करोनामुळे यंदा कोकणात निरुत्साही वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला...
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
पंकज घाटे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 10 September 2020
  • पडघम कोमविप गणेशोत्सव Ganeshotsav गणपती Ganpati गणेश Ganesh कोकण चाकरमानी

कोकणात होळी आणि श्रीगणेश चतुर्थी हे सर्वांत जिव्हाळ्याचे उत्सव. इथल्या घरगुती आणि स्थानिक गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. यातला कोणताही उत्सव असला की, कोकणी माणूस अगदी भावूक होऊन जातो. जगात कुठेही असला तरी या काळात गावी येण्याचा तो प्रयत्न करतो किंवा उत्सवाच्या आठवणी काढून हळहळतो. यंदा उत्सवांवर करोना साथीमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या, अनिश्चिततेच्या वातावरणाची छाया होती.  

गणपतीच्या आदल्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात १४५ करोना रुग्णांची नोंद झाली. आजवरची ही जिल्ह्यातली विक्रमी वाढ. जून-जुलै महिन्यात राज्यात बाधितांची संख्या वाढत असताना रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हे प्रमाण नियंत्रणात होतं. ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच विलगीकरणाच्या दिवसांवरून घोळ, ई-पास, रेल्वे-एसटी बसच्या फेऱ्या, आरोग्य तपासणी आणि बाकीच्या अडचणी यांवरून वातावरण तापू लागलं. ठोस निर्णय, समन्वय आणि नियोजन नसल्यामुळे विरोधक सरकारवर जोरदार टीका करत होते. जिल्हा प्रशासन ई-पास आणि विलगीकरण मान्य केल्याशिवाय प्रवेश देण्यास तयार नव्हतं. स्थानिकांच्या मनात पुन्हा एकदा येणाऱ्यांविषयी धास्ती आणि संशय निर्माण होऊ लागला. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी नियम पाळले नाहीत आणि बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली, तर गणेशविसर्जनानंतर टाळेबंदीत वाढ करण्याचा इशारा दिला.

दरवर्षी गणपती येण्याआधीच्या आठवड्यात वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कोकणातल्या रस्त्यांवर असतो. राज्य सरकारने १२ ऑगस्टनंतर इकडे येणाऱ्यांना करोना चाचणी बंधनकारक केली होती. ई-पासची सक्ती, तसंच विलगीकरणाचे अन्य नियमही होते. अशा निर्बंधामुळे व करोनाची लागण होण्याच्या भीतीमुळे कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचं प्रमाण निम्म्याहून अधिक घटलं. एरवी ही संख्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विचार केला तर काही लाखांत असते. तीन जिल्ह्यांत प्रत्येकी सुमारे अडीच-तीन लाख गणेशभक्त दरवर्षी दाखल होतात आणि उत्सवानंतर पुन्हा परत जातात. या वेळी अनेक गावांमध्ये चाकरमानी गणपतीपूर्वीच (होळीच्या वेळी, टाळेबंदीदरम्यान थोडी सूट मिळाल्यावर) कोकणात आलेले होते. तसंच या वर्षी गणपतीला न येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. यांत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यांत जाता न आलेलेही अनेक गणेशभक्त आहेत.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

कोकणात येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग आणि पुणे-बेंगळुरू महामार्गाचा वापर केला जातो. इथले वाहनांनी तुंबून जाणारे टोलनाके, खराब रस्ते, वाहतुकीच्या कोंडीमुळे दर हंगामात घरी पोहचण्यासाठी होणारी असह्य कसरत या वेळी पाहायला मिळाली नाही. मुंबई-गोवा महामार्गावर दुपदरीकरणाचं काम चालू आहे, तर पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर ते सारोळा या दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीच्या सूचना, वेगळ्या मार्गिकांची सोय, टोलमाफी, नवे तपासणी नाके असे उपाय करूनही हा प्रवास बिकटच असतो.

यंदा कोकणासाठी गणपती विशेष रेल्वेगाड्या सोडण्यावरून रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारमध्ये सुसंवाद नव्हता. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंतच्या काळात येणाऱ्या व जाणाऱ्या अशा एकूण १८२ फेऱ्यांचं नियोजन होतं. विशेष रेल्वे गाड्यांचं २२ ऑगस्टपर्यंतचं आरक्षण केवळ २५ टक्क्यांपर्यंत झालं. प्रत्येक गाडीला १ हजार ६३८ प्रवाशांपैकी सरासरी ४०० प्रवासी मिळाले; तर गणपतीच्या आदल्या दिवसात मुंबईहून रत्नागिरीपर्यंत आलेल्या एका रेल्वेत फक्त ५०-६० प्रवासीच होते. राज्य सरकारने उशिरा घेतलेला निर्णय आणि असलेले निर्बंध यामुळे काहींनी आधीच खासगी वाहनांचा पर्याय निवडला. विशेष रेल्वे आधीच सोडल्या असत्या तर प्रतिसाद वाढला असता, असं प्रवाशांचं म्हणणं पडलं. रेल्वे स्थानकांवर उतरल्यानंतर होणारी आरोग्य तपासणी (केवळ थर्मल स्क्रिनिंग), आजारी नसल्याचं हमीपत्र आणि गावी पोहोचल्यावर तिथले विलगीकरणाचे वेगवेगळे नियम (७, १० की १४ दिवस?) यांमुळे अनेक ठिकाणी वादावादी व गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. रेल्वे, शासन-प्रशासन आणि प्रवासी यांच्यात कोणत्याही स्पष्ट-नेमक्या सूचना वेळेत मिळण्याची सुविधा व समन्वय दिसत नव्हता.

उशीरा निर्णय झाल्यामुळे आणि गैरसोयीच्या चाचणी-विलगीकरण निर्बंधांमुळे मुंबईहून कोकणात गेलेल्या गाड्या बहुतांश रिकाम्या असल्या, तरी गणपती झाल्यावर परतीच्या प्रवासासाठी एसटी, विशेष रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चाकरमान्यांकडून परतीसाठी एक हजारापेक्षा गाड्या आरक्षित झाल्या आहेत. या परत जाणाऱ्यांमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांत अनेक कारणांमुळे कोकणात राहावं लागलेल्यांचाही समावेश असेल.

गणपती आगमनाच्या आधी दोनच दिवस राज्य सरकारनं ‘मिशन बिगिन अगेन-६’ अंतर्गत राज्यातली बससेवा सुरू केली. यामुळे जिल्ह्यांतर्गत धावणारी बस आता जिल्ह्याच्या बाहेरही धावण्याचा मार्ग मोकळा झाला. पण इतर खासगी वाहनांना प्रवासासाठी ई-पास बाळगणं बंधनकारक होतं.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : कोकणवासीयांप्रमाणेच अनेक गोमंतकीय ‘होम क्वारंटाईन’ला सामोरे जाऊन गणपतीचे स्वागत करायला आपापल्या घरी पोहोचले आहेत!

..................................................................................................................................................................

‘अनलॉक-३’च्या टप्प्यात केंद्र सरकारनं देशांतर्गत प्रवासी व मालवाहतुकीवरचे निर्बंध पूर्णपणे हटवले होते. मात्र राज्यांनी हे निर्बंध कायम ठेवले. त्याचा परिणाम अर्थचक्रावर होत असल्यामुळे पुन्हा २९ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनांनुसार आंतरराज्यीय व राज्यांतर्गत वस्तूंची ने-आण, व्यक्तींच्या प्रवासावरील निर्बंध हटवण्यात आले; तसंच स्वतंत्र परवानगी वा ई-पासची गरज नाही असं जाहीर झालं. राज्यातली गंभीर स्थिती पाहता ई-पास बंद केला तर करोनाचा प्रसार वेगानं वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही काळ तरी ई-पास सुरू ठेवणं गरजेचं आहे, असं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. ई-पासच्या सक्तीमुळे भ्रष्टाचाराचा आणि मध्यस्थांच्या हस्तक्षेपाचा फटका कोकणातही अनेकांना बसला.

एका चाकरमान्याने सरकारतर्फे घालण्यात आलेले निर्बंध हे देशात कुठेही प्रवास करण्याच्या आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचं सांगत सरकारने लागू केलेल्या निर्बंधांना/नियमांना न्यायालयात आव्हान दिलं. तसंच विलगीकरणाची अट ही अशास्त्रीय असल्याचा दावाही याचिकेत केला. न्यायालयाने मात्र हे दावे फेटाळून लावले. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांवर सरकारने घातलेले निर्बंध योग्यच असल्याचं सांगत, त्यामुळे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत नसल्याचा निर्वाळा दिला.

कोकणात गणेशोत्सवात दणक्यात खरेदी होते. या वेळचा पाऊस, गर्दी, संसर्गाची भीती या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून काही ठिकाणी (विशेषतः जिल्हा-तालुक्याच्या बाजारपेठांत) खरेदी केली गेली असली तरी, दरवर्षीप्रमाणे उत्साह नसल्यामुळे बाजारावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. काही ठिकाणी प्रशासनानं विशेष सोयी केल्या होत्या. सण, वस्तू खरेदीची अपरिहार्यता आणि टाळेबंदीमुळे गेल्या चार महिन्यांपासून झालेल्या नुकसानीमुळे स्वाभाविकपणे वस्तूंची चढ्या भावात विक्री चालू होती. फुलं, फळं, स्थानिक भाज्या, गणेशमूर्ती, मिठाई, पूजा, सजावटीचं साहित्य इत्यादी वस्तूंचे दर २० ते १०० टक्क्यांपर्यंत वाढले होते.

गणपतीसोबत गौरीच्या पूजन-भोजनाचा सोहळा कोकणात काही ठिकाणी सामिष असतो. वाडीतली मंडळी जास्त हौशी असतील तर कोंबडी वड्यांवर न भागवता वर्गणी काढून बोकड खरेदी करून त्याचे वाटे घातले जातात. या वेळी गावोगावी चाकरमानी मोठ्या संख्येनं असल्यामुळे या बोकडांना जागेवर तीनशे-साडेतीनशे रुपये किलो याप्रमाणे मागणी होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

ऑगस्ट महिन्यात मासेमारी सुरू होऊनही वादळी वारे आणि पावसामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर मासेमारी व्यवसाय ठप्प होता. गेल्या हंगामात लाखोंचं नुकसान झाल्यामुळे मच्छिमार आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या अन्य व्यवसाय-उद्योगांना मोठा फटका बसतो आहे. याचप्रमाणे पर्यटन व्यवसायही जबर नुकसानीत आहे. दरवर्षी या काळात गणपतीपुळे, गणेशगुळे अशा ठिकाणी तुफान गर्दी असते. तिथल्या व्यावसायिकांचा हा अधिक उत्पन्न मिळवण्याचा हंगाम असतो. खासगी गाड्या, हॉटेल्स, त्यावर अवलंबून असणारे इतर व्यवसायही यात येतात. शासकीय आदेशामुळे ही धार्मिक स्थळं बंद असल्यामुळे त्या गावांमध्ये नीरव शांतता आहे.

या वर्षीची परिस्थिती पाहता कोकणात येणारी बिकट वाट, खासगी वाहनांवर अंदाजे ८० ते ९० हजाराच्या घरात करावा लागणारा खर्च आणि गावपातळीवर ग्राम कृती दलांची व्यवस्था पाहून अनेकांनी न येण्याचा निर्णय घेतला. विलगीकरण कालावधी गृहीत धरून इतकी सुट्टी मिळणंही दुरापास्त होतं. त्यामुळे आपल्या घरी मुंबईतच गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय काही भक्तांनी घेतला. यासाठी (पौरोहित्यासाठी) गुरुजींना न बोलावता साधी, आटोपशीर सजावट करून पूजा पार पाडली. कोकणात घरातल्या गणपतीचं दर्शन नातेवाईकांना फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, गुगल मीटच्या माध्यमातून घ्यावं लागलं. ‘दुरून’ का होईना घरातल्या पूजा, आरत्यांना त्यांना उपस्थित राहता आलं.

गणेशमूर्तीची उंची, सार्वजनिक उत्सवावर असलेले निर्बंध मुंबई-पुण्यात प्रभावी असले तरी कोकणात घरगुती गणपतींच्या संख्येवर त्याचा परिणाम झाला नाही. यंदा रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १ लाख ६५ हजारांच्या आसपास, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ६८ हजार गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. काही गावांनी चाकरमानी गावी येऊ न शकल्यामुळे बंद असलेल्या त्यांच्या घरांतही दरवर्षीप्रमाणे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला होता. पण गणेशोत्सवात दरवर्षी दिसणारं चैतन्य, उत्साह यावेळी फारसा पाहायला मिळाला नाही.

कोकणात असलेल्या पद्धतीप्रमाणे गणेशोत्सवात सत्यनारायणाची पूजा, याग किंवा नवस फेडण्यासाठी होणारे विधी दरवर्षी केले जातात. पौरोहित्य करणारे स्थानिक गुरुजी आणि यजमान यांचे संबंध वर्षानुवर्षांचे असतात. भावकी, गावातले ओळखीचे, शेजारी-पाजारी, नातेवाईक अशांना बोलावून हे सोहळे पार पडतात.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : केशवानंद भारती हे काही ‘भारतीय राज्यघटनेचे संरक्षक’ नव्हेत, कृपया गैरसमज नको!

..................................................................................................................................................................

यंदा यजमानांनी तसंच, गुरुजींनी स्वतःवर बंधनं घालून घेतली. काही ठिकाणी काळजी घेऊन पूजा, विधी केले गेले. सार्वजनिक आणि घरगुती गणपतीसमोर एकादष्णी, आवर्तनं, याग यांचं प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्म्यानं कमी होतं. गणपतीची प्रतिष्ठापना घरात बसून गाव-शहर-परदेशातही ऑनलाईन पद्धतीनं करण्याचे प्रयोगही यशस्वी झाले. काहींनी यू-ट्यूबवर व्हिडिओ पाहून घरच्या घरी पूजाविधी पार पाडले. सर्वसाधारण गणपतीच्या दिवसांत पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींची दक्षिणा/मिळकत (जी साधारण ५ ते १५ हजारांच्या दरम्यान असते!) निम्म्यावर आली. एरवी यज्ञयागासारखी मोठी कामं घेणारी मंडळी जास्त नुकसानीत आहेत. कारण त्याचं गणेशोत्सवातलं सर्वसाधारण उत्पन्न २० ते २५ हजारांच्या घरात असतं. या सर्वांचं उत्पन्न अंदाजे ३ ते ९ हजारांवर खाली आलं आहे.

कोकणातल्या जाखडी, भजन आणि अन्य कोकणी लोककला सादर करून स्वतःचं कुटुंब चालवणाऱ्या अनेक व्यावसायिक व कलाकारांना जबर फटका बसला आहे. काही ग्रामपंचायतींनी गावपातळीवर निर्णय करून कोणतेही धार्मिक कार्यक्रम सामूहिकरित्या वा बाहेरच्या कोणालाही न बोलावता घरच्या घरी करावेत असे फतवे काढले. कारवाईची आणि करोना संसर्गाची भीती यामुळे यजमानांमध्येही उत्साह दिसत नव्हता. सार्वजनिक गणेश मंडळांचे रक्तदानासारखे उपक्रम, सामूहिक याग, भजनं, ढोलपथकांचे कार्यक्रम बंद होते.

टाळेबंदीमुळे सजावट, रोषणाई यांत साधेपणा होता. गावात प्रत्येकाच्या घरी स्वतंत्रपणे गणपती बसत असला तरी संध्याकाळी मात्र टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर सामूहिकपणे आरती, भजनं, मंत्रपुष्पांजलीचे कार्यक्रम होतात. त्यासाठी गावातले सारेजण रात्री उशिरापर्यंत जथ्थ्याने घरोघरी फिरत असतात. यंदा मात्र केवळ रिवाज म्हणून, मोजके पाच-सहा जण प्रत्येक घरी जाऊन अतिशय निरुत्साही वातावरणात हा सोपस्कार पार पाडताना दिसून आले. ठाय लयीतली भजनं किंवा शक्ती-तुरे जुगलबंदी सामने, ढोलकी-घुंगरांच्या ठेक्यावरील जाखडी नृत्यं तर अदृश्यच होती.

श्रावण महिना सुरू झाला की कोकणात जाखडीच्या तालमींना सुरुवात होते. ग्रामीण भागात रात्री उशीरार्यंत ढोलकी आणि झांजांचा आवाज घुमू लागतो. अनेक वर्षांची ही परंपरा यंदा थंडबस्त्यात गेली होती. सार्वजनिक स्वरूपाच्या उत्सवाचं प्रमाण जिल्ह्या-तालुक्याच्या ठिकाणी असलं, तरी ते अत्यल्प असतं. त्यांची मिरवणूक यावर्षी नाही. घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी या वेळी पहिल्यांदाच स्थानिक प्रशासनानं आवश्यक ठिकाणी कृत्रिम तलावांची, फिरत्या गाड्यांची व्यवस्था केली होती. गावपातळीवर विसर्जनाच्या ठिकाणी बंदोबस्तही होता. हे असं यंदाचं गणेशोत्सवातलं चित्र होतं!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. शासकीय पातळीवर वेगवेगळ्या विभागांत समन्वय, सुसूत्रता नव्हती आणि वेळेवर निर्णय न घेतल्यामुळे त्रासदायक स्थितीला सामोरं जावं लागलं. त्यामुळे रेल्वे व शासनाचंही आर्थिक नुकसान झालं. भविष्यात अशा काळात प्रवासी आणि प्रशासन यांच्यात संवाद साधू शकेल, सूचना व माहितीचं वेळेत आदानप्रदान होईल आणि त्वरित समस्या सोडवू शकेल, अशी लवचीक प्रणाली उभी करणं आवश्यक आहे. यांत चाकरमानी व गावकरी अशा दोघांचाही विचार/ सहभाग घ्यायला हवा. राजकीय पक्षांच्या अवाजवी हस्तक्षेपाला जागरूकपणे हाताळण्याचं कौशल्य स्थानिकांनीच अंगी बाणवायला हवं.

इतक्या मोठ्या प्रमाणावर कोकणात माणसं येण्याचं वार्षिक वेळापत्रक ठरलेलं असतं. प्रशासकीय पातळीवर याची कार्यप्रणालीही ठरलेली असते; पण, त्यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गतिमानता आणता येईल. उदा. वाहतूक नियमनासाठी अत्याधुनिक ड्रोन्स, क्यूआर कोड यांचा वापर कल्पकतेनं करता येणं शक्य आहे. त्यामुळे परिस्थितीचा आढावा वेगाने घेता येईल आणि त्वरित निर्णय घेणं सोपं जाईल.

करोनामुळे गाव तसंच कौटुंबिक स्तरावर अनेक लहान-मोठे संघर्ष पाहायला मिळाले. चाकरमान्यांची ग्रामपंचायतींनी जसा ग्रामसभेचा, ग्राम कृती दलाचा उपयोग आरोग्यविषयक नियम पाळताना केला, तसे अधिकार वापरून गावाचा विकास करावा अशी अपेक्षा आहे. करोनामुळे यंदा निरुत्साही वातावरणात गणरायाला निरोप दिला गेला. पुढच्या वर्षी दणक्यात आपला गणेशोत्सव साजरा होईल, अशी आशा कोकणी माणूस बाळगून आहे.

..................................................................................................................................................................

लेखक पंकज घाटे रत्नागिरीच्या गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.

pankajghate89@gmail.com 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा