तुकाराममहाराजांच्या सत्शिष्या श्रीबहिणाबाईकृत ब्राह्मण-शोध आणि बोध
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • बहिणाबाई आणि तुकाराममहाराज
  • Fri , 27 May 2022
  • पडघम सांस्कृतिक बहिणाबाई Bahinabai तुकाराममहाराज Tukaram Maharaj ब्राह्मण Brahman ब्राह्मण्य Brahmanya

बहिणाबाई कुलकर्णी या तुकाराममहाराजांच्या सत्शिष्या. ब्राह्मणाने ब्राह्मणच गुरू करावा, खालच्या वर्णाचा वा यातीचा गुरू करू नये, अशी तत्कालीन समजूत होती. तथापि ब्राह्मण जातीच्या बहिणाबाईंनी कुणबी (शेतकरी) असलेल्या तुकारामांचे शिष्यत्व स्वीकारले होते. वरदा प्रकाशन, पुणे यांनी १९९८ साली प्रकाशित केलेल्या ‘बहिणाबाईचा गाथा’मध्ये ‘ब्रह्मकर्मपर अभंग’नामक एक प्रकरण आहे. त्यात बहिणाबाईंनी ब्राह्मण-माहात्म्य, ब्राह्मण कशावरून व कुणाला म्हणू नये व कुणाला म्हणावे इथपासून ब्राह्मण या अध्यात्मशास्त्रीय संकल्पनेत नेमके काय अभिप्रेत आहे, ते सयुक्तिक स्पष्ट करून ठेवले आहे. 

ब्राह्मणाचे माहात्म्य -

ब्राह्मणाच्या माहात्म्याबाबत त्या म्हणतात की, चार वर्णांमध्ये ब्राह्मण-वर्ण वरिष्ठ असल्याचे श्रेष्ठ लोक बोलून गेले आहेत. ब्राह्मणाच्या मुखात वेद वसत असतात. ब्राह्मण वेदांमधील वचनांचा भेद म्हणजे सकलार्थ जाणत असतो. अशा ब्राह्मणाने मारलेल्या लाथेमुळे छातीवर उमटलेले चिन्ह देव भूषण म्हणून वाहत असतो. म्हणून मोक्षाचे द्वार असलेल्या ब्राह्मणाची सादर पूजा करावी. (अभंग क्र.४०५) ब्राह्मणाच्या मुखी अन्न गेले की, देव तृप्त होतो. म्हणून सर्व शास्त्रे ब्राह्मण वंदनीय असल्याचे सांगतात. मंत्र म्हणून ब्राह्मण पाषाणातही देवाची प्रतिष्ठापना करतो, अशी निष्ठा धरली की, देव प्रगट होतो. कलियुगात ब्राह्मण हाच देव होय, अशी वेदाची साक्ष आहे. (अभंग क्र.४०६) ब्राह्मणाचे तीर्थ प्राप्त होते, त्याने पृथ्वीवरील तीर्थे केली असे होते. ब्राह्मणाला सर्व सिद्धी प्राप्त असतात, म्हणून तो सर्वश्रेष्ठ ठरतो. ब्राह्मणाची कृपा होते, त्याचे कल्याण होते व ब्राह्मण-दर्शन घडले की, पाप आपोआप जळून जाते. (अभंग क्र.४०७) क्षणभर जरी ब्राह्मण-सेवा घडली तरी इच्छा पूर्ण होते. म्हणून ब्राह्मणाला भजावे, पूजावे व त्यापुढे सादर लोटांगण घालावे. ब्राह्मणासाठी आपले प्राणही वेचतो, त्याला इंद्रपदी वास घडतो. म्हणून ब्राह्मण थोर असून मोक्ष त्याचा नोकर असतो. (अभंग क्र.४०८) ब्राह्मणाची आज्ञा देवालाही शिरोधार्य असते. मुक्ती ही त्याची आज्ञाधारी असते म्हणून कलियुगी ब्राह्मण तारक असतो व ब्राह्मणाची सेवा करतो तो धन्य होतो. ज्याचे शरीर मूर्त देवयुक्त व विवेकरूप असते, अशा ब्राह्मणाची थोरवी काय वर्णावी! (अभंग क्र.४०९) ब्राह्मणाजवळ समीपता मुक्ती असते. ब्रह्मच ब्राह्मण असते, असे श्रुती म्हणतात. ब्राह्मणाचे वचन तिन्ही लोकांत वंदिले जाते. ब्राह्मण झालेल्या व्यक्तीची अधोगती होत नसते. सर्व देव ब्राह्मणाचे ध्यान करतात. ब्राह्मणाच्या देहात गायत्रीचा वास असतो. (अभंग क्र.४१०)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ब्राह्मण कुणाला वा कशाला म्हणावे?

ब्राह्मण-माहात्म्य वर्णिल्यानंतर ब्राह्मण कोणाला म्हणावयाचे ते विचारपूर्वक (आधी) निश्चित करावे आणि मगच मोक्ष देण्यास पात्र असलेल्या त्या ब्राह्मणांना वंदन करावे व सप्रेम भजावे. जीव, देह, वर्ण, जात, कर्म व धर्म यांचे वर्म (तात्पर्य) शोधून घेऊन ज्यांच्या ठिकाणी पांडित्य (अध्यात्मशास्त्र समजावून सांगण्याची कला) व (आत्म)ज्ञान असते, तेच ब्राह्मण होत, असा निर्णय करावा, असे म्हणत बहिणाबाईंनी ब्राह्मण या शब्दाच्या अर्थाचा पुढीलप्रमाणे शोध आणि बोध करून दिला आहे.

जीव ब्राह्मण नव्हे!

जीवाला ब्राह्मण म्हणावे तर त्याच्या ठिकाणी ब्राह्मण या शब्दाचा इत्यर्थ सापडतच नाही. पशु, पक्षी, किडा, मुंगी, चांडाळादि मानव या सर्वांच्या ठिकाणी जीव असतो. यापूर्वी असंख्य जीव होऊन गेले व पुढेही होणार आहेत. सर्वच प्राण्यांच्या ठिकाणी जीव समान असल्याने जीवभाव असलेल्या कुणाही प्राण्याला वा मानवाला ब्राह्मण म्हणता येत नाही. (अभंग क्र.४१२)

देहदेखील ब्राह्मण नव्हे!

विवेकदृष्टीने पाहिले तर कुणीही देह वा देहवान जीव ब्राह्मण आहे, असे ठरत नाही. म्हणून ब्राह्मण तो कोण असे निश्चित केल्यानंतरच त्या ब्राह्मणाला भजत जावे, अशी पुनरुक्ती त्यांनी केली आहे. सर्वांचेच देह पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांचे बनलेले असल्याने समान होत. देहांच्या ठिकाणी बालत्व, तारुण्य व वार्धक्य असते व देहांमध्येच जीव राहत असतात. जारजअंडजादि चारी योनींमधील जीव आहार, निद्रा, भय व मैथुन हे व्यवहार करत असतात. हे व्यवहार तत्त्वत: समान होत. यावरून, सर्व देह समान ठरतात. देह तेथे जीव व जीव तेथे देह असतो. म्हणून कुणाही देहाला ब्राह्मण म्हणता येत नाही. (अभंग क्र.४१३) मृत्युचे भय असणाऱ्या जीवांना ब्राह्मण तरी कसे म्हणावे, असा प्रश्नात्मक निर्णय म्हणजे विवेक मनात दृढ धरून ‘ब्राह्मण’ या पदास नीट ओळखून असावे, असेही त्यांनी म्हटले आहे. शरीर जर ब्राह्मण असते, तर मातापित्यांच्या शरीरांना त्यांच्या मृत्युनंतर जाळणाऱ्या नरांना ब्रह्महत्येचे पाप लागणार नाही काय, असा प्रश्न विचारून ‘देह तो ब्राह्मण नव्हे’ हे त्यांनी नमूद केले आहे. (अभंग क्र.४१४) 

वर्णही ब्राह्मण नव्हे!

मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वा शूद्र आहे, असा अभिमान बाळगून जीव वागत असतात. तथापि वर्णाभिमानी कुणीही जीव ब्राह्मण असल्याचे अनुभवास येत नाही. खरे पाहू जाता, ब्राह्मण हा चारही वर्णांच्या पलीकडचा असतो, असे निश्चित होते. ब्राह्मण श्वेत, क्षत्रिय तांबडा, वैश्य पिवळा व शूद्र काळा असल्याचे कुठेही आढळत नाही. सर्व मानवांच्या देहाचा बांध सारखाच असतो. म्हणून ब्राह्मणाचा विशिष्ट वर्ण असतो, हा अज्ञानयुक्त विचार मनातून काढून टाक, असे त्यांनी म्हटले आहे. (अभंग क्र.४१५)

याती वा जातीवरूनही ब्राह्मणत्व निश्चित होत नाही

यातीवरून वा जातीवरून एखाद्याला ब्राह्मण म्हणावे, तर तेही मनाला पटत नाही. याती वा जातीबाबतचे विचार निरसून जे सत्य उरते, ते ओळखून घेता येण्यासाठी बहिणाबाईंनी काही ऋषींच्या जन्मजातींचे उल्लेख केले आहेत व त्यांच्या जातींवरून त्यांचे ब्राह्मणत्व निश्चित होत नाही, असा निर्णयदेखील दिला आहे. उदा. हरणीचे पोटी शृंगी ऋषी जन्मले, कैवर्तकीपोटी व्यास जन्मले, क्षत्राणीपासून विश्वामित्र जन्मले, वसिष्ठ ऋषी उर्वशीनामक अप्सरेउदरीं जन्मले, अगस्ती कलशातून जन्मले व नारदमुनी तर दासीच्या पोटी जन्मले. जन्माने भिन्नभिन्न जातींचे असणारे हे सारे महात्मे ब्राह्मण होते. यावरून कोणत्याही जातीमध्ये ब्राह्मण जन्मत होते, जन्मत असतात व जन्मणार, हे सत्य सुस्पष्ट होते. (अभंग क्र.४१६)   

पांडित्यावरूनही ब्राह्मणत्व ठरत नाही

पंडित व्यक्तीच्या ठिकाणी ब्राह्मणत्व असते, हेही मत मनाला पटत नाही. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र असलेली म्हणजे कुणीही व्यक्ती पांडित्य करत होती, करत असते व करू शकते. शास्त्रातील पद-पदार्थांचे विवरण करणारे लोक सर्वच वर्णांमध्ये, जातींमध्ये व इतर धर्मांमध्येही असल्याचे (वर्तमानकाळी तर मोठ्या प्रमाणात) दिसून येते. यावरून ब्रह्मानुभवविरहित पांडित्य हे ब्राह्मणत्वाचे निर्णायक लक्षण नाही, हे स्पष्ट होते. (अभंग क्र. ४१७)

धार्मिक व कर्मिक व्यक्तीही ब्राह्मण ठरत नाही

शास्त्राने ब्राह्मणादि चारी वर्णांची कर्मे ठरवून दिली आहेत. स्ववर्णाची कर्मे करणे हा स्वधर्म असल्याचे सांगितले आहे. स्वधर्माचे आचरण करणारे अभिमानी लोक खरे तर देहाभिमानी असतात. नाशिवंत देहाचा अभिमान बाळगणाऱ्या जीवांना आपल्या मूळ अविनाशी आत्मरूपाचा अनुभव नसल्याने ते अनात्मज्ञ वा अज्ञानी असतात व म्हणूनच ते ब्राह्मण नसतात. स्वधर्माभिमानी, कर्मिक वा स्वकर्माभिमानी असण्याहून ब्राह्मणत्वाची खूण, खरे तर, फार वेगळीच आहे, असा निर्णय बहिणाबाईंनी दिला आहे. (अभंग क्र.४१८ व ४१९) वर्णविशिष्ट आचरण केल्याने स्वर्गलोकप्राप्ती होऊ शकते पण त्यामुळे ब्राह्मणत्व येत नसते. नाना, यज्ञ, दान, अनुष्ठाने व तपादि करणे हेही ब्राह्मणत्वाचे लक्षण ठरत नाही (कारण ही कर्मे करणारांच्या मनात कर्मफलाभिलाषा वावरत असते.) (अभंग क्र. ४२०-४२१)

ब्राह्मणाची प्रमुख लक्षणे

व्यक्ती कशावरून व का ब्राह्मण ठरत नाही हे पटवून दिल्यानंतर बहिणाबाईंनी ब्राह्मण या शब्दाचा इत्यर्थ सांगितला आहे. वेदांनी प्रमाण म्हणून सांगितलेली ब्राह्मणाची पुढील लक्षणे त्यांनी उल्लेखिली आहेत.

१) जाणे वेदांचा अर्थ । तोचि ब्रह्मज्ञ संत ।।

आपल्या अंत:करणात वेदार्थ साठविलेला (अनुभवलेला) असतो, तोच वेदांना प्रमाण असलेला ब्राह्मण होय. तोच वरिष्ठ, भला व सर्वांना गुरुस्थानी असतो. अशा महात्म्यामुळे कैवल्य म्हणजे सर्वत्र केवळ एक आत्मारूपी देवच आहे (हाच संत श्रीतुकाराम यांना ठाऊक असलेला ‘वेदाचा तो अर्थ’ आहे), असे अनुभवास येऊ लागते. त्याच्या कृपादृष्टीने प्रारब्धाचे भोग जळून जातात. असा ब्राह्मण आणि ब्रह्म (म्हणजे देव) यांच्यात अणुमात्रही भेद नसतो व अशा ब्रह्मानुभवी संत व्यक्तीच्या सहवासात निर्द्वंद्व स्थिती (अद्वैत) साधता येते. शहाणा म्हणजे आत्मानात्मविवेक असलेला माणूसच ब्रह्मज्ञ वा संतव्यक्तीचे हे लक्षण ओळखत असतो. (अभंग क्र.४२२)

२) सत्य न संडी सर्वथा । तोचि ब्राह्मण तत्त्वतां ।।

ब्राह्मण कधीही सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या आधीन होत नसतो. त्याच्या ठिकाणी मी कर्ता हा भाव उद्भवत नसतो. सर्वांतर्यामी आत्मदेव हाच सकळकर्ताकरविता असल्याचे अनुभवत असल्याने त्याच्या ठिकाणी स्वप्नातही द्वैतभाव निर्माण होत नसतो. तहान, भूक, शोक, मोह, जरा व मृत्यू या सहा उर्मींमुळे निर्माण होणारे भाव व दोष यांमध्ये तो गुंतून पडत नसतो. (तुका म्हणे गेल्या षड्उर्मी अंग । सांडूनिया मग ब्राह्मण तो ।।, या न्यायाने तो ब्राह्मण झालेला असतो.) सर्व जग व जीव हे मुळात ब्रह्म आहेत, या सत्यापासून ज्याचे मन कधीही विचलित होत नाही असा तो आत्मतत्त्वज्ञ ब्राह्मण असतो. (अभंग क्र.४२३)

३) जयाठायी परब्रह्मज्ञान । तोचि खरा ब्राह्मण जाण ।।

ज्याला निविर्कल्प समाधी जोडलेली असते व त्यामुळे ज्याचे चित्त परब्रह्मी अबोल (नि:शब्द) झालेले असते, तोच खरा वेदसंमत ब्राह्मण असतो; या वेगळी असलेली मते ती पाखंड होत. सर्व भूतांच्या ठिकाणी एक आत्मा आहे म्हणजे सर्व काही मुळात आत्मरूपच आहे, ही खरी समदृष्टी लाभलेली असल्याने त्याच्या ठिकाणी मूर्तीमंत शांती नांदत असते. आकाश जसे सर्वत्र असते तसा परब्रह्मस्वरूप असलेला तो सर्व जग व्यापून असतो. (संत श्रीज्ञानेश्वरमाउली म्हणतात त्याप्रमाणे ‘आपण चराचर झालेलो’ असल्याचे तो अनुभवत असतो.) (अभंग क्र.४२४)

४) काम क्रोध आदि नसे विकार । वसे तिथेचि ब्राह्मणत्व साचार ।।

ज्याच्या ज्ञानदृष्टीला परब्रह्मरूपी प्रमेय प्रत्यक्ष दिसत असते व त्यामुळे आपल्या आत व बाहेरदेखील एक अखंड अद्वय परब्रह्मच विलसत आहे, असे जो अनुभवत असतो, त्यालाच ब्राह्मण म्हणावे. मृत्युनंतरही तो परब्रह्मस्वरूप होत असतो. अनपेक्षा म्हणजे निरपेक्षता ही त्याला देवाकडून मिळालेली सर्वोत्तम भेट असते. तळहातावरील आवळा जसा सर्व बाजूंनी पाहता येतो, तसे विज्ञान म्हणजे अंतिम सत्य वस्तुचे सानुभव ज्ञान त्याला झालेले असते. ज्याला कामक्रोधादि सर्व विकार पूर्णत: सोडून गेलेले असतात त्याच्याच ठिकाणी ब्राह्मणत्व येऊन राहिलेले असते. (अर्थात ब्राह्मण व्यक्ती कधीही कामक्रोधादि विकाराधीन होत नसते.) (अभंग क्र.४२५)

५) निमाली असे वासना जयाची । जाणा तो ब्राह्मण ब्रह्मनिष्ठचि ।।

ज्याच्या ठिकाणी शमदमादि नऊ गुण वसत असल्याने जो सदासर्वदा संतोषी असतो, तो ब्राह्मण असतो व त्याच्यामुळे भ्रष्ट व्यक्तीलाही मोक्ष मिळतो. ज्याच्या अंत:करणातून तृष्णा, मोह, लोभ, अहंकार गेलेला असतो व ज्याची वृत्ती कोणतीही कृती करताना निविर्कार असते, तसेच ज्याच्या ठिकाणची वासना पूर्णत: निमालेली असते तोच खरा म्हणजे ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण असतो. (अभंग क्र.४२६)

६) ब्रह्मीं नांदे तो ब्राह्मण । यातीशी प्रमाण नसे तेथे ।।

ज्याच्या ठिकाणी सदासर्वकाळ ‘मी ब्रह्म आहे’ हा भाव असतो, तोच ब्राह्मण असतो, असे श्रुती, स्मृती यांची साक्ष असून याबाबत कोणतेही गुह्य मी बाकी ठेवलेले नाही, असे बहिणाबाईंनी म्हटले आहे. ज्याची सर्व इंद्रिये ब्रह्मस्वरूपातच वर्तत असतात, विषयसुखांचा उपभोग घेत असतानाही ज्याच्या इंद्रियांना केवळ ब्रह्मस्वरूपाचाच अनुभव येत राहतो, तो याच अर्थाने ब्राह्मण असतो. अर्थात, कोणत्याही जातीचा वा यातीचा असला तरी जो केवळ ब्रह्मस्वरूपात नांदत म्हणजे आनंदाने जगत असतो तोच ब्राह्मण असतो. (अभंग क्र.४२७)

श्रीबहिणाबाईंनी यापुढील २५ अभंगांमध्येही ब्राह्मण व्यक्तीची आणखी लक्षणे विशद केली आहेत. विस्तारभयास्तव त्यांचा अगदी थोडक्यात आढावा -

१. क्रियेपाशीच नाम असते. सोने घडवणाराला जसे सोनार म्हटले जाते, तसे ज्याच्या ठिकाणी ब्रह्म नांदत असते, तोच ब्राह्मण वेदाने प्रतिष्ठिला आहे. (अभंग क्र.४२८)

२. ‘ब्रह्म जाणे तोचि ब्राह्मण बोलिजे’ हे वेदाचे वचन उद्धृत करून त्या म्हणतात काम पुरविते तीच कामधेनु असते व मरणाला मारते तेच जसे अमृत असते, तसा ‘ब्रह्माचा जाणता तोचि एक तत्त्वतां ब्राह्मण’ असतो. (अभंग क्र.४२९ व ४३४)

३. विषयभोगीं चित्त विरक्त असते, कर्मफळाची अजिबात आस नसते व आत्मदेवाशिवाय दुसरे काहीही पाहात नाही तोच बाह्मण आहे, असे ओळखावे. (अभंग क्र.४३०)

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

४. भक्ती, ज्ञान व वैराग्यामुळे वेद प्राप्त झालेले असतात, तो ब्रह्मवेत्ता ब्राह्मण असतो. त्याच्या घरी विरक्तीरूपी भार्या नांदत असते. नित्य व नैमित्त{क कर्मे करताना आत्मरूपविषयक अखंड विवेकरूप अग्नीने जो साग्निक असतो त्यालाच वेद ब्राह्मण म्हणतात. (अभंग क्र.४३१)

५. सद्गुरुवचनाने ज्याच्या हृदयात ज्ञानाग्नी प्रगटून राहिलेला असतो, त्यालाच ब्राह्मण म्हणावे. (अभंग क्र.४३३)

६. पिंड व ब्रह्मांड किंवा जीव व शिव यांचे ऐक्य अनुभवलेले असते व ब्रह्मसाक्षात्कार झालेला असतो, तोच ब्राह्मण असल्याचे समजावे. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चारही देहांचा शोध घेऊन जो तुर्यपदी आरूढ असतो, ‘सोऽहं हंस’ मंत्राचा अखंड जप करत असतो व जो अखंड सहज समाधीत असतो, त्या ब्रह्मवेत्त्या बाह्मणाचे दर्शन घडले की, मुक्ती मिळते. (अभंग क्र.४३५)

७. सानुभव स्वरूपज्ञानामुळे ज्याच्या ठिकाणी पंच कोश, त्रिविध ताप व ईषणात्रय हे  पूर्णत: लय पावलेले असतात तोच ब्राह्मण आहे, हे सत्य बोलावे. (अभंग क्र. ४३९)

८. ॐतत्सत् या देवनामरूपातील सत् शब्दी स्वधर्माचे फळ समर्पित करून जो अढळपणे ब्रह्मनिष्ठ असतो, त्यालाच आम्ही ब्राह्मण म्हणतो व असा ब्राह्मण भेटला की, ब्रह्मसायुज्यता म्हणजे आपण ब्रह्माशी एकरूप असल्याचे सदोदित होऊन जाते. (अभंग क्र. ४४१)

९. ज्ञानी व्यक्तीच्या ठिकाणी कर्माआधी, मध्ये व अंती ब्रह्मभाव असतो. कोणतेही कर्म घडत असताना आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपाहून आपण च्युत होत नाही, असे तो अनुभवत असतो. अशी ज्यांची स्थिती असते ते खरे ब्राह्मण असतात. ॐकाराने कर्मारंभ करतात, तत्काराने समर्पित करतात व सत्काराने स्वरूपीं ऐक्य करतात ते निश्चितच ब्रह्म असतात, या तथ्याचा अनुभव घेऊन तू लीन होऊन म्हणजे ब्रह्म होऊन रहा, असे सदर ‘ब्रह्मकर्मपर अभंग’ प्रकरणान्ती बहिणाबाईंनी सदुपदेशिले आहे. (अभंग क्र.४५२)

..................................................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

...............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......