अनेक लोक स्वतःला ‘मसिहा’ म्हणून घोषित करतात, त्यांना जेलची हवा खावी लागते. याउलट काहींना आपण ‘मसिहा’ असल्याचे भास होऊ लागतात...
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • जे. कृष्णमूर्ती, ‘इल्युजन’ या कादंबरीचे मुखपृष्ठ आणि क़ादामावी हैइली सलैसे
  • Mon , 18 January 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध मसिहा Messiah जे. कृष्णमूर्ती J Krishnamurti रिचर्ड बाख Richard Bach इल्युजन Illusions क़ादामावी हैइली सलैसे Qädamawi Haylä Səllasé

शब्दांचे वेध : पुष्प बाविसावे

काल मी खूप दिवसांनी पी. जी. वुडहाऊसची ‘अंकल डायनामाईट’ (Uncle Dynamite) ही कादंबरी पुन्हा वाचायला सुरुवात केली. हे पुस्तक मी आजवर दहा-बारा वेळा तरी वाचले आहे, पण त्यातली ‘जमैका’वरची कोटी (pun) वाचून मी प्रत्येक वेळीच फस्सकन हसतो. तसाच कालही हसलो.

या कथेतले अंकल फ्रेड (लॉर्ड इकनम्) एकदा आगगाडीतून प्रवास करत होते. त्यांचा सहप्रवासी होता बिल ओकशॉट नावाचा एक लालबुंद तरुण. बडबड्या स्वभावाचे अंकल फ्रेड बिलला स्वतःबद्दल आणि त्यांच्या बायकोबद्दल सांगत असतात. त्या वेळी ते म्हणतात, “Yes, my dear wife, I am glad to say, continues to be in the pink. I’ve just been seeing her off on the boat at Southampton. She is taking a trip to the West Indies.”

“Jamaica?”? (बिल विचारतो.)

अंकलचे उत्तर - “No, she went of her own free will.”

हा एक अत्यंत उच्च दर्जाचा शाब्दिक विनोद आहे. इंग्रज लोक इंग्रजी कसे बोलतात याचे ज्ञान असणाऱ्या प्रत्येकालाच तो भावून जातो. (वुडहाऊसचा अशा पद्धतीचा अस्सल विनोद मराठी किंवा अन्य भाषांत जसाच्या तसा उतरवणे का कठीण आहे, याची झलक या ‘pun’ किंवा कोटीमधून अनुभवायला मिळते. इंग्रज लोक अतिशय अधर, अतिशय घाईघाईत, आणि खूप वेगाने बोलतात. त्यामुळे त्यांचे उच्चार एकमेकांत घुसतात किंवा ‘टेलिस्कोप’ होतात. ‘माझी बायको वेस्ट इंडिजला गेली’, हे अंकल फ्रेडने सांगितल्यावर साहजिकच बिल त्याला विचारतो की, तिथे कुठे, जमैकाला गेली का? आता यावर ‘हो-नाही’ असे सरळ उत्तर अपेक्षित आहे. पण तसे न करता ‘जमैका’ या देशाच्या नावावर अंकल फ्रेड खट्याळपणे कोटी करतात. बिलला काय म्हणायचे आहे, हे त्यांना चांगलेच माहीत असते. तरीपण ते मुद्दाम त्याच्या ‘Jamaica’चा ‘Did you make her?’ असा अर्थ काढून त्याला सांगतात, ‘नाही, ती स्वतःहून गेली.’ ‘Did you’ चा उच्चार वेगाने केला तर तो ‘Ja’ (ज्या) सारखा ऐकू येतो. ‘Make her’चा उच्चार वेगाने केला तर तो ‘makah’ (मेका) सारखा ऐकू येतो. ‘तुम्ही तिला तिथे जायला भाग पाडले का?’ असा भलताच अर्थ काढून अंकल फ्रेड म्हणतात, ‘नाही, ती स्वतःहून गेली!’ आता हा विनोद जसाच्या तसा मराठीत कसा आणणार? पण ते जाऊ द्या, हा वेगळ्या लेखाचा विषय आहे.)

मी याचा आत्ता येथे उल्लेख केला कारण हा ‘जमैका’ शब्द वाचून काल माझे डोके भलतीचकडे धावू लागले होते, हे सांगायला. या जमैकावरून मला पहिले जमैका देश आठवला. मग तिथली प्रसिद्ध जमैकन रम आठवली. मग माझ्या डोळ्यांसमोर आला जेम्स बाँड. त्याच्या पहिल्या चित्रपटाची ‘डॉ. नो’ची कहाणी या देशात घडते. त्याचा ‘लिव्ह अँड लेट डाय’ हा चित्रपटही इथलाच. आणि मग मला आठवला इथिओपिआचा एम्परर हैइली सलैसे आणि त्याच्या नावाने जमैकात निघालेला रॅस्टाफेरियन पंथ.

पण त्याबद्दल वाचण्यापूर्वी आपल्याला आपल्या या आठवड्याच्या शब्दाकडे बघावे लागेल. या खेपेचा शब्द आहे - मेसिया/मसिआ/मेसाया किंवा मसिहा. इंग्रजीत ‘Messiah’. हा शब्द तसा जवळपास सर्वांनीच ऐकला असेल. एक तर धार्मिक वाङमयातून नाहीतर हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांमधून आपल्याला या शब्दाचा परिचय झाला असतो. ‘तू मसिहा मुहब्बत के मारो का है’ हे किशोरकुमारचे ‘मुकद्दर का सिकंदर’मधले गाणे घ्या किंवा ‘क्रोधी’मधले लताचे ‘वो मसिहा आया है’ हे गाणे घ्या.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

पण ‘मसिहा’ म्हणजे नक्की कोण? त्राता, वाली, रक्षणकर्ता, उद्धारक, मुक्त करणारा, सेव्हियर. ख्रिस्तीधर्मिय लोक येशू ख्रिस्ताला त्यांचा ‘मसिहा’ म्हणजे ‘सेव्हियर’ मानतात. तो जगाचा उद्धार करायला पृथ्वीवर आला. ‘मसिहा’ हा शब्द १३००च्या आसपास इंग्रजीत आला. त्या वेळी त्याचे स्पेलिंग ‘Messyas’, ‘Messy’, ‘Messie’ असे केले जात असे. या शब्दाचे मूळ ‘बायबल’च्या काळातल्या हिब्रू भाषेत आहे. ‘Māšîaḥ’ म्हणजे ‘anointed’. एखाद्या व्यक्तीला समारंभपूर्वक पवित्र तेलाने आंघोळ घालणे, अभिषेक करणे या कृतीला ‘अनॉइंटमेंट’ (anointment) असे म्हणतात. असा तैल अभिषेक झालेली व्यक्ती म्हणजे ‘māšîaḥ’. अर्थातच अशी व्यक्ती सामान्य नसणार, हे तर उघडच आहे. त्यानंतर आधी अरेमिक, मग हिब्रू, मग प्राचीन ग्रीक (Μεσσίας), आणि मग लॅटिन (Messias) या भाषांमध्येही या शब्दाचा शिरकाव झाला आणि लॅटिनमधून तो इंग्रजीत आला. भारतीय भाषांमध्ये त्याचा प्रवेश इंग्रजीच्या संपर्कामुळे झाला.

‘एब्रॅहॅमिक’ (Abrahamic tradition) परंपरेनुसार इस्रायलच्या पुत्रांचा नेता म्हणून देवाने ज्याची निवड/नियुक्ती केली आहे, तोच हा ‘मसिहा’. ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्ताला ‘मसिहा’ मानतात. पुढे ढोबळ अर्थाने दैवी शक्ती असलेल्या एखाद्या व्यक्तीला किंवा भविष्यात अशी एखादी व्यक्ती भूतलावर येणार आहे, अशा विश्वासापोटी त्या भावी ‘अवतारा’ला ‘मसिहा’ मानले जाऊ लागले. त्याहीनंतर ‘मसिहा’ म्हणजे एक अत्यंत शक्तीशाली व्यक्ती अशीही अर्थच्छटा या शब्दाला प्राप्त झाली.

प्राचीन हिब्रू भाषेनुसार ‘mashah’ म्हणजे तैल अभिषेक करणे. याच अर्थाचा जुन्या ग्रीक भाषेतला शब्द आहे - ‘khristos’. प्रोटो-इंडो-युरोपियन या अतीप्राचीन भाषेतल्या ‘ghrei’ या धातूपासून ‘khriein’ (घासणे, अंगाला तेल रगडणे) हे ग्रीक क्रियापद तयार झाले. ज्याचे नामरूप ‘khristos’ आहे. त्यावरून लॅटिन भाषेत ‘Christus’ हा शब्द तयार झाला. पुढे यातून ६७५ ते ८०० या दरम्यान जुन्या इंग्रजीत ‘crist’ हा शब्द बनला, ज्याने नंतर ‘Christ’ असे स्वरूप धारण केले. नाझरेथच्या येशूला (जीझसला) ही पदवी देण्यात आली. त्यामुळे येशू ख्रिस्त ‘मसिहा’ बनला. थोडक्यात ‘मसिहा’ आणि ‘ख्रिस्त’ हे समानार्थी शब्द असून त्याचा अर्थ (पवित्र तेलाने अभिषिक्त असा) महानायक असा होतो.

‘बायबल’च्या ‘ओल्ड टेस्टामेंट’ किंवा ‘जुन्या करारा’त ज्यू लोकांच्या उद्धारासाठी भविष्यात असा एक महानायक जन्म घेणार आहे, अशी भविष्यवाणी वर्तवली होती. त्याचे वर्णन ‘मसिहा’ या शब्दाने केले गेले होते. ‘Messiah’ या शब्दाचे आधुनिक रूप १५६०च्या ‘जिनीव्हा बायबल’पासून स्फूर्ती घेऊन तयार झाले, तर ‘बंधनात असलेल्या (कोणत्याही) लोकांच्या उद्धारासाठी किंवा तारणासाठी ज्याचा जन्म होणार आहे’, अशा एखाद्या भविष्यकालीन महानायकाचे वर्णन ‘Messiah’ या शब्दाने करण्याची पद्धत १६६०च्या आसपास सुरू झाली.

‘एब्रॅहॅमिक परंपरा’ (Abrahamic tradition) हा शब्दप्रयोग ज्यू (यहुदी), ख्रिस्ती आणि इस्लाम अशा तीन प्रस्थापित धर्मांच्या संदर्भात केला जातो. एके काळी ज्यांना ‘सेमाइट’ किंवा ‘सेमायटिक’ (Semites, Semitic) अशा नावाने संबोधले जात असे, अशा साधारणपणे मध्यपूर्वेकडील देशांत राहणाऱ्या मूळ निवासी वंशांच्या, लोकांचे हे तीन महत्त्वाचे धर्म आहेत. (आजकाल ‘सेमायटिक’ हा शब्द बहुतेक करून भाषाशास्त्रापुरता मर्यादित असून त्यातून अरेबिक, हिब्रू, अम्हेरिक, अरेमिक, आणि मॉल्टिज अशा काही भाषांच्या समूहाचा बोध होतो. ‘अँटी-सेमायटिक’ या शब्दातून ज्यू-विरोध असा अर्थ व्यक्त होतो.) या वंशांच्या लोकांचा मूळ पुरुष एब्रॅहॅम आहे, अशी मान्यता आहे. त्याच्यापासून सुरू झालेली परंपरा म्हणजे ‘एब्रॅहॅमिक परंपरा’. याच परंपरेच्या धर्मकल्पनांतून ‘मसिहा’ची संकल्पना उदयाला आली आणि पुढे युरोपातही तिचा प्रवेश होऊन ‘मसिहा’ हा शब्द तयार झाला. यहुदी (ज्यू), इस्लामिक आणि ख्रिस्तीधर्मियांच्या सहवासामुळे पुढे भारतातही ‘मसिहा’ हा शब्द प्रचलित झाला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

ही संकल्पना फक्त ज्यू धर्माशीच संबंधित आहे असे नाही. जगाच्या उद्धारासाठी अवतरणारा एक त्राता या अर्थाने ‘बायबल’च्या ‘जुन्या करारा’नंतरच्या काळात जगात इतरत्रही ही संकल्पना रुजली. येशू ख्रिस्त हा ख्रिश्चनांसाठी ‘मसिहा’ तर आहेच, पण तो देवाचा पुत्रही आहे. इस्लाम धर्मियांच्या तसेच अहमदिया पंथियांच्या आणि सनातनी, कर्मठ ज्यू लोकांच्या ‘चॅबॅड’ (Chabad) या पंथाच्या अनुयायांच्या ‘मसिहा’बद्दल यापेक्षा वेगळ्या मान्यता आहेत. पण ‘मसिहा’ची संकल्पना तिथेही आहे. हिंदू मान्यतेनुसार कल्की हा परमेश्वराचा दहावा अवतार असून भविष्यात तो कधीतरी जन्म घेईल. मानवतेच्या कल्याणासाठी आणि उद्धारासाठी भगवान विष्णू हा अवतार धारण करणार आहेत. हे देखील ‘मसिहा’चेच एक रूप असेल की! पण त्याला अजून तरी बराच वेळ आहे.

तसे पाहिले तर गेल्या शतकातच भारतात एक नवा ‘मसिहा’ जन्माला येऊ घातला होता. ‘मसिहा’ म्हणून त्याच्या नावाचा जगभर डांगोराही पिटण्यात आला होता. पण ऐन वेळी या माणसाने त्याच्या ‘मसिहा’पदाच्या पुरस्कर्त्यांना धक्का दिला. त्याने स्वतःचे ‘मसिहापण’ नाकारले. ‘माझ्यात देवत्व वगैरे काही नसून मी एक सामान्य मानव आहे’, असे सांगून ज्या जागतिक आध्यात्मिक संघटनेचे त्यांना नेता बनवण्यात आले होते, त्या संघटनेलाच त्यांनी मूठमाती दिली, तिला नष्ट केले. ही व्यक्ती म्हणजे थोर विचारवंत आणि तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती (कृष्णाजी).

आपल्यापैकी बहुतेकांना कृष्णाजींची कहाणी ठाऊक असेलच. थोडक्यात सांगायचे तर ‘थिऑसॉफी’ (गूढ-अध्यात्मविद्या) या शास्त्राच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी कृष्णाजींना जगद्गुरू म्हणून घोषित करण्याचे स्वप्न पाहिले होते आणि त्यासाठी त्यांनी ‘The Order of the Star in the East’ या नावाची एक संघटना उभारली होती. कृष्णाजींमध्ये दैवी शक्ती असून त्यांच्या जडदेहातूनच पुढे खरा ‘मसिहा’ किंवा ‘जगद्गुरू’ प्रगट होणार आहे, असा या दोघांना भाबडा पण दृढ विश्वास होता. आणि त्यादृष्टीने कृष्णाजींचे तसे रूप जगासमोर आणण्याचा त्यांचा अतोनात प्रयत्न सुरू होता. (आजच्या जगात याला ‘मार्केटिंग’ असेही म्हणता येऊ शकते!)

वस्तुतः कृष्णाजींचा जन्म १८९५ साली एका सामान्य तेलुगु परिवारात झाला होता. त्यांचे वडील थिऑसॉफिकल विचारसरणीचे होते. याच चळवळीचे ज्येष्ठ नेते चार्ल्स वेब्स्टर लीडबीटर हे इंग्रज गृहस्थ पुढे भारतात आले असताना त्यांनी १९०९ साली मद्रास शहरातल्या अड्यार नदीच्या काठावर लहानग्या कृष्णाला पाहिले. लीडबीटर clairvoyant (दिव्यदृष्टी लाभलेला मनुष्य) होते असे म्हणतात. या मुलाच्या शरीराभोवती काहीतरी सकारात्मक ऊर्जेचे प्रचंड वलय, आभा (aura) आहे, असे त्यांना जाणवले. त्याच्या अंगात खूप दैवी आणि अतिंद्रीय शक्ती आहे, अशीही त्यांची खात्री पटली. याच मुलाच्या माध्यमातून पुढे थिऑसॉफिकल लोकांना अभिप्रेत असलेले भावी जगद्गुरू लॉर्ड मैत्रेय हे प्रकट होतील आणि हा लहानसा मुलगा एक उत्कृष्ट वक्ता आणि जागतिक आध्यात्मिक नेता म्हणून प्रसिद्धीला येईल, असाही त्यांचा समज झाला. त्यांनी आपले म्हणणे अन्य थिऑसॉफिकल लोकांना पटवून दिले. त्यामुळे मग पुढे कृष्णा आणि त्याचा लहान भाऊ नित्या यांच्या पालनपोषणाची जबाबदारी थिऑसॉफिकल सोसायटीने घेतली.

डॉ. अ‍ॅनी बेझंट तसेच पी. जी. वुडहाऊसचा मोठा भाऊ अर्नेस्ट आर्मिन वुडहाऊस या दोघा बड्या शिक्षकांनी या भावांना शिकवले. मग त्यांना अधिक शिक्षणासाठी परदेशी पाठवण्यात आले. याच वेळी १९११मध्ये थिऑसॉफिकल सोसायटीने ‘The Order of the Star in the East’ (OSE) या संस्थेची स्थापना केली आणि कृष्णाजींना तिचे प्रमुख नेमण्यात आले. जगद्गुरू लॉर्ड मैत्रेय यांच्या आगमनाची पूर्वतयारी करण्याचे कार्य या संस्थेतर्फे केले जाणार होते.

१९११ ते १९२९ या काळात कृष्णाजींच्या आयुष्यात बरेच काही घडले. ते शिक्षणासोबतच आध्यात्मिकदृष्ट्यादेखील प्रगत झाले, तत्त्वचिंतन करू लागले, आणि १९२५मध्ये त्यांच्या धाकट्या भावाच्या म्हणजे नित्याच्या अनपेक्षित मृत्यूमुळे ते भूतकाळाच्या बंधनातूनही बाहेर पडले. नित्याचा मृत्यू त्यांच्यासाठी धक्का तर होताच, पण त्याहीपेक्षा तो आय-ओपनर (eye opener) म्हणजे त्यांना जागृत करणाराही होता. पुढची जवळपास चार वर्षे त्यांनी आत्मचिंतनात घालवली आणि मग ३ ऑगस्ट १९२९ रोजी नेदरलंडस्मध्ये संस्थेच्या वार्षिक मेळाव्यात त्यांनी ‘मी मसिहा नाही, मी जगद्गुरू नाही, मला जगद्गुरू व्हायचे नाही’ अशा अर्थाची क्रांतिकारी घोषणा केली आणि ‘The Order of the Star in the East’ या संस्थेला बरखास्त केले. या वेळी त्यांनी केलेल्या भाषणाचा हा सुप्रसिद्ध अंश फार मननीय आहे -

“I maintain that truth is a pathless land, and you cannot approach it by any path whatsoever, by any religion, by any sect. That is my point of view, and I adhere to that absolutely and unconditionally. Truth, being limitless, unconditioned, unapproachable by any path whatsoever, cannot be organized; nor should any organization be formed to lead or coerce people along a particular path. ... This is no magnificent deed, because I do not want followers, and I mean this.

The moment you follow someone you cease to follow Truth. I am not concerned whether you pay attention to what I say or not. I want to do a certain thing in the world and I am going to do it with unwavering concentration. I am concerning myself with only one essential thing: to set man free. I desire to free him from all cages, from all fears, and not to found religions, new sects, nor to establish new theories and new philosophies.”

या घटनेमुळे सारे थिऑसॉफिकल विश्व व्यथित झाले. कृष्णाने त्यांना ऐन वेळी दगा दिला, असे समजून ते सारे त्यांच्या विरोधात गेले. लवकरच कृष्णाजींनी थिऑसॉफिकल तत्त्वज्ञानाचा त्याग केला आणि ते मुक्त तत्त्वचिंतक म्हणून प्रसिद्धीला आले. ‘मसिहापण’ नाकारणारा हा खरा मानव होता.

रिचर्ड बाख (Richard Bach) या अमेरिकन लेखकाची ‘Illusions : The Adventures of a Reluctant Messiah’ या नावाची एक अतिशय गाजलेली आणि नितांतसुंदर कादंबरी आहे. या लेखकाने जे. कृष्णमूर्तींचे चरित्र कधी वाचले होते का, हे मला माहीत नाही, पण त्याची ही कादंबरी वाचताना अनेकदा कृष्णाजींच्या मसिहापद नाकारण्याच्या घटनेची आठवण येते. बंधमुक्त होईपर्यंत कृष्णाजी हेदेखील एक प्रकारे एक ‘Reluctant Messiah’ (अनिच्छुक त्राता)च होते.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

‘खरे मसिहा’ असे तयार केले जाऊ शकत नाहीत आणि ‘कृत्रिम मसिहा’ फार काळ टिकतही नाहीत. आपण सामान्य आहोत, हे माहीत असूनही अनेक लोक अनेकदा स्वतःला लोभापोटी, पैसा आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ‘मसिहा’ म्हणून घोषित करतात, आणि जेव्हा त्यांचे पितळ उघडे पडते, तेव्हा त्यांना जेलची हवा खावी लागते.

याउलट काही लोक असेही असतात की, ज्यांना आपण ‘मसिहा’ असल्याचे भास होऊ लागतात. आपण जगदोद्धारक आहोत, मानवतेच्या कल्याणासाठी आपला जन्म झाला आहे, असे त्यांना वाटू लागते. हा एक मानसिक आजार असून त्याला ‘messiah complex’ किंवा ‘God complex’ असे शास्त्रीय नाव आहे. सायकिअ‍ॅट्रिस्ट तज्ज्ञ यालाच ‘narcissistic personality disorder’ असे म्हणतात. अहंगंडाने पछाडलेले लोक किंवा स्वतःच्या प्रेमात आकंठ बुडालेले लोक अशा विकाराचे बळी होतात. Delusions of grandeur (Grandiose delusions) आणि ‘megalomania’ हेदेखील या ‘narcissistic personality disorder’चेच प्रकार आहेत. मी खूप महान, मी सर्वश्रेष्ठ, मी कर्ताधर्ता, मी लोकांचे भविष्य घडवणारा, मी कधीच चूक न करणारा… ही सगळी या विकाराची विलसिते आहेत.

अफ्रिकेतल्या इथिओपिआ या देशाचा माजी सम्राट क़ादामावी हैइली सलैसे (Qädamawi Haylä Səllasé) हा देखील अशाच ‘messiah complex’ने पछाडला होता का, हे माहीत नाही, पण आजही जगाभरात त्याचे सुमारे सात ते दहा लाख भक्त, अनुयायी असून ते मात्र त्याला ‘मसिहा’ मानतात. या लेखाच्या सुरुवातीला मी ज्या जमैका देशाचा उल्लेख केला होता - तिथेच त्याचे सर्वांत जास्त भक्त आहेत. हे सर्व लोक हैइली सलैसेच्या खऱ्या नावाने स्थापल्या गेलेल्या ‘Rastafari’ (रॅस्टॅफेरी) या पंथाचे अनुयायी आहेत. कोणी याला नव्याने स्थापन झालेला एक वेगळा धर्मदेखील मानतात. तर काही लोक ही एक फक्त सामाजिक चळवळ आहे, असे समजतात. काहींना हा ख्रिस्ती धर्माचाच एक पंथ वाटतो.

‘Rastafari’ किंवा ‘Rastafarianism’ किंवा ‘Rastafari movement’ अशा नावांनी ओळखला जाणारा हा पंथ १९३० मध्ये जमैकात प्रथम उदयाला आला. त्यावर यहुदी (ज्यू) आणि ख्रिश्चन धर्मांची दाट सावली आहे. त्यांचा ‘Jah’ किंवा ‘Yah’ (‘या’) अशा नावाचा एकच देव आहे आणि हैइली सलैसेच्या रूपाने या ‘या’ने मूर्त अवतार धारण केला होता, असे त्याचे समर्थक मानतात. म्हणून त्यांच्यासाठी हैइली सलैसे हा ‘बायबल’मध्ये सांगितलेलाच ‘मसिहा’ ठरतो.

हैइली सलैसेचे खरे नाव Ras Tafari Makonnen असे होते. त्याने १९३० पासून १९७४पर्यंत इथिओपिआचा सम्राट म्हणून राज्य केले. (नंतर एका लष्करी बंडात त्याला पदच्युत करण्यात आले आणि १९७५मध्ये त्याची हत्या करण्यात आली.) तो स्वतः इथिओपिआच्या Orthodox ख्रिस्ती चर्चचा सदस्य होता. मग इथिओपिआपासून हजारो मैल दूर असलेल्या जमैका देशात त्याच्या नावाचा पंथ कसा काय निघाला बुवा?

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

रॅस्टॅफेरी पंथाचे बहुतांश लोक अश्वेत म्हणजे काळे असून जमैका देशात इंग्रजांनी गुलाम म्हणून आणलेल्या मूळ अफ्रिकन लोकांचे ते वंशज आहेत. मार्कस गार्वे या अश्वेत नेत्याच्या नेतृत्वाखाली जमैकात चाललेल्या ‘चला, अफ्रिकेत वापस जाऊ’ या चळवळीचा प्रभाव पडल्याने तिथल्या लोकांनी रॅस्टॅफेरी पंथ सुरू केला गेला असे मानतात. त्यांना आपल्या देशातले इंग्रजी वर्चस्व नको होते. त्याच काळात लेनर्ड हॉवल (Leonard Howell) या प्रोटेस्टंट धर्मगुरूने दूर देशीचा हैइली सलैसे हा ‘मसिहा’ असून ‘बायबल’मध्ये ज्याच्याबद्दल भविष्यवाणी केली आहे, तोच हा महानायक आहे, असे जाहीर केले.

याचाही तिथल्या जनमानसावर परिणाम झाला. म्हणून बघता बघता जमैका देशात रॅस्टॅफेरी चळवळीने जम धरला आणि ती फोफावू लागली. हैइली सलैसेच्या Ras Tafari या खऱ्या नावावरून या चळवळीचे नामकरण करण्यात आले. पुढच्या तीस चाळीस वर्षांत ही चळवळ लोकप्रिय झाली. १९६०-७० च्या दरम्यान बॉब मॅर्ली (Bob Marley)सारख्या रेगी (reggae) गायकांनी रॅस्टॅफेरी पंथाच्या प्रभावाखाली येऊन नवनवीन संगीत रचना केल्या. त्यामुळे तर रॅस्टॅफेरीचा नावलौकिक अधिकच झाला.

‘बायबल’च्या ‘जुन्या करारा’तील Psalm 68:31 नुसार “Princes shall come out of Egypt; Ethiopia shall soon stretch out her hands unto God” अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. याचाच आधार घेऊन पुढे मार्कस गार्वेने जमैकातल्या लोकांना इथिओपिआच्या हैइली सलैसेचे उदाहरण देऊन हाच तो आपला तारणहार असे त्यांच्या मनावर बिंबवले आणि तो इंग्लंडच्या पंचम जॉर्ज राजापेक्षा कसा आणि किती महान आहे, हे पटवून दिले.

हैइली सलैसे उर्फ Ras Tafari हा खराखुरा मसिहा होता की नाही, कोण जाणे. पण एका वेगळ्याच कारणाने तो त्राता म्हणून अमरत्व पावला, हे मात्र निर्विवाद.

एक गोष्ट सांगायचीच राहिली - माझे एक ज्येष्ठ साहित्यिक मित्र होते. त्यांनीच मला रिचर्ड बाखची ‘Illusions’ ही कादंबरी भेट म्हणून दिली होती. ते नेहमी म्हणत की, हे पुस्तक देशभरातल्या सर्व कॉलेजेसमध्ये अनिवार्य वाचनासाठी (compulsory reading) नेमले गेले पाहिजे. तुम्ही जर ते वाचले नसेल तर अगदी आवर्जून वाचा, तुम्हालाही अगदी असेच वाटेल…

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......