गोंधळलेल्या परिस्थितीमुळे मुलं, पालक भांबावून गेले आहेत. आणि शिक्षकदेखील.
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
कल्पना धाकू मलये
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 31 July 2020
  • पडघम कोमविप ऑनलाईन शिक्षण Online education करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona virus लॉकडाउन Lockdown

मार्च महिन्याचा तिसरा आठवडा अभ्यासक्रम शिकवून जवळजवळ संपत आलेला आणि परीक्षांचे वेध लागलेले. ‘परीक्षा कधी सुरू होतील?’ असे मुलांचे प्रश्न ‘आणि कधी संपतील?’ हे घरी जायची घाई लागलेल्या पालकांचे प्रश्न. आकारीक मूल्यमापनाची - विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना नियमित केले जाणारे मूल्यमापन - राहिलेली आवराआवर आणि संकलित मूल्यमापनाची - ठरावीक कालावधीनंतर एकत्रित स्वरूपात केले जाणारे मूल्यमापन. उदा. लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश इत्यादी - आखणी अशी सगळी उलथापालथ सुरू असताना अचानक कोविड-१९च्या थैमानाला सुरुवात झाली. त्याच्या प्रसाराला आळा घातला जावा यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत सुटी देण्यात आली. विद्यार्थ्यांना सूचना देऊन, खबरदारी कशी घ्यावी, हे सांगून लगेच घरी पाठवावं लागलं.

अनेक प्रश्नचिन्हं सोबत घेऊन आणि ३१ तारीखपर्यंतचा गृहपाठ देऊन १ एप्रिलला पुन्हा भेटूया म्हणत निरोप घेतला. ३१ मार्च उलटून गेली. परीक्षा रद्दची घोषणा झाली. आकारीक मूल्यमापनावर आधारीत श्रेणी देऊन विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवायचे ठरले. मधल्या काळात शिक्षण क्षेत्रात बरेच निर्णय घेतले गेले. दहावीचा एक पेपर रद्द केला गेला. काही दिवस नववी-अकरावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही घ्यायच्या याविषयी बरीच उलटसुलट चर्चा होत राहिली. नंतर त्या रद्द होऊन मुलांना पुढच्या वर्गात पाठवायचे ठरले.

त्यानंतर हा हा म्हणता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. पण स्थिती ‘जैसे थे’च राहिली. कोणतीही पूर्वतयारी नसलेले शिक्षण क्षेत्र दिशांचा शोध घेत आपली नौका हाकू लागले. 

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

काही शाळांनी म्हणजे बहुतांश इंग्रजी माध्यमांतील शाळांनी व्हिडिओ मिटिंग्जद्वारे शिकवायला सुरुवात केली, पण समस्या तिथेही होतीच. ठराविक वेळेतच शिकवणं आटोपायचं असल्याने विद्यार्थ्यांच्या शंका-समाधानासाठी वर केलेले हात तसेच राहू लागले. पुन्हा पडद्यावर एकाच वेळी फार मोठ्या पटसंख्येचा वर्ग दिसणे शक्य नव्हते. तसेच समोर विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे, याचा थांगपत्ता अजिबात लागू शकत नव्हता. समस्या तिथेही सुरू आहेतच.

पण ज्या शाळांना हे शक्य नव्हते, त्या शाळांनी काय करावं, या प्रश्नाचं उत्तर त्या त्या शिक्षकांनाच शोधावं लागलं. अंधारात चाचपडत काही शिक्षकांनी आपली आपणच वाट शोधून काढली.    

डिजिटल शिक्षणाचे वारे शिडात भरलेलेच होते. आता समोरासमोर शिकवणं नाही, म्हणजे ऑनलाईन हाच पर्याय शिल्लक राहिला. ऑनलाईन शिक्षण म्हणजे व्हिडिओ तयार करून तो ढकलणे एवढाच अर्थ काढून काहीजणांनी तशी सुरुवातही केली. व्हिडिओ तयार करून पाठ शिकवणे म्हणजे वर्गात शिक्षकांनी येणे, भराभर शिकवत जाणे आणि मुलांकडून काहीच प्रतिसाद नसणे असंच होतं. मुलांच्या मनात येणाऱ्या शंका, समस्या, प्रश्न सगळं मुलांच्या मनात साठू लागले.

ज्या पालकांकडे एकापेक्षा जास्त स्मार्टफोन होते, त्यांचा प्रश्न नव्हता; पण ज्यांच्याकडे एकच स्मार्टफोन होता, त्यांनी तोही स्वतःच्या कामासाठीच घेतलेला होता. अशा घरांमध्ये अक्षरश: कटकटी सुरू झाल्या. दमले-भागलेले पालक आधीच वैतागलेले होते. त्यात पुन्हा मुलांचा फोनसाठी हट्ट. मुलांनी फोन हातात घेतल्यानंतर बराच वेळ स्वतःजवळ ठेवल्यावर होणारी पालकांची  चिडचिड.

अर्थात यामागे कारणेही तशीच होती. अलीकडच्या काळात बरीच मुलं मोबाईल गेमच्या आहारी जाऊन स्वतःचे नुकसान करून घेत असल्याचे आपल्याला समाजात आढळून येत आहे. अशा परिस्थितीत पालकांची चिडचिड होणे चूक म्हणता येणार नाही. काही पालक रात्री उशिरा कामावरून घरी येतात आणि सकाळी लवकर जातात. अशा काळात मुले झोपलेली असण्याची शक्यता असते. त्या मुलांनी मोबाईलवर आलेला अभ्यास कधी पाहायचा? एकच मोबाईल आणि तोही पालकाकडे असल्यास मुलांना ऑनलाईन लेक्चर पाहता येत नाहीत. कारण त्या वेळी त्यांचे पालक नोकरीवर गेलेले असतात. किंवा ऑनलाईन पाठवलेला गृहपाठ पालक घरी आल्याशिवाय पाहता येत नाही. असे अनेक प्रश्न शहरी-निमशहरी भागात निर्माण होत आहेत. त्यातून काही मुलांनी आपल्याकडे फोन नाही हा आपला न्यूनगंड वाटून घेतला.

अगदी माझ्या सानिध्यातले उदाहरण. माझा भाऊ रिक्षाचा व्यवसाय करतो. त्याच्या दोन मुली शिकणाऱ्या. एक दहावीची परीक्षा देऊन कॉलेजच्या मार्गावर आहे आणि दुसरी सहावीमध्ये शिकते. सतत मोबाईलवर येणारा अभ्यास बघून तो पूर्ण होत नसल्याने सहावीतल्या मुलीच्या मनात भीती दाटून यायला लागली. आपण अभ्यासात मागे पडत आहोत, आपल्याकडे लॅपटॉप नाही, हे फार मोठे वैगुण्य आहे, असे तिला वाटू लागले. तिचे खाण्यापिण्याकडचे लक्ष उडाले लॉकडाऊनमुळे रिक्षाचा व्यवसाय अक्षरशः दोन ते तीन महिने बंद होता. शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून येणारा अभ्यास, पाठवलेल्या लिंक्स आपल्याला सोडवता येत नाहीत, ही भीती त्या मुलीच्या मनात घर करून राहू लागली. तिने लॅपटॉपसाठी हट्ट धरला. अर्थात वडिलांनी काहीतरी खटपट करून लॅपटॉप विकत आणला.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘शिक्षण’ ही एक गुंतवणूक आहे, हे कधीच मान्य न केलेल्या देशात ‘ऑनलाईन शिक्षण’ पद्धती कशी अस्तित्वात येईल?

..................................................................................................................................................................

ही झाली एका घराची कहाणी. पण अनेक घरांमध्ये हेच घडत आहे. अगदी अलीकडच्या काळात ऑनलाईन अभ्यास होत नाही म्हणून काही मुलांनी आत्महत्याही केल्या आहेत.

फार कमी दिवसात तंत्रस्नेही केलेले शिक्षक कितपत तंत्रज्ञान योग्य प्रकारे हाताळून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतात आणि किती विद्यार्थी प्रतिसाद देऊ शकतात, हा प्रश्नच आहे. डिजिटल शाळांची आकडेवारी गोळा करताना शिक्षकांकडे मोबाईल असला तरी शाळा डिजिटल शाळेत गणली गेली. आता डिजिटलची ही कागदोपत्री पूर्तता उघडी पडलीय.

कोविड-१९च्या संकटामुळे आज एक नवा प्रश्न आपल्या शिक्षणासमोर उभा ठाकला आहे ऑनलाईन शिक्षण हा पर्याय होऊ शकतो का? अर्थातच या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला ऑफलाईन शिक्षणाचा विचार करावा लागेल, जेव्हा विद्यार्थी शाळेत येत असतात, तेव्हा ते निव्वळ पुस्तकी शिक्षण घेतात असे नाही. विद्यार्थ्यांचे आजूबाजूच्या परिसरातील मित्र-मैत्रिणींशी होणारे संवाद, शिक्षकांशी होणारे संवाद, वर्गात वर्गाबाहेर सातत्याने घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, खेळ, गाणी, गोष्टी, गप्पा, त्यांची आवडती मधली सुट्टी. विविध उपक्रम, सहली, क्षेत्रभेटी या सगळ्यांचा अंतर्भाव शिक्षणात होतो.

शाळेत पाऊल टाकल्यापासून मुलांचे डोळे बोलू लागतात. त्यांना खूप काही सांगायचं असतं, बोलायचं असतं. शिक्षक शिकवत असताना शिक्षकांनी सांगितलेले अनुभव लगेच ते आपल्या पूर्वानुभवाशी जोडून घेतात. त्यावर त्यांना बोलायचं असतं. हे सगळं त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक वाढीसाठी अत्यावश्यक असंच आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी या सर्व अनुभवांना मुकत आहेत. ऑनलाइन शिक्षण हा शिक्षणासाठी पर्याय होऊ शकत नाही. 

एकंदरीत सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत मुलांना फक्त घरात डांबून ठेवणे एवढीच संपूर्ण समाजाची भूमिका आहे. त्यांच्या बालमनाचा कोणी फारसा विचार केलेला दिसत नाही. इकडून तिकडून काही स्पर्धा, काही प्रश्नावल्या निव्वळ ५० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. उरलेल्यांचं काय? माहीत नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

यानिमित्ताने आपण जगत असलेल्या नेहमीच्या परिस्थितीत सतत एकाच बाजूने विचार करतो, हे आपणा सर्वांच्या लक्षात आलंय. अचानक बदल घडून आल्यास तंत्रज्ञान असूनदेखील आपण काही अडचणींवर मात करू शकत नाही.

तसंच एकंदरीत पालकांच्या म्हणजेच समाजाच्या आर्थिक स्तराचा विचार केल्यास ऑनलाइनच्या खटपटीत शिक्षणापासून मध्यमवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारा वर्ग काहीसा दूरच राहत आहे. शिक्षण विभाग मात्र शैक्षणिक वर्ष चालू असल्याचे दाखवून पुढे चालत आहे. अगदी अलीकडेच शिक्षण विभागाकडून पाठ्यक्रमातील काही भाग वगळले असल्याचे परिपत्रक आले आहे. वगळलेला भागातील महत्त्वाचा भाग विद्यार्थ्यांकडून कसा पूर्ण करून घ्यावा?

यातील काही घटक यापूर्वीच शिकून झाले आहेत. गोंधळलेल्या परिस्थितीमुळे मुलं आणि पालक भांबावून गेले आहेत. सोबतच शिक्षकदेखील. शिक्षण विभाग आणि कोविड-१९ची अत्यावश्यक सेवेची कर्तव्ये पार पाडणे, अशा दुहेरी भूमिकेतून वावरताना शिक्षकही हैराण झाले आहेत. मुले एकच प्रश्न सातत्याने पालकांना, शिक्षकांना विचारत आहेत- शाळा कधी सुरू होणार? मला वाटतं - या एकाच प्रश्नाच्या उत्तरात सर्वांच्याच‌ प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत...

..................................................................................................................................................................

‘वैनतेय’ साप्ताहिकाच्या ३० जुलै २०२०च्या अंकातून साभार

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा