आता जनतेलाच ठामपणे ठरवावे लागेल की, आम्हाला ‘गारदी’ आणि ‘गद्दारां’चे हे राजकारण नको आहे...
पडघम - राज्यकारण
अभिजित वैद्य
  • अजित पवार दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना
  • Tue , 25 July 2023
  • पडघम राज्यकारण अजित पवार Ajit Pawar राष्ट्रवादी काँग्रेस NCP शरद पवार Sharad Pawar भाजप BJP देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis शिवसेना Shiv Sena उद्धव ठाकरे Uddhav Thackeray

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व राजकारणाला अत्यंत उच्च अशी नैतिकता प्राप्त करून देण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले. पंडित नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद आणि त्या वेळच्या सर्वच नेत्यांनी या नीतीमूल्यांची जपणूक केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशीच उच्च नैतिक मूल्ये जपत आपले राजकारण केले आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या मूल्याधिष्ठित वाटचालीला सांविधानिक बळ दिले.

मात्र भारतीय राजकारण इतक्या उच्च नैतिक पातळीवर राहू शकले नाही. त्याची नैतिक घसरणच सुरू झाली. भाजप गुजरातमध्ये आणि त्यानंतर केंद्रात सत्तेवर आल्यापासून या नैतिक घसरणीचा वेग प्रचंड वाढला. यापूर्वीची राजकीय नैतिकतेची घसरण ही अधिकांशरित्या व्यक्तिगत पातळीवरील होती. भाजपने या घसरणीला संस्थात्मक स्वरूप दिले, लोकशाही, संविधानाने दिलेली मूल्ये यांचे ‘न भूतो न भविष्यती’ असे अवमूल्यन केले. राजकीय नैतिकतेची ही घसरण आणि सांविधानिक मूल्यांचे अवमूल्यन यांना हिंदू धर्माची अप्रत्यक्ष मान्यता देण्याची व्यवस्थाही करून टाकली. प्रत्यक्षात धर्माने नैतिक मूल्यांचे रक्षण करणे अभिप्रेत आहे. इथे एका धर्मावर आधारित राष्ट्र उभे करण्यासाठी अनैतिक राजकारणाचा आधार घेतला जात आहे.

उदाहरण म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही वर्षांचा एक धावता चलतचित्रपट आपण पाहिला तरी आपल्या हे लक्षात येईल.

“आमचे सरकार आल्यावर सिंचन घोटाळ्यामध्ये आम्ही अजितदादांची अवस्था काय करणार?” आमचे नाथाभाऊ खडसे यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर, “आमचे सरकार आल्यावर अजितदादा जेलमध्ये चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग.” २०१४च्या निवडणूक प्रचारातील देवेंद्र फडणवीस यांचे हे भाषण सोयीस्करपणे स्मृतिभ्रंश होणाऱ्यांसाठी आजही यु-ट्यूबवर उपलब्ध आहे- “आम्ही कधीही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नाही, नाही, नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार आम्हीच उघडकीस आणला”, असेही ते म्हणाले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

याच देवेंद्र फडणवीस यांनी २०१मध्ये अजितदादांबरोबर स्वतः मुख्यमंत्री बनून आणि अजितदादांना जेलमधील ‘चक्की पिसिंग’ऐवजी उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर ‘बसविंग’ करत, भल्या पहाटे शपथविधीचा सोहळा उरकून ‘तीन दिवसांचे सरकार’ स्थापले. तीन दिवसांनी अजितदादा उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले. या सरकारचा जवळपास सर्वच कार्यकाळ कोविड महासाथीचा होता.

जनता महासंकटाचा सामना करत असताना भाजप विरोधी पक्ष म्हणून किती भयानक ठरू शकतो, याचा अनुभव येत होता. परमसिंग या उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याने अनिल देशमुख, या तेव्हाच्या गृहमंत्र्यांबर १०० कोटी वसुलीच्या टार्गेटचे बेछूट आरोप केले आणि अनिल देशमुख तुरुंगात गेले. वर्षभराने कोणताही आरोप सिद्ध न होता बाहेर आले.

पुढे संजय राऊत यांनाही अशीच तुरुंगवारी करावी लागली. सुशांतसिंग, दिशा सालियन, पूजा चव्हाण, मनसुखानी अशा भयानक आणि अतर्क्य घटनांची मालिकाच सुरू झाली. अँटेलिया या अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अडकवून समीर वानखेडे नामक अधिकारी आधुनिक सिंघमच्या रूपात समोर आला. पुढे या सिंघमवरच अनेक भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले. कंगना राणोत ही अभिनेत्री विषारी थयथयाट घालू लागली.

या सगळ्या गोष्टींना उद्धव ठाकरे पुरून उरले. त्यांची लोकप्रियता वाढत गेली. त्यांची भाषाही बदलत गेली. ते बाळासाहेब यांच्यापेक्षा ‘प्रबोधनकार’ ठाकरे यांची भाषा अधिक बोलू लागले. शेंडी जानव्याचे ब्राह्मण्यवादी हिंदुत्व नाकारून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडू लागले. त्यांच्या भूमिकेतील हा बदल भाजपच्या आणि संघाच्या कडव्या ब्राह्मण्यवादी नेतृत्वाला झोंबणारा असला, तरी त्यांच्याच पक्षातील बहुजन नेत्यांना सुखावणारा असायला हवा होता. पण असे न घडता, हे बहुजन नेते ब्राह्मणी षडयंत्राला बळी पडले.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

उद्धव ठाकरे यांच्या सरकारात अडीच वर्षे सत्ता उपभोगून त्यांचेच अनेक निष्ठावंत एकनाथ शिंदे यांचे बोट धरून, शिवसेनेत उभी फूट पाडून, फडणवीस यांच्याबरोबर सरकार बनवून पुन्हा सत्तेत आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर सत्तेत गेल्याने आपले हिंदुत्व बुडाल्याचा त्यांना अचानक साक्षात्कार झाला. अनपेक्षितपणे शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आणि फडणवीस यांना अपमान गिळत उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले.

शिंदे-फडणवीस सरकारला जनसमर्थन कधीच मिळाले नाही. शिवसेनेतून फुटलेल्या सर्वांचा उल्लेख सर्वसामान्य जनता ‘गद्दार’ आणि ‘खोकी बहादर’ असाच करत राहिली. कारण शिवसेनेतून फुटल्यावर या फुटीरांनी लपून छपून सुरतेला जाणे, तेथून रिक्षासारख्या फेऱ्या मारणाऱ्या चार्टर्ड विमानाने गौहत्तीला जाणे, तेथे ‘रॅडीसन ब्लू’मध्ये कित्येक आठवडे पंचतारांकित पाहुणचार झोडणे आणि महाराष्ट्रात परतून सत्तेवर येणे, हे सर्वच उबग आणणारे होते.

दुसरीकडे मुंबई महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा या तीनही निवडणुकांमध्ये भाजप पराभूत होणार, असे अनेक सर्वेक्षणे सांगत राहिली. देशात मोदींच्या लोकप्रियतेला प्रचंड ओहोटी लागली होती. कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव झाला. मोदींच्या मदतीला ‘बजरंगबली’ आले नाहीत. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तर ‘कर्नाटकात भाजप पराभूत झाले, तर दंगली होतील’ अशी धमकी देऊनही जनतेने त्यांना भीक घातली नाही. ज्या राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, तिथेही असाच पराभव होणार असे दिसू लागले.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

सत्तेचे आकर्षण, नाही कशाचे चिंतन | संधीचे साधक सारे, पदरी पडे ते छान ||

शरद पवारांनी भाजपला तब्बल नऊ वर्षे झुलवत ठेवले, पण त्याची किंमत त्यांना मोजावी लागली...

शरद पवार विरुद्ध शरद पवार...

.................................................................................................................................................................

आता पुन्हा एक चिखलाने बरबटलेले ‘ऑपरेशन लोटस’ करण्याची गरज निर्माण झाली होती. राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ तुरुंगात जाऊन आले होते. राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्यांची हजारो पाने घेऊन किरीट सोमय्या डरकाळ्या फोडत हिंडत होते. नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा सहकारी बँक, सिंचन आणि खाणी, अशा अनेक गोष्टींमध्ये सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला आहे, असा जाहीर आरोप केला. तिसऱ्याच दिवशी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस उभी फोडून, शिंदे मंत्रीमंडळात दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.

‘डबल इंजिना’चे सरकार आता ‘ट्रिपल इंजिना’चे झाले. फडणवीस यांच्या भाषेत ‘त्रिशूल’ निर्माण झाला. भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले राष्ट्रवादीचे सर्व नेते भाजपच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. अटक आणि तुरुंगवास टळला. उलट लाल दिव्याची गाडी मिळाली. शरण आले आणि आरोपांतून मुक्त झाले.

भाजपने भारतीय राजकारणाचे एका साध्या सूत्रात रूपांतर केले आहे - ‘जो जो विरोधात, तो तो तुरुंगात, जो जो बरोबर तो तो सत्तेवर’. आता निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या मदतीने शिवसेना पक्षच जसा पळवण्यात आला, तशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केली जाईल हेही निश्चित.

शाहू-फुले-आंबेडकर यांची परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणाचा गेल्या काही वर्षांतील हा धावता आढावा... देशातील अनेक राज्यांमध्ये अशा नाटकाचे प्रयोग होत राहतील आणि अशीच पात्रे भूमिका करत राहतील. इथे नायक आणि खलनायक हे आलटून पालटून भूमिका करतात. आजचा खलनायक उद्याचा नायक असतो, तर आजचा नायक उद्याचा खलनायक! भाजप सत्तेवर नसलेल्या प्रत्येक राज्याला हे भोगण्याची तयारी ठेवावी लागेल.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

या राजकारणापुढे राघोबादादा आणि आनंदीबाई यांचे, आपला १८ वर्षांचा पुतण्या, पेशवा नारायणराव याच्यावर, पुण्यातील शनिवारवाड्यात भर दिवसा भाडोत्री गारदी घालण्याचे राजकारणही फिक्के पडेल. गारदी म्हणजे भाडोत्री मारेकरी, आधुनिक भाषेत ‘मर्सिनरी’. आज सर्व सरकारी यंत्रणा सत्ताधाऱ्यांचे ‘गारदी’ बनल्या आहेत की काय, अशी शंका यावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या गारद्यांच्या झुंडीत इडी, आयटी, सीबीआय, एटीएस, इसी, सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि न्यायाधीशसुद्धा सामील होताना दिसत आहेत! भारतीय राजकारणाने इतके टोकाचे अध: पतन कधीच पाहिले नव्हते.

भ्रष्ट विरोधकांवर सरकारी गारदी सोडून भयभीत करायचे, भयाने तो लाचार होऊन गद्दार झाला की, त्याच्यावर गोमूत्र शिंपडून त्याला शुद्ध करायचे आणि आपल्या सत्तेत भागीदार करायचे. याचे नाव ‘ऑपरेशन लोटस’!

राजकीय नैतिकता, नीतिमत्ता, साधन शुचिता या सर्वांची हत्या! ही हत्या करणारे ‘नथुराम गोडसे’ संघपरिवाराने जागोजागी उभे केले आहेत.

वास्तविक नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सत्तेवर येताच व्यक्तिकेंद्रित राजकारणाच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. पण संघाच्या हिंदू राष्ट्राच्या अंतिम स्वप्नाकडे जाण्याची त्यांची क्षमता आहे, अशी संघाला खात्री वाटल्याने संघाने त्यांच्यामागे आपली भारतातील आणि भारताबाहेरील सर्व ताकद उभी केली. त्यांच्या सत्तेच्या शिखराकाडील वाटचालीला तात्त्विक कोंदणात बसवण्यात आले. आपल्या अंतिम स्वप्नाकडे जाण्यासाठी मोदी नामक व्यक्तीची प्रतिमा प्रचंड फुगवण्यात आली. यातूनच ते देशाचे पंतप्रधान बनले आणि दुसरा अध्याय सुरू झाला.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

लोकसभा निवडणुकीची खडाखडी – ‘इंडिया’

विरोधी ऐक्यातील सर्वांत कमजोर कडी अन्य कुणी नसून ‘काँग्रेस’च आहे

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपेतर विरोधी पक्ष एकत्र, आता या विरोधकांची भाजपविरोधातील प्रत्यक्ष लढाई सुरू होईल...

.................................................................................................................................................................

अशा राजकारणात नेता मोठा आणि पक्ष छोटा बनत जातो. पक्षाची तत्त्वप्रणाली नाहीशी होत जाते. वास्तविक संघ आणि त्याचा राजकीय चेहरा भाजप यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा पाया एकच, आणि तो म्हणजे हिंदुत्व. हे हिंदुत्वही सर्वसमावेशक नाही, तर ते ब्राह्मण्यवादावर उभारलेले आहे. धर्माची भाषा जेव्हा राजकारणाचा पाया बनते, तेव्हा सत्ता हाच धर्म बनतो. धर्माच्या नावाखाली सर्व राजकीय अनैतिकता धर्ममान्य बनते.

भारतीय राजकारणात व्यक्तिकेंद्री राजकारणाच्या अध्यायाची सुरुवात मोदी राजकारणात येण्याच्या फार पूर्वी झाली होती. व्यक्तीकेंद्रित राजकारणाने भल्या भल्या पक्षांचा तात्त्विक पाया उखडून पडला आणि कोणतीही तत्त्वप्रणाली नसणारे पक्षही निर्माण झाले. व्यक्तीकेंद्रित राजकारण हे फक्त सत्ताकेंद्रित असते. एक विशिष्ट तत्त्वज्ञान जेव्हा राजकीय पक्षाला जन्म देते, तेव्हा त्याच्या आधारे समाज आणि देश बदलण्याच्या ध्येयाने भरलेल्या कार्यकर्त्यांची फौज उभी राहते. इथे नेते गौण असतात, तत्त्वज्ञान नेतृत्व करते. सत्तापरिवर्तन हे आपले तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्याचे आणि त्या आधारे देश बदलण्याचे साधन बनते.

राजकारणातून तत्त्वज्ञान नाहीसे होते, तेव्हा सत्ता हेच साध्य बनते. तेव्हा त्या सत्तेकडे नेणाऱ्या साधनांची शुचिता, शुद्धता, नैतिकता ही अर्थहीन बनते. सरकारी यंत्रणेला ‘गारदी’ बनवणे आणि कोणताही विरोधी पक्ष फोडून ‘गद्दारां’ना सत्ता देणे, हे राजकारण यातूनच जन्म घेते. पण देशाच्या भविष्यासाठी असे राजकारण अत्यंत घातक आहे. गद्दारांच्या गदारोळात जनतेचा आवाज आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे भान हरवत आहे. गारदी मुजोर बनत जाण्याचाही धोका आहे.

असेच घडत राहिले, तर भारताचा ‘पाकिस्तान’ व्हायला वेळ लागणार नाही. पाकिस्तानात सत्तेवर कोण येणार हे लष्कर ठरवते. गारद्यांना जेव्हा लक्षात येते की, आपल्या ताकदीवर सत्ताधारी गादीवर राहतात, तेव्हा गारद्यालाच गादीवर येण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण होऊ शकते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

पुतिन यांनी युक्रेनची लढाई जिंकण्यासाठी प्रिगोझीनचे भाडोत्री वॅग्नर सैन्य वापरले, आणि अचानक प्रिगोझीनने आपल्या गारद्यांना मॉस्कोच्या दिशेने कूच करण्याचा आदेश दिला. पुतिन यांनी सध्यातरी या भाडोत्री सैन्याला आणि त्याच्या मालकाला वेसण घातली असली, तरी त्यांना प्रिगोझीनला अभय द्यावे लागले. मोदी-शहा हे तर याच्यापेक्षाही घातक खेळ आपल्या देशात करत आहेत. त्यांनी सर्व सरकारी यंत्रणांना आपले ‘बॅनर सैन्य’ बनवले आहे. यातून गारदीच कधी गादीवर येतील, हेही सांगता येत नाही. आणि नाहीतर मोदी यांना पुतिन बनावे लागेल. त्यांचा असाच इरादा असावा, असे वाटू लागले आहे.

आपल्या देशातील जनतेलाच ठामपणे ठरवावे लागेल की, आम्हाला ‘गारदी’ आणि ‘गद्दारां’चे हे राजकारण नको आहे म्हणून!

‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकाच्या जुलै २०२३च्या अंकातून साभार.

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. अभिजित वैद्य हे ‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकाचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

puja.monthly@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा