जनीं जाणता पाय त्याचे धरावे । म्हणे दास सायास त्याचे करावे ॥
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • संत कबीर
  • Sat , 30 March 2019
  • पडघम सांस्कृतिक कबीर Kabir तुकाराम Tukaram रामदास Ramdas

आपले एखादे काम करून घेण्यासाठी व घेताना व्यवहारी माणूस संबंधित व्यक्तीस अनेकदा ‘साहेब’ म्हणत असतो. ती व्यक्ती आपले ते काम करू शकते, तिच्याकडून ते होईल असे तो समजत असतो. अनेकांची मोठमोठी कामे करू शकते, त्या व्यक्तीस लोक ‘मोठा साहेब’, ‘मोठे साहेब’ म्हणून संबोधितात. इतरांशी बोलताना व लिहितानादेखील तिचा ‘साहेब’ असा सादर उल्लेख ते करत असतात.

व्यावहारिक जीवनातील हा न्याय संतांनी जणू देवालाही लागू केला असल्याचे आढळते. उदाहरणार्थ संत श्रीकबीर यांनी आपल्या एका दोह्यामध्ये देवाला ‘साहेब’ म्हटले आहे. तो दोहा असा आहे -

दोहा :  संपुट माहिं समाइया, सो साहब नहिं होय ।

सकल मांड में रमि रहा, मेरा साहब सोय ॥

भावानुवाद : देहसंपुटीं सामावे तो साहेब नोहे खरा ।

नांदताहे विश्वमंडपीं साहेब माझा खरा ॥

या दोह्याचा सकलार्थ समजून घेताना श्रीकबिरांच्या मते कुणाला ‘साहेब’ समजणे का योग्य नाही आणि कोणत्या अर्थाने कोण ‘खरा साहेब’ आहे, याची कल्पना आपल्याला रेते.

संपुट वा संपुष्ट म्हणजे देव ठेवण्याचे छोटेसे धातुपात्र होय. आपल्या प्रत्येकाच्या देहरूपी संपुटात देवाचा एक अंश असलेला जीव राहत असतो. या अर्थाने तो देवरूपी साहेब देहरूपी संपुटात सामावलेला असतो. पण जीव अल्पज्ञानी, अल्प शक्तियुक्त व विशिष्ट जागी राहत असल्याने त्याला ‘साहेब’ म्हणणे हे जसे श्रीकबिरांना पूर्णत: पटत नाही, तसेच ज्याच्या ज्ञानाला व शक्तीला मर्यादा पडत असल्याने दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप इत्यादी नैसर्गिक तसेच मानवनिर्मित विनाशकारी घटना घडतात, तेव्हा प्रत्ययास येत असते, त्या मानवाला ‘साहेब’ म्हणणे उचित नसल्याचे आपल्यालाही पटत असते.

देहात जीव असेपर्यंत व्यक्ती जिवंत राहते व तो निघून गेल्यानंतर ती मृत होते. देहाने व देहात इच्छावर्ती वा ऐच्छिक क्रिया व अनिच्छावर्ती वा अनैच्छिक क्रिया अशा दोन प्रकारच्या क्रिया घडत असतात. उदा. पाहणे, चालणे, अन्न सेवन करणे इत्यादी ऐच्छिक क्रिया होत; तर, अन्नाचे पचन होणे, त्यापासून रक्त, मांस वगैरे बनणे या अनैच्छिक क्रिया होत. यापैकी पहिल्या क्रिया आपण करू शकतो, थांबवू शकतो वा टाळू शकतो; पण, दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे अनैच्छिक क्रिया मात्र आपण जशा करू शकत नाही, आपण करतही नसतो, तशाच त्या आपण कुणीही थांबवू वा टाळू शकत नाही.

हे सत्य सामान्य माणसाला जसे लागू आहे, तसेच ज्यांना अज्ञानी व गरजू लोक ‘साहेब’ वा ‘मोठा साहेब’ म्हणत असतात, त्या साहेबांनाही तंतोतंत लागू पडणारे आहे. अर्थात स्वत:च्याच देहातील अत्यंत महत्त्वाच्या क्रिया जे करू शकत नाहीत, ते सारे लोक खऱ्या अर्थाने कर्ते व करवितेही नसतात आणि म्हणूनच ते ‘खरे साहेब’ही नसतात.

वर उल्लेखिलेल्या अनैच्छिक क्रियादेखील आपल्या प्रत्येकाच्या मेंदूत असलेल्या सहस्त्रदळ कमळात राहणाऱ्या देवाच्या सत्तेने होत असतात. सामान्य भाषेत सांगायचे तर देवच त्या क्रियांचा खरा कर्ताकरविता असतो. ‘मी जठराग्नि होऊन सर्व प्राण्यांच्या शरीरात चार प्रकारचे अन्न पचवत असतो’, असे ‘गीते’त भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे; ‘सहस्त्रदळ कमळात राहून माझा पांडुरंगच शरीराच्या क्रिया करत व करवत असतो’, अशा शब्दांत संत श्रीनामदेवांनी त्या देवाचा महिमा गायिला आहे; तर, ‘चाले हे शरीर कोणाचिया सत्तें । कोण बोलविते हरिविन ॥ देखवी ऐकवी तो एक नारायण ।.....’ या अभंगाद्वारे संत श्रीतुकारामांनी सर्व क्रियांचा कर्ताकरविता तो एक देवच असल्याचे सांगितले आहे; आणि ज्यांच्या दोह्यांच्या आधारे आपण ‘खरा साहेब’ ही संकल्पना समजून घेत आहोत, त्या संत श्रीकबिरांनीदेखील प्रत्येक घटात म्हणजे देहात देव आहे, देव नाही असा एकही घट नाही. तीळात तेल असते, गारगोटीत अग्नी असतो, समोरच्या वस्तू पाहणारी बाहुली जशी डोळ्यात असते, तसाच माझ्यात, तुझ्यात व सर्वांच्यात असलेल्या त्या आत्मदेवाशिवाय एकही काम होत नसते, अशा अर्थाची अनेक विधाने करून त्या देवाचे अंतिम स्वरूप व माहात्म्य म्हणजे ‘साहेबपण’ समजून घेण्याचे अप्रत्यक्षपणे आवाहन केले आहे. ते म्हणतात,

“साहब सो सब होत है, बंदे तें कछु नाहि ।

राइ तें पर्वत कर, पर्वत राई माहिं ॥”

अर्थात,

“सर्व होतसे देवाकडून, काही न दासाकडून ।

राईमध्ये पर्वत अथवा पर्वत राईमधून ॥”

या दोह्यातून श्रीकबिरांनी नम्रपणे केवळ स्वत:लाच देवाचा बंदा म्हणजे दास म्हटलेले नाही; तर, विश्वातील सर्वच जीव त्या देवाचे बंदे आहेत, देवावर अवलंबून आहेत, पराधीन आहेत वा त्या सर्वोच्च सत्ताधीशापुढे अगतिक आहेत, हे अंतिम सत्यही सूचित केले आहे. आणखी ज्या काही दोह्यांमधून त्यांनी हे सत्य प्रतिपादिले आहे, त्यांतील विधाने अशी आहेत -

१) ज्याने राम कृष्ण यांनाही निर्माण केले, तो कर्ता (साहेब) निराळा आहे, हा विचार ज्ञानदृष्टी नसलेल्या माणसाला समजत नाही.

२) लोक अनेक देवदेवतांना मानतात, भजतात, पण अलक्ष्य म्हणजे दिव्य ज्ञानदृष्टीशिवाय दिसू न शकणाऱ्या सकळकर्त्या देवाधिदेवाचे स्वरूप मात्र ते समजून घेत नाहीत.

महाशक्तिशाली महात्म्यांनादेखील ज्याचे भय असते, ज्याचे ते आज्ञाधारक असतात, त्या देवाधिदेवरूपी साहेबाचे स्वरूप समजून घेण्यासाठीदेखील श्रीकबिरांनी त्या महात्म्यांच्या मर्यादा काही दोह्यांमध्ये अधोरेखित करून ठेवल्या आहेत. अर्थात, ते महात्मेदेखील ‘खरे साहेब’ नाहीत, असे त्यांनी सूचित केले आहे. त्यांपैकीच्या काही दोह्यांचे भावानुवाद असे -

१) धरती पाऊली पार करी, समुद्र एका उडीत।

तोलीतसे पर्वत तयाही काळ असे गिळीत ॥

२) भय असे काळाचे सकळां, ब्रह्माविष्णुमहेशां ।

सुरनरमुनिलोकांना नि रसातळींच्या शेषां ॥

३) भिती पीरही कठीण ऐसा काळाचा जोर ।

स्वर्गमृत्युपाताळीं ना तयापुढे कुणी थोर ॥

देहधारी जीवांना तसेच अगदी अवतारी महात्म्यांनाही देहामुळे मर्यादा पडत असतात. अवतारी महात्म्यांनी व संतांनी जरी स्वेच्छेने देह धारण केलेला असतो तरी त्यांना तो देहाकार ‘नाहीसा’ करून अवतारकार्य संपवावेच लागते. म्हणून तर ‘रामकृष्णही आले गेले’, असे एका कवीने उदबोधक विधान केले आहे.

वर म्हटल्याप्रमाणे देवाचा एक अंश म्हणजे जीव जसा आपल्या प्रत्येकाच्या देहात असतो, तसाच त्या जीवाला ज्ञान, शक्ती पुरवणारा देवाचा जणू एक विशेष अंशही आपल्या मेंदूत असलेल्या सहस्त्रदल कमळात रहात असतो. जीवाप्रमाणे जणू तोही देहरूपी संपुटात वास करत असतो. जीव जेव्हा देवाच्या या विशेष अंशाशी एकरूप होतो, तेव्हा श्रीतुकारामांच्या व श्रीकबिरांच्याही भाषेत तो देव होत असतो. अशा प्रकारे अगोदर आपल्या देहरूपी संपुटात देवरूपी साहेबाचा अनुभव संत, योगी, महात्मे घेत असतात. या अनुभवास ‘आत्मज्ञान’ म्हणतात. देहरूपी संपुटातील देवरूपी साहेबाच्या स्वरूपाचा हा अनुभव व्यक्तिगत वा मर्यादित असतो. म्हणून श्रीकबीर या देवरूपी साहेबास ‘खरा’ म्हणत नाहीत.

या अनुभवानंतर आपला आत्मारूपी देव जसा आपल्या देहाच्या रोमारोमात रममाण झालेला आहे, तसाच तो विश्वातील सर्व प्राणिमात्रात, जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणीं म्हणजे सर्व ठिकाणी असल्याचा जो अनुभव येतो त्यास ब्रह्मज्ञान, परब्रह्मज्ञान म्हणतात. श्रीकबिरांच्या भाषेत त्यावेळी ‘सर्वचि माझे, मी सर्वांचा झालेलो असल्याने दुजा कोणी वा दुजे काहीही नसल्याचे’ सदोदित होते. श्रीरामदासांच्या भाषेत ‘नभीं वावरे जो अणूरेणू काही । रिता ठाव या राघवेंविन नाही ॥’ असा त्या ‘थोरल्या’ देवाच्या सर्वव्यापक स्वरूपाचा अनुभव येत राहतो. देवाचे हे रूप म्हणजेच ‘नांदताहे विश्वमंडपीं साहेब माझा खरा’ या श्रीकबिरांच्या विधानात अभिप्रेत असलेला ‘खरा साहेब’ होय.

तथापि, हा अनुभवही विश्व व त्याचा अनुभव घेणारे आपण सारे जीव निर्माण झाल्यानंतरचा असल्याने तो सापेक्ष ठरतो. विश्व निर्माण होण्यापूर्वी एक देवच होता, त्याने ‘अनेक होण्याचा संकल्प’ केला व तो अनेक झाला. असंख्य जीव जसे त्या देवाधिदेवाचे अंश आहेत, तसेच रामकृष्णादी अवतारी महात्मेही त्याचे अंश असतात. म्हणूनच देहधारी कुणाही देवाच्या अंशांना श्रीकबीर सकलकर्ता व करविता म्हणजे ‘साहेब’ म्हणत नाहीत. त्यांनी अनंत विश्वे निर्माण होण्यापूर्वीच्या देवाच्या त्या स्वरूपाचा अनुभव घेतला होता, खरे तर, त्या पराकोटीच्या दिव्य अनुभवातच ते अखंडपणे स्थित होते, आपणच परमात्मरूपाने अनंत विश्वात विलसत आहोत, हा त्यांचा अनुभवच त्यांनी ‘माझा साहेब’ या सर्वथैव उचित अशा सार्थकतारुक्त व प्रबोधकारी शब्दांनी व्यक्त करून ठेवला आहे. आपल्या त्या स्वानुभवाचे म्हणजे पर्यायाने ‘खऱ्या साहेबा’चे स्वरूप त्यांच्या आणखी काही दोह्यांचे पुढील भावानुवाद वाचताना लक्षात येते -

१) वाट दाविली गुरुंनी तैं कबिरां उमजले ।

देहीं ब्रह्म नि देह ब्रह्मीं हे सदोदित जाहले ॥

२) श्रीगुरुदत्त समदृष्टीमुळे गेला भ्रम विकार।

जिकडे पाहे तिकडे आता स्वामी-साक्षात्कार ॥

३) भिन्न नसे हे जग, ईश्वर आणि ते ब्रह्म ।

सर्वांमाजी एक ब्रह्म नि ब्रह्मीं जगत्भ्रम ॥

४) वन सारे ते तुळशी झाले पर्वत शाळिग्राम।

सरिता साऱ्या गंगा जैं जाणिला आत्माराम॥

५) विदेही तो राहे देहीं स्वामी सच्चिद्रूप ।

अनंत लोकीं नांदताहे जरा न रंग रूप ॥

६) होते पाणी, हिम झाले ते वितळून पाणी पुन्हा ।

होतो आधीच ते झालो आता वर्णितां नये ना ॥

या सहाव्या भावानुवादात म्हटल्याप्रमाणे पूर्वी पाणी असते ते बर्फ होते व नंतर पुन्हा त्याला आपले पूर्वरूप (मूळरूप) प्राप्त होते, त्याचप्रमाणे श्रीकबीर म्हणतात की विश्वोत्पत्तीपूर्वी मी देवच होतो आणि ते मूळ देवपण मला आता पुन्हा प्राप्त झाले आहे.

आपल्या त्या विश्वव्यापी परमात्मस्वरूपाचे वर्णनही त्यांनी करून ठेवले आहे. ते त्यांचे संबंधित विधान असे आहे - “आय अ‍ॅम ऑल्वेज् अँड विल रिमेन फॉर एव्हर. अ मिलियन ऑफ विष्णुज हॅव्ह पास्ड, मेनी मिलियन कन्हैयाज. काऊंटलेस मिलियन शंभुज हॅव्ह बिन, मोहम्मद अँड हिज खलीफ्स; गॉड्स दॅट कॅनॉट बि नम्बर्ड.... हिअर, ओ गोरख, सच इज माय एज्.”

सर्वव्यापक देवाधिदेवाच्या एका अंशावर जग वसलेले आहे, असे अर्जुन अनुभवतो, असे ‘गीता’ व ‘ज्ञानेश्वरी’त म्हटले आहे. अनंतकोटी ब्रह्मांडनायक असलेल्या त्या देवाशी एकरूप झालेल्या श्रीकबिरांनी करोडो विष्णू, करोडो कृष्ण, करोडो शंभू वगैरे होऊन गेल्याचे आपण पाहिले असल्याचे व्यक्त करीत होते, तेव्हा तेही तत्त्वत: तो विश्वव्यापी देवरूपी ‘खरा साहेब’ झाले होते.

श्रीकबिरांप्रमाणे श्रीज्ञानेश्वरादी संतही त्या ‘खऱ्या साहेबा’शी एकरूप होऊन गेले होते. म्हणूनच सुरुवातीला व्यवहारी माणूस ज्यांना ‘साहेब’ वा ‘मोठे साहेब’ म्हणतो ते देह, मन, बुद्धी हेच आपले स्वरूप आहे असे समजून वागणारे व वागवणारे साहेब लोकही संतांचा जयजयकार करत असतात, संतांसारखे असलेल्यांपुढे नतमस्तक होत असतात. असो.

थोडक्यात, व्यवहारी माणूस ज्यांना ‘साहेब’ म्हणत असतो, ते ‘साहेबलोक’ही ज्यांना पूज्य मानत असतात, ते संत देवरूपी ