आहे ऐसा देव । घ्यावा अनुभव ॥
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • संत कबीर, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम
  • Sat , 24 August 2019
  • पडघम सांस्कृतिक कबीर Kabir ज्ञानेश्वर Dnyaneshwar तुकाराम Tukaram मुक्ताई Muktai रामदास स्वामी Ramdas Swami

ज्या एकापासून हे सारे विश्व निर्माण होते, पण जे या विश्वपसाऱ्यातील कशापासूनही निर्माण होत नसते ते एक जर ठाऊक नसेल तर बाकी सारे माहीत असून काय होणार आहे, असे एका दोह्यात आणि मूळच धरलेले असल्याने वृक्षाच्या फांद्या, पाने, फुले वगैरे सारे आपल्या हाती आले आहे, असे दुसऱ्या एका दोह्यात श्रीकबीर म्हणतात. त्यांना जे अभिप्रेत आहे ते एक जाणले वा पाहिले असता जाणावयाचे वा पहावयाचे तत्त्वत: बाकी काही राहत नाही, असे श्रीतुकारामही एका अभंगात म्हणतात. म्हणून ते एक काय आहे, ते कुठे नि कोणकोणत्या रूपात आहे आणि ते जाणून घेण्यासाठी नेमके काय करावयाचे असते, ते थोडक्यात जाणून घेऊयात.

ते एक म्हणजे देव व देव म्हणजे साक्षात आत्मा!

विश्व निर्माण करण्यापूर्वी एक देवच होता. त्या देवाचा श्रीज्ञानेश्वरांनी ‘आद्या’ म्हणून तर श्रीरामदासांनी ‘देवराया’ व ‘थोरला देव’ म्हणून ‘मनाचे श्लोक’ (क्र. १७९) मध्ये निर्देश केला आहे. तो देव आत्मरूप व गणेश आहे, असेही ‘ज्ञानेश्वरी’च्या आरंभीच्या दोन ओव्यात म्हटले आहे आणि ज्याच्यापासून जग निर्माण होते, ज्याच्यात स्थिर असते व ज्याच्यातच लय पावते, तो देवबाप्पा गणपती साक्षात आत्मा आहे, असे ‘अथर्वशीर्षा’त म्हटले आहे.

‘देव आत्मा आहे’ म्हटल्यावर तो आपल्या देहात असणार, हे उघड आहे. देह हे देऊळ व आत्मा हा देव होय, देह हे देवाचे मंदिर तर त्यातील आत्मा हा परमेश्वर होय, देव अंतर्यामीं आहे, देव हृदयस्थ आहे म्हणजे देव हृदयात राहतो, देहरूपी पंढरीतील तो आत्मारूपी विठ्ठल होय, आत्मारूपी नारायण सर्व देहरूपी घटात आहे, देहात असणारा जीव हा देवाचा अंश आहे, देह हे क्षेत्र असून त्यात असणारा व त्यास जाणणारा आत्मा हा खरा क्षेत्रज्ञ आहे, देहरूपी पुरीचा ईश असलेला तो कूटस्थ म्हणजे गुप्त असणारा पुरुष होय, वैश्वानर म्हणजे जठराग्नि बनून देवच प्राण्यांच्या शरीरात चतुर्विध अन्न पचवत असतो, देहाच्या रोमारोमात असतो म्हणून त्यास आत्माराम म्हणतात, मेंदूच्या पोकळीतील सहस्त्रदळकमळात तो राहतो, ऋषीक् म्हणजे वृत्ती व वृत्तीद्वारे इंद्रियांचे नियमन करणारा अंतर्यामीचा ईश म्हणून त्यास ऋषीकेश म्हणतात, इंद्रियरूपी गायांना वळणारा आत्मा हा गोपाळ होय आणि देवाच्या सत्तेमुळेच शरीर चालत-बोलत असते अशा, अनेक विधानांद्वारे ‘देव आत्मरूप आहे’, हे सत्य सर्व संत स्त्रीपुरुषांनी उद्घोषिले आहे.

आधी आपुल्या देहात । पहावा मग विश्वात ॥

ज्याअर्थी देव आपल्या देहातही आहे त्याअर्थी त्याची ओळखही आधी आपल्या देहात होणार, हे उघड आहे. अनंत नामे असलेला तो देव अंतर्यामी कसा आहे ते समजून घ्यावे व त्या देहधारी देवाला आधी पहावे, नंतर तो विश्वात्मक असल्याचे पहावे आणि त्यानंतर सर्वातीत असलेले (त्याचे) परब्रह्मस्वरूप होऊन रहावे, असे श्रीरामदासांनी पुढील ओव्यांमधून मार्गदर्शिले आहे -

चौवीस नामी सहस्त्रनामी । अनंत नामी तो अनामी ।

तो कैसा आहे अंतर्यामीं । विवेकें ओळखावा ॥

आधी देखिला देहधारी । मग पाहावे जगदंतरीं ।

तयाचेनि या उपरी । परब्रह्म पावावे ॥- (दासबोध, ११.९. ४ व २०)

श्रीरामदास हे श्रीरामाचे अविभक्त भक्त होते. स्वत: अनुभवलेल्या रामाच्या स्वरूपाचा बोध आपल्या वाङ्मयातून त्यांनी आपल्याला करून दिला आहे. तोच बोध श्रीकबिरांनीदेखील रामाच्या चार रूपांच्या वर्णनातून करून दिला आहे. त्यानुसार, देवाचा सातवा अवतार दशरथपुत्र श्रीराम हे त्याचे एक रूप होय, सर्व प्राण्यांच्या देहरूपी घटात असलेला जीव हे त्याचे दुसरे रूप होय, विश्वरूपी पसारा हे त्याचे तिसरे रूप होय तर या सर्वांहून ‘वेगळे’ असलेले असे ते रामाचे चौथे रूप होय.

अनुसरोनि प्रथम राम । अनुभवा तो आत्माराम ॥

रामाची म्हणजे देवाची ही सर्व रूपे आपल्यालाही अनुभवावयाची आहेत. त्यासाठी, श्रीराम सूर्यवंशीं जन्मला तसा आपला जीव नरदेहीं जन्मला आहे, हे लक्षात घेऊन व श्रीरामचरित्रातील काही ठळकठळक गोष्टींपासून बोध घेऊन आता आपण नेमके काय करावयास हवे, ते श्रीहंसराजस्वामी यांनी ‘वेदेश्वरी’ या ग्रंथाच्या अध्याय ५मध्ये उपदेशिले आहे. उदा. रामाने पित्याची आज्ञा पाळली, आपण वेदाज्ञा पाळावी; रामाने भरताला राज्य समर्पिले, आपण आपले जीवन प्रारब्धावर सोपवावे; रामाने वनवास भोगला, आपण एकान्त सेवावा; रामाने त्राटिकेचा वध केला, आपण आशा मारावी; रामाने रज्ञरक्षण केले, आपण धर्माचरण रक्षावे; राम ऋषिसंघात वर्तला, आपण सत्संग धरावा; रामाची सीता रावणाने हरण केली होती, आपल्या जीवाची स्वानुभूती अहंकाराने नेली आहे; रामाने सीताविरोगाची खंत केली, आपल्याला देवभेटीची तळमळ असावी; रामाला लक्ष्मणाचे साह्य होते, आपण लक्षपूर्वक वैराग्याचे संरक्षण करावे; रामाने देह कष्टविला, आपण कायेने गुरूसेवा करावी; रामाने शिवाचे ध्यान केले, आपण गुरूचे ध्यान करावे; रामाने शिवकृपेने पाशुपतास्त्र मिळवले, आपण गुरुकृपें अभेदज्ञान वस्तुतंत्र मिळवावे (म्हणजे आपण व देव आत्मरूप आहोत असे अखंड ज्ञान करून घ्यावे); रामाने मारुती हाती सीतेचा शोध केला, आपण विवेकपूर्वक स्वानुभूती ठायी पाडावी; रामाला बिभीषण शरण आला, आपल्याला सत्त्वगुणाचे साह्य लाभले पाहिजे; रामाने सेतु बांधला, आपण दृढ अभ्यासाने साधनसंपत्ती वाढवावी; राम समुद्रापल्याड उतरला, आपण मोहाचे पार जावे; राम त्यावेळी अहोरात्र युद्धविचार करत होता, आपण श्रवणमनन करावे; राम त्रिकुटावर उठावला, आपण देहत्रयां जिंकावे; रामाने कुंभकर्णाचा वध केला, आपण तमअहंकार नष्ट करावा; रामाने कुंभकर्णाचे कुंभ व निकुंभ हे पुत्र मारले, आपण आळस व प्रमाद यांना दवडावे; लक्ष्मणाहातीं इंद्रजित मेला, आपण वैराग्याने काम संपवावा; मारुतीने त्रिशिराला मारले, आपण विवेकाने क्रोधास मारावे; रावणाचा बाण लागून लक्ष्मण बेशुद्ध पडला त्यावेळी हनुमानाने वनस्पती आणून दिली, आपले वैराग्य नष्ट होऊ पहात असेल तेव्हा आपण ते विवेकाने जागृत ठेवावे; रामाने रावणाचा वध केला, आपण रजअहंकाराचे निर्दाळण करावे; रामाने बिभीषणाला राज्य दिले, आपण सत्त्वगुणाला प्रतिष्ठा द्यावी; रामाने सीता आणली, आपण जीवाला स्वानुभूतीपूर्वक आत्म्याशी एकरूप करावे; राम पुष्पक विमानात बसला, जीवरूप आपण अपरोक्ष ज्ञानारूढ व्हावे; राम अयोध्येला परत आला, आपण अभयपद पावावे; रामाचे अवतारकार्य संपले, (पूर्णकाम झालेल्या) आपले साधन गळावयास हवे; नंतर रामाने निष्कंटक राज्य केले, आपण जीवन्मुक्तिसुख भोगावे आणि राम निजधामाला गेला, आपण विदेहकैवल्य पावावे. असे आचरण करतात ते रामच होतात, असे उपदेशवजा विधानही श्रीहंसराजस्वामी रांनी सदर ‘अध्यात्मरामारण’नामक निरुपणान्तीं केले आहे.

कथिली मुक्ताईंना । करा ती साधना ॥

श्रीहंसराजस्वामींनी उपदेशिल्याप्रमाणे आचरण करणारास, विश्वनिर्माता आत्माच या साऱ्या विश्वपसाऱ्याहून ’न्याराही न्यारा असलेला ‘चौथा राम’ असल्याचा अनुभव येतो. “सर्वातुनी वेगळा’ असलेला तो आपल्या हातीं कसा येईल, म्हणजे देव होण्यासाठी नेमके काय करायचे, ते सांगा दादा, असे श्रीमुक्ताई म्हणतात. त्यावेळी श्रीज्ञानदेवांनी त्यांना केलेला उपदेश म्हणजे ‘ज्ञानेश्वराची सनद’ होय. या सनदीत असलेले गुह्यज्ञान श्रीकबिरांनी चार युगीं सांगितले व श्रीनामदेवांनाही लाधले, असा तिचा (पर्यायाने तिच्यात संक्षिप्तपणे उल्लेखिलेल्या ‘थोर भक्ती’मार्गाचा) महिमाही त्यांनी शेवटी सांगून ठेवला आहे. ‘सर्वांतुनी वेगळा’ म्हणजे ‘इंद्रियां वेगळा मन बुद्धी निराळा’ होय, असे या सनदीत स्पष्ट होते. आपल्या ‘स्व’रूपाबाबतच्या अज्ञानामुळे ‘मी म्हणजे देह, मन वा बुद्धी’ असा जीवाचा गैरसमज झालेला असतो. तो गैरसमज श्रीसद्गुरुंच्या कृपाछत्राखाली निरहंकारपणे करत असलेल्या सोऽहंसाधनेत लय पावू लागतो. श्रीमुक्ताईंप्रमाणे स्वदेहातील मूलाधारचक्रावर गणपतीची स्थापना करून षडचक्रे ओलांडत तो जीव ब्रह्मांडातील आत्मदेवाशी एकरूप होतो.

विश्ववृक्षाचे मूळ । परमात्मा निश्चळ ॥

पंच महाभूते, अहंकार, बुद्धी, प्रकृती, पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये आणि त्यांचे दहा विषय, मन, सुख, दु:ख, द्वेष, संघात, इच्छा, चेतना व धृति या छत्तीस तत्त्वांचा (ज्ञानेश्वरी, १३. ७२-७४) बनलेला आपला देह म्हणजे गीता-ज्ञानेश्वरीत वर्णिलेला अश्वत्थ वृक्ष होय. हा देहरूपी वृक्षच ऊर्ध्वमूल आहे. म्हणजे श्रीनामदेव म्हणतात म्हणतात तो वर आपल्या मेंदूच्या पोकळीत असलेल्या सहस्त्रदलकमलात आकाशाप्रमाणे राहणारा व श्रीएकनाथ आपल्या ‘हरिपाठात’ (क्र. १५) म्हणतात तो आत्मारूपी हरी हा या वृक्षाचे मूळ होय. हे मूळ श्रीकबिरांच्याही हातीं आले होते, ते त्या वृक्षाच्या ‘मुळीचिरा ठायां बसून’ होते. श्रीज्ञानदेवांच्या ‘हरिपाठातील’ भाषेत सांगायचे तर, ‘करतळीं आवळा तैसा तो हरी’ त्यांना दिसत होता. अर्थात आत्मारूपी मूळापासून पुढे विस्तार पावलेल्या आपल्या देहरूपी वृक्षाचेही सम्यक ज्ञान त्यांना झाले होते. सत्शिष्यांनाही देहरूपी क्षेत्र हा आपल्या आत्म्याचा विस्तार आहे, असे अनुभवास रेते. नंतर श्रीसद्गुरुंचा परमकृपाप्रसाद लाभून त्यांना परमात्मस्वरूप प्राप्त होते व देहाबाहेरील ‘विश्वदेखील’, भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे, ‘आपल्या आत्म्याचाच विस्तार आहे’ (ज्ञानेश्वरी, ९.६४), असे अनुभवास येते. म्हणूनच, उदा. देहात व देहाबाहेर सर्वत्र एक आत्मदेवच आहे, हे अनुभवगम्य सत्य ‘किंबहुना चराचर आपणचि जाहला’ (१२.२१३) या ओवीभागातून श्रीज्ञानेश्वरांनी व्यक्त करून ठेवले आहे. त्यांनी आपल्या ‘हरिपाठात’ उल्लेखिलेली ‘जीवनकलेची साधना’ करून त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही चराचर व्यापून उरलेल्या म्हणजे ‘शेष’ असलेल्या त्या आपल्या देवस्वरूपाचा अनुभव घ्यावयाचा आहे. 

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 04 September 2019

अगदी प्रत्ययकारी लिहिलंय. नमन व अभिवादन! -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......