अशाच एका वाचनात मला ‘फइटन’ हा शब्द आढळला आणि ‘क्रीड’सारखंच आणखी एक जुनं कोडं सुटलं!
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 25 June 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध क्रीड Creed फइटन Feuilleton इलक्युब्रेट elucubrate

शब्दांचे वेध : पुष्प अडतिसावे

आजचे शब्द : ‘क्रीड’, ‘फइटन’ आणि ‘इलक्युब्रेट’

कोणे एके काळी (म्हणजे फार नाही, जेमतेम वीस-पंचवीस वर्षांपूर्वी) कोणत्याही दैनिकाची रविवार पुरवणी वाचणं, हा जवळपास प्रत्येक वाचकाचा एक खास कार्यक्रम असायचा. कथा, कविता, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील गंभीर लेख, काही हलकंफुलकं विनोदी साहित्य, व्यंगचित्रं, महिला आणि मुलांसाठी खास स्तंभ, राशीभविष्य, संगीत-चित्रपट - अन्य कलाप्रकार यांच्यावरचे लेख, अशा अनेकविध लालित्यपूर्ण मजकुरानं नटलेल्या या पुरवण्या रविवारचा अख्खा दिवस वाचकांचं मनोरंजन करत असत. आजही या पुरवण्या असतात, नाही असं नाही. इंटरनेटमुळे आजकाल त्या ऑनलाईनदेखील वाचायला मिळतात. पण त्यात ती जुनी मजा नाही. का, कोण जाणे!

तो काळ वेगळाच होता. टीव्ही नुकताच आला होता, इंटरनेट बाल्यावस्थेत होतं, सेलफोन नव्हते. मासिकं, पुस्तकं आणि त्या जोडीला वर्तमानपत्रं हेच आपलं बौद्धिक आणि विरंगुळापर खाद्य होतं. भरपूर जेवून मग रविवारची दुपार पलंगावर लोळत वाचण्यात घालवण्याची एक अनोखी गंमत तेव्हा असे. जोडीला रेडिओवर ‘विविध भारती’ची गाणी असत. ती ऐकता ऐकता आणि वाचता वाचता झोप केव्हा लागायची हे कळायचंही नाही!

माझ्या लहानपणी नागपुरातून दोन-तीन वर्तमानपत्रं प्रसिद्ध होत असत. मुंबईहून ‘महाराष्ट्र टाईम्स’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या डाक आवृत्या येत असत. दिल्ली, मुंबई, कलकत्ता (आता कोलकाता) येथून इंग्रजी वृत्तपत्रंदेखील अशीच यायची. आज डाक आवृत्ती हा प्रकार आणि तो शब्दही कालबाह्य झाला आहे. डाक आवृत्ती म्हणजे early edition. यातल्या बातम्या बहुतेक शिळ्याच असायच्या, पण आम्हाला वाट असायची, ती त्यांच्या रविवार पुरवण्यांची.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

स्थानिक वर्तमानपत्रांपेक्षा मुंबईच्या वृत्तपत्रांच्या या पुरवण्या जास्त चांगल्या असतात, असा तेव्हा एक समज होता. कारण त्यात मुंबई-पुण्याकडचे मातब्बर लेखक लिहीत असत. आमच्या भागात या आवृत्त्या विकणारा एकच पेपरस्टॉलवाला होता. त्याच्याकडे आमची ‘standing order’ असायची. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास त्याच्या दुकानात जाऊन आपले पेपर ताब्यात घेणं, हादेखील एक विशेष कार्यक्रम तेव्हा असायचा. या प्रती तेव्हा मुंबईहून कलकत्ता मेलनं यायच्या असं आठवतं. नंतर हवाई मार्गानं या आवृत्त्या येऊ लागल्या. (त्या नंतर तर या वर्तमानपत्रांनी आपली नागपूर आवृत्तीच सुरू केली.) कधी कधी नोंदवलेल्या प्रतींपेक्षा कमी माल मुंब‌ईहून यायचा. मग जो ग्राहक आधी आला असेल त्याला त्या प्रती देऊन दुकानदार मोकळा व्हायचा. उशीरा आलेले लोक मग त्याच्याशी हुज्जत घालायचे. खूप मस्त दिवस होते ते!

इंग्रजी वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांचा साहेबी थाट असायचा. त्यात उत्तमोत्तम लेखांसोबत अमेरिकन कॉमिक स्ट्रिप्स् असायच्या. क्रॉसवर्ड्स असायचे. यात मला ‘द हिंदू’ या मद्रास (आता चेन्नाई)हून प्रकाशित होणाऱ्या

वर्तमानपत्राची रविवार पुरवणी सगळ्यात जास्त आवडत असे. (पुढे कधीतरी एकदा ‘द हिंदू’च्याच रविवार पुरवणीत माझा पहिलावहिला इंग्रजी लेखही प्रसिद्ध झाला होता!)

मी लिहायला सुरुवात केल्यावर नागपुरातल्याच ‘तरुण भारत’ या दैनिकाच्या रविवार पुरवणीत माझं बरंचसं प्रारंभिक लिखाण प्रसिद्ध झालं. रविवारी सकाळी लवकर उठून ताजा पेपर पहिल्यांदा आपल्या हातात घेऊन आपला स्वतःचा लेख किंवा कथा वाचायची एक और नशा असायची.

खूप नंतर मीही काही काळासाठी नागपुरातल्या ‘नागपूर पत्रिका’ (मराठी) आणि ‘नागपूर टाईम्स’ (इंग्रजी) या वृत्तपत्रांत काम केलं. त्यातला बराचसा वेळ ‘डेस्क’वर म्हणजे आमच्या स्वतःच्या वार्ताहरांकडून आलेल्या आणि PTI, UNI यासारख्या वृत्तसंस्थांकडून टेलीप्रिंटरवर आलेल्या बातम्यांवर उपसंपादकीय संस्कार करण्यात जरी गेला असला तरी रविवार तसंच अन्य mid-week (सप्ताहमध्य) पुरवण्यांचं संपादन करण्याची संधीही मला काही काळासाठी मिळाली होती. त्यामुळे या पुरवण्यांचं मॅजिक (आणि गणित) काय असतं, हे मला जवळून अनुभवता आलं.

टेली (Tele) म्हणजे दूरचा, दुरून. टेलीप्रिंटर म्हणजे दुरून येणारा मजकूर छापणारं यंत्र. दूरमुद्रक. संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी त्याचा उपयोग एकोणिसाव्या शतकातच होऊ लागला होता. टेलीग्राम, टेलीफोन, टेलीव्हिजन यासारख्या शब्दांतला ‘टेली’ हाच आहे. टेलीप्रिंटरला teletypewriter, teletype अथवा TTY असेही पर्यायी शब्द आहेत. कोणत्याही एका ठिकाणी किंवा एकाच वेळी अनेक ठिकाणी एकच संदेश पाठवायला या (एक प्रकारच्या) विद्युत टंकलेखन यंत्राची मदत घेतली जात असे. १९३१नंतर हळूहळू त्याचा वापर जगभरच्या वर्तमानपत्रांना आणि रेडिओ-टीव्ही केंद्रांना बातम्या पुरवण्यासाठी होऊ लागला. संगणकांचं युग आणि इंटरनेट आल्यावर मात्र या बिचाऱ्याचे दिवस भरले. Aviation म्हणजे विमानचालन क्षेत्रासारख्या अगदी मोजक्या ठिकाणीच आता त्याचा वापर केला जातो.

टेलीप्रिंटर या यंत्राला वर्तमानपत्रांच्या खास भाषेत ‘क्रीड’ (creed) असं म्हणतात, असं मला त्या वेळी पहिल्यांदा कळलं. पण असं का म्हणतात, हे मात्र तिथल्या कोणालाच माहीत नव्हतं. याचा उलगडा खूप वर्षांनी, मी पत्रकारिता सोडल्यावरच झाला. हे यंत्र तयार करण्यात अनेक शास्त्रज्ञांचा हात असला तरी पहिलं व्यावसायिक टेलीप्रिंटर Frederick G. Creed या शास्त्रज्ञाच्या Creed & Company या ब्रिटिश कंपनीनं १९३१ साली यशस्वीरीत्या बाजारात आणला आणि म्हणून त्याच्या स्मरणार्थ टेलीप्रिंटरला ‘क्रीड’ मशीन या टोपणनावानंही ओळखलं जाऊ लागलं. पुढे त्यातलं नुसतंच ‘क्रीड’ शिल्लक राहिलं.

इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांतल्या ललित पुरवण्या संपादित करण्याचा माझा अनुभव दीर्घकालीन नसला तरी त्यातला आनंद मी भरपूर लुटला. पुढे मी पत्रकारितेतून बाहेर पडलो आणि मग फक्त वाचक म्हणून पुन्हा मूळपदावर आलो. विविध भाषांमधल्या शब्दांचा अभ्यास करण्याची गोडी मला पहिलेपासूनच होती. त्यासाठी एखादी कादंबरी वाचावी तसं मी वेगवेगळे शब्दकोश वाचत होतो. अजूनही वाचतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अशाच एका वाचनात मला ‘फइटन’ हा शब्द आढळला आणि ‘क्रीड’सारखंच आणखी एक जुनं कोडं सुटलं. वर्तमानपत्रांतल्या रविवार आणि अन्य पुरवण्यांना ‘सप्लिमेंट’ किंवा ‘पुलआउट’ याखेरीज आणखी काही विशिष्ट शब्द आहे का, या माझ्या (मी मलाच विचारलेल्या) प्रश्नाचं उत्तर मला या शब्दातून मिळालं. ‘फइटन’ म्हणजे वर्तमानपत्रांतल्या ललित पुरवण्या.

Feuilleton हा एक फ्रेंच शब्द आहे. त्याचा उच्चार त्या भाषेत ‘फइटन’ (fœjtɔ̃) असा होतो. फ्रेंचमध्ये feuillet म्हणजे पुस्तकाचं पान. त्यापासून हा शब्द बनला आहे. सुरुवातीला फ्रेंचभाषी वृत्तपत्रं फक्त बातम्या (त्याही मुख्यत्वे करून राजकीय बातम्या) छापत असत. आपला खप वाढावा, यासाठी पुढे त्यांनी बातम्या असलेल्या मुख्य अंकाला जोडून साहित्य, संगीत, कला, हास्य, व्यंग, फॅशन, गॉसिप यांसारख्या ललित आणि अन्य (गैर राजकीय) विषयांवरचं लेखन असलेल्या खास पुरवण्याही छापणं सुरू केलं. या पुरवण्यांना ‘फइटन’ असं नाव देण्यात आलं.

या नामकरणाचं श्रेय ‘जुर्नाल दे देबा’ (Journal des débats) या नियतकालिकाच्या Julien Louis Geoffroy आणि Bertin the Elder या संपादकद्वयाकडे जातं. १८००मध्ये त्यांनी हे नाव शोधून काढलं आणि ते अल्पावधीत लोकप्रिय झालं. लवकरच त्यांचा कित्ता इतरांनीही गिरवणं सुरू केलं. ‘फइटन’ला ‘talk of the town’ असंही म्हटलं जात असे. सुप्रसिद्ध ‘द न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकात याच नावाचा एक स्तंभ अजूनही प्रसिद्ध केला जातो.

इंग्रजीत मात्र रविवार वा अन्य पुरवण्यांसाठी ‘फइटन’ हा शब्द आरंभी वापरला जात नसे. ही अर्थच्छटा इंग्रजीत बरीच उशीरा आली. तोवर हा शब्द ‘कथामालिका’ (a serial story) या अर्थानं या भाषेत वापरला जात असे.

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत इंग्लंड आणि अमेरिकेत अक्षरशः शेकडो नियतकालिकं प्रसिद्ध होत असत. त्यात  कॉनन डॉयल, पी. जी. वुडहाऊससारखे अनेक ख्यातनाम लेखक आपले साहित्य प्रकाशित करत असत. एकाच अंकात कथा संपत असेल तर तिला ‘वन शॉटर’ म्हणत. पण दीर्घ कथा किंवा कादंबरी जर असेल ती हफ्त्याहफ्त्यानं छापली जाई. (मग तिचं पुस्तक निघायचं.) या अशा इन्स्टॉलमेंटवाल्या साहित्याला आरंभी इंग्रजीत ‘फइटन’ किंवा ‘a serial story’ असं म्हटलं जायचं. वुडहाऊसची बहुतेक पुस्तकं ही याच मार्गानं प्रकाशित झाली आहेत. एकच ‘फइटन’ एकाच वेळी (किंवा काही अंतरानं) इंग्लंडमधल्या आणि अमेरिकेतल्या दोन वेगळ्या नियतकालिकांत छापून येत असे. आधुनिक फ्रेंच भाषेत आता ‘फइटन’ हा शब्द टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या डेली सोप ऑपेरां (मालिकां)साठी वापरला जातो.

फ्रान्समध्ये जन्म घेतलेल्या या ‘फइटन’ सुरुवातीला वेगळ्या पुरवणीच्या स्वरूपात नसत. मुख्य पेपरच्याच पानांवर ललित साहित्य तळाशी छापलं जात असे. पानाच्या वरच्या भागावर राजकीय समाचार आणि खाली ‘तळमजला’ किंवा ‘ग्राउंड फ्लोअर’वर गैर राजकीय मजकूर, पण तो बारिक टाइपात असे. दोघांतला फरक कळावा म्हणून मध्ये एक जाड रेष असे. (आम्ही या रेषेला मराठीत ‘रूळ’ म्हणायचो.) १८३६ मध्ये पॅरिसमधल्या ‘La Presse’ या वर्तमानपत्रानं जगातली पहिली ‘फइटन’ स्वतंत्र पुरवणीच्या रूपात प्रसिद्ध केली. हळूहळू हे लोण युरोपभर पसरलं आणि मग जगभर.

आज ‘फइटन’चा अर्थ बराच व्यापक झाला आहे. ठराविक दिवशी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणारं ठराविक लेखकांचं स्तंभलेखन, रेडिओ किंवा टीव्हीवर ठराविक वेळी प्रसारित होणारे ‘टॉक शो’ यांनाही फइटन असं नाव आता दिलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ ऑप्रा विन्फ्री (Oprah Winfrey) किंवा डेव्हिड लेटरमनचा टॉक शो. आपल्याकडच्या शेखर सुमन, अवधुत गुप्ते यांच्या टीव्ही शोंनासुद्धा ‘फइटन’ म्हणता येईल.

S. J. Perelman हा प्रख्यात विनोदी लेखक असे ‘फइटन’ लेखन करत असे. म्हणून तो स्वतःचं वर्णन  ‘फइटनिस्ट’ (feuilletoniste) असं करायचा.

माझ्या अल्पजीवी वृत्तपत्रीय कारकीर्दीकडे या लेखाच्या निमित्तानं मला मागे वळून पुन्हा एकदा बघता आलं. या काळात मी खूप काही शिकलो. वृत्तपत्रांचं जग मला जवळून अनुभवता आलं. पत्रकारितेची एक खास भाषा (jargon) असते, ती समजली. चांगली आणि वाईट पत्रकारिता यातला फरक समजला. मुख्य म्हणजे पत्रकारिता कशी करावी, यापेक्षा ती कशी करू नये, हे प्रकर्षानं जाणवून घेता आलं. हा एक जिवंत वस्तूपाठ (object lesson) होता. याबद्दल अजून बरंच काही लिहिता येण्यासारखं आहे, पण ते या लेखात नको.

-------

आजचा पस्तुरी किंवा lagniappe शब्द एका अर्थानं पत्रकारांनाही लागू पडतो. हा शब्द आहे – ‘इलक्युब्रेट’ (Elucubrate). आज विस्मृतीत गेलेल्या या शब्दाचा अर्थ आहे, एखादी ‘डेडलाईन’ पाळायला रात्रीचा दिवस करून, प्रचंड मेहनत घेऊन काही लेखन करणं. अगदी टॉपची काही वृत्तपत्रं सोडली तर बाकीच्या वर्तमानपत्रांतल्या बातमीदारांवर अशी वेळ अनेकदा येत असते. (निदान त्या काळात येत असे.) रात्री उशीरा मिळालेल्या माहितीवर आधारित आपल्या अत्यंत महत्वाच्या ‘एक्स्क्लुझिव’ बातमीला किंवा ‘स्कूप’ला उद्याच्या पेपरची छपाई सुरू व्हायच्या आधी पहिल्या पानावर जागा मिळवून देण्यासाठी त्यांना कधी कधी पहाटे तीन वाजेपर्यंत काम करावं लागतं. छपाईयंत्राच्या प्रमुखाला थोडा थांब, इतक्यात मशीन सुरू करू नकोस, किंवा सुरू केलं असेल तर ते बंद कर (Stop Press), असे निरोप पाठवावे लागतात. तो प्रेसवालाही बिचारा डेडलाईनखाली काम करत असतो. त्यामुळे या बातमीदाराला आपली ‘कॉपी’ भरभर लिहावी लागते (आता टाईप करावी लागते.) तीही बिनचूक. हे असं प्रेशरखाली जीवतोड मेहनतीनं लेखन करणं म्हणजे ‘इलक्युब्रेट’ करणं. रात्रभर जागून परिक्षेचा अभ्यास करणं, यासाठीही ही संज्ञा वापरता येते. इंग्रजीत ‘to burn the midnight oil’ हा आणखी एक वाक्प्रचार याच अर्थानं उपयोगात आणला जातो. ‘Elucubrate’ या शब्दाचं मूळ लॅटिन भाषेतल्या lucubro या शब्दात सापडतं.

Lux म्हणजे प्रकाश. Luceo म्हणजे ‘मी दिव्याच्या प्रकाशात काम करतो’. (वीज येण्यापूर्वीच्या काळात) मेणबत्ती किंवा तेलाच्या दिव्यांच्या उजेडात रात्री उशीरापर्यंत काम करणं, यासाठी ‘elucubrate’ हा शब्द वापरला जात असे. यातूनच ‘to burn the midnight oil’ हा वाक्प्रचार तयार झाला.

माझ्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत माझ्यावरही एकदा असा ‘elucubrate’ करण्याचा प्रसंग आला होता. तेव्हा मी ‘नागपूर पत्रिका’ या मराठी दैनिकात उपसंपादक होतो. त्या दिवशी माझी रात्रपाळी होती आणि पहिलं पान तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. रात्री बारा साडेबारापर्यंत सगळं आटोपलं. सगळे उपसंपादक, प्रमुख उपसंपादक, सगळे वार्ताहर घरी गेले. उरलो फक्त मी. अडीच वाजता छपाई सुरू होणार होती. (तीन वाजता फक्त नागपूर शहरासाठीच्या प्रतींची छपाई सुरू होत असे.) त्यानंतर आम्हाला घरी जाता येत असे. एक वाजता चहा पिऊन झाला. मग खालच्या मजल्यावर प्रेस फोरमनशी गप्पा करत टाईमपास करत होतो. (भन्नाट घाणेरड्या शिव्या देणारा तो एक अस्सल नागपुरी बाण्याचा इरसाल नमुना होता!) पावणे दोन वाजता जांभई देत मी त्याला म्हणालो, ‘चलो, सगळं नीट चालू आहे, आज जरा लवकर घरी पळतो.’ तोही हसत म्हणाला, ‘जा, काही घोर नाही.’ कारण काहीच विशेष नसलेली ती एक सामान्य शांत रात्र होती.

त्यादिवशी (बहुतेक) बनकर नावाचा एक चपराशी माझ्या जोडीला होता. त्याला मी वरच्या मजल्यावर जाऊन ‘क्रीड’ बघायला सांगितलं. बहुतेक वेळी ती टेलीप्रिंटर यंत्रंही याच वेळी झोपी जात असत (सकाळी सहापर्यंत). काही आलंच असेल तर ते बघून निघावं असं मी ठरवलं होतं. काही वेळानं बनकर रमतगमत क्रीडवरचे कागद घेऊन आला. मी सहज म्हणून एक नजर त्या कागदांवर टाकली आणि एक हात वर उडालोच.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अमृतसरच्या सुवर्णमंदिरात मध्यरात्रीनंतर भारतीय सैन्यानं प्रवेश केला असल्याची आणि तिथून गोळीबाराचे आवाज येत असल्याची ‘फ्लॅश न्यूज’ मशीनवर आली होती. त्या काळी फक्त लॅंडलाईन फोन होते. आणि ते ही घरोघरी नव्हते. त्यामुळे कोणत्याही वरिष्ठांशी संपर्क करण्याचा प्रश्नच नव्हता. एकदम मॅनेजिंग डायरेक्टरलाच फोन करावा लागला असता. मग मीच माझ्या जबाबदारीवर फोरमनला लायनो मशिन चालवणाऱ्या कंपोझिटरला थांबवायला सांगितलं. त्याची ड्युटी दोन वाजता संपत असे. मी क्रीडवर आलेल्या इंग्रजी मजकुराचं पटापट मराठी भाषांतर करून कॉपी त्याच्या हातात दिली. ऑफसेट छपाई यंत्र चालवणाऱ्या कामगारांच्या रात्रीच्या साहेबाला (दुय्यम सुपरव्हायझरला) काय झालं ते सांगितलं. त्यानं लगेच पहिल्या पानाची नवीन छपाई प्लेट करण्याचा हुकूम दिला. दहा मिनिटांत लायनो ऑपरेटरनं मजकूर तयार केला. मी घाईघाईनं त्याचं गॅली प्रुफ तपासून पाहिलं. सगळं ठीक होतं. फोरमननं माझ्या देखरेखीखाली पहिल्या पानावरचा आधीचा काही मजकूर काढून टाकून तिथे हा नवा STOP PRESS मजकूर भरला. लगेच ते पान पुढच्या प्रक्रियेसाठी दुय्यम सुपरव्हायझरच्या हवाली करण्यात आलं. (ही प्रक्रिया बरीच किचकट असते. तिच्या तपशिलात या वेळी जाण्याची गरज नाही.) त्याची प्लेट तयार झाल्यावर ती छपाई यंत्रावर चढवण्यात आली. आणि रोजच्या पेक्षा फक्त पंधरा-वीस मिनिटांच्या उशीरानं छपाई सुरू झाली. फार मजेशीर अनुभव होता तो.

अर्थात मी जे केलं त्याला ‘elucubrate’ करणं म्हणतात, हे मला त्या वेळी माहीत नव्हतं. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण ‘मिस’ केली नाही, एवढंच समाधान होतं. आणखी काही बातमी येते का, हे बघण्यासाठी चारपर्यंत थांबून मगच आम्ही सगळे घरी गेलो.

वो भी क्या दिन थे!

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......