मीम चूक की बरोबर हा दुय्यम मुद्दा आहे... तरुणांची अस्वस्थता समजून घेण्यात कमी पडता कामा नये
पडघम - सांस्कृतिक
विजय तांबे
  • हीच ती मीम, ज्यावरून गेले काही दिवस सोशल मीडियावर गदारोळ चालला आहे
  • Mon , 27 July 2020
  • पडघम सांस्कृतिक मीम साने गुरुजी श्यामची आई श्याम

‘श्यामची आई’ या सिनेमातील ‘श्याम आणि त्याची आई’ यांची छायाचित्रं वापरून मास्क वापरासंबंधी मीम तयार करून सोशल मीडियावर सर्वत्र फिरली. माझ्या आठवणीप्रमाणे गेले काही महिने उत्पल व.बा. याच सिनेमातील ‘श्याम आणि त्याची आई’ हे छायाचित्रं वापरून वेगवेगळे मीम बनवत होते. त्याचे सोशल मीडियावर कौतुकही झाले. नुकतेच काही तरुणांनी हे तथाकथित वादग्रस्त मीम बनवले आणि गदारोळ झाला.

गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर राग, द्वेष, थट्टामस्करी, टिंगलटवाळी, तिरकस टीका करण्याचे अनेक प्रकार तयार झाले. अभिव्यक्तीचे हे प्रकार निर्विष विनोदापासून चारित्र्यहनन, अफवा पसरवण्यापर्यंत सगळ्यासाठी वापरले गेले. गांधीजी आणि नेहरू यांच्याबद्दल गलिच्छ अफवा पसरवण्यासाठी पगारी आयटी सेलने मीमचा वापर केला.

मीम म्हणजे नक्की काय असं कोणी विचारलं तर ‘आपल्याला सुचलेले मांडण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांवर काही प्रक्रिया करणे’ असे ढोबळमानाने मानाने म्हणता येईल. समाजामध्ये आज भेडसावणाऱ्या प्रश्नांची विविधता आणि गुंतागुंत प्रचंड आहे. माध्यमांचा स्फोट झालेला असला तरी माध्यमे कमी शब्दांची आणि भरपूर चिन्हांची झालेली आहेत. अशा वातावरणात वाढलेल्या तरुणांना वरुण ग्रोव्हर, कुणाल कामरा जवळचे वाटतात. अभिव्यक्तीसाठी रॅप आणि मीम आपले वाटतात. आहे त्या साधनांवर प्रक्रिया करताना ते मोडतोड करतात. व्यवस्थेवरचा राग, चीड, टिंगलटवाळी उपलब्ध छायाचित्रं, चित्रं किंवा फिल्मवर व्यक्त करतात.

हे व्यक्त करणाऱ्या तरुणांचे प्रकार नेहमीप्रमाणे वेगळे असतातच. काही थिल्लर असतात, काही टवाळी करतात, तर काही खरोखरीच गंभीरपणे संदेश पोचवण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारांनी दचकून जाण्याचे कारण नाही. हे सर्व प्रकार सर्वच प्रकारच्या अभिव्यक्तींमध्ये सनातन काळापासून चालत आलेले आहेत. या सगळ्यातून समाजाच्या सांस्कृतिकतेची पातळी ठरते.

असं सगळं समाजात चालूच होतं. अश्लीलतेविरुद्ध खटले झालेच. अगदी आठवणीतली घटना म्हणजे वसंत दत्तात्रय गुर्जर यांची ‘गांधी मला भेटला’ ही कविता राष्ट्रीय नेत्याचे चारित्र्यहनन करते म्हणून पतित पावन संघटना सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपण समजून घेतलं की, खूपसे प्रश्न सुटतात.

व्यक्त होण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य श्रेष्ठ आहेच, मात्र त्यात एक गंमत आहे आणि एक मर्यादा. मर्यादा ही आहे की धमकी देणे, हिंसा घडवून आणू, गुन्हा करू, हल्ला करू, शारिरीक इजा करू किंवा हे सगळं करण्यास चिथावणी देणे, हे सगळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अमान्य आहे. कुणीही दहशत निर्माण करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरणे चूकच आहे. मात्र गंमत अशी आहे की, थेट मतभेद, तिखट आणि परखड टीका नसेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य अगदीच बेचव होईल ना?

वरील दोन्ही मुद्द्यांत भावना दुखावणे नावाचा प्रकारच आलेला नाही. भावना दुखावणे हणजे नक्की काय असतं? आपल्या मनात एक आदर्श असतो. मग तो तुकाराम असो, की सावरकर असोत, की डॉ आंबेडकर. व्यक्ती महत्त्वाची नाही. त्या आदर्शाची तत्त्वे आपण आपल्या जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करावा अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते. सुरुवातीला तसे प्रयत्नही होतात. नंतर कळू लागतं की, दैनंदिन जीवनात आदर्शांच्या पावलावर पाऊल टाकून चालणं फारच कठीण आहे. त्यापेक्षा आदर्शांची नावे वापरून गट तयार करावेत. सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू करावी. धर्मांचे, पंथांचे, जातींचे, विचारसरणीचे गट एकत्र येण्यासाठी आपल्या अस्मिता जागवण्यास सुरुवात करतात. त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे आपल्या सर्वांना बांधून ठेवणारा एक ‘आयकॉन’ शोधावा लागतो. आयकॉन म्हणजे आपल्या मनातल्या आदर्शाचे दैवतीकरण करणे. हे दैवतीकरण आपला धर्म, पंथ, जात, विचारधारा आंधळेपणाने घट्ट करण्यास मदत करतो.

याचे कारण दैवतीकरणाचा एकमेव नियम असा आहे की, या दैवताची पूजा करावी. त्यासाठी कर्मकांड, प्रतीके, चिन्हे यांचा मुबलक वापर आणि प्रदर्शन करावे. दैवताबद्दल आपल्याला न आवडणारे बोलल्यास सर्वांनी संघटीत होउन बोलणाऱ्यास गप्प करावे. पण आपल्या आदर्शांचे विचार आपल्या जीवनात उतरू नयेत, याची पुरेशी खबरदारी घ्यावी. याची अनेक उदाहरणे देता येतील. हे सर्व झाले सर्वसामान्य माणसाच्या भावना दुखावण्याचे वर्णन.

ज्यांच्या भावना दुखावत नाहीत, त्यांच्याबद्दल काय मांडता येईल? माझे माझ्या आदर्शांवर अतिशय डोळसपणे प्रेम आहे. माझ्या आदर्शांचे गुण-दोष मला नीट माहीत आहेत. त्यांच्याबद्दल कोणी गंभीरपणे विधान करत असेल तर मी त्यावर नक्की विचार करेन. मात्र कोणी टिंगल करण्यासाठी किंवा मला भडकवण्यासाठी खोडसाळपणा करत असेल तर मी भडकावे का? मी भडकलो याचा अर्थ जे विरोधकाला अपेक्षित आहे, तसेच मी वागतोय. अशा वेळी प्रतिसाद न देता आपल्या मताशी ठाम राहणे हा उत्तम मार्ग असतो.

जो सामाजिक कार्यकर्ता आहे, त्याचा या सर्वांपेक्षा वेगळा मार्ग असतो. सामाजिक कार्यकर्ता हा सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळा असतो. त्याला समाजातील वास्तवाचे भान असते. त्याची स्वत:ची विचारधारा असते. कितीही विरोध, छळ झाला तरी लोकांमध्ये आपल्या विचाराचा प्रसार करणे, आपल्या विचारातील समाज प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कष्ट करणे, यात त्याला आत्मिक आनंद असतो. यातूनच त्याच्या वर्तनाची शैली इतरांपेक्षा वेगळी होते. मला जो विरोध करत आहे, त्याला मी कसे जिंकेन हे त्याच्या समोरचे आव्हान असते. निंदानालस्ती, टीका, टिंगलटवाळी याचे हलाहल पचवून मला त्यांनाच जिंकायचे आहे, ही त्याची भूमिका असते.

माझ्या भावना दुखावल्या म्हणून मी पोलिसात तक्रार केली तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी संवादाचे मार्ग तोडत असतो. कायद्याच्या चौकटीत आरोपी आणि फिर्यादी, न्यायनिवाडा, गुन्हेगार, शिक्षा असं सगळं असतं. तेथे संवाद, गैरसमज दूर करणे, मनमोकळे बोलणे, एकमेकांना समजून घेणे, परस्पर मैत्री, सहकार्य नसते.

भारतामध्ये या सगळ्याची स्पष्टता गांधीवादी, समाजवादी आणि साम्यवादी मंडळींना होती. हल्ली गांधीजींचा खून साजरा होतो, तरीही कोणीही गांधीवादी पोलिसात तक्रार करत नाही. समाजवादी साने गुरुजींना त्यांच्याच हयातीत भरपूर दूषणे मिळाली, मात्र गुरुजींच्या संवादात कुठेही फरक पडला नाही. एसेम जोशींच्या गळ्यात चपलांचा हार घातला तरी त्यांचे चित्त तसूभरही विचलित झाले नाही. साम्यवाद्यांनी भावना दुखावल्याची कुठे तक्रार केल्याचे वाचनात आलेले नाही. सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका ही आपल्या विचाराला पुढे घेऊन जाण्यासाठी संवादाची, माणसे जोडण्याची असते, कायद्याचा आधार घेऊन तक्रार करण्याची नसते.

एकंदरीतच सध्या चळवळींमध्ये तरुणांशी संवाद कमी झालाय. श्याम आणि त्याची आई यांचा मीम करणारी काही तरुण मुले आहेत असे ऐकीवात आले. या निमित्ताने एक चांगले झाले की, तरुण काय करत आहेत याकडे पन्नाशी पार केलेल्या कार्यकर्त्यांचे लक्ष गेले. आता ही दरी बुजवण्याचे काम तरुणांचे नाही, तर वय आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांचे आहे. त्यांनी पुढाकार घेउन सोशल मीडियावर कृतीशील असणाऱ्या या आणि अशा सर्व तरुणांना भेटावे. त्यांचे विचार समजून घ्यावे. मोकळ्या मनाने त्यांची अभिव्यक्ती जाणून घ्यावी.

साने गुरुजी म्हणजे गोळवळकर गुरुजी नव्हेत आणि गाडगेबाबा व तुकडोजी महाराज म्हणजे टिपिकल सध्याचे बाबा आणि महाराज नव्हेत, हे त्यांना सांगण्याची जबाबदारी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आहे. गप्पांच्या ओघात देश कसा घडला त्याच्या गोष्टी सांगाव्या लागतील, देशाचे संविधान निर्माण झाले, त्याचे परिणाम काय हे सांगावं लागेल.

त्याचबरोबर देशाच्या आजच्या स्थितीबद्दल मुलांचा दृष्टीकोन समजून घ्यावा लागेल. कदाचित त्यांना आजच्या स्थितीची जाणीव करूनही द्यावी लागेल. सोशल मीडियावरील वाईट प्रचार समाजात कसे विष पसरवत आहे, या विषयावर एकमेकांशी गप्पा माराव्या लागतील.

एक मात्र नक्की, जो तरुण एका छायाचित्राची मोडतोड करून त्यातून काही सांगू पाहतोय, याचा अर्थच तो अस्वस्थ आहे. त्याचे मीम चूक की बरोबर हा दुय्यम मुद्दा आहे, मात्र त्याची अस्वस्थता समजून घेण्यात कमी पडता कामा नये.

..................................................................................................................................................................

लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 28 July 2020

विजय तांबे,

तुम्ही म्हणता की साने गुरुजी म्हणजे गोळवलकर गुरुजी नव्हेत. तुमचा एकंदरीत सूर असा आहे की जणू काही साने गुरुजींचे आदर्श गोळवलकरांनी बिघडवले. प्रत्यक्षात आज साने गुरुजींचे सेवेचे आदर्श जर कोणी पाळंत असतील तर ते गोळवलकरांच्या रा.स्व.संघाचे स्वयंसेवक होय. तेव्हा विनाकारण गोळवलकरांना मध्ये आणू नका. आणि आणलंत तर विपरीत रंगात न रंगवता यथोचित रंगात रंगवा.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......