Philo म्हणजे प्रेम आणि Sophos म्हणजे श्रूडनेस. शहाणपणाविषयीचे प्रेम म्हणजे फिलॉसॉफी!
सदर - फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
श्रीनिवास जोशी
  • थेलिस, अनाक्सिमांडर, अनाक्सिमिनीस आणि टॉल्स्टॉय
  • Tue , 01 February 2022
  • सदर फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी श्रीनिवास जोशी फिलॉसॉफी Philosophy Philosopher तत्त्वज्ञ थेलिस Thales अनाक्सिमांडर Anaximander अनाक्सिमिनीस Anaximenes टॉल्स्टॉय Tolstoy

एका बाजूला आपल्याला आपले मानवी आयुष्य अर्थहीन वाटत असते. परस्परविरोधी आकांक्षांचा पाठलाग करताना आणि परस्परविरोधी जबाबदाऱ्या पाळताना आपल्याला हे मानवी आयुष्य व्यर्थ आहे, असे वाटत राहिलेले असते. त्याच वेळी आपल्यात काहीतरी सुंदर आणि महत्त्वाचे आहे, असेही आपल्याला वाटत असते. एकदा मानवी आयुष्यातील अर्थावर पकड आली की, सारे श्रेय आपल्या हाती लागेल, असे आपल्याला वाटत असते. फिलॉसॉफीवरील गप्पांची ही मालिका म्हणजे त्या मानवी आयुष्यातील श्रेयाचा शोध आणि पाठलाग!

..................................................................................................................................................................

लेखांक : दुसरा

मिताली खुश होती. एक शोध सुरू झाला होता. त्यामुळे तिला मानवी जीवनाविषयीच काय, पण अगदी आपल्या वैयक्तिक जीवनाविषयीसुद्धा ‘इन्साइटस्’ प्राप्त होणार होत्या. तिला पडलेले कितीतरी प्रश्न हळूहळू सुटणार होते. ती स्वतःच्या विचारात जास्त जास्त राहू लागली. थोर तत्त्वज्ञांच्या सहवासात राहण्याचा विचार तिला आवडू लागला.

मिताली हे तिचेच नाव असून तिला त्याचा अर्थ माहीत नव्हता. तेव्हापासून ती भाषेविषयी सजग झाली. तिला शब्दांच्या व्युत्पत्या कशा झाल्या, याविषयी कुतूहल वाटायला लागले. उदा. ‘भिकारी’ हा शब्द कुठून आला असावा? तिने फिलॉसॉफरला विचारले.

त्याने तिला कृ. पां. कुलकर्णी यांचा ‘व्युत्पत्ती कोश’ विकत आणायला सांगितला.

मिताली विचार करत राहिली. हा शब्द ‘भीक’ या शब्दावरून आला आहे हे स्पष्ट आहे. पण मग ‘भिकारी’ का? भीक+अरी कसे असेल? किती कॅज्युअली आणि बेपर्वाईने वापरत असतो आपण भाषा! साधे साधे शब्द कुठून आले हे आपल्याला माहीत नसते! ती स्वतःवरच वैतागली. त्याच तिरमिरीत ‘व्युत्पत्ती कोश’ घेऊन आली.

‘भीक’ हा शब्द संस्कृत ‘भिक्षा’वरून आला. भिक्षा मागून आहार करणारा तो ‘भिक्षाआहारी’. पुढे या त्याचा ‘भिक्खाहारी’ असा अपभ्रंश झाला. आणि त्याचा अपभ्रंश होऊन ‘भिक्खारि’ हा शब्द तयार झाला. आणि त्याचा अपभ्रंश होऊन ‘भिकारी’ हा सुटसुटीत शब्द तयार झाला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मितालीला अतिशय आनंद झाला. ती आज मराठीशी अतिशय वेगळ्या पद्धतीने जोडली गेली होती. संस्कृतशी जोडली गेली होती. आणि पाली, पैशाची, प्राकृत वगैरे भाषांशीसुद्धा. तिने ‘भिकारी’ची व्युत्पत्ती फिलॉसॉफरला कळवली. त्याचा मेसेज आला, फिलॉसॉफीमध्ये भाषा अतिशय काळजीपूर्वक वापरली जाते. आपण बोलतो आहोत, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ पूर्णपणे माहीत करून बोलले जाते.

तिने विचारले ‘फिलॉसॉफी’ या शब्दाची व्युत्पत्ती काय?

त्याचा मेसेज आला - फिलो (Philo) आणि सोफॉस (Sophos) या दोन शब्दांचा संयोग होऊन हा शब्द तयार झाला आहे. Philo म्हणजे प्रेम आणि Sophos म्हणजे श्रूडनेस किंवा माहिती. शहाणपणाविषयीचे प्रेम म्हणजे फिलॉसॉफी!

तिने तिची स्वतःची एक व्याख्या तयार केली- आपल्या जीवनातील स्मार्टनेसविषयीचे प्रेम म्हणजे फिलॉसॉफी!

मिताली कपड्याच्या वगैरे बाबतीत अतिशय टापटीप होती, पण तिला आज कळले की, आपण भाषा अत्यंत गबाळेपणाने, लक्ष न देता वापरत आहोत. ती विचार करायला लागली. बहुतेक शब्द, ती कसलाही विचार न करता वापरत होती. ‘सत्ता’ हा शब्द कुठून आला? ‘आनंद’ या शब्दाचा उगम काय? साधे साधे शब्द! प्रवास कुठून आला? जेवण? पाणी? तिला वेड लागायची पाळी आली.

तिने मेसेज केला - मी भाषा जन्मभर सवयीने, फारच शिथिल पद्धतीने वापरली आहे.

फिलॉसॉफरचा मेसेज आला- आपण याच पद्धतीने जीवनसुद्धा जगत असतो. आपले विचार, आपल्या भावना, आपली जीवनपद्धती हे सगळेच आपण सवयीने स्वीकारलेले असते. काहीच तपासून घेतलेले नसते. सगळेच गृहित धरलेले असते. तुम्ही ‘भिकारी’ हा शब्द तपासून घेतलात, तर भाषेविषयी एवढे विचार तुमच्या मनात तयार झाले. ‘प्रेम’, ‘समाज’, ‘राज्यव्यवस्था’, ‘लग्नसंस्था’ असे शब्द तपासून घ्यायला लागलात तर? किती रिचनेस येईल? तुम्हाला आज भाषेशी आपण जोडले गेलो असे वाटते आहे, असे तुम्ही जीवनाशी जोडल्या गेलात तर किती मजा येईल? म्हणूनच प्लेटो म्हणाला आहे – ‘अ‍ॅन अनएग्झामिन्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग!’ सुंदर जगायचे असेल तर आपण सगळे तपासून घेतले पाहिजे.

मिताली विचारात गढून गेली. तिच्या लक्षात आले की, आपण शिक्षणासाठी कुठली शाखा निवडायची, याविषयी जेवढा विचार केला होता, तेवढा लग्न करायचे की नाही, या महत्त्वाच्या विषयावर केला नव्हता. एक सामाजिक प्रवाह शतकानुशतके चालत आला होता. त्यात सगळे ठरवून ठेवलेले होते. कुठे काही प्रश्न वगैरे उपस्थित करण्याची गरज नव्हती. समाज म्हणेल तसे करत गेले की, सगळे नीट होते, ही श्रद्धा होती. तिला अचानक आठवले - फिलॉसॉफर म्हणाला होता की, आपल्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधायची. श्रद्धा मध्ये आणायची नाही. का नाही आणायची? तिने तसे विचारले.

फिलॉसॉफर म्हणाला, मी श्रद्धेविषयी एक नोट तयार केली आहे ती तुम्हाला पाठवतो. थोड्या वेळाने त्याची नोट आली. त्यात सुरुवातीलाच एक वाक्य होते - Faith only can give truth - Leo Tolstoy.

मिताली या वाक्यापाशी थांबली. केवळ श्रद्धाच मानवाला सत्यापर्यंत पोहोचवू शकेल, असे टॉल्स्टॉय का वाटले असेल? बराच वेळ विचार करूनही तिला काही सुचले नाही. शेवटी तिने नोट वाचायला सुरुवात केली.

“श्रद्धा

Faith only can give truth - Leo Tolstoy.

श्रद्धा ही अतिशय मौलिक गोष्ट आहे असे मला वाटते. बाकी काही चर्चा करण्यापूर्वी मला श्रद्धेविषयी तीन मोठ्या व्यक्तींच्या भूमिका सांगाव्याश्या वाटतात. पहिला विचार योगी श्री अरविंद यांचा. 

त्यांची भूमिका किंवा त्यांचा अनुभव असा की- या जगातील अंतिम सत्य माहीत करून घ्यायचे असेल, तर तुम्हाला श्रद्धा ठेवावीच लागते. कारण मानवाची बुद्धी हे अंतिम सत्य माहीत करून घ्यायला असमर्थ आहे. हा मुद्दा मांडताना श्री अरविंद मानवी दृष्टी आणि प्रकाशाच्या स्पेक्ट्रमचे उदाहरण देतात. मानवी दृष्टीला प्रकाशाच्या मर्यादित फ्रिक्वेन्सीज दिसतात. क्ष-किरण आणि अल्ट्रा व्हायोलेट किरण यांच्या पलीकडच्या इतर असंख्य फ्रिक्वेन्सीज मानवी दृष्टीला दिसत नाहीत. ते असे म्हणतात की, प्रकाशाचा स्पेक्ट्रम असतो, त्याप्रमाणेच कॉन्शसनेसचाही स्पेक्ट्रम असतो. त्याच्या अनेक पातळ्या असतात. मानवी बुद्धीला किंवा जास्त व्यापक शब्द वापरायचा तर मानवी अनुभवाला कॉन्शसनेसच्या अतिशय मर्यादित पातळ्या जाणवतात.

वेगवेगळ्या पातळीवरील कॉन्शसनेस कसे असतात, याची काही उदाहरणे श्री अरविंद देतात. आपले शरीर आपोआप वाढत असते. आपण त्याला काहीही सांगत नाही. त्याच्या त्याच्या वाढीचा अनुक्रम ते आपोआप पाळत असते. म्हणजेच शरीराचा स्वतःचा म्हणून एक कॉन्शसनेस असतो. तो तुम्हाला अजिबात ‘जाणवत’ नाही. याला श्री अरविंद ‘फिजिकल कॉन्शसनेस’ म्हणतात. या पातळीच्या वर आपल्या भावना असतात. याला ते ‘व्हायटल कॉन्शसनेस’ म्हणतात. आपण विचार करतो, हे अजून एक कॉन्शसनेसचे प्रतल. याला ते ‘मेंटल कॉन्शसनेस’ म्हणतात.

