काँग्रेसच्या गलथानपणामुळे भाजपने दोन राज्यं त्याच्याकडून हिसकावून घेतली आणि मध्य प्रदेशातील सरकारही राखले!
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड यांचे नकाशे व भाजपचं बोधचिन्ह आणि तेलंगणाचा नकाशा व काँग्रेसचं बोधचिन्ह
  • Sat , 09 December 2023
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress राजस्थान Rajasthan मध्य प्रदेश Madhya Pradesh छत्तीसगड Chhattisgarh तेलंगणा Telangana

नुकत्याच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी तीन राज्यांमध्ये भाजपने, तर एका राज्यात काँग्रेसने बहुमत मिळवले. मध्य प्रदेशात आधीही भाजपचेच सरकार होते, पण गेल्या १८ वर्षांपासून भाजपच सत्तेत असल्यामुळे ‘अँटी-इन्कमबन्सीं’चा फायदा मिळून या वेळी काँग्रेसचे सरकार येईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत होता, पण तो साफ चुकला. मात्र मुख्यमंत्रीपद पुन्हा शिवराज चव्हाण यांनाच मिळेल की, आणखी कोणाला, हे लवकरच स्पष्ट होईल.

राजस्थानमध्ये आधी काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेसचे आमदार फोडून तेथे आपले सरकार स्थापन करण्याचा भाजपने गेल्या पाच वर्षांत अनेकदा प्रयत्न केला, पण मध्य प्रदेशमध्ये जसे त्यांना फाटाफुटीत यश आले, तसे राजस्थानमध्ये जमले नाही. काँग्रेसचे सचिन पायलट यांनी पक्षांतर्गत फाटाफूट करून भाजपला मदत होईल, यांसारखा प्रयत्न करून पाहिला, पण दमछाक झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी सामंजस्य प्रस्थापित करून एकजुटीने निवडणुका लढवल्या. पण तरीही भाजपने निर्विवादपणे यश मिळवले आहे. खरे तर भाजपच्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांना केंद्रीय नेतृत्वाने फारसे महत्त्व दिले नसल्याने, त्यांच्यातील मतभेदाचा फायदा पुन्हा एकदा काँग्रेसला मिळेल, असे म्हटले जात होते, पण तो अंदाजसुद्धा साफ चुकला. भाजपअंतर्गत वादविवादाचा फायदा काँग्रेस या वेळी उठवू शकली नाही.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांच्या कार्यकाळात ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चे अनेक प्रयोग केले. त्याशिवाय शेतकऱ्यांचे धान खरेदी, शेण खरेदी इत्यादी प्रकल्प राबवले. त्यामुळे ते पुन्हा सत्तेत येतील, असे बोलले जात होते, परंतु तेथेही काँग्रेसला फटका बसला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भाजपच्या ‘हार्ड हिंदुत्वा’ला काँग्रेस ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ने उत्तरे देण्याचा प्रयत्न करते. असा प्रयोग मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी करून पाहिला, पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. कारण ‘हिंदुत्वाचे खरे रक्षणकर्ते आम्हीच आहोत’ हा ब्रँड भाजपने एव्हाना चांगलाच प्रस्थापित केला आहे. तो ‘सॉफ्ट हिंदुत्वा’च्या जोरावर काँग्रेसला हिसकावून घेता येत नाही, हेच यातून दिसते. अशा परिस्थितीत छत्तीसगडमध्ये राममंदिर उभारणे, आईच्या नावाने ‘कौसल्या यात्रा’ काढणे, अशा पद्धतीने काम करून भागत नाही, हे निकालाने दाखवून दिले.

त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये घडलेल्या ख्रिश्चन आदिवासींच्या हत्याकांडात आणि चर्च तोडफोडीच्या घटनांत काँग्रेस सरकारकडे आदिवासी ख्रिश्चनांनी स्वसंरक्षणाची अपेक्षा व्यक्त केली होती. पण हिंदू मतदार आपल्यापासून दूर जाईल, या भीतीपोटी काँग्रेसने त्यांना संरक्षण दिले नाही. परिणामी ख्रिश्चन आदिवासींनी नाईलाजाने या निवडणुकीत भाजपला मतदान केले असेल, तर त्यांचे काही चुकले असे म्हणता येणार नाही.

तेलंगणात मात्र काँग्रेसने बहुमत मिळवले. त्याचा आवश्यकतेपेक्षा जरा जास्त गवगवा केला जात आहे, तो अनाठायी वाटतो. त्याचे साधे कारण असे आहे की, देशभरातून व विविध राज्यांतून भाजपची सत्ता उखडून टाकावी, यासाठी ‘इंडिया आघाडी’ निर्माण झाली आहे. परंतु तेलंगणात काँग्रेसने भाजपचेही विरोधक असलेल्या टीआरएस चंद्रशेखर यांच्या ‘भारतीय राष्ट्र समिती’ (‘बीआरएस’) या पक्षाला (भलेही त्याला भाजपची ‘बी टीम’ म्हटले जात असेल.) धोबीपछाड दिला, ही काही फार कौतुकाची बाब आहे, असे नाही. फार तर तेलंगणात काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेत आले, एवढेच म्हणता येईल.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभाच्या निवडणुकीत या ‘इंडिया आघाडी’च्या त्या त्या राज्यांतील संबंधित घटक पक्षांना फारसे विचारात घेतले नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे हा पक्ष बऱ्यापैकी गर्वात आला होता, त्यामुळे त्यांच्या ठिकठिकाणच्या नेत्यांकडून व केंद्रीय नेतृत्वाकडून गर्विष्ठ व्यवहार झाला. याचे एक साधे उदाहरण द्यायचे झाल्यास मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशला लागून असलेल्या पाच मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी उमेदवार उभे करण्याबाबत चर्चा करूया, असा प्रस्ताव दिला होता. मात्र मध्य प्रदेशचे काँग्रेसचे कमलनाथ यांनी आघाडी लोकसभेसाठी झाली आहे, विधानसभेसाठी नाही, असे सांगत ‘कोण हे अखिलेशविखिलेश?’ असे उद्गार काढले होते. त्यांचे हे उद्गार प्रसारमाध्यमांतून बऱ्यापैकी गाजले, आणि आताही त्याची बरीच चर्चा होत आहे. त्या अहंभावाचेच परिणाम पराभवाच्या रूपात काँग्रेसला भोगावे लागत आहेत, असे म्हटले जात आहे.

या पराभवानंतर काँग्रेसने ‘इंडिया आघाडी’ची बैठक ६ डिसेंबर रोजी बोलावली होती, परंतु लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांच्यासारख्यांना ती तारीख सोयीचे नसल्याने ही बैठक आता १७ डिसेंबरला होणार आहे.

तेलंगणामध्ये सीपीआय, सीपीएम यांसारख्या डाव्या पक्षांनी चार-पाच उमेदवार उभे करण्यासाठी काँग्रेसशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला काँग्रेसने दाद न दिल्यामुळे त्यांनी आपापले उमेदवार उभे केले. त्यापैकी कोठागुडेम मतदारसंघातून सीपीआयचे कॉ. के. एस. राव ६१,८३२ मतांनी विजयी झाले आहेत.

काँग्रेसने परिपक्वता दाखवून त्या त्या राज्यांतील संबंधित घटक पक्षांशी चर्चा, विचारविनिमय करून जर या निवडणुका लढवल्या असत्या, तर जनतेमध्ये चांगला संदेश जाऊ शकला असता, पण ही संधी काँग्रेसने गमावली.

‘इंडिया आघाडी’त काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष असून त्याचे स्वरूपही देशव्यापी आहे. काही राज्यांत त्याची सत्ताही आहे. त्यामुळे इतर पक्षांनी त्यांना या आघाडीचे नेतृत्व दिले आहे, पण काँग्रेसने ज्या जबाबदारीने व परिपक्वतेने वागायला पाहिजे, तसे वागले जात नाही, असेच दिसून येते आहे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

भाजपला मोठं, तर काँग्रेसला थोडंसं यश!

निवडणूक निकालाची आकडेवारी आणि वस्तुस्थिती!

..................................................................................................................................................................

राजस्थानमध्ये ‘भारत आदिवासी पक्ष’ हा आदिवासींचा नवा पक्ष तयार झाला आहे. काँग्रेसने या पक्षाशी चर्चा करून काही ताळमेळ करायला हवा होता, परंतु तो केला नाही. त्याचाही फटका काही ठिकाणी बसला. त्या त्या ठिकाणच्या लहानसहान पक्षांना विश्वासात घेऊन, त्यांच्या काही मागण्या तडजोडीने मान्य करून मोठेपणाची भूमिका काँग्रेसने निभावणे आवश्यक होते, पण तसे घडू शकले नाही.

तसे पहिल्याच काँग्रेसची मतदानाची टक्केवारी फारशी कमी झालेली नाही, परंतु भाजपची टक्केवारी मात्र पूर्वीपेक्षा वाढलेली दिसते. तेलंगणात भाजपचा मागच्या निवडणुकीत एकच आमदार निवडून आला होता, आता मात्र त्यांचे आठ आमदार निवडून आले आहेत. त्याच्याच परिणामी त्यांचे तीन राज्यांत सर्वाधिक आमदार निवडून आले.

मुस्लीम, दलित, ख्रिश्चन व काही प्रमाणात आदिवासी समुदाय आपल्याला मतदान करणार नाही, याची भाजपला खात्री असल्याने या समुदायांची मतं निदान काँग्रेसला मिळणार नाहीत, असे डावपेच भाजप आखतो आणि त्यात यशस्वी होतो. काँग्रेस नेमकी अशा डावपेचांत मागे पडते.

महाराष्ट्रात ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा दलितांतील एक मोठा समुदाय आहे. त्यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’शी काँग्रेसचे नेते कशा पद्धतीने वागतात? ‘इंडिया आघाडी’चे त्यांना साधे निमंत्रणसुद्धा दिले जात नाही. दलित समाजाचाही ॲड. बाळासाहेब यांच्यावर काँग्रेसशी आघाडी करण्याबाबत दबाव आहे, पण काँग्रेसचे नेते ॲड.बाळासाहेबांना आघाडीत घ्यायलाही तयार नाहीत. तरीही ॲड.बाळासाहेबांनी आघाडी करण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लेखी पत्र दिले, मात्र काँग्रेसने त्याला अजून साधे उत्तरही दिलेले नाही.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

काँग्रेसचा हा एक भ्रम आहे की, तोच दलित, आदिवासी, ख्रिश्चन, मुस्लिमादी अल्पसंख्याकांचा ‘दाता-त्राता’ आहे आणि आम्हीच त्यांचे नेतृत्व करू शकतो. या भ्रमातून ते जेवढ्या लवकर बाहेर पडतील, तितके त्यांच्याच फायद्याचे ठरेल.

सर्व समाजविभागांच्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्ष-संघटनांना भाजपची ‘बी टीम’ अशी दूषणे दिली जातात. त्याचेही दुष्परिणाम काँग्रेसला भोगावे लागत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांतही ते दिसलेच. अशा परिस्थितीत भाजप जी मते आपणाला मिळणारच नाहीत, ती निदान काँग्रेसला मिळू नयेत, यासाठी अशा पक्ष-संघटनांना रसद पुरवत असेल, तर त्यात त्याचे काय चुकले?

काँग्रेसच्या गलथानपणामुळे भाजपने दोन राज्यं त्याच्याकडून हिसकावून घेतली आणि मध्य प्रदेशातील सरकारही राखले. त्यामुळे राजकीय विश्लेषक चक्रावून गेले आहेत. ‘एक्झिट पोल’ तर पूर्णपणे खोटेच असतात, आपापल्या वृत्तवाहिनीच्या हितसंबंधाला धरून असतात, हेही या चार राज्यांच्या निवडणुकांतून दिसून आले.

.................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......