हा गळाठा हटवणारी लस शोधणार तरी कोण?
पडघम - देशकारण
अभय टिळक
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 31 March 2021
  • पडघम देशकारण करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus कोविड-१९ Covid-19

पुरेपूर एक वर्ष उलटून गेले तरी ‘लॉकडाऊन’चे सावट आपली पाठ सोडण्याचे नाव घेत नाही, ही वस्तुस्थिती जितकी चिंताजनक तितकीच चिंतनीयही आहे. काही राज्यांमध्ये आणि त्या-त्या राज्यांतील काही निवडक शहरांमध्ये ‘कोविड-१९’ने पुन्हा डोके वर काढल्याने २०२०मधील मार्च महिन्यात अंगावर कोसळलेल्या ‘लॉकडाऊन’च्या कटू आठवणींनी जवळपास सगळ्यांनाच पुरते भयशंकित करून सोडलेले आहे. सर्वसामान्य नागरिकांचा केवळ धीरच नव्हे, तर संयमही आता पातळ व्हायला लागलेला दिसतो. खास करून, ‘लॉकडाऊन’पायी ज्या समाजघटकांनी पराकोटीचे आर्थिक चिमटे सहन केले, ते तर आता पार हातघाईला आलेले आहेत. ‘काहीही झाले तरी पुन्हा लॉकडाउन नको’, अशी एक सार्वत्रिक मानसिकता झाल्याचे आपण अनुभवतो आहोत.

मुळात, ‘कोविड’चा प्रादुर्भाव हा लोकसंख्येच्या घनतेशी निगडित असल्यामुळे शारीरिक अंतर राखण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याखेरीज अन्य काही हुकमी उपायच नाही, ही या सगळ्यांतील सर्वांत अनोखी बाब होय. आणि, प्रचंड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात दाटीवाटीचा जनसंपर्क हेच रोकडे वास्तव असल्यामुळे ‘कोविड’च्या फैलावाला सुपीक भूमी सततच नांगरून तयार असते. सार्वत्रिक शिस्तीचा एकंदरीनेच असणारा घाऊक अभाव हा त्याच्याच जोडीने आणखी एक पूरक घटक.

लसीकरणाच्या संदर्भातील उदंड गोंधळ आणि बेपत्ता असणारी सुसूत्रता व समन्वय पाहता शेवटच्या नागरिकाला लस मिळायला कोणते वर्ष उजाडेल, हे निश्चित सांगण्याच्या परिस्थितीत निदान आज तरी कोणीच नाही. भरीस भर म्हणून की काय, पण राज्यसंस्थेबाबत सर्वसामान्यांच्या मनात वसणाऱ्या विश्वासाची सरासरी पातळी आज पार रसातळाला गेलेली असल्यामुळे, ‘कोविड’ची साथ आटोक्यात खरोखरच आलेली नाही की, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी लसनिर्मितीसाठी केलेल्या अब्जावधीच्या गुंतवणुकीवर त्यांना अपेक्षित असणारा फायदा मिळण्याची सोय ‘कोविड’च्या दुसऱ्या लाटेची आवई उठवून संगनमताने केली जाते आहे, याबद्दलही अनंत प्रकारच्या वावड्या प्रत्यही कानांवर येत आहेत.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566

..................................................................................................................................................................

हे काहीही असले तरी, ‘कोविड’संदर्भातील गेल्या वर्षभरात साकारलेल्या घडामोडी आणि राजकीय व्यवस्था व शासकीय पातळीवरून त्यांना दिला गेलेला पडसाद यांमध्ये दोन बाबी सातत्यशील राहिलेल्या जाणवतात. व्यापक स्तरावरील कोणत्याही संकटाला तोंड देताना कमालीची तोकडी ठरणारी राज्यसंस्थेची व्यवस्थापनक्षमता कसोटीच्या याही काळात ठसठशीतपणे डोळ्यांत भरली. ही झाली पहिली बाब. राज्यसंस्थेच्या दुर्बळ क्षमतेसंदर्भात चिकित्सक आणि बौद्धिक ऊहापोह अनेक व्यासपीठांवरून उदंड घडला. आजही त्यांत खंड नाही.

परंतु, कमजोर राहिलेली (अथवा, जाणीवपूर्वक मरतुकडी राखली गेलेली) ही ‘स्टेट कपॅसिटी’ बुलंद कशी बनवायची आणि त्या दिशेने जाण्याच्या मार्गावरील मुख्य टप्पे कोणते, या संदर्भातील व्यावहारिक व प्रगल्भ चर्चेचा आजही कोठे मागमूस नाही. दुसरे म्हणजे, कोणत्याही संकटाच्या लांबी-रुंदीशी सुसंगत भासणाऱ्या औरस-चौरस उपाययोजनांसंदर्भात प्रचंड रकमांच्या तरतुदींची घोषणा करण्याची सत्ताधाऱ्यांना असणारी अतोनात हौस गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र ठासून भरलेली असल्याचे वास्तव ‘कोविड’ने पुन्हा एकदा अधोरेखित केले, ही सातत्यशीलतेने प्रतीत झालेली दुसरी वस्तुस्थिती.

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हे त्याचे बोलके व ठळक उदाहरण. अरिष्टाच्या मुकाबल्यासाठी जितक्या अधिक रकमांच्या घोषणा कराव्यात, तितकी सरकारची उपक्रमशीलता अधिक दिसते, असा एक समज या विचित्र कार्यप्रणालीच्या मुळाशी आहे व असतो. अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलेल्या एखाद्या रोगावर अत्यंत महागडे औषध नेमून दिले की, रोग्याला जसा अंमळ दिलासा मिळतो, त्यातलाच हा प्रकार. जीवघेण्या रोगावर भारी किमतीची दवा दिलेली आहे म्हणजे ती जालीम रामबाण ‘ट्रीटमेंट’ असणारच, असा दिलासा काय तो रोग्याला त्यामुळे मिळतो. बस्स्‌! त्यापलीकडे काही नाही.

जबर बाजारभावाचे ते औषध रोगाच्या मुळाचा नायनाट करणारे आहे अथवा नाही, याची फिकीरही मग ना रोग्याला असते, ना त्याच्या सग्यासोयऱ्यांना. ‘कोविड’ आणि त्याच्या फैलावापायी अवतरलेला ‘लॉकडाऊन’ यांच्या संदर्भातही आज घडते आहे ते नेमके हेच. सगळ्यांत चिंतेची आणि चिंतनीय बाब कोणती असेल, तर नेमकी हीच.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘करोना’चा फैलाव, त्याने उडवलेला हाहाकार, त्यासाठी करावा लागलेला ‘लॉकडाऊन’, सर्वसामान्यांच्या जगण्यापासून ते देशाच्या अर्थकारणापर्यंत जीवनाच्या प्रत्येकच अंगाला त्याच्या झोंबलेल्या झळा यांचे चित्र सर्वच जगात थोड्याफार फरकाने एकसमानच दिसले. परंतु, आपल्या देशात मात्र या सगळ्यापायी, तीन समाजघटक तुलनेने सर्वाधिक पोळले-भरडले गेले. शहरोशहरी फोफावलेल्या असंघटित उद्योगांच्या अस्ताव्यस्त विश्वात सामावून घेतले गेलेले कुशल-अकुशल-अर्धकुशल असे शब्दश: अगणित स्थलांतरित; लघुतम, लघु व मध्यम उद्योजक आणि शेतीसह एकंदरच ग्रामीण व्यावसायिक- हे ते तीन घटक होत. या तीन समाजघटकांची जी अतोनात परवड झाली, तिला ‘कोविड’इतकेच कारणभूत आहे ते आपल्या देशाच्या व्यवस्थापनात सर्वदूर पसरलेले प्रगाढ असंतुलन.

बेबंदपणे पोसले जाणारे बांडगुळी नागरीकरण आणि कुपोषणापायी खुरटलेले ग्रामीण अर्थकारण, हे त्या असंतुलनाचे प्रगट असे मुख्य दोन आयाम. ‘लॉकडाऊन’ने एकाच वेळी मुसक्या आवळल्या या दोघांच्याही. धडाकेबाज लसीकरणाद्वारे आज ना उद्या ‘कोविड’ हटेलही. मात्र दृढमूल झालेल्या या असंतुलनाबाबत आपण काय करणार आहोत, याबाबत आज तरी सर्वत्र बधिरताच जाणवते. चटकन आकलनात येणेदेखील दुरापास्त व्हावे, अशा रकमांच्या तरतुदी असणाऱ्या घोषणांच्या दणदणाटात मूळ दुखण्याची तीव्रता अनंत पटींनी वाढविणाऱ्या त्याच्या मूलभूत कारक घटकाकडेच दुर्लक्ष होईल, अशी भीती वाटते. ही भीती अनाठायी अजिबातच नाही, हे समजावून घेण्यासाठी २०२० मधील फेब्रुवारी-मार्च महिन्यांपासूनचा ढोबळ घटनाक्रम केवळ आठवून बघितला तरी पुरे.

‘कोविड’ नावाची एक महामारी चीनमध्ये धुमाकूळ घालत असल्याच्या बातम्या २०१९मधील नोव्हेंबर महिन्यापासूनच जागतिक समुदायाच्या कानांवर पडत होत्या. आपल्या देशात ‘करोना’चा चंचुप्रवेश घडला तो साधारणपणे २०२०मधील फेब्रुवारीच्या मध्यास. देशात ‘कोविड’चा प्रादुर्भाव प्रथम अतिशय जोरकसपणे झाला तो लोकसंख्येची प्रचंड दाटीवाटी असलेल्या महानगरांमध्ये. स्मरणशक्तीला जरा ताण दिला तर एक बाब निश्चित आठवावी.

ती अशी की, ‘कोविड’ हा आपल्या देशात तरी त्याच्या उद्रेकाच्या पहिल्या पर्वात निखळ ‘अर्बन फेनॉमेनन’ होता आणि ते अतिशय स्वाभाविकच होते. कारण १९९०-९१नंतर आर्थिक विकासाची आपल्या देशातील एकंदरच प्रक्रिया शहरीकरणाच्या वाढविस्तारास पोषक अशीच राहिलेली आहे. २००१-०२ ते २००८-०९ या काळात देशाच्या ढोबळ देशी उत्पादनातील वाढीचा वार्षिक सरासरी वेग राहिला आठ टक्क्यांच्या परिघात. त्या वाढीचे वर्णन त्या काळात सतत ‘जॉबलेस ग्रोथ’ असेच होत राहिले. ‘जॉबलेस ग्रोथ’ म्हणजे रोजगारात शून्य टक्के वाढ, असा अर्थ अजिबात नाही. सरासरी दरडोई उत्पन्न वाढत राहिले तरी त्याला समांतर अशा पद्धतीने वा वेगाने देशातील संघटित, कॉर्पोरेट उद्योगांच्या विश्वात रोजगारनिर्मिती घडून येत नव्हती. ती सगळी आर्थिक वाढ ‘जॉबलेस’ वाढ होती ती या अर्थाने. रोजगारवाढ चालू होती, पण ती मुख्यत्वेकरून नगरा-महानगरांतील असंघटित उद्योगांच्या विश्वात.

अतिरिक्त मनुष्यबळाच्या बोज्याखाली दबलेली शेती किफायतशीर राहिलेली नाही आणि सुयोग्य कौशल्ये व प्रशिक्षण नसल्यामुळे शहरी कॉर्पोरेट नोकऱ्यांच्या वाटा बंद झाल्या, अशा कोंडीत सापडलेल्या अकुशल-अर्धकुशल स्थलांतरितांना सामावून घेत राहते ते शहरी उद्योगांचे हेच लवचिक असे असंघटित क्षेत्र. ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’, असा प्रसंग ओढवलेल्या शहरी स्थलांतरितांचे मायपोट अखेर ठरते ते हेच असंघटित व्यवसायक्षेत्र. देशाच्या ग्रामीण भागांतून लोकसंख्येबरोबरच ग्रामीण गरिबांच्याही शहरांकडे होत राहिलेल्या स्थलांतराचे अक्राळविक्राळ दर्शन घडते ते शहरोशहरी फुगलेल्या उद्योग-व्यवसायांच्या याच असंघटित क्षेत्रात. इतकी वर्षे छुपी बेरोजगारी हे ग्रामीण भारताच्या पाचवीला पुजलेले वास्तव होते. आज तेच नेमके बनलेले आहे शहरी ‘इंडिया’चे भागधेय. शहरी संघटित उद्योगक्षेत्राशी या असंघटित क्षेत्राचे नाते असते बहुपदरी आणि नानाविध स्वरूपाचे.

‘लॉकडाऊन’ने संघटित उद्योगांच्या नाड्या आवळल्यानंतर साहजिकच हातपाय जखडले गेले ते त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योग-व्यवसायांच्या असंघटित क्षेत्राचे. मुळात, शहरी समाजजीवनात आणि अर्थकारणात ‘उपरे’च गणल्या जाणाऱ्या स्थलांतरितांना एकाएकी प्रगाढ निराधारपण जाणवावे, हे मग ओघानेच आले. ना त्यांची कायदेशीर गुंफण शहरी कॉर्पोरेट विश्वाशी, ना त्यांची नाळ जुळलेली नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी. केवळ कामापुरतेच जवळ करावयाच्या या क्षेत्राबद्दल कोणालाच बांधिलकी नव्हती आणि नाही. सगळी उपजीविका ज्या शहरी अर्थकारणावर विसंबलेली, त्या अर्थचक्राचेच चलनवलन ठप्प झाल्याने असंघटित क्षेत्रातील कामगार-मजुरांची गात्रे जायबंदी व्हावीत, हे तर्कशुद्धच होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

परंतु, पोटाचे गाणे तर्काचा बाजा वाजवून सुरेल बनवता येत नाही. जिथून शहरात आलो, त्या मूळ गावाकडे पुन्हा पाय वळवण्याखेरीज मग शहरी स्थलांतरितांना अन्य पर्यायच नव्हता. परतीच्या खडतर प्रवासात झालेले त्यांचे धिंडवडे साऱ्यांनीच बघितले. त्याबद्दल आतड्यापासून कळवळाही व्यक्त झाला. पण मुळात हे असे अधांतरी जगणे या प्रचंड मनुष्यबळाच्या भाळी लिहिणाऱ्या विकासविषयक धोरणदृष्टीबाबत आज एका वर्षानंतर तरी काही कोठे चर्चा, विचार, चिकित्सा चालू दिसते का?

बरे, निरुपायाने गाव जवळ करणाऱ्यांना तरी तिथे जगण्याची काय सोय होती? विकासाची सगळी प्रक्रियाच कमालीची असमान आणि शहरकेंद्री बनलेली असल्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर हजेरी लावण्याखेरीज परतीची वाट चोखाळलेल्या स्थलांतरितांना अन्य मार्गच नव्हता. म्हणजे, हा दैवदुर्विलास बघा कसा आहे तो. शहरांमधील अत्याधुनिक उत्पादनव्यवस्थेमध्ये शिरकाव करून घेता येईल, अशी कौशल्ये व शैक्षणिक क्षमता प्रचलित शिक्षणव्यवस्थेमध्ये न मिळाल्यामुळे स्थलांतर करूनही शहरांत रोजंदारीवर राबणेच नशिबी आले. श्रमांच्या शहरी बाजारपेठेतील ‘स्ट्रक्चरल’ असमतोल तिथे या स्थलांतरितांच्या तसा मुळावर आला. आणि शहरांमध्ये कुशल-अर्धकुशल रोजगार पदरात पाडून घेताना प्रत्यक्ष कार्यानुभवाद्वारे जी काही क्षमता या स्थलांतरितांनी कमावलेली होती, तिचा विनियोग करून घेण्याच्या संधी गावात नसल्यामुळे पुन्हा रोजगार हमीच त्यांच्या पदरी आली. म्हणजे, ग्रामीण भारतातील श्रमांच्या बाजारपेठेतही पुन्हा एक विचित्र असा ‘स्ट्रक्चरल’ असमतोल निर्माण होऊन नांदतो आहेच. ‘लॉकडाऊन’ने स्थलांतरितांची हानी केली ती अशी दुहेरी. 

‘साधना’ साप्ताहिकाच्या २७ मार्च २०२१च्या अंकातून साभार

.............................................................................................................................................

लेखक अभय टिळक पुण्यातील अर्थविज्ञानवर्धिनीचे संचालक आहेत.

agtilak@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Narendra Apte

Wed , 31 March 2021

या लेखात  मला प्रकर्षाने कळला तो आपल्या देशातील सद्य परिस्थितीसाठी जबाबदार असणाऱ्या राजकीय व्यवस्थेबद्दलचा संवेदनशील व्यक्तीदारे व्यक्त होऊ शकेल असा संताप; इथे मला दिसला एक आगतिकतेचा सूर. सध्याचे आर्थिक संकट एव्हढे मोठे आहे की इथे जाणवते करोडो भारतीयांची हतबलता. परन्तु प्रश्न आहे तो या परिस्थितीतून सावरायचे कसे हा. नजीकच्या भविष्य काळात या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही ही सार्वत्रिक भावना झाली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला सद्य परिस्थितीसाठी जे राजकीय-आर्थिक भाष्यकार आणि अर्थतज्ज्ञ जबाबदार धरत आहेत ते १९९० नंतरचा आपल्या अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा झाला याकडे कानाडोळा तरी करत आहेत किंवा ते वैचारिकदृष्ट्या निष्क्रिय आणि निष्प्रभ झाले आहेत असे म्हणायला हवे. सर्वसामान्य छोटे शेतकरी आणि ग्रामीण भागातील भूमिहीन मजूर यांचे आयुष्य जर थोडेफार सुकर करायचे असेल तर त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे उत्पन्न वाढवण्यासाठी काही कार्यक्रम राबवणे आवश्यक असते. परंतु या घटकांचा शक्य असेल तेव्हा मतदार म्हणून वापर करून घ्यायचा आणि इतर वेळी त्यांना वाऱ्यावर सोडायचे हे धोरण सर्व राजकीय पक्षांत दिसते. या समाजघटकांचे आणि ग्रामीण भागातून शहरात आलेल्या लाखो असंघटित मजुरांचे प्रश्न कोरोनाच्या साथीमुळे अधोरेखित झाले. या समयी त्यांच्या जीवन-मरणाच्या लढाईत कोण सामील झाले होते? सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष या बाबतीत काही वेगळे नाहीत हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले. या संदर्भात मला आणखी एक मूद्दा नमूद करावयाचा आहे. बहुसंख्य जनतेचे जे आर्थिक-सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी लोकशाही समाजवादी रचना उपयुक्तआहे असे डाव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते असणाऱ्यांची धारणा असते. माझ्या मते या संबंधी विचार करताना लोकशाही समाजवादी विचार कुठे कमी पडले याबद्दलची चर्चा खुलेपणाने झाली पाहिजे. या चर्चेत उपयुक्त ठरू शकणार श्री वसंत पळशीकर यांच्या मराठी विश्वकोशातील 'लोकशाही समाजवादा" वरील टीपणातील काही भाग मला समर्पक वाटला तो भाग येथे मी उर्धृत करत आहे: “लोकशाही समाजवादाच्या आर्थिक फेरमांडणीविषयी लोहियांनी दोन गोष्टी महत्त्वाच्या मांडल्या. भारतातील मनुष्यबळाची उपलब्धता व भांडवलाची कमतरता ध्यानात घेता, तसेच संपत्ती व सत्तेचे केंद्रीकरण रोखण्याच्या दृष्टीने, येथे श्रमसधन अल्पप्रमाण यंत्रांचा वापर अधिकात अधिक करणे श्रेयस्कर ठरेल, असे त्यांनी प्रतिपादले. आज हेच तत्त्व समुचित तंत्रविज्ञान या शब्दप्रयोगाने मांडले व ओळखले जाते. प्रत्येकास अर्थपूर्ण रोजगार मिळावा व त्याआधारे किमान जीवन वेतनाची हमी मिळावी. ही बाब सर्वाधिक अग्रक्रमाची मानून या देशात आर्थिक विकासाची व्याख्या तसेच नियोजन केले जावे, या गांधीजींच्या आग्रहाचे प्रतिबिंब लोहियांच्या विचारात पडलेले दिसते. रोजगार, समता व न्याय प्रस्थापनेचा मुद्दा वा व्यक्तिस्वातंत्र्य असो, विकासाच्या मार्गक्रमणात त्या गोष्टी आपल्या पदरात थोड्याथोड्या का होईना पडत आहेत वा अनुभवाला येत आहेत, अशी प्रचीती शोषित-पीडित व दरिद्री-बेकार व्यक्तींना आली पाहिजे. ‘तत्काळ पडताळ्याचे तत्त्व’ (प्रिन्सिपल ऑफ इमीडीअसी) लोहियांनी मांडले मात्र दुर्दैवाने, ‘समुचित तंत्रविज्ञाना’ विषयी, विकेंद्रित अर्थ आणि उद्योग–व्यापार संरचनेविषयी वा पर्यायी विकासनीतीविषयी अधिक सखोल वा तपशीलवार मांडणी नंतरच्या काळात लोकशाही समाजवादी चळवळीमध्ये केली गेली नाही.” वसंत पळशीकरांचे हे विचार या संबंधी आणखी विचार-विनिमय करण्यासाठी वाचकांना उपयुक्त वाटले तर हा पत्र-प्रपंच सफल होईल असे वाटते. -नरेंद्र महादेव आपटे पुणे 31.03.21


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा