म. फुले पावलोपावली आपल्याला सोबत करतात, आपण त्यांच्या विचारांना किती साद देतो?
पडघम - सांस्कृतिक
सतीश देशपांडे
  • महात्मा जोतीराव फुले
  • Thu , 11 April 2019
  • पडघम सांस्कृतिक महात्मा फुले Mahatma Phule जोतीराव फुले Jyotirao Phule जोतिबा फुले Jotiba Phule

आज महात्मा जोतीराव फुले यांची १९२ वी जयंती. ही जयंती साजरी होत असताना आपला देश लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहे. जोतीरावांनी जी सांस्कृतिक एकात्मतेची मांडणी केली आणि आज ज्या प्रकारची सांस्कृतिक सामाजिक परिस्थिती आपण अनुभवत आहोत, त्या परिस्थितीविषयी आजच्या दिवशी चिंतन करण्याची गरज आहे.

............................................................................................................................................................

महात्मा जोतीराव फुले हे नाव घेतलं की, डोळ्यांसमोर येतो तो त्यांचा गुलामगिरीच्या विरोधातला आवाज, असत्याच्या विरोधात त्यांनी केलेलं बंड, बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, लोकांना दिलेला सत्यधर्माचा पर्याय, समकालीन चळवळीला दिलेलं वेगळं वळण, करारी भाषेत केलेला वैचारिक विरोध आणि अखंड सत्यशोधनासाठी वाहून घेतलेलं जीवन.

आज जोतीरावांची १९२ वी जयंती. ही जयंती साजरी होत असताना आपला देश लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहे. देशात लवकरच नवी लोकसभा आणि नवं सरकार अस्तित्वात येणार आहे. या नव्या सरकारच्या हातात पुढील पाच वर्षं आपला देश राहणार आहे. आपण सारे भारताचे लोक या नव्या कारभाऱ्यांना आपल्या मताद्वारे निवडणार आहोत. आपण ज्या देशात आज राहतो आहोत, त्या देशाच्या आधुनिकतेची पायाभरणी ज्यांनी केली, त्यापैकीच जोतीराव हे एक आहेत.

आज आपण ज्या स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, मानवी हक्कांची भाषा करतो, त्यासाठी जोतीरावांनी आपलं अवघं आयुष्य अर्पण केलं. ‘माझ्या देशाचा कारभार मी कोणाच्या हातात देणार,’ हे आपण आपल्या मताच्या आधारे ठरवणार आहेत. हा ठरवण्याचा अधिकार ज्या लोकशाही मूल्यांमुळे आला, त्या लोकशाही मूल्यांचं बीजारोपण करणाऱ्यांपैकी जोतीराव हे एक आहेत.

त्यामुळे लोकशाहीच्या उत्सव सुरू असताना साजरी होणारी जोतीरावांची जयंती औचित्यपूर्ण वाटते. गुलामगिरीच्या विरोधात त्यांनी उगारलेला असूड आजच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा वाटतो. जोतीरावांनी जी सांस्कृतिक एकात्मतेची मांडणी केली आणि आज ज्या प्रकारची सांस्कृतिक सामाजिक परिस्थिती आपण अनुभवत आहोत, त्या परिस्थितीविषयी आजच्या दिवशी चिंतन करण्याची गरज आहे.

सत्यवर्तन 

फुले-शाहू-आंबेडकर या तिघांची नावं घेतल्याविना महाराष्ट्राच्या राजकारणाचं आज पानही हलत नाही, ही आजची परिस्थिती आहे. हे तिघेही इथल्या मुक्त सामाजिक सांस्कृतिक वातावरणाचे निर्माते आहेत. त्यांना मानणाऱ्या व न मानणाऱ्या पक्ष - संघटना त्यांच्या नावाचा जयघोष करत असतात. त्यामुळे ‘सत्यवर्तनी’ नेमकं कोणास म्हणावं, हा जोतीरावांच्या काळात निर्माण झालेला प्रश्न आजही निर्माण होतो. जोतीरावांना ‘सत्यवर्तन’ अपेक्षित होतं.

‘सत्यवर्तन’ नेमकं कशाला म्हणायचं ते त्यांच्याच शब्दांत सांगायचं झाल्यास, “सर्व स्त्रीपुरूषांस धर्म आणि राजकीय स्वतंत्रता आहे. जो दुसऱ्याचे हक्क समजून घेऊन इतरांस पीडा देत नाही, त्यांचे नुकसान करीत नाही तो सत्यवर्तन करणारा म्हणावा. सर्व स्त्रीपुरूषांस सर्व मानवी हक्कांविषयी आपले विचार, मते, बोलून दाखविण्यास अथवा लिहिण्यास आणि प्रसिद्ध करण्यास स्वतंत्रता दिली आहे, परंतु त्या विचारांपासून व मतांपासून दुसऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जे खबरदारी घेतात त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावे. दुसऱ्यांच्या मतांवरून किंवा राजकीय मतांवरून जे त्यास नीच मानून त्याचा छळ करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावे..” ( जोतिचरित्र, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पृ. ६९) 

हे जोतीरावांचे विचार. आपणास या विचारांना आजच्या परिस्थितीशी जोडून पाहायचं आहे. सत्यवर्तनी कोण आहे, यापेक्षा सत्यवर्तनी कोण नाही हे शोधून काढून त्यांना आपल्या सांस्कृतिक परंपरेला ओरखडे ओढण्यापासून रोखणे, हे आज या सत्यशोधकाच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपल्यासमोर आव्हान आहे.

वाद-संवादप्रिय भारतासमोरचं आव्हान 

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाच्या सांस्कृतिकतेची खरी ओळख भाईचारा राखण्यात आहे. प्राचीन भारताच्या इतिहासात आद्य शंकराचार्यांची अद्वैती मांडणी, रामानुजाचार्यांचा द्वैतवाद, गौतम बुद्धांनी दिलेला वेगळा धार्मिक सांस्कृतिक पर्याय, महावीरांनी मांडलेली वचने, प्राचीन - मध्ययुगीन व अर्वाचीन काळात एकामागून एक आलेले परकीय, त्यांच्या विविध परंपरा - चालीरीती, मध्ययुगातील संतांची कामगिरी, ते अगदी प्रबोधन युग आणि स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर झालेली राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ, हे सारं पचवून भारत नावाचं राष्ट्र उभं राहिलं.

स्वातंत्र्यानंतर अनेक परकीय विचारवंतांनी, नेत्यांनी अशी शक्यता वर्तवली होती की, हे वैविध्यपूर्ण राष्ट्र देश म्हणून फार काळ टिकणार नाही, याचं विभाजन अटळ आहे. परंतु या देशाला स्वातंत्र्यानंतरची सात दशकं ज्या संहितेनं योग्य मार्गदर्शन केलं, त्या राज्यघटनेमुळे हा देश टिकून राहिला. प्राचीन भारतापासून आलेली वाद-संवादप्रिय भारताची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी देशाची राज्यघटना नेहमी प्रयत्नशील राहिली.

वाद-संवाद प्रिय नसणारा दुसरा एक गट छोट्या प्रमाणात का होईल प्राचीन भारतापासून या देशात सदैव अस्तित्वात राहिला आहे. बुद्धांची परंपरा संपवू पाहणारा, धर्माच्या नावानं भेद करणारा, सहिष्णुता आचरणाऱ्यांचा द्वेष करणारा, गांधींपासून ते गौरी लंकेशपर्यंत कार्यकर्त्यांना गोळ्या घालून संपवणारा हा गट आजही या देशाच्या सांस्कृतिक ऐक्याला आव्हान म्हणून उभा आहे.

या गटानेच आज आपल्यासमोर सांस्कृतिक आव्हानं निर्माण करून ठेवली आहेत. ती जाणून घेणं आणि त्याविरोधात लढणं हे सहिष्णू सांस्कृतिक परंपरेसमोरचं आव्हान आहे. जोतीराव हे याच सहिष्णू सांस्कृतिक परंपरेचा भाग आहेत. त्यांनी आपली उभी हयात, असत्यापासून समाजाला दूर नेण्यात, गुलामगिरीच्या विरोधात बंड करण्यात आणि लोकांना वेगळा पर्याय देण्यात घालवली. आजघडीला सांस्कृतिक क्षितिजावर जे काळेकुट्ट डाग दिसत आहेत, ते पुसून टाकायचे असतील तर जोतीरावांनी दिलेली आयुधं उपयोगी पडतील यात तीळमात्र शंका नाही.  

आज लोकशाहीत घटनात्मक व कायदेशीर तरतुदी असल्यामुळे उघडउघड विषमता पाळता न येणारे छुप्या पद्धतीनं आपला विषमतेचा अजेंडा राबवत आहेत. धर्म कशास म्हणावं इथपासून ते धर्माच्या नावं आपण प्रतिकुटूंब एक हिंदूसैनिक निर्माण करू, असे नारदी कीर्तनातून पटवून सांगणारे चारूदत्त आफळे असोत, की गांधीजींना आजही गोळ्या घालून मारण्यात शौर्य गाजवणारी साध्वी पुजा पांडे असो. हा धार्मिक विषमता राबवण्याचा आणि सहिष्णूता खोडून काढण्याचा अजेंडा आहे. अपर्णा रामतीर्थकर यांसारख्या शिक्षित स्त्रियांच्या तोंडून इतर बहुजन स्त्रियांना आपण दुय्यम कसे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो.

निवडणुकीत आता औरंगाबादेत, ‘तुम्हाला खान पाहिजे का बाण’ पाहिजे असं विचारलं जातंय. सोशल मीडियावरच्या टिनपाट कार्यकर्त्यापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच तारतम्य सोडून दिलंय. विरोध करणारा देशद्रोही, पाकिस्तानी ठरवला जातो. खायचं काय, प्यायचं काय याबाबतही आता निर्णय करण्याचा अधिकार या धर्मद्रोह्यांनी हातात घेतलाय. नुसत्या संशयावरून मुडदे पाडले जात आहेत. डोक्यावर स्कलकॅप घातलेल्या मोहसिनला केवळ संशयावरून पुण्यात ठार मारलं गेलं. वरात काढण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, तुम्ही तर नीच जातीचे आहात म्हणून दलित समाजातल्या तरुणांना मारलं जातं. गुजरातमध्ये अंगणवाड्यांत दलित समाजातल्या मुलांना वेगळं बसवलं जात होतं, या आशयाचा दै. ‘इंडियन एक्सप्रेस’सारख्या राष्ट्रीय दैनिकांत बातम्या येत होत्या. तुम्ही आदिवासी नाही आहात, तुम्ही वनवासी आहात, हे बिंबवणं म्हणजे आम्ही आर्य मूळचे इथले आहोत असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

ही प्रवृत्ती म्हणजे बहुतोंडी अजगरासारखी आहे. एकानं सांस्कृतिक गप्पा मारायच्या, दुसऱ्यानं इतिहासाची चिरफाड करायची, तिसऱ्यानं अध्यात्म सांगायचं, चौथ्यानं राजकारण करायचं, पाचव्यानं हिंसक रूप धारण करायचं… म्हणजे एक जण अडकला की, बाकीच्यांनी हात वर करून नामानिराळं व्हायचं. ही घातक प्रवृत्ती आज सांस्कृतिक परिघावर आव्हान बनून उभी आहे.

हे आव्हान पेलण्यासाठी जोतीरावांचे विचार आजही उपयोगी पडतात.

ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी

धरावे पोटाशी बंधुपरी

मानव भावंडे सर्व एकसहा

त्यांजमध्ये आहा तुम्ही सर्व

हा संदेश आपल्याला समाजात रुजवावा लागेल.

धर्मावरून ध्रुवीकरण करणारे लोक ज्या धर्माचा आधार घेत आहेत, त्या धर्मांबद्दल जोतीरावांनी चिकित्सक वृत्तीनं लिहून ठेवलंय. हिंदू धर्मातल्या विषमतावादी प्रवृत्तीवर कडा़डून टीका करणारे फुले हे केवळ हिंदूधर्माचे टीकाकार नव्हते, तर ते खऱ्या अर्थानं सुधारक होते, हे समजून घेतल्याशिवाय आणि समजून दिल्याशिवाय लोकांमधले गैरसमज दूर होणार नाहीत.

धर्म ही एक बाब विचारात घेतली आणि त्या अनुषंगानं आजचं सांस्कृतिक वातावरण तपासून पाहिलं, तर असं दिसून येईल की, या विषयावर ज्यांनी अत्यंत मूळ स्वरूपाचं भाष्य केलं, त्यापैकी जोतीराव हे एक आहेत. शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या वाईट अवस्थेची मूळ कारणं कशा प्रकारे धर्मात आहेत, हे त्यांनी दाखवून दिलं. आजही त्याच धर्मातील विषमतेची मुळं उखडून टाकण्याचं काम बाकी आहे.

ब्राह्मण्याचं आव्हान 

जोतीराव हे ब्राह्मण्यावर कोरडे ओढणारे व ब्राह्मणेतर समाजाला आत्मभान देणारे होते, यात शंका नाही. जोतीरावांनंतर ही भूमिका बऱ्याचशा अनुयायांनी ही भूमिका नीटशी समजली नाही. ब्राह्मण - ब्राह्मणेतरवादाला यामुळे खतपाणी मिळालं. काहींनी मुद्दामहून राजकीय आक्रमक भूमिका घेऊन हा वाद पुढे नेला. पण नुकसान झालं ते समाजाचं. याचा धर्मद्रोही मंडळींनी फायदा उचलला. किमान आजच्या काळाची पावलं ओळखून तरी या वादाला मूठमाती द्यायला हवी. जोतीरावांनी ब्राह्मण्यावर ताशेरे ओढले, ते त्या काळाच्या सामाजिक सांस्कृतिकसंबंधानं. आजचा संबंध लक्षात घेता हे ब्राह्मण्य केवळ ब्राह्मणांत राहिलेलं नसून ते प्रत्येक जातीत शिरलं आहे. हे ब्राह्मण्य संपवणं हे आपल्यासमोरचं सांस्कृतिक आव्हान आहे. कॉ. गोविंद पानसरे नेहमी म्हणायचे, ‘आपल्या पुरोगामी चळवळीतले शत्रुमित्र कोण आहेत हे ओळखता आलं पाहिजे.’ दुर्दैवानं हे अजूनही न ओळखता आल्यानं चळवळीचं सतत नुकसान होत आहे.

शत्रुमित्रत्वाचा सांस्कृतिक विवेक

महापुरुषांबाबत आपल्या समाजात मोठा तिढा निर्माण झालाय. ज्या जोतीरावांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा रचला, त्या जोतीरावांच्या विरोधी विचारांच्या संघटनांनी शिवबाला भगव्या रंगात न्हाऊ घातला. शिवाजी राजे हिंदू नव्हते, असं नाही, पण ते मुस्लीमद्वेष्टे नव्हते, हे मात्र निश्चित, हे सांगायला जोतीरावांचे अनुयायी म्हणून आपण आजही कमी पडतो आहोत. संभाजी महाराजांना हिंदूधर्मरक्षक म्हणून मांडलं जातं, शिवाजी महाराजांना मुस्लिमांचा कर्दनकाळ म्हणून रंगवलं जातं, तेच लोक भीमा कोरेगाव घडवून आणतात.

‘हा महापुरुष त्यांचा, हा आपला’ ही खेळी करून सनातनी मंडळींनी आपली पोळी भाजून घेतली. पण ही खेळी ध्यानात न आलेले आपण त्यांच्यात आजही भेद करत बसलो आहोत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीला लोकमान्य टिळक चालत नाहीत, रानडेंचं नाव घेणं तर दूरच. वास्तविक पाहता रानडे-फुले यांच्यातील संवादाचा आणि वादाचाही मुद्दा समजून घ्यायला हवा. वडिलांचंच ऐकायचं असेल तर मग सुधारक म्हणून मिरवू नका, म्हणून टीका करणारे जोतीराव जेव्हा त्यांना भेटत, तेव्हा त्यांच्याशी आदरानं बोलत असत. एकेकाळी दोघंही एका मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत. रानडेंचं उदाहरण इथं वानगीदाखल घेतलंय. पण हेच टिळकांना, आगरकरांना, गांधी, आंबेडकरांनाही लागू होतं. हा सांस्कृतिक विवेक टिकवणं आपल्यासमोरचं आव्हान आहे.

आव्हानं

जोतीराव सूक्ष्मात जाऊन विचार करणारे होते. मग तो मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा असो वा हौद खुला करण्याचा मुद्दा असो वा पुरोहिताशिवाय धार्मिक विधी करण्याचा मुद्दा असो. त्यांनी त्यावेळचे मुद्दे हाताळले. आज आपल्याला आजच्या संदर्भातले मुद्दे हाताळायचेत. तसे मुद्दे अनंत आहेत, पण काही महत्त्वाच्या बाबी इथं अग्रक्रमानं नोंदवाव्या लागतील. आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह, धर्म म्हणजे काय याचं नेमकं आकलंन, शत्रुमित्र विवेक, सर्व प्रकारच्या विषमतेचा धिक्कार, राजकारणासाठी केलं जाणारं धार्मिक ध्रुवीकरण व त्यातून होणारा सांस्कृतिक नाश, शिक्षणाचं भगवेकरण, वारीसारख्या संतपरंपरेचं भगवेकरण, विवेकी वृत्तीचा समाजातील विकास आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कृतिशील संघटन या सर्वांच्या आधारे आजच्या सांस्कृतिक आव्हानांना तोड देता येणं शक्य आहे.

जोतीराव पावलोपावली आपल्याला सोबत करतात, प्रश्न आहे तो आपण त्यांच्या विचारांना किती साद देतोय त्याचा. जोतीरावांनी आपल्याला खूप मोठी वैचारिक तिजोरी देऊन ठेवली आहे. त्याचा वारंवार वापर करणं, हे आपल्या विवेकाला आपण सर्वांनी करावयाचं आव्हान आहे.

............................................................................................................................................................

लेखक सतीश देशपांडे मुक्त पत्रकार आहेत.

sdeshpande02@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 15 April 2019

ज्योतीबा फुले हे भान सुटलेले गृहस्थ आहेत. ब्राह्मणांवर टीका करायच्या नादात ते शिवाजी महाराजांना निरक्षर ठरवतात. शिवाय महमंद पैगंबरांच्या नावाने अत्याचार करणाऱ्या इस्लामी आक्रमकांची भलामण करतात. हे त्यांनी स्वत:च 'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकात लिहिलेले आहे. हे पुस्तक इथे मिळेल : http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shetkaryacha_asud_fule.pdf कृपया पीडीएफ पान क्रमांक २० बघणे. असो. शिवाजी महाराजांना फुकटची नावे ठेवणाऱ्या माणसाची विश्वासार्हता काय असा प्रश्न उभा राहतो. -गामा पैलवान


Satya Kute

Fri , 12 April 2019

अप्रतिम लेख. ...


Sandip Rajguru

Thu , 11 April 2019

सर फार सुंदर लेख लिहिलाय.