सारे काही तुमच्याच हाती आहे, मग तुम्ही भीतीच्या सावटाखाली कसे काय?
पडघम - राज्यकारण
सतीश देशपांडे
  • पिंपरी-चिंचवडच्या शोभायात्रेतील एक छायाचित्र
  • Thu , 06 June 2019
  • पडघम राज्यकारण शोभायात्रा Shobha Yatra बजरंग दल Bajrang Dal विश्व हिंदू परिषद Vishva Hindu Parishad विहिप VHP संघ RSS हिंदू धर्म Hindu Dharma

‘कुणीतरी आपल्यावर अन्याय करत आहे’, ‘आपले अस्तित्व संपवले जाण्याची शक्यता आहे,’ अशा परिस्थितीत भीती वाटणे साहजिक आहे. पण आपल्यावर आजूबाजूला कुणीही अन्याय करताना दिसत नाही, सत्तास्थानी आपल्यापैकीच काही जण आहेत. त्यामुळे अस्तित्व संपवून टाकणे, ही खूप दूरची बाब आहे. अशी परिस्थिती असते तेव्हा भीतीचे सावटदेखील असू शकत नाही. पण गेल्या काही दिवसांतल्या सामाजिक घटना-घडामोडी पाहिल्या तर नेमके याच्या उलट घडताना दिसत आहे. जणू काही अखंड भारत आणि त्याचा धर्म संकटात असल्याप्रमाणे कृती घडत आहेत.

काही मोजक्या घटना

मुंबईच्या मीरा रोड परिसरात भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन अॅकॅडमीतर्फे आयोजित शिबिरात शस्त्र प्रशिक्षण दिले जात होते. यात बजरंग दलासारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचा समावेश होता. त्याची उग्र छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहेत. डोक्याला भगवा रूमाल गुंडाळलेली, हातात बंदुका घेतलेली नि काही अर्ध्या खाकी चड्डीतली माणसेही छायाचित्रांत दिसत आहेत. (लिंक : https://www.thehindu.com/news/cities/mumbai/police-probe-weapons-training-at-bjp-mlas-mira-road-school/article27395670.ece )

सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे साध्वी पुजा पांडे आणि तिच्या अखिल भारतीय हिंदू महासभेने मुला-मुलींना चाकू वाटप कार्यक्रम केला. पुन्हा एकदा ‘महात्मा गांधी मुर्दाबाद’, ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’, ‘सावरकर अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. हीच ती साध्वी जिने गांधी जयंतीच्या दिवशी गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घातल्या होत्या. (https://aajtak.intoday.in/gallery/sadhvi-puja-shakun-pandey-controversy-in-hindu-mahasabha-program-tst-1-33987.html )

पिंपरी-चिंचवड शहरातील यमुनानगर परिसरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने एक शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत शाळकरी मुलींच्या हाती एअरगन आणि तलवारी देण्यात आल्या होत्या. शिवाय एअरगनचे ट्रिगर दाबून त्यातून आवाजही काढण्यात आले. हे सर्व आम्ही का केले आहे, याची कारणेदेखील त्यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या प्रतिक्रियेतून सांगितली आहेत. (लिंक : https://youtu.be/xRVj-2xRWz8 )

नुकत्याच झालेल्या मध्यवर्ती निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगाल राज्यात तर ‘जय श्री राम’चा नुसता नारा लावला होता. तिथल्या मुख्यमंत्री या कशा हिंदू धर्माच्या विरोधात आहेत, हाच प्रचाराचा मुद्दा बनवला होता.

वरील सर्व ठिकाणी धर्म ही गोष्ट मध्यवर्ती असल्याचे ध्यानात येईल. हे आम्ही का करत आहोत, याचे उत्तर या लोकांकडे तयार आहे. ते म्हणजे ‘धर्मरक्षणासाठी आम्ही हे करत आहोत. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे सर्व करत आहोत. तसेच लोकांनीच आता आपल्या हातात शस्त्र घेऊन धर्मरक्षणासाठी पुढे येण्याची गरज आहे’, असे या मंडळींचे म्हणणे आहे. आपले म्हणणे ते स्पष्टपणे माध्यमांसमोर मांडत आहेत.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4902/anartha

...............................................................................................................................................................

शिवाय या अगोदरपासून कीर्तनातून, संघटनांच्या शिबिरांतून प्रत्येक घराघरात एक हिंदू सैनिक निर्माण व्हायला हवा, अशा पद्धतीचा प्रचार या मंडळींनी चालवला आहे. सनातन संस्थेने तर धर्माच्या विरुद्ध कोण कोण आहेत याची भली मोठी यादीसुद्धा प्रसिद्ध केली आहे. ‘धर्मद्रोही’, ‘राक्षस’ असे खास शब्द ते विरोधी विचार मांडणाऱ्या मंडळींबद्दल वापरत असतात. जसे देवांनी राक्षसांना संपवले व धर्मरक्षण केले, तसे आपणही आज करावयास हवे, असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ते संदेश देत असतात. कित्येकांची छायाचित्रे फुली मारून प्रसिद्ध करतात. हे सर्व आम्ही धर्माच्या रक्षणासाठी चालवले आहेत, यातच सर्व हिंदू धर्मीयांचे भले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

धर्माचे संवर्धन, त्याच्या नीतीतत्त्वांचे पालन, प्रचार-प्रसार करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. भारतात असणारे सर्व धर्माचे लोक या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असतात. उभारलेली प्रार्थनास्थळे, विविध धर्मादाय संस्था, वेगवेगळे सोहळे हे याच स्वातंत्र्याचा आविष्कार आहेत. जशी अवस्था सीरियात आहे, तशी अवस्था भारतात निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही. देशातील मध्ययुगीन इतिहासाला धर्माची किनार लाभलेली होती. हीच किनार वर्तमानाला जोडण्याचे काम या मंडळींनी सुरू केले आहे.

आपल्यावर धोका ओढावण्याची शक्यता आहे, अल्पसंख्य धर्म आता पाय पसरायला लागले आहेत, आपण वेळीच सावध व्हायला हवे, यांसारखी भावनिक आवाहने केली जात आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्तेत बसलेली मंडळी जर हिंदुत्वाचा उघडउघड पुरस्कार करणारी असतील, ती जर धर्मरक्षण वगैरेसाठी कटिबद्ध असतील, तर मग भीती नेमकी कोणाची आहे? सारं काही तुमच्याच हाती आहे, तर मग तुम्हीच भीतीच्या सावटाखाली कसे काय आला आहात? भारतात सध्या कुठेही धर्मपरिवर्तनाची लाट नाही, हिंदू धर्माला छेद देणारी बौद्ध-जैन धर्मासारखी मांडणी होत नाही, कुणी अशी थोर व्यक्तीही जन्माला आलेली नाही की, जिच्यापाठीमागे धर्माच्या कारणास्तव लाखोंच्या संख्येने अनुयायी जात आहेत. तरी देखील धर्माच्या संरक्षणाची इतकी गरज का भासावी? 

तर हे या मंडळींचे नाटक आहे. यामुळे भावनिक आवाहने करता येतात, लोकांच्या डोक्यात या निमित्ताने आपले विचार भिनवता येतात आणि त्यांची डोकी आपल्या पुढच्या योजनांसाठी तयार करता येतात, हा या पाठीमागचा उद्देश आहे.

याला दोन कंगोरे आहेत. एक म्हणजे धर्मसत्ता नावाची गोष्ट त्यांच्या हातून निसटून गेली आहे, ती त्यांना परत आणायची आहे. आणि दुसरी म्हणजे आहे ही राजसत्ता ध्रुवीकरण करून काही केल्या टिकवून ठेवायची आहे. जुन्या रूढी-परंपरांना छेद देऊन जी न्याय, समता, बंधुता ही मूल्ये उभी राहिली, ती मूल्ये त्यांच्या परंपरांचे पुनरुज्जीवन होऊ देत नाहीत. धार्मिक आवाहने करून त्या मूल्यांपासून लोकांना दूर नेणे, हा या कृतींमागील धूर्तपणा आहे. या पुनरुज्जीवनाखातर ते इतिहास बदलू पाहताहेत, चुकीच्या समजुती समाजात रुजवू पाहताहेत नि आड येणाऱ्या समतेच्या मूल्यांपासून लोकांना दूर नेऊ इच्छित आहेत.

या मंडळींनी ‘हिंदू’ या अस्मितेखाली लोकांना एक होण्याचे अनेकदा आवाहन केले, पण त्यांचे आजवरचे प्रयत्न फसले आहेत. याचा पाया ‘सेक्युलॅरिझम’ या इथे रुजलेल्या संकल्पनेत आहे. या सेक्युलॅरिझमला ‘फेक्युलॅरिझम’ आणि सेक्युलर मंडळींना ‘फेक्युलर’ असे हिणवून शक्य तितके प्रयत्न करून त्याला संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. विषम समाजरचनेची मुळे परत एकदा रुजवणे, धर्माची संपत चाललेली ठेकेदारी परत एकदा प्राप्त करणे, हे त्यांचे मूळ उद्दिष्ट आहे. मिळवलेल्या राजकीय सत्तेच्या आधारे त्यांना हे पूर्ण करायचे आहे. शस्त्रप्रशिक्षण हा त्या उद्दिष्टानुरूप कार्यक्रमाचा एक छोटासा भाग आहे.

हा धर्मरक्षण नव्हे, तर धर्माच्या नावाखाली लोकांचे सैनिकीकरण करण्याचा प्रयत्न आहे. याच सैनिकांचा वापर त्यांना धर्मचिकित्सा करणाऱ्यांच्या विरोधात आणि मुख्य म्हणजे राजकीय सत्तेत टिकण्यासाठी करायचाय. धर्माच्या नावाखाली लोकांची डोकी भडकवायची नि त्याला राष्ट्रवादाची जोड द्यायची, हा सगळा ‘आयडिया ऑफ इंडिया’ची तोडफोड करणारा प्रकार आहे. हे न समजणारे लोक मोठ्या संख्येने या सैनिकीकरणाच्या पाठीशी उभे राहत आहेत. लोकांचा पाठिंबा मिळतोय, तर मग कायदा सुव्यवस्थेने आमचं ऐकलंच पाहिजे, हा या पुढचा टप्पा असतो. शबरीमला मंदिर प्रवेशाच्या वेळी हीच गोष्ट पाहायला मिळाली. उद्या झुंड उभी करून त्या झुंडीखातर कायदे बदलायलादेखील ही मंडळी कमी करणार नाहीत. तसे त्यांचे प्रयत्न चालू आहेत.

हे धर्माच्या विपरीतच  

धर्माची एक व्याख्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशात सांगितली आहे. ती अशी- “जीवन परिपूर्ण व कृतार्थ करणारी, अपरिपूर्ण दोषमय, अशांत जीवन बदलून टाकणारी, उच्चतम ध्येयाच्या म्हणजे दिव्यत्वाच्या प्राप्तीची पद्धती म्हणजे धर्म होय.” सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी, उच्चतम ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी धर्म आपल्याला मदत करतो. एकूणच, धर्म या संकल्पनेपाठीमागे उदात्त असा मानवी कल्याणाचा हेतू आहे. या हेतूलाच सद्यस्थितीत हरताळ फसला जात आहे. आम्ही म्हणू तोच धर्म, आम्ही करू तेच नियम, हे रुजवण्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांना आता वेग आला आहे. ज्या गोष्टी पूर्वी पडद्याआडून होत होत्या, त्या आता प्रत्यक्ष घडू लागल्या आहेत. समाजाने या मंडळींचा कावा वेळीच ओळखायला हवा. ही मंडळी खरी अधर्मी आहेत. धर्माच्या मूळ तत्त्वांचा ऱ्हास करणारी आहेत. यांच्यापासूनच आपला धर्म आणि आपला देश वाचवायला हवा.

............................................................................................................................................................

लेखक सतीश देशपांडे मुक्त पत्रकार आहेत.

sdeshpande02@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 08 June 2019

सतीश देशपांडे, तुमची फारंच जळजळ झालेली दिसतेय. मुस्लीम एकगठ्ठा मतदान करतात तरीही इस्लाम खतरेमे कसा काय जाऊन पडतो? ख्रिश्चन एकगठ्ठा मतदान करतात तरीही चर्च नेहमी धर्मांतर का करीत असतं? हिंदूंनी जरा म्हणून संघटीत झालं तर लगेच तुमच्या पोटात दुखायला लागतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज भारतात जी शांती आणि सुबत्ता आहे ती केवळ हिंदूंच्या बहुसंख्येमुळेच. हे मी म्हणंत नसून पाकिस्तानातनं हाकलले गेलेले शिया व अहमदिया व बलुची मुस्लिम म्हणतात. त्यामुळे हिंदूंनी संघटित होणं ही काळाची गरज आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......