आता एक मजा बघायला मिळते. ही प्रतले एकमेकांची इंटरअॅक्ट होताना दिसतात. फिजिकल कॉन्शसनेसमध्ये काही गोंधळ झाला, तर भावनांवर त्याचा तीव्र पडसाद उठतो. किंवा भावनिक कल्लोळ तयार झाला, तर त्याचे पडसाद फिजिकल कॉन्शसनेसवर उठतात. या मधल्या प्रतलाला श्री अरविंद ‘फिजिकल-व्हायटल’ प्रतल असे नाव देतात. हाच प्रकार भावना आणि विचारात घडू शकतो. भावनिक कल्लोळामुळे विचार बिथरतात आणि ते बिथरले की, भावनिक कल्लोळ तयार होतो. या सांध्यावरच्या प्रतलाला श्री अरविंद ‘मेंटल-व्हायटल कॉन्शसनेस’ म्हणतात. त्यांचे म्हणणे असे की, मेंटल प्रतलापर्यंतचीच जाणीव मानवी अनुभवाला येऊ शकते. कॉन्शसनेसच्या या स्तरांच्या वर अनेक स्तर आहेत. उदा. हायर माईंड, इल्युमाईंड माईंड, इंट्युटिव्ह माईंड, ओव्हर माईंड आणि सुपर माईंड.

हे आपल्या मनाच्या वरचे स्तर आध्यात्मिक प्रगती झाल्याशिवाय मानवाला आकळत नाहीत, कारण खालच्या कॉन्शसनेसला वरच्या पातळीवरील कॉन्शसनेस आकळत नाही. श्री अरविंद यांचे म्हणणे असे की, आपण मनाला किंवा बुद्धीला ओलांडून गेलो, तरच या वरच्या पातळ्या अनुभवाला येतात.

आता प्रश्न असा येतो की, आध्यात्मिक प्रगती कशी करायची? श्री अरविंद सांगतात की, तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा श्रद्धेची ‘ब्लाइंड लीप’ घ्यावी लागते. अंधारात उडी घ्यावी लागते. गुरूला किंवा वरच्या अस्तित्वांना शरण जावे लागते, तरच पुढची प्रगती होते.

श्रद्धेमुळे पुढची दारे उघडतात. याला कुठलाही पुरावा देता येत नाही. हा प्रवास स्वतःलाच करावा लागतो.”

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

मिताली विचार करत राहिली. कॉन्शसनेसच्या प्रतलांबद्दलचा विचार तर बरोबर वाटत होता. पण, कॉन्शसनेस म्हणजे काय? तिने मेसेज केला- कॉन्शसनेस आणि चैतन्य एकच का?

फिलॉसॉफरने लिहिले - कॉन्शसनेस हा शब्द मुख्यतः दोन अर्थांनी वापरला जातो. जाणीव आणि जिवंतपणा! कळणे आणि जिवंत असणे या दोन गोष्टी कॉन्शसनेसमध्ये अध्याहृत आहेत. चैतन्य हा शब्द ‘चेतन’ या शब्दावरून आलेला आहे. चेतन म्हणजे जिवंत असलेला.

श्री अरविंद यांनी सांगितलेली प्रतले मी थोडी सोपी करून सांगितलेली आहेत. श्रद्धेविषयी चर्चा सुरू असताना कॉन्शसनेसच्या पातळ्यांविषयी गोंधळ नको. हा भाग आपण खूप पुढे गेल्यावर नीट तपासून घेऊ.

फिलॉसॉफरचे बरोबर होते. सुरुवातीलाच गोंधळ उडायला नको. मिताली परत श्रद्धेविषयीच्या नोटकडे वळली. 

“श्रद्धेविषयीची दुसरी भूमिका आहे पारंपरिक हिंदू अशा अध्यात्मातली. या परंपरेत गुरू अपरिहार्य असतो. तुम्हाला अंतिम ज्ञान हवे असेल तर, तुम्हाला जमेल आणि सुचेल त्या मार्गाने साधना सुरू करा. कालांतराने तुमच्या आयुष्यात एक गुरू येतो. तो तुम्हाला मन आणि आणि शरीर या पलीकडे अस्तित्वाच्या अनेक पातळ्या आहेत, या गोष्टीचा पुरावा देतो. त्यामुळे तुमची साधना अजून प्रखर होत जाते. या साधनेच्या मार्गात तुम्हाला गुरू साथ देत राहतो. जन्मोजन्मांतरीची ही साथ असते.

रामकृष्ण परमहंस म्हणायचे की, डोळे मिटून श्रद्धा ठेवायचा प्रश्नच नाही. अध्यात्म हा रोकडा व्यवहार आहे. एखादा बनिया जसा बंदा रुपया आरखूनपरखून घेतो, तसा तुम्ही गुरू आरखूनपरखून घ्या. इथे गुरुने शिष्याला अनुभव देऊन त्याची श्रद्धा जिंकून घ्यायची आहे. मग पुढे मात्र गुरूचे पाय हीच पूजा, गुरूचा शब्द हाच मंत्र! गुरूने श्रद्धा जिंकून घेतली की, मग मात्र संपूर्ण श्रद्धा. जादा शहाणपण करायचे नाही. बुद्धीची मस्ती करायची नाही.

या प्रकारात पहिल्यांदा साधना सुरू केल्यावर श्रद्धा आवश्यक आहे, आणि ती एवढीच की - मी साधना करत राहिलो, तर माझ्या संशयाचे निराकरण करणारा गुरू मला मिळेल.

तिसरी भूमिका रशियन लेखक लिओ टॉलस्टॉयची. तो लेखक आणि तत्त्वज्ञ होता. त्याचा सारा जन्म बुद्धिवादी विचारसरणीत गेला. तो तत्त्वज्ञानात शॉपेनहॉवरचा चेला होता.

आयुष्यात पैसा, प्रसिद्धी आणि सर्व ऐहिक सुखांच्या शिखरावर असताना त्याला अचानक आत्महत्या करावीशी वाटू लागली. या अय्याश आयुष्यात काही अर्थ नाही असे वाटू लागले. एक मोठे शून्य त्याला खायला उठले. त्याने त्याची बंदूक लपवून ठेवायला सांगितली. घरातले सगळे दोरखंड बाहेर फेकून दिले. त्याने ज्या ‘सेक्युलर’ तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला होता, ते या द्वंदामधून त्याला बाहेर काढू शकत नव्हते. त्यामुळे, त्याने ‘बायबल’, बुद्धिझम, वेदांत, ‘कुराण’ या साऱ्यांचा अभ्यास केला.

त्या अभ्यासातून त्याने निष्कर्ष काढले. ते असे - श्रद्धा ही आदीम आहे. मानवाच्या अगदी सुरुवातीपासून ती त्याच्या बरोबर आहे. ती मानवाइतकीच जुनी आहे, मानवी मनाचा अविभाज्य भाग आहे.

टॉलस्टॉयने श्रद्धा या संकल्पनेची व्याप्ती वाढवली. तो म्हणाला - मानवी आयुष्य अर्थपूर्ण आहे ही श्रद्धा तरी किमान प्रत्येक व्यक्तीमध्ये असायलाच लागते. अशी श्रद्धा नसेल तर जीवन जगणे शक्य होत नाही. आणि, जीवनात अर्थ असायला हवा असेल तर, मानवाच्या मर्यादित जीवनाचे नाते कुठल्या ना कुठल्या प्रकारे अनंताशी जोडले जायला लागते. टॉल्स्टॉयचे म्हणणे असे की, एखादी व्यक्ती जिवंत असेल तर तिची कशावर तरी श्रद्धा असणारच.

ही श्रद्धेची भावनाच तुमच्या स्पिरिच्युअल प्रवासात पुढची दारे उघडत जाते असे त्याचे म्हणणे आहे.

पुढे टॉलस्टॉयचा मोठा प्रवास झाला. तो आत्महत्येच्या कड्यावरून परत आला. जीवनशक्तीने रसरसलेले एक आध्यात्मिक जीवन पुन्हा जगू लागला. हा सगळा प्रवास त्याने आपल्या ‘कन्फेशन’ या पुस्तकात लिहिला आहे. थोडक्यात श्रद्धा असल्याशिवाय अंतिम सत्यापर्यंत तुम्हाला जाता येत नाही, असा टॉलस्टॉयचा निर्वाळा आहे.”

इथे फिलॉसॉफरची श्रद्धेविषयीची नोट संपली. कॉन्शसनेसचा स्पेक्ट्रम ही संकल्पना मितालीला फार आवडली. तिने फिलॉसॉफरला लिहिले, हे सगळे स्तर पाहायला मिळणार असतील तर मी श्रद्धा ठेवायला तयार आहे.

फिलॉसॉफर म्हणाला - ठीक आहे उद्या पाँडेचरीच्या श्री अरविंद आश्रमात जा आणि साधना सुरू कर.

साधना करूनही मला हे सगळे स्तर पाहायला नाही मिळाले, तर काय करायचे? तिने लिहिले.

त्याचे उत्तर आले - यावर श्री अरविंद म्हणाले आहेत हा जन्म वाया जाऊ शकतो, पण या जन्मात केलेली साधना वाया जाणार नाही अशी श्रद्धा ठेवा. एक-दोन जन्मात तुमची थोडीतरी प्रगती नक्कीच होईल. तुम्ही या मार्गावर थोडे तरी पुढे जाल.

मिताली निराश झाली. म्हणजे पुनर्जन्मावर सुद्धा श्रद्धा ठेवायची! तिने लिहिले - मला रामकृष्ण परमहंस यांच्यासारखा आधी प्रचिती देणारा गुरू हवा आहे.

त्याने लिहिले, रामकृष्ण परमहंस यांच्या पायावर डोके ठेवून साधना सुरू करा. काही वर्षांत किंवा काही जन्मांत तुम्हाला प्रचिती देऊन तुमची श्रद्धा जिंकून घेणारा गुरू दिला जाईल.

पुढच्या जन्माच्या आधीची बातच कोणी करत नाहिये - ती स्वतःशी पुटपुटली. तिने लिहिले, मी निराश झाले आहे. पण श्रद्धा माझ्या हृदयात लहानपणापासून आहे. मानसिक आधार म्हणून असो किंवा अजून काही कारणांनी असो, श्रद्धा मला अतिशय अपरिहार्य वाटते.

