फेब्रुवारीत होणाऱ्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीचा धमाका असणार आहे. त्याची चुणूक आतापासूनच दिसायला लागली आहे…
पडघम - देशकारण
कामिल पारखे
  • डावीकडे पंतप्रधान मोदी व राहुल गांधी, मध्यभागी गोव्याचा नकाशा आणि उजवीकडे ममता बॅनर्जी व अरविंद केजरीवाल
  • Mon , 15 November 2021
  • पडघम देशकारण गोवा विधानसभा निवडणूक नरेंद्र मोदी भाजप काँग्रेस अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी

येत्या फेब्रुवारीत पंजाब आणि गोवा या दोन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. डिसेंबरमध्ये त्यांच्या तारखा जाहीर होतील. यापैकी पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडून सवतासुभा जाहीर केल्याने तेथील निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेस विरुद्ध अकाली दल, या नेहमी होणाऱ्या लढाईत एक वेगळी रंगत येणार आहे. संपूर्ण देशभर निवडणुकांत मर्दुमकी गाजवणारा भारतीय जनता पक्ष तिथं कुणाच्या खिजगणतीतही नसतो. त्यामुळे पंजाबऐवजी भाजपची ताकद या वेळी देशातील सर्वांत लहान राज्य असलेल्या गोव्यात पणाला लागणार आहे.

पंजाबप्रमाणेच गोव्यातील निवडणुकीचे पडघम कधीच सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रोममधील दौऱ्यात अचानक व्हॅटिकन सिटी या जगातील सर्वांत छोट्या सार्वभौम देशाला भेट देऊन आणि त्याचे प्रमुख व कॅथोलिक पंथाचे परमाचार्य पोप फ्रान्सिस यांची गळाभेट घेऊन गोव्यातील निवडणूक प्रचाराचा बिगुल वाजवला आहे. अर्थात असे पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधी म्हणजे मार्च २०२१मध्ये मोदींनी बांगलादेशचा दौरा करून तेथे पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेतली होती. तेव्हासुद्धा अशाच प्रकारे पश्चिम बंगालमध्ये तेव्हा होऊ घातलेल्या निवडणुकांचे रणशिंग त्यांनी विदेश भूमीवर फुंकले, असे म्हटले गेले होतेच.  

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मोदींनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन आणि त्यांना भारतभेटीचे आमंत्रण देऊन गोव्यातील व देशातील ख्रिस्ती जनतेच्या भावनांना हात घातला आहे. त्याचप्रमाणे जगभर त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कट्टर ‘हिंदुत्ववादी’ भारतीय जनता पक्षाबद्दल जे काही बोलले जाते, त्याबाबत एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारने पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीवर बोलवावे म्हणून येथील कॅथोलिक चर्चने सारख्या मिनतवाऱ्या चालवल्या होत्या. गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना मोदी सरकारने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

पोपमहोदयांचा भारतदौरा खरेच होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेच्या सानिध्यात मोदीजी पोप फ्रान्सिस यांच्यासमोर पवित्र ‘बायबल’ आदराने कपाळाला लावत आहेत, या छायाचित्राचे गोवा निवडणुकीत अप्रत्यक्षरीत्या भरपूर भांडवल केले जाणार आहे. पोपमहाशयांच्या भारतभेटीला नेहमीच ठाम विरोध असणारा संघपरिवार या काळात कदाचित मूग गिळून बसणे उचित मानेल. याआधी  पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कारकिर्दीत पोप जॉन पॉल दुसरे यांनी भारतदौरा केला होता.

गोव्यातली विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक स्टार प्रचारक माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. पर्रीकर यांनी गोव्यात बहुसंख्य हिंदू आणि अल्पसंख्याक कॅथोलिक यांची मते मिळवून पक्षाला सत्ता मिळवून दिली होती. भारतीय जनता पक्षाने २०१२ पासून अनेक पेचप्रसंगांवर मात करून या राज्यात आपली सत्ता टिकवली आहे. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

गेल्या निवडणुकीत भाजपला गोवा विधानसभेच्या एकूण ४०पैकी केवळ १३ जागा मिळाल्या. त्या वेळचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे स्वतः निवडणुकीत हरले होते आणि काँग्रेसला सर्वाधिक १७ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा पर्रीकर यांना दिल्लीतून माघारी बोलावून त्यांच्याकडे गोव्याचे तख्त राखण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी ती कामगिरी उल्लेखनीयरीत्या फत्तेही करून दाखवली.

त्या २०१७च्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला स्पष्टरीत्या झिडकारले होते, तरीही त्याने उपलब्ध सर्व साधने व यंत्रणा येनकेनप्रकारे हाताळून काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवले आणि सत्ताही मिळवली. इतकेच नाही, तर भाजपच्या विधानसभेतील जागांची संख्या मूळ १३हून आता २७पर्यंत आली आहे.

निवडणुकीचा निकाल काहीही असला तरी घटनात्मक तरतुदींचा वापर करून बहुमताने सत्तेवर येण्याचा हा मार्ग नंतर भाजपने आणि मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांनी कर्नाटकातसुद्धा यशस्वीरीत्या चोखाळला आहे. इतर राज्यांतही असा प्रयोग झाला आहे.

पर्रीकर यांचे उत्तराधिकारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर आता भाजपची सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या गोव्यातील आमदारांपैकी १५ कॅथोलिक आणि १२ हिंदू आहेत. बहुसंख्य आमदार कॅथोलिक असले तरी त्यापैकी एकालाही मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही. आतापर्यंत तरी भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या आमदारालाच मुख्यमंत्रीपद दिलेले आहे.   

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

पंतप्रधान मोदी यांच्या व्हॅटिकन भेटीआधीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने गोव्यात प्रचाराचा धुराळा उडवला आहे. आतापर्यंत बंगालच्या उपसागरापाशीच राजकारण करणाऱ्या ममतादीदींच्या पक्षाच्या गळाला दुसऱ्या टोकाला असलेल्या अरबी समुद्राच्या किनारी गोव्यात एक फार मोठा मासा गावला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लुईझिन्हो यांच्या रूपाने तृणमूल काँग्रेसने गोव्यात आपले पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

जगातली कुठलीही लोकचळवळ नव्या पिढीतील कितीतरी नेत्यांना जन्मास घालत असते. ऐंशींच्या दशकात कोकणी आणि मराठी राज्यभाषा वादात आणि स्वतंत्र गोवा राज्य चळवळीत गोव्यात राजकारण, साहित्य आणि इतर क्षेत्रांत अशी अनेक व्यक्तिमत्त्वे उदयास आली. साहित्य अकादमी पुरस्कारविजेते उदय भेम्बरे, पुंडलीक नायक, औटघटकेचे मुख्यमंत्री बनलेले चर्चिल आलेमाव आणि आता पंचाहत्तरीत असलेले लुईझिन्हो फालेरो ही त्यापैकी काही उल्लेखनीय नावे.  

तृणमूल काँग्रेसचे नेते बाबुल सुप्रियो यांनी पश्चिम बंगाल आणि गोव्यात फुटबॉल व मासे प्रिय आहेत, असे सांगून देशातील या दोन टोकांतील राज्यांचे जवळचे नाते सांगितले आहे.

गेल्या निवडणुकीत आप आदमी पार्टीने पंजाबप्रमाणेच गोव्यातही पाय रोवण्यासाठी जय्यत तयारी केली होती. पंजाबमध्ये ‘आप’ला काही जागा मिळाल्या, मात्र गोव्यात एकही जागा मिळाली नाही. आता तृणमूल काँग्रेसच्या रूपाने बाहेरचा पक्ष येथील निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. काही अनपेक्षित समाजक्षेत्रातील लोकांनी तृणमूलमध्ये प्रवेश करून प्रस्थापित राजकारणी लोकांना धक्का दिला आहे.   

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आमनेसामने उभे राहिले होते. मोदीजींची  प्रचारसभांतली ‘दीदी, ओ दीदी’ ही ललकारी अनेक अर्थांनी गाजली, तशीच ‘खेला होबे’ ही ममतादीदींची घोषणासुद्धा. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे आणि इतर पक्षांचे असेच तुंबळ प्रचारयुद्ध गोव्याच्या निवडणुकीत दिसणार आहे.       

गेल्या निवडणुकीत गोव्यात सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाची आता अत्यंत दयनीय अवस्था आहे. गेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला सत्तेतून दूर करून काँग्रेसला सत्तेच्या दारात आणून ठेवले होते. मात्र तरीसुद्धा या पक्षाला सत्ता काबीज करता आली नाही. हे पाहून आणि पाच वर्षे सत्तेतून बाहेर का राहायचे, असा विचार करून मग विश्वजित राणे आणि इतर काँग्रेस आमदारांनी राजीनामा देऊन भाजपची वाट धरली आणि पोटनिवडणुकीत जिंकून आले आणि मंत्रीही झाले!

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

कोण आहेत हे विश्वजित राणे? सत्तरच्या दशकात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या मंत्रीमंडळाचे सदस्य असलेल्या आणि ऐंशींच्या दशकात आणि नंतर एक तपाहून सर्वाधिक काळ काँग्रेसचे मुख्यमंत्री, नंतर विधानसभा सभापती असलेल्या प्रतापसिंह राणे यांचे ते चिरंजीव. महाराष्ट्रातल्या राजकारणात गेली पाच दशके अग्रस्थानी असलेल्या शरद पवारांप्रमाणेच प्रतापसिंह राणे यांनीही निवडणुकीत कधी पराभव चाखलेला नाही. मात्र स्वतः प्रतापसिंह राणे आजही काँग्रेसचे आमदार आहेत. गोव्यातल्या विद्यमान आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांची जितकी संख्या आहे, तितकी संख्या इतर कुठल्याही राज्यांत नसेल.

भाजप सरकारमध्ये आता आरोग्यमंत्री असलेले विश्वजित राणे यांच्यासारखे काँग्रेस पक्षाचे अनेक स्थानिक रथीमहारथी या घडीला भाजपच्या तंबूत आहेत.

भारतातल्या निवडणुकीच्या आखाड्यातले एक तज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्या ‘इंडियन पोलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी’ (आयपॅक) टीमची तरुण मंडळी तृणमूल काँग्रेससाठी गोव्यात कधीच दाखल झाली आहेत.   

मार्चच्या दरम्यान गोव्यात कार्निव्हल भरतो. पाश्चात्य धर्तीच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्निव्हल उत्सवाच्या आधीच गोव्यात विधानसभेच्या निवडणुकीचा धमाका असणार आहे. त्याची चुणूक आतापासूनच दिसायला लागली आहे.  

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......