अजून किती दिवस आपण महात्मा गांधींची बदनामी खपवून घेत राहणार?
पडघम - देशकारण
अरुण खोरे
  • महात्मा गांधी
  • Sat , 29 January 2022
  • पडघम देशकारण महात्मा गांधी Mahatma Gandhi नथुराम गोडसे Nathuram Godse

उद्या, ३० जानेवारी २०२२. महात्मा गांधींचा ७४वा  स्मृतिदिन. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…

.................................................................................................................................................................

लोकमान्य टिळकांनी १९१८ मध्ये लिहिले होते- “गांधी यांच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा इतर मतांपैकी काही मते किती एकांस कदाचित पसंत होणार नाहीत. विद्वत्तेने त्यांना मागे टाकणारे दुसरे पुष्कळ गृहस्थ असतील, पण शीलचारित्र्याची जी महती वर सांगितली, त्या दृष्टीने विचार केला असता महात्मा गांधी यांचे चरित्र खरोखरच सामान्य मनुष्यास आदर्शभूत होण्यासारखे आहे, याबद्दल काही मतभेद असेल तेव्हा होईल असे आम्हास वाटत नाही.”

आचार्य विनोबा भावे यांनी लिहिले आहे – “ज्यांना स्वतःसंबंधी आपण मुक्त पुरुष, पूर्ण पुरुष असल्याचा भास होतो, असे पुष्कळ महापुरुष मी पाहिले आहेत. अशा कोणत्याही महापुरुषाचे मला आकर्षण वाटले नाही. पण स्वतःला सदैव अपूर्ण मानणाऱ्या बापूंचेच मला विलक्षण आकर्षण वाटले. ते नेहमी म्हणायचे की, मी अजून पूर्ण सत्यापासून फार दूर आहे. माझ्यावर बापूंचा जेवढा प्रभाव पडला, तेवढा पूर्णतेचा दावा करणाऱ्या इतर कोणा सज्जनांचा पडलेला नाही.”

विख्यात शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे पुढील विधान सुप्रसिद्ध आहे – “हाडामासाचा असा एक माणूस पृथ्वीतलावर होऊन गेला याच्यावर, भावी पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत!”

फ्रेंच विचारवंत आणि विख्यात लेखक रोमां रोलां हे गांधीजींचे निकटचे स्नेही होते. त्यांनी लिहिले होते- “हा तोच माणूस आहे की, ज्याने गेल्या दोन हजार वर्षांच्या मानवी इतिहासात पहिल्यांदाच राजकारणाच्या प्रक्रियेत माणसाला धीर, बळ देणाऱ्या आध्यात्मिक भूमिकेचा अवलंब केला. महान बुद्धानंतर शांतता अहिंसेचा मार्ग गांधींनी जगाला पुन्हा एकदा दाखवला.”

महात्मा गांधींची हत्या होऊन उद्या ३० जानेवारी २०२२ रोजी ७४ वर्षे पूर्ण होतील. भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष गेल्या १५ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. गांधींच्या बलिदान स्मृतीच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात होत असताना गेल्या शतकभरात त्यांच्याबद्दल जगातील असामान्य लोकांनी काय म्हटले आहे, याचे संदर्भ वर उदधृत केले आहेत.

गेले दोन महिने दोन घटनांनी आपल्या सर्वांना सुन्न करून सोडले आहे. पहिली म्हणजे २०२१च्या डिसेंबर महिन्यात हरिद्वार येथील तथाकथित धर्मसंसदेत स्वतःला कालीचरण महाराज म्हणवणाऱ्याने गांधींबद्दल वापरलेली शिवराळ भाषा आणि त्याच भाषणात नथुराम गोडसेचा केलेला गौरव.

दरम्यानच्या काळातच ‘आणखी एक नथुराम’ या चित्रपटाचा टिझर आपण पाहिला. नामवंत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘मैने गांधी को क्यू मारा?’ हा चित्रपट ओटीटीवर ३० जानेवारीला म्हणजे गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कालीचरण महाराजला अटक झाली आहे आणि कायदेशीर कारवाई त्याच्यावर होईल, अशी आपण अपेक्षा बाळगू यात. मांजरेकर यांच्या सिनेमाचे मात्र तसे नाही. कारण त्यांच्या पूर्वीच्या मेलोड्रॅमॅटिक आणि भडक चित्रपटातून हिंसेचे आणि हत्येचे समर्थन आपण यापूर्वी पाहिले आहे. गांधींवरचा त्यांचा सिनेमा याच भूमिकेशी सुसंगत असणार यात शंका नाही.

यात आणखी धक्कादायक बाब उघड झाली आणि ती म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका करणारे आणि आता लोकसभा सदस्य असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘व्हॉय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात केलेली नथुराम गोडसेची भूमिका. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉ. कोल्हे यांची पाठराखण करताना जे समर्थन केले, ते किती अयोग्य आणि चुकीचे होते, याबाबत अनेक जाणकार स्पष्टपणे बोलत आहेत. यातला वदतोव्याघात म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि डॉ. जितेंद्र आव्हाड या दोघांनी या चित्रपटाबाबत आणि डॉ. कोल्हे यांच्या भूमिकेबाबत स्पष्टपणे विरोधी मत मांडले आहे.

ज्या नथुरामने गांधींचा खून केला, त्याला ‘ग्लोरीफाय’ करण्याच्या प्रयत्नात या चित्रपटातील टीझरमध्ये जे विधान आपल्याला वाचायला मिळते, ते तर खूपच धक्कादायक आणि मनाला क्लेष देणारे आहे-

‘जन्मदिन की हार्दिक शुभकामनाये, बापू’

आपका

नथूराम गोडसे’

असे त्यात म्हटले आहे. म्हणजे ज्याचा आपण खून केला, त्यालाच हा मारेकरी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय, हे मुळातच किती हिंसक आणि क्रूर असे विधान आहे!

यापूर्वी २०२०मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘द मॅन हू किल्ड गांधी’ असा चित्रपट आपण करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या वेळी त्यांनी म्हटले होते की, गोडसेच्या परिप्रेक्ष्यातून मी हा चित्रपट करतो आहे.

विसावे शतक संपत असताना जगभरातून ‘सहस्त्रकातील महापुरुष’ किंवा ‘शतकातील महामानव’ अशी मांडणी विविध पातळ्यांवर होत असताना सगळीकडे गांधींच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यानंतर मात्र गांधींची प्रतिमा भंग करण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा एक मोठा कार्यक्रम प्रस्थापित, सनातनी आणि अभिजन वर्गातील काही धर्मांध व जात्यंध घटकांनी योजनाबद्ध रीतीने सुरू केला, त्याचेच पडसाद अशा विविध माध्यमांतून आपल्यासमोर उमटताना दिसत आहेत.

उत्तर भारतात आणि त्यातही उत्तर प्रदेशात गेल्या तीन-चार वर्षांत गोडसे-गौरवाला उधाण आले आहे. बरोबर तीन वर्षापूर्वी म्हणजे ३० जानेवारी २०१९ रोजी पूजा शकुन पांडे या हिंदू महासभेच्या पदाधिकारी महिलेने गांधींच्या प्रतिमेला गोळ्या मारल्या आणि त्या प्रतिमेतून खाली रक्त ओघळत येईल, असे काहीसे करून दाखवले. वृत्तवाहिन्यांवरून हा व्हिडिओ साऱ्या देशाने पाहिला. ही घटना अलिगडमधली. या पूजा शकुन पांडे यांना अटक केल्यानंतर त्या म्हणाल्या, “आम्हाला अजिबात अपराध केला असे वाटत नाही!”

मेरठमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी २०१६मध्ये नथुराम गोडसेचा अर्धपुतळा बसवला. ‘अमर हुतात्मा नथुराम गोडसे’ असे नाव त्यांनी त्या खाली दिले आहे. याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी २ ऑक्टोबर हा ‘धिक्कार दिवस’ जाहीर करा, अशी मागणी केली आहे. याच्या पुढे जाऊन गेल्या वर्षी त्यांनी गोडसेबरोबर ज्यास फाशी देण्यात आली, त्या नारायण आपटेचाही पुतळा बसवला, अशी बातमी नंतर आली.

भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर आणि भाजपचे एक आणखी एक खासदार साक्षी महाराज यांनी अनेकदा जाहीररीत्या नथुरामची भलावण करणारी वक्तव्ये केली आहेत. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारला तर शाळेच्या पाठ्यपुस्तकात गोडसेवरचा धडा असावा, अशा सूचना करण्यात आल्या होत्या.

मला एक तीव्र खंत येथे व्यक्त केली पाहिजे आणि ती म्हणजे या सगळ्या गोष्टी होत असताना, गांधींची शक्य तितकी विटंबना, बदनामी यांचे काहूर माजले असताना जे पक्ष गांधींचा वारसा सांगतात, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष आणि त्यांचे सगळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरचे नेते मूग गिळून गप्प का बसले आहेत? गांधींच्या बदनामीचे त्यांना काहीच का पडलेले नाही?

याचबरोबर केंद्र सरकार जरी गांधींच्या संदर्भात त्यांचे विचार आपण मानतो, असे वरकरणी मांडत असले तरी अलीकडच्या एक-दोन घटना इतक्या स्पष्ट आहेत की, सरकारला गांधींना राष्ट्रीय इतिहासाच्या पानावरून शिताफीने, कौशल्याने बाजूला कसे करता येईल, याची काळजी लागून राहिली आहे, असेच वाटते.

परवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सव्वाशेव्या जयंतीदिनी (रविवार, २३ जानेवारी २०२२) अमर जवान ज्योतीच्या जागी सुभाषबाबूंची होलोग्राम प्रतिमा स्थापित करण्याचा कार्यक्रम पंतप्रधानांच्या पुढाकाराने झाला. त्या वेळी त्यांच्या भाषणामध्ये गांधींचा उल्लेख काही आला नाही. वस्तुतः ज्या नेताजींनी गांधींना परदेशातील नभोवाणीवरून ‘राष्ट्रपिता’ म्हणून गौरवाने संबोधित केले, त्या गांधींचे, नेताजींचे आणि नेहरूंचे काय ऋणानुबंध होते आणि कोणते नाते होते, हे मुद्दाम दुर्लक्षिले जात आहे. गांधींची बदनामी करणारे ट्रोल कुठल्या पक्षाबरोबर, कुठल्या विचारधारेबरोबर आहेत, हे सर्वांनाच ज्ञात आहे. अशा वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष आणि त्यांचे सगळे मोठे नेते गप्प बसून राहतात, ही गोष्ट कोणत्याही तर्कात बसत नाही.

दुसऱ्या बाजूने मी विचार करतो तेव्हा लक्षात येते की, गांधींच्या नावाने ज्या अनेक विश्वस्त संस्था, संघटना आज भारताच्या विविध शहरांमध्ये, विविध राज्यांमध्ये आहेत, त्यांचे संस्थाचालक, प्रमुखदेखील गप्प बसलेले आहेत! गांधी स्मारक निधी, गांधी स्मृती दर्शन, बा-बापू नॅशनल मेमोरियल सोसायटी, हरिजन सेवक संघ, मणिभवन संग्रहालय, नवजीवन प्रकाशन, सेवाग्राम आणि साबरमती आश्रमातील विविध संस्थांचे विश्‍वस्त आणि पदाधिकारी या सर्वांना सरकारी धाक असावा असे वाटते. कारण यांच्याशी संबंधित असलेल्या कोणाही व्यक्तीने गांधींबाबत जी बदनामीची मोहीम सुरू आहे, त्याविषयी किंवा गांधींना जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याविषयी काहीही म्हटलेले नाही किंवा एकसंधपणे काही भूमिका मांडली आहे, असेही दिसत नाही.

या पार्श्वभूमीवर रवीश कुमार किंवा संजय आवटे यांच्यासारखे काही जाणते संपादक आणि रामचंद्र गुहा यांच्यासारखे इतिहास संशोधक, मनोजकुमार झा यांसारखे अभ्यासू संसद सदस्य,  जी भूमिका घेत आहेत, ती आपल्या सर्वांच्या डोळ्यात अंजन टाकणारी ठरते. ‘इंडियन एक्सप्रेस’ने २४ जानेवारी २०२२च्या अंकात रामचंद्र गुहा यांची एक विस्तृत मुलाखत प्रसिद्ध केली आहे. या मुलाखतीत सुभाषचंद्र बोस यांना आता भाजप सरकार आपल्या प्रतिमावर्धनासाठी त्यांच्या जयंतीचा उपयोग करत आहे, असे गुहा यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात की, भारतीय जनता पक्षाकडे किंवा संघपरिवाराकडे स्वातंत्र्य चळवळीमधला कोणताही नायक नाही. पंडित नेहरूंऐवजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वीकारणे अधिक सोपे, शिवाय भाजपसमोर जो पौरुषत्वाचा आदर्श आहे, त्याला नेताजींची प्रतिमा अधिक जवळची आहे. यात गुहांनी सांगितलेला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, नोकरी, बेकारी, गरिबी या देशातील मूलभूत प्रश्नापासून पळ काढण्यासाठी मोदी सरकारने हा प्रतीकांचा उत्सव सुरू केला आहे.

सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या इतिहासातील पाने पाहताना लक्षात येते की, आजाद हिंद सेनेच्या चार तुकड्या होत्या. त्यातली एक बोस तुकडी होती, दुसरी गांधी तुकडी, तिसरी नेहरू तुकडी आणि चौथी आझाद तुकडी. हिंदू-मुस्लीम एकता ही नेताजींची वैचारिक भूमिका विसरता येणार नाही.

आज गांधींना समाजमाध्यमातून असभ्य, असंस्कृत, अशिष्ट अशा भाषेतून आणि भूमिकेतून बदनाम करण्याचा प्रयत्न अतिशय भयंकर स्वरूपात सुरू आहे. त्यामुळे एक मोठे सामाजिक, सांस्कृतिक असे आव्हान समोर उभे राहणार आहे. याही परिस्थितीत महाराष्ट्रातील, देशातील आणि परदेशातील अनेक तरुण, अभ्यासक, कार्यकर्ते, तज्ज्ञ गांधींच्या विचारांचा मागोवा घेत काम करत आहेत आणि गांधींचे नव्याने जागरण करत आहेत, हेही विसरता येणार नाही. तथापि एकसंध स्वरूपात आणि व्यापक स्वरूपात गांधींविरुद्धच्या बदनामीच्या मोहीमेला वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय आघाडीवरही रोखण्यासाठी काम करावे लागणार आहे. माझे अनेक तरुण मित्र या दृष्टीने काम करत आहेत. पण जे पक्ष गांधी, नेहरू, पटेल आणि बोस यांचा वारसा सांगतात... ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे राजकीय पक्ष प्रभावी आणि संघटित स्वरूपात लढायला उभे का राहत नाहीत? गांधीजी आणि त्यांचे सत्य-अहिंसेचे विचार आपल्याला खरेच पुढे न्यायचे आहेत की, आपले पक्षीय, व्यक्तीगत राजकारण करत सामाजिक जीवन व्यतीत करायचे आहे?

आज तरी गांधींची बदनामी करणारा पंथ वाढतो आहे आणि त्यांना रोखण्याची इच्छाशक्ती, त्यांचा वारसा आम्ही चालवतो म्हणणाऱ्या राजकीय पक्षांकडे किती शिल्लक आहे, याची शंकाच आहे! या देशातील सर्वसामान्य माणसाला जागे करणाऱ्या, निर्भयपणे ब्रिटिशांसमोर उभे राहायला तयार करणाऱ्या गांधींना आपण विसरलो नाही, याची प्रचिती कशी येईल, कधी येईल?

..................................................................................................................................................................

लेखक अरुण खोरे हे ज्येष्ठ संपादक असून सध्या ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ या मासिकाचे संपादक आहेत.  

arunkhore@hotmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा