राजकीय घोडेबाजार, प्रेग्नंट चॅड, आयाराम गयाराम आणि टी. एन. शेषन
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 12 October 2020
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध घोडेबाजार Horse trading प्रेग्नंट चॅड Pregnant chad आयाराम गयाराम Aaya Ram Gaya Ram टी. एन. शेषन T. N. Seshan शेषन्ड Seshan-ed

शब्दांचे वेध : पुष्प बारावे

आजपासून जेमतेम तीन आठवड्यांनी म्हणजे तीन नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. डॉनल्ड ट्रम्प या वेळी पुन्हा निवडून येतील की नाही की, त्यांचा प्रतिस्पर्धी विजयी होणार, याविषयी आत्तापासून अंदाज बांधण्यात काही अर्थ नाही असे माझे मत आहे. कारण वेळेवेळेपर्यंत काहीही होऊ शकते. आपल्याकडे होणाऱ्या निवडणुकांबाबतही माझा हाच मुद्दा असतो. भल्याभल्या ‘सीफॉलॉजिस्ट’ना चकवणारे, खोटे पाडणारे धक्कादायक निकाल शेवटच्या क्षणी बाहेर येऊ शकतात. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या ‘free and fair’ मतदान व्यवस्थेत असे नवल जगभरात अनेकदा घडले आहे. म्हणून टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रांत एखादा तज्ज्ञ निकालाआधी कितीही छातीठोकपणे, खात्रीपूर्वक काहीही सांगत असला तरी त्यावर निदान मी तरी डोळे झाकून विश्वास ठेवत नाही.

तशीही अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकप्रक्रिया अतिशय जटील आणि गुंतागुंतीची आहे. नुकताच मी यावर एक चांगला लेख वाचला. मतमोजणीत पहिल्याच झटक्यात एखाद्या उमेदवाराचे स्पष्ट बहुमत सिद्ध न झाल्यास पुढे निकाल लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टप्प्यांतून जावे लागते आणि कसेही करून २० जानेवारीच्या आत निकाल जाहीर करावाच लागतो, कारण नव्या राष्ट्राध्यक्षाचा शपथविधी दर चार वर्षांनी २० जानेवारीलाच करण्याचे तिथे घटनात्मक बंधन आहे.

ही प्रथा १९३७पासून सुरू आहे. जर यदाकदाचित २० जानेवारीपर्यंतही नव्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडीची घोषणा करणे शक्य झाले नाही तर १९४७च्या ‘Presidential Succession Act’ नुसार काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष नेमला जाऊ शकतो. आजवर असे कधीच झालेले नाही, पण असे होऊही शकते, हे गृहित धरूनच हा १९४७चा कायदा तयार करण्यात आलेला आहे. तात्पर्य काय की थोडा धीर धरा, अटकळ बांधू नका.

अमेरिकेचे सोडा, पण यानिमित्ताने आज आपण निवडणुका आणि राजकारणाशी संबंधित काही शब्द बघू या.

सीफॉलॉजी

‘सीफॉलॉजिस्ट’ म्हणजे कोण? सीफॉलॉजिस्ट म्हणजे निवडणूक तज्ज्ञ. हा विश्लेषक निवडणुकीपूर्वी जनमताचे वारे कसे वाहत आहेत, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करतो, निवडणुकीत झालेल्या मतदानानंतर मतमोजणीच्या वेळी येणारे कल तपासतो आणि शेवटी प्रत्यक्षात जे उमेदवार निवडून येतात, त्यांच्या आणि हरलेल्या उमेदवारांच्या पदरात पडलेल्या मतांची चिकित्सा करून या सबंध प्रक्रियेवर आधिकारिक भाष्य करतो. यासाठी तो आधी होऊन गेलेल्या अशाच निवडणुकांचा ऐतिहासिक मागोवा घेतो. निवडणूक प्रचाराच्या वेळी कोणी किती खर्च केला, कोणत्या पक्षाची किती पत आहे, त्याला किती पाठिंबा आहे, राजकीय पक्षांना वा उमेदवाराला होणाऱ्या फंडिंगचा म्हणजे वित्त पुरवठ्याचा स्रोत काय, इत्यादी सांख्यिकीय सामग्री (statistical data)देखील तो तपासतो.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

आता हे सर्व करण्यासाठी तो राज्यशास्त्रात प्रवीण असला पाहिजे, हे तर उघडच आहे. कारण सीफॉलॉजी ही राज्यशास्त्राचीच एक विशेष शाखा आहे- निवडणुकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास. यात निवडणुकांचे आणि मतदानाचे परिमाणात्मक पृथक्करण (quantitative analysis of elections and balloting) केले जाते. ‘एक्झिट पोल’ नावाच्या एका भुताला टीव्ही चॅनेलवाले निवडणुकांच्या ऐन रणधुमाळीत जागे करतात. या बहुतांशी फालतू जनमत चाचण्यांवर विश्वास ठेवून जर एखादा सीफॉलॉजिस्ट ‘गॅरंटी के साथ’ काही सांगत असेल तर निकालांनंतर तो तोंडघशी पडण्याची शक्यता जास्त असते. पण म्हणून सीफॉलॉजी हे एक थोतांड आहे, असेही नाही. तेही एक शास्त्रच आहे, पण त्याला मर्यादा आहेत. विशेषतः निवडणूकपूर्व कयासांबाबत तरी. अमेरिकेत Gallup, Inc ही जनमत चाचणी करणारी एक व्यावसायिक कंपनी आहे. तिच्यातर्फे घेतले जाणारे ‘गॅलप पोल’ फार प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे हेच काम काही अती उत्साही पत्रकार करतात. यातले किती जण खरे सीफॉलॉजीस्ट असतात, कोणास ठाऊक!

‘सीफॉलॉजी’ (Psephology) हा शब्द ग्रीक भाषेतल्या ψῆφος, psephos (सीफॉस) या शब्दापासून तयार करण्यात आला आहे. Psephos म्हणजे ‘pebble’ (गारगोटी किंवा तत्सम गुळगुळीत दगड). पेबलच का? कारण प्राचीन ग्रीसमध्ये निवडणुकांमध्ये ‘मतदानपत्रिका’ म्हणून पेबलचा वापर केला जायचा. आपण ज्याला ‘बॅलट’ (ballot) म्हणतो तो शब्दही फ्रेंच ‘ballotte’पासून तयार झाला आहे, ज्याचा मूळ अर्थ ‘छोटा चेंडू’ असा होतो. आपण आज ‘ballot’ शब्द निवडणूक, मतदान या अर्थाने वापरतो. ‘Ballot paper’ म्हणजे मतदानपत्रिका. जुने फ्रेंच लोक यासाठी चेंडूचा वापर करत असत.

https://blogs.getty.edu/iris/voting-with-the-ancient-greeks/

स्कॉटिश विद्वान आणि तत्त्वज्ञ W. F. R. Hardie यांनी १९४८मध्ये ‘सीफॉलॉजी’ या शब्दाची निर्मिती केली असे मानले जाते. १९५२ साली त्याचा पहिल्यांदा उपयोग करण्यात आला.

प्रेग्नंट चॅड

मी सीफॉलॉजिस्ट म्हणजे निवडणूक तज्ज्ञ नसलो तरी जगातल्या इतर अनेक लोकांप्रमाणेच मलाही दर चार वर्षांनी होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालात थोडाफार तरी रस आहेच. काहीच नाही तर यातून २००० साली जॉर्ज बुश आणि अ‍ॅल गो(अ)र यांच्यात झालेल्या निवडणुक लढतीच्या वेळी उद्भवलेल्या ‘प्रेग्नंट चॅड’सारखा एखादा अनोखा मुद्दा नजरेस येतो आणि नवीन काही तरी शिकायला मिळते. हे गरोदर तुकड्यांचे (‘प्रेग्नंट चॅड’चे) कांड तुम्हालाही आठवत असेल बहुधा.

झाले काय की, त्या वेळी जॉर्ज बुश आणि अ‍ॅल गो(अ)र यांच्यापैकी नक्की जिंकून कोण आले, हे अधिकृतरीत्या ठरवायला आणि तशी घोषणा करायला निवडणूक अधिकाऱ्यांना कठीण जात होते. त्यामुळे अमेरिकेत खूप काळ नुसती बहेसबाजी आणि गोंधळ सुरू होता. याचे कारण हे होते की, फ्लोरिडा राज्यातले अनेक ‘चॅड’ त्या वेळी ‘प्रेग्नंट’ म्हणजे गरोदर झाले होते!

गर्भारपणाची जबाबदारी निसर्गाने सजीवसृष्टीतल्या स्त्रीवर्गावर सोपवली आहे. क्वचित एखादे वेळी ‘पॉज’पण गर्भार होतो. पण म्हणून चॅडनेही गर्भार होणे, हे मात्र काही तरी अतर्क्य, अद्भुत आहे. निदान त्या वेळी अनेक अमेरिकन लोकांना ते पटले नाही आणि म्हणून मग एक मोठा वाद उत्पन्न झाला. प्रकरण न्यायालयातही गेले. बरेच चर्वितचर्वण झाल्यावर शेवटी एकदाचे बुशमहाराजांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले. या सर्व राजकीय, कायदेशीर चर्चेतून माझ्यासारख्या शब्दप्रेमीच्या ज्ञानात जी भर पडली ती अशी -

‘Pregnant’ या शब्दाचे मूळ लॅटिन भाषेतल्या ‘praegnāns’ शब्दामध्ये आहे. तिथून तो जुन्या फ्रेंच भाषेत शिरला आणि मग मध्य इंग्रजीत. तोवर जुन्या इंग्रजीत ‘ēacniende’ (आकारमान वाढणे) हा शब्द वापरला जात होता. स्त्रीने प्रेग्नंट होणे म्हणजे तिला गर्भधारणा होणे. या शब्दाचा काही वेळा आलंकारिक वापरही केला जातो. ‘A pregnant pause’ किंवा ‘look’ या वाक्प्रचारात ‘rich in significance or implication’ म्हणजे आशयघन, अर्थपूर्ण (विराम किंवा नजर) अशा अर्थाने ‘pregnant’ हा शब्द वापरला गेला आहे. पण ‘चॅड प्रेग्नंट’ होणे म्हणजे काय? चॅड ही काय भानगड आहे?

‘Chad’ असा काही शब्द असतो हे २०००पर्यंत अनेकांना माहीतही नव्हते. अफ्रिका खंडात ‘Chad’ (चॅड किंवा त्शाद) नावाचा एक देश आहे एवढे सामान्य ज्ञान बहुतेकांना असते, पण हा चॅड काहीतरी वेगळाच होता. (आपल्या मराठीतही ‘चाड’ नावाचा एक शब्द आहे. त्याचा अर्थ पर्वा, मुर्वत, किंवा आवड.)

.................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

फाईलमध्ये एखादा कागद लावताना त्याला आपण आधी दोन छिद्रे करून घेतो. अगदी आत्ताआत्तापर्यंत एसटी बसचा कंडक्टरही कागदी तिकिटांवर छिद्रे पाडून ती आपल्याला देत असे. ही सर्व प्रकारची छिद्रे हातात धरायचा पंच किंवा पंचिंग मशीन वापरून पाडली जातात. असे आरपार छिद्र पडले की, त्या छिद्राच्या जागी असलेला कागदाचा गोल तुकडा गळून खाली पडतो (किंवा पंचिंग मशीनच्या आत जातो.) बरोबर? तर हा जो तो गोल तुकडा आहे, त्याला ‘chad’ असे नाव आहे. एखादवेळी असेही होते की, आपण जर नीट जोर लावून पंच केले नाही तर हा गोल तुकडा तसाच मूळ कागदाला चिकटून राहतो. किंवा अर्धवट बाहेर, अर्धा चिकटलेला असा निघतो. म्हणजे तुम्ही त्या कागदाला पंच कसे करता, यावर सगळे अवलंबून असते.

बस, अमेरिकेतले ते ‘चॅड प्रेग्नंट’ होण्याचे अगदी हेच कारण आहे. अगदी थोडक्यात सांगायचे तर अमेरिकेत निवडणुकांच्या वेळी मतदानपत्रिका म्हणून जाडसर कागदाचा (कार्ड) वापर करतात. त्यावर विशिष्ट खुणा केल्या असतात. मतदाराने त्याच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील या खुणेवर मशीनने पंच करायचे असते, म्हणजे ‘चॅड’ निघून जाऊन तिथे छिद्र पडते. फरक एवढाच आहे की, हे छिद्र गोलाकार नसून ‘ऑब्लाँग’ (oblong) म्हणजे लांबुळक्या आयतच्या आकाराचे असते. तुम्ही व्यवस्थित पंच केले तर चॅड पूर्णपणे निघून जातो, अन्यथा तो कागदालाच चिकटून राहतो. म्हणजे तुम्ही पंच केले असूनही जर तिथे आरपार गड्डा नसेल तर तुमच्या मताबद्दल शंका उत्पन्न होऊ शकते. २००० साली फ्लोरिडामध्ये असेच झाले. हजारो मतपत्रिकांवरचे चॅड मूळ कार्डाला चिकटून राहिले. त्यामुळे त्या मतदारांनी मत दिले आहे आणि कोणाला दिले आहे, हे जरी कळत असले तरी चॅड कार्डाला चिकटून राहिल्यामुळे ते मत वैध समजून विचारात घ्यायचे की, अवैध समजून रद्द समजायचे याविषयी संदिग्धता उत्पन्न झाली आणि मग दोन्ही बाजूचे वकील, राजकीय तज्ज्ञ, पत्रकार, समीक्षक या साऱ्यांना खूप दिवस अनायसे खाद्य मिळाले. प्रकरण न्यायालयातही गेले. शेवटी निवडणुकीचा निकाल बुशच्या बाजूने लागला ते सोडा. पण बाकी लोकांना या ‘फॉल्स प्रेग्नसी’ची मजा तर घेता आली!

अरे हो, त्या नीट न गळून पडलेल्या ‘चॅड’ला ‘प्रेग्नंट’ का म्हणतात, हे तर राहिलेच. कार्डावरची ती जी खूण केलेली ‘ऑब्लाँग’ जागा असते, तिच्यावर पंच केल्यावर तिच्यातून चॅड पूर्णपणे निघून गेला पाहिजे. चारही बाजूंनी मध्ये बारीक फट पडली आहे, पण तरीही तो तुकडा जर चारही कोपऱ्यांपाशी कार्डाला चिकटलेला असेल तर त्याला ‘प्रेग्नंट चॅड’ असे म्हणतात. कारण गरोदर बाईचे पोट कसे फुगलेले दिसते तसेच या लटकलेल्या चॅडमुळे कार्डवरची तेवढी जागा फुगीर दिसते, बोटांना जाणवते, म्हणून ‘चॅड प्रेग्नंट’ आहे, असा विनोदी शब्दप्रयोग तयार करण्यात आला.

‘Chad’ या शब्दाची व्याख्या आणि उत्पत्ती अशी आहे -

Chad, n. pl. [var. of CHAFF or perh. Scot. small gravel?] 1. the circular pieces of paper punched out by a paper-tape punch, as used with a teletype machine: PUNCHINGS, CHAFF, CONFETTI. 2. the pieces of cardstock punched out by a keypunch, as used with punched-card data processing: CHIPS. 3. any waste produced by a paper punch. 4. the punchings produced by a Votomatic voting device, when used with pre-scored machine readable punched-card ballots.

या अर्धवट निघालेल्या चॅडचेसुद्धा दोन प्रकार आहेत. पहिला, ‘हँगिंग’ (HANGING) किंवा ‘ट्रॅपडोअर’ (TRAPDOOR) किंवा ‘डॅंगलिंग’ DANGLING.

दुसऱ्या प्रकारात ‘प्रेग्नंट’ (PREGNANT) किंवा ‘डिंपल्ड’ (DIMPLED) किंवा ‘बल्जिंग’ (BULGING) चॅड येतात. या सर्व मजेशीर प्रकारांची अधिक आणि सचित्र माहिती या दोन वेबसाईटवर मिळू शकेल -

http://homepage.divms.uiowa.edu/~jones/cards/chad.html

आणि

https://ell.stackexchange.com/questions/106984/what-is-the-meaning-of-the-so-called-pregnant-chad

राजकारणी लोकांनी इंग्रजी भाषेत या सारख्याच आणखीही अनेक नावीन्यपूर्ण शब्दांची भर घातली आहे.

फिलिबस्टर

‘फिलिबस्टर’ (Filibuster) हा शब्द बघा. संसदेच्या एखाद्या सभागृहात एखाद्या प्रस्तावावर किंवा कायद्याच्या मसुद्यावर चर्चा चालू असेल आणि तो प्रस्ताव, तो कायदा पारित होऊ नये असे विरोधकांना वाटत असेल तर ते ‘फिलिबस्टर’ची युक्ती वापरतात. लांब लांब भाषणे करून मतदानात दिरंगाई करायची आणि सभागृहात अडथळे उत्पन्न करायचे, हा या मागचा उद्देश. यामुळे कधी कधी तर तो प्रस्ताव वा ते विधेयक जन्माला यायच्या आधीच मरून जाते. यालाच ‘talking a bill to death’ असेही म्हणतात. अमेरिकन सिनेटमध्ये या हातखंड्याचा जास्त वापर केला जातो.

प्राचीन रोमन लोकांनी या राजकीय ‘दगडी भिंती’ची देणगी जगाला दिली. असे लांबच लांब भाषण करणारा एखादा विरोधक अशा वेळी काय वाटेल ते बोलत असतो. मूळ विषयापासून भरकटत जाऊन असंलग्न विषयांवर असंबद्ध बोलणाऱ्या अशा काही महाभागांनी खाद्यपदार्थांच्या कृती, टेलिफोन डायरेक्टरीतले फोन नंबर यांचेदेखील वाचन सभागृहांत केले आहे, असे विकीपिडीया सांगतो. ‘फिलिबस्टर’ (Filibuster) हा शब्द इंग्रजीने स्पॅनिश भाषेकडून उसना घेतला आहे. त्या भाषेत याचा खरा अर्थ समुद्री चांचे लोक वापरत असलेली एक प्रकारची वेगवान शिडाची नाव (स्पॅनिश – ‘filibote’, इंग्रजीत – ‘fly-boat’) असा होतो. जरी १५८७ साली इंग्रजीत पहिल्यांदा हा शब्द वापरला गेल्याची नोंद आहे, तरी गेल्या शे-दोनशे वर्षांतल्या अमेरिकन राजकारण्यांमुळे तो खऱ्या अर्थाने प्रचारात आला.

जेरीमँडर

यानंतरचा खास राजकीय शब्द आहे ‘जेरीमँडर’ (gerrymander). कोणत्याही निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांची निर्मिती केलेली असते. भारतामध्ये देशाचा कोणता भौगोलिक भाग कोणत्या मतदारसंघात येईल याचा निर्णय मतदारसंघ-सीमा पुनर्निर्माण आयोग काही तरी वैध तर्काच्या आधारेच घेत असतो. यासाठी ताज्या जनगणना आकडेवारीचा आधार घेतला जातो. हा ‘Delimitation Commission or Boundary Commission of India’ आयोग भारत सरकारने ‘Delimitation Commission Act’ या कायद्याच्या अंतर्गत स्थापन केला आहे. जगात इतरत्रही साधारणतः अशाच प्रकारे मतदारसंघांची निर्मिती केली जाते. अमेरिकेत मात्र १८१२ साली काही तरी अजबच बघायला मिळाले. ‘मॅसॅच्युसेट्स’ (Massachusetts) या अमेरिकन राज्यात त्यावेळी गवर्नर एल्ब्रिज जेरी (Elbridge Gerry) सत्तेवर होता. त्याने राज्यभरात होणाऱ्या सिनेट निवडणुकीमध्ये स्वतःच्या राजकीय पक्षाचा फायदा व्हावा म्हणून राज्यातल्या मतदारसंघांची स्वतःला सोयीस्कर अशी वेडीवाकडी पुनर्आखणी केली. त्याच्या या कृतीला खूप विरोध झाला.

‘बॉस्टन गॅझेट’ या वृत्तपत्रात २६ मार्च १८१२ रोजी ‘जेरीमँडर’ या शब्दाचा सर्वप्रथम वापर करण्यात आला. मात्र त्याच्या निर्मितीचे श्रेय नक्की कोणाला द्यावे याबद्दल दुमत आहे. ‘जेरीमँडर’ म्हणजे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केलेली मतदारसंघांची पुनर्आखणी. ‘जेरीमँडर’ हा एक पोर्टमॅंटो (portmanteau) शब्द आहे. दोन वेगळे शब्द एकत्र आणून त्यांच्यापासून बनलेला नवा शब्द म्हणजे पोर्टमॅंटो शब्द. जेरीमॅंडरमध्ये एल्ब्रिज जेरीच्या नावातला जेरी घेतला आहे. आणि मॅंडर कुठून आला? जेव्हा एल्ब्रिज जेरीने नव्या मतदारसंघाचा नकाशा प्रकाशित केला तेव्हा त्या मतदारसंघाचा आकार एखाद्या सॅलॅमँडॅर सारखा दिसायला लागला. त्यातला मँडॅर वेगळा करून तो जेरीला जोडला गेला आणि ‘जेरीमँडर’ या शब्दाची निर्मिती झाली. (Salamander, सॅलॅमँडॅर हा उभयचर amphibian वर्गात येणारा एक प्रकारचा पाणसरडा असतो.) या सर्व भानगडीत एल्ब्रिज जेरीला आपले पद गमवावे लागले, पण त्याच्या या (अप)कृत्याचा फायदा त्याच्या राजकीय पक्षाला पुढची अनेक वर्षे घेता आला.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

घोडेबाजार

अमेरिकेल्या अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे गेल्या काही वर्षांत आणखीही काही शब्द जास्त प्रचारात आले. यात ‘फंड रेझिंग’ (Fund-raising) म्हणजे राजकीय कामासाठी चंदा गोळा करणे; ‘रिग्ड’ (Rigged) म्हणजे निवडणुकीत अवैध मार्गांचा वापर किंवा हेराफेरी; ‘स्पीच रायटर’ (Speechwriter) म्हणजे दुसऱ्याची भाषणे लिहून देणारा; ‘लॅंडस्लाईड’ (landslide) म्हणजे एखाद्या उमेदवाराला मिळालेला भूस्खलनासारखा प्रचंड, वेगवान विजय; ‘एअर वॉर’ (Air war) म्हणजे रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून उमेदवारांमध्ये छेडले गेलेले शाब्दिक युद्ध, यासारख्या अनेक शब्दांचा समावेश होतो. चार वर्षांपूर्वी बीबीसीने तर ‘US election glossary : A-Z guide to political jargon’ या नावाने अशा शब्दांची एक मोठी यादीच प्रसिद्ध केली होती. पहा -

https://www.bbc.com/news/election-us-2016-37385625

असे अजूनही शेकडो शब्द आहेत. या छोट्या लेखात त्या सगळ्यांची नोंद घेणे शक्य नाही. पण हे दोन नमुनेदार शब्द बघा.

पंडित (Pundit) : हा तर चक्क संस्कृतमधून उचलेला शब्द आहे. Pundit – A  person who offers to mass media his or her opinion or commentary on a particular subject area (most typically political analysis, the social sciences, technology or sport) on which he or she is knowledgeable (or can at least appear to be knowledgeable), or considered a scholar in said area. थोडक्यात सर्वज्ञ असलेला किंवा सर्वज्ञ असल्याचा आव आणणारा एखादा राजकीय प्रवक्ता, भाष्यकार, पत्रकार, समीक्षक, इत्यादी. (आपल्याकडे तर असे हजारो ‘ज्ञानी पंडित’ आहेत!)

‘स्पिन’ (spin) आणि ‘स्पिन डॉक्टर’ (spin doctor) : क्रिकेटमुळे ‘स्पिन’ हा शब्द तर बहुतेकांना माहीत आहेच. स्पिन म्हणजे गोल गोल घुमवणे. या ठिकाणी शब्दांना घुमवणे. राजकारणात याचा वापर नेते लोक स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतात. सत्य असत्य यांचा विचार न करता आपल्या राजकीय पक्षाची चांगलीच बाजू पत्रकारांसमोर किंवा लोकांसमोर घुमवून फिरवून मांडण्याचे काम जो व्यावसायिक प्रवक्ता करतो तो झाला ‘स्पिन डॉक्टर’. A spokesperson employed to give a favourable interpretation of events to the media, especially on behalf of a political party. थोडक्यात या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून गोडगोड आणि गोलगोल बोलून जो पत्रकारांच्या आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकतो, तो असतो ‘स्पिन डॉक्टर’.

‘घोडेबाजार’ हा शब्द तर तुम्ही ऐकलाच असेल. ‘Horse trading’ या अमेरिकन इंग्रजी शब्दाचा हा मराठी अवतार. अगदी प्रारंभी घोडे घेणे आणि विकणे या व्यापाराशीच संबंधित असलेला हा शब्द आता राजकीय सौदेबाजीसाठी वापरला जातो. खऱ्या घोडे-व्यापारात फसवणूक, अप्रामाणिकपणा, बनवाबनवी यासारख्या गोष्टी सर्रास आणि खुलेआम केल्या जातात. वरून दिसायला सारे कायदेशीर असते, पण आतून लांडीलबाडी आणि अनैतिक मार्गांचा वापर करून पैसा कमावला जातो. अगदी तसेच राजकीय सौदेबाजीतही होते. सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष लांडीलबाडी आणि अनैतिक मार्गांचा वापर करून पैसा खर्च करतात किंवा प्रलोभने दाखवतात आणि आपली बाजू मजबूत करून बहुमत मिळवतात. भारतात याची असंख्य उदाहरणे आजवर बघायला मिळाली आहेत. १८७० ते १९०० या काळात अमेरिकेत याला इतके उधाण आले होते की, स्पर्धात्मक व्यापाराच्या नावाखाली जीवनाच्या अनेक क्षेत्रातही घोडेबाजार केला जाऊ लागला. वर्तमानपत्रेही याला अपवाद नव्हती. घोडेबाजारालाच जर्मनी आणि इतर काही देशांत ‘गायबाजार’ असेही म्हटले जाते. याच अर्थाचा एक जुना शब्द होता ‘लॉगरोलिंग’ (Logrolling), पण तो आता मागे पडला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर हा राजकीय ‘quid pro quo’चा प्रकार आहे. म्हणजे तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो. इस हाथ दे, उस हाथ ले. तू मला मदत कर, मी तुला मदत करतो. हे सगळे घोडेबाजारात होत असते.

पर्दा

आतापर्यंत आपण विशेषतः अमेरिकन राजकारणाशी संबंधित शब्द पाहिले. ब्रिटिश राजकारणातही काही खास शब्दांचा वापर केला जातो. त्याची एक संक्षिप्त यादी या पृष्ठावर बघा -

A guide to UK election jargon

https://newseu.cgtn.com/news/2019-11-29/A-guide-to-UK-election-jargon-M07wFqrcsw/index.html

या यादीतला एक शब्द आपल्या ओळखीचा आहे, कारण तो भारतीय उपखंडातूनच ब्रिटिशांनी उचलला आहे. हा शब्द आहे ‘पर्दा’ (Purdah). निवडणुकांच्या आधी आपल्याकडे जी आदर्श आचार संहिता पाळली जाते, तिचे हे ब्रिटिश नाव. या काळात विद्यमान सरकारला फायद्याच्या ठरतील अशा कोणत्याही घोषणा मंत्री, सरकारी कर्मचारी, सनदी अधिकारी यांना करता येत नाहीत. म्हणजे ते काही काळ पडद्या/बुरख्याआड जातात. मात्र आजकाल ब्रिटनमध्ये हा शब्द सेक्सिस्ट, वंशवादी, आणि अयोग्य समजला जाऊ लागला आहे, त्यामुळे तो कमी वापरतात.

https://metro.co.uk/2019/11/06/saying-purdah-sexist-racist-offensive-says-womens-party-candidate-11049885/

आयाराम गयाराम

राजकारणाशी संबंधित शब्दांच्या या धावत्या आढाव्यात आपल्या भारतीय ‘आयाराम गयाराम’ यांचाही उल्लेख मोठ्या ‘सन्माना’ने करावा लागेल.

‘आयाराम गयाराम’ हे अनैतिक राजकीय सौदेबाजीचे जिवंत उदाहरण होते. हरयाणा राज्यातील गयालाल या स्वतंत्र आमदाराने १९६७ साली निवडून आल्यावर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नंतरच्या पंधरा दिवसांत या पठ्ठ्याने तीनदा पक्ष बदलले. आधी तो काँग्रेसमधून युनायटेड फ्रंटमध्ये गेला, मग वापस काँग्रेसमध्ये आला, आणि लगेच नऊ तासांच्या आतच तो पुन्हा युनायटेड फ्रंटकडे परत गेला. त्याला काँग्रेसमध्ये परत आणण्याचे काम राव बिरेंद्र सिंग या नेत्याने केले होते. त्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंग म्हणाले, ‘Gaya Ram was now Aya Ram’! तेव्हापासून ‘आयाराम गयाराम’ हा वाक्प्रचार अस्तित्वात आला. कोणताही विधीनिषेध नसलेली, जनाची तर नाहीच पण मनाचीही लाज नसलेली, राजकीय स्वार्थासाठी सर्व सभ्य संकेतांना आणि नीतीमूल्यांना पायदळी तुडवणारी ही अशी भ्रष्टाचारी, कोडगी माणसे जगात सर्वत्र आढळतात, पण भारतात त्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच मग पुढे पक्षांतर बंदी कायदा तयार झाला. अर्थात आपले राजकारणी जास्त हुशार असल्यामुळे ते या कायद्यात असलेल्या पळवाटा बरोबर शोधून काढतात आणि मोठ्या खुबीने पक्षांतर करतात. आजही हा प्रकार सुरू आहे. त्याचे प्रमाण थोडेसे कमी झाले आहे, एवढेच. ‘आयाराम गयाराम’ हा शब्द खरे म्हणजे जगातल्या सर्व भाषांच्या शब्दकोशांत जसाच्या तसा सामील व्हायला हवा. भारतीयांनी ही उर्वरीत जगाला दिलेली एक शाब्दिक देणगी आहे, असे समजा.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

टीएन शेषन्ड

आपण आणखी एक शब्द तयार करू शकतो. ‘मैं पॉलिटिशियनस् को कच्चा चबा जाता हूँ’ असे म्हणणाऱ्या टी. एन. शेषनचे नाव आज किती लोकांना आठवते? १९९० ते १९९६ या काळात भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून त्यांनी काम केले. हा कर्तबगार आणि कर्तृत्ववान, प्रामाणिक माणूस होता. तेवढाच सनकी होता, सर्किट होता, झकलट आणि लहरी होता, एककल्ली आणि हट्टीही होता. पण हे सगळे मान्य करूनही त्यांनी तत्कालीन राजकारण्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते, हे नाकारता येत नाही. भ्रष्ट राजकारण्यांना तर शेषनच्या सावलीचीही भीती वाटत असे. निवडणूक प्रचारात त्यांनी करवलेल्या आमूलाग्र बदलांसाठी तरी आपण शेषनविषयी कृतज्ञता दाखवली पाहिजे. साऊथ अफ्रिकेत राहणारी माझी एक मैत्रीण गेल्याच वर्षी तिथल्या निवडणूक प्रचारातल्या गोंगाटाबद्दल आणि गोंधळाबद्दल तक्रार करत होती. मी तिला शेषनबद्दल सांगितले. त्यावर ती म्हणाली, ‘My country also needs to be Sheshan-ed’. एखाद्या विशेषनामावरून तयार झालेल्या शब्दाला इंग्रजीत ‘इपॉनिम’ (eponym) म्हणतात. भारतातल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल घडवून तिला बऱ्यापैकी ‘सॅनिटाईज’ करण्याचे (निर्जंतुकीकरण) करण्याचे काम शेषन यांनी केले. जगभरातही जर याच धर्तीवर असे प्रक्रिया-शुद्धीकरण घडून आले, तर त्याला ‘Sheshan-ed’ (शेषन्ड) असे नवे इपॉनिमस नाव देता येईल का? तुम्हीच ठरवा.

आजच्यापुरते इथेच थांबतो.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......