फिलॉसॉफीमध्ये सखोल ‘इन्साइट’ तर आहेतच, पण जीवनातून अर्थ काढण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आहे! ती आपल्याला जीवनाच्या जवळ नेते!!
सदर - फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
श्रीनिवास जोशी
  • ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो आणि एक प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 17 January 2022
  • सदर फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी श्रीनिवास जोशी प्लेटो Plato फिलॉसॉफी Philosophy तत्त्वज्ञान तत्त्वज्ञ Philosopher

कुणी गंभीरपणे बोललं की, आपण लगेच त्याला म्हणतो, ‘ये बाबा, फार फिलॉसॉफी झाडू नको!’ आणि मोठ्यानं हसतो तरी किंवा वैतागतो तरी! पण तेव्हा ती व्यक्ती खरंच फिलॉसॉफी झाडत असते? फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान, म्हणजे काय? तर जगण्याचे नीतीनियम. नीतीपूर्ण जगण्यात स्वातंत्र्याचं, प्रेमाचं, न्यायाचं महत्त्व असतं. फिलॉसॉफी त्यातल्या सीमारेषा स्पष्टपणे अधोरेखित करते; स्वातंत्र्य, प्रेम, न्याय म्हणजे काय? विवेक कशाला म्हणायचं? सदसदविवेकबुद्धी म्हणजे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं फिलॉसॉफी देते. कुठल्याही नीतीपूर्ण जगण्याचा फिलॉसॉफी हा अविभाज्य असतो! अशा विविध प्रश्नांची आणि त्यांची मांडणी करणाऱ्या जगभरच्या तत्त्वज्ञांची गप्पा मारत मारत चर्चा करणारं हे नवं पाक्षिक सदर आजपासून... 

..................................................................................................................................................................

मिताली तिच्या नेहमीच्या कॅफेवर आली, तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते. हा तिचा आवडता कॅफे होता. त्याला काही कारणं होती. एक म्हणजे कॅफे ओपन होता. दुसरं, त्याच्या अवतीभवती सुंदर झाडी होती. तिसरं, तिथं खूप वेळ बसता यायचं. याशिवाय ‘कामाशिवाय बसू नये’ अशा स्वरूपाच्या आचरट आणि असभ्य पाट्या तिथं नव्हत्या. आणि चौथं व सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तिथं ‘फिलॉसॉफर’ यायचा!

पन्नाशीचा हा माणूस रोज तिथं दुपारी साडेतीन वाजता येत असे आणि सहा वाजता जात असे. तो कुणाशी फारसं बोलत नसे. एक लॅपटॉप आणि दोन-चार पुस्तकं त्याच्याबरोबर असत. पुस्तकात वाचता वाचता लॅपटॉपवर काहीतरी लिहीत असे. गेली अनेक वर्षं ती त्याला पाहत होती.

आपण खूप वाचावं अशी तिची लहानपणापासून इच्छा होती, पण आता वयाची चाळीशी उलटली तरी तिला गंभीर वाचन जमलं नव्हतं. तिचा कॉलेजातला एक मित्र होता- कार्तिक. तो सतत वाचत असे. होता मराठी मीडियमचाच, पण त्याने कष्ट करून इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं होतं. ‘तू तीन महिने कष्ट कर, मोठी मोठी इंग्रजी पुस्तकं वाच आणि मग इंग्रजी तुझी होईल’, असं तो तिला नेहमी सांगत असे. पण ते काही तिला जमलं नव्हतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

सॉक्रेटिस, प्लेटो, शॉपेनहॉवर, सार्त्र आणि रसेल अशा लेखकांची पुस्तकं त्या ‘फिलॉसॉफर’च्या टेबलावर असायची. म्हणून तिनं त्याचं नाव ‘फिलॉसॉफर’ ठेवलं होतं.

तिनं तिची नेहमीची कॉफी सांगितली. ‘फिलॉसॉफर’ त्याच्या कामात होता. रोहिणी अजून आलेली नव्हती.

मितालीच्या आणि रोहिणीच्या खूप चर्चा चालायच्या. अजूनही चालतात. दोघींचे नवरे. दोघींची आयुष्यं. त्या आवाज कंट्रोल करत बोलायच्या, पण मितालीला सतत वाटत असे की, आपण फार मोठ्या आवाजात बोलत आहोत. तिला वाटे, इतर लोकांना सहज ऐकू येत असणार आपलं बोलणं. काय वाटत असेल त्यांना? काही लोक करमणूक करून घेत असतील, काही वैतागत असतील, काही आपल्याला वेडं समजत असतील. पण, तिला काही केल्या चर्चांचा मोह आवरायचा नाही. आणि चर्चा रंगात आली की, तिचा आवाज वाढायचा. रोहिणीसुद्धा आचरटच. तिलाही मोठमोठ्यानं चर्चा केल्याशिवाय राहावायचं नाही.

फिलॉसॉफर आपलं बोलणं मन लावून ऐकतो आहे, असं कधी कधी तिला वाटायचं. पण त्याच्या चेहऱ्यावरून तसं काही दिसायचं नाही. सॉक्रेटिस वाचणारा कुणाच्या वैयक्तिक गप्पा कशाला ऐकेल? त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वात एक सुंदर शांतता आणि सहनशीलता आहे, असं तिला वाटायचं. त्यानं कधीही त्या दोघींना हळू आवाजात बोला वगैरे सांगितलं नव्हतं.

इतक्यात रोहिणीचा मेसेज आला, तिला आज यायला जमणार नव्हतं. मिताली खट्टू झाली. निराशेची एक छटा तिच्या मनात उमटली. थोड्या वेळानं तिला स्वतःचाच राग आला. किती अवलंबून आहोत आपण इतर माणसांवर!

तिनं ‘फिलॉसॉफर’कडे पाहिलं, त्याचं वाचन सुरूच होतं. तिला वाटलं की, आपण त्याच्याशी बोलावं. इतके दिवस आपण त्याला पाहतो आहोत. आज संधी आहे तर बोलावं.

ती उठली आणि त्याच्या समोर जाऊन बसली. त्यानं तिच्याकडं पाहिलं आणि आपलं वाचन सुरू ठेवलं. पण, त्याला तिचं तिथं येणं आवडलेलं नाहिये असा काही भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसला नाही. तिनं हसून विचारलं की – ‘मी तुम्हाला थोडं डिस्टर्ब केलं तर चालेल का?’

तो शांतपणे म्हणाला – ‘नाही’.

ती एकदम हिरमुसली. ‘ठीक आहे’, असं म्हणून उठू लागली. त्यावर तो म्हणाला की – ‘का निघालात?’

ती म्हणाली – ‘तुम्हाला डिस्टर्ब केलेलं चालणार नाहिये म्हणून’.

त्यावर तो हसून म्हणाला – ‘तुम्ही मला आत्ता डिस्टर्ब केलेलं नाहिये. तुम्ही बसू शकता’.

तिला काही कळेना. तिचा विचार ओळखून तो म्हणाला की, ‘तुम्ही मला  ‘मी तुम्हाला डिस्टर्ब केलं तर चालेल का?’ असं विचारलंत. माझ्या येण्यामुळं तुम्ही आत्ता डिस्टर्ब झाला आहात काय, असं नाही विचारलंत’.

ती त्याच्याकडं बघतच राहिली. तो पुढं म्हणाला की, ‘तुम्ही मला डिस्टर्ब केलेलं कधीही मला चालणार नाहीये. पण, या क्षणी तुम्ही इथं येऊन मला अजिबात डिस्टर्ब केलेलं नाहिये. तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का?’

‘हो. म्हणजे तसं मी सहजच आले आहे तुमच्याशी बोलायला... तुम्ही इथं बसून सारखे वाचत असता, लिहीत असता. तुमच्याबरोबर तुमचे मित्र कधीच नसतात. मला खूप दिवसांपासून कुतूहल वाटत होतं तुमच्याबद्दल. म्हटलं एकदा ओळख करून घ्यावी. काय करता आपण?’

‘मी फारसं काही करत नाही. वाचतो आणि लिहितो फक्त’.

‘हं. म्हणजे लेखक आहात?’

‘नाही, मी माझ्यापुरतं लिहितो. छापत नाही.’

‘काय लिहिता?’

‘फार काही नाही. वाचलेल्या पुस्तकांवर टिपा काढतो. त्यांचं विश्लेषण करतो. एखादं पुस्तक फारच आवडलं, तर त्याचं भाषांतर करतो’.

‘भाषांतर?’

‘हो’.

‘तुम्हाला इंग्रजी येतं आणि तुम्हाला छापायचंसुद्धा नसतं. मग भाषांतर का करता?’

‘भाषांतरामुळं पुस्तकाच्या खूप जवळ जाता येतं आपल्याला. खूप वेळ राहता येतं त्या पुस्तकाबरोबर’.

तिनं विचार केला की, आपण आपल्याला आवडणाऱ्या मित्रांना आणि मैत्रिणींना घरी राहायला बोलावतो तसं हा आपल्याला आवडलेल्या पुस्तकांना आपल्या बरोबर राहायला बोलवतो. 

ती विचारात पडलेली बघून तो परत त्याच्या कामाला लागला. तिनं थोड्या वेळानं विचारलं, ‘तुम्ही बहुतेक वेळा फिलॉसॉफीची पुस्तकं वाचत असता’.

तो निर्विकारपणे – ‘हो’.

‘मला फार दूरचा वाटतो तो विषय’.

‘असं कसं म्हणता? तुम्ही आणि तुमची मैत्रीण फिलॉसॉफी तर बोलत असता’.

तिला एकदम हसू आलं. म्हणजे हा ऐकत असतो सगळं!

‘अहो ती कसली फिलॉसॉफी? साधी बडबड ती. आमच्या आमच्या किरट्या आयुष्यावरची बडबड!’

‘फिलॉसॉफी म्हणजेसुद्धा आयुष्यावरची बडबडच असते. मानवाच्या आयुष्यावरची. प्लेटो म्हणालेलाच आहे - ‘अनएक्झामिन्ड लाइफ इज नॉट वर्थ लिव्हिंग.’ आपण आपल्या आवडीनिवडी, आपली जीवनमूल्यं, आपली मतं तपासून घेतली नाहीत, तर आपल्या आयुष्यात अर्थ काय राहिला? आणि, चर्चा हे एकच माध्यम असते आपल्यापाशी आपलं आयुष्य तपासून घेण्यासाठी! आयुष्यात चर्चा नसतील तर काय मजा आहे?

‘मला फिलॉसॉफी वाचायची आहे. खूप वर्षांपासूनचं स्वप्न आहे माझं. पण, जमत नाही. मी काय वाचू सांगाल तुम्ही एकदा?’

‘एकदा?’ तो मिष्किलपणे म्हणाला.

ती हिरमुसली. ‘एकदा म्हणजे एकदा कधीतरी!’

‘म्हणजे कधीच नाही’.

मिताली विचारात पडली. तो म्हणत होता ते खरं होतं. ती एकदम म्हणाली, ‘ठीक आहे, तुम्ही आत्ता सांगा मला काही पुस्तकं. मी लगेच जाऊन आणेन’.

‘फिलॉसॉफीची पुस्तकं वाचण्याआधी या विषयाबद्दल दृष्टी तयार झाली असेल, तर वाचन सार्थकी लागतं’.

‘मग तुम्ही सांगा मी काय करू?’

‘सांगेन, पण माझी एक अट आहे. तुम्ही माझ्याशी अजिबात बोलायचं नाही. मी जे काही सांगायचं ते मेल करून सांगेन. किंवा व्हॉट्सअ‍ॅप वर सांगेन. तुम्ही तुमचे प्रश्न लेखी स्वरूपात विचारायचे’.

‘ठीक आहे’.

तो पुन्हा वाचू लागला. ती म्हणाली, ‘तुम्ही कॉफी घ्याल का?’

‘आपलं आता ठरलं आहे की, बोलायचं नाही’.

‘तुमचा फोन नंबर द्या’.

तिनं दिला. तो पुन्हा वाचायला लागला.

ती उठून तिच्या टेबलावर येऊन बसली. काय विक्षिप्त माणूस आहे! मदत करणार, पण बोलणार नाही म्हणजे काय?

तिनं मोबाईल बघितला तर एक मेसेज आला होता. त्यात एक प्रश्न होता- ‘मिताली’ या शब्दाचा अर्थ काय?

‘मिताली म्हणजे मित्रांचा अनुनय करणारी. मित्रांना प्रिय असलेली’.

पुढचा मेसेज आला- ‘या पलीकडे या नावाला अजून काही अर्थ आहे का?’

तिनं मेसेज केला – ‘असला तर मला माहीत नाही’.

‘ ‘मित’ या मूळ शब्द रूपाचा अर्थ आहे, नपा-तुला. मोजूनमापून करणारा, बोलणारा, स्ट्रक्चर्ड!’

तिला हा अर्थच माहीत नव्हता.

‘फिलॉसॉफरचं मुख्य काम काय असतं?’ त्याचा पुढचा प्रश्न.

‘काय?’

‘आपल्याला किती कमी माहिती आहे, हे लोकांच्या लक्षात आणून देणं. हे सॉक्रेटिसचं वाक्य आहे.’

ती मोठ्यांदा हसली. आजुबाजूचे लोक तिच्याकडे बघू लागले. तिला लाजल्यासारखं झालं. तिनं कॉफी सांगितली. तिनं मेसेज केला – ‘आपण माझ्याकडून कॉफी स्वीकारली नाही’.

‘सॉक्रेटिस शिकवण्याचा कसलाच मोबदला घेत नसे’.

इतक्यात दोन-चार वारकरी आले. कॅफेतले वेटर त्यांना हाकलू लागले. फिलॉसॉफरने त्या वारकऱ्यांना बोलावलं, त्यांना पन्नास रुपये दिले. खाली वाकून नमस्कार केला. त्या वारकऱ्यांनीही त्याला खाली वाकून नमस्कार केला. नंतर त्यांनी गळाभेट घेतली.

वारकरी गेल्यावर त्याचा मेसेज आला – ‘वारी म्हणजे काय?’

मितालीने थोडा विचार केला आणि लिहिलं – ‘म्हणजे विठ्ठलाला भेटायला पायी पायी जाणं’.

‘मला वाटतं की, विठ्ठल म्हणजे अंतिम ज्ञान. विठ्ठल म्हणजे अंतिम प्रेम. वारी म्हणजे प्रेममय ज्ञानाच्या प्रेमात पडून रमतगमत ज्ञानाकडे प्रवास करत जाणं’.

विठ्ठल म्हणजे प्रेम आणि ज्ञानाचं अद्वैत. मितालीला हा अर्थ आत कुठेतरी सब-कॉन्शसली जाणवला होता. आज फिलॉसॉफरने त्या अर्थाची तिच्या सब-कॉन्शसमधून बाहेर काढून कॉन्शस मनात प्रतिष्ठापना केली.

आपणही त्या वारकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांचा सन्मान करायला हवा होता, असं तिला वाटलं. या माणसाशी आपण चर्चा करत राहिलो, तर आपण एक व्यक्ती म्हणून खूप विस्तारत जाऊ, असं तिला वाटलं. नुसताच विस्तार नाही, तर स्ट्रक्चर्ड विस्तार! आपण खरी मिताली होऊ, असं तिला वाटलं.

तिचा हा विचार सुरू असताना त्याचा अजून एक मेसेज आला- ‘हा आजचा शेवटचा मेसेज. आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक प्रश्न पडलेले असतात. ते प्रश्न कितीही महत्त्वाचे असले तरी त्यांची उत्तरे आपल्याला माहीत नसतात. तुम्हाला पडलेल्या अशा प्रश्नांची एक यादी करा. अट एकच - श्रद्धेनं मिळालेली उत्तरं ग्राह्य धरायची नाहीत. लॉजिकच्या कसोटीवर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासून पाहायची. बाय!’

‘तुमचं नाव काय?’

‘नावात काही नसतं’.

मिताली घरी गेली. रात्री थोडी उसंत मिळाल्यावर ती प्रश्न लिहायला बसली- १) हे जग कोठून आलं?, २) या जगात देव आहे का?, ३) मृत्यू म्हणजे काय?, ४) माझ्या आयुष्याचं ध्येय काय?, ५) माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो का?, ६) समाज इतका नादान का आहे?, ७) लोक भ्रष्टाचार का करतात?, ८) माझा नवरा हिंदुत्ववादी आहे, हे बरोबर आहे का?, ९) माझ्या संसारात माझा कोंडमारा होतो आहे, असं मला वाटतं आहे, ते बरोबर आहे का?, १०) मी मुलांना त्यांच्या चांगल्यासाठी मारते, ते बरोबर आहे का?, ११) राजकारणी लोक चांगले का नाही वागत?, १२) आपल्याला गरिबांची पाहिजे तेवढी कणव का नाही वाटत?, १३) आपण आपल्याकडची जास्तीची संपत्ती गरिबांना का नाही देऊन टाकत?, १४) भिकाऱ्यांना पैसे द्यावेत की नाही? 

या सगळ्या प्रश्नांनी तिला घेरून टाकलं. कुठल्याचंही समाधानकारक उत्तर तिला मिळेना. या सगळ्या गहन विचारातच तिला झोप लागली.

सकाळी उठली, तेव्हा विचारांची तीच मालिका तिच्या मनात सुरू झाली. तिला जाणवलं, यातल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, तर आपल्या मनातली खूपशी अस्वस्थता कमी होईल. शांततेकडे प्रवास सुरू होईल. ज्ञानाबरोबर प्रेम येतं, तशीच शांततासुद्धा येते. विठ्ठल म्हणजे ज्ञान, विठ्ठल म्हणजे प्रेम, त्याचप्रमाणे विठ्ठल म्हणजे शांततासुद्धा!

या विचाराबरोबर तिला ‘एम्पॉवर’ झाल्यासारखं वाटलं. पैसा आल्यावर आपल्याला छान वाटतंच, पण ज्ञान प्राप्त होण्याच्या शक्यतेमुळे येणारा सेल्फ-अश्युरन्स काही वेगळाच असतो.

तिला कार्तिक आठवला. त्याचा सेल्फ-अश्युरन्स आठवला. कार्तिकशीच लग्न करायला हवं होतं. तो आवडत होता, पण नुसतं वाचन करून आयुष्य कसं निभणार असं तेव्हा वाटलं होतं. तसं बघायला गेलं तर कार्तिकचं तसं बरं चाललं होतं. वाचनाच्या नादामुळे त्याचं म्हणावं इतकं आर्थिक नुकसान झालं नव्हतं.

ती संध्याकाळी चार वाजता कॅफेमध्ये आली, तेव्हा कालचे १४ प्रश्न तिच्या मोबाईलच्या मेमो पॅडवर पडले होते. तिला ते प्रश्न फिलॉसॉफरला पाठवावेसे वाटले, पण थोडा संकोचही वाटला. तिने मेसेज पाठवला – ‘मला १४च प्रश्न लिहून काढता आले. मला अजून खूप प्रश्न पडले आहेत, पण सगळे एकदम सुचत नाहियेत. मी काल काढलेले प्रश्न तुम्हाला पाठवू का?’

‘प्रश्न पाठवू का, असं विचारत आहात याचा अर्थ तुम्हाला प्रश्न पाठवायला संकोच वाटतो आहे. काही हरकत नाही. त्या प्रश्नातले विश्व आणि निसर्गाच्या संदर्भातले प्रश्न बाजूला काढा. तुमच्या लक्षात येईल की, बाकीचे सगळे प्रश्न भावनिक आहेत’.

तिने प्रश्न पाहिले. पहिले तीन प्रश्न सोडले तर बाकी सगळे भावनांशी निगडित होते.

तिनं मेसेज पाठवला – ‘एक ते तीन विश्वाच्या संदर्भातले आहेत. बाकी भावनिक आहेत. अमेझिंग!’

त्याचा मेसेज आला – ‘अजून थोडं बारकाईनं पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की, भावनांच्या प्रश्नांच्या खाली न्याय-अन्यायाचा प्रश्न आहे. भावनांच्या संदर्भातले प्रश्न डिस्टिल केले, तर खाली न्याय-अन्यायाचे भांडण हाती लागते’.

तिनं परत एकदा प्रश्नांकडे पाहिलं. माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो आहे का, या प्रश्नाच्या मागे न्याय-अन्यायाचं काय आहे? थोडा वेळ विचार केल्यावर तिच्या लक्षात आलं की, एका स्त्रीवर एका पुरुषानं प्रेम करणं यात एक मुक्तता आहे. पण तीच स्त्री आपल्या नवऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करू लागली की, त्यात न्याय-अन्यायाचा विचार डोकावू लागतो. मुक्तता जाते, हक्क येतो. कार्तिकने तिच्यावर प्रेम केलंच पाहिजे, असा तिचा हट्ट असू शकत नव्हता. तिला कार्तिकचं प्रेम हवं वाटत असलं तरी! पण तिच्या नवऱ्यानं मात्र तिच्यावर प्रेम करायलाच पाहिजे, अशी तिची अपेक्षा होती. कारण ते ‘न्याय्य’ होतं. या विचारामुळे तिला हसू आलं. ती कार्तिकला स्वातंत्र्य देत होती आणि नवऱ्याला देत नव्हती. तो नवरा आहे म्हणून त्याला फक्त तिच्यावरच प्रेम वाटतंच राहिलं पाहिजे, ही अपेक्षा कितपत न्याय्य होती? विशेषतः, तिला स्वतःला कार्तिक आवडत असताना!

बाकी सगळे प्रश्न तर उघड उघड न्याय-अन्यायाच्या संदर्भातलेच होते.

न्याय-अन्यायाचा प्रश्न मानवी समाजात मध्यवर्ती प्रश्न आहे, हे तिला माहीत होतं; पण मानवी भावनांच्या जगातही न्याय-अन्यायाचा प्रश्न इतका मध्यवर्ती असेल, असं तिला कधीच वाटलं नव्हतं. हे लक्षात आणून दिल्याबद्दल तिला फिलॉसॉफरचं फार कौतुक वाटलं.

तिने त्याला कौतुकानं मेसेज पाठवला – ‘तुम्ही ग्रेट आहात! सगळ्या भावनिक प्रश्नांखालून न्याय-अन्यायाचा विचार वाहतो आहे’.

त्याचा मेसेज आला – ‘मी ग्रेट नाही. फिलॉसॉफी ग्रेट आहे’.

तिला ते पटलं! आज फिलॉसॉफीने तिला एक महत्त्वाची इन्साइट दिली होती. नवऱ्याचं प्रेम हा न्याय-अन्यायाचा प्रश्न आहे, असं तिला आज फिलॉसॉफीनं शिकवलं होतं. इतके दिवस तिला तो जीवन-मरणाचा प्रश्न वाटत होता. विचारांच्या साखळदंडांपासून फिलॉसॉफीनं तिची सुटका करायला सुरुवात केली होती.

इतक्यात रोहिणी आली, तिची बडबड सुरू झाली. मिताली तिच्या विचारात मग्न होती. तिला रोहिणीची कटकट वाटू लागली. तिला वाटलं, आपण रोहिणीला सांगावं- आजपासून आपण बोलायचं नाही. जे काही संभाषण करायचं ते ईमेल किंवा मेसेजवर! मितालीला त्या क्षणी फिलॉसॉफरने बोलायला का बंदी घातली आहे, ते उमगलं. वाटला होता तेवढा विक्षिप्त नाहिये हा माणूस! तिला हसू आलं. तिला रोहिणीला गप्प करायचं होतं, पण हिंमत झाली नाही. मितालीला आपल्याशी बोलायचं नाहिये, हे रोहिणीच्या लक्षातच आलं नाही. मिताली अस्वस्थ झाली.

त्याचा मेसेज आला – ‘तुम्ही शांतपणे मैत्रिणीशी गप्पा मारा. फिलॉसॉफी आपण जेव्हा बोलवू, तेव्हा आपल्यापाशी बोलायला येते. मित्र-मैत्रिणींना प्रायॉरिटी द्यावी लागते. शेवटी आपण आपल्या मैत्रिणीशी न्यायानं वागलं पाहिजे’.

तिने मेसेज केला – ‘तिच्याशी न्यायानं वागणं माझ्यासाठी अन्यायाचं ठरतं आहे’.

त्याचा मेसेज आला – ‘न्यायाची संकल्पना अतिशय गुंतागुंतीची आहे. आपण सॉक्रेटिस आणि प्लेटो यांचा विचार करू, तेव्हा आपण ते बघणारच आहोत. पण त्या आधी आपल्याला ग्रीक तत्त्वज्ञानाची पहिल्यापासून ओळख करून घ्यावी लागेल. सॉक्रेटिसच्या आधी जे फिलॉसॉफर होते, त्यांना ‘नॅचरल फिलॉसॉफर’ (निसर्गाचे तत्त्वज्ञ) म्हणतात. त्यांची आपण ओळख करून घ्यायला पाहिजे.’

‘हे सगळे सुरू करण्याआधी मला दोन प्रश्नांची उत्तरं हवी आहेत- १) श्रद्धेनं दिलेली उत्तरं आपण का ग्राह्य धरायची नाहीत? आणि, २) प्रेम म्हणजे काय?’

‘श्रद्धेनं दिलेली उत्तरं मानवी आयुष्यात महत्त्वाची असतात. तरीही तत्त्वज्ञानाला स्वतःला श्रद्धेपासून दूर ठेवावं लागतं. यावर आपण नक्की विचार करू. त्यासाठीच आपण नॅचरल फिलॉसॉफर्सची ओळख करून घेणार आहोत. त्यामुळे श्रद्धेविषयीचा प्रश्न आपण तोपर्यंत बाजूला ठेवू.

प्रेम म्हणजे काय? माणसाला प्रेमाची तहान लागलेली असते. जीवनभर ही तहान शांत होत नाही. प्लेटोने त्याच्या ‘सिम्पोजियम’ या संवादात प्रेमाविषयी चर्चा केली आहे, तीसुद्धा आपण बघणार आहोत. तुम्हाला हा प्रश्न पहिल्यांदा हाताळावासा वाटतोय, याचा अर्थ या जगातील बहुतेक व्यक्तींप्रमाणेच तुम्हाला हा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा वाटतो आहे. तत्त्वज्ञानावरील सविस्तर चर्चेला सुरुवात करताना आपण प्लेटोचं प्रेमाविषयीचे एक वाक्य पाहू- Love is simply the name for the desire and pursuit of the whole. (प्रेम हे एका मानवी इच्छेचं नाव आहे, ती एक आकांक्षा आहे आणि प्रेम हा पूर्णत्वाचा एक शोध आहे.)’

मिताली प्लेटोनं दिलेल्या या व्याख्येत आकंठ बुडून गेली. प्रेम म्हणजे पूर्णत्वाची आकांक्षा आहे. प्रेम म्हणजे पूर्णत्वाची इच्छा! या व्याख्येनं तिच्या मनात एक सुंदर वादळ उठलं होतं. प्रेमाचा हा अर्थ तिला माहीतच नव्हता. प्रेम हा विषय एका वेगळ्याच प्रकाशात तिला दिसू लागला.

रोहिणी बोलत होती, पण मितालीचं तिच्याकडे फारसं लक्ष नव्हतं. थोड्या वेळानं ती अचानक उठली आणि रोहिणीला बाय म्हणून निघून गेली. घरी गेल्यावर तिने फिलॉसॉफरला आभाराचा मेसेज टाकला.

रात्री खूप वेळ ती विचार करत राहिली. खरंच, तिला फार लहानपणापासून अपूर्णत्वाच्या फीलिंगनं व्यापून टाकलं होतं. आपल्यामध्ये एक रिकामा खड्डा आहे, असं तिला वाटत होतं. आईने जवळ घेतलं की, तो खड्डा भरला जायचा तात्पुरता. पुढे ती प्रेमात पडली, तेव्हा तो खड्डा भरला जावा, अशी तिची कळत-नकळत अपेक्षा होती. शरीराचे मुक्त अनुभव घेतल्यावर काही काळ तो खड्डा भरला जातोय, असं तिला वाटलं होतं. आताशा तिला तसं वाटेनासं झालं होतं. त्यामुळेच रोहनचं तिच्यावर प्रेम आहे की नाही, असं तिला वाटत राहिलं. रोहन तोच होता, पण तिचाच प्रतिसाद बदलला होता. तो खड्डा परत आला होता. मुलांच्या जन्मानंतर तिला असाच पूर्णत्वाचा फील आला होता. आताशा तोसुद्धा हरवून गेला होता. त्या पूर्णत्वाची जागा मुलांच्या करिअरच्या काळजीनं घेतली होती. तिच्या आजूबाजूच्या लोकांचंही असंच होतं. पैसा, प्रसिद्धी, शरीर, अनेक सुखं, अशा अनेक गोष्टींच्या प्रेमात आसपासचा प्रत्येक जण होता. सगळे जण आपल्यातलं अपूर्णत्व भरून काढण्याच्या उद्योगात होते. कार्तिकची आठवण आजकाल फार गहिरी होत चालली होती. त्याला फोन करावा असं तिला वाटलं. कार्तिकमुळे तो खड्डा नक्की भरून निघणार होता. तिचा हात फोनपाशी गेलाही, पण तिने तो मागे घेतला. खड्डा भरून निघणार होता हे खरं, पण काही दिवसांनी तो पुन्हा परत येणार होता.

ती शांत पडून राहिली. प्लेटोने तिला तिच्या आत्म्यापासून हलवलं होतं. फिलॉसॉफी एवढी ‘डेडली’ असेल असं तिला वाटलं नव्हतं.

तिच्या मनात विचार आला - आपण घेतो आहोत तोच प्लेटोच्या वाक्याचा अर्थ आहे का? का आपण अर्थाचा अनर्थ करत आहोत?

तिने तसा मेसेज फिलॉसॉफरला टाकला. इतक्या रात्री मेसेज करताना तिला ऑकवर्ड वाटत होतं, पण तिच्या मनात वादळच इतकं मोठं उठलं होतं...

थोड्या वेळानं त्याचा मेसेज आला – ‘तुम्ही प्लेटो वाचता, तेव्हा प्लेटो महत्त्वाचा नसतो. तुम्ही स्वतः महत्त्वाचे असता’.

मितालीला खूप हायसं वाटलं.

फिलॉसॉफीमध्ये सखोल ‘इन्साइट’ तर आहेतच, पण जीवनातून अर्थ काढण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

प्रेम, ज्ञान, शांतता आणि स्वातंत्र्य! यात एक काहीतरी कमी आहे, असं तिला वाटत राहिलं. काय असावं? ती विचार करत राहिली. किती सुंदर आहे प्लेटोची ही इन्साइट! एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद असलेली! अचानक ती सुंदर या शब्दापाशी थांबली! सौंदर्य! मानवी बुद्धीचं, भावनांचं आणि विचारांचं सौंदर्य!

जे काही कमी होतं, ते तिला सापडलं होतं. प्रेम, ज्ञान, शांतता, स्वातंत्र्य आणि सौंदर्य!

खड्डा अशा ज्ञानमय आयुष्यानं भरून निघणार होता का?

तिने विचार केला- भरून निघेल नाहीतर नाही निघणार, खड्डा आहे हे आपल्याला कळलं हे किती सुंदर आहे!

मिताली फिलॉसॉफीच्या प्रेमात पडली. तिला शांत झोप लागली. आयुष्यात पहिल्यांदाच ती मानवी जीवनाच्या इतक्या जवळ आली होती आणि मुख्य म्हणजे स्वतःच्याही पहिल्यांदाच इतक्या जवळ आली होती!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......