सत्ताधारी मंडळीपुढे कधीही लोटांगण न घालण्याची दर्पोक्ती करणाऱ्या आम्हा पत्रकारांनाही मालकांच्या रूपाने आमचा ‘बोलाविता धनी’ वा स्वामी असतोच!
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 18 August 2020
  • पडघम माध्यमनामा सर Sir युवर लॉडशिप Your Lordship मि. प्रेसिडेंट Mr. President मि. प्राईम मिनिस्टर Mr. Prime Minister

राजकारणात दादा, भाऊ, साहेब, अण्णा, तात्या अशा नावांची खैरातच पाहायला मिळते. आपल्या नेत्याची हांजी हांजी करावी लागत असल्याने ते अपरिहार्य असावे. पण ही बाधी केवळ राजकारणातच पाहायला मिळते असं नाही. कारण नसताना आणि कुणालाही ‘साहेब’, ‘सर’ म्हणण्याची गरज नसते. शिष्टाचार, संकेत यांबाबतीत आपण सहसा उदासीन तरी असतो किंवा बेफिकीर तरी. या पार्श्वभूमीवर हा लेख मननीय ठरावा...

..................................................................................................................................................................

गोव्यातल्या ‘नवहिंद टाइम्स’चा ‘कॅम्पस रिपोर्टर’ असताना पणजीतल्या १८ वा जून रोडवरच्या शिक्षण संचालनालयाला आठवड्यातून दोन-तीन वेळेस भेट देत असे. एक दिवस मला ऑफिसला पोहचण्यास उशीर झाला. त्याबाबत कार्यकारी संपादक एम. एम. मुदलीयार यांनी विचारले असता ‘शिक्षण खात्याच्या उपसंचालकांच्या भेटीसाठी अर्धा तास ताटकळत बसावे लागले’ असे मी सांगितले. त्यावर ते एकदम भडकले. ‘‘नवहिंद टाइम्स’च्या एखाद्या बातमीदाराला कुठल्याही ऑफिसात असे भेटीसाठी ताटकळत ठेवणे’, हा आपल्या दैनिकाचा अपमान आहे, असे ते म्हणाले. ‘ते अधिकारी खरेच महत्त्वाच्या कामात असतील तर तिथे तू थांबायची काहीच गरज नाही’, असे त्यांनी सांगितले.

त्या काळात गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक आणि त्याचबरोबर सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी सरकारी अधिकाऱ्याने कसे वागावे, हे मी त्यांना दाखवून दिले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. मुदलियारसाहेबांचा हा आदेश पाळण्याचा प्रयत्न मी नेहमीच केला.

पत्रकाराने बातम्या कशा मिळवाव्या, पत्रकार म्हणून कसे वागावे, कसे वागू नये, याचे बहुतांश प्राथमिक धडे मी गोव्यात १९८०च्या दशकात आठ-नऊ वर्षे बातमीदार असताना गिरवले. कुठल्याही ऑफिसात, कार्यक्रमात वा इतर कुठेही संपर्कात येणाऱ्या कुणाही व्यक्तीला ‘सर’ असे आदरार्थी विशेषण वापरायचे नाही, अशी दुसरी एक सक्त ताकीद मुदलियारसाहेबांनी मला दिली होती. ‘आपल्या या वृत्तपत्रात तुझे बॉस असणाऱ्या व्यक्तीशिवाय इतर कुणालाही,  मग भले ती व्यक्ती सरकारी अधिकारी असो व मंत्री असो, त्यांना पत्रकार म्हणून भेटताना सारखे ‘यस सर, यस सर’ असे पालुपद लावायची काहीही गरज नाही, पत्रकार कुणाच्याही ताटाखालचे मांजर नसतो. अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल धारेवर धरायचे, त्यांना जाब विचारायचा,  हे बातमीदारांचे काम, त्यामुळे भेटताना त्यांना ‘सर’ म्हणण्याऐवजी त्यांच्या पदाचा आदर राखत ‘मिस्टर अमुकअमुक’ असे म्हटले की बस!’, असा मुदलियारसाहेबांचा आदेश होता. 

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

या आदेशाचे पालन मी पत्रकारितेच्या व्यवसायात गोवा सोडल्यानंतरही सातत्याने करत आलो. त्याचा मला फायदा झाला. समोरची व्यक्ती आपली काही बॉस नाही, पत्रकार या नात्याने आपण दोघे समपातळीवर आहोत, हा विश्वास त्यामुळे निर्माण झाला. सुदैवाने मी ‘नवहिंद टाइम्स’, ‘लोकमत टाइम्स’, ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘सकाळ’ मीडिया ग्रुपसारख्या आघाडीच्या दैनिकांत नोकरी केली. त्याचाही एक वेगळाच फायदा झाला. छोट्या दैनिकांत काम करणाऱ्या बातमीदारांना बातमी मिळवण्यासाठी, अगदी अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी वा क्वचित जाहिरात मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांची आणि इतरांची हांजीहांजी करावी लागते. त्यामुळे त्यांना स्वतःकडे कमीपणा घ्यावा लागतो, इतरांना सारखे ‘सर’ असे म्हणावे लागते, याची मला जाणीव आहे.

कार्यालयाबाहेर बॉस नसणाऱ्या कुणालाही ‘सर’ ही उपाधी न लावण्याचा हा नियम इंग्रजी पत्रकारितेतील अनेक जण पाळतात, हे मी अनेक वृत्तपत्रांत अनुभवलेले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक प्रकाश कर्दळे हे आम्हा सहकाऱ्यांची इतरांना ओळख करून देताना ‘हे माझे सहकारी अमुकअमुक’ असे म्हणत असत. अनेक संपादक आणि इतर ज्येष्ठ मंडळी आपल्याला (!) ‘सर’ म्हणू नये, नावानेच हाक मारावी असा आग्रह करताना मी अनुभवले आहे.

‘नवहिंद टाइम्स’चे वयाची तिशीही न पार केलेले संपादक बिक्रम व्होरा यांना बहुतेक सर्व वरिष्ठ व कनिष्ठ सहकारी ‘बिक्रम’ या नावानेच संबोधत. कुणाही व्यक्तीला तिच्या पहिल्या नावाने हाक मारायची, हा इंग्रजी पत्रकारितेतील आणखी एक रुळलेला संकेत. पत्रकारितेत अनेक वर्षे कारकीर्द केली तरी टीम लीडर म्हणून मी फार कमी काळ काम केले, कुठल्या शैक्षणिक संस्थेत तर कधीच शिकवले नाही. त्यामुळे ‘सर’ ही उपाधी स्वतःला चिकटून घेणे मला कधीच आवडले नाही. ही नावडती उपाधी अलीकडच्या काळात अगदी अनिच्छेनेच मला चिकटली. तरी मी ओळखला जातो तो मुख्यत: ‘कामिल’ म्हणूनच. त्यामुळे खूप मोकळेढाकळे  वाटते. 

माझ्या पत्रकारितेच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे १९८३ला गोव्यात कॉमनवेल्थची एक बैठक झाली. दिल्लीतील औपचारिक परिषदेनंतर गोव्यात ही अनौपचारिक बैठक म्हणजे रिट्रीट होते. त्यानिमित्ताने ब्रिटिश साम्राज्याचा एके काळी भाग असलेल्या संपूर्ण जगातील ३९ राष्ट्रांचे प्रमुख गोव्यात चार दिवस रिट्रिटसाठी जमले होते. त्यामध्ये ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान बॉब किंवा रॉबर्ट  हॉक, झिम्बाब्वेचे राष्ट्रप्रमुख रॉबर्ट मुगाबे वगैरेंचा समावेश होता. या कॉमनवेल्थ परिषदेच्या यजमान म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधी उपस्थित होत्या.

यापैकी कुणाही राष्ट्रप्रमुखाला भेटण्याची किंवा त्यांच्या आसपास फिरकण्याची आम्हां पत्रकारांना मुभा नव्हती. जगभरातील पत्रकार यानिमित्ताने गोव्यात आले होते. फोर्ट आग्वाद ताज व्हिलेज रिसॉर्टवर एकमेकांना अनौपचारिकरीत्या भेटत या राष्ट्रप्रमुखांच्या चर्चा चालू होत्या. जुना गोवा आणि विविध समुद्रकिनारी भेटी, तसेच जुन्या चर्चमधील प्रार्थनांत सहभाग वगैरे बातम्या आम्ही स्थानिक आणि इतरही पत्रकार देत होतो.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : समाजमाध्यमे लोकशाहीसाठी धोकादायक ठरतील का?

..................................................................................................................................................................

भारतीय वंशाचे असलेले श्रीदत्त रामफळ हे तेव्हा कॉमनवेल्थ कॉन्फरन्सचे सरचिटणीस होते. परिषदेचे प्रवक्ता या नात्याने ते आम्हा पत्रकारांना दररोज भेटत असत, दैनंदिन घडामोडीविषयी काही सांगत असत. थ्रिपिस सूट घातलेले, हातात टेपरेकॉर्डरसारखी विविध अद्ययावत उपकरणे घेऊन पत्रकार परिषदेस हजर राहणारे वेगवेगळ्या देशांतील विविध वृत्तपत्रांचे आणि वृत्तसंस्थांचे पत्रकार तेव्हा मी पहिल्यांदा पाहिले. ‘मिस्टर सेक्रेटरी जनरल...’ या संबोधनाने ते कॉमनवेल्थ कॉन्फरन्सचे सरचिटणीस रामफळ यांना प्रश्न विचारत. त्या चार दिवसांत कुणीही त्यांना वा इतर अधिकाऱ्यांना ‘सर’ हे संबोधन वापरले नाही आणि त्यांत त्यांनाही काही अपमानास्पदही वाटले नाही, हे मी या वेळी अनुभवले.

माझ्या कारकिर्दीतील गोव्यातली ही कॉमनवेल्थ परिषद सर्वांत मोठी घटना. या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान व राष्ट्रप्रमुखांना ‘मिस्टर प्रेसिडेंट’ वा ‘मिस्टर प्राईम मिनिस्टर’ असे संबोधन कसे वापरतात हे मी जवळून अनुभवले. असेच संबोधन असलेल्या ‘यस मिनिस्टर’ आणि ‘यस प्राईम मिनिस्टर’ या कमालीच्या गाजलेल्या आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन मालिका अनेकांना आजही आठवत असतीलच. 

पणजीला सचिवालयात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी बोलताना अगदी मंत्र्यांशीही बोलताना पत्रकारितेतील हे तत्त्व पाळल्याचा फायदा झाला. गोव्यात कोकणी भाषेत ‘तुम्ही, आपण’ असे आदरार्थी संबोधन नसल्याने आणखी फायदा व्हायचा. त्या वेळी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, विधानसभेचे सभापती दयानंद नार्वेकर, विरोधी पक्षनेते रमाकांत खलप वा इतर मंत्र्यांनाही ‘तू, तुका’ असेच संबोधन असायचे. फारच आदर द्यायचा झाल्यास ‘राणेबाब, नार्वेकरबाब, खलपबाब’ असा जोड लागायचा.     

त्याशिवाय कुठल्याही कनिष्ठ व वरच्या पातळीवरील न्यायालयात न्यायाधीश वा न्यायमूर्ती प्रवेश करताना आणि जाताना इतर लोकांप्रमाणे पत्रकारांनाही उभे राहण्याचा शिष्टाचार पाळावा लागतो. पणजीला उच्च न्यायालयात न्यायमूर्तींसमोर सुनावणी चालू असताना मी खुर्चीवर बसल्यावर दोन्ही पाय एकमेकांवर टाकले की, लगेच तिथला भालदार येऊन सरळ, नीट आदराने बसण्याची तंबी द्यायचा हे मला आजही आठवते.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : सोशल मीडिया केवळ राजकीय पक्ष, नेते यांचंच नाहीतर सामान्य भारतीय माणसांचंही ‘दानवीकरण’ करत आहे!

..................................................................................................................................................................

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गेल्यावर तिथल्या न्यायमूर्तींना त्यांच्या चेम्बरमध्ये मी ‘युअर लॉर्डशिप’ असेच संबोधत असे आणि उच्च न्यायालयाच्या बातम्यांमध्ये त्यांचा ‘मिस्टर जस्टीस अमुकतमुक’ असाच उल्लेख करावा लागत असे. ‘मिस्टर जस्टीस’ ही उपाधी नक्की कुणासाठी वापरायची हे माहीत नसलेल्या एका बातमीदाराने एकदा ही उपाधी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी वापरली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पणजीतल्या सचिवालयातल्या आमच्या प्रेसरूमध्ये मोठा हास्यकल्लोळ उडाला होता. ‘न्यायाधीश’ ही उपाधी खालच्या न्यायालयांतल्यांसाठी वापरली जाते, तर ‘न्यायमूर्ती’ ही उपाधी उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पीठासीन व्यक्तींसाठी वापरतात.

अनेक दैनिकांनी काळानुसार बातम्यांत व्यक्तीच्या नावाआधी  ‘श्री, श्रीमती’ हे विशेषण वगळले आहे. अगदी जुन्या काळात ‘राजमान्य राजश्री’ असा अगदी आदरपूर्वक उल्लेख केला जायचा.  काही स्थानिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांनी न्यायमूर्तीसाठी ‘मिस्टर जस्टीस’ ही उपाधी वगळली  आहे. काही दैनिके मात्र सरंजामशाहीचे प्रतीक असलेली ‘मिस्टर जस्टीस’ ही उपाधी उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी आजही वापरतात. आम्हाला ‘माय लॉर्ड’ किंवा ‘युअर लॉर्डशिप’ म्हणू नका, असे काही वर्षांपूर्वी काही न्यायमूर्तींनी बजावले आहेच

असेच पत्रकारितेतील काही संकेत कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाची बातमी देण्याबाबत होते. पत्रकारांना पुढच्या रांगेत वा वेगळ्या कक्षात बसण्याची सोय केली जायची. मुख्य पाहुणे असलेले मुख्यमंत्री, मंत्रीमहोदय वा इतर माननीय व्यक्ती सभागृहात प्रवेश करतात. उपस्थित लोक उभे राहून त्यांचे स्वागत करणार. अशा वेळी सभागृहाच्या पहिल्या व दुसऱ्या रांगेतील पत्रकार कक्षातील आम्ही सर्वजण आमचे नोटबुक आणि पेन हातात घेऊन बसलेलेच असायचो. सर्वजण एकत्र बसल्याने या अलिखित सांकेतिक प्रथेला वेगळाच भारदस्तपणा यायचा.

मात्र पत्रकारितेच्या या शिष्टाचार संकेतास काही सन्माननीय अपवाद होतेच. उदाहरणार्थ, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि सभागृहात असताना लोकसभेचे किंवा विधानसभेचे  सभापती यांच्या पदाचा आदर व्यक्त करण्यासाठी पत्रकारांनी उभे राहावे, असा सर्वसाधारण संकेत आम्ही पाळत असू. आमच्या संपादकाच्या मतानुसार विद्यापीठाचे कुलगुरूसुद्धा या अपवादात्मक आदरास पात्र होते.

या संकेतामुळे मात्र कधी गंमतीदार घटनाही घडायच्या. वसंतराव डेम्पो, विश्वासराव चौगुले, तिंबलो, साळगावकर वगैरे उद्योगपती म्हणजे गोव्यातील लोहखनिज खाणींचे मालक हे इंग्रजी, कोकणी आणि मराठी वृत्तपत्रांचेही मालक होते. या वृत्तपत्रांच्या मालकांना सार्वजनिक कार्यक्रमांत मिरवण्याची मोठी हौस असायची. यापैकी प्रत्येक जण वर्षांतून किमान चार-पाच वेळा सार्वजनिक व्यासपीठांवर यायचे. या कार्यक्रमांत ते वाचत असलेली भाषणे त्यांच्या दैनिकांतील मुख्य संपादकांनीच लिहिलेली असायची!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तर ‘नवहिंद टाइम्स’ आणि ‘नवप्रभा’ या दैनिकांचे मालक असलेले वसंतराव डेम्पो कार्यक्रमाच्या स्थळी आले की, ‘गोमंतक’चे बातमीदार रमेशचंद्र सरमळकर, सुरेश काणकोणकर, ‘राष्ट्रमत’चे  बालाजी  गावणेकर वगैरे पत्रकार ‘नवहिंद’ ग्रुपच्या आम्हा एक-दोन बातमीदारांना ढोपऱ्याने टोचून ‘अरे तुझो पात्राव आयलो, बेगिन उभे राव’ असे डिवचत आम्हाला आदराने उभे राहण्याचे फर्मावत असत आणि मग चरफडत मी आणि ‘नवप्रभा’चे बातमीदार गुरुदास सावळ वगैरे मुकाट्याने तटदिशी उभे राहत असू. पुढे कधीतरी गोमंतक दैनिकाचे मालक विश्वासराव चौगुले कार्यक्रमास हजर असत, तेव्हा ‘नवहिंद’ माध्यमसमूहाचे आम्ही पत्रकारमंडळी मग सरमळक, काणकोणकर वगैरेंवर अगदी त्याच पद्धतीने पुरता वचपा काढत असू. 

सार्वजनिक कार्यक्रमांत वा इतरत्र कुठेही कुठल्याही राजकीय सत्तास्थानासमोर न झुकण्याशी फुशारकी मारणाऱ्या आम्हा पत्रकारांच्या आणि वृत्तपत्रांच्या निर्भीड स्वातंत्र्यालाही अशा प्रकारे कधीतरी नव्हे तर अनेकदा मुरड घालावीच लागते. सत्ताधारी मंडळीपुढे कधीही लोटांगण न घालण्याची दर्पोक्ती करणाऱ्या आम्हा पत्रकारांनाही मालकांच्या रूपाने आमचा ‘बोलाविता धनी’ वा स्वामी असतोच, या कटु सत्याची अशा प्रतीकात्मक घटनांमुळे प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांतही काम करणाऱ्या आम्हा सर्वच पत्रकारांना प्रकर्षाने जाणीव व्हायची.

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......