आर्गस/आर्गॉस पॅनॉप्टेस सीसीटीव्ही कॅमेरासारखं कोणतंही दृश्य कोणत्याही अँगलनं आणि केव्हाही बघू शकायचा
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • ग्रीक दंतकथेमधील आर्गस/आर्गॉस पॅनॉप्टेसचं एक काल्पनिक चित्र
  • Tue , 11 January 2022
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध आर्गस Argus आर्गॉस पॅनॉप्टेस Argus Panoptes

शब्दांचे वेध : पुष्प त्रेपन्नावे

‘अहर्निशं सेवामहे’ हे संस्कृत ध्येय वाक्य आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असतंच. भारतीय टपाल (आणि तार) खात्याचा हा बाणा आहे. (आम्ही तुमची) रात्रंदिवस सेवा (करतो), असा याचा अर्थ आहे. अर्थात, सीमेवर तैनात असलेले सैनिक, पोलीस, अग्नीशमन आणि इतर आकस्मिक सेवा देणारी सगळी मंडळी देखील हेच म्हणू शकतात. दिवसा-रात्री केव्हाही यांच्यापैकी कोणी ना कोणी आपल्या हाकेला ‘ओ’ देऊन मदतीला येतात. त्यांचे डोळे आणि कान सतत उघडे असतात. या अशा सदैव सचेत, जागृत अवस्थेत असलेल्या लोकांसाठी इंग्रजीत ‘आर्गस’ किंवा ‘आर्गस’ – ‘आईड’ असा शब्द आहे. अगदी आपल्या घरात किंवा सभोवतालीसुद्धा असे काही आर्गस असतात, आणि त्यांच्या या जागरूकतेमुळे वैयक्तिक किंवा सामाजिक फायदा होतो. ज्याच्या नावावरून हा शब्द तयार झाला आहे, तो आर्गस मुळात होता तरी कोण? आणि तो कधीच झोपत नव्हता म्हणजे त्याला निद्रानाशाचा आजार होता की काय? नाही, असं काही नाही. तो झोपायचा. पण त्याच्या शंभर डोळ्यांपैकी काही डोळे बंद करून. त्याचे उरलेले डोळे उघडेच असायचे. असं करून तो आळीपाळीनं सर्व डोळ्यांना आरामही द्यायचा.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आर्गसची मनोरंजक कथा सांगायच्या आधी हा शब्द माझ्या वाचनात पहिल्यांदा कुठे आला, ते सांगतो. पी. जी. वुडहाऊसच्या अनेक दुय्यम पात्रांमधल्या एकाचं नाव आहे पर्सी पिलबीम. हा आधी पत्रकार होता. पीत-पत्रकारिता ही त्याची खासीयत. बड्या धेंडांची, प्रतिष्ठित लोकांची लफडी शोधून काढून त्यांच्याबद्दल खऱ्या-खोट्या चविष्ट बातम्या छापणं त्याला आवडायचं. यामुळे त्याच्या साप्ताहिकावर वाचकांच्या उड्या पडत असत. अर्थातच त्याचा मालक त्याच्यावर अतिशय खुश होता. एक दिवस या लुच्च्या पिलबीमच्या असं लक्षात आलं की, हे असं दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा आपण स्वतःच जर याच धर्तीचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला तर आपली चांदीच चांदी होईल. लगेच त्यानं नोकरी सोडली आणि स्वतःची खासगी गुप्तहेर संस्था उघडली. इंग्लंड अमेरिकेत असे प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर शेकड्यानं सापडतात. पोलिसांकडून रीतसर परवानगी घेऊन पिलबीमही असाच एक डिटेक्टिव्ह बनला. त्यानं जी डिटेक्टिव्ह संस्था सुरू केली, तिचं नाव ‘Argus Detective Agency’ असं होतं. (अर्थात या बाह्य मुखवट्याच्या आडून तो ब्लॅकमेलिंग करायचा आणि पैसे कमवायचा, हे सांगायची गरज नाही.) वुडहाऊसच्या १९२९ सालच्या ‘Summer Lightning’ (अमेरिकन शीर्षक- ‘Fish Preferred’) या ‘ब्लॅंडिंग्ज कासल’ कादंबरीत हा उल्लेख आहे. आर्गस हेच नाव पिलबीमनं का निवडलं असेल, याचा मी शोध घेतला, तेव्हा मला या शब्दाची कुळकथा वाचायला मिळाली.

ग्रीक दंतकथांमध्ये Argus Panoptes किंवा आर्गस/आर्गॉस पॅनॉप्टेस (Ἄργος Πανόπτης किंवा Ἄργος) या नावाचं एक पात्र आहे. तो एक ‘जायंट’ होता. त्याच्या पूर्ण शरीरावर एकूण शंभर डोळे होते. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरासारखं तो कोणतंही दृश्य कोणत्याही अँगलनं आणि केव्हाही बघू शकायचा. म्हणून तो पॅनॉप्टेस. पॅन म्हणजे अखिल; ऑप्टेस म्हणजे बघणारा. (ऑप्टिशियन म्हणजे चष्मे बनवणारा, हे तर तुम्ही जाणताच.)

असा हा आर्गस ‘हेरा’चा सेवक होता. ग्रीक देवांचा राजा (म्हणजे इंद्र) होता झ्यूस. ही हेरा त्याची बायको, म्हणजे इंद्राणी. तो हेराचा अंगरक्षक होता, पहारेकरी होता, आणि तिचा ‘हेर’ पण होता. सभोवताली कुठे काय घडतंय, कोण काय करतंय, याची तो आपल्या शतनेत्रांनी नोंद घ्यायचा आणि त्याची वित्तंबातमी तिला द्यायचा. तो २४ तास जागाच असायचा. कारण शंभरपैकी त्याचे कुठले ना कुठले डोळे सतत उघडेच असायचे.

अर्धं शरीर मानवाचं आणि अर्धं शरीर सापाचं असलेला ‘एकिडना’ (Echidna) नावाचा एक अतिभयंकर प्राणी त्या काळी तिथे थैमान घालत होता. ही बया एका गुहेत राहायची आणि भूक लागली की, गुहेजवळून जाणाऱ्या प्रवाशांचा फडशा पाडायची. तिची मुलं पण तशीच हिंस्त्र आणि भयानक होती. त्यातल्या दोघांची नावं ‘सेरेबेरस’ (Cereberus) आणि ‘लर्निअन हायड्रा’ (Learnean Hydra) अशी होती. अशा या एकिडनाला ठार मारण्याची कामगिरी हेरानं आर्गसवर सोपवली. ती झोपली असताना आर्गस हळूच तिच्या गुहेत शिरला आणि त्यानं तिचा वध केला. आर्केडिआ नावाच्या रम्य, अतीसुंदर प्रदेशात एक विशाल रानटी सांड बेफाम होऊन उधळला होता. आर्गसनं त्यालाही कंठस्नान घातलं. त्याच्या कातडीपासून आर्गसनं स्वतःसाठी एक झगा शिवला. याच आर्केडिआत नंतर एकदा गायी म्हशी चोरणारा एक शक्तिशाली ‘साट(र)’ (Satyr) घुसला. त्यालाही आर्गसनं संपवलं.

अशा या सर्वज्ञ आर्गसचा शेवट मात्र विचित्र परिस्थितीत झाला. हेराचा नवरा झ्यूस स्त्रीलंपट होता. आपण देवांचे राजे असल्यानं आपल्याला सर्व गुन्हे माफ आहेत, असा त्याचा समज होता. तो ‘आयो’ (Io) नावाच्या धर्मगुरू बाईच्या प्रेमात पडला. (जगभरचे सारे इंद्र असेच बाहेरख्याली असतात की काय?) त्यांचं हे लफडं हेराला कळलं. स्वाभाविकच ती चिडली. आपल्या नवर्याला आणि त्याच्या माशुकाला रंगेहात पकडण्यासाठी ती प्रयत्न करू लागली. अशाच एका प्रसंगी झ्यूस आणि आयो यांचं ‘इलू – इलू’ सुरू असताना ती तिथे पोहचली. ते कळताच प्रसंगावधान राखून झ्यूसनं आयोचं रूपांतर एका पांढऱ्या गायीत केलं. त्यामुळे हेरा निराश होईल आणि परतेल असं त्याला वाटलं. पण हेराही चतुर होती. आपल्या पतीला ती चांगली ओळखून होती. त्यामुळे ही गाय म्हणजेच आयो आहे, हे त्या चाणाक्ष बाईनं ताडलं. ‘मला ही गाय खूप आवडली, ती मला दे’ असं तिनं झ्यूसला सांगितलं. आता काय करावं, हे त्याला कळेना. शेवटी नाइलाजानं त्याला ती गाय हेराला द्यावी लागली. हेरानं गाय आपल्या महालात आणली आणि तिच्यावर पहारा ठेवण्याची जबाबदारी आर्गसवर सोपवली. आर्गसनं तिला एका झाडाला बांधून ठेवलं. सदैव जाग्या असणाऱ्या आर्गसच्या तावडीतून आयोची सुटका कशी करायची, हा गहन प्रश्न आता झ्यूसला पडला. मग त्यानं हे काम ‘हर्मिज’ (Hermes) नावाच्या देवांच्या एका दूताला दिलं. हा गडी हेरगिरी करण्यात, चोरी करण्यात मोठा वस्ताद होता. वेषांतर करणं ही त्याची खासीयत होती. तो आर्गसच्या अंगणात गेला.

अपेक्षेप्रमाणेच आर्गस आपल्या काही डोळ्यांनी गायीवर सक्त नजर ठेवून बसला होता. धूर्त हर्मिजनं मग एका गुराख्याचं रूप धारण केलं. त्यानं आर्गसशी गप्पागोष्टी सुरू केल्या. मग स्वतःजवळचा पावा काढला आणि त्यावर तो कर्णमधुर अशा संगीतरचना वाजवू लागला. ते स्वर्गीय संगीत ऐकता ऐकता आर्गसला हळूहळू झोप येऊ लागली आणि एक एक करता करता त्याचे सगळे डोळे मिटले. काही क्षणात तो गाढ झोपी गेला. हा आता पूर्णपणे कामातून गेला याची खात्री पटल्यावर हर्मिजनं हळूच एक सुरा आपल्या अंगरख्यातून काढला आणि आर्गसची मान कापली. तो मेल्यावर त्यानं आयो गायीला मुक्त केलं आणि तिला झ्यूसकडे पोहचवलं.

आर्गसच्या मृत्यूचं हेराला अतिशय दुःख झालं. तिनं त्याचे शंभरही डोळे त्याच्या शरीरापासून वेगळे केले आणि ते तिच्या पाळीव मोराच्या पिसाऱ्यावर मण्यांसारखे चिकटवले. तेव्हापासून मोराच्या पिसार्यातल्या प्रत्येक पंखावर एक डोळा उमटायला सुरुवात झाली. आर्गसची स्मृती हेरानं अशा रीतीनं कायम ठेवली म्हणून मोराला तिचं प्रतीक मानलं जाऊ लागलं.

आर्गसचा बाप कोण होता याबाबत दुमत आहे. Inachus, Agenor किंवा Arestor यापैकी कोणा एकाचा तो मुलगा होता. काही लोक त्याला आदिवासी नायक (autochthon) मानतात. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात बनलेल्या लाल चिनीमातीच्या भांड्यांचे काही अवशेष पुरातत्व संशोधकांना एथेन्स शहरात मिळाले आहेत. त्यावर आर्गसची चित्रं कोरली आहेत. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकानंतर लिहिल्या गेलेल्या बर्याच ग्रीक शोकांतिकांमध्येदेखील आर्गसचा उल्लेख आहे.

इस्कायलस (Aeschylus)च्या ‘Suppliants’ आणि ‘Prometheus Bound’, तसंच युरिपायडेस (Euripides)च्या ‘Phoenician Women’ या रचनांमध्ये आणि ओव्हिड (Ovid) या लॅटिन कवीच्या ‘Metamorphoses’ या काव्यातही आर्गसवर लिहिलं गेलं आहे. या होमेरिक काव्यांमध्ये त्याला Argeiphontes (आर्गसचा वधक) असा किताब देण्यात आला आहे. यामुळे ग्रीक आणि लॅटिन साहित्याच्या प्रभावाखाली जे साहित्य पाश्चात्य भाषांमुळे पुढे लिहिलं गेलं, त्यात ‘सदैव जागृत’ अशा अर्थाचं प्रतीक म्हणून आर्गसची नोंद केली गेली. त्यातूनच आपल्याला ‘आर्गस – आईड’ हा इंग्रजी शब्दप्रयोग मिळाला.

‘आर्गस’ हा शब्द ग्रीक Argosपासून बनला. चमकदार, तेजस्वी असा त्याचा खरा अर्थ होतो. मूळ PIE धातू arg असा आहे. त्याचाही अर्थ तोच आहे. यापासून आपल्याला आर्गसशिवाय पुढील शब्दांचा लाभ झाला. Argent म्हणजे रजत किंवा चांदी; Argentina (एक देश); argentine (एक प्रकारचा चमकता सागरी मासा); Argo (एक नक्षत्र); argue (वाद घालणे); hydrargyrum (एक रासायनिक मूलद्रव्य); litharge (एक खनिज). PIE मधल्या arg या धातूपासूनच संस्कृत भाषेत ‘रजत’ आणि ‘अर्जुन’ हे शब्द पुढे तयार झाले, असा एक तर्क आहे.

Pan- म्हणजे सर्व, संपूर्ण, सर्वसमावेशक, इत्यादी. इंग्रजीत आता हा शब्द अनेक शब्दांना उपसर्ग म्हणून जोडला जातो. जसं- पॅन अमेरिकन, पॅन इंडियन, पॅन अफ्रिकन. या ग्रीक शब्दाचं मूळ pant या प्रोटो इंडो युरोपिअन (PIE) रचित भाषेतल्या शब्दात आहे. ग्रीक दंतकथांमध्ये Pan या नावाचा एक देवदेखील आहे. वनं, उपवनं, शेतजमीन, धनगर, शेळ्यामेंढ्यांचे कळप, अशा गोष्टींचा तो अधिष्ठाता आहे. बकरीचे पाय, कान, आणि शिंगं असलेला मानवरूपधारी असा हा पॅन आहे. पण त्याचा Panoptesमधल्या पॅनशी काही संबंध नाही. Panoptesमधल्या optesला मूळ ग्रीक optikos या शब्दाचा आधार आहे. दृष्टी, नजर, डोळ्यांनी दिसणारं, अशा अर्थानं हा शब्द वापरला जात होता.

ōps (डोळा) याचा उगम PIE धातू okw- (to see) पासून झाला. त्यातूनच तयार झालेले अनेक इंग्रजी शब्द आपण नेहमी वापरतो. उदाहरणार्थ- amblyopia, autopsy, binocle, binocular, biopsy, Cyclops, eye, eyelet, hyperopia, inoculate, monocle, monocular, myopia, ocular, oculist, oculus, ogle, ophthalmo-, optic, optician, optics, optometry, panoptic, panopticon, synopsis, window इत्यादी.

‘झ्यूस’ (Zeus) हा र्हिआ (Rhea) आणि क्रोनस यांचा मुलगा होता. पुढे क्रोनसला इंद्रपदावरून हाकलून देऊन हाच गादीवर बसला. (ग्रीक कंस आणि उग्रसेन.) हेरा (Hera) त्याची बहीण होती. नंतर त्यानं तिच्याशीच लग्न केलं. त्याच्या भावांची नावं Poseidon आणि Hades अशी होती. आजच्या भाषेत सांगायचं तर झ्यूस हा अत्यंत चालू आणि लंपट देव होता. कंसासारखाच रागीट आणि क्रूर.

‘जायंट’ (Giant) या शब्दाचा आजचा अर्थ अतीभव्य, प्रचंड, विशाल, महाकाय असा होतो. मुळात जायंट ही ग्रीक दंतकथांमध्ये सापडणारी एक मानवसदृश विशालकाय लोकांची जमात होती. त्यांना देवांमध्येच गणलं जायचं, पण कमी दर्जाच्या. उच्चवर्णीय देव त्यांना रानटी आणि राक्षसी समजायचे. आपल्या देव आणि दानव किंवा सुर आणि असुर यांच्याच सारखं हे नातं होतं. Gaia आणि Uranus या दाम्पत्याच्या या प्रजेला पुढे स्वर्गस्थ देवांनी नष्ट केलं. देवांनी दैत्यांवर विजय मिळवला, तसं. Giant पासून इंग्रजीत giant-killer हा शब्ददेखील आला. एखाद्या शक्तिशाली खेळाडू किंवा राजकारण्याला आकस्मिकरीत्या, अनपेक्षितपणे हरविणाऱ्या, त्याच्या तुलनेनं कमजोर प्रतिस्पर्ध्याला जायंट किलर म्हणतात. इंदिरा गांधी यांना निवडणुकीत हरवून विजयी झालेले राज नारायण हे त्या काळी ‘जायंट किलर’ म्हणून ओळखले जात होते.

ग्रीक पुराणांतली अनेक नावं आपण आज वेगळ्या संदर्भात वाचतो. एकिडना (Echidna) या नावाचा एक प्राणी ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात आणि नद्यांमध्ये सापडतो. त्यालाच spiny anteater असंही म्हणतात. प्लॅटिपस आणि एकिडना हे दोनच सस्तन प्राणी असे आहेत, ज्यांचा बाळांचा जन्म अंड्यातून होतो.

आधुनिक प्राणीशास्त्रज्ञांनी Learnean Hydraवरून गोड्या पाण्यात राहणाऱ्या काही सूक्ष्म जीवांचं नाव हायड्रा (Hydra) असं ठेवलं आहे.

सेरेबेरस (Cereberus किंवा Cerberus) हा नरकातला (Hades) राखणदार कुत्रा होता. ग्रीकमध्ये त्याचा उच्चार ‘केरबेरॉस’ असा होतो. त्याला तीन तोंडं होती. आपल्या अंगावर केस असतात, तसे त्याच्या अंगावर साप उगवले होते. शेपटीही सापाचीच होती. नरकातल्या मृतात्म्यांना जमिनीवर जाण्यापासून रोखण्याची कामगिरी त्याच्याकडे होती. हर्क्युलीजच्या प्रसिद्ध कहाणीत त्याचा उल्लेख आहे. भारतीय परंपरेतल्या मृत्यूलोकपती यमदेवतेच्या कुत्र्याशी (Sabalah किंवा Sharvara, शर्वर) त्याचं नातं जोडलं जातं.

Satyr ही दारूबाज आणि स्त्रीलंपट ग्रीक जंगली देवांची एक जमात होती. मनुष्याचं शरीर आणि घोड्याचे कान व शेपटी असं त्यांचं रूप होतं. त्यावरून इंग्रजीत कामपिसाट माणसाला ‘satyr’ म्हटले जाऊ लागले. वेगवेगळ्या असंख्य स्त्रियांशी रोज अनेकदा संभोग करण्याची इच्छा आणि तीव्र कामवासना असलेल्या (आणि तसं करणाऱ्या) माणसाला satyriasis नावाची लैंगिक विकृती आहे, असं वैद्यकीय शास्त्रात सांगितलं जातं.

आर्केडिआ (Arcadia) या नावाचा एक प्रदेश ग्रीस देशात आहे. प्राचीन काळापासून त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. ग्रीक भाषेत त्याचं स्पेलिंग ‘Arkadia’ असं केलं जातं. झ्यूस देवाचा मुलगा आर्कास (Arkas) यानं तो वसवला. तो तिथला पहिला राजा. तिथल्या डोंगराळ भागात एके काळी जणू काही स्वर्गीय नंदनवन असल्याचा भास होत असे. तिथे साधे भोळे आणि आहे त्यात खुश राहणारे, प्रामाणिक धनगर लोक आणि त्यांच्या रूपवान, जरा खोडकर बायका राहत असत. शेळ्यामेंढ्या पाळून त्यांची गुजराण होत असे. नंतर रोमॅंटिक प्रवृत्तीच्या कवी लोकांनी या साध्या, सरळ, शांत, आनंदी, ग्रामीण वातावरणाचं उदात्तीकरण केलं, आणि उत्तम जीवन कसं असावं तर आर्केडिआसारखं, अशी प्रसिद्धी त्याला मिळवून दिली. यातलं सगळंच काही खरं नव्हतं. तिथे स्पर्धा, महत्त्वाकांक्षा, आणि गुन्हेगारी अगदीच नव्हती, असंही नाही. वेळप्रसंगी ते लोक भांडणंही आणि युद्धंदेखील करत असत. जुन्या ग्रीक लोकांना तर त्याबद्दल अप्रितीच होती. पण एक मनोहारी प्रदेश म्हणून पुढे त्याची जी ख्याती झाली, ती आजतागायत टिकून आहे. इंग्रजीत हा शब्द आणण्याचं श्रेय सर फिलिप सिडनी या कवीला जातं. १५९०मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या एका कवितेत त्यानं आर्केडिआवर लिहिलं आहे. यावरून इंग्रजीत ‘Arcadian’ हे विशेषण तयार झालं आहे. मात्र arcade या शब्दाशी त्याचं काही नातं नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आयो (Io) या झ्यूसच्या प्रेयसीचं नाव गुरू ग्रहाच्या एका उपग्रहाला देण्यात आलं आहे. यावर जिवंत ज्वालामुखी आहेत, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.

ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमध्ये हर्मिज (Hermes) या नावाचा एक विशाल युद्धपोत होता. हे जगातलं पहिलं विमानवाहू जहाज. पुढे ते भारतीय नौदलाला विकण्यात आलं. आयएनएस विराट या नव्या नावाखाली त्यानं बरीच वर्षं सेवा दिली. आता ते निवृत्त करण्यात आलं असून गुजरातमधल्या अलंग या बंदरात ते जतन करून ठेवण्यात आलं आहे.

ऑटोक्थन (Autochthon) हा शब्द १६४०पासून इंग्रजीत वापरला जातो आहे. ग्रीक भाषेत ऑटो म्हणजे स्वतः किंवा स्वतःहून. आणि क्थन (khthōn) म्हणजे भूमी, जमीन, माती. या दोन्ही शब्दांना एकत्र करून भूमीपुत्र किंवा कोणत्याही प्रदेशातले अगदी पहिले रहिवासी अशा अर्थाचा हा नवा शब्द बनवला गेला. याचा शब्दशः अर्थ ‘जमिनीतून स्वतः उगवलेला’ असा होतो. सध्या तो आदिवासी लोकांसाठी औपचारिकरीत्या वापरला जातो.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......