युरोपमध्ये सुट्टी घालवत असताना २५ वर्षांपूर्वीची घटना माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली...
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
  • रोम शहराचे काही छायाचित्रं
  • Wed , 03 March 2021
  • पडघम माध्यमनामा रोम Rome इटली Italy पत्रकारिता Journalism

‘सोफिया-मॉस्को-दिल्लीऐवजी सोफिया-रोम-दिल्ली अशा बदललेल्या मार्गाने उड्डाण करण्यासाठी एरोफ्लोट एअरलाईन्समध्ये केवळ दोन जागा उपलब्ध आहेत. बदललेल्या प्रवासमार्गासाठी अतिरिक्त शुल्क बल्गेरियन चलन १० लेव्ह असेल.’

आम्ही तीन भारतीय पत्रकार बल्गेरियाची राजधानी सोफिया येथील एरोफ्लोट एअरलाईन्सच्या कार्यालयात पोहोचलो होतो. आमच्या सोफियातून परतीच्या विमानाचा मार्ग रशियातील मॉस्कोऐवजी बदलून रोमला जाण्यासाठी दोन दिवसांचा इटलीचा ट्रान्झिट व्हिसा मिळवू शकतो, असे आम्हाला कळाले होते. त्यामुळे युरोपात आहे तेव्हा भारताकडे परतीचा विमानमार्ग बदलून इटलीचाही दौरा करावा, या हेतूने तातडीने आम्ही सोफियातील एरोफ्लोट कार्यालयात पोहोचलो होतो.

तेव्हा परतीचा प्रवास बदलण्यासाठी रोममार्गे फक्त दोनच तिकिटे आता मिळू शकतील, असे आम्हाला सांगण्यात आले होते. दोन दिवसांनंतर आमचा बल्गेरियाचा व्हिसा संपणार होता आणि त्यानंतर एक दिवससुद्धा बल्गेरियात आम्हाला राहणे शक्य नव्हते.

ही घटना एप्रिल १९८६ची आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेने (IOJ, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टस) पत्रकारिता अभ्यासक्रम आयोजित केला होता आणि भारतीय श्रमिक पत्रकार संघटना (फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट्स) यांनी देशातील विविध भागांतील ३० पत्रकारांची या अभ्यासदौऱ्यासाठी निवड केली होती.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

१९८०च्या दशकात आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना भारतीय पत्रकारांसाठी दरवर्षी सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या विविध युरोपियन देशांमध्ये म्हणजे ईस्टर्न ब्लॉकमधल्या देशांतल्या पत्रकारांसाठी असे अभ्यासक्रम दरवर्षी आयोजित करत असे. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्सचा सरचिटणीस म्हणून मलाही या कोर्ससाठी निवडले गेले होते.

पणजीतून प्रकाशित होणाऱ्या आमच्या ‘द नवहिंद टाईम्स’चे वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांनी मला लखनौमधील प्रारंभिक कोर्ससाठी आणि नंतर या बल्गेरिया दौऱ्यासाठी अशी जवळजवळ साडेसहा महिन्यांची पूर्ण पगारी रजा मंजूर केली होती. आणि हा सगळा पगार अॅडव्हान्ड्स म्हणून मला दिलाही होता! (आता अशा सुविधांची पत्रकारमंडळी कल्पनाही करू शकणार नाहीत!) तर तीन महिन्यांचा बल्गेरियातील हा पत्रकारितेचा अभ्यासक्रम संपणार होता आणि या दरम्यान आम्ही एरोफ्लोटच्या ऑफिसमध्ये आमच्या फ्लाइटच्या बदललेल्या मार्गाबद्दल विचारणा करण्यासाठी पोहोचलो होतो.

आम्ही दिल्लीहून मॉस्कोमार्गे सोफियात पोहोचलो होतो. हे माझे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण होते. त्या काळात सोव्हिएत युनियन ऑफ रिपब्लिक रशियाची (यूएसएसआर) एरोफ्लोट एअरलाइन्स ही जगातील सर्वांत स्वस्त विमान कंपनी होती आणि त्यात बरीच मोकळी जागा असलेल्या सीट्स आणि सामान ठेवण्यासाठी ऐसपैस जागा असायची.

त्यावेळी मी २६ वर्षांचा होतो. विमानात आम्हा प्रवाशांचे स्वागत करणाऱ्या हवाई सुंदऱ्या आमच्याकडे पाहून स्मित करत होत्या आणि त्यापैकी बहुतेक जणी विशीतल्या नव्हत्या, हे माझ्या लक्षात आले. सुंदर, आकर्षक अशी हवाई सुंदरीची कोणतीही लक्षणे त्यांच्यात दिसत नव्हती आणि मुख्य म्हणजे सहज जाणवेल असा त्यांनी कुठलाही मेकअपसुद्धा केलेला नव्हता. कम्युनिस्टांना स्त्रियांच्या सौंदर्याचे किंवा लिंगाधारित शोषण करणे मान्य नव्हते हे उघड होते. मला तिशीतली एक उंचीपुरी हवाई सुंदरी आजही स्पष्टपणे आठवते. आम्हा प्रवाशांच्या भरपूर जड असलेल्या व्हीआयपी सूटकेसेस ती हवाईसुंदरी अगदी सहजपणे उचलून वरच्या ओव्हरहेड रॅकमध्ये ठेवत होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मॉस्कोमधील इमिग्रेशन काउंटरवरील कर्मचारी मात्र अतिशय विचित्रपणे वागत होते. त्यांचे ते निळेगार थंड डोळे, त्यांचे ते वेगवेगळ्या बाजूंनी आमच्याकडे रोखून पाहणे आणि आणि आमच्या पासपोर्टवरील कृष्णधवल फोटोशी साम्य शोधण्याचा त्यांचा तो प्रयत्न अंगावर शहारे आणत होता. त्या काळात सगळीकडे संचार असलेल्या रशियाच्या  केजीबी या गुप्तहेर संघटनेविषयी विविध पुस्तकांत बरेच काहीबाही लिहिले  जात असे. त्याचाच हा परिणाम होता.

आम्ही मॉस्कोमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो, तिथे नेहमीच आपल्या खुर्चीवर बसलेली गडद कपड्यांमधील एक वयस्कर लठ्ठ स्त्री डोअर-किपर होती. पहिल्या दिवशी आम्ही तिथे आलो, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कुठल्याही कोणत्याही भावना दिसत नव्हत्या. पण तिची लवकरच माझ्याशी गठ्ठी झाली आणि शेवटच्या दिवशी, तिने माझ्याकडे पाहत चक्क स्मितहास्य केले आणि लटक्या रागाने माझा गाल धरून जोरात ओढला होता. मला तिची रशियन भाषा समजत नव्हती आणि तिला इंग्रजी समजत नव्हते. तरीसुद्धा मला तिचे म्हणणे समजले होते. हॉटेलात असताना, येताजाताना मी सारखा सिगारेट फुंकत असल्याबद्दल तिने आपला राग व्यक्त केला होता, हे मला आणि माझ्याबरोबरच्या पत्रकार मित्राला कळाले होते.

आम्ही मॉस्कोमध्ये तीन दिवस मुक्काम केला आणि त्यानंतर आम्ही सोफियाच्या दिशेने प्रस्थान केले. आमचा अभ्यासक्रम आणि बल्गेरियाचा प्रवासदौरा चालू असतानाच रशियामधील त्या चर्नाबेल न्यूक्लिअर दुर्घटनेची बातमी आमच्यापर्यंत येऊन धडकली. त्या काळात बल्गेरियात आम्हाला कुठलेही इंग्रजी वृत्तपत्र वाचायला मिळत नव्हते. सोव्हिएत रशियाच्या मिखाईल गोर्बाचेव्ह सरकारने जगातील या सर्वांत भयानक आण्विक आपत्तींचे वृत्त जगापासून लपवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अणु प्रकल्पात झालेल्या या दुर्घटनेनंतर कित्येक दिवसांनी ही बातमी अमेरिकेतून फुटली होती. आम्हाला बल्गेरियन भाषा समजत नव्हती आणि आमचे दुभाषी आम्हाला काहीही सांगताना नेहमी खूप सावधगिरी बाळगत होते. तरीही ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचलीच.

आम्ही अशीही एक अफवा ऐकली की, चेर्नोबेल दुर्घटनेमुळे झालेल्या प्राणघातक रेडिएशनचा प्रसार टाळण्यासाठी मॉस्को विमानतळ काही काळ बंद ठेवावे लागेल. आमची एरोफ्लोट एअरलाईन्सची विमाने त्यामुळे मॉस्कोऐवजी रोममार्गे दिल्लीला वळवली जाण्याची शक्यता होती. पण आमची भारतात परत येण्याची तारीख जसजशी जवळ येत होती, तसतशा या अफवा दूर झाल्या.

आणि आता सोफियातील एरोफ्लोट ऑफिसमध्ये आम्हा तीन भारतीय पत्रकारांना असे सांगितले गेले होते की, रोममार्गे पुन्हा जाण्यासाठी दोनच तिकिटे उपलब्ध आहेत. या जागांवर दुसऱ्या कुणीतरी हक्क सांगण्यापूर्वी आम्हाला त्वरित निर्णय घ्यावा लागला.

आम्ही तिघेही जण लगेच त्या खिडकीपासून दूर झालो आणि आपापसांत चर्चा करू लागलो. आधी लखनौच्या आणि नंतर आता बल्गेरियाच्या दीर्घ वास्तव्यात जवळीक साधलेले आम्ही तीन पत्रकार मित्र तसे अमर, अकबर आणि अँथनी होतो. त्यातला ‘अँथनी’ म्हणजे ख्रिश्चन आणि तोसुद्धा रोमन कॅथोलिक असलेल्या मला रोम आणि पोपच्या व्हॅटिकन सिटीबद्दल असलेले आकर्षण अगदी साहजिकच होते. बायबलच्या नवीन कराराच्या माध्यमातून लहानपणापासूनच मी या प्राचीन शहराविषयीचे अनेक किस्से वाचत आलो होतो. असे असले तरी आमच्याकडे वेळ खूप कमी होता. माझ्या मनात खूप काही भावना दाटून आल्या होत्या. पण एक क्षणभरही विचार न करता मी त्या पर्यायी परतीच्या प्रवासमार्गाचे तिकीट मला नको असे सांगितले आणि माझ्या त्या दोन पत्रकार मित्रांनी - राघवन आणि हबीब यांनी -  ताबडतोब प्रत्येकी १० लेव्ह देऊन आपल्या परतीचा प्रवासदौरा रोममार्गे बदलून घेतला. 

मी स्वेच्छेने पर्यायी प्रवासमार्ग नाकारण्याचे सरळसरळ आणि एकमेव कारण म्हणजे माझे तोडके बजेट. माझा पत्रकार मित्र राघवनचे वडील पद्मनाभन हे दिल्लीतील ‘हिंदू’ या नामांकित इंग्रजी दैनिकात अर्थ-वार्ताहर होते. राघवनबरोबर दिल्लीत त्यांच्या घरी राहताना त्यांनी मला युरोप दौऱ्यासाठी जवळ असावे म्हणून मला ४००० रुपये दिले होते. बल्गेरियातील पत्रकारिता अभ्यासक्रमात आम्हा सर्वांना शिष्यवृत्ती म्हणून प्रत्येकी १२०० लेव्ह देण्यात आले होते. माझी बल्गेरियातील शॉपिंग म्हणजे रेमिंग्टन कंपनीचा एक आकर्षक पोर्टेबल टाईपरायटर (किंमत १०० लेव्ह, भारतीय एक हजार रुपये) आणि रशियन कॅमेरा (१० लेव्ह किंवा १०० रुपये) एव्हढी खरेदी होऊन पद्मनाभनकाका यांचे पैसे परत करण्यासाठी माझ्याकडे रक्कम शिल्लक होती. या दोन वस्तू गोव्यातील माझ्या पत्रकारितेच्या व्यवसायात माझी सर्वांत मौल्यवान मालमत्ता होत्या. विमानमार्गासाठी रोम शहराची निवड केली आणि तेथील दोन दिवसांच्या राहण्याचा आणि शॉपिंगचा खर्च पाहता हे पैसे परत करणे शक्य नव्हते. 

इटाली, रोम आणि व्हॅटिकन सिटीला भेट देण्याची संधी आपण थोडक्यात गमावली, याची सल मात्र माझ्या मनात कायम राहिली. विमानमार्ग बदलल्याचे अतिरिक्त शुल्क फक्त दहा लेव्ह होते, म्हणजे फक्त रुपये १००!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अलिकडेच युरोपमध्ये तीन आठवड्यांची सुट्टी मी जॅकलीन आणि मुलगी आदितीसह घालवत असताना आमच्या विमानाने पॅरिसहून रोमच्या दिशेने उड्डाण केले. तेव्हा सोफिया शहरात घडलेल्या त्या परतीच्या विमानमार्गाची २५ वर्षांपूर्वीची घटना माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. त्या वेळी रोम शहराची थोडक्यात टळलेली माझी भेट आता खरेच साकार होणार होती. माझ्या मनातल्या यावेळच्या भावना व्यक्त करण्याच्या पलीकडच्या होत्या.

दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या रोमविषयी ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन ए सिंगल डे’ अशी एक खूप जुनी म्हण आहे. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे १६०४ साली मराठीतील महाकाव्य ‘क्रिस्तपुराण’ गोव्यात रचणाऱ्या ब्रिटिश धर्मगुरू थॉमस स्टिफन्स यांनी या म्हणीचे ‘एके दिवशी रोमनगरी I उभविली नाही I’ असे मराठमोळे भाषांतर केले आहे! असा अतिशय समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेल्या रोम नगरीला भेट देण्यास मी उत्सुक होतो. तीन तासांच्या विमानप्रवासानंतर ‘एअरफ्रान्सचे विमान आता लवकरच रोमच्या लिओनार्दो दा व्हिन्सी विमानतळावर पोहोचत आहे,’ अशी घोषणा कानावर आली आणि मी भानावर आलो.  

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......