनने त्यांना २७ दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते, परंतु त्यांचा राजकीय प्रभाव इतका मजबूत होता की, तिघांनाही सोडून द्यावे लागले. आता ६० दिवसांनंतर पोलिसांनी गुन्हेगारांच्या चेहऱ्यावरील मुखवटे काढले आहेत. सोनभद्रमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजप आमदार रामदुलार गोंड यांना जन्मठेपेची शिक्षा आणि बीएचयू कॅम्पसमधील सामूहिक बलात्काराच्या आरोपींना अटक झाल्यानंतर राजकारण तापले आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

त्याचबरोबर अनेक विचारवंत आणि नागरी समाजातील लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, “ज्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ‘मॉरल (नैतिक) पोलिसिंग’ करत फिरतात, इतरांना सल्ले देत असतात तरुणांना ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू देत नाहीत, प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करतात, ते स्वत:च सामूहिक बलात्कारासारखे जघन्य गुन्हे करतात. एवढेच नाही, तर त्यावर पांघरूण घालण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. बीएचयूमधील विद्यार्थिनीसोबत झालेल्या अमानूष घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, भाजपसाठी ‘चाल-चरित्र’ आणि ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या केवळ घोषणा आहेत, बाकी काही नाही. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण शरणसिंगला वाचवणं आणि या सामूहिक बलात्काराच्या आरोपींना वाचवणं, या गोष्टी भाजपला आरोपांच्या पिंजऱ्यात उभं करतात.”

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

बनारस पोलीस आयुक्तालयाने सुंदरपूरच्या ब्रिज एन्क्लेव्ह कॉलनीतील कुणाल पांडे, बजरडिहाच्या जीवाधिपूरमधील आनंद उर्फ अभिषेक चौहान आणि याच परिसरातील सक्षम पटेल यांना आयआयटी-बीएचयूमधील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी भाजपच्या आयटी सेलचे पदाधिकारी आहेत. कुणाल पांडे भाजपच्या महानगर युनिटमध्ये आयटी विभागाचे निमंत्रक होता, तर सक्षम पटेल सहसंयोजक होता. आनंद या दोघांचा मित्र होता आणि त्यांच्यासोबत सर्व कार्यक्रमांना हजेरी लावत असे. त्यांना पक्षातून काढण्याचा आदेश भाजपने यापूर्वी कधी काढला नव्हता. सायंकाळी उशिरा पोलिसांनी तिन्ही आरोपींना जिल्हा दंडाधिकारी शिखा यादव यांच्या न्यायालयात हजर केले, तेथून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. हे प्रकरण सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी उघडपणे बोलणं टाळत आहेत.

दिग्गजांवरही आरोपांच्या फैरी

हे तिन्ही आरोपी गेल्या पाच वर्षांपासून भाजपशी संबंधित असून ते आयटी सेलचे काम पाहत होते. त्यांच्या प्रभावाचा अंदाज यावरूनही लावता येतो की, देशातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये त्यांची विशेष दखल घेतली जात असे- मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असोत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा असोत, कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी असोत किंवा संघप्रचारक असोत. त्यांच्यासोबतची या आरोपींची छायाचित्रं सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होत आहेत. त्यावरून हे सिद्ध होतं की, या आरोपींचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी थेट संपर्क आहे.

एका प्रतिष्ठित कुटुंबातील कुणाल पांडे हा भाजपच्या एका सदस्याचा जावई आहे. सहआरोपी सक्षम पटेल हा मूळचा बिहारचा आहे. तो बाजरडिहा येथे राहतो आणि भाजपसाठी काम करत असे. भाजपने काशी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ज्येष्ठ नेते दिलीप पटेल यांच्याकडे सोपवली, तेव्हा त्यांच्यासोबत सक्षम पटेलही होता. पटेल यांच्या सर्व कार्यक्रमांना तो हजेरी लावत असे. तो पटेल यांची छायाचित्रं सोशल मीडियावर अपलोड करत असे.

