गोळवलकर आणि मोदी एका बाजूला अन् खुद्द सरसंघचालक दुसऱ्या बाजूला… असे कसे झाले, एवढ्या शिस्तीच्या, एकमुखाने बोलणाऱ्या संघटनेत? संघ व सरकार या दोघांत अशी विरोधी व टोकाची मते कशी काय?
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Wed , 11 October 2023
  • पडघम देशकारण संघ RSS भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi मोहन भागवत Mohan Bhagwat गोळवलकर गुरुजी Golwalkar Guruji आरक्षण Reservation जात Caste

नाशकात दोन ऑक्टोबर रोजी ‘विचार जागर फाउंडेशन’ या संस्थेने ‘रा.स्व. संघ : काल, आज, उद्या’ असा एक व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला होता. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रावसाहेब कसबे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. वक्त्यांमध्ये मी व निरंजन टकले होतो. प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार-संपादक उत्तम कांबळे यांनी केले. सभागृहाबाहेर काही ज्येष्ठ स्वयंसेवक भेटले. म्हणाले, ‘तुम्ही गोळवलकरांवर जादा भर दिला, ‘उद्या’च्या संघावर काही बोलला नाहीत!’ खरे तर कसबेसर त्यांच्या अध्यक्षीय समारोपाच्या आरंभी ‘संघ काल होता, आज आहे अन् उद्यासुद्धा असेल’, असे म्हणाले होते. कारण संघ नेहमी चलनी नाण्याचा वापर करतो, असे सरांचे म्हणणे होते. आपण अ-राजकीय असल्याचे भासवत सदोदित सत्तेच्या जवळ जायचे, संघाचे खरे रूप तर राहिलेच, पण त्याचबरोबर त्याचा ब्राह्मणी गाभा सत्तेवाचून जगू शकत नाही, हेही तितकेच खरे. त्याबद्दल माझ्या व्याख्यानात मी काही विवेचन केले.

तीन ऑक्टोबरच्या सर्व वृत्तपत्रांत बिहारमधल्या जातगणनेच्या निष्कर्षाची बातमी ठळक छापलेली दिसली. दै. ‘सकाळ’ने ती पहिल्या पानावर छापली अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यावरील प्रतिक्रिया पान नऊवर सहा कॉलमी छापली. त्यातली त्यांची भाषा मी आदल्याच दिवशी वाचून दाखवलेल्या गोळवलकरांच्या उताऱ्यासारखीच दिसली. म्हणजे गोळवलकर ‘काल’ होते, ‘आज’ तर ठळकपणे प्रकटत आहेत आणि ‘उद्या’ त्यांचा दाखलाच काय, तात्त्विक आधार सढळपणे घेतला जाणार, हे उघड आहे. कारण गोळवलकरांखेरीज संघापाशी तत्त्वज्ञानात्मक (?) मांडणी करणारे कोणीच नाही. गोळवलकरांच्या मुद्रित ११ खंडांमध्ये जी भाषणे व लेखन आहे, ते सिद्धान्त, तत्त्वज्ञान अथवा विचारसरणी असे मानायचे का?  ते काय म्हणाले, ते आधी पाहू :

“अर्थात आज जातिसंस्थेचेही भयंकर अध:पतन झाले आहे. शतकानुशतकांच्या विकृतींबरोबर राजकारणामुळे आपल्या समाजजीवनात आणखी एका अनिष्ट प्रवृत्तीने प्रवेश केला आहे. जातिसंस्थेची निर्भर्त्सना करण्यात ज्यांचा आवाज सर्वांत मोठा असतो, त्यांनीच जातीजातींमधील संघर्षात आणि जातिसंस्थेमध्ये घुसलेल्या विकृतींमध्ये भर घातली आहे. निवडणुकीच्या वेळी उमेदवाराची निवड करताना प्रामुख्याने त्याच्या जातीचाच विचार केला जातो आणि प्राय: त्याच गोष्टीच्या आधाराने मतदारांना आवाहन करण्यात येते. अशा प्रकारे जातीच्या नावाने स्वार्थी वृत्तीला आणि सत्तालोलुपतेला करण्यात येणारे आवाहन, हेच जातिविद्वेषाची व परस्परशत्रुत्वाची भावना बळावण्याचे मुख्य कारण आहे. हे भेद अधिकाधिक वाढविण्याच्या कामी शासनयंत्रणेचाही गैरवापर करण्यात येत असतो. समाजातील काही गटांना हरिजन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशी नावे देऊन, पैशाच्या प्रलोभनाच्या साहाय्याने त्यांना आपले दास बनविण्याच्या हेतूने दिलेल्या विशेषाधिकारांची अधिकाधिक जाहिरात करून, त्यांच्यामध्ये परस्पर ईर्ष्या व संघर्ष वाढविणारी विभक्तपणाची भावना जोपासली जात आहे.” (‘समग्र श्रीगुरुजी’, खंड ११, भारतीय विचार साधना, पुणे, २००६, पान - १२३)

हा खंड मूळच्या ‘बंच ऑफ थॉटस’ नावाने इंग्रजीत प्रसिद्ध असलेल्या संग्रहाचा अनुवाद असून, मराठीत त्याला ‘विचारधन’ असे जुन्या आवृत्तीत म्हटले जायचे, तर २००६च्या आवृत्तीत ‘चिंतनसुधा’ असे त्याचे नाव आढळते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पंतप्रधान नरेंद्र मोदी गोळवलकर यांचीच री कशी ओढत आहेत, ते आता पाहू :

जातिनिहाय सर्वेक्षणावरून पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका : जातीच्या आधारावर समाजाची विभागणी, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश), ता. २ (पीटीआय) : बिहारमध्ये जातिनिहाय सर्वेक्षणाची आकडेवारी आज जाहीर करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधी पक्ष हे समाजाची जातीच्या आधारावर विभागणी करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. मागील सहा दशके विरोधकांनी गरिबांच्या भावनांशी खेळ करत देशाची जातीच्या आधारावर विभागणी केली. आता तेच पाप पुन्हा केले जात आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांच्या बोलण्याचा रोख नितीशकुमार यांच्या दिशेने होता.” (दै. ‘सकाळ’, औरंगाबाद आवृत्ती, पान ९)

मग मोदी स्वत: प्रचारसभांमध्ये आपणही ओबीसी म्हणजे अन्य मागासवर्गीय आहोत, असे का सांगायचे?

भाजपमध्ये निरनिराळे ‘सेल’ असून ठरावीक जातींचे नागरिक त्याच्याशी जोडायचा प्रयत्न चालू असतो, की नाही?

जात बघून भाजप उमेदवारी देत नाही का?

मराठा जातीला आरक्षण देण्याचा खटाटोप देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच झाला ना? मग ते समाजाचे विभाजन होत नाही का?

छोट्या जातींचे तसेच ब्राह्मण्यवादी बलिष्ठ जातीचे मेळावे भाजपकडून आयोजित केले जात नाहीत का? ‘मा.ध.व.’ ही जातीय मांडणी राबवूनच भाजपला १९९५मध्ये सत्ता मिळाली ना?

गोळवलकरांनी उघडपणे आरक्षणांवर आक्षेप घेतला आहे. सध्या सरकारी रिक्त जागा न भरण्याची आणि सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करण्याची चतुराई राखीव जागा भराव्या लागू नयेत, यासाठीच दाखवली जात आहे ना?

गोळवलकर व मोदी यांना जाती, जातींमुळे आलेली विषमता, जातींवर होणारे अत्याचार व हिंसाचार यांविषयी मुळीच तक्रार नाही. त्याउलट आरक्षण राबवणाऱ्या आणि राबवू पाहणाऱ्या राजकीय नेत्यांवर त्यांचा राग दिसतो, असे जाणवले तर त्यात चूक काय?

फुले, आगरकर, शिंदे, पेरियार आदी जातीविरोधकांची नावे संघपरिवार घेत नाही. मग ‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ या नावाचे पुस्तक लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव तो का करतो? गोळवलकर यांचे जे उदधृत वर दिले आहे, त्याच्या आधीचा त्यांचा परिच्छेद असा आहे :

“तथाकथित जाती-उपजातींनी भरलेला हा हिंदू समाज एक अजेय व चिरंजीव समाज म्हणून आजही उभा आहे. दोन हजारांहून अधिक वर्षेपर्यंत ग्रीक, शक, हूण, मुसलमान आणि युरोपियन या सर्वांच्या आक्रमक हल्ल्यांना तोंड देऊनही आज एखादे रामकृष्ण, एखादे विवेकानंद, एखादे टिळक आणि एखादे गांधी निर्माण करण्याची क्षमता त्याच्यात शिल्लक आहे; उलट तथाकथित जातिविरहित समाज मात्र या आक्रमकांच्या एकाच झपाट्यात असे भुईसपाट झाले की, त्यांना पुन: कधीही डोके वर काढता आले नाही.” (उपरोक्त, पान १२३)

जातीव्यवस्थेचे हे सपशेल आणि कडवे समर्थन आहे. जातीमुळे हिंदू समाज टिकून राहिला, असा गोळवलकरांचा दावा आहे. त्यांनी जी चार नावे घेतली, त्यांच्यासोबत आंबेडकर यांचे का घेतले नाही, याचे कारण स्पष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे विवेकानंद व गांधी यांनी जातीव्यवस्थेला उशिराने का होईना, पण विरोध केला. बाकी, गोळवलकरांचा आधीचा उतारा वाचला की, त्यांची अनुसूचित जाती-जमाती यांच्या आरक्षणावरची चीड अत्यंत प्रखरपणे व्यक्त होताना दिसते. जातींना विकृती न मानता जातीविरोधी बोलणाऱ्यांना ते विकृत ठरवत आहेत!! पैशाचे प्रलोभन काय, आपले दास बनवणे काय, ईर्ष्या व संघर्ष वाढेल, असे म्हणणे काय, हे सांगत गोळवलकर किती विपर्यस्तपणे जातीव्यवस्थेचा कैवार घेत आहेत. अस्पृश्यता, भेदाभेद, विषमता जणू त्यांना हवी आहे, असाच त्यांचा आग्रह दिसतो.

मोदी त्यांच्यापेक्षा वेगळे काही बोलत आहेत का?

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

महिला आरक्षण : सत्ताधाऱ्यांना इच्छा नसताना हे विधेयक आणावे लागले, आणि विरोधी पक्षांना नाईलाजाने त्यास मान्यता द्यावी लागली, हा या सर्वांवरच काळाने उगवलेला सूड आहे!

‘महिला आरक्षण विधेयक’ मंजूर झाले असले, तरी किमान पुढची पाच-सात वर्षे ते थंड बस्त्यातच पडून राहणार...

ते ‘कुंकू-टिकली’बद्दल बोलतील, तुम्ही ‘वाट्या’बद्दल विचारा... प्रतिमा-प्रतीकांची लढाई आता हाणूनच पाडा...

‘समतेशी करार’ या पुस्तकात कल्याणकारी राज्याच्या ऱ्हासानंतरची समतेपुढील आव्हाने स्पष्ट केली आहेत…

..................................................................................................................................................................

सरसंघचालक गेल्या महिन्यात आरक्षणाला पाठिंबा देणारे वक्तव्य करून बसले अन् संघपरिवारात म्हणजे समस्त हिंदुत्ववाद्यांत एकच खळबळ उडाली. डॉ. मोहन भागवत म्हणाले की, जोवर अखेरच्या माणसाला न्याय मिळत नाही, तोवर आरक्षण व्यवस्था चालू राहावी. समाजातले उपेक्षित व वंचित यांना आरक्षण असावे, या मताचा संघ आहे, असेही भागवत सहा सप्टेंबर रोजी नागपूरला म्हणाले.

आता गंमत अशी वा विसंगती अशी की, २०१५ साली आरक्षणाचा फेरविचार केला जावा, अशी मागणी याच भागवतांनी केली होती. मग कोणते भागवत प्रामाणिक अन् खरे मानायचे? त्या वेळीही भागवत बोलले, त्याला बिहारच्या निवडणुकांचा संबंध होता आणि आजही आहे.

गोळवलकर आणि मोदी एका बाजूला अन् खुद्द सरसंघचालक दुसऱ्या बाजूला, असे कसे झाले? मुळात होऊच कसे शकते, एवढ्या शिस्तीच्या, एकमुखाने बोलणाऱ्या संघटनेत? संघ व सरकार या दोघांत अशी विरोधी व टोकाची मते कशी काय?

एवढेच कशाला, तिसरे सरसंघचालक मधुकर देवरस यांनी ५० वर्षांपूर्वी पुण्याच्या ‘वसंत व्याख्यानमाले’त अस्पृश्यता नाहीशी झाली पाहिजे, अगदी सर्वथा गेली पाहिजे, असे म्हटले होते, पण तेवढेच. त्यांनी संघापुढे ना कोणता कार्यक्रम मांडला, ना बाबा आढावांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ मोहिमेला पाठिंबा दिला.

तसेच भागवतांचे दिसते. आरक्षणाला संघाचा पाठिंबा आहे, असे म्हणताना केंद्र व राज्य सरकारांनी नोकरभरती केली पाहिजे, असे त्यांनी म्हणायला हवे होते, पण संघ फक्त बोलघेवडा आहे. त्याला उपक्रम, कार्यक्रम, अमलबजावणी यांची फिकीर नसते. भागवत बोलले, तेव्हा बिहारची जातगणना सुरू होती आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला होता.

गोळवलकर यांची भूमिका जुनाट असून आता संघाला ती मान्य नाही, असेही आरक्षणाच्या निमित्ताने भागवत म्हणू शकले असते. परंतु खरे काही सांगेल तो संघ कसचा?

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

महिला आरक्षण : सत्ताधाऱ्यांना इच्छा नसताना हे विधेयक आणावे लागले, आणि विरोधी पक्षांना नाईलाजाने त्यास मान्यता द्यावी लागली, हा या सर्वांवरच काळाने उगवलेला सूड आहे!

‘महिला आरक्षण विधेयक’ मंजूर झाले असले, तरी किमान पुढची पाच-सात वर्षे ते थंड बस्त्यातच पडून राहणार...

ते ‘कुंकू-टिकली’बद्दल बोलतील, तुम्ही ‘वाट्या’बद्दल विचारा... प्रतिमा-प्रतीकांची लढाई आता हाणूनच पाडा...

‘समतेशी करार’ या पुस्तकात कल्याणकारी राज्याच्या ऱ्हासानंतरची समतेपुढील आव्हाने स्पष्ट केली आहेत…

..................................................................................................................................................................

तरीही संघाला आपण एक संधी अशी देऊन पाहू या की, गोळवलकरांचे विचार ओलांडून संघ आता विषमता, भेदाभेद मान्य करून आरक्षणाच्या बाजूने उभा आहे; तेव्हा संघ बदलतो आहे आणि तो आणखी बदलेल, असे त्याचे ‘उद्या’चे स्वरूप आपण मांडायचे का? संघ पालटतो आहे, याचा अर्थ तो तमाम पुरोगामी, आधुनिक अन् परिवर्तनवादी विचारकांचा स्वीकार करत आहे? डॉ. भागवत या विचारकांनी व समाजसुधारकांनी योजलेले सारे कार्यक्रम, उपक्रम आणि आचार-व्यवहार संघाच्या स्वयंसेवकांना पाळायला सांगतील का? जातिसंस्थेचे जनक म्हणून फुले-शाहू-आंबेडकर यांची ब्राह्मणांवरची धारदार व साधार तक्रार भागवत मान्य करतील का? दोन हजार वर्षांपासून समाजात भेदाभेद पाळले म्हणून आणखी २०० वर्षे तरी राखीव जागा असल्या पाहिजेत, असे ते नागपुरात म्हणाले, ते मनापासून म्हणाले का?

संघापाशी स्वत:चे संविधान नाही. त्याची नेमकी भूमिका कोणती, याचा कधी पत्ता लागत नाही. जगभरचे फॅसिस्ट जसे हिटलरचे आत्मचरित्र आणि फॅसिस्ट प्रचार व कार्यक्रम यांचा आधार घेतात, तसे तमाम हिंदुत्ववादी सावरकर-गोळवलकर यांचे खंड आपल्या प्रसारासाठी वापरतात. सावरकरांना त्यांचे भक्त ‘पुरोगामी’, ‘बंडखोर’ म्हणतात, पण त्यांनी महाराष्ट्राला अस्पृश्यता निर्मूलनाचा कार्यक्रम दिला नाही किंवा त्यांच्या अनुयायांना ‘पतितपावन’ चळवळ पटली नाही. ‘हिंदू महासभा’सुद्धा लुप्त झाली. त्यामुळे सावरकर फक्त बोलके सुधारक ठरले.

तद्वत भागवत आणि त्यांचा संघ दिसतो आहे. एकटे सरसंघचालक बोलले म्हणजे सर्व स्वयंसेवकांच्या मनातले बोलले, असे मानायचे कसे? जी संघटना एकाही सुधारकाचा साधा उल्लेखही करत नाही, ती त्यांनी दिलेले कार्यक्रम साकारेल तरी कशी? चला, सरसंघचालक बोलले, त्याप्रमाणे उद्यापासून आपला येणारी २०० वर्षे आरक्षणाला पाठिंबा, असे स्वयंसेवक म्हणू लागल्याचे ऐकू आलेले नाही.

मग पंतप्रधान मोदी राखीव जागांचा भागवतांचा मुद्दा स्वीकारून त्याप्रमाणे का नाही बोलले? ते गोळवलकरांच्याच भाषेत कसे काय बोलले? जवळपास एक महिना मोदींपाशी होता, भागवत यांच्या विवेचनानंतर आपली मते बदलायला. तरीसुद्धा पंतप्रधान ना बदलले, ना त्यांनी जातीसंस्था घाणेरडी आहे, असे म्हटले.

याची संगती कशी लावायची? कसबेसर म्हणाले त्याप्रमाणे संघ उद्याही (असाच) राहील आणि ‘चलनातली नाणी’ असतात, त्याप्रमाणे चालू विषय हवेच्या दिशेप्रमाणे हाताळतही राहील. म्हणजे संघाला स्वत:चे काही तत्त्वज्ञान वा मूल्यव्यवस्था नाही. आपले अस्तित्व टिकवायला ही संघटना लबाडी, चतुराई, दिशाभूल, धूळफेक, फसवणूक करत राहते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एकाच वेळी दोन ठिकाणी उपस्थित राहायची जादू संघाला कशी काय जमते? बाबा आढाव यांनी ‘संघाची ढोंगबाजी’ असे शीर्षक त्यांच्या एका पुस्तिकेला दिले होते, ते किती सार्थ होते! दुटप्पीपणा, दुतोंडीपणा हा आत्मविश्वास नसलेली माणसे करत असतात. पळपुटेपणा हा स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी करणारा संघ आता स्वातंत्र्याचा ‘अमृतकाल’ मोठ्या दिमाखात साजरा करतो, तो मग कोणत्या श्रेणीत गणायचा? सरकारचा चालक जातगणनेला विरोध करतो, तर संघटनेचा चालक राखीव जागा द्याव्यात असे सांगतो. हा वैचारिक गोंधळ की धूळफेक की अर्थहीन बडबड?

गांधीजी असे सांगत अन् लिहीतही की, माझी भूमिका काय असे विचारले, तर कालपरवा मी जे मांडले, ती माझी भूमिका. ती बदलणार नाही किंवा अगदी ठाम असे मत माझ्यापाशी नाही. गांधीजी प्रामाणिक, सच्चे व आत्मशुद्धी करणारे असल्याने असे बोलत. संघाचे तसे काही अनुभव जगाला आले का? उलट गेली १० वर्षं संघाचे सरकार गांधींची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाही, पण त्याच वेळी गांधीजींची यथेच्छ बदनामी, निंदा व हेटाळणी करणेही थांबवत नाही. सोबत नेहरू, डावे, मुस्लीम यांची तर अखंड चालूच असते.

अशी धरसोड करणारा संघ मग कितपत सच्चा व गंभीर मानावा? सांस्कृतिक राष्ट्रवाद, मुस्लीमद्वेष, पुरोगाम्यांची निंदा, पाश्चात्य तत्त्वज्ञानाविषयी नाराजी, ‘हिंदूराष्ट्रा’ची उघड मागणी, असे संघाचे कार्यक्रम. ते मात्र थांबत नाहीत. किंबहुना त्यावरच त्याची वाढ होत असते. संघ स्त्रिया, दलित, आदिवासी यांची कधीही बरोबरी करण्याचे तत्त्व मानत नाही. त्याचबरोबर राजेशाही, जमीनदारी, श्रीमंती, उद्योगपतींचे साम्राज्य, पुरोहितशाही यांचा धिक्कारही कधी करत नाही.

एकंदर, संघापुढचा पेच त्याच्या वाढत्या वयासह त्याला भविष्यातही पछाडणार आहे.

इकडेही ‘हो’ म्हणायचे अन् तिकडेही म्हणायचे, याला ‘बौद्धिक दिवाळखोरी’ म्हणतात. अशा दोन पाय दोन डगरींवर ठेवण्याच्या वृत्तीला संधीसाधूपणाही म्हणातात. कोणालाही दुखवायचे नाही. त्यामुळे नेहमी गुळमुळीत, मोघम अथवा दुहेरी बोलत राहायचे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

महिला आरक्षण : सत्ताधाऱ्यांना इच्छा नसताना हे विधेयक आणावे लागले, आणि विरोधी पक्षांना नाईलाजाने त्यास मान्यता द्यावी लागली, हा या सर्वांवरच काळाने उगवलेला सूड आहे!

‘महिला आरक्षण विधेयक’ मंजूर झाले असले, तरी किमान पुढची पाच-सात वर्षे ते थंड बस्त्यातच पडून राहणार...

ते ‘कुंकू-टिकली’बद्दल बोलतील, तुम्ही ‘वाट्या’बद्दल विचारा... प्रतिमा-प्रतीकांची लढाई आता हाणूनच पाडा...

‘समतेशी करार’ या पुस्तकात कल्याणकारी राज्याच्या ऱ्हासानंतरची समतेपुढील आव्हाने स्पष्ट केली आहेत…

..................................................................................................................................................................

तरीही संघाने यावर एक तोडगा शोधला आहे. सारे जण त्याकडे धूर्तपणा वा चातुर्य या नजरेतून बघतात. प्रत्यक्षात तो संघाने आपले न्यून झाकायला उभा केलेला एक आडोसा असतो. गेल्या १० वर्षांत संघ व भाजप यांनी अन्य पक्षातले नेते, कार्यकर्ते जसे फोडले, तसे कला-साहित्य-क्रीडा-शास्त्रे-उद्योजक-आरोग्य-कृषी-शिक्षण आदी क्षेत्रांतली असंख्य नामवंत मंडळी काही ना काही आश्वासने, प्रलोभने देऊन आपल्याकडे खेचली आहेत. ही माणसं संघाची बाजू त्यांच्या बुद्धीनुसार मांडतात. ती मग हिंदुत्वाची, धर्माची, राष्ट्रवादाची असो की, अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि पर्यावरण असो.

त्या त्या व्यक्ती आपल्याकडे वश कशा करायच्या, याची सोपी नीती संघापाशी असते. त्या व्यक्तीकडे सतत आपले स्वयंसेवक पाठवायचे. कौटुंबिक व भावनिक संबंध उत्पन्न करायचे. त्यांची काही कामे करून त्यांना उपकृत करून टाकायचे. त्यांच्यावर प्रेम, आदर, गौरव अन् प्रशंसा यांचा वर्षाव करत राहायचा. त्या व्यक्तीचे रागलोभ जाणून घेऊन, त्यानुसार त्याच्यावर बोलत राहायचे. कार्यक्रमांना निमंत्रित करून त्यांचे महत्त्व समाजाला किती आहे, हे ठसवायचे. अखेर त्यांना ‘आपले’से करून टाकायचे आणि मग हलकेच त्या व्यक्तीला संघाच्या शत्रूंना भिडवायला वापरायचे किंवा आपला तकलादू, तर्कशून्य अन् नितांत द्वेष्टा सिद्धान्त त्या व्यक्तींच्या तोंडून वदवायचा! बस्स, झाले काम!!

उर्वरित समाज त्या व्यक्तीचे आधीचे कार्यकर्तृत्व पाहतो आणि ‘असेल बुवा खरे, हे म्हणत आहेत तर’ असे स्वत:ला बजावत गप बसतो. सामान्य भारतीय अजूनही सत्ता, ज्ञान, संपत्ती, कीर्ती, बल आणि घराणे यांना दिपतो. सोबतीला धर्म व जात असेल, तर पाहायलाच नको.

भाजपने मराठा जातीतले घरंदाज आणि कीर्तीवंत पुढारी अगदी पायघड्या अंथरून पक्षात घेतले, याचे कारण हे. अशा ‘आयाती’त व्यक्ती संघाची कड घेत कितीही तळमळीने झटत राहिल्या, तरी त्यांनी मूळच्या संघवाल्यांपेक्षा कधीही वरचढ केले जात नसते. प्रमुखपदे अथवा मोक्याच्या जागा त्यांना कधीही दिल्या जात नसतात.

अगदी ताजे उदाहरण घेऊ. काहीही गरज नसताना मोदींनी संसदेची नवी इमारत बांधून घेतली. तीत कामकाज सुरू व्हायच्या आधी पाच दिवसांत नटनट्या आणि अनेक प्रभावशाली व्यक्तींना निमंत्रित करून खूप मिरवले. सगळे जण कौतुक करतील ही मोदींची अटकळ होती व त्याप्रमाणे घडलेही. नव्या संसदेवर काँग्रेसच्या नेत्यांनीच टीका केली आणि ती नेहमीचीच असे समजून सर्वांनी ती मनावर घेतली नाही. बाकीचेही नेते बोलले, पण त्यांची दखल घेऊ नये, असे माध्यमांना दटावलेले. हा सारा खेळ दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाललेला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एकीकडे ‘राष्ट्र सर्वतो परि’ असे म्हणायचे अन् दुसरीकडे समाजाचे श्रेष्ठत्व मानायचे. एकीकडे सरसंघचालक परमपूज्य ठरवायचे अन् दुसरीकडे ‘भारतमाता’ही पूज्य असे म्हणत राहायचे. एकीकडे हिंदूराष्ट्र घडवायला संघ सरसावलेला दिसतो, तर दुसरीकडे संविधान रक्षणाच्या व पालनाच्या शपथाही घ्यायच्या. एकीकडे प्रेमाने आम्ही सर्वांवर विजय मिळवतो असे म्हणायचे आणि दुसरीकडे हिंसाचार-आक्रमकता-बलप्रयोग यांचा गौरव करत बोलायचे. एकीकडे भ्रष्टाचार घालवू असे घसा फोडून सांगायचे अन् दुसरीकडे भ्रष्टाचारी माणसांच्या मदतीने सत्ता मिळवायची व टिकवायची…

अशी कैक दुटप्पी उदाहरणे भारत रोज पाहतो. ओबीसींच्या बळावर सत्ता मिळवायची अन् त्यांची लोकसंख्या किती याची मोजणी केली, तर आगपाखड करायची, ही ढोंगबाजी भाजप करतो. कारण मुळातच संघापाशी स्वत:ची काही वैचारिक भूमिका नसते. शेतकरी संघटना जशी एककलमी व एककल्ली सिद्धान्तांवर चालणारी संघटना शेती आणि त्यापायीच संपून गेली, तसे संघाचे आहे. हिंदूराष्ट्र हा एकमेव राजकीय सिद्धान्त त्यांचा असतो. एककलमी राजकीय विचार अन्य बाजू समजण्यात अधू असतो.

पण आपल्याला काही कळत नाही, हे संघ कधी मान्य करणार नाही. त्याचे मूळ संघाच्या ब्राह्मण्यात दडले आहे. ब्राह्मण म्हणजे चारित्र्य, बुद्धी आणि पावित्र्य यांचे प्रतीक असे मानणारा बहुसंख्याक समाज, मग आपोआपच संघाच्या थोतांडावर विश्वास ठेवतो. सेवा, राष्ट्रकार्य, शिस्त, राष्ट्रवाद, ऐक्य आदी गोष्टी बिनडोकपणे मान्य करतो आणि त्याचे प्रत्यंतर आपण मतदानावेळी पाहतो.

ब्रिटिश जसे वागत, अगदी तसा संघाचा व्यवहार असतो. ‘सतीबंदी’ व्यतिरिक्त ब्रिटिशांनी भारतीय नागरिकांच्या धार्मिक, सामाजिक, पारंपरिक बाबतीत ढवळाढवळ केली नाही. आपण अल्पसंख्य आहोत, या भीतीने ब्रिटिश घाबरले होते. म्हणून त्यांनी फक्त प्रशासकीय गोष्टींवर भर देत दीडशे वर्षे हा देश गुलाम करून ठेवला. सामान्य भारतीयही ब्रिटिशांवर या त्यांच्या भूमिकेमुळे रागावलेला नव्हता.

भाजप व संघ याच ‘सर्वे सुखिना: संतु’ तत्त्वाचे अमलदार. त्यांनी ना अस्पृश्यतेवर हल्ला केला, ना निरक्षरता, अंधश्रद्धा अथवा दारिद्रय अन् विषमता यांच्यावर. सारे काही टिकवून राज्य करायला कोणाची ना असणार? झालाच काही बदल आपोआप म्हणजे लोक ‘हे नको, ते नको’ म्हणू लागले, तर आपणही ‘हो, बरोबर आहे’ असे म्हणून त्यांच्या कलाप्रमाणे वागायचे झाले!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा