सामाजिक बहिष्काराचा इंग्रजी अवतार म्हणजे एखाद्याला ‘कॉव्हेंट्री’ला पाठवणे!
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 25 January 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध कॉव्हेंट्री Coventry

शब्दांचे वेध : पुष्प तेविसावे

खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर ‘Are You Being Served?’ या नावाची एक साप्ताहिक इंग्रजी विनोदी मालिका दाखवली जायची. बीबीसी लंडनने तयार केलेल्या या मालिकेतले सगळेच भाग अतिशय उत्तम होते. (सध्या यूट्यूबवर ते उपलब्ध आहेत.) इंग्लंडमधल्या एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या स्त्री-पुरुषांचे कपडे विकण्याच्या विभागातल्या दोन महिला, चार पुरुष कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या वरिष्ठांच्या, तसेच त्यांच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजाभोवती या मालिकेच्या भागांचे कथानक फिरते. प्रत्येक वेळी सुमारे अर्धा तासाची नवीन कथा.

या मालिकेच्या चौथ्या फेरीच्या (सीझनच्या) तिसऱ्या भागात (Forward, Mr. Grainger) मिस्टर ग्रेंजर या वयस्क कर्मचाऱ्याला अनपेक्षितपणे एक महिन्यासाठी मॅनेजर म्हणून बढती मिळते तेव्हा काय होते, ही कथा आहे. साहेबाच्या खुर्चीत बसल्यानंतर पहिल्याच दिवशी पहिल्याच तासात मिस्टर ग्रेंजरच्या डोक्यात सत्तेचे भूत शिरते आणि आत्तापर्यंत त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांशी तो तुसड्यासारखे वागू लागतो, त्यांचा अपमान करतो, आणि दुसऱ्या दिवशी तर आणखीच वाईट वागू लागतो.

नेमके त्याच वेळी ज्याच्या जागेवर त्याला तात्पुरती बढती मिळालेली असते, तो साहेब परत येतो आणि ज्या कामासाठी तो परगावी जाणार होता, ते रद्द होते, त्यामुळे मिस्टर ग्रेंजरने पुन्हा आपल्या मूळ पदावर परत जावे, अशी घोषणा करतो. झाले, मिस्टर ग्रेंजरच्या अंगातला सत्तेचा माज क्षणार्धात उतरतो. आपण हे काय करून बसलो, याची त्याला जाणीव होते.

लंचटाईममध्ये जेव्हा सगळे कर्मचारी कॅंटिनमध्ये एकत्र जमतात, तेव्हा तो ओशाळा होऊन सगळ्यांची माफी मागतो आणि खूप गयावया करतो. पण त्याचे सहकारी त्याच्यावर जाम रागावलेले असतात. ते त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करून जणू काही तो तिथे नाहीच, अशा पद्धतीने वागतात. त्याच्याकडे नजरही टाकत नाहीत. यावर अगदी काकुळतीला येऊन मिस्टर ग्रेंजर म्हणतो – ‘I am not being sent to Coventry, am I?’ यानंतर काही मिनिटांतच हा भाग संपतो. पुढे काय झाले यासाठी मूळ व्हिडिओ पहावा -

Coventry (कॉव्हेंट्री)चा उल्लेख २६.०९ मिनिटांपासून आहे.)

हे वाक्य मी जेव्हा ऐकले तेव्हापासून ‘Send to Coventry’ ही इडियम (वाक्संप्रदाय) माझ्या डोक्यात फिट्ट बसली होती. लंडनपासून सुमारे नव्वद मैल दूर असलेले कॉव्हेंट्री हे इंग्लंडमधले एक ऐतिहासिक महत्त्वाचे शहर आहे, हे मला माहीत होते, पण एखाद्याला तिथे पाठवण्यामागे काय अर्थ दडला आहे, हे मात्र मला शोधून काढावे लागले. ‘Send to Coventry’ किंवा ‘To be sent to Coventry’ हा एक खास ब्रिटिश वाक्प्रचार किंवा संप्रदाय आहे. पूर्वी आपल्याकडे एखाद्याला वाळीत टाकायचे ना, जवळपास त्याच अर्थाचा. त्याचा साधा अर्थ (वाच्यार्थ) असा आहे की, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर नाराज असता, ज्याने तुमचा रोष ओढवून घेतला आहे, तेव्हा त्याला कॉव्हेंट्रीला पाठवून द्यायचे.

एके काळी आपल्याकडेही याचे समांतर उदाहरण होते. ते म्हणजे ‘गडचिरोलीला बदली करणे’. साधारणपणे तीसेक वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यात झालेली नियुक्ती अथवा बदली ही एक प्रकारची शिक्षा मानली जात असे. कारण हा भाग महाराष्ट्राच्या अगदी एका कोपऱ्यात असून त्या वेळी तिथे सुखसुविधा तसेच दळणवळणाची साधने अभावानेच उपलब्ध होती. शिवाय हा जंगली इलाखा होता. डासांचा सुकाळ होता. नक्षली लोकांची भीती होती. त्यातच हा आदिवासीबहुल विभाग आहे. त्यामुळे तिथे आधुनिक सुखसुविधादेखील जवळपास काहीच नव्हत्या. रस्ते नीट नव्हते. नद्यांवर पूल नव्हते. पावसाळ्यात तर चार-पाच महिने तुम्हाला एकाच जागी अडकून राहावे लागायचे. त्यामुळे या त्रासदायक जागेत जाणे, हे मुंबई-पुण्याकडच्या शहरी बाबूंना एक प्रकारची शिक्षाच वाटायची.

याच धर्तीचे आणखी एक उदाहरण ब्रिटिश अंमलाखाली असलेल्या भारताचे देता येईल. काळ्यापाण्याची शिक्षा झालेले कैदी आणि त्यांच्यावर निगराणी करण्यासाठी तिथे पाठवले गेलेले साहेब लोक या दोघांनाही अंदमान बेटांवर जाणे नकोसे वाटायचे. कॉव्हेंट्री गावाला जावे लागणे, हेदेखील याच प्रकारात येत असावे का आणि असे का, असे प्रश्न मला पडले.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

कॉव्हेंट्री जावे लागणे किंवा रवानगी होणे, याचा लक्षणार्थ मात्र वेगळा आहे. तो म्हणजे एखाद्याला अनुल्लेखाने मारणे, त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे, त्याचे अस्तित्व नाकारणे, वाळीतच टाकणे, सामाजिक बहिष्कार टाकणे, असा होतो. (यालाच इंग्रजीत ‘ostracism’ अशीही संज्ञा आहे.)

शारिरीकदृष्ट्या ती व्यक्ती तुमच्या जवळ असते, सहवासात असते, पण तुम्ही असे भासवता की, जणू काही ती तिथे हजरच नाही. त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवला जात नाही. जुन्या जमान्यात काही कारणांनी सामाजिक नाराजी ओढवून घेतलेल्या लोकांचे हुक्कापाणी बंद केले जायचे, त्यांच्याशी रोटी-बेटी व्यवहार केला जात नसे. अगदी स्मशानातही त्यांच्या कलेवराला स्थान मिळत नसे. आज सुदैवाने हा प्रकार जवळपास नाहीसा झाला आहे, पण काही जात-पंचायतींमध्ये अजूनही अशी शिक्षा सुनावली जाते, अशा बातम्या अधूनमधून वाचायला मिळतात. हा एक प्रकारचा भयंकर अपमान आहे. घोर उपेक्षा आहे.

मिस्टर ग्रेंजरने आपल्या सहकारी मित्रांना जी वागणूक दिली, तिचा बदला म्हणून तुम्ही मला वाळीत टाकले आहे का, हे त्याला विचारायचे असते. या वाक्संप्रदायाची सुरुवात कशी झाली, याविषयी बऱ्याच कहाण्या आहेत, मात्र खात्रीपूर्वक असे काही आजही सांगता येत नाही.

कॉव्हेंट्री हे गाव इंग्लंडच्या वॉरविकशर परगण्यात आहे. ऐतिहासिक महत्त्वाच्या काही घटना तिथे घडल्या. १६४०मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या गृहयुद्धात या गावाला महत्त्व प्राप्त झाले होते. राजा आणि पार्लमेंट (संसद) यांच्यात त्या वेळी सत्तासंघर्ष सुरू होता. कॉव्हेंट्रीचे लोक पार्लमेंटच्या बाजूने होते. एकदा बर्मिंगम शहरात दोन्ही बाजूच्या सैनिकांत जोरदार लढाई झाली. त्या वेळी राजाच्या फौजेतल्या अनेक सैनिकांना (यांना कॅव्हलिअर Cavalier असे म्हणत) कैद करण्यात आले आणि त्यांना कॉव्हेंट्रीला पाठवण्यात आले. त्या वेळी कॉव्हेंट्रीच्या जनतेने या सैनिकांना जी सापत्नभावाची वागणूक दिली, त्यांची उपेक्षा केली, त्यावरून हा वाक्प्रचार अस्तित्वात आला, असे एक गृहितक ‘The History of the Rebellion and Civil Wars’ या एडवर्ड हाईड (क्लॅरेंडनचा पहिला अर्ल) या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकातील माहितीवर आधारित आहे.

आणखी एक तर्कानुसार ‘the Coventry Act’ या कायद्यावरून हा वाक्प्रचार तयार झाला. सर जॉन कॉव्हेंट्री या खासदाराच्या मागणीवरून पार्लमेंटने हा कायदा अंमलात आणला होता. १६६०मध्ये इंग्लंडमध्ये पुन्हा राजसत्ता सुरू झाली आणि दुसरा चार्ल्स गादीवर बसला. सर जॉन कॉव्हेंट्रीला तो राजाविरुद्ध बोलला म्हणून एकदा अनेक प्रकारच्या शारिरीक यातना भोगाव्या लागल्या. त्यामुळे हा कायदा पारीत झाला. जो कोणी राजाच्या कोणत्याही प्रजाजनांना शारिरीक हानी पोहचवेल अथवा त्यांचा छळ करेल किंवा त्याच्या शरिराचे अवयव कापेल, त्याला मृत्यूदंड देण्यात येईल, अशी या कायद्यात तरतूद होती. (मात्र या माहितीच्या सत्यतेविषयी दुमत आहे.)

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तिसरा तर्क तर अधिकच संदिग्ध पण जास्त मनोरंजक आहे. कॉव्हेंट्री हे गाव लेडी गडायव्हा (Lady Godiva) आणि पीपिंग टॉम (Peeping Tom) यांच्या दंतकथेसाठीही सुप्रसिद्ध आहे. (या दंतकथेच्याही अनेक आवृत्त्या आहेत.) लेडी गडायव्हा ही एक उच्चकुलीन, घरंदाज महिला होती. तिचा मृत्यू १०६६ ते १०८६ या दरम्यान कधीतरी झाला. तिचा नवरा Leofric, Earl of Mercia हा कॉव्हेंट्री परिसरातला एक मोठा जमीनदार, धनाढ्य आणि प्रतिष्ठित असा माणूस होता. त्याच्या मालकीच्या हजारो एकर जमिनींवर जी कुळे होती, त्यांच्याकडून तो खूप जास्त कर वसूल करायचा, जुलूम जबरदस्ती करायचा. (एक प्रकारचा खोतच होता तो, असे म्हणा ना.) त्याच्या पत्नीला म्हणजे लेडी गडायव्हाला आपल्या पतीचे हे वर्तन मान्य नव्हते, पण तो तिला अजिबात दाद देत नव्हता. आपल्या शेतावरच्या कुळांचे हे हाल जेव्हा तिला असह्य झाले, तेव्हा तिने स्वतःच्या नवऱ्याच्या विरुद्ध निःशस्त्र बंड पुकारले. त्याच्या अत्याचारांचा निषेध म्हणून तिने एकदा कॉव्हेंट्री गावात घोड्यावर बसून भरदिवसा फेरफटका केला. पण कसा? ती त्या वेळी पूर्ण नग्नावस्थेत होती आणि फक्त आपल्या लांब केसांनी तिने आपले शरीर झाकून घेतले होते. (एका आख्यायिकेनुसार तिच्या नवऱ्यानेच तिला ही अट घातली होती की, जर ती विवस्त्रावस्थेत घोड्यावरून गावात हिंडली तर तो कुळांवर लादलेले अवाजवी कर कमी करेल.) आपण गावात असे नग्न हिंडत असताना कोणी आपल्याला बघू नये म्हणून तिने आधी एक फर्मान जारी केले की, तिचा फेरफटका आटोपेपर्यंत गावातल्या कोणत्याही व्यक्तीने घराबाहेर पडू नये, दारेखिडक्या बंद कराव्या आणि रस्त्याकडे पाहू नये. गावातल्या एकाने सोडून सर्व व्यक्तींनी तिची ही आज्ञा पाळली. टॉ(थॉ)मस किंवा टॉम नावाच्या एका शिंप्याला मात्र आपली मालकीण नग्नावस्थेत कशी दिसते, हे बघण्याची इतकी अनावर इच्छा झाली की, त्याने तिच्या हुकुमाविरुद्ध वर्तन केले. तो एका ठिकाणी लपून बसला आणि तिथून त्याने ती विवस्त्र महिला घोड्यावरून जात असताना तिच्याकडे पाहिले आणि नयनसुख घेतले. याचा परिणाम म्हणून तो तत्क्षणी मरण पावला किंवा आंधळा झाला, असे म्हणतात.

आणखी एका आख्यायिकेनुसार कॉव्हेंट्रीच्या लोकांनी या आज्ञाभंगासाठी टॉमला वाळीत टाकले. त्यावरून ‘send to Coventry’ हा वाक्प्रचार तयार झाला, असे म्हणतात. लेडी गडायव्हाची कथा १०५० ची आहे, असे मानले जाते. मात्र ‘send to Coventry’ या वाक्प्रचाराचा प्रत्यक्ष वापर बराच उशीरा करण्यात आला, असे दिसते. याचे पहिले उदाहरण १७६५च्या ‘Club book of the Tarporley Hunt’ या पुस्तकात सापडते -

Mr. John Barry having sent the Fox Hounds to a different place to what was ordered was sent to Coventry, but return'd upon giving six bottles of Claret to the Hunt.

या संदर्भात इतरही काही तर्क आहेत. त्या सगळ्यांचाच येथे विचार करणे शक्य नाही. मुद्दा हा आहे की, यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे आधीच प्रसिद्ध असलेले कॉव्हेंट्री शहर आणखीच प्रसिद्धीला आले.

(लेडी गडायव्हाच्या आख्यायिकेतल्या त्या कुख्यात टॉमवरूनच इंग्रजीत ‘Peeping Tom’ हा शब्दप्रयोग रूढ झाला असे म्हणतात, हे देखील उल्लेखनीय आहे. पीपिंग टॉम म्हणजे अशी व्यक्ती की जिला चोरून, लपून दुसऱ्या व्यक्तीला नग्नावस्थेत बघायला, कपडे बदलताना किंवा स्नान करताना बघायला, अथवा दुसऱ्याचा संभोग बघायलाही आवडते. हा एक प्रकारचा मानसिक लैंगिक आजार असून त्याचे शास्त्रीय नाव ‘व्हॉयुरिझम’ (voyeurism) आहे. तो बळावला तर त्याचे विकृतीत रूपांतर होऊ शकते. फ्रेंच भाषेतल्या ‘व्हॉर’ (voir, बघणे) या शब्दापासून हा इंग्रजी शब्द बनवण्यात आला आहे.)

‘Ostracism’ म्हणजे वाळीत टाकणे हे आपण पाहिले. एखाद्याला ऑस्ट्रसाईझ ostracize (किंवा ostracise) करणे या शब्दाला ग्रीक पार्श्वभूमी आहे. प्राचीन ग्रीक भाषेत ὀστρακίζω (ostrakízō,) करणे म्हणजे एखाद्याला वाळीत टाकून शहरातून हाकलून देणे. आजच्या भाषेत सांगायचे तर गुन्हेगारांना पोलीस लोक काही काळासाठी ‘तडीपार’ करतात, तीच ही प्रक्रिया. याचे मूळ ὄστρᾰκον (óstrakon) या शब्दात आहे. याचा अर्थ मातीची भांडी किंवा त्यांचे तुकडे. जुन्या काळी ग्रीस देशात एखाद्याला तडीपार करायचे असल्यास त्याचे नाव या मातीच्या भांड्यांच्या तुकड्यांवर लिहिले जायचे आणि मग निर्णयासाठी गावातल्या लोकांचे मतदान घेतले जायचे.

Ostracize किंवा Send to Coventry यासाठी इंग्रजीत आणखीही काही समानार्थी शब्द अथवा वाक्प्रचार आहेत. उदाहरणार्थ Silent treatment, cold shoulder, shun, इत्यादी. यापैकी Send to Coventry, Silent treatment, cold shoulder ही इडिओमॅटिक इंग्रजी (idiomatic English)ची उदाहरणे आहेत.

कोणतीही भाषा (अगदी आपली मातृभाषासुद्धा) नुसती पोपटपंची करून किंवा तर्खडकरी शैलीची प्राथमिक, बाळबोध पुस्तके वाचून येत नसते. एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर तुम्हाला त्या भाषेतल्या म्हणी, वाक्प्रचार, अनौपचारिक शब्द (colloquialisms आणि slang) माहीत असावे लागतात आणि योग्य वेळी तुम्हाला त्यांचा समर्पक असा वापरही करता यावा लागतो. परकी भाषा बोलताना तर तुम्हाला याचे ज्ञान असलेच पाहिजे.

अशा प्रकारच्या संभाषणाला ‘इडिओमॅटिक’ म्हणतात. अशा प्रकारची संभाषणकला शिकायला काही फार कष्ट करावे लागत नाहीत, फक्त कान आणि डोळे नीट उघडे पाहिजेत आणि टीपकागद जसा सहजतेने शाई शोषून घेतो, तितक्याच सहजतेने तुम्हाला हे बारकावे शोषून घेता आले पाहिजेत.

‘तुम्ही मला वाळीत टाकता आहात का?’ हे विचारायला मिस्टर ग्रेंजर ‘I am not being ostracized (किंवा shunned), am I?’ असेही म्हणू शकला असता. पण त्याने त्यासाठी ‘I am not being sent to Coventry, am I?’ अशा इडिओमॅटिक इंग्रजीचा वापर केला. त्यामुळे या वाक्याची लज्जत एकदमच वाढली. अशा प्रकारचे शैलीदार लेखन करणे किंवा खुमासदार संभाषण करता येणे, ही एक कला आहे.

पी. जी. वुडहाऊसच्या ‘Hot Water’ या विनोदी कादंबरीतला एक प्रसंग मला या ठिकाणी आठवतो. बाकी तपशिलात न शिरता मी त्यातली मुद्द्याची फक्त दोन-तीन वाक्ये उदधृत करतो.

‘Oh, I’m all right now. I’ve perked up a lot recently.’ (कथानायक इंग्रजी बोलणारा अमेरिकन असून त्याने एका फ्रेंच माणसाचे सोंग घेतले असते. त्याचे हे वाक्य ऐकून मिस पटनम नावाची इंग्रज बाई जरा चकितच होते. ती म्हणते -)

‘How idiomatically you speak English, Vicomte.’

‘Yes?’

‘I am sure nobody would take you for a Frenchman.’

‘I was educated at an English school.'

‘माझा उत्साह एवढ्यात जरा जास्त वाढलेला आहे’, हे सांगण्यासाठी नायकाने जो “I’ve perked up a lot recently’ असा इडिओमॅटिक इंग्रजीचा वापर केला, तो त्या हाडाच्या इंग्रज बाईला नवलाचा वाटला, कारण विदेशी माणसांच्या तोंडून (तेही एखाद्या फ्रेंच माणसाकडून) असे काही ऐकायला मिळेल याची तिला अपेक्षा नव्हती.

जाताजाता हेदेखील पहा -

‘Send to Coventry’ याचा एक अर्थ अनुल्लेखाने मारणे असाही होतो, हे आपण पाहिले. याचे एक फार चांगले (खरे तर दुःखदायक) उदाहरण पॉल स्कॉट (Paul Scott) लिखित ‘The Raj Quartet’ या चार कादंबऱ्यांच्या संचात वाचायला मिळते. भारतावरची इंग्रजांची सत्ता जेव्हा संपत आली होती, त्या काळातल्या काही सत्य, काही काल्पनिक घटनांवर आधारित ही पुस्तके आहेत. या संपूर्ण, प्रदीर्घ कथानकात आपल्याला वारंवार इंग्रजांची आढ्यताखोर मानसिकता; एतद्देशियांना तुच्छतेने वागवण्याची, कस्पटासमान लेखण्याची त्यांची प्रवृत्ती; त्यांची गुर्मी, घमेंड, मग्रुरी; भारतियांना ते देत असलेली अन्याय्य वागणूक; त्यांचे कपटी धोरण; त्यांचे जुलुम आणि त्यांचे प्रत्यक्ष तसेच नैतिक भ्रष्टाचार, या सगळ्याचे थक्क करणारे दर्शन होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

एका ब्रिटिश माणसाने १९६५ ते ७५ या दहा वर्षांच्या अवधीत केलेल्या या प्रांजळ, प्रामाणिक, आणि चिकित्सक वर्णनातून मला सर्वांत प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे ब्रिटिशांनी केलेला सामान्य भारतियांचा अनुल्लेख. स्कॉट सांगतो की, ब्रिटिशांचा आणि भारतियांचा परस्परसंबंध जवळपास ‘नहीं के बराबर’ होता. दैनंदिन व्यवहारात कलेक्टर, पोलीस, न्यायाधीश यांच्यासारखे निवडक ब्रिटिश अधिकारी अगदी नाइलाज म्हणून भारतीय लोकांशी बोलायचे. तेही अगदी जुजबी, कामापुरते. या दोघांत अन्य कोणताही प्रकारचा ‘social intercourse’ म्हणजे सामाजिक व्यवहार होत नसे. जणू काही भारतीय लोक अस्तित्वातच नाहीत, असे ब्रिटिश लोक वागत. समोर जर कोणी भारतीय आलाच तर ब्रिटिश लोक त्याच्यातून आरपार बघत. कोणत्याही प्रकारे भारतियांची उपस्थिती त्यांनी कबूल केली नाही. जणू काही त्यांनी तमाम भारतियांना ‘कॉव्हेंट्री’लाच पाठवले होते. पॉल स्कॉटने स्वतः असा उल्लेख केला नसला तरी त्याच्या या कथनाचा मथितार्थ हाच होतो.

शेक्सपिअरच्या ‘Henry IV’ या नाटकाच्या पहिल्या भागात, अंक चारच्या दुसऱ्या प्रवेशात फॅलस्टाफ (Falstaff) हे पात्र सैनिक, कैदी, गुन्हेगार, आणि भेकड लोकांबद्दल बोलताना म्हणते की, या सगळ्या कचऱ्याला कॉव्हेंट्रीला धाडून द्यावे लागेल.

कॉव्हेंट्रीच का? शेक्सपिअरने हे नाटक १५९७च्या आसपास लिहिले होते (म्हणजेच सुरुवातीला सांगितलेल्या सतराव्या शतकातील राजकीय घटनांच्या आधी). त्यामुळे त्याला कॉव्हेंट्रीचा आणखी एखादा वेगळा अर्थ अभिप्रेत होता, असे यावरून सिद्ध होते का? की कॉव्हेंट्री या नावातच काही रहस्य आहे? कोणास ठाउक!

ऐसा (आहे) महिमा कॉव्हेंट्रीचा!

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......