राज ठाकरेंच्या छायेत...
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • राज ठाकरे
  • Sat , 20 April 2019
  • पडघम राज्यकारण राज ठाकरे Raj Thackeray मनसे MNS काँग्रेस Congres भाजप BJP राष्ट्रवादी काँग्रेस NCP

दुसर्‍या टप्प्याचं मतदान पार पडलेलं असताना किमान महाराष्ट्रात तरी लोकसभा निवडणुकीवर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या घणाघाती प्रचाराची गडद छाया दाटून आलेली आहे आणि ‘राज का ‘राज’ आखिर है क्या?’ या प्रश्नाच्या  उत्तराचा शोध प्रत्येक जण त्याच्या कुवतीप्रमाणं घेत आहे. दोन अधिक दोन म्हणजे चार असं काही जसं कोणत्याही आजाराचं निश्चित सूत्र नसतं, तसंच राजकारणाचंही असतं, हेच राज ठाकरे यांच्या या प्रचाराच्या ‘आऊट सोर्सिंग फंड्या’नं दाखवून दिलेलं आहे.

देशात सर्वत्र नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत होत असताना महाराष्ट्रावर मात्र ‘राज छाया’ पसरलेली आहे आणि लढाई राज ठाकरे विरुद्ध सेना-भाजप युती अशी झालेली आहे. परिणामी महाराष्ट्रात सेना-भाजप युती ३२ ते ३५ च्या दरम्यान जागा मिळवेल, असे जे अंदाज माध्यमतज्ज्ञ आणि विविध पाहण्यांतून समोर आलेले होते, त्याला छेद जातो की काय अशी हवा निर्माण झालेली आहे. उदाहरणच द्यायचं तर ‘निसटत्या का होईना बहुमतानं सुशीलकुमार जिंकतील’, ‘अशोक चव्हाण जागा काढतीलच’ , ‘कमी मार्जिननं का असेना नितीन गडकरी जिंकतीलच’ आणि ‘बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम मुंडे हरल्या तर आश्चर्य वाटायला नको’... अशा चर्चांना आता पेव फुटलं आहे.

यात तथ्य किती, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात जाण्यात काहीच मतलब नाही. कारण मतदारांनी कौल दिलेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. मुद्दा आहे महाराष्ट्राची हवा बदलू लागलेली आहे आणि त्याचं श्रेय राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नाही, तर ते राज ठाकरे यांना आहे. त्यासाठी त्यांना केवळ १०-१२ जाहीर सभा घेतल्या आहेत. अशा सभा जर त्यांनी पहिल्या टप्प्याआधीच विदर्भ-मराठवाड्यातही घेतल्या असत्या आणि सध्या घेत आलेल्या सभांची संख्या किमान दुपटीनं वाढवली असती तर चित्र आणखी वेगळं दिसलं असतं, यात शंकाच नाही.

पाठिंबा, गुपचूप पाठिंबा, जाहीर पाठिंबा देऊन दगलबाजी असे प्रकार पत्रकारितेतल्या आजवरच्या चार दशकांत अनेकदा पाहण्यात आले. पण ज्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही, त्या पक्षाचा नेता प्रचारात उतरतो, कुणाला मत द्या, हे न सांगता कुणाला मत देऊ नका, हे सांगतो आणि त्या मागचं ‘राज’ (रहस्य) तो उघड करत नाही, असं पाहायला मिळालेलं नाहीये. त्याआधी जर असं काही घडलं असेल तर त्याची माहिती नाही.

याचा अर्थ जर या निवडणुकीत राज्यात खरंच सेना-भाजप युतीचा दारुण पराभव झाला, तर राज ठाकरे यांची नोंद एक तर महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवणारे नेते अशी होईल. ते राज्याचे निर्विवाद नेते आहेत, हे सिद्ध होईल आणि त्याचा आणखी एक अर्थ आहे, आगामी विधानसभा निवडणूक सेना-भाजप युती विरुद्ध मनसे म्हणजे राज ठाकरे अशी होईल. त्या निवडणुकीच्या निकालावरही राज ठाकरे यांचीच पकड असेल. पण जर लोकसभा निवडणुकीत युतीला अपेक्षित (म्हणजे ३०च्या वर) जागा मिळाल्या तर वाट चुकलेले राजकारणी अशी नवी ओळख राज ठाकरे यांना लाभेल.

थोडक्यात राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं एक राजकीय ‘जुगार’ खेळत आहेत. ‘जुगार’ हा शब्द न रुचणार्‍यांसाठी दुसर्‍या भाषेत सांगायचं तर क्रिकेट सामन्याचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे, फलंदाजी करणार्‍या संघाला विजयासाठी सहा धावा आणि गोलंदाजी करणार्‍या संघाला केवळ एक बळी हवा आहे, अशी ही चुरशीची स्थिती आहे. 

आपला प्रचार आपलं नाव न घेता दुसरा कुणी तरी करतो आहे, ज्याला आपण आघाडीत सहभागी होण्यास विरोध केला, राज ठाकरे हे त्याचं नाव आहे आणि तो त्या प्रचारातून अधिकाधिक लोकप्रिय होतो आहे, याबद्दल काँग्रेस-राष्ट्रावादीच्या उमेदवारांना निश्चितच ओशाळल्यासारखं वाटत असणार. यापेक्षा जास्त महत्त्वाची बाब म्हणजे आत्ताच्या घटकेला सेना-भाजप युतीला आणि त्यातही नरेंद्र मोदी व भाजपला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तरी केवळ आणि केवळ राज ठाकरे आणि त्यांचा पक्षच सक्षम आहे, हा जो संदेश जनमनात रुजतो आहे, तो काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी धोक्याचा इशारा आहे.

राज ठाकरे यांच्या घणाघाती प्रचारामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त विजयी होतील, पण तरी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांचं अस्तित्व पुसट आणि भवितव्य आणखी क्षीण झालेलं असेल. राज ठाकरे यांच्या विद्यमान क्रेझमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी यांना आघाडी तर सेना-भाजपला युती करावीच लागेल, अशी स्थिती निर्माण झालेली असेल आणि ती राज ठाकरे व त्यांच्या मनसेसाठी अत्यंत अनुकूल असेल. कारण सेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले तर मनसे हा पाचवा पर्याय ठरतो. मात्र युती आणि आघाडी झाली तर मनसे तिसरा पर्याय असतो, हे गेल्या दोन निवडणुकांत सिद्ध झालेलं आहे.

सध्याची परिस्थिती कायम राहिली तर मनसे पर्याय नंबर तीन नव्हे तर दोन म्हणून समोर येऊ शकतो आणि सत्तेसाठी प्रमुख दावेदारही ठरू शकतो, हे जर लक्षात घेतलं तर राज ठाकरे हे बारामतीकरांच्या इशार्‍यावर नाचत आहेत, हा दावा म्हणा की आरोप, क्षणभर मान्य केला तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तरी राज ठाकरे यांची पाऊले योग्य दिशेनं पडत आहेत, असा याचा अर्थ निघतो.

आणखी एक कळीचा प्रश्न सध्या मिळणारा अफाट प्रतिसाद पाठिंब्यात रूपांतरित करण्यात राज ठाकरे यशस्वी होतील का? हा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर ठामपणे ‘हो’ असं देता येणं शक्य नाही, असा किमान आजवरचा तरी अनुभव आहे. राज ठाकरे हे कसलेले, मुरब्बी नेते आहेत, असा साक्षात्कार काही पुरोगामी आणि राजकीय नेते-कार्यकर्त्यांना आत्ता झालेला दिसत असला तरी तो कोणतीही भेसळ नसलेला संधीसाधूपणा आहे. कारण राज ठाकरे यांना आत्ता जो लोकांचा अफाट प्रतिसाद मिळतो आहे, तो काही पहिला नाही आणि त्यांच्या वक्तृत्वाची मोहिनी काही प्रथमच महाराष्ट्रावर पडलेली नाही. त्यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा आणि नंतरही त्यांनी घेतलेल्या सभांना महाराष्ट्रभर असाच प्रतिसाद मिळाला आहे! त्यांनी दाखवलेल्या त्यांच्या मनातल्या महाराष्ट्राची मराठी मनाला भुरळही पडली होती. मात्र तो प्रतिसाद पाठिंब्यात रूपांतरीत करून घेण्यात तेव्हा राज ठाकरे यशस्वी ठरलेले नाहीत, हे विसरता येणार नाही. 

कारण मनसे म्हणजे राज ठाकरे नावाचा एकखंबी तंबू आहे, संघटना आहे, पण  राज ठाकरे केंद्रीत अशी तिची रचना आहे. राजकीय पक्ष म्हणून गांभीर्य, चिकाटी आणि सातत्य या पक्षात कुणाकडेच नाही, हेच वारंवार दिसून आलेलं आहे. (राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना रुचणार नाही, पण सांगतोच– राज ठाकरे तसंच नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी दाखवलं तसं गांभीर्य, चिकाटी आणि सातत्य!).

राज ठाकरे म्हणतील ती दिशा आणि राज ठाकरे म्हणतील तो कार्यक्रम, अशी या पक्षाची दिशा आणि धोरण आहे. ही जितकी जमेची बाजू तितकाच कमकुवतपणाही आहे. खळखट्याक, नाकाबंदी, क्वचित राडा किंवा केवळ मराठी बाणा हे कार्यक्रम आकर्षक असले तरी ते पूरक आहेत. तेच दीर्घकालीन राजकीय धोरण होऊ शकणार नाहीत. पाच वर्षांपूर्वी मोदी समर्थन आणि आता इतका टोकाचा विरोध हा ‘यू-टर्न’ का, यामागचं ‘राज’ लोकांना समजलं पाहिजे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या क्रेझची आभा आणखी वाढेल.

आज राज ठाकरे भाजप-मोदी सरकारच्या कामाचे जबरदस्त वाभाडे काढत आहेत. मात्र एक विसरता कामा नये की, तसे वाभाडे कोणत्याही पक्षाच्या सरकारच्या कामाचे काढता येतातच. आजवर काँग्रेसेतर पक्षांनी काँग्रेस सरकारांचे असेच पंचनामे केलेले आहेत, पण जनतेनं मोजकेच अपवाद वगळता काँग्रेसच्या विरोधात कौल दिलेला आहे. आता आरोपीच्या पिंजर्‍यात काँग्रेसऐवजी भाजप आहे, हाच काय तो फरक आहे.

राज ठाकरे ते वाभाडे ज्या नेमक्या पद्धतीनं काढत आहेत, तसे ते काढणारे अभ्यासू वृत्तीचे आणि गारुड करणारी वक्तृत्व शैली असणारे (छगन भुजबळ वगळता) नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नाहीत आणि यातून या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. मात्र विरोधी पक्षात राहून सरकारचे वाभाडे काढणं आणि सत्तेत्त राहून प्रशासनावर अंकुश ठेवून लोकहितार्थ काम करणं, यात फरक असतो. त्यामुळे सत्तेतले राज ठाकरे पाहणं हा एक उत्सुकतेचा भाग असेल.  

सध्याची भूमिका स्वीकारताना जी गृहितकं म्हणा की, अलिखित करार-मदार की, दिलेली वचनं आहेत, ती विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाळली जातीलच याची राजकारणात कोणतीही खात्री नसते, हे भान राज ठाकरे यांना असेलच. पण तूर्तास तरी ते काहीही असो, मागच्या सर्व चुका आणि निर्माण झालेले गैरसमज यांना तिलांजली देत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे एखाद्या फिनिक्स पक्ष्यासारखे भरारी मारते झाले आहेत. एक राजकीय नेता म्हणून ते झळाळून निघाले आहेत.

आता गांभीर्य, चिकाटी अन सातत्य कायम ठेवलं तर येत्या विधानसभा सामन्याचे सामनावीर राज ठाकरे असतील. अन्यथा २०१९ची निवडणूक राज ठाकरे यांच्या प्रचाराच्या छायेत झाली, याची केवळ आठवण लोकांच्या मनात राहील!              

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......