पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन आणि काही पण, परंतु, वगैरे
पडघम - देशकारण
डॉ. सुधीर रा. देवरे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Tue , 28 May 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP राममंदिर RamMandir काश्मीर Kashmir पाकिस्तान Pakistan

प्रथमत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन. २०१९ च्या पार पडलेल्या लोकसभेच्या या निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरेल, पण त्यांना स्पष्ट बहुमत नसणार, असाच निष्कर्ष जाणकार काढत होते. मात्र २०१४ पेक्षाही या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. या यशाचे आणि विरोधकांच्या प्रचंड अपयशाचे समीक्षण सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे. कोणाला हा निकाल अनाकलनीय वाटतो, तर कोणाला इव्हीएम मशीनचा. पण कोणत्याही पुराव्याशिवाय असे बोलणे चुकीचे ठरेल.

सर्वसामान्य नागरिकाच्या मनात मोदींबद्दल काय चाललं, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मोदींना परिवार नसल्याने ते राजकारणातून पैसा कमवून मिळकतीत साठवणार नाहीत. म्हणूनच ते राफेलमध्ये पैसे खाणार नाहीत. संतती नसल्याने त्यांना पुढे आपली घराणेशाही चालवायची नाही. त्यांची आईही सामान्य नागरिक म्हणून वावरते. त्यांचे भाऊ राजकारणात नाहीत. मोदी भ्रष्टाचार विरोधी आहेत. त्यांच्या काळात भ्रष्टाचार कमी झाला. जगात त्यांच्यामुळे भारताची मान उंच झाली. पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर पंतप्रधानपदी मोदीच हवेत. ते जास्त तास काम करतात. कमी झोप घेतात. शारीरिक फिटनेस वगैरे गोष्टी तरुणाईत आणि नागरिकांत पसरल्या. अशा समजांमुळे मोदी आज जनमानसात लोकप्रिय आहेत.

आणखी काही बाबी

मोदी नाहीत तर मग दुसरे कोण? राहुल गांधींना भारताचे पंतप्रधानपद झेपणार नाही, असे अनेक नागरिकांना वाटते. प्रादेशिक पक्ष संधीसाधू असल्याने ते एकत्र आले तरी जास्त‍ दिवस सरकार चालणार नाही. अशा पक्षांना काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला तरी काँग्रेस पूर्ण पाच वर्षं पाठिंबा देत नाही हा इतिहास. काँग्रेसच्या सरकारातही प्रादेशिक पक्ष आपल्या महत्त्वाकांक्षेमुळे पाच वर्षं टिकणार नाहीत. असे असेल तर मोदीच भारताचे पंतप्रधान हवेत असे नागरिकांना वाटते.

मोदींनी पाकिस्तानवर दोन वेळा सर्जिकल स्ट्राइक केल्याने पाकिस्तान फक्‍त मोदींनाच घाबरू शकतो. मोदी पंतप्रधान असल्याने भारतात बाँबस्फोट – दंगली होणे बंद झाले वगैरेही चावळ तरुणाईत-नागरिकांत आहे. पण यात काश्मिरात मोठ्या प्रमाणातली अशांतता-हिंसाचार, पीडीपीशी ध्रुवीकरणाची युती, नक्षली हल्ले, दहशतवादी हल्ले, पाकिस्तानला अचानक भेट, पठाणकोट, उरी, पुलवामा हल्ला, फसलेली नोटबंदी, जमाव हल्ला, गायकांड, पेट्रोलशिवाय लावलेला जीएसटी, सरकारी कंपन्यांची झालेली दिवाळखोरी, लोकहितांच्या कामांऐवजी भावनिक रंगरंगोटी, स्वायत्त संस्थांत घुसखोरी, कर्ज बुडवून परदेशात पळून जाणारे उद्योजक, काळ्या पैशांचे आश्वासन आदी गोष्टी सोयीस्करपणे विसरल्या जातात.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

अनेकांना राममंदिर हवे आहे आणि ते मोदी करतील असा त्यांचा‍ विश्वास आहे. अनेकांना काश्मीरचं ३७० कलम नको आहे आणि ते मोदी काढून टाकतील असं त्यांना वाटतं. अनेकांना भारत हा ‘पाकिस्तान’ सारखा फक्‍त ‘हिंदुस्तान’ हवा आहे आणि तसा ‘हिंदुस्तान’ मोदी करतील असं त्यांना वाटतं. अनेकांना भारतात समान नागरी कायदा हवा आहे आणि तो कायदा मोदी करतील असं त्यांना वाटतं. भाषणांतून अशी हवा तयार करायला मोदी स्वत: जबाबदार आहेत.

एकीकडे ते महात्मा गांधींचे गुणगान गातात आणि दुसरीकडे त्यांचे लोक महात्म्याच्या पुतळ्यावर गोळ्या झाडतात, नथुराम गोडसेला देशभक्‍त म्हणतात. एकीकडे पंतप्रधान शहीदांविरुद्ध बोलणार्‍यांना देशद्रोही ठरवतात आणि दुसरीकडे त्यांचे लोक हेमंत करकरेंच्या कुरबानीला आपला शाप असल्याचे सांगतात. हेमंत करकरे हे शहीद असतील तर त्यांच्यावर टीका करणारे त्यांच्याच व्याख्येनुसार ‘देशद्रोही’ ठरतात. आणि सर्वांत वरची कडी म्हणजे अशा अपात्र- कलंकित- गुन्हेगार लोकांना संसदेचे दरवाजे उघडे करून देणे हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. पैसे खाण्यालाच फक्‍त भ्रष्टाचार म्हणता येत नाही. (देशभरात पैशांचा भ्रष्टाचारही अजिबात कमी झालेला नाही. फक्‍त भ्रष्टाचाराची शैली बदलली.)

निवडून येताच एकीकडे भारताच्या धर्मनिरपेक्षतेची स्वत: पंतप्रधान टिंगलटवाळी करतात आणि नेता निवड कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताच्या संविधानाला नमस्कार करतात. यात विरोधाभास असल्याचे कोणाच्याच लक्षात येत नाही. (आजपर्यंत कोणत्याच पंतप्रधानाने धर्मनिरपेक्षतेची सार्वजनिक टिंगल केली नव्हती! भारत धर्मनिरपेक्ष होता, धर्मनिरपेक्ष आहे आणि यापुढे धर्मनिरपेक्षच असेल. देशातील पुरोगामी चळवळीचीही या गोटात टिंगल सुरू असते.) भारताच्या नागरिकांत फक्‍त दुफळीच नव्हे तर धर्म-जातींच्या अनेक चिरफळ्या करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे.

केवळ विशिष्ट अस्मितेच्या लाटेवर प्रचंड प्रमाणात यशस्वी झालेली, भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही पहिली निवडणूक. ‘झूठ बोल पण ताठ बोल’ शैलीतली नुसती भाषणेसुद्धा मतदारांवर गारूड करतात, हेही या निवडणुकीने दाखवून दिले! भारताच्या लोकशाही मतदान पद्धतीने नरेंद्र मोदी घवघवीत यशाने निवडून आल्यामुळे त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन! निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पुलवामा हल्ल्याला सडेतोड उत्तर दिल्याने मोदींचा विजयी रस्ता तेव्हाच सोपा झाला होता. तरीही इतर राजकीय पक्षांचा नाकर्तेपणा, वाचाळपणा आणि घरभेदीपणा लपून राहत नाही.

.............................................................................................................................................

लेखक डॉ. सुधीर रा. देवरे भाषा, कला, लोकवाड्‍मय, लोकसंस्कृती आणि लोकजीवनाचे संशोधक आहेत.

sudhirdeore29@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख