उतावीळ नाना पटोळे!  
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोळे
  • Sat , 17 July 2021
  • पडघम राज्यकारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस Maharashtra Pradesh Congress नाना पटोळे Nena Patole काँग्रेस Congress भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररची डॉमिनिक केफ्फर याच्या विरुद्धची लढत पाच सेटसपर्यंत आणि जवळजवळ सुमारे अडीच तासावर चालली. फेडरनं हा सामना ७-६, ६-७, ७-६, ७-५ असा जिंकला. म्हणजे दोन्ही खेडाळूंची किती दमछाक झाली असेल, हे लक्षात घ्या. पण त्यातही कौतुक  रॉजर फेडररचं; गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झालेल्या, शिवाय वय ३९, सामन्यात तीन ट्राय ब्रेक, तरी फेडरर जिंकला. आश्चर्य-स्तंभित करणारी ही फेडररची कामगिरी आहे. म्हणून कायमच जिद्द आणि प्रेरणा यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे फेडरर आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोळे यांना फेडरर माहीत असण्याची शक्यता नाही आणि फेडररसारखा संयम तसंच जिद्दही नाना पटोळे यांच्यात आहे, असं काही दिसत नाही.

एकूणच नाना पटोळे यांची राजकीय कारकीर्द ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ अशा पद्धतीची दिसतेय. १९९० साली भंडारा जिल्हा परिषदेवर झालेली निवड ते २०२१, असा नाना पटोळे यांचा राजकीय प्रवास आहे. अपक्ष ते काँग्रेस ते भाजप ते पुन्हा काँग्रेस अशी वळणं या प्रवासात त्यांनी घेतलेली आहेत. या काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही त्यांनी जिंकलेल्या आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

२०१४ची लोकसभा निवडणूक भाजपचे उमेदवार म्हणून जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेऊन पक्ष सोडणं, हे नाना पटोळे यांच्या राजकीय कारकिर्दीतलं दुसरं शिखर होतं. २०१४ची निवडणूक जिंकताना ज्यांच्या नेतृत्वाखालील शिक्षण संस्थेत महाविद्यालयीन शिक्षण झालं, त्या प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या (महा)राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा त्यांनी केलेला पराभव हे पहिलं शिखर होतं. त्यानंतर ‘जायंट किलर’ ठरलेले नाना पटोळे एकदम प्रकाशझोतात आले आणि राष्ट्रीय पातळीवर चमकले. प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केल्याच्या मोबदल्यात जर केंद्रात मंत्रिपद मिळालं असतं, तर त्यांनी भाजपचा त्याग केला नसता, हे उघड आहे. पण, ते असो. कारण राजकारणात अनेकांच्या वाट्याला असे ‘जर-तर’ खूप येतात आणि जातात; कधी त्या येण्या-जाण्याला मोल मिळतं, तर कधी मिळत नाही.

नाना पटोळे बहुजन समाजातले आहेत आणि त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात स्वबळावर केलेली आहे. त्यामुळे आजवर त्यांनी जे काही मिळवलं, त्याचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे, यात कोणतीही शंका नाही. मात्र अशात त्यांनी बरेच ‘लूज बॉल’ टाकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील स्थैर्यांबाबत चर्चांना नाहक पेव फुटलं.

राजकारणात आलेल्या प्रत्येकाला राज्यात आमदार, केंद्रात खासदार, मंत्री, मुख्यमंत्री व्हावंसं वाटण्यात काहीच गैर नाही. मनातल्या मनात असे मांडे भाजणं प्रत्येकाचाच स्वाभाविक अधिकारच आहे. एकदा तर आपण या राज्याचे सर्वांत सक्षम मुख्यमंत्री आपण कसे होऊ शकतो, याची स्वप्नं पाहत असल्याचं नगरसेवकपदी कसाबसा निवडून आलेला एक राजकारणी गप्पा रंगवत असताना बघायला मिळालेलं आहे.

नाना पटोळे यांचा दर्जा त्या नगरसेवकापेक्षा मोठा आहे हे नि:संशय, पण त्यासाठी (पक्षी : मुख्यमंत्रीपद) जरा कळ सोसणं आणि उतावीळपणा न दाखवता रॉजर फेडररसारखं जिद्दीनं काम करणं आवश्यक आहे, हे काही नाना पटोळे यांच्या लक्षात येत नाही.

स्पष्टवक्तेपणा आणि बेतालपणा, आक्रमकता आणि आतातायीपणा यातल्या सीमारेषा लक्षात घेऊन जो राजकारणात वावरतो, त्याची पावलं यशाच्या मार्गावर कायमच पडत असतात, याचा विसर नाना पटोळे यांना पडलेला दिसतो आहे. अन्यथा ‘आपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाळत ठेवून आहेत,’ अशी बेताल बडबड त्यांनी केलीच नसती. खणिकर्म महामंडळातील एका कंत्राट प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिताना आपण आपल्याच पक्षाच्या ऊर्जामंत्र्यावर निशाणा साधतो आहोत, याचाही विसर त्यांना पडला. विधानसभेच्या सभापतीपदावर असताना राज्याच्या मुख्य सचिवाला सभागृहात हजर होण्याचा हुकूम देण्याचं (आततायी) धाडस त्यांनी दाखवलं होतं. शिवाय ते भाजप आणि शिवसेनेवरही अधूनमधून गुरगुर करत असतात.

भंडारा जिल्ह्यासारख्या अरण्य प्रदेशातून नाना पटोळे आले आहेत. त्या अरण्यात अनेक वाघ आणि बिबटे आहेत. त्या वाघांपासूनच ही गुरगुर करण्याची सवय त्यांना लागली, असं कुणी म्हणेलही, पण राजकारण करताना एकाच वेळेस स्व आणि विरोधी पक्षालाही एकाच वेळी अंगावर ओढावून घेण्यात कोणताही शहाणपणा नसतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

त्यात पुढे जाऊन देशातले एक ज्येष्ठतम नेते शरद पवार यांच्यावरही एक उसळता चेंडू भिरकावण्याचा उतावीळपणा नाना पटोळे यांनी केला. पवार यांचं वय, अनुभव आणि त्यांच्या राजकारण करण्याची शैली याची कोणतीही पोच न ठेवता, केलेला हा स्वैर मारा येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला महाग पडू शकतो, याची जाणीव नाना पटोळे यांना नसावी, हे केवळ त्यांचंच नाही तर काँग्रेस पक्षाचं दुर्दैव म्हणायला हवं. योग्य वेळी ‘धडा’ शिकवणं ही शरद पवार यांची शैली आहे आणि ती योग्य वेळ निवडणूक असते, ही काही नाना पटोळे यांच्या लक्षात आलेलं नाही.

विधानसभेचं अध्यक्षपद सोडून नाना पटोळे यांनी प्रदेश काँगेसचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे (किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना ते स्वीकारायला लावलं आहे). काँगेस पक्षाचा गाडा देश आणि राज्यातही  सध्या सर्व बाजूने चिखलात रुतलेला आणि मोडकळीसही आलेला आहे. एकेकाळी स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणाऱ्या काँग्रेसला १९९९पासून म्हणजे ‘महा’राष्ट्रवादी काँग्रेसचा सहारा घ्यावा लागत आहे.

आता तर (महा)राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेलाही सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी तिघांची आघाडी काँग्रेसला करावी लागली आहे. राज्यात विधानसभेतलं संख्याबळ पन्नासच्या खाली उतरलं आहे. अनेक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर पंचायती, नगर परिषदा, महापालिका आणि ग्रामपंचायतीही काँग्रेसच्या हातून अन्य पक्षांनी खेचून घेतल्या आहेत. महाराष्ट्राच्या काही लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची वाणवा पडावी, इतक्या केविलवाण्या परिस्थितीत काँग्रेस पक्ष सापडलेला आहे.

तरीही काँग्रेस पक्षाची पाळंमुळं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही रुजलेली आहेत, काँग्रेसचे सहानुभूतीदार शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात आहेत, हे न विसरता हा मोडून पडलेला गाडा आधी चिखलातून काढून आणि मग दुरुस्त करून चालवावा, याचं भान नाना पटोळे यांना राहिलेलं नाही, असंच त्यांच्या या आततायी विधानावरून स्पष्ट होतं.

मोडून पडलेल्या या गाड्याला नव्या दमाचे घोडे किंवा बैल जोडून कुशलपणे सारथ्य नाना पटोळे करतील अशी अपेक्षा होती. थेट राहुल गांधी यांचा वरदहस्त लाभल्यामुळे संकटनात्मक पातळीवर डागडुजी करून नाना पटोळे काँग्रेस पक्षात चैतन्य निर्माण करतील असं वाटत होतं, पण तसं काही घडताना दिसत नाहीये. गावोगाव मेळावे घेणं आणि सर्वांना एकाच वेळी अंगावर ओढवून घेणं, हेच पक्षकार्य असतं, असा बहुधा त्यांचा समज झालेला असावा. त्यात त्यांच्या अशा भडकावू वक्तव्यांना मोठी प्रसिद्धी मिळते. ती पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आणि काडीमात्र उपयोगाचीही नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. अशी प्रसिद्धी  देणं ही माध्यमांची गरज आहे, हेही त्यांनी विसरता कामा नये.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

माझी एक आवडती मांडणी आहे- माध्यमं ही ‘नाच्या’ असतात. त्यांना बॅंड कोण वाजवतंय आहे, याच्याशी काही घेणं-देणं नसतं; वाजवण्याचे आवाज आले की, नाच्या जसा नाचायला सुरुवात करतो, तसं चटपटीत किंवा भडकावू वक्तव्य हाती आलं की, ते करणाऱ्या व्यक्तीला प्रसिद्धी देण्यात माध्यमांना रस असतो. कारण ती व्यक्ती नव्हे तर पद माध्यमांसाठी महत्त्वाचं असतं. पक्षाचं संघटन मजबूत होतं किंवा नाही, कोणाचं कुठे तरी स्थान मजबूत होतं की नाही, याच्याशी माध्यमांना काही सोयरसूतक नसतं, तर ती माध्यमांची मजबूरी असते.

नाना पटोळे यांनी हे कायम लक्षात ठेवावं की, ते सांगडी मतदारसंघातून भंडारा जिल्हा परिषदेवर निवडून आलेले सदस्य आजही असते, तर त्यांना आज मिळते तेवढी प्रसिद्धी कधीही मिळाली नसती. ते प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून माध्यमांचे कथित लाडके आहेत. आणि माध्यमांचं लाडकं असण्यापेक्षा नाना पटोळे पक्ष संघटन कसं मजबूत करतात. यात काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी, तसंच समर्थक आणि हितचिंतकाना रस आहे. उतावीळपणे वागून आणि बोलून भलेही मोठी प्रसिद्धी मिळत असेल, पण त्याचा पक्षवाढीसाठी काडीमात्र उपयोग नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......