तेच ते आणि, तेच ते…
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 16 April 2022
  • पडघम राज्यकारण वीज वीजटंचाई भारनियमन शेतकरी आत्महत्या

लोडशेडिंगच्या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची झालेली पत्रकार परिषद आटोपल्यावर प्रकाश वृत्तवाहिन्यांचे काही पत्रकार भेटले. वीज टंचाई, लोडशेडिंग, कोळशाचा अत्यल्प पुरवठा, मिळणाऱ्या कोळशात दगडाचं प्रमाण जास्त असणं. कोळसा पुरवठा होण्यात केंद्र सरकार करत असलेलं असहकार्य वगैरे मुद्दे ते पत्रकार सांगू लागले आणि प्रश्न पडला आपल्या राज्यात प्रश्न सुटले की, आहेत तसेच आहेत. कारण ते पत्रकार सांगत असलेली परिस्थिती २५-३० वर्षं सलग आम्हीही ऐकली होती आणि त्याबद्दल सातत्यानं बातम्या दिलेल्या होत्या. कोल इंडियाकडून कोळशाचा कसा अपुरा आणि निम्न दर्जाचा पुरवठा केला जातो आणि त्यासाठी केंद्र सरकारचा सापत्न भाव कसा जबाबदार आहे, हे त्या काळात वारंवार लिहिल्याचं आठवतं.

तो काळ काँग्रेस सरकारचा होता. आता भाजपच्या राजवटीत कोल इंडिया अदानीला विकली. म्हणजे खाजगीकरण होऊनही कोळसा पुरवठ्याचा कळीचा प्रश्न सुटलेला नाही. मग काय एकट्या अदानींचं भलं झालं का? अलीकडच्या १७-१८ वर्षांत किमान विजेचा तरी प्रश्न मिटलेला आहे, असं वाटत असताना पुन्हा लोडशेडिंग आणि तीच ती कारणं ऐकायला मिळाली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

१९९९ ते २००५ महाराष्ट्रात विजेची टंचाई टोकाला पोहोचलेली होती आणि त्या काळात (आता गृहमंत्री असलेले) दिलीप वळसे पाटील राज्याचे ऊर्जामंत्री होते. परिस्थिती अतिशय बिकट होती आणि त्याचा केव्हाही स्फोट होऊ शकतो, अशी स्थिती होती. तरीही दिलीप वळसे पाटील डगमगले नाहीत... कारण तत्कालीन ऊर्जा खातं आणि एकूणच राज्य सरकारज्या तडफेनं तेव्हा वागलं, तसं आता घडलेलं आणि घडतानाही दिसत नाही.

या संदर्भात दिलीप वळसे पाटलांच्या एकसष्ठीनिमित्त प्रकाशित झालेल्या गौरवग्रंथातील माझ्या लेखाचा काही भाग असा - मंत्रीमंडळ स्थापन झालं आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तेव्हा ऊर्जा खात आलं. ऊर्जा खातं तेव्हा फारच कळीचं होतं. आपल्या देशात जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे वाहायला सुरुवात होऊन आठ-नऊ वर्ष व्हायला आली होती. पायाभूत सुविधांची उभारणी होण्याचे ते दिवस होते. माहिती आणि तंत्रज्ञानाची खूप मोठी लाट तेव्हा निर्माण झालेली होती. नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागल्या होत्या. पगार भरघोस मिळू लागलेले होते. त्यामुळे हातात मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खेळू लागलेला एक नवश्रीमंत मध्यमवर्गीय अस्तित्वात आलेला होता. बाजारपेठ खुली झाल्यामुळे जगातल्या सर्व चैनीच्या वस्तू भारतीय बाजारपेठेत सहज उपलब्ध होत होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे त्या भरमसाठ विकल्याही जात होत्या. याचा एकत्रित परिणाम विजेच्या संदर्भामध्ये फारच वेगळा झालेला होता.

प्रत्यक्षात घरगुती वापर, शेती, व्यापार, उद्योग अशा सर्वच ठिकाणी विजेचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू झालेला होता. मागणी आणि उत्पादन यात फार मोठी तफावत पडून विजेची परिस्थिती गंभीर झालेली होती. उदाहरणच सांगायचं झालं, तर ज्या तालुक्याच्या गावामध्ये १९९५च्या आधी वर्षभरात चारशे टीव्ही विकले जात नसत किंवा ज्या मध्यम शहरामध्ये वर्षांत शंभर एसी किंवा गिझर्स विकले जात नसत; त्या तालुक्याच्या गावी महिन्याला चारशे टीव्ही आणि शहरामध्ये महिन्याला शंभर एसी/गिझर्स विकले जाण्याचे दिवस आले होते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

हे उदाहरण एव्हढासाठी देतो की, या आणि अशा सर्व जीवनशैली उंचावणाऱ्या सर्व वस्तूंसाठी वीज अतिशय आवश्यक होती. जे घरगुती वापराबाबत घडत होतं तेच शेतीच्या वापराबद्दल, व्यापाराबद्दल आणि उद्योगांमध्येही तसंच घडत होतं. त्यामुळे विजेची अभूतपूर्व अशी टंचाई निर्माण झाली होती. आहे त्या वीज प्रकल्पांची वीज निर्मिती करणारी यंत्रणा जुनाट होती; ती यंत्रणा अद्ययावत करणे आणि वीज उत्पादनाची नवी केंद्र निर्माण करण्यासाठी अवधी लागणार होता. त्यातच राजकीय आणि समाजिक आततायी भूमिकांमुळे एनरॉन प्रकल्पाने गाशा गुंडाळेला होता आणि महाराष्ट्रात उद्योग उभारणीच्या संदर्भात उद्योग जगतात चुकीचा संदेश गेलेला होता. विजेचं उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात वाढलेलं नव्हतं. वीज टंचाईवर मात करणं हे खूप मोठं आव्हान होतं.

दिलीप वळसे पाटलांसारखा तरुण मंत्री या खात्याचा कारभार बघत असताना उर्जा खात्यासमोर आहे, त्या वीज निर्मिती संचांची क्षमता वाढवणं-ती यंत्रणा अद्ययावत करणं, वीज निर्मिती वाढवणं आणि महत्त्वाचं म्हणजे वीज मंडळाची कार्यक्षमता वाढवून वीज निर्मिती, वितरण आणि विपनन व्यावसायिक करणं अशी गुंतागुंतीची आव्हानं होती. पण त्यातून मार्ग कसा काढला जाईल, याबद्दल साशंकता निर्माण करणारं वातावरण निर्माण होतं.

याची तीन महत्त्वाची कारणं होती. एक म्हणजे, विजेचं उत्पादन तातडीने वाढण्याचे पर्याय तेव्हा उपलब्ध नव्हते. दुसरं म्हणजे, विजेच्या वापराचं नियमन कसं करायचं. तिसरं, वीज मंडळ हे शासकीय यंत्रणेप्रमाणे मंद, बथ्थड आणि कुर्मगतीच्या मानसिकतेचं होतं. त्यात कामगार संघटना बळकट आणि कोणत्याही क्षणी संपाचं हत्यार उपसण्याच्या वृत्तीच्या होत्या. त्यामुळे वीज मंडळाची पुनर्रचना, कामात गतिमानता आणणं आणि त्यासाठी वीज मंडळाचं बदलत्या वातावरणात विभाजन करणं क्लिष्ट झालेलं होतं.

शिवाय विजेचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि आहे ती यंत्रणा अपडेट करण्यासाठी निधी कसा उपलब्ध करायचा, हादेखील या आव्हानांच्या यादीतला ठळक मुद्दा होता. शिवाय या सगळ्या व्यवहारामध्ये तेव्हा काम करत असलेल्या कंत्राटदारांचं आर्थिक हितही मोठ्या प्रमाणावर गुंतलेलं होतं. जी काही नवीन व्यावसायिक रचना अंमलात येणार होती, ती अंमलात येताना पुन्हा आर्थिक हितसंबध निर्माण होणार होते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

त्या काळामध्ये विरोधी पक्षानं स्वभाविकपणे भारनियमनाच्या विरोधात मोठं रान सभागृहात आणि सभागृहाबाहेर उठवलेलं होतं. त्याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर झालेला होता. पुणे आणि नागपूरसारख्या बड्या शहरांमध्येसुद्धा दररोज सहा-आठ तास भारनियमन असण्याचे ते दिवस होते. अशा परिस्थितीमध्ये मुळीच न डगमगता अतिशय ठाम आणि शांतपणाने दिलीप वळसे पाटील एक-एक पाऊल उचलत होते.

एकदा गप्पा मारत असताना मी सहज म्हणालो, ‘भारनियमन अपरिहार्य आहे हे कबूल, पण त्याचं नियोजन करता येणार नाही का? त्याची नीटशी कल्पना आधी देता येणार नाही का? तसं जर घडलं, तर लोकांना त्या वेळापत्रकानुसार नियोजन करून मग कामं केव्हा करायची ते ठरवता येईल’. हे सांगण्यामागे माझी भूमिका जरा वेगळी होती. माझं वैयक्‍तिक आणि कौटुंबिक पातळीवरचं मित्रमंडळ हे प्रामुख्याने डॉक्टर मंडळीचं आहेत. त्यांना ऑपरेशन्स करताना अनियमित वीज पुरवठ्याचा कसा फटका बसतो, हे मी बघत होतो. मग दिलीप वळसे पाटलांना ते सगळं सांगितलं. त्यांना भारनियमनाचं वेळाप्रत्रक तयार करण्याची कल्पना अतिशय आवडली.

हे काम वाटतं तेवढं काही सोपं नव्हतं, कारण संपूर्ण राज्यभर तपशीलवार नियोजन करणं महाकठीण होतं. शिवाय निर्माण होणारी वीज मर्यादितच होती. वीज मंडळाचे तत्कालीन चेअरमन जयंत कावळे यांना हाताशी धरून, या सगळ्या संदर्भामध्ये विभागवार आणि जिल्हावार बैठका घेऊन दिलीप वळसे पाटील आणि जयंत कावळे यांनी भारनियमनाचं एक अतिशय सविस्तर असं वेळापत्रक तयार केलं. वीज पुरवठा जरी अनियमित असला आणि भारनियमन अपरिहार्य असलं तरी त्या वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर वीज केव्हा जाणार हे लोकांना समजू लागलं. याचा फायदा केवळ डॉक्टरांनाच नाही तर कृषी, उद्योगांना, व्यापार्‍यांना असा सगळ्याच लोकांना होऊ लागला.

केंद्र सरकारात त्या काळात सुशीलकुमार शिंदे ऊर्जामंत्री होते आणि देशभर विजेची परिस्थिती अशीच टंचाईचीच होती. तो काळ काँग्रेसचा होता हे लक्षात घ्या आणि हळूहळू वीज टंचाईवर महाराष्ट्र आणि देशानं अफाट परिश्रम, दूरदृष्टी आणि कौशल्यानं मात केली. मात्र अलीकडच्या दोन वर्षांत काय बिघडलं आहे? महाराष्ट्र पुन्हा एकदा विजेच्या संकटाच्या विळख्यात सापडलेला आहे. हे अपयश कुठं आलं याचा राज्य सरकारनं विचार करायला हवा.

कायमचे न सुटता पुन्हा पुन्हा तेच ते प्रश्न/समस्या का उपस्थित होत असतात आणि तरी त्यावर लाखो कोट्यवधी रुपये खर्च झालेले असतात. हे आपल्या सरकार आणि प्रशासनाचंही खूप मोठं अपयश आहे. आता उन्हाळा सुरू झालाय. दरवर्षी उन्हाळा येतो आणि त्या पाठोपाठ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येतोच. केवळ महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी हजारो कोटी रुपये खर्च होतात. इतकी मोठी, मध्यम आणि छोटी धरणं उभारली गेली. त्यात पाणीही साठतं, पण गेल्या साडेचार दशकांच्या पत्रकारितेत महाराष्ट्राच्या जनतेला पिण्यासाठी आणि शेतीला सिंचनासाठी पाणी मिळत नाही.

मध्यंतरी एक टूम आली की, धरणांमध्ये गाळ साचतो म्हणून पाण्याचा साठा कमी होतो. मग गाळ उपसा मोहिमेसाठी मोठी तरतूद दरवर्षी होऊ लागली, तरी पाणी टंचाई संपतच नाही. उन्हाळा म्हणजे टँकर लॉबीचा घसघशीत कमाईचा मोसमच ठरलेला आहे. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून किमान दहाएक लाख कोटी रुपये पाण्याच्या साठवण आणि वितरणावर खर्च झाले असावेत, तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे… दरवर्षी शहरी आणि निमशहरी भागात पावसाळ्याआधी मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत किमान दोनएक हजार कोटी रुपये खर्च होत असावेत. तरी नाल्यांची साफसफाई होतच नाही आणि पाणी साठण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

दोन महिन्यांनी पावसाळा सुरू होईल आणि बियाणे व खतासाठी शेतकऱ्यांची परवड सुरू होईल. दरवर्षी ही समस्या निर्माण होते. ती अनेकदा अक्राळविक्राळ होते. शेतकऱ्यांची लूट होते आणि अनेकदा फसवणूकही होते, पण ही समस्या काही सुटू शकलेली नाही. एकदाचं पीक हाती येतं, मग तूर असो की उडीद, कापूस असो का ऊस, सोयाबीन असो का ज्वारी, भाज्या असोत का फळं मग सुरू होतो तो भाव न मिळण्याचा फेरा. शेतकरी कायम अशा कुठल्या ना कुठल्या फेऱ्यात अडकलेला असतो. शेवटी शेतकरी आत्महत्या करतो. एक कुटुंब उदध्वस्त होतं. अशा उद्ध्वस्त कुटुंबाची मालिका संपता संपतच नाही आणि तरीही म्हणे कृषी विकास दर वाढतो आहे. शेतकऱ्याचं जीवन भकास करणारा ‘वाढता’ कृषी दर ही वस्तुस्थिती आहे का? मुळात जाऊन विचार करून एखादा प्रश्न सोडवण्याची दृष्टी असणारे आपल्या सरकार आणि प्रशासनात उरलेले आहेत का नाहीत, असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पावसाळा संपत नाही, तोच रस्त्यावरच्या खड्ड्याचा प्रश्न दरवर्षी चर्चेला येतो. रस्त्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च होतात, परंतु देशातल्या कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गतचा अपवादात्मक एखाद-दुसरा वगळता अन्य सर्व रस्ते कायमच खड्ड्यात गेलेले असतात. मग हे रस्ते दुरुस्त होतात का नाही, त्या दुरुस्तीच्या नावावर मंजूर होणारे हजारो कोटी रुपये जातात का नाही? याचा लेखाजोखा ठेवणारी यंत्रणा आहे किंवा नाही, असा प्रश्न सरकार किंवा प्रशासनाला कधीच पडत नाही. असे हजारो कोटी रुपये दरवर्षी वाया जातात, पण त्याची फिकीरच कुणालाच नाही. असं हे एकूण प्रकरण आहे.

आपल्या दैनंदिन जीवन जगण्याच्या प्रत्येक आघाडीवर सरकार आणि प्रशासन पातळीवर हे असंच घडतं आहे. मग वर उल्लेख केलेली खाती असो का अन्य आरोग्य, शिक्षण, अशी अन्य खाती असो. दरवर्षी तेच प्रश्न त्याच बातम्या आणि सरकार व प्रशासनाचं तेच ते म्हणणं या दृष्टचक्रातून आपली सुटका होणार आहे किंवा नाही?

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......