‘झांबळ’ : बदलत गेलेल्या ग्रामसंस्कृतीच्या ऱ्हासपर्वाचं चित्रण हा या कथांचा ‘युएसपी’ आहे…
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नीतीन वैद्य
  • ‘झांबळ’चं मुखपृष्ठ
  • Sat , 30 December 2023
  • ग्रंथनामा शिफारस झांबळ Zanbal समीर गायकवाड Samer Gaikwad

२०२३चे सोलापूरचे ‘लोकमंगल साहित्य पुरस्कार’ नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यातील एका पुरस्कारप्राप्त पुस्तकाचा हा परिचय...

............................................................................................................................................

“समीर गायकवाडना काही सांगावे असे वयासहित कसलेच वडीलपण माझ्याकडे नाही, पण अनुभवलेलं, पाहिलेलं, ऐकलेलं, उरात कोंडलेलं कुणाला तरी सांगण्याच्या अनावर ऊर्मीनं भारलेला आपला गाववाला लेखक आणि वाचण्या-समजून घेण्यातून माणूसपणाकडे सरकण्यापलीकडे कशात रस नसलेला वाचक, हे नातं तर आहेच. त्यातून सांगावेसे वाटते- अनुभवापासून थोडे अंतर राखा, दुःखाचं गदगदून टाकणारं ओझं काही वेळा पुरतं तरी उतरवून, कमावलेल्या ताटस्थ्यानं त्याकडं पाहा.”   

हे टंकून ठेवले त्याला काही दिवस झालेत. दरम्यान हिंदीतल्या बुजूर्ग लेखिका कृष्णा सोबतींचे ‘रचना का गर्भगृह’ हे निर्मितीविचार सांगणारे छोटंसं पुस्तक वाचनात आलं. त्यात लेखक आणि त्याचं लेखन यातलं नातं विविधांगांनी, बारीक तपशीलांनी तपासलं आहे. कृष्णाजी म्हणतात, अगदी कोऱ्या पानांवरही लेखक आणि लेखन हे वेगवेगळे आहेत. एक आपल्या बहिर्मुखतेसह भरपूर जगतो, तर दुसरा आपल्या आतल्या एकांताला त्याच्या गहनतम सीमेपर्यंत शोषून घेतो. बाहेरची ऊब आणि आतली ओल आपल्या संवेदनेत खेचून घेतो.

असं झालं नाही, तर लेखक उसनं गांभीर्य किंवा कृतक भावूकतेची शिकार होतो. महत्त्वपूर्ण हे की, निर्मिकाला आपल्या रचनेला आपल्यावेगळं करून काही अंतरावरून पारखता येते का? तिच्या केंद्रापासून परिघापर्यंतचा प्रवास पुन्हा करता येतो का?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

समीर गायकवाड यांचं लेखन समाजमाध्यमं, ब्लॉग, वृत्तपत्रं असं सगळीकडेच सतत दिसत होतं, पण पुस्तकरूपात काहीएक सूत्रानं बांधलेलं असं प्रथमच पाहिलं.‌ ‘खुलूस’ आणि ‘झांबळ’ ही एकाच वेळी आलेली दोन पुस्तकं. (याआधी एक पुस्तक आलेय, पण ते वाचण्या-पाहण्यात आले नाही) वृत्तपत्रांतल्या बातम्यांमध्येच अडकून काही क्षण हळहळीनंतर विस्मृतीत विरून जाणारी दुःखानं गदगदलेली झाडं ही, समीर त्यांना तुमच्यासमोर उभं करून अंतर्बाह्य दाखवतात. या कथा नव्हेत. वास्तवाची, अनुभवाची रचना करून त्यांना कथारूप देण्याचे प्रयत्न बापूंनी अपवाद वगळता इथं केलेले नाहीत. या अतिसंवेदनशील मनानं टिपलेल्या अनुभवांच्या गोष्टीवेल्हाळपणे केलेल्या नोंदी आहेत.

‘खुलूस’मधल्या लेखनाचा देहविक्रय हा विषय एरवी चघळून सोडून दिला जाईल इतपतच गांभीर्यानं आलेला, त्यामुळे मुळातून काहीसा अस्पर्शित. समीर मात्र अतितीव्र संवेदनशीलतेनं निव्वळ विषय मांडण्यापलीकडे त्यात गुंतून गेले, त्यातून त्यांचं प्रत्यक्षातलं काही कामही उभं राहिलं.

‘खुलूस’मधले लेख या त्याच्या केस स्टडीज आहेत, असं रूढार्थानं म्हणता येईलही, पण ‘केस’ या शब्दात ‘निर्जीवपण’ आणि ‘स्टडीज’मध्ये त्यात आपण गुंतणार नाही, एवढं कोरडेपण अभिप्रेत असतं. हे दोन्ही या लेखनात नाही, तर समाजाच्या तनामनाला गदगदून हलवण्याची तीव्र असोशी आहे. स्त्रीवर देहविक्रय लादलेला असणं, त्याशिवाय तिचं आयुष्यातले जगण्याचे अन्य पर्याय परिस्थितीनं खुडून टाकलेले असणं, या विपरितावरही जगण्याच्या असोशीनं (का त्याचीही कशाकुणासाठी तरी असलेली सक्ती?) कुरघोडी करणं, हे काय आहे?

यातल्या कथासदृश नोंदी आधी ब्लॉगवर मग फेसबुक वॉलवर सुट्या अधूनमधून वाचलेल्या होत्या, तरी इथं त्या एकत्रित सलग वाचताना दुःखानं गदगदलेल्या झाडांच्या घनदाट बनात मध्ये आपण एकाकी उभे आहोत, असं काहीक्षण वाटून गेलं. ‘जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे’ या उक्तीचा साक्षात अनुभव. श्वासदेखील पराधीन करणारं हे दुःख साहण्यासाठी सोडाच पण पाहण्या-ऐकण्या-वाचण्यासाठीही असहनीय खरं, कथित सभ्य समाजाच्या टाचांखाली पडून राहणंही कुणाला खुपावं, याला काय म्हणता येईल? तरी सलग कथावाचनात देहविक्रयातल्या सामाजिक क्रौर्याचा, दांभिकपणाचा हा अनुभव काहीसा एकसुरी, ‘प्रेडिक्टेड’ होतो.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

पण ‘झांबळ’मधले दुःख तसं एकजातीय नाही, ते अनेकपदरी आहे. शेवटाच्या अग्रावर उभ्या ग्रामजीवनातल्या बऱ्यावाईट अशा दोन्ही माणूसपणाच्या यातल्या नोंदी अजून भग्न रूपात का होईना शिल्लक अवशेषांचं अस्सल दर्शन घडवतात.

“भेटलेली माणसे घनदाट होती, थेट पोचावयास कोठे वाट होती?” या सुरेश भटांच्या ओळी ‘झांबळ’च्या मनोगतात उदधृत केल्या आहेत. या कथानुभवांमधली माणसं वरवर साधी, सामान्य दिसत असली तरी अनेकार्थानं घनदाट आहेत हे खरंच आहे. सामान्यपणातल्या या घनदाटपणावर लोभावून जाण्यातूनच तर हा ऐवज तयार झाला. ‘आपल्या आयुष्याचे तोरण ज्यांनी इतरांच्या दारी बांधले त्यांना’, अशी या पुस्तकाची अर्पणपत्रिका आहे, त्यावरून या कथांमधल्या पात्रांचा काही एक अंदाज यावा.

‘पाच रुपयांची नोट’ ही पहिलीच कथा हा पिळवटून टाकणारा अनुभव यादृष्टीने पाहण्यासारखा आहे. सरळ रेषेतला कसलेही खाचखळगे नसलेला अपयशी प्रवास. अंतिमतः यश का अपयश, असलीच तर एवढीच उत्सुकता. पण समीर या प्रवासाचं जे निकटदर्शन घडवतात, ते कमाल आहे. अपघातानंतर जन्ममृत्यूच्या सीमेवर आहेत वडील. तरी रुग्णालयातला रहिवास अनिश्चित काळ लांबतो, तसं नकळत काहीसं शैथिल्य येतं. या काळात असाध्य रोगानं ग्रस्त असलेला पांडुरंग हा आठ-दहा वर्षांचा पोर आणि तीन मुलींनंतर या हुशार मुलावरच सगळी आशा लावून बसलेले त्याचे वडील दिसतात.

एकीकडे वडिलांची काळजी, अनिश्चितता आणि दुसरीकडे समांतर सतत होणारं दारिद्र्याचं, त्यातल्या हतबलतेचं, यातही एकमेकांना सांभाळून घेण्यातल्या मनाच्या श्रीमंतीचं दर्शन, असा समांतर वाटांवरचा प्रवास, दोघांचाही अखेर अपयशी होतो. भल्या सकाळी ऑपरेशनआधी खायचे म्हणून वडील मुलासाठी दहाची नोट देऊन टपरीवाल्याला मोठा वडापाव करायला सांगतात, मुलगा नेहमीचा लहान वडा खाऊन परत घेतलेली पाच रुपयाची नोट बापाला परत करतो, भूक नाही म्हणत. त्या बापाच्या खिशात तशाच राहून गेलेल्या पाच रुपयांच्या नोटेची ही करुणरम्य गोष्ट.

या कथांमध्ये अर्थात अपवाद वगळता पूर्वीचं सगळंच चांगलं आणि आताचं सगळं वाईट, असा सगळं नव्या जुन्या ‘बायनरी’त विभागणारा एक काहीसा भाबडा सूर आहे. शिवाय समीर बहुतेक कथा निवेदनातून सांगतात, वाचकाशी थेट संवाद केल्यासारखी. पात्रउभारणी, संवाद, घटनाप्रसंगातून ती उमलत नाही. त्यामुळे लेखकाचे ताटस्थ्य हरवते आणि पुस्तक कृष्णा सोबती म्हणतात, तशा काहीशा कृतक भावुकतेकडे झुकते. तरी एकेकाळी संपन्न असलेल्या ग्रामजीवनाचे काजळत, अंधारत गेलेलं हे चित्र उदास करतं.

या संग्रहातल्या सगळ्याच कथांना कारुण्याचा अंतःस्वर आहे. अफाट भोग निमूटपणे सोसणं भाग पडलेली पात्रं या कथांमधून सतत दिसतात. ‘बकुळा’ ही चांगदेवाच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाची, अंगदची पत्नी आहे. लग्न होऊन गावी येताच ‘कसाया हाती गाय’ असं तिचं वर्णन येतं कथेत. नंतरची तिची परवड तपशीलात वर्णन करतात समीर, इतकी की शेवटी ती पोटात दोन मुली आणि एक मुलगा यांच्यासह विहीर जवळ करते तशी काहीशी सुटकेची भावना होते, तिच्याबरोबर वाचकांचीही.

‘झिपरीचा माळ’मध्ये सात मुली असलेल्या पाटलाच्या भरल्या चौसोपी वाड्याची भावकी, बाईलवेडे रंगेलपण यातून ‘झिपरीचा माळ’ होण्यापर्यंतची दुर्दशा येते.

शेतकरीजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या प्राणीजीवनाचं उत्कट, सहृदय चित्रण हाही या कथांचा एक विशेष म्हणता येईल. सुभान्या हा बैल आहे,, हे कथेत पार पुढे जाईतो कळत नाही, इतकं हे चित्र मानवी आहे. सुभान्या गार खिरीला तोंड लावत नाही, म्हणून वेलची, जायफळांनं घमघमणारी गव्हाची खीर पितळी डब्यात गच्च बंद करून, तेही मुलगी गेल्यानंतरच्या उदास दिवसांत, नवऱ्याजवळ देणारी लोचनाबाई इथं भेटते.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

निखिलेश चित्रेंचा असंख्य शक्यतांनी भरलेल्या वाटेवरचा पुढचा लेखनप्रवास आणखी कुठल्या चकव्यात नेईल, की काही वेगळ्या वाटेने होईल, याची उत्सुकता आहे…

‘मेळघाट : शोध स्वराज्याचा’ या पुस्तकात मिलिंद बोकील ‘स्वशासन’ ही संकल्पना स्पष्ट करतानाच आपल्याकडच्या प्रशासकीय विटंबनेचा उल्लेख करतात, तेव्हा पटतंच ते!

‘पुस्तकनाद’ : एखादा ‘नाद’ किती सृजनशील असू शकतो, याचं उदाहरण म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल

..................................................................................................................................................................

डबा घेऊन एसटीत बसलेल्या आबांच्या डोळ्यासमोर शेवंता आणि सुभान्या यांचा जीवनप्रवास समांतर तरळतो इतकं सख्य दोघांत आहे. पण तोवर शेवंता गेल्याचं कळल्यावर दावं तोडून सुसाट निघालेला सुभान्यानं बरड माळरानावरल्या खोल कोरड्या विहिरीत उडी घेऊन जीव दिलेला आहे.

‘चित्र्या’ या कारवानी कुत्रा नायक असलेल्या कथेतला रंगनाथ. त्याचा परिसरातल्या कुठल्या कुठल्या सजीव-निर्जीवावरही अपार जीव आहे. त्याची यादी करताना समीर लिहितात ते वाक्य तब्बल ऐंशी शब्दांचे आहे. काय काय सामावले आहे त्यात… आबांना शेवटाआधी ज्या दवाखान्यात ठेवलं आहे, त्याचा माग काढत चित्र्या वाटेतल्या कुत्र्यांना तोंड देत पंचेचाळीस किलोमीटर धावत पोचतो. आबांच्या अत्यवस्थ अवस्थेत ॲम्ब्युलन्समधल्या परतीचा प्रवास पुरा होईतो आबा आणि चित्र्या दोघांचाही श्वास थांबला आहे.

समीरच्या कथेतली प्राणीसृष्टीही त्यातल्या माणसांसारखीच घनदाट आहे. ‘पांढरी माती’मधली कृष्णा गाय आयुष्यभर भरभरून दिल्यानंतर भाकड झाली आहे. दुष्काळात बाकी जनावरं छावणीत सोडल्यावर कृष्णा एकटीच राहते, कारण धनी नारायणशिवाय ती पाण्यालाही तोंड लावत नाही. तशात नारायणला सासुरवाडीत लग्नाला जावे लागते. काही जुजबी सोय करून खुल्या शेतात आंब्याखाली तिला बांधून नारायण गावी जातो. पण तोवर मोसम पालटला आहे, वादळी वारं, विजांचा कल्लोळ गावी पाहताना त्याला कृष्णाची काळजी वाटू लागते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

असंख्य अडचणींशी झगडत काळजीनं पोखरलेल्या मनानं नारायण लगबग करत परततो, तेव्हा कृष्णाच्या अंगावर झाडाची फांदी पडली आहे. तिच्यात लढण्याचं त्राण उरलेलं नाही. पण नारायणची चाहूल लागताच ती जीव एकवटून उभी राहते, त्याच्या स्पर्शाच्या जादूने भाकड कृष्णेचा पान्हा पुन्हा तटतटतो.

बदलत गेलेल्या ग्रामसंस्कृतीच्या ऱ्हासपर्वाचं चित्रण हा या कथांचा ‘युएसपी’ आहे. तशा गावाच्या लोकजीवनात कालौघात दंतकथा बनलेल्या प्रेमाच्या-सुडाच्या-पिढीजात वैराच्या किस्सेवजा कथाही येतात. पण त्याचा मुख्य स्वर आहे भरलेल्या, नांदत्या ग्रामजीवनाचा ऱ्हास. हा ऱ्हास केवळ कालौघात झालेला नाही, तर माणसांची मनं, परिणामी नातेसंबंधाचा परिघ - जो कधी भोवतालची जनावरांसह असलेली हिरवी सृष्टी पोटात घेण्याइतका विशाल होता तो - रक्तनात्याच्या संबंधाच्याही आत आकसत गेला. ग्रामजीवन आक्रसत गेल्यानं वैयक्तिक वैर, सूड यावर गावाचं, समूहाचं काहीसं नियंत्रण होतं ते संपलं. मोकळी, सुटी झालेली माणसं चंगळवादानं झपाटली, आपल्यापलीकडचं पाहण्याची दृष्टी गमावत गेली, या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे.

या कथांमध्ये अर्थात अपवाद वगळता पूर्वीचं सगळंच चांगलं आणि आताचं सगळं वाईट, असा सगळं नव्या जुन्या ‘बायनरी’त विभागणारा एक काहीसा भाबडा सूर आहे. शिवाय समीर बहुतेक कथा निवेदनातून सांगतात, वाचकाशी थेट संवाद केल्यासारखी. पात्रउभारणी, संवाद, घटनाप्रसंगातून ती उमलत नाही. त्यामुळे लेखकाचे ताटस्थ्य हरवते आणि पुस्तक कृष्णा सोबती म्हणतात, तशा काहीशा कृतक भावुकतेकडे झुकते. तरी एकेकाळी संपन्न असलेल्या ग्रामजीवनाचे काजळत, अंधारत गेलेलं हे चित्र उदास करतं.

‘झांबळ’ - समीर गायकवाड

मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने – १९६ | मूल्य – २८० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......