सूत्रानुसार, ३ डिसेंबर २०२३ रोजी लंका पोलीस स्टेशनने सक्षमसह उर्वरित आरोपींना ताब्यात घेतले, तेव्हा प्रदेशाध्यक्ष पटेल यांनी त्याच्याकडून सोशल मीडियाची जबाबदारी काढून घेतली. भाजपमध्ये स्वीय सहाय्यक ठेवण्याची पद्धत नसतानाही सक्षम स्वतःला प्रदेशाध्यक्षांचा ‘पीए’ म्हणवून घेत असे.

“भाजपचं शीर्ष नेतृत्व पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह पक्षाच्या सर्व नेत्यांशी या आरोपींचे घनिष्ठ संबंध होते. भाजपचे नेतेच त्यांना संरक्षण देत होते. त्यांच्यासोबतची छायाचित्रं हे सत्य उघड करत आहेत. भाजपच्या ‘बेटी बचाओ’ या मोहिमेचा खरा अर्थ असा आहे की, भाजपपासून मुलींना वाचवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात जर मुलीसुद्धा सुरक्षित नसतील, तर देश कसा सुरक्षित राहणार? तशीही उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था ‘रामभरोसे’च चालली आहे.”

कुणाल पांडे आणि सक्षम पटेल हे दोन्ही आरोपी भाजपच्या आयटी सेलशी जोडले गेल्याचे भक्कम पुरावेही सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होत आहेत. २० ऑगस्ट २०२१चे एक पत्रदेखील ‘व्हायरल’ होत आहे. ते स्वतः कुणाल पांडेने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. भाजपचे महानगर अध्यक्ष विद्याधर राय यांच्याकडून पक्षाच्या लेटर हेडवर आयटी सेलमधल्या कार्यकर्त्यांची एक यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये वाराणसी आयटी सेलचे समन्वयक म्हणून कुणाल पांडेच्या नावाचा उल्लेख आहे. या लेटर हेडवर दस्तुरखुद्द कुणालचीही सही आहे. याच पत्राने सक्षम पटेलची आयटी सेलचा सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

हे तिन्ही आरोपी भाजपच्या आयटी सेलशी संबंधित असल्याने त्यांच्या अटकेबाबत पोलीस अधिकारी काही बोलणं टाळत आहेत. आरोपींचे कुटुंबीय आणि शेजारीही काही बोलायला तयार नाहीत. कुणाल पांडेचे वास्तव्य असलेल्या सुंदरपूर भागातील ब्रिज एन्क्लेव्ह कॉलनीत स्मशानशांतता पसरली आहे. शेजाऱ्यांनी एवढंच सांगितलं की, तो जवळपास पाच वर्षांपासून भाजपसाठी काम करत होता. २०२१मध्ये आरोपी कुणालचा विवाह भाजपसदस्य मदन मोहन तिवारी यांच्या मुलीशी झाला. सक्षम पटेल आणि आनंद उर्फ अभिषेक चौहान हे दोघेही बाजारडिहा येथील रहिवासी आहेत.

प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टीकरण दिले

या प्रकरणाबाबत ‘न्यूजक्लिक’ने भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप पटेल यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सक्षम पटेल हा त्यांचा पीए असल्याचा काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला. ते म्हणाले, “अजय राय यांचा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे. भाजपमध्ये पीएची कोणतीही पद्धत नाही. सक्षम पटेलशी माझा याआधी कधी संबंध नव्हता. जेव्हा मी पदभार स्वीकारला, तेव्हा त्याने मला भेटून पक्षाचा जुना कार्यकर्ता असल्याचे सांगत सोशल मीडियाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. मी त्याला फक्त छायाचित्रं काढण्यासाठी नेमलं होतं. दोन महिन्यांपूर्वीच त्याने काम सोडलं होतं.”

पुढे पटेल असंही म्हणाले की, “मी जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा आणि शहराध्यक्ष विद्यासागर राय यांच्याकडून खुलासे मागितले आहेत की, आयटी सेलच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतचं पत्र कधी आणि कोणाच्या आदेशानं जारी करण्यात आलं? आम्हाला तोंडी सांगण्यात आलं की, सध्या तिघंही कुठल्याही पदांवर नाहीत. मी अद्याप कोणत्याही नवीन पदांवर नियुक्ती केलेली नाही. आयटी सेलमधील नियुक्तीबाबतचं ते पत्र जुनं आहे. सध्याच्या संदर्भात ते गैरलागू आहे.”

“हे प्रकरण बनारसचं आहे, पण आजपर्यंत तिथले खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या दुर्दैवी घटनेबाबत चकार शब्दही काढलेला नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, भाजप केवळ बलात्कार करणाऱ्यांना संरक्षणच देत नाही, तर त्यांना पक्षात मोठी पदंही देते, आणि त्यांना सर्वोच्च नेतृत्वाच्या गोटातही सामील करून घेतं. या पक्षाचा आणि त्यांच्या नेत्यांचा धिक्कार असो.”

आयटी सेलमधील नियुक्त्या रद्द करण्याबाबत काही आदेश काढण्यात आला आहे का, असं पटेल यांना विचारलं असता ते म्हणाले की, “आम्ही तुम्हाला माहिती मिळाल्यावर सांगू. आरोपी माझी छायाचित्रं काढत असला, तरी मी आजपर्यंत कधी त्याच्या घरी गेलेलो नाही. आम्हाला बऱ्याच दिवसांनी समजलं की, तो पटेल असून मूळचा बिहारचा आहे. भाजप कुणाच्याही बाबतीत भेदभाव करत नाही, मग तो आपला असो की नसो. आम्ही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही. कायदा आपलं काम करेल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारचे मुद्रांक मंत्री रवींद्र जैस्वाल यांनी म्हटलं आहे की, आरोपी कोणीही असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तिन्ही आरोपी भाजपशी संबंधित असल्याबाबत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर जैस्वाल म्हणाले, “आरोपी कुठलाही असो, त्याने भाजपमध्ये आश्रय घेतलेला असला तरी, तो दोषी असेल तर कठोर कारवाई केली जाईलच.”

पोलिसांना सगळं माहीत होतं!

आयआयटी-बीएचयूची पीडित विद्यार्थिनी १ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री जवळपास दीड वाजता बनारसच्या काशी हिंदू विद्यापीठ परिसरात फिरत होती. वाटेत तिला एक मित्र भेटला. ते दोघं थोड्या अंतरावर गेले, तोच बुलेटवर आलेल्या कुणाल, सक्षम आणि आनंद या तिघांनी करमनबीर मंदिराजवळ त्यांना अडवलं. हे तिघं आधीपासूनच तिच्या मागावर होते. त्यांनी विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी याआधीही अनेकदा रात्रीच्या वेळी बीएचयूमधल्या विद्यार्थिनींनाही लक्ष्य केलं आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, आरोपींनी विद्यार्थिनीच्या मित्राला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला विवस्त्र करून तिचा व्हिडिओ बनवला. त्यांनी तिला बराच वेळ ओलीस ठेवलं. त्यानंतर ते मोबाईल घेऊन पळून गेले.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी आयआयटी-बीएचयूच्या विद्यार्थ्यांनी आरोपींना अटकेसाठी आणि कॅम्पसच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरू केलं. ते पुढे दहा दिवस सुरू राहिलं. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि टेहळणीच्या मदतीनं तपास सुरू केला. बीएचयू कॅम्पस आणि गेटवर लावण्यात आलेल्या शंभरहून अधिक सीसीटीव्हींचं फुटेज पाहिलं, त्यामुळे तिन्ही आरोपींची ओळख पटली. घटनेच्या वेळी त्यांचे फोननंबरही तेथे सक्रिय आढळले. पोलिसांनी मोबाईलची सीडीआर फाईल तपासली, तेव्हा पोलिसांचा संशय ठोस पुराव्यानिशी सिद्ध झाला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी बीएचयूमध्ये अभूतपूर्व निदर्शनं केली, तेव्हा या प्रकरणाला वेगळी दिशी देण्यासाठी कॅम्पसच्या संरक्षक भिंतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. बीएचयूच्या काही विद्यार्थ्यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी लंकेतील सिंहद्वार इथं आंदोलन सुरू केलं, तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन गोंधळ घातला. नंतर बनावट वैद्यकीय अहवाल बनवून अनेक निरपराधी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित विद्यार्थ्यांनी केला असून, तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त प्रवीण सिंग यांची भूमिका या संपूर्ण प्रकरणात संशयास्पद राहिली आहे.

बनारस आयुक्तालय पोलिसांनी ३० डिसेंबर २०२३च्या रात्री तिन्ही आरोपींना अटक केल्याचं नमूद केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना तपासादरम्यान पकडण्यात आलं. घटनेत वापरलेली गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. तिन्ही आरोपी बुलेटवर बसलेले दिसत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. घटनेच्या दिवशी तिघंही बुलेट घेऊन आयआयटी कॅम्पसमध्ये घुसले होते आणि मध्यरात्री त्यांनी मित्रासोबत फिरणाऱ्या या मुलीवर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप आहे.

पोलिसांत तक्रार देताना पीडितेने गँगरेपची घटना सांगितली होती, मात्र बदनामीची भीती दाखवून अधिकाऱ्यांनी विनयभंग आणि मारहाणीचीच तक्रार नोंदवली, असा आरोप आहे. विद्यार्थिनीने मॅजिस्ट्रेटसमोर जबानी दिली, तेव्हा एफआयआरमध्ये सामूहिक बलात्काराचा आरोप जोडण्यात आला.

काशी झोनचे पोलीस उपायुक्त आर.एस. गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या साहाय्याने तीनही आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे. या आरोपींना कोठडी रिमांडवर घेऊन त्यांची चौकशी केली जाईल. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. पुरेशा पुराव्यांच्या आधारावर तिन्ही आरोपींना अटक करून कारागृहात पाठवण्यात आलं आहे. बुलेट मोटरसायकल कुणा संतोष नावाच्या व्यक्तीची आहे, परंतु ती कुणाल वापरत असे. पोलिसांनी आरोपींच्या फोन नंबर्सचा शोध घेतला असता, आधी त्यांचं लोकेशन मध्य प्रदेश आणि नंतर लखनौ इथं आढळून आलं. ते सतत आपलं ठिकाण बदलत होते. घटनेच्या रात्री बुलेटवर नंबर प्लेट नव्हती, मात्र नंतर त्यांनी नंबर प्लेट लावली. पोलिसांनी नियोजनबद्ध रणनीती म्हणून आधी उदासीनता दाखवली. प्रकरण शांत झाल्याचं पाहून तिघंही घरी परतले.

ज्येष्ठ पत्रकार अजित अंजुम ट्विट करून मुख्य प्रवाहातील माध्यमांवर प्रश्न उपस्थित करताना म्हणाले की, “ही तरुण मुले पंतप्रधानांपासून आणि योगी-नड्डा यांच्यापर्यंत कशी पोहोचली? एवढा मोठा गुन्हा करूनही त्यांची छायाचित्रं कोणत्याच वाहिनीवर दाखवली का गेली नाहीत? त्यांची छायाचित्रं दाखवून एखादा ‘राष्ट्रवादी’ अँकर भाजपला प्रश्न का विचारत नाही?” समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अखिलेश यादव यांनी या प्रकरणावरून भाजप जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, “हे आहे भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या छत्रछायेखाली राजरोसपणे वाढलेल्या आणि फिरणाऱ्या भाजपेयींचं नवं पीक.”

आरोपींचे ‘वरपर्यंत’ संबंध आहेत

काशी हिंदू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नेते प्रदीप श्रीवास्तव या घटनेकडे वेगळ्या नजरेनं पाहतात. ते म्हणाले, “या प्रकरणात सत्ताधारी पक्ष- भाजपचे कार्यकर्ते सामील असल्यानं पोलिसांनी आरोपींना अटक करण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. भाजपमध्ये आता समजदारपणा, नैतिकता, चारित्र्य आणि प्रामाणिकपणा लोप पावला आहे, हे या घटनाक्रमावरून स्पष्ट होतं. पकडल्या गेलेल्या आरोपींचे भाजपमध्ये वरपर्यंत संबंध आहेत. व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांवरून स्पष्टपणे दिसून येते की, त्यांची वरपर्यंत पोहोच आहे. मोठ्या नेत्यांसोबतचे त्यांची ‘व्हायरल’ झालेली छायाचित्रं सगळं स्पष्ट करतात. मला वाटतं, तीन राज्यांतील निवडणुकांमुळे या आरोपींना अटक करण्यात टाळाटाळ केली गेली. ज्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करून या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांची पोलीस प्रशासनाने माफी मागायला हवी.”

श्रीवास्तव पुढे म्हणाले, “सामूहिक बलात्काराची ही घटना बीएचयूच्या इतिहासातील सर्वांत घृणास्पद आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अशी घटना कधी घडली नव्हती, याआधी कधी सामूहिक बलात्कार झाला नव्हता. कदाचित पोलिसांवर बराच दबाव असावा. त्यांनी आधी जाणूनबुजून विनयभंगाची तक्रार नोंदवून घेतली. नंतर ते आरोपींना वाचवण्यात गुंतले. सुदैवानं तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त प्रवीण सिंग यांची गौतम बुद्धनगरला बदली झाली, अन्यथा सामूहिक बलात्काराची ही घटना उघडकीसही आली नसती.”

“विद्यार्थिनीने दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबावानंतर पोलीस बॅकफूटवर गेले. पोलिसांना सर्व काही माहीत होतं आणि ते मुद्दाम आरोपींना हात लावत नव्हते. कदाचित वरून दबाव आला असावा. नंतर हिरवा सिग्नल मिळाल्यावर आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस अजूनही न्याय देऊ शकतील की नाही, याबाबत शंका आहे. त्यांच्या आरोपपत्रावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, नाहीतर तिन्ही आरोपी सहजरित्या सुटतील. योगी सरकार इतर गुन्हेगारांची घरं ज्या प्रकारे बुलडोझरने उदध्वस्त करते, तशीच या आरोपींचीही घरं पाडली पाहिजेत.”

“पोलिसांनी आरोपींना पकडलेलं असताना, कोणाच्या दबावामुळे त्यांना सोडून दिलं, याचाही तपास व्हायला हवा. किरकोळ घटनांपायी विरोधी पक्षांचे नेते आणि मुस्लिमांची घरं तोडणारं योगी सरकार या सामूहिक बलात्काराच्या या अमानूष घटनेवर गप्प का आहे? या आरोपींच्या घरांवर का बुलडोझर फिरवला जात नाहीये?, भाजप सरकारचे नियम इतरांसाठी वेगळे आणि स्वत:साठी वेगळे आहेत का?”

पंतप्रधान-मुख्यमंत्री त्यांना थेट भेटायचे

बीएचयूचे माजी अध्यक्ष अनिल श्रीवास्तव यांनी आरोपींना विलंबानं झालेल्या अटकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, “आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे तिन्ही आरोपी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या अगदी जवळचे आहेत. त्यांचा पक्षात इतका दबदबा होता की, ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटत असत. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांनी आरोपींना अटक केली, त्याच वेळी सीडीआर फाइल काढली असती, तर इतका उशीर लागला नसता. उशिराने म्हणजे दोन महिन्यांनंतर अटक का करण्यात आली? घटना घडली, त्या वेळी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका शिगेला पोहोचल्या होत्या. या घटनेमुळे भाजपपुढे पेच निर्माण झाला असता. ज्या दिवशी मतमोजणी होत होती, त्या दिवशी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली, त्यांना पोलीस ठाण्यात बोलावलं गेलं. मग त्यांची सुटका का करण्यात आली? राजकीय कारणासाठी गुन्हा लपवण्याचा व गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न होता का? जेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी या प्रकरणाला वाचा फोडली, तेव्हा पोलिसांनी दुसऱ्याच विद्यार्थ्यांवर खोटा गुन्हा दाखल केला. निवडणुकीमुळे आरोपींची अटक लांबणीवर टाकली गेली, हे सुशासन आहे?”

भाजपवर हल्लाबोल करताना अनिल पुढे म्हणाले की, “बलात्कार प्रकरणी भाजप आमदाराला झालेली जन्मठेपेची शिक्षा आणि आता याच पक्षाच्या आयटी सेलमधल्या तरुणांना सामूहिक बलात्कारप्रकरणी झालेली अटक, यांमुळे भाजप या सत्ताधारी पक्षाचा खरा चेहरा उघड झाला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुलासा करायला हवा, कारण ते बनारसचे खासदारही आहेत. ज्या विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले, त्यांची भाजप नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांनी माफी मागितली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात भेलूपूरचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त प्रवीण सिंग यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे. २७ दिवसांपूर्वी तिन्ही आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावलं गेलं, तेव्हाच्या पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजशी पोलिसांनी छेडछाड करू नये.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

दुधखुळी माणसं आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी टपलेली लबाड माणसं, यांचा सुळसुळाट झालेल्या जगात ‘देव’ या कल्पनेचा वापर स्वतःच्या ‘पोळ्या’ भाजून घेण्यासाठी सर्रास केला जात आहे!

सर्व भारतीय उपखंडात एकच राम असावा, एकच ‘रामायण’ असावे आणि एकच रावण असावा, हा संघपरिवार व भाजपचा हेतू आढळतो. पण त्यांचा रावण नेमका कोणता?

आजच्या ‘सुपरडुपर ऐतिहासिक दिवसा’ची संक्षिप्त पूर्वपीठिका

अर्वाचीन काळात कोट्यवधी भारतीयांच्या मनात ‘रामा’चे नाव कोणी रुजवले असेल तर, ते म. गांधीजींनी!

..................................................................................................................................................................

“पोलिसांनी आरोपींना पकडलेलं असताना, कोणाच्या दबावामुळे त्यांना सोडून दिलं, याचाही तपास व्हायला हवा. किरकोळ घटनांपायी विरोधी पक्षांचे नेते आणि मुस्लिमांची घरं तोडणारं योगी सरकार या सामूहिक बलात्काराच्या या अमानूष घटनेवर गप्प का आहे? या आरोपींच्या घरांवर का बुलडोझर फिरवला जात नाहीये?, भाजप सरकारचे नियम इतरांसाठी वेगळे आणि स्वत:साठी वेगळे आहेत का?”

एका आरोपीचं संघप्रचारक आणि भाजपच्या तत्कालीन संघटना मंत्र्यासोबतचं छायाचित्र व्हायरल होत आहे. हे तिन्ही आरोपी भाजप आमदारांच्या निकट असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप पटेल, जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा आणि शहराध्यक्ष विद्यासागर राय यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. २७ दिवसांपूर्वी तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली, तेव्हाच भाजपने त्यांना बाहेरचा रस्ता का दाखवला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडेनऊ वर्षांच्या कार्यकाळात भाजपला अशा प्रकारे अडचणीत आणणारी ही पहिलीच घटना आहे.

‘राष्ट्रवादी अँकर’ प्रश्न का विचारत नाहीत?

ज्येष्ठ पत्रकार अजित अंजुम ट्विट करून मुख्य प्रवाहातील माध्यमांवर प्रश्न उपस्थित करताना म्हणाले की, “ही तरुण मुले पंतप्रधानांपासून आणि योगी-नड्डा यांच्यापर्यंत कशी पोहोचली? एवढा मोठा गुन्हा करूनही त्यांची छायाचित्रं कोणत्याच वाहिनीवर दाखवली का गेली नाहीत? त्यांची छायाचित्रं दाखवून एखादा ‘राष्ट्रवादी’ अँकर भाजपला प्रश्न का विचारत नाही?”

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अखिलेश यादव यांनी या प्रकरणावरून भाजप जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, “हे आहे भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या छत्रछायेखाली राजरोसपणे वाढलेल्या आणि फिरणाऱ्या भाजपेयींचं नवं पीक. त्यांच्या तथाकथित ‘झिरो टॉलरन्स सरकार’चा डंका दिखावटी होता, पण ठोस पुरावे आणि जनतेतील वाढता असंतोषामुळे सरकारला शेवटी आरोपींना अटक करावी लागली. हे तेच भाजपचे लोक आहेत, ज्यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.”

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

माणसांचे मुखवटे पांघरलेली भलतीच कुठली तरी जमात, माणसांना माणसांतूनच हद्दपार करत आहे. केवळ माणसांनाच नाही, तर त्यांचा वर्तमान, इतिहास आणि भविष्यकाळही

‘सेक्युलर’ शक्तींना टिकून राहायचे असेल, पुन्हा उभे राहायचे असेल, तर ‘धर्म’ ही बाब वजा करून चालणार नाही आणि जनतेची भाषा आपलीशी करून ‘भारतीयत्वा’च्या चर्चेचा भाग व्हावे लागेल

धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भातील मूलभूत बाबींचा सामना करावा लागत असलेला आणि वैविध्य असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे

..................................................................................................................................................................

“भाजप महिलांच्या प्रतिष्ठेचा कशा प्रकारे खेळ करत आहे आणि महिलांवर अत्याचार, छेडछाड करणाऱ्यांना आणि बलात्काराच्या आरोपींना संरक्षण देत आहे, हे देशभरातील प्रत्येक महिला पाहत आहे. आगामी निवडणुकीत महिला भाजपला एकही  मत देणार नाहीत. याच महिला भाजपच्या पराभवाचं कारण असतील. भाजपचं सत्य आता जनतेसमोर उघड झालं आहे. आगामी निवडणुकीत जनता भाजपला पराभूत करून महिलांना न्याय देईल.”

ट्विटरवरही समाजवादी पक्षाची प्रतिक्रिया आली आहे की, “बीजेपी की गारंटी : सत्ता की हनक में भाजपाई करेंगे शोषण ! IIT-BHU में गनपॉइंट पर छात्रा के कपड़े उतरवाकर वीडियो बनाने और गैंगरेप करने वाले आरोपी भाजपा सोशल मीडिया के सदस्य हैं शर्मनाक! प्रदेश में बहन-बेटियां असुरक्षित, बीजेपी वाले ही हैं खतरा। इन आरोपियों को सख्त से सख्त सजा मिले, सरकार न दे संरक्षण।”

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय म्हणतात, “मी त्याच वेळी सांगितलं होतं की, या प्रकरणात भाजपचे लोक सामील आहेत. तेव्हा मला ‘टार्गेट’ करून माझ्यावर एफआयआर दाखल करण्यात आला, पण माझं म्हणणं खरं ठरलं. या मुद्द्यावर बीएचयूच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. दबाव वाढल्याने पोलिसांना कारवाई करणं भाग पडलं. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ ही भाजपसाठी केवळ घोषणा आहे.”

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

तर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेता म्हणाल्या की, “हे प्रकरण बनारसचं आहे, पण आजपर्यंत तिथले खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या दुर्दैवी घटनेबाबत चकार शब्दही काढलेला नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, भाजप केवळ बलात्कार करणाऱ्यांना संरक्षणच देत नाही, तर त्यांना पक्षात मोठी पदंही देते, आणि त्यांना सर्वोच्च नेतृत्वाच्या गोटातही सामील करून घेतं. या पक्षाचा आणि त्यांच्या नेत्यांचा धिक्कार असो.”

उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया अध्यक्षा पंखुरी पाठक यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्या म्हणाल्या, “आयआयटी-बीएचयूच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे कुणाल पांडे आणि सक्षम पटेल हे भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यामुळेच त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांना अटक करण्यासाठी इतका वेळ लागला. भाजप हा पक्ष बलात्कारी आणि गुन्हेगारांचा बालेकिल्ला झालेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात त्यांच्याच पदाधिकार्‍यांनी केलेल्या या जघन्य अपराधाला जबाबदार कोण?”

समाजवादी पक्षाचे आमदार आशुतोष सिन्हा आणि ज्येष्ठ नेते मनोज राय धुपचंडी म्हणाले की, “भाजपचं शीर्ष नेतृत्व पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह पक्षाच्या सर्व नेत्यांशी या आरोपींचे घनिष्ठ संबंध होते. भाजपचे नेतेच त्यांना संरक्षण देत होते. त्यांच्यासोबतची छायाचित्रं हे सत्य उघड करत आहेत. भाजपच्या ‘बेटी बचाओ’ या मोहिमेचा खरा अर्थ असा आहे की, भाजपपासून मुलींना वाचवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात जर मुलीसुद्धा सुरक्षित नसतील, तर देश कसा सुरक्षित राहणार? तशीही उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था ‘रामभरोसे’च चालली आहे.”

हिंदीतून मराठी अनुवाद - कॉ. भीमराव बनसोड

.................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख ‘न्यूज क्लिक’ या पोर्टलवर १ जानेवारी २०२४ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा –

https://hindi.newsclick.in/IIT-BHU-gang-rape-case-Police-impartiality-and-BJP-conduct-and-character-both-under-question

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा