कलामांचं राष्ट्रपतीपद आणि थापाडे चंद्रकांत पाटील!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • चंद्रकांत पाटील, प्रमोद महाजन, डॉ. अब्दुल कलाम, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी
  • Sat , 27 February 2021
  • पडघम राज्यकारण चंद्रकांत पाटील प्रमोद महाजन डॉ. अब्दुल कलाम अटलबिहारी वाजपेयी नरेंद्र मोदी

कोल्हापूर शहराची ख्याती ‘कलानगरी’ म्हणून आहे. या शहरानं अनेक अभिजात गायक, प्रतिभावंत चित्रकार, अभिनेते दिले... आखाड्याच्या लाल मातीत चितपट करणारे मल्ल दिले... अंबाबाईच्या देवळाचं गाव म्हणूनही या शहराची ख्याती आहे. इथल्या चपला अतिशय प्रसिद्ध आहेत, पण या शहराची ‘ही’ ओळख मिटवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील करत नाहीत ना, अशी शंका येऊ लागली आहे. कारण असं की, देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे थोर शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले, अशी एक शुद्ध लोणकढी फोडणी दिलेली थाप त्यांनी मारलेली आहे. हे पाटील कोल्हापूरचे आहेत, मात्र तिथं त्यांची पाळंमुळं घट्ट रुजलेली नाहीयेत. म्हणून त्यांना विधानसभेची निवडणूक लढवायला पुण्याला यावं लागलं, पण ते असो.  

आपल्या देशात राजकारणाच्या क्षेत्रात थापा मारणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यात आता चंद्रकांत पाटलांची भर पडलेली आहे. काँग्रेसनं गेल्या ७० वर्षांत या देशासाठी काहीच केलं नाही, ही भारतीय जनता पक्षाची एक ‘राष्ट्रीय’ थाप आहे, तशीच एक थाप आता पाटलांनी मारलेली आहे. उल्लेखनीय म्हणजे कलाम राष्ट्रपति झाले, तेव्हा नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात नव्हते, तर गुजरातपुरते मर्यादित होते आणि राजकारणाच्या क्षितिजावर पाटलांचा तर उदयही झालेला नव्हता! म्हणूनच या थापेबद्दल महाराष्ट्रातले ‘थापसम्राट’ असा सन्मान (!)पाटील यांना द्यायला हरकत नाही.

मुळात इतिहासाचा वेध घेऊन, वर्तमानाचं नीट अवलोकन करून, भविष्याकडे नजर टाकत राजकारण करावं लागतं. तसं काही भाजपचे हे प्रदेशाध्यक्ष करतायेत, असं दिसत नाही. ते जर असेच थापेबाजी करत राहिले तर काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि चंद्रकांत पाटील हे दोन वाचाळवीर महाराष्ट्राला मिळालेले आहेत, असं म्हणावं लागेल!

कलाम राष्ट्रपती म्हणून सर्व संमतीनं निवडून आले, त्या मागची वस्तुस्थिती काय आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सर्वसंमतीचे उमेदवार पुढे येण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा देशाचं पंतप्रधानपद तेव्हाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएकडे होतं आणि एनडीएचं नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे होतं, तर संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे युपीएचं अध्यक्षपद काँग्रेसच्या श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे होतं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, कुठल्याही पक्षाच्या सरकारचा कोणताही निर्णय हा देशाच्या हिताचा, जनतेच्या हिताचा जितका असतो, तितकाच त्याच्यामागे मतांचा अनुनय करण्याचा एक हेतूही दडलेला असतो. जशी आपल्यात जात असते आणि त्याच्या सोबत एक पोटजात येते, तसं कुठल्याही पक्षाच्या सरकारच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये हे घडतं असतं. भाजपची प्रतिमा आणि वर्तनही कायमच मुस्लिमांच्या विरोधात राहिलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. अर्थातच हे विधान सरसकट नाही. शंभर टक्के मुस्लीम भाजपच्या विरुद्ध नाहीत. काही मुस्लीम भाजपचे निश्चितच समर्थक आहेत. परंतु कलाम यांचं नाव समोर करत असताना आपला पक्ष हा मुस्लिमांविरुद्ध नाही, हा एक गर्भित हेतू भाजपच्या मनात असणं यात काही शंका नाही, पण त्याचा जाहीर उच्चार न करण्याचा जो मुत्सद्दीपणा अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी  दाखवला, तो चंद्रकांत पाटील यांना मात्र दाखवता आलेला नाही.

आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, भाजपमुळे म्हणजे वाजपेयींमुळे कलाम राष्ट्रपती झाले हे जितकं खरं, तितकाच त्यात महत्त्वाचा वाटा काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचाही होता. इथं आणखीन एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी की, जेव्हा ही राष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा कलाम यांच्या नावावर राजकीय राष्ट्रीय एकमत घडवून आणण्याचं ‘धनुष्य’ आपल्या महाराष्ट्राच्या एका राजकारण्यानं उचललं होतं. प्रमोद महाजन हे त्यांचं नाव. कलाम यांच्या निवडीमध्ये महाराष्ट्राचे, मराठी असूनही महाजन यांनी बजावलेली भूमिका जर चंद्रकांत पाटील यांना जर ज्ञात नसेल तर, तो त्यांचा दोष नाही, तर तो त्यांचे गुरू अमित शहा यांनी राजकारण करण्याची जी काही शिकवणूक त्यांना दिली, त्या शिकवणुकीचा आहे, असंच म्हणायला हवं. प्रमोद महाजन यांना विसरण्याचा निगरगट्टपणा पाटील यांनी दाखवलेला आहे, असंही खेदानं म्हणता येईल .

त्या काळामध्ये एनडीए आणि युपीए यांच्यामध्ये कलाम यांच्या नावाबद्दल एकमत झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांत याबद्दल मतैक्य आणण्यासाठी प्रमोद महाजन यांच्यासोबतच विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली होती, मात्र हे चंद्रकांत पाटलांना माहीत नसल्यामुळे किंवा त्यांना माहीत असून त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या गुरूच्या गुरूला म्हणजे महागुरूला खूष करण्यासाठी थापाच मारण्याच्या ठरवलेल्या असाव्यात. त्यामुळे कलाम हे मोदी यांच्यामुळे राष्ट्रपती झाले म्हणजे ते (पक्षी : नरेंद्र मोदी) मुस्लिमद्वेष्टे नाहीत, अशी थाप चंद्रकांत पाटील यांनी ठोकून दिली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अलीकडच्या काळात मताच्या अनुनयासाठी आपल्या देशाच्या राजकारणाचं फारच सुमारीकरण झालंय. आश्वासन द्यायची मतं मिळवायची. सत्तेत यायचं आणि मग ते सगळं विसरून जायचं, ही अलीकडच्या आपल्या देशाच्या तीन-चार दशकांतल्या राजकारणाची व्यवच्छेदक व्याख्या झालेली आहे. मुंबईचं सिंगापूर करू, कोकणचा कॅलिफोर्निया करू, विदर्भ आणि मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष दूर करू, पश्चिम महाराष्ट्राकडे वळलेलं मराठवाड्याच्या वाट्याच्या हक्काचं पाणी पुन्हा मराठवाड्याकडे आणू, अशी अनेक आश्वासनं अलीकडच्या काळामध्ये राजकारण्यांनी सत्तेत येण्यासाठी या राज्याला दिली. दाऊदला पाकिस्तानातून ओढून आणू, एन्रॉन समुद्रात बडवू, अशा काही लोकप्रिय घोषणा त्या काळातल्या होत्या. त्यांच्याकडे एक राजकीय आश्वासन म्हणून बघितलं गेलं.

अशात मात्र, पूर्ण न होणाऱ्या आश्वासनासोबत थापा मारण्याची वा पुड्या सोडण्याची एक खूप मोठी लाट आपल्या देशाच्या राजकारणात आलेली आहे आणि या पुड्या सोडण्यात/थापा मारण्यात भाजपचे लोक जास्त आघाडीवर आहेत. चंद्रकांत पाटील महाराष्ट्रामध्ये अशा पुड्या अनेकदा सोडत असतात. त्यामुळे ते कोल्हापूरची ‘थापाड्यांचं शहर’ अशी एक वेगळी प्रतिमा तयार करतायेत का काय, असा धोका आता दिसू लागला आहे.

जाता जाता आणखी एक. कलाम यांच्या राष्ट्रपती होण्याच्यावेळेची आणखी एक महत्त्वाची हकीकत आहे. तेव्हाच्या वृत्तपत्रात ती प्रकाशित झालेली आहे. शिवाय अनेक ज्येष्ठ राजकारणी आणि बुजुर्ग पत्रकारांना नक्कीच माहिती आहे. कलाम यांच्या आधी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांचं नाव या पदासाठी जवळ-जवळ अंतिम झालेलं होतं. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा त्या नावाला पाठिंबा होता. त्याबाबत अलेक्झांडर यांना कळवण्यात आलं होतं आणि त्यांची संमतीही मिळवण्यात आलेली होती. त्याप्रमाणे दिल्लीला राष्ट्रपती भवनात जाण्याची पूर्ण तयारी अलेक्झांडर यांनी केलेली होती. महाराष्ट्राच्या राजभवनातील कोणते अधिकारी आणि कर्मचारी सोबत न्यायचे, याची यादी तयार होती. तशी कल्पना त्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देण्यात आलेली होती. आपल्याला आता नवी दिल्लीला राष्ट्रपती भवनात जायचं आहे, यासाठी त्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचीही तयारी झालेली होती.  

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मात्र अलेक्झांडर यांचं नाव मागे पडलं, कारण तेलगू देसम, अण्णा द्रमुक आणि अन्य काही पक्षांनी अलेक्झांडर यांच्या नावाला विरोध केला आणि राष्ट्रपतीपदाची निवड एकमतानं होणार नाही, हे स्पष्ट झालं.

याच दरम्यान (नक्की आठवत नाही पण) बहुदा तेलगू देसमकडूनच  कलाम यांचं नाव सुचवलं गेलं. त्या नावाला मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षानं पाठिंबा दिला. कलाम यांचं नाव भाजपसाठी अतिशय ‘सोयी’चं होतं आणि ते अखेर अंतिम झालं. मग तत्कालीन केंद्रीयमंत्री प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजभवनात येऊन अलेक्झांडर यांची भेट घेतली आणि राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बदलावा लागला म्हणून दिलगिरी व्यक्त केली होती. या प्रसंगाचे काही साक्षीदार असणारे अधिकारी/कर्मचारी अजूनही महाराष्ट्राच्या राजभवनात असतील, नक्कीच  आहेत.

कलाम यांची राष्ट्रपतीपदी निवड होण्याच्या काळात काय घडलं याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी थापेबाजी कशी केलेली आहे, हे कळावं म्हणून ही हकीकत नमूद केली.

असो!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......