ज्यांचे मन शुद्ध व तेजस्वी झालेले असते, त्या संत-योगी-महात्म्यांना देव म्हणणे उचित!     
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 14 September 2019
  • पडघम सांस्कृतिक ज्ञानेश्वर Dnyaneshwar तुकाराम Tukaram मुक्ताई Muktai रामदास स्वामी Ramdas Swami

जगातली सर्वांत मोठी व जगाहूनही मोठी असलेली ‘सद्वस्तू’ म्हणजे देव होय. जशी देवाच्या स्वरूपाबाबत मतमतांतरे आहेत, तशीच देव भेटावा, तो प्रसन्न व्हावा, त्याचे स्वरूप समजावे म्हणून करावयाच्या त्याच्या भक्तीबाबतही विविध मतप्रवाह आहेत. आपापल्या मतांचा प्रसार व प्रचारही लोक करत असतात. त्यामुळे देव हा बहुतेकांच्या जिव्हाळ्याचा, तसेच शास्त्रज्ञांना व विद्वानांनाही महत्त्वाचा वाटणारा तरीदेखील कधीही न संपलेला व न संपणारा असा एक अभ्यास-विषय (सब्जेक्ट) झाला आहे.

तथापि, ‘ब्राईट अँड क्लीअर माइंड, दॅट वुई कॉल गॉड,’ या विधानात अभिप्रेत असलेली कृती जी करू शकेल निदान त्या व्यक्तीच्या दृष्टीने तरी या विषयाला पूर्णविराम मिळेल, असे मला वाटते. कारण, समर्थ श्रीरामदासस्वामी यांचे सत्शिष्य श्रीदिनकरस्वामी म्हणतात, त्याप्रमाणे प्रार्थना, पूजाअर्चा, उपवास, व्रत, उद्यापन, अनुष्ठान, मंत्रजप, नामजप, ध्यानधारणा, तीर्थयात्रा, यज्ञयाग, तपश्चर्या, धर्मग्रंथांचे वाचन व पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, सत्संग इत्यादी गोष्टी करताना मन शुद्ध असेल तरच त्यांचे सार्थक होते. म्हणजे ‘आपला आत्मा हाच खरा देव’ असल्याची प्रचीति येते व व्यक्ती धन्यता पावते. 

एक शुद्ध होतां मन । प्राप्त होते देवपण ॥ 

‘शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥’, असे श्रीमुक्ताई म्हणतात. म्हणून प्रथम मन शुद्ध होणे व देव पावणे म्हणजे काय, ते समजून घेऊयात.   

श्रीज्ञानदेव म्हणतात की मन संकल्पविकल्पात्मक असते. संकल्पविकल्प करत असणे हे मनाचे स्वरूप होय (ज्ञानेश्वरी, १३.११.). संकल्प म्हणजे विचार वा कल्पना होय. संकल्पाप्रमाणे कृती करण्याची इच्छा असणे म्हणजे भाव होय. संकल्प बदलतात तसे भावही बदलतात. एक देव सोडून बाकी कोणताही चांगला वा वाईट भाव मनात असणे म्हणजे ते तत्त्वत: अशुद्ध (डहुळलेले वा गढुळलेले) असणे होय. याउलट, एक देवच हवा व व्हावा, बाकी कोणीही व काहीही नको, हा एकनिष्ठ भाव असणे म्हणजे मन शुद्ध असणे होय. अशा प्रकारे, भाव शुद्ध झालेला असतो त्याला देव दूर नसतो, असे श्रीमुक्ताई म्हणतात. दूर नाही म्हणजे जवळ आहे, असे सामान्यत: समजले जाते. पण, साध्या साध्या शब्दातूनही संत ‘आत्मानुभवाच्या खुणा’ सांगत असतात. हे लक्षात घेतले, की शुद्ध भाव झालेल्या ज्या जीवापासून देव दूर राहिलेला नसतो तो जीवच आता देव झालेला असतो, हा अर्थ आपल्याला लागतो. 

श्रीमुक्ताई सांगतात तेच श्रीतुकारामही ‘तुका म्हणे मन मुरे । मग जे उरे, तेचि तू ॥’ अशा वेगळ्या शब्दात सांगतात. मन मुरते व आपले स्वरूप उरते. मन मुरते म्हणजे ते संकल्पविकल्परहित वा वृत्तीविरहित होते. मन वृत्तीविरहित झाले की विशुद्ध जाणीवयुक्त असे केवळ आपण उरतो. डोळे, कान, नाक, त्वचा व जीभ या ज्ञानेंद्रियांनी अनुभवलेले काहीही आठवत नाही, मनात कुणाचाही व कशाचाही विचार येत नाही, कोणतेही ज्ञानेंद्रिय वा कर्मेंद्रिय किंचितही हालत नाही, त्यांची हालचाल करण्याची वृत्तीही होत नाही. अशा पूर्णत: स्थिर आसनस्थ स्थितीत सूक्ष्म अतिसूक्ष्म होत चाललेल्या श्वासोच्छ्वासाकडेच अविचल लक्ष राहणे म्हणजे मन शुद्ध राहणे होय. ‘निर्वात जागी तेवत असलेल्या निष्कंप ज्योतीप्रमाणे’ संकल्पविकल्परूपी हालचाल न होता केवळ जाणीव राहणे म्हणजे मन मुरणे होय. मन मुरून उरते ‘तेच तू’ म्हणजे ‘आत्मा आहेस’, असे ते सांगतात; आणि, ‘हा आत्मा ब्रह्म आहे’ व ‘ते ब्रह्म म्हणजे तो देव तू आहेस’, असे वेद म्हणतात. अशा प्रकारे, मन मुरले की आत्मज्ञान होते, हे वेदान्तींचे सूत्र ते अगदी सहजपणे सांगून जातात.  

‘मन मुरे मग जे उरे । ते तू कारे सेवीसीना ॥’, अशा आर्जवयुक्त भाषेत श्रीज्ञानदेवदेखील तेच सत्य सांगतात. कल्पनारूप मनामुळे देवाला जीवदशा प्राप्त झालेली असते. (ज्ञानेश्वरी, १३.११०) देवच द्वैत कल्पून जीव झालेला असतो. कल्पना करत असलेला जीव देवपणाला मुकलेला असतो. मन मुरते म्हणजे त्याचे कल्पना करणे थांबते. ते निर्विकल्प होते म्हणजे त्याचे मनपण संपते. मनपण संपते, तेव्हा जीवास स्वरूपाचे ज्ञान होते म्हणजे आपण देव असल्याचा अनुभव येतो. अर्थात, मन मुरते व जीवाला देवपण प्राप्त होते. अशा त्या तुझ्या देवस्वरूपाचा म्हणजे आत्मरूपाचा तू कां बरे अनुभव घेत नाहीस’, असा अनाग्रही उपदेश ते करतात. थोडक्यात, मन शुद्ध झालेला माणूस देव असतो, हे सत्य तेही सूचित करतात.

मन असे तेजस्वी । तैं जीव तो देवचि ॥ 

जी कृती केली की आत्मारूपी आपण देवाप्रमाणे तेजस्वी असल्याचे अनुभवास येते ती कृतीही संत सांगतात.

उदा. ‘सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥’ या अभंगचरणातून श्रीतुकारामांनी ती सांगितली आहे. ध्याता, ध्येय व ध्यान ही एक त्रिपुटी होय. ध्यान करताना ही त्रिपुटी सांडणे म्हणजे वृत्ती पूर्णत: ध्येयाकार होणे होय. किंवा, ध्यान करणाऱ्याच्या मनात कोणताही विचार व ‘मी ध्यान करतो आहे’ अशी जाणीवही न राहता तो केवळ अवधानमय होऊन राहणे म्हणजे त्रिपुटी सांडलेली असणे होय. त्रिपुटी सांडणे म्हणजे ती ओलांडून पुढील अवस्थेत जाणे होय. देव होणे हे आपले ध्येय आहे. त्रिपुटी सांडूनच देवरूप प्राप्त होत असते. या ध्येयाचा ध्यास घेऊन तद्रूप होता यावे म्हणून देवानेच सर्वांच्या देहात अजपाजप गुप्तपणे चालू करून ठेवला आहे. भक्तियोगसाधकाने त्याकडे फक्त साक्षीभावाने लक्ष द्यावयाचे असते. श्रीज्ञानदेवांनी आपल्रा ‘हरिपाठात’ उल्लेखिलेला ‘अजपाजप’ जपून श्रीतुकारामांनीदेखील आपल्या देहातील ‘अरूप’ देवास ‘जागविले’ होते. त्यांच्याप्रमाणे श्रीसद्गुरुकृपेने आपली वृत्ती ध्येयाकार झाली की, आपल्याही देहरूपी घटात आत्मदीप उजळतो. आकाशातील ढग विरून गेल्याने जसा सूर्याचा प्रकाश सर्वत्र पडतो, तसा आत्मरूपाला झाकोळून टाकणारे संकल्पविकल्परूपी ढग विरून गेल्याने (श्रीज्ञानदेव व श्रीतुकारामांच्या भाषेत मन मुरून गेल्याने) आत्मदेवरूपी सूर्याचा प्रकाश देहरूपी घटाकाशात सर्वत्र पडतो. श्रीज्ञानदेव आपल्या दुसऱ्या एका अभंगात म्हणतात, तसा आपल्या मेंदूच्या पोकळीत असलेल्रा सहस्त्रदळकमळात जणू सूर्यच उगवला आहे, असा अनुभव येतो.

आत्मारूपी देवाचे दर्शन आपण कसे घेतले ते श्रीज्ञानदेवदेखील जणू श्रीतुकारामांच्याच शब्दांत सांगतात. ‘द्रष्टा दृश्य दर्शन’ या त्रिपुटीतील ‘द्रष्टा’ व ‘दर्शन’ याऐवजी ‘पाहता’ व ’पाहणे’ हे साधे शब्द त्यांनी श्रीमुक्ताईंना उद्देशून केलेल्या अभंग-उपदेशात योजिले आहेत. त्रिपुटीतील ‘पाहता व पाहणे हे घटक सांडून मी जो श्रीहरी पाहिला’ तो म्हणजे ‘ज्योतींची निजज्योती’ होय, असे ते म्हणतात. या ध्यानयोगात्मक अभ्यासात ‘जीवाचे व शिवाचे ऐक्य झाले व ‘कोटी सूर्यकळा प्रकाशल्या’चेही ते नंतरच्या अभंगात म्हणतात. जीवशिवाचे ऐक्य साधलेली व्यक्ती अर्थातच योगी असते. 

स्वर्गीय देवांचे देह दिव्य, ज्योतिरूप वा विद्युल्लतेसारखे असतात, असे श्रीरामदास म्हणतात (दासबोध, ४.१०.२१-२२) आणि जीवशिवांचे ऐक्य साधलेला ‘योगी हा देवांचा देव असतो,’ असे श्रीज्ञानेश्वर म्हणतात (ज्ञानेश्वरी, ६.४८२) यावरून, योगी महात्मा स्वर्गवासी देवांपेक्षा तेजस्वी वा प्रकाशमान असणार, हे स्पष्ट होते. अर्जुनाला योगी व्हावयास सांगितले जाते, तो योगी होतो व देवांचा देव असलेल्या श्रीकृष्ण-परमात्म्याच्या विश्वरूपाचे दर्शन त्याला घडते. देव ‘प्रकाशाचे आगर’ (ज्ञानेश्वरी, ११.५०९) व ‘ज्योतींचीही ज्योत म्हणजे परमज्योत’ (गीता, १३.१७) असून त्याच्या स्वयंप्रकाशी स्वरूपात सूर्याचीदेखील सावली पडत असल्याचे त्यास दिसते (ज्ञानेश्वरी, ११.३००-३०१). ‘ज्ञानेश्वरी’च्या कळसाध्यायात म्हटल्याप्रमाणे अर्जुन देवाधिदेवाशी एकरूप झाला होता. परिणामी अर्जुनही सूर्याहून अधिक तेजस्वी झाला होता. श्रीज्ञानदेवांनी सनद-अभंगात उल्लेखिले आहे तशा ‘कोटी सूर्यकळा प्रकाशल्याचे’ त्याने अनुभवले होते.

कुणीही खरा संतयोगी कोटी सूर्यांहून अधिक तेजस्वी होणे कसे शक्य आहे, अशी शंका श्रीरामदासस्वामींचे सत्शिष्य श्रीदिनकरस्वामी यांनी आपल्या ‘स्वानुभव दिनकर’मध्ये उपस्थित केली आहे आणि तिचे सोपपत्तिक निरसनही केले आहे. ते असे : ‘गीतेत’ म्हटल्याप्रमाणे जीव हा देवाचाच एक अंश होय. त्याला पिंडातील स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या देहचतुष्टयामुळे संकुचितपण आलेले असते. ते जीव-शिवाच्या ऐक्यानुभवाने किंवा मी ईश्वर आहे असे ज्ञान होते तेव्हा नष्ट होते. परिणामी, जीवाला आपल्या विराट स्वरूपाचे ज्ञान होते व परमेश्वराचे सर्वव्यापकपण प्राप्त होते. आपणच विश्वरूप धारण केले आहे किंवा आपला आत्माच विश्वरूपाने नटला आहे, असा दिव्य अनुभव त्यास प्राप्त होतो. अर्थात, परमेश्वराच्या विश्वरूपाचे दर्शन म्हणजे त्याच्या विराटदेहाचे दर्शन होय. श्रीकृष्णाने अर्जुनाला घडवले तसे सर्व समर्थ सद्गुरू आपल्या सत्शिष्यांना विश्वरूपाचे दर्शन घडवत असतात. आपल्याला आपल्या सद्गुरूंनी विराटदेहाचे दर्शन घडवले, असेही श्रीदिनकरस्वामींनी सदर विवरणात उल्लेखिले आहे.

थोडक्यात, श्रीज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे भक्तियोग्याला आपल्या विराट देहात कोटी सूर्यकळा प्रकाशल्याचा अनुभव येतो. कोटी सूर्याहूनही तेजस्वी असे आपले आत्मस्वरूप आहे, असे अतींद्रिय ज्ञान त्याला दिव्यदृष्टीने प्राप्त होते.

म्हणूनच, अशा दिव्यज्ञानानुभवाने ज्यांचे मन शुद्ध व तेजस्वी झालेले असते त्या संत-योगी-महात्म्यांना देव म्हणणे व या अर्थाचे सुरुवातीला उद्धृत केलेले इंग्रजी विधान मला उचित वाटते.     

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

suresh supekar

Sun , 15 September 2019

Simply great... Sir


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......