तो म्हणाला - टॉल्स्टॉय हेच म्हणाला आहे. आदिम काळापासून जेवढे मानवी समाज होते, त्या सगळ्या समाजात श्रद्धा आपल्याला पाहायला मिळते. याचाच अर्थ असा की, श्रद्धा हा मानवी अस्तित्वाचा एक मूलभूत भाग आहे.

मितालीला हे पटले. पण असे असले तरी पुढचा प्रवास कसा करायचा?

एवढ्यात त्याने लिहिले - श्रद्धेच्या आणि मानवाच्या अनावर नात्याविषयी मला जलालुद्दीन रूमी या १३व्या शतकातील तुर्की कवीच्या ओळी फार आवडतात -

“माझी माझ्या आईशी असलेली नाळ ज्या क्षणी कापली गेली, त्याच क्षणी माझी नाळ हे ईश्वरा, तुझ्याशी जोडली गेली…”

‘प्रेम म्हणजे पूर्णत्वाचा शोध’ या प्लेटोच्या वाक्याचा बसला होता, तसाच फटका तिला या रूमीच्या वाक्याचा बसला. श्रद्धा एकप्रकारे तिची आईच होती. अगदी लहानपणापासून ती देवबाप्पाकडे तक्रारी करत होती, त्याच्याकडे काही ना काही मागत होती, त्याला सांभाळून घ्यायला सांगत होती. श्रद्धा तिचा आधार होती. श्रद्धेच्या कुशीत तिला बरे वाटत होते.

एक विश्वास आणि एक आधार या पलीकडचा श्रद्धेचा अर्थ तिला आज कळला होता. श्रद्धा हे अध्यात्ममार्गातले एक वाहन होते. या गाडीत बसून अंतिम अर्थाच्या गावाला जाता येत होते. रामकृष्ण परमहंस यांच्या आश्वासनामुळे तिला बरे वाटले. काही भाग्यवंतांची श्रद्धा त्यांना प्रचिती देऊन जिंकून घेतली जात होती. टॉलस्टॉयमुळे तिला श्रद्धेची आदिम प्रकृती कळून चुकली होती. देवापुढे पैसे ठेवून सुख विकत घेण्याएवढी श्रद्धा थिल्लर नव्हती. आणि अश्रद्ध लोकांनी बसल्या बसल्या मोडीत काढावी एवढी श्रद्धा उथळही नव्हती. मग तिला फिलॉसॉफीच्या बाहेर का ठेवायचे? तिने तसे फिलॉसॉफरला विचारले.

त्याने उत्तर दिले - श्रद्धा या नाण्याची दुसरी बाजू आहे प्रचिती. ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. प्रचिती ही गुरू आणि शिष्य किंवा देव आणि भक्त यांच्या मधली गोष्ट आहे. त्यावर चर्चा कशी होणार? इंद्रियांच्या संवेदनांच्या पलीकडची ही बाब आहे. शिवाय गंमत अशी आहे की, मानवी बुद्धी अंतिम सत्य जाणण्यासाठी अपूर्ण वाटली तरी खूप सारे मानवी आयुष्य तिच्या कक्षेत येते. अंतिम सत्याचा शोध ज्याला घ्यायचा आहे, तसा त्याने घ्यावा, पण आपण जे आज जगतो आहोत, त्या मानवी जीवनाचा शोध तर आपण बुद्धीच्या कक्षेत राहून घेऊ शकतो आहोत ना? आपण या जीवनाविषयीच्या चर्चा बुद्धीच्या अंगणात बसून करू. पुढे तुम्हाला श्रद्धेची ‘ब्लाईंड लीप’ घ्यायची असेल तर तुम्हाला कोण अडवायला येणार आहे?

तिला पटले. पहिल्यांदा जो शोध बुद्धी वापरून घेता येतोय तो घेऊ, त्यावर समाधान नाही झाले तर श्रद्धेचे मार्ग आहेतच!

तिने लिहिले - तुमचे बरोबर आहे. मी श्रद्धेची नाव सोडून काही काळापुरती बुद्धीच्या नावेमध्ये बसले आहे. पण कुठल्याही क्षणी मी परत एकदा श्रद्धेच्या नावेमध्ये बसायचा माझा हक्क राखून ठेवते आहे.

त्याने एक मंद हास्याची स्मायली पाठवली.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

थोड्या वेळाने त्याची एक नोट मेसेज बॉक्समध्ये आली. त्या नोटचा मथळा होता - ‘नॅचरल फिलॉसॉफर्स म्हणजे अर्थात निसर्गाचे फिलॉसॉफर्स’.

“तुम्ही जशा आज बुद्धीच्या नावेमध्ये बसला आहात, त्याचप्रमाणे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या ग्रीसमध्ये अनेक फिलॉसॉफर बुद्धीच्या नावेमध्ये बसून प्रवासाला निघाले. त्यांनी श्रद्धेला जाणीवपूर्वक बाजूला ठेवले असणार, कारण जगातल्या जवळ जवळ सर्व प्रश्नांची उत्तरे काव्यातून तोपर्यंत दिली गेली होती. अमुक एका देवामुळे पाऊस पडतो. तमुक एका देवतेमुळे सृजन होते, असे प्रत्येक समाजात सांगितले गेले होते. या जगातील प्रत्येक समाजामध्ये अशा कहाण्या आहेत.

थेलीस नावाच्या फिलॉसॉफरने मानवी बुद्धीला केंद्रस्थानी ठेवून निसर्गाविषयी विचार करायला सुरुवात केली. त्याचे गाव होते मायलिटस आणि राज्य होते आयोनिया. एशिया मायनर या प्रदेशात हे राज्य होते. पूर्वीचा एशिया मायनर म्हणजे आजचा तुर्कस्तान! थेलीस इसपू ६४५मध्ये जन्मला आणि ५२४मध्ये मृत्यू पावला.

ग्रीस आणि एशिया मायनर एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यामुळे अडीच हजार वर्षांपूर्वी या दोन प्रदेशात ये-जा भरपूर होती. व्यापार भरपूर होता. लोक ये-जा करत राहिले की, विचारांची देवाणघेवाण होते. वेगवेगळ्या संस्कृती बघितल्या जातात. प्रत्येक ठिकाणचे देव आणि दंतकथा वेगवेगळ्या आहेत, हे लक्षात येते. प्रत्येक ठिकाणचे रीतीरिवाज वेगळे आहेत हे कळते. मानवी संस्कृती आणि व्यवहार अफाट आहेत, हे कळते. माणूस आपल्या समाजात ऐकलेल्या दंतकथांच्या पलीकडे जाऊन वेगळा विचार करण्यास प्रवृत्त होतो.

या देवाणघेवाणीच्या काळात एक विचार तत्कालीन विचारवंतांच्या मनात आला. हे विश्व एकाच मूलभूत अविभाज्य अशा पदार्थामुळे बनलेले असावे. या विचाराचा निश्चित उगम पहिल्यांदा नक्की कुठे आणि कसा झाला, याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.

या विश्वात होत राहणारे सततचे बदल फिलॉसॉफर लोकांना आकर्षित करत होते. ऋतूंप्रमाणे निसर्गाचे, जीवन-मृत्यूचे चक्र फिरत राहते. हे सारे बदल कसे होतात? माणूस मृत्यू पावल्यावर त्याचे विघटन होते. माणूस पुन्हा जन्मताना जे विखुरले गेले आहे, ते पुन्हा एकत्र येत असावे, असा विचार वाढीस लागला. एका मूळ पदार्थापासून सगळे बनत असावे.

थेलीस या मूळ पदार्थाविषयी विचार करत राहिला. उत्पत्ती आणि लयाची संगती लागायची असेल तर एक असा पदार्थ असलाच पाहिजे- ज्यापासून सगळे जन्माला येते आणि ज्यामध्ये सगळे लय पावते.”

मितालीला या विचारप्रक्रियेचे फार कौतुक वाटले. विज्ञान अस्तित्वात नसताना असा विचार मनात येणे, ही केवढी मोठी क्रिएटिव्हिटी होती! थेलीसच्या बुद्धीचे तिला कौतुक वाटले. ती पुढे वाचू लागली-

“आपली निरीक्षणे करून थेलीसने आपला निष्कर्ष काढला - पाणी हा जगातील मूल-पदार्थ असावा! शास्त्रीय विचार-प्रक्रियेमधील हे पहिले पाऊल होते. या थेलीसने प्रचंड प्रवास केला होता. त्या पुरातन काळी तो इजिप्तपर्यंत जाऊन आला होता. तिथली गंमत अशी की, इजिप्तमध्ये असताना त्याने पिरॅमिडची ऊंची अचूक मोजून दाखवली होती. त्याने दिवसात ज्या क्षणी आपली सावली आपल्या ऊंची एवढी असेल, त्या क्षणी पिरॅमिडच्या सावलीची लांबी मोजली आणि पिरॅमिडची ऊंची तेवढीच असणार असे जाहीर केले.

याच थेलीसने इसवीसन पूर्व ५८५मधील सूर्यग्रहण नक्की कधी होणार आहे, हे अचूक सांगितले होते. बॅबिलॉनमधील संस्कृतीने तयार केलेले सूर्य आणि चंद्राच्या भ्रमण कक्षेचे तक्ते थेलीसने यासाठी वापरले. ग्रहणाचे अचूक भाकित करणारा थेलीस हा पहिला मानव होता.”

मिताली पूर्णपणे गार झाली. पाण्यापासून हे जग तयार झाले आहे, असे या ब्रिलयन्ट थेलीसला का वाटत होते, हे माहीत करून घेण्याची तिला उत्सुकता वाटली. ती पुढे वाचू लागली.

“एक म्हणजे सगळे जग पाण्यावर अवलंबून आहे, हे थेलीसने पाहिले होते. झाडे असोत किंवा प्राणी, पाणी हेच त्यांचे जीवन होते. शिवाय त्याने बघितले असावे की, नाईल नदीचा पूर ओसरला की, पिके तरारून वर येतात. शिवाय पाऊस पडला आणि तळी साचली की, त्या पाण्यातूनही छोटे छोटे मासे आणि बेडूक तयार होताना दिसतात. थेलीसने विचार केला असणार की, ज्या अर्थी हे जीव पाण्यामधून तयार झालेले दिसत आहेत, त्या अर्थी संपूर्ण विश्व पाण्यामधून तयार झालेले असावे. पाण्यामध्ये देवाची बीजे पेरली गेली असावीत. पाण्यात जिवांचा ‘इसेन्स’ लपलेला असावा. आपल्या मराठीत बोलायचे तर पाण्यात जीवनाचे सत्व पेरले गेले असावे. आपण इतक्या वर्षांच्या शास्त्रीय विचाराच्या प्रगतीच्या खांद्यावर उभे आहोत. आपल्याला सगळे रेडीमेड दिले गेलेले आहे. थेलीसला असा कुठलाही आधार नव्हता.

पाण्याची वाफ होताना त्याने बघितली होती, पाण्याचा बर्फ होताना त्याने बघितला होता.

थेलीसने हाही विचार केला होता की, वाफ गरम असते. याचा अर्थ उष्णतासुद्धा पाण्यापासूनच तयार होते! जमिनीत पाणी मुरताना त्याने पाहिले होते. आणि याच जमिनीतून फुले व अनेक प्राणी बाहेर येताना त्याने पाहिलेले होते. पाणी हा दैवी पदार्थ आहे, असे थेलीसचे मत झाले होते.

थेलीसनंतरचा नॅचरल फिलॉसॉफर म्हणजे अनाक्सिमांडर. त्याचा जन्म इसपू ६१०चा. हा बहुतेककरून थेलीसचा शिष्य होता. हासुद्धा मायलिटस येथील राहणारा होता. विचारांमध्ये हा थेलीसच्या पुढे गेला. हे विश्व कुठल्या तरी ‘अनबाऊंड’ गोष्टींमधून जन्माला आले आहे आणि त्या ‘अनबाऊंड’ गोष्टीमधेच ते विलय पावते, असे त्याचे म्हणणे होते. आपण अनाक्सिमांडरच्या या ‘अनबाऊंड’ला ‘अपरिमित’ असे म्हणू. जे कशानेही बांधले गेलेले नाही, ते अपरिमित. डायमेन्शन्स, आकार किंवा गुण-वैशिष्ट्ये अशा कशाकशानेही जे बांधले गेलेले नाही, ते अपरिमित!

हे अपरिमित म्हणजे नक्की काय हे अनाक्सिमांडर सांगत नाही. पण हे अपरिमित म्हणजे पाण्यासारखा, आपल्या सर्वांना माहीत असलेला पदार्थ नक्कीच नव्हता. हे अपरिमित आपण पाहतो त्या सगळ्या पदार्थांपासून वेगळीच गोष्ट (Thing) असावी. या ‘अपरिमित’ गोष्टीपासून या जगातील सगळ्या ‘परिमित’ गोष्टी तयार होत असाव्यात, असे अनाक्सिमांडरला वाटत होते.

या जगाचा मूळ उगम पाण्याइतका साधा असू शकत नाही, असे अनाक्सिमांडरला वाटले असावे. पाण्यापासून सगळे जग तयार झाले आहे, या थेलीसच्या म्हणण्याचा विचार करत असताना अनाक्सिमांडरच्या मनात आले की, ज्या अर्थी पाणी आणि अग्नी या एकमेकांच्या विरोधातील गोष्टी आहेत, त्या अर्थी निदान आग तरी पाण्यापासून तयार झाली नसावी. या विचारातून तो आपल्या ‘अपरिमिता’च्या विचाराकडे गेला.

विरोधी गोष्टींना सामावून घेण्याची क्षमता या अपरिमितामध्ये असेल तरच ते एकाच वेळी पाणी आणि अग्नी यांचा उगम असू शकणार होते. याचाच अर्थ असा की, या अपरिमिताला स्वतःचे असे काही वैशिष्ट्य नसणे आवश्यक होते. स्वतःची अशी कुठलीही ‘क्वालिटी’ त्याला नसणे आवश्यक होते. या जगातील कुठल्याच गोष्टीच्या विरोधात नसलेले हे तत्त्व असायला हवे होते. त्यामुळेच त्याला अनाक्सिमांडर अपरिमित म्हणतो. सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्याला पुरून उरणारे! सगळ्याच्या पलीकडे जाऊनही शिल्लक उरणारे!

थेलीसच्या विचारांनंतर अनाक्सिमांडरने घेतलेली ही फार मोठी तात्त्विक उडी होती. या जगाचे मूळ जर ‘अपरिमित’ असेल तरच या जगात दिसून येणारे सृजन आणि लयाचे चक्र अव्याहतपणे चालू राहणे शक्य होते.”

मितालीच्या मनात विचार आला की - फारच ओरिजिनल विचार आहे हा! परिमित असे जे आहे, ते अपरिमितामध्ये लय पावते आहे आणि अपरिमितातून ते परत परिमितामध्ये परत येते आहे. अव्याहत चक्र!

अनाक्सिमांडरने विश्वाच्या उगमाबरोबरच त्याच्या अस्तित्वाच्या सलगतेचा सुद्धा विचार केला होता आणि लयाचासुद्धा विचार केला. उद्गम, स्थिती आणि लय या तीन्ही गोष्टी त्याने कवेत घेतल्या होत्या.

मितालीने चहा करून घेतला. तिच्या डोळ्यापुढे प्राचीन कालातील एशिया मायनर येत राहिला. तेथील विचार करणारे थेलीस आणि अनाक्सिमांडर येत राहिले. अनाक्सिमांडरचे हे अपरिमित, हा एक पदार्थ होता की, ते एक अस्तित्व होते. तिने फिलॉसॉफरला विचारले.

त्याने लिहिले- तत्त्वज्ञ फ्रीड्रीश नीत्शे अनाक्सिमांडरच्या अपरिमताला अस्तित्व (बीइंग) समजत होता आणि हायझेनबर्ग या क्वान्टम फिजिक्समध्ये काम केलेल्या शास्त्रज्ञाचा सहकारी मॅक्स बॉर्न अनाक्सिमांडरच्या अपरिमिताला पदार्थ (सब्स्टन्स) समजत होता. आपण या चर्चेत न गेलेले बरे. अपरिमित ही एक ‘गोष्ट’ (Thing) आहे, असे समजून तिथेच आपण थांबू. 

मिताली चहा पीत पीत पुढची नोट वाचू लागली.

“या नॅचरल फिलॉसॉफरच्या मालिकेतील शेवटचा फिलॉसॉफर म्हणजे अनाक्सिमिनीस (इसपू ५७६ ते ५२६). हासुद्धा मायलिटस येथेच जन्मला. याचे म्हणणे असे की, हे जग हवा किंवा वाफेपासून जन्मले आहे.

अनाक्सिमिनीसचे हवा हे तत्त्व अनाक्सिमांडरच्या ‘द अनबाऊंड’ या तत्त्वाप्रमाणेच अपरिमित आहे. अनाक्सिमिनीसने प्राण्यांना श्वास घेताना पाहिले होते. श्वास घेऊ लागला की, प्राणी जिवंत होतो. म्हणजे हवा जिवंत असणार! हवा एखाद्या प्राण्याला जिवंत ठेवते, त्याचप्रमाणेच या संपूर्ण विश्वाचे ती चलनवलन आहे.

अनाक्सिमिनीसला अर्थातच थेलीसचा पाण्याचा सिद्धान्त माहीत होता. अनाक्सिमिनीसने विचार केला पाण्यापासून जग आले हे ठीक आहे. पण पाणी कुठून आले? अनाक्सिमिनीसला वाटले की, पाणी म्हणजे द्रवरूप हवा आहे. हवेतून पाऊस येताना आपण पाहत नाही का? पाणी अजून घट्ट झाले की, जमीन तयार होते. पाण्याचा बर्फ होतो आणि त्याचीच पुढे माती होते. हवा अजून विरळ झाली की, अग्नी तयार होतो. जीवन तयार व्हायचे असेल तर हवा, पाणी आणि अग्नी हे सर्व आवश्यक आहेत, असे अनाक्सिमिनीसचे म्हणणे होते. पण या सगळ्याचा उगम मात्र हवेपासूनच झाला आहे, असे त्याचे म्हणणे होते.

असे हे नॅचरल फिलॉसॉफर्स. हे विश्व कुठल्यातरी एका पदार्थामुळे बनले आहे असे त्यांना वाटत होते.

आता सगळे लक्षात घेतल्यावर आपण तीन महत्त्वाचे ग्रीक शब्द बघू. जगाचा उगम ज्यात आहे, त्या मूल पदार्थाला हे नॅचरल फिलॉसॉफर ‘फायसिस’ (Physis) म्हणत. अनाक्सिमांडर आपल्या अपरिमिताला ग्रीकमध्ये ‘आपिअरॉन’ (Apeiron) म्हणत होता. आणि आपल्या हवा या तत्त्वाला अनाक्सिमिनीस ‘आएर’ (Aer) म्हणत होता. जाता जाता हे शब्द लक्षात ठेवायला हरकत नाही.

जग कुठल्या तरी एका गोष्टीने बनले आहे, हे ठीक आहे, पण मग ती गोष्ट या विश्वातील अनेक पदार्थांची रूपे कशी घेते? मूळ गोष्टीमध्ये मध्ये बदल कसे होतात? याला म्हटले गेले ‘द प्रॉब्लेम ऑफ चेंज’!”

या बदलाच्या प्रश्नाची चर्चा आपण पुढच्या भागात करू. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मितालीने बाहेर बघितले. लाईट गेले होते. आकाश तारकांनी भरून गेले होते. जे आकाश नॅचरल फिलॉसॉफर्सच्या अंगांवरून सरकत गेले होते, तेच तिच्याही शरीरावरून सरकत होते. मधला अडीच हजार वर्षांचा काळ पुसला गेला होता. मानवाच्या विचारांच्या प्रवासातली ती एक यात्रिक झाली होती. संपूर्ण मानवाच्या एकत्रित वैचारिक संकृतीची ती आज नागरिक झाली होती. ती आज संपूर्ण विश्वाची नागरिक झाली होती. हा प्रवास आपल्याला पुढे कुठे घेऊन जाणार आहे, याचा अंदाज तिला खूप विचार करूनही येईना! एक मोठे वैचारिक आणि भावनिक साहस सुरू झाले आहे, याचा आनंद तिच्या मनात तारकांच्या प्रकाशासारखा पडला होता.

..................................................................................................................................................................

लेखांक : पहिला

फिलॉसॉफीमध्ये सखोल ‘इन्साइट’ तर आहेतच, पण जीवनातून अर्थ काढण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आहे! ती आपल्याला जीवनाच्या जवळ नेते!!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......