जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत
सदर - फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
श्रीनिवास जोशी
  • हेराक्लिटस, अल्बर्ट आइन्स्टाइन, पार्मेनीडीज, प्लेटो आणि फ्रेडरिक नीत्शे
  • Tue , 15 February 2022
  • सदर फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी श्रीनिवास जोशी फिलॉसॉफी Philosophy तत्त्वज्ञ Philosopher हेराक्लिटस Heraclitus पार्मेनीडीज Parmenides फ्रेडरिक नीत्शे Friedrich Nietzsche प्लेटो Plato अल्बर्ट आइन्स्टाइन Albert Einstein

एका बाजूला आपल्याला आपले मानवी आयुष्य अर्थहीन वाटत असते. परस्परविरोधी आकांक्षांचा पाठलाग करताना आणि परस्परविरोधी जबाबदाऱ्या पाळताना आपल्याला हे मानवी आयुष्य व्यर्थ आहे, असे वाटत राहिलेले असते. त्याच वेळी आपल्यात काहीतरी सुंदर आणि महत्त्वाचे आहे, असेही आपल्याला वाटत असते. एकदा मानवी आयुष्यातील अर्थावर पकड आली की, सारे श्रेय आपल्या हाती लागेल, असे आपल्याला वाटत असते. फिलॉसॉफीवरील गप्पांची ही मालिका म्हणजे त्या मानवी आयुष्यातील श्रेयाचा शोध आणि पाठलाग!

..................................................................................................................................................................

लेखांक तिसरा

फिलॉसॉफरची पुढची नोट आली. ती मितालीने अतिशय उत्सुकतेने उघडली.

“मिताली, आपण याआधी पाहिले की, मानव आपली बुद्धी वापरून या जगाचा विचार कसा करायला लागला. हा प्रवास गेली दोन हजार वर्षं झाली सुरू आहे. जगातला पहिला बुद्धिवादी फिलॉसॉफर थेलीस म्हणाला की, हे सारे जग पाण्यापासून जन्मले आहे. त्यानंतर अनाक्सिमांडर म्हणाला की, हे जग एका अमर्याद अशा तत्त्वापासून जन्मले आहे. नंतर अनाक्सिमिनीस म्हणाला की, हे जग हवेपासून जन्मले. या पुढे मानवाचा विचार कसा कसा सरकत गेला?

आपण पाहिलेल्या फिलॉसॉफरना नॅचरल फिलॉसॉफर असे म्हणतात हेसुद्धा आपण पाहिले. कारण ते मुख्यतः या जगाच्या नैसर्गिक प्रकृतिबद्दल विचार करत होते. आता आपण पुढच्या नॅचरल फिलॉसॉफर्सचा विचार करणार आहोत. पण सगळ्यांची दखल घेणे आपल्याला शक्य होणार नाही, त्यामुळे महत्त्वाचे फिलॉसॉफर घेणार आहोत.

बुद्धीच्या प्रवासातला आपला पुढचा हीरो आहे हेराक्लिटस. याने या जगाच्या नैसर्गिक प्रकृतीबद्दल आपली मते मांडली, त्याचबरोबर मानवाबद्दलही. बाह्य जगाकडून फिलॉसॉफीचा झोत आता मानवाच्या स्वभावप्रकृतीकडेसुद्धा वळला होता.

हेराक्लिटसचा जन्म इसपू ५४०चा. तो एफिसस या गावी जन्मला. एफिसस, एशिया मायनरमध्ये होते म्हणजे सध्याच्या तुर्कस्तानमध्ये होते. हेराक्लिटस राजघराण्यातून आला होता. एफिससच्या राज्यपदावर पहिला अधिकार त्याचा होता. पण त्याने राजा व्हायचे सोडून ज्ञानी व्हायचे ठरवले. सत्य आणि शहाणपण त्याला सत्तेपेक्षा जास्त महत्त्वाचे वाटले. आपले राजेपद त्याने आपल्या लहान भावाला देऊन टाकले.

हेराक्लिटसला सामान्य माणसाबद्दल अजिबात आदर नव्हता. त्याच्या मते सामान्य माणसे काय करत आहेत आणि काय बोलत आहेत, याला अजिबात किंमत नसते. मेंढ्या काहीतरी आवाज करत राहतात, त्याचप्रमाणे सामान्य लोक काही ना काही बडबड करत राहतात. मेंढ्यांच्या आवाजाकडे आपण लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे सामान्य माणसाच्या मतांकडे लक्ष द्यायचे कारण नसते. सामान्य माणसे अडाणी असतात. चालत आलेल्या रूढी आंधळेपणाने पाळत पाळत हे लोक आपला जन्म काढतात. हे लोक काही कामाचे नसतात. एखादाच माणूस अद्वितीय म्हणून जन्मतो. त्यालाच किंमत असते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

हेराक्लिटस स्वतः सदैव ज्ञानाच्या शोधात राहिला. त्याने त्याच्या मते या जगाची गुरूकिल्ली शोधून काढली. त्याच्या मते सारे जग एकाच तत्त्वाने भारलेले असते. या तत्त्वाला हेराक्लिटस ‘लोगोस’ असे म्हणतो. या ग्रीक शब्दाचा इंग्रजी अर्थ ‘रीझन’ हा आहे. म्हणजे आपली बुद्धी वापरून विचार करायची क्षमता. साध्या शब्दात बोलायचे तर लॉजिक वापरून विचार करायची क्षमता.

हेराक्लिटसने आपल्या सर्वव्यापी तत्त्वाला बुद्धीच्या संदर्भातले नाव दिले. त्याचे म्हणणे असे की, हे तत्त्व समजून घ्यायचा प्रयत्न माणसाने केला, तर त्याला ते नक्की समजते. एकदा हे तत्त्व कळले की, या जगातील सगळ्या गोष्टींची प्रकृती आपल्या लक्षात येते.

लोगोस हे तत्त्व या जगात सर्वत्र अस्तित्वात असते. या जगाच्या रचनेचे आणि या जगात सुसूत्रता आणण्याचे काम लोगोस हे तत्त्व करते. हे या जगातील अनेक विरोधाभासांना सामावून घेणारे तत्त्व आहे. चांगले आणि वाईट, युद्ध आणि शांतता, अशा अनेक परस्परविरोधी गोष्टी या जगात आहेत. त्या का आहेत, याची संगती हे तत्त्व कळल्याशिवाय आपल्याला लागत लागत नाही.

काही फिलॉसॉफरना वाटत आले आहे की, लोगोस ही कल्पना मांडताना हेराक्लिट्सच्या मनात ‘देवाच्या मनाची’ संकल्पना असावी. त्याने लिहिले आहे - ‘God is day-night, winter-summer, war-peace, satiety-hunger…’ (रात्र-दिवस, उन्हाळा-हिवाळा, युद्ध आणि शांतता, भूक आणि तृप्ती हे सगळे देवामध्ये एक होते.)

हे तत्त्व समजून घेऊनच माणसाने आपली मते ठरवली पाहिजेत. पण गंमत अशी की, या तत्त्वाचा पाठलाग करायचा सोडून लोक स्वतःच्या व्यक्तिगत मतांना चिकटून बसलेले असतात. आपल्याला जे वाटते आहे, तेच या जगातील ‘अंतिम सत्य’ आहे, असा त्यांचा समज असतो.

आपल्या व्यक्तिगत आणि कोत्या सत्याचा कोष या लोकांनी स्वतःभोवती विणलेला असतो. या जगात खरे काय आणि खोटे काय, या विषयी या सामान्य लोकांना काहीही घेणे-देणे नसते. आपलेच मत खरे, अशी या लोकांची धारणा असते.

आपल्या व्यक्तिगत श्रद्धा, आपल्या व्यक्तिगत भीत्या, आपल्या व्यक्तिगत इच्छा आणि आपली व्यक्तिगत मते, यांचे चष्मे लावूनच सामान्य लोक हे जग बघत राहतात. या असल्या वृत्तीमुळे या जगाच्या चराचरात सतत अस्तित्वात असलेले सत्य लोक बघू शकत नाहीत. झोपेत चालल्यासारखे हे लोक आपले जीवन जगत राहातात.

आपल्या जागेपणी आपण काय करत आहोत, हेसुद्धा या लोकांना समजत नसते. झोपेत जे घडते, ते जसे आपण विसरून जातो, त्याचप्रमाणे आपण जागेपणी काय केले आहे, हेसुद्धा सामान्य लोक विसरून जातात. आपल्या वैयक्तिक मतांच्या झोपेमधून जागे होऊन माणसाला सत्य बघता आले पाहिजे, असे हेराक्लिटसला वाटत होते. इथे गंमत अशी आहे की, आपल्या व्यक्तिगत मतांच्या झोपेतून जागे होण्याचा हा सत्याचा प्रवास अत्यंत व्यक्तिगत असतो, असेही त्याला वाटत होते. इथे ना कुठले शिक्षण मदत करू शकते, ना कुठला तत्त्वज्ञ!

ग्रीक संस्कृतीमधील बाकीचे फिलॉसॉफर आधीच्या फिलॉसॉफर्सनी मांडलेल्या विचारांवर आपल्या तत्त्वज्ञानाच्या इमारती बांधत होते. हेराक्लिटसचे म्हणणे असे की, माझ्या तत्त्वज्ञानाची इमारत मी माझ्या स्वतःच्या विचारांच्या पायाभरणीवर केली आहे. त्याच्या तत्त्वज्ञानाची इमारत तीन मुख्य विचारांवर उभी होती-

१) या जगात बदलांचा प्रवाह सतत वाहत असतो. या जगात सतत काही ना काही उलथापालथ सुरू असते. (Everything is in a flux.)

२) हे जग म्हणजे एक सतत प्रज्वलित असलेला अग्नी आहे. (The world is an everliving fire.)

३) युद्ध हे या जगाच्या पितृस्थानी आहे. (War is father of all.)

आपण यातील एका एका विचाराचा विचार करू. पहिला विचार आहे ‘फ्लक्स’चा म्हणजे या जगातील सततच्या बदलांबाबतचा. हेराक्लिटसचे एक वाक्य फार प्रसिद्ध आहे- ‘Into the same river it is not possible to step twice.’ (एकाच नदीमध्ये आपण दोनदा पाय टाकू शकत नाही.) या वाक्याचा अर्थ पहिल्या शतकातील फिलॉसॉफर प्लुटार्कने सांगितला आहे - ‘हेराक्लिटसच्या मते आपण त्याच नदीत दोनदा पाऊल टाकू शकत नाही किंवा या जगातील कुठलाही पदार्थ त्याच्या कायम स्थितीमध्ये आपल्या हातात धरू शकत नाही’. नदी आपल्या प्रवाहामुळे सतत बदलत असते. प्रत्येक क्षणी नदी नवी होत असते. त्याचप्रमाणे कुठलाही पदार्थ त्याच्यात सतत बदल होत असल्याने कधीही एका स्थितीमध्ये राहत नाही. हे जग क्षणोक्षणी बदलत असते. आपणही कायम बदलत असतो.”

मितालीला ‘फ्लक्स’ची आयडिया अतिशय आवडली. लहानपणातली मिताली आत्ता आहे का? कालची आज आहे का? फिलॉसॉफर भेटण्याच्या आधीची आणि नंतरची एक आहे का? तिने लग्न झाल्यावर ज्या रोहनला मिठीत घेतले होते, त्यालाच कालही मिठीत घेतले होते का? ती आजकाल रोहनबद्दल थोडी खट्टू झाली होती की, रोहनमध्ये झालेल्या बदलांबद्दल खट्टू झाली होती? लग्न झाल्या झाल्या सतत ‘मिताली, मिताली’ करणारा रोहन आता १५ वर्षांनंतर तिला मिळणे शक्य होते का? तशी अपेक्षा करणे योग्य होते का? रोहनबद्दलची तिची निराशा थोडी मावळली.

खरं तर जग हे अनित्य आहे, सतत बदलणारे आहे, हा विचार मितालीला माहीत होता. पण, क्षणोक्षणी नवीन अस्तित्व धारण करणाऱ्या नदीची प्रतिमा तिच्या हृदयाला स्पर्शून गेली. या जगाचे क्षणोक्षणी बदलते स्वरूप तिला जणू काही नव्याने कळले होते. ती पुढे वाचू लागली,

“एखादी गोष्ट स्थिर आहे असे जरी आपल्या इंद्रियांना वाटले, तरी ती गोष्ट सतत बदलत असते. तिच्यात सतत बदल होत असतात. प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक क्षणी वेगळ्या गोष्टीमध्ये रूपांतर होत असते. हा विचार आपण स्वीकारला तर आपले मन दुःखाच्या खाईत लोटले जाते. हे जग जर सतत बदलत असेल, तर आपले सगळे आदर्श, आपले सगळे विचार, आपल्याला जे जे महत्त्वाचे वाटते आहे, त्यातले काहीच टिकणार नसते. कसले आदर्श? कसले विचार? कसल्या सामाजिक संस्था? कसला देश? कसले युग? कसले पुरुषार्थ? सगळे मातीत मिळून जाणार असते! सगळे मातीमोल होणार असते. आपण लढायचे कशासाठी हा प्रश्न उभा राहतो.”

मितालीला तिच्या सगळ्या लढाया आठवल्या. तिचा पहिला प्रेमभंग. त्यातून आलेली निराशा. तिचे वडील गेले, तेव्हाचे दुःख. या जगाचा अंत झाला आहे, असे तिला त्या दोन्ही वेळा वाटले होते. पण तसे काही झाले नव्हते. तिचे स्वतःचे आयुष्य थोडेसे बदलले होते इतकेच! ती स्वतः गेल्यावरसुद्धा जगाचा अंत होणार नव्हता. जगातले काही अणूरेणू थोडे इकडेतिकडे होणार होते इतकेच! मितालीचा या जगातला इंटरेस्ट एका चांगल्या अर्थाने थोडा कमी झाला. तिने लिहिले - ‘कशाला काही अर्थ नाही. आपण आयुष्यात उगीचच तडतड करत असतो’.

फिलॉसॉफरचे उत्तर आले - ‘या दुःखाला फिलॉसॉफीमध्ये ‘नाहिलस्टिक डिस्पेअर’ म्हणतात. शून्यवादातून येणारे दुःख! सगळे शून्य आहे या जाणीवेतून आलेले दुःख.’

मितालीने लिहिले, ‘या पेक्षा श्री अरविंद यांनी मांडलेला कॉन्शसनेसच्या उत्क्रांतीचा विचार मला भारी वाटतो. प्रत्येक जन्मात आपण बदलत असलो तरी आपण वरच्या वरच्या स्तरावर जात आहोत. प्रत्येक जन्मात एक एक धडा घेऊन आपण देवासारखे होत आहोत, देवाच्या थोडे थोडे जवळ जात आहोत, ही भावना किती इंटरेस्टिंग आहे. अरविंदांचा हा विचार खरा असो वा खोटा, या विचारामुळे निदान आहे, या मानवी आयुष्यातला माणसाचा इंटरेस्ट तरी कायम राहतो! हेराक्लिट्सचे विचार आपल्याला दुःखात लोटणार असतील तर उपयोग काय?’

फिलॉसॉफरने लिहिले - ‘हेराक्लिटसच्या विचारांनी तुझ्या मनात दुःख तयार झाले आहे, हे खरे आहे, पण त्यामुळेच तुला श्री अरविंद यांच्या आध्यात्मिक विचारांमुळे होणारे फायदे कळले हेसुद्धा तेवढेच खरे आहे!’

थोडा वेळ विचार करून मितालीने लिहिले - ‘बरोबर आहे. आपण सगळ्या प्रकारचे विचार करून बघितले पाहिजेत. विरोधी विचार एकमेकांवर प्रकाश टाकत राहतात. आपल्या जीवनाच्या अनेक बाजू त्यामुळे आपल्या लक्षात येत राहतात.’

फिलॉसॉफरने लिहिले - ‘फिलॉसॉफी समजून घेण्यामधला खरा चार्म हाच आहे! हेराक्लिटस सर्वांत महत्त्वाचा विचार लोगोस हा आहे. हेराक्क्लिटस म्हणतो आहे की, लोगोस हा प्रकार कळला की, या जगातील बदलांमागचे प्रयोजनसुद्धा कळणार आहे. मग मनात विषण्णता राहण्याचे कारण नाही.’

मिताली थोडा वेळ विचार करत राहिली. तिने लोगोस वगैरेचा विचार सोडून दिला. तिला त्या विचारात फार रस वाटला नाही. तिने सतत बदल होणाऱ्या जगाचा मनापासून स्वीकार करायचा प्रयत्न केला. तिला मोकळे वाटले. तिची बहुतेक दुःखे आणि चिंता काही ना काही ‘कायमचे’ पकडून ठेवण्याच्या इच्छेमधून आल्या होत्या. क्षणोक्षणी बदलणाऱ्या या जगात तिला सगळे आयुष्य आपल्या मुठीत ठेवायचे होते. गती हा या जगाचा नियम असताना, स्थिरतेला आपली कायमची मैत्रीण बनवायचा प्रयत्न ती करत होती. तिने आता बदलांना आपले मित्र बनवायचे ठरवले. कशातही गुंतून राहायचे नाही. तिला एकदम मोकळे वाटायला लागले. खूप वेळ ती हा मोकळेपणा एन्जॉय करत राहिली.

रात्री मोकळ्या वेळात तिने परत एकदा हेराक्लिट्सवरची नोट वाचायला घेतली-

“ ‘फ्लक्स’ आणि ‘लोगोस’ या विचारानंतर हेराक्लिटस आपला पुढचा विचार मांडतो- हे विश्व म्हणजे कधीही न विझणारा अग्नी आहे. (The world is an everliving fire.) त्याच्या या वाक्याच्या अर्थाबद्दल अनेक उलटसुलट विचार आहेत. काही फिलॉसॉफर म्हणतात की, या वाक्यातील अग्नीकडे एक रूपक म्हणून बघितले पाहिजे. अग्नी जसा प्रत्येक क्षणी आपले रूप बदलत असतो, त्याचप्रमाणे हे जग आहे, या अर्थाने आपण हेराक्लिटसच्या अग्नीकडे बघितले पाहिजे. 

‘स्टॉइक्स’ नावाचा फिलॉसॉफीचा पंथ पुढच्या काळात उदयाला आला. त्यांच्या मते हेराक्लिट्सचा अग्नी म्हणजे त्याचे ‘लोगोस’ हे तत्त्व. आपण पाहिलेच आहे की, हेराक्लिटसच्या मते लोगोस हे तत्त्व या जगात सर्वत्र अस्तित्वात असते. या जगाच्या प्रत्येक कणात राहून ते रचनेचे काम करत राहते. ते या जगात सुसूत्रता आणण्याचे काम करत राहते.

(येथे फिलॉसॉफरने एक टिप लिहिली - येथे ‘सोल’ या इंग्रजी शब्दाचे भाषांतर मी ‘आत्मा’ असे केलेले आहे. भारतीय तत्त्वज्ञानात आत्मा म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेला परमेश्वराचा अंश. ग्रीक फिलॉसॉफीमध्ये ‘सोल’ म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेला त्याचा ‘इसेन्स’. त्या व्यक्तीचे सत्व. त्या व्यक्तीमध्ये प्राधान्याने असलेले विचार आणि भावना.)

हेराक्लिटस म्हणतो की, आत्मा अग्नीपासून बनलेला असतो. यात पाणी मिसळले गेले की, आत्मा कमी प्रतीचा होतो. उदाहरणार्थ - दारू प्यालेला माणूस. त्याचे सगळे भान निघून जाते. या पुढे हेराक्लिट्स त्याचा पुढचा अग्नी, पाणी आणि पृथ्वी यांच्यातल्या नात्याचा विचार मांडतो.

माणसाचा आत्मा मृत्यू पावला की, पाणी तयार होते. पाणी मृत्यू पावले की, पृथ्वी तयार होते. पृथ्वीमधून पाणी वर येते आणि त्यापासून पुन्हा आत्मा बनतो.”

मितालीने मेसेज केला - ‘अग्नी-पाणी-पृथ्वी-आत्मा हे लॉजिक अत्यंत क्रेझी’.

त्यावर फिलॉसॉफरने लिहिले - ‘मानवाच्या बुद्धीने टाकलेल्या या ‘बेबी-स्टेप्स’ आहेत. डगमगती छोटी छोटी पावले! मानव आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवून विचार करत राहिला आणि या बैद्धिक परंपरेमधूनच पुढे सायन्स रेव्होल्यूशन झाली. विज्ञानाची क्रांती झाली!

मितालीने - थम्स अपची स्मायली पाठवली! ती पुढे वाचू लागली,

“या अग्नी, पाणी आणि पृथ्वी यांच्या नात्यातून हेराक्लिटसचा पुढचा विचार येतो - युद्ध हे या जगाच्या पितृस्थानी आहे. (War is father of all.) अग्नीचा मृत्यू झाला की, हवा तयार होते. हवेच्या मृत्यूमध्ये अग्नीचा जन्म होतो. पाण्याचा मृत्यू झाला की, पृथ्वी तयार होते. पृथ्वीचा मृत्यू झाला की, पाणी तयार होते. माणसाचा आत्मा मृत्यू पावला की, पाणी होते. या सगळ्यांच्या मध्ये सतत युद्ध सुरू आहे. एकाचा मृत्यू हा दुसऱ्याचा जन्म आहे. एकाचा जन्म हा दुसऱ्याचा मृत्यू आहे. या निरीक्षणामधून हेराक्लिटसचा सगळ्यात धक्कादायक विचार बाहेर पडतो. युद्ध हाच न्याय! (Strife is justice.)

या जगातील विविध तत्त्वे आणि गोष्टी एकमेकांशी सतत भिडत असतात, हे सगळ्यांनीच पाहिलेले असते. तसे ते हेराक्लिटससह इतर ग्रीक फिलॉसॉफरनीसुद्धा पाहिलेले होते. फरक इतकाच की, इतर फिलॉसॉफरना युद्ध वाईट आहे असे वाटत होते आणि हेराक्लिटस युद्धाचे स्वागत करत होता. इतर ग्रीक फिलॉसॉफर कधीतरी शांतता आणि सुस्थिरता येईल, अशी आशा करत होते. हेराक्लिट्स युद्ध हे जगाच्या चांगल्यासाठीच आहे, असे म्हणत होता. हे जग म्हणजे एकमेकांच्या विरोधातील तत्त्वांमधील सततचे युद्ध आहे, असे त्याचे म्हणणे होते.

युद्धामुळे राजा व्हायच्या लायकीचे लोक राजे होतात, प्रजा व्हायच्या लायकीचे लोक प्रजा होतात आणि गुलाम व्हायच्या लायकीचे लोक गुलाम होतात. युद्ध प्रत्येकाच्या क्षमतांना न्याय देते, म्हणजेच, प्रत्येकाला न्याय देते. या जगातील प्रत्येक गोष्टीमध्येसुद्धा अनेक अंतर्गत ताण असतात. अगदी स्थिर दिसणाऱ्या गोष्टींमध्येसुद्धा वरून अजिबात न दिसणारे ताण असतात.

हेराक्लिटसचा हा मुद्दा डब्ल्यू. के. सी. गूथ्री या विचारवंताने छान मांडला आहे. वरून स्थिरता पण अंतर्गत तणावग्रस्तता, या स्थितीचे उदाहरण देताना गूथ्री धनुष्याचे उदाहरण देतो. काठीला वाकवून तिला दोरीने बांधले की, धनुष्य तयार होते. वरून धनुष्य स्थिर दिसते, पण वाकलेल्या काठीमध्ये आणि दोरीमध्ये ताण असतो. दोरी तुटली की, काठी परत सरळ होऊ लागते.”

मितालीला हा विचार पटला. वरून स्थिर दिसणाऱ्या तिच्या रोहन बरोबरच्या नात्यात ताण होते. अनेक राग, अपेक्षाभंग होते. कितीतरी गोष्टी. या नात्याची दोरी काही कारणांनी तुटली तर आपण कार्तिककडे ओढले जाणार आहोत का, याचा विचार मिताली करत राहिली.

या जगातील सुसंवादी नात्यामागे किंवा गोष्टीमागे कसला ना कसला तरी विसंवाद लपलेला असतो, हे वाक्य फार ग्रेट आहे, असे मितालीला वाटले. सगळ्या जगात, प्रत्येक क्षणाच्या पोटात कसले ना कसले युद्ध सुरू आहे. लोकशाही विरुद्ध हुकूमशाही, धर्मवाद विरुद्ध निधर्मीवाद, स्त्रीवाद विरुद्ध पुरुषी-अहंकारवाद, जाती विरुद्ध जाती, प्रदेश विरुद्ध प्रदेश. मोजताही येणार नाहीत इतके वाद. समाज, लिंगे, देश, संस्कृती आणि व्यक्ती अशा मोठ्या गोष्टी सोडून द्या; अगदी एखाद्या अणूमध्येसुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फोर्सेसचे ताण असतात! अजून काय पाहिजे?

फिलॉसॉफरने लिहिले होते - ‘‘या जगात प्राचीन काळापासून युद्धे होत आली आहेत. प्रत्येक युद्ध हे कायमची शांतता आणण्यासाठीच झाले होते. हे एवढे एक युद्ध करायचे आणि मग कायमची शांतता आणि सुस्थिरता येणार, असा विचार प्रत्येक युद्धामागे होता. युद्धे कधीही संपली नाहीत. या अर्थाने हेराक्लिट्स योग्य बोलून गेला. युद्ध हा या जगाचा स्थायीभाव आहे. आता वाद राहील तो युद्ध चांगले की वाईट या विषयी!

एकोणिसाव्या शतकातील फिलॉसॉफर फ्रीड्रीश नीत्शे याने हेराक्लिटसचा युद्धाचा विचार उचलून धरला. नीत्शेच्या मते ज्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये चांगल्या वाईट अशा प्रचंड भावनांचे अतिप्रचंड युद्ध सुरू असते, तीच व्यक्ती मोठेपणा प्राप्त करते. या युद्धामुळे भावना आणि विचार या दोन्हीतले खरे-खोटे, चांगले-वाईट हे सगळे अतिशय निकाराने तपासले जाते. माणूस प्रगत होत जातो.”

मिताली विचार करत राहिली - हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण त्याचे काही विचार किती भारी आहेत! नीत्शेसारख्या आधुनिक फिलॉसॉफरला हेराक्लिटसच्या विचारात रस वाटत असेल तर हेराक्लिट्सने काही महत्त्वाचे नक्कीच जाणले आणि मांडले होते. तिने तसा मेसेज फिलॉसॉफरला पाठवला.

फिलॉसॉफरने लिहिले - “या विचारांमधला काही भाग तुला क्रेझी वाटत असेल ते योग्यच आहे. विज्ञानाचा कसलाही आधार नसताना हे लोक विचार करत होते. तुला इयत्ता पाचवीपासून हे जग अणू-रेणूंनी बनलेले आहे, असे शिकवले गेले आहे. या लोकांना असे काही शिकवले जाण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा ज्ञानच नव्हते. त्याचा पाया घालणारे हे लोक. तो कसा घातला जात असताना किती क्रेझी विचार केले गेले, याचा थोडा फील आपण घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर हे लोक मानवी आयुष्यातील सत्याला स्पर्श करू शकत होते, हे आपण मानले पाहिजे. हेराक्लिट्स नीत्शेला हलवू शकला, तसाच तो मितालीलासुद्धा हलवू शकतो आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. तुला हेराक्लिट्स क्रेझी वाटत असेल तर पार्मेनिडीज किती क्रेझी वाटेल, याची मला कल्पनाच करवत नाही. तू हेराक्लिटसच्या बदलत्या जगाच्या विचाराने इतकी विचारमग्न झाली आहेस. पार्मेनिडीजचे म्हणणे होते की, या जगात बदलच होत नाहीत.”

मितालीने आश्चर्यचकित झाल्याची स्मायली पाठवली. तिने लिहिले - हे काय नवेच?फिलॉसॉफरने लिहिले -

“हीच मजा आहे. हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. ग्रीक लोकांची इटलीमध्ये एक वसाहत होती - इलिया तिचे नाव. या इलिया गावी पार्मेनिडीज जन्मला. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद!

पार्मेनिडीज (इसपू ५४० ते ४८०) ने आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवून दोन गृहितके मांडली- १) शून्यातून काहीही तयार होऊ शकत नाही. (Nothing can come out of nothing.) आणि, २) जे अस्तित्वात आहे ते शून्यात लय पाऊ शकत नाही. (Nothing that exists can become nothing.)

मिताली, हे दोन विचार आपल्याला अगदी बरोबर वाटतात. अगदी पटकन मान्य करण्यासारखे वाटतात. पण, या विचारांना पकडून ठेवणे किती अवघड आहे, हे तुझ्या लक्षात येईल.

वरचे दोन विचार मान्य केले तर या जगात कसलाही बदल होऊ शकत नाही, हे आपल्याला मान्य करावे लागते. कारण, जन्म म्हणजे शून्यातून काहीतरी तयार होते आहे, हे आपण पाहत असतो. मृत्यू म्हणजे अस्तित्वात असलेले काहीतरी शून्यात जाते आहे, हेसुद्धा पाहत असतो. येथे शून्य म्हणजे ‘नथिंगनेस’ म्हणजे काहीच नसण्याची अवस्था हे लक्षात घे.

शून्यातून काही येणार नसेल आणि शून्यामध्ये काही जाणार नसेल तर हे जग बदलत आहे, हे आपण कसे म्हणायचे? मृत्यू नसेल आणि जन्म नसेल तर बदल कसे होणार? पण अनेक जन्म आणि मृत्यू होताना आपल्याला दिसत असतात. जग सतत बदलते आहे, हे आपल्याला दिसत असते. मग काय करायचे?”

मिताली विचार करू लागली. दोन्ही विचार अत्यंत योग्य होते. पण त्यातून निघणारा निष्कर्ष योग्य वाटत नव्हता. काय करायचे? तिने मेसेज केला की पार्मेनिडीजने मला गोंधळात टाकले आहे.

फिलॉसॉफरने लिहिले - “पार्मेनिडीज तुला अजून एक खूप धक्का तुला देणार आहे. आपल्या बुद्धीला स्मरून पार्मेनिडीजने अजून एक विचार मांडला - ज्या अर्थी न बदलणाऱ्या या जगातले बदल आपल्या इंद्रियांद्वारे आपल्याला दिसतात, त्याअर्थी इंद्रियांमुळे मिळालेल्या ज्ञानावर आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही. पहिले दोन विचार पकडून ठेवायचे असतील, तर या जगातील बदलाचा विचार नाकारावा लागेल. हे जग बदलते आहे, हे नाकारायचे नसेल, तर आपले पहिले दोन विचार आपल्याला नाकारावे लागतील.

पार्मेनिडीजने अजून एक धक्का देणारा विचार मांडला, आणि त्या विचारातून एक धक्कादायक निष्कर्ष निघाला. विचार करणे आणि अस्तित्व यांचे खूप घट्ट नाते आहे. पार्मेनिडीजचे म्हणणे असे की, जी गोष्ट अस्तित्वात आहे त्याच गोष्टीचे खरे ज्ञान आपल्याला होऊ शकते. जी गोष्ट अस्तित्वातच नाही, तिच्याविषयी आपल्याला काय बोलता येते?”

या विचारावर मिताली थांबली. हा काय प्रकार आहे? फिलॉसॉफरने पुढे लिहिले होते - ‘काही नाही’ यावर निबंध लिहायला सांगितला तर काय लिहायचे?

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

मिताली विचार करून करून ती थकली. जे अस्तित्वात आहे, त्याचाच विचार करता येतो का? जे अस्तित्वात नाही त्याचा विचार का करता येत नाही?

“फार काही कन्फ्यूज व्हायचे कारण नाही मिताली. एखादी अस्तित्वात नसलेली गोष्ट बघायचा प्रयत्न कर. शक्यच होणार नाही. याला विरोध करताना काही फिलॉसॉफरनी हॅम्लेटचे उदाहरण दिले. हॅम्लेटला डोळ्यासमोर खंजीर नसताना खंजीर असल्याचा भ्रम होतो. म्हणजेच खंजीर नसतानाही हॅम्लेटला खंजीर दिसू शकतो. याला उत्तर असे आहे की, खंजीरही नाही आणि भ्रमही नाही, असे झाले तर हॅम्लेटला काय दिसेल?”

सगळेच अवघड. तो हेराक्लिट्स परवडला! पण, पार्मेनिडीजचे म्हणणे मितालीला स्वीकारताही येत नव्हते आणि खोडूनही काढता येत नव्हते. ती पुढे वाचू लागली,

“जे अस्तित्वात नाही त्याचा विचार आपण करू शकत नाही. त्यामुळे आपण आपला शोध जे अस्तित्वात अस्तित्वात आहे, त्याच्यापुरताच मर्यादित केला पाहिजे.

विचार आणि अस्तित्व यांची सांगड असायलाच पाहिजे हे मान्य केले, तर विचित्र परिस्थिती तयार होते. अवकाशाबद्दल काय म्हणायचे. या विश्वात खूप मोकळी जागा आहे. मोकळी जागा म्हणजे काय? तर काही नाही! म्हणजे अस्तित्व नसलेले अस्तित्व? शक्यच नाही. मोकळी जागा अस्तित्व असू शकत नाही. (Empty Space = Nothing = Non-Being.)

आपण विचार करू शकत नाही, म्हणजे अस्तित्व नसलेले अस्तित्व अस्तित्वातच असू शकत नाही. पण या जगात मोकळी जागा तर आपल्याला दिसतच असते. त्याचे काय करायचे? बुद्धीचे निष्कर्ष आणि आपल्याला आपले डोळे जे जग दाखवत आहेत, हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तर काय करायचे?

पार्मेसेनिडीज म्हणतो की, अर्थातच आपण आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवायचा. आपली इंद्रिये आपल्याला फसवू शकतात. बुद्धीचा निष्कर्ष असेल की, या जगात मोकळी जागा असू शकत नाही, तर या जगात मोकळी जागा नाही. मोकळी जागा तुम्हाला दिसत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. ते सत्य नव्हे.”

मितालीला आश्चर्य वाटत राहिले. तिने मेसेज केला - ‘या जगात जन्म नाही, मृत्यू नाही, बदल नाहीत, मोकळी जागा नाही. अजून काय काय नाहिये पार्मेसेनिडीजच्या जगात?’

मिताली पुढे वाचू लागली - “मोकळी जागा नसल्यामुळे या जगात हालचाल शक्य नाहिये आणि बदल नसल्यामुळे वेगवेगळे आकारसुद्धा नाहियेत. या जगात एकच एक सत्य आहे. ते अनादी आहे, कधीही न बदलणारे आहे. आणि मुख्य म्हणजे ते कधीही न बदलणारे असल्यामुळे परिपूर्ण\परफेक्ट आहे. या जगात इम्परफेक्ट असे काही नाही.”

मिताली भयंकर अस्वस्थ झाली. तिने लिहिले, विचित्र आहे सगळे. याला काही अर्थच नाहिये. असली कसली फिलॉसॉफी? मिताली घरातल्या घरात येरझाऱ्या घालत राहिली. मूळ गृहितके तिला नाकारता येत नव्हती आणि त्यातून निघणारे निष्कर्ष तिला मान्य होत नव्हते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

फिलॉसॉफरने लिहिले होते- “हे सगळे जग एकच आहे. या जगातील विविधता ही त्या एकाच सत्याची विविध दृश्य स्वरूपे, भ्रामक स्वरूपे आहेत.”

मितालीने आजुबाजूच्या हवेत हात फिरवून बघितला. ही मोकळी जागा कुठून आली? तिला पार्मेनिडीजचे म्हणणे अजिबात पटत नव्हते. खोडून काढता आले नाही म्हणून काय झाले? पटले नाही म्हणजे पटले नाही! मग तिला वाटले की, आपणही हेराक्लिटसच्या सामान्य माणसाप्रमाणेच विचार करत आहोत. आपले मत म्हणजे अंतिम सत्य! आपल्याला जर एखादे मत खोडून काढता आले नाही, तर आपण ते मत स्वीकारले पाहिजे.

तिने लिहिले - “मला पार्मेनीडीजचे मत खोडून काढता येत नाहिये, पण पटतही नाहिये. या जगातील दुसऱ्या कोणी पार्मेसेनिडीजचे मत मान्य केले आहे का?”

फिलॉसॉफरने लिहिले - “विसाव्या शतकातील फिलॉसॉफर कार्ल पॉपर खुद्द आईनस्टाइनला ‘आधुनिक भौतिक शास्त्राचा पार्मेनिडीज’ म्हणाला आहे. कारण, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे सर्व एकाच वेळी अस्तित्वात असतात, असे आईनस्टाइनचे प्रतिपादन होते. भूत-वर्तमान-भविष्य हा आपला भ्रम असतो, असे आईनस्टाइन म्हणत होता आणि या जगात विविध आकार आणि मोकळी जागा आहे, हा आपला भ्रम आहे, असे पार्मेनिडीज म्हणत होता.”

मितालीने डोळे विस्फारले. प्रगत भौतिकशास्त्र वापरून आईनस्टाईन कालाच्या एकसंधतेबद्दल बोलत होता. भूत-वर्तमान-भविष्य हा आपला भ्रम असू शकतो, असे जर भौतिकशास्त्र म्हणत असेल तर आपल्याला जे दिसते आहे, तो भ्रम आहे, असे पार्मेसेनिडीजने का म्हणू नये?

फिलॉसॉफरने लिहिले - “पार्मेनिडीजचे निष्कर्ष मला महत्त्वाचे वाटत नाहीत. त्याचे मानवी बुद्धीला चिकटून राहणे मला महत्त्वाचे वाटते. त्याचे बुद्धीवर विश्वास ठेवणे मला महत्त्वाचे वाटते. हेराक्लिट्स आणि पार्मेनिडीज या दोघांनीही सत्याबद्दल आणि या जगातील बदलांबद्दल आपापली मते मांडली. ही मते आपल्याला विचित्र वाटली तरी त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढे प्लेटोसारख्या दिग्गज फिलॉसॉफरवर पडला. प्लेटोला या दोघांचेही विचार का महत्त्वाचे वाटले आणि त्यातून त्याने स्वतःच्या विचारांची मांडणी कशी केली, हे आपण पाहणारच आहोत. पण त्याला अजून थोडा वेळ आहे. या जगातील अंतिम तत्त्व एकच आहे, या विचाराचा फार मोठा प्रभाव प्लेटोवर कसा पडला, हेही पाहणारच आहोत. पार्मेनिडीजमुळे फिलॉसॉफी पुढे गेली.”

मितालीने नोट खाली ठेवली. ती विचार करत राहिली - जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिटस आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात एवढे क्रेझी नक्कीच नाहीत.

..................................................................................................................................................................

लेखांक : पहिला

फिलॉसॉफीमध्ये सखोल ‘इन्साइट’ तर आहेतच, पण जीवनातून अर्थ काढण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आहे! ती आपल्याला जीवनाच्या जवळ नेते!!

Philo म्हणजे प्रेम आणि Sophos म्हणजे श्रूडनेस. शहाणपणाविषयीचे प्रेम म्हणजे फिलॉसॉफी!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख