आपल्या संवेदनशीलतेला अर्धांगवायू झालाय आणि करमणुकीला बद्धकोष्ठता (?)
पडघम - सांस्कृतिक
अंजली अंबेकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 29 May 2020
  • पडघम सांस्कृतिक करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

करोनाचे संकट आहे की महामारी आहे, याविषयी वाचून, समजून घेताना जीव मेटाकुटीला आलाय. तरी ते समजत नाही, आकलन तर त्याहून होत नाही आणि त्याला सामोरं कसं जायचं हे कळता कळत नाहीये. सोशल मीडियाचा बावळट आणि संवेदनशून्य पसारा इतका वाढलाय की, तो या काळात आवरता आवरत नाहीये. लोक भीतीने वर्तमानपत्रं बंद करून बसले आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या भुरट्या व्हायरल होणाऱ्या गोष्टींशी डोकं लावत बसले. व्हॉट्सअ‍ॅप तर एक विद्यापीठ म्हणूनच उदयाला येईल असं वाटतंय. WHOनेही वर्तमानपत्रांना क्लीन चिट देऊनही फारसा परिणाम होईल असं वाटत नाही. इ-फॉरमॅटवर अधिकृत बातम्यांचे स्त्रोत येऊनही आम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर जास्त भरवसा आहे आणि ते सध्याच्या काळात सोयीचंही आहे.

ठाण्यातील आम्ही राहतो त्या माजिवडा गावात करोना-रुग्णांची संख्या वाढतेय. परिणामी मध्यमवर्गीय सोसायटीतील नियमांचे दोर आवळले जाताहेत. कुणी सोसायटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर करोना-रुग्णाचं छायाचित्रं फॉरवर्ड करतंय, तर कुणी घरगुती काम करणाऱ्या बायकांना सरकारमार्फत अन्न धान्य पुरवलं जातंय, तर आपण विनाकाम पूर्ण वेतन कशाला द्यायचं असे तारे तोडतंय!

एकूणात मध्यमवर्गीय आपापल्या फ्लॅटमध्ये राहून बरीच तारेतोड करताहेत. कारण घरी राहू शकणारी आणि पर्यायाने सुरक्षित राहू शकणारी ही मंडळी आहेत, असंच सध्यातरी म्हणावं लागेल. तुम्ही, आम्ही आणि आपण सगळेच फक्त या संकटात कसं सहसंवेदनेनं वागायला हवं, असं मूर्ख अनॲनेलिटिकल भरताड फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमांतून ऐकवतोय, पण प्रत्यक्षात असं काही होताना दिसत नाही. किंबहुना आपली ते करण्याची तयारी नाही.

टाळेबंदीचा काळ जसजसा वाढतोय, तसंतसं कामवाल्या बायांचं येणं लांबतंय आणि तुमचं त्यांच्यावर पूर्णतः अवलंबून असणारं घरही पूर्वपदावर येत नाहीये. त्यामुळे सातासमुद्रापारची, अमेरिकेतील ‘आत्मनिर्भर’पणाची उदाहरणं दिली जाताहेत. पुरुषांची भांडी घासताना, लादी साफ करतानाची छायाचित्रं, विनोद येताहेत. आपण तेही एन्जॉय करतोय. आपली सुरक्षित उपायांची योजना फक्त कामवाल्या बायकांना काम करण्यापासून परावृत्त करतेय. गरीब वस्त्या, झोपडपट्ट्या यांममधून संसर्ग कसा पसरला जाऊ शकतो, याची बुद्धिमान कारणमीमांसा केली जात आहे.

त्यापूर्वी करोनासारखा जगाला एकाच वेळी वेठीला धरणारा आणि सगळ्याच प्रागतिकपणाची झिंग उतरवणारा विषाणू याच श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय माणसांमार्फत गरीब वस्त्या, झोपडपट्ट्यांमध्ये घुसला, याचा मात्र सोयीस्कर विसर पडतोय, आपण तो पडू देतोय.

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यांत मात्र ‘स्वीगी’, ‘झोमॅटो’ किती अलगद आणि अगदी जीवनावश्यक गरजांसारखे तुमच्या सोसायटीत घुसलेत. ‘नेचर्स बास्केट’ वाईन व बिअर पुरवतेय. तेही चालतंय आपल्याला. ‘ॲमेझॉन’, ‘बिग बास्केट’च्या गाड्या सकाळपासून शांतता भंग करत असतात आणि सोसायटीची चहलपहल वाढते. सुरक्षारक्षकांच्या कामांत अजून एक भर पडलीय. पण हे सगळं चालू राहणार.

आमच्या घरी माझा मुलगा, अहान साडेआठ महिन्यांचा असल्यापासून सोनाली नावाची त्याची ताई आहे. ती पहिल्यांदा आमच्या घरी आली, तेव्हा तिला मराठीही फारसं येत नव्हतं. मुलं सांभाळण्याचा अनुभवही नव्हता. तळकोकणातून आलेली असल्यामुळे ती फक्त मालवणी बोलू शकायची. हळूहळू मराठी शिकली. अहानला सांभाळण्यापासून घरचं सगळं काम करायला लागली आणि मग ‘ऑल इन वन’ झाली. तिच्याशिवाय माझ्याकडे आता दुसरी मदतनीस नाही आणि ती माझ्याशिवाय इतर कुणाचं कामही करत नाही.

आमचं हे किती तरी वर्षांपासून असंच सुरू आहे. दरवर्षी गणपतीच्या काळात ती कोकणात गावी जाते, तेव्हा आठ-दहा दिवस घरचं सगळं काम आमच्या दोघांवर पडतं. आम्ही वर्षातून दोनदा फिरायला जातो, तेव्हा तिला सुटीच असते. तेवढं आणि तेवढंच. सोनाली बाकी कधी फारशा सुट्या घेत नाही. आपल्याला कशी रविवारी सुटी असते, तशी सोनालीताईला का नाही, असं अहान शाळेत जायला लागला तेव्हापासून म्हणायला लागला, मग रविवारी ती सकाळचं सगळं काम करून घरी जायला लागली. बाकीचं दिवसभराचं काम किंवा स्वयंपाक मी किंवा सतीश, माझा नवरा करायला लागलो. तशीही सुटी असली की, पूर्ण स्वयंपाक बहुतांश वेळा मीच करते. ती इतर कामं करते.

सांगण्याचा मुद्दा असा की, she is very much part of our family. मी या सर्व टाळेबंदीच्या काळात तिला मिस करतेय. ती आमच्या घरापासून फक्त पाचच मिनिटांच्या अंतरावर आहे, तरी गेल्या दोन महिन्यांत आम्ही भेटलेलो नाही. तसा आम्ही नेहमी तिला फोन करतो. पगार देणं वगैरे फार व्यावहारिक झालं आणि ते आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहेच. करोनामुळे आम्हा दोघा नवरा-बायकोची पगारकपात होत आहे, प्रत्येक महिन्याला वेळेवर मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही. तरी पण आमचा पगार जेव्हा केव्हा होतो, तेव्हा आम्ही तिचाही लगेच करतो.

जूनपासून सगळ्या घरकाम करणाऱ्या बायका येऊ शकतील, असं सोसायटीनं सुतोवाच केलं होतं म्हणून तिला करोनाबाबतची वैद्यकीय तपासणी करायला सांगितली. पण पुन्हा टाळेबंदीचा काळ वाढला, सोसायटीची बंधनं वाढली. त्यामुळे घरकामवाल्या बायकांना यापुढे दुसऱ्या, तिसऱ्या महिन्याचं वेतन मिळणार की नाही, ही शंका आहेच.

आरोग्याची सुरक्षितता हा महत्त्वाचा भाग आहेच आणि ते मान्यच आहे, पण त्यासाठी पर्याय शोधता येणार नाहीत का? या वर्गाला स्थलांतर करायला किंवा उद्या चोऱ्या करायला तुम्ही-आम्ही भाग पाडतोय. हे होऊ न देण्याची फक्त सरकारचीच जबाबदारी आहे का?

ख्यातनाम पत्रकार रवीश कुमार यांनी परवा मध्यमवर्गावर मार्मिक टिपण लिहिलंय. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी फक्त अकरा टक्के कर भरणारे नागरिक आहेत. त्यांनी भरलेला कर भारताचं मोठं महसुली उत्पन्न आहे. या अकरा टक्क्यांमध्येही सात-आठ टक्के मध्यमवर्गीय आहेत, जे प्रामाणिकपणे कर भरतात. पण ते कुठल्याही धोरणाबाबत काही प्रतिक्रिया देत नाहीत. करोनानंतर जो आर्थिक हाहाकार माजणार आहे, त्याचा मोठा फटका याच मध्यमवर्गाला बसणार आहे, तरी तो गप्प आहे. तो नेहमीसारखा अंगाला तेल लावून बसला आहे. अभिनेता व मानसोपचार तज्ज्ञ मोहन आगाशे एका लाईव्ह कार्यक्रमात नेमकं हेच बोलले.

स्वातंत्र्योत्तर काळापासून उद्योगधंद्यांचं ध्रुवीकरण झालं आणि शहरांतले लोंढे वाढतच गेले. उद्योगधंद्यानेही मुंबईचीच वाट पकडली. तेव्हापासून या शहरावरचा ताण वाढतच गेला आहे. या शहराने अनेकांच्या दोन वेळेसच्या अन्नाची चिंता मिटवलीही असेल, पण त्याहून कितीतरी अधिक जगण्याची असुरक्षितता दिलीय.

२६ जुलैचा पाऊस असेल, बॉम्बस्फोटाची मालिका असेल, २६\११ अकरा असेल किंवा बाबरी नंतरच्या भीषण दंगली असतील… पुलांची पडझड किंवा चेंगराचेंगरी या तर नित्याच्याच बाबी. ही जगण्यातील असुरक्षितता बाळगत बाळगत मुंबईकर पुढे पुढे जात होता, सो कॉल्ड मुंबई स्पिरीट असा मुलामा त्याला लावला जायचा, पण त्या सगळ्याला खऱ्या अर्थानं नख लावलं ते करोनानं. अगदी कहरच केला. या सो कॉल्ड मुंबई स्पिरीटची अक्षरश: वाट लावली!

असंच काहीसं घरी परतरणाऱ्या मजुरांचं. त्याला तर फाळणीनंतरचं सर्वांत मोठं स्थलांतर म्हणायची वेळ आलीय. लोक वाट सापडेल तिथून सैरावैरा धावत सुटलेत. या शहरातलं आपलं सगळंच संपलंय या भयगंडाने ग्रासून गेलेत. व्हॉट्सअ‍ॅपचा आशावाद त्यांना मदत करत नाहीय. कुठल्याही राजकीय नेत्याच्या आश्वासनानं किंवा प्रशासन यंत्रणेच्या कार्यपद्धतीनंही ते आश्वस्त होत नाहीयेत. याच भीतीतून देशांतर्गत, राज्यातंर्गत आणि जिल्ह्यांतर्गत अशी अव्याहत स्थलांतरं सुरूच आहेत, राहणार आहेत…

इकडे मात्र सगळे मध्यमवर्गीय स्वत:च्या घरात सुरक्षित आहेत. रोज भाजी, फळे, मटण, चिकनच्या ग्रुपवर व्यस्त आहेत. त्यातून वेळ मिळालाच तर व्हॉट्सअपची मोठी करमणूक आहेच. त्यांनी पुढच्या सहा महिन्याच्या किराणाची तजवीज केलीय किंवा करू शकतात. अजून एखादा महिना रेसिपींनी करमणूक होईल सगळ्यांची, पण नंतर? कंटाळा येणार आहे. त्यानेही हातपाय पसरायला सुरुवात केलीय आणि तो अजून किती काळ असणार आहे आपल्या सोबतीला… माहीत नाही.

हा कंटाळा वरचेवर अजून आपल्याला स्वकेंद्रित बनवणार. येत्या महिन्या दोन महिन्यांत स्थलांतराची प्रक्रिया काही अंशी पूर्ण होईल. त्यांच्याशिवायची मुंबई भकास होईल. गावी गर्दी वाढेल. प्रत्येकाच्या उपजीविकेचे नवीन प्रश्न सुरू होतील. मुंबईत माणसं कमी पडतील तर गावी त्यांच्या हातांना काम असणार नाही. इकडे करोना महामारीतही नोकरी टिकलेले, धंदे टिकवून असलेले मध्यमवर्गीय मॉल व मल्टिप्लेक्स सुरू व्हायची वाट बघायला लागतील. करमणुकीच्या नवीन दिशा त्यांना खुणावतील.

माझा गावाकडचा भाऊ म्हणतो, करमणुकीचंही आपल्याला व्यसन लागलंय. नेटफ्लिक्स व ओटीटी प्लॅटफॉर्मशिवाय टाळेबंदीचा विचारही करू शकत नाहीये आपण. अमेझॉन प्राईम व नेटफ्लिक्सचं प्रॉफिट कैक पटीनं वाढलंय. करमणुकीची झापडं ओढल्यामुळे आपल्याला इकडचं-तिकडचं काहीच दिसेनासं झालंय. मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हजचा आयुष्यात प्रवेश झाल्यामुळे गंध व स्पर्श या जाणिवाही नष्ट व्हायला लागतील. त्यामुळे आपण सगळ्यांपासून दूर होऊ का? असलेलं अंतर अधिकच वाढेल का? अशा प्रश्नांचा भडिमार होतोय. या अनुभवाच्या पल्याड गेल्यावर त्यावर जगभरातील वेगवेगळ्या भाषेत चित्रपट बनतील आणि त्यातील या हाहाकाराची दृश्यात्मकता बघून आपल्याला हळहळ वाटेल. बस्स!

अहानने, माझ्या मुलाने त्याच्या बाबाचं टाळेबंदीच्या काळात दीर्घकाळापासूनचं धुम्रपानाचं व्यसन सुटलेलं पाहिलं आहे. त्यातून डी-ॲडिक्शनच्या चार फेजेस असतात असं निरीक्षण त्याने मांडलंय...

बघा ते इथं लागू होतं का…

१. लूज मोशन

२. सॅडनेस

३. अँगर

४. ॲक्सेप्टन्स

आपण कदाचित सॅडनेसच्या बाहेर आलोय,

पण अजून अँगर याच टप्प्यावर आहोत.

ॲक्सेप्टन्सच्या टप्प्यावर जायची अजून तयारीच होत नाहीये.

सगळ्यांनीच करोनाशी लढायला फील्डवर जायची गरज नाहीये, परंतु थोडं आजूबाजूच्या लोकांबाबत तरी संवेदनशील व्हायला हवं. सहा महिन्यानंतरचे परिणाम कदाचित अजून दाहक असतील, तयारीत रहायला हवं. फार्मा, रिटेल, आयटी, इन्शुअरन्स सोडून अनेक क्षेत्रांत मंदी येऊ शकते, अनेकांच्या नोकऱ्या जातील.

त्यामुळे हे सामूहिकपणे लढायचं युद्ध आहे, नेहमीची वर्गवारी इथं उपयोगाची नाही.

आज, उद्या किंवा फार तर परवा करोनाची लस येईल. ती येणार हे नक्की, कारण त्यामागे एक मोठं जागतिक अर्थकारण असणार आहे. ती आल्यावरही श्रीमंत, उच्च मध्यमवर्ग, मध्यमवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग यांना टोचून झाल्यावर गोरगरिबांचा नंबर लागणार आहे. तोपर्यंत त्यांच्याकडून, आपल्याकडून इतरांना संसर्ग व्हायचा धोका आहेच.

जालन्याच्या रेल्वे ट्रॅकवर झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर वाटणारी स्वत:ची शरम अजून जात नाहीय. ती जाऊही द्यायची नाही. कारण हे संकट श्रीमंत व मध्यमवर्गामार्फत आलेलं आहे, तेव्हा थोडी जबाबदारी तर घ्यायला हवीच.

फैज नेमका आठवतोय,

बस नाम रहेगा अल्लाह का,

जो गायब भी है और हाज़िर भी,

जो मंजर भी हैं और नाज़िर भी,

उट्ठे का अन-अल-हद का नारा,

जो मैं भी हूँ और तुम भी हो।

..................................................................................................................................................................          

लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.

anjaliambekar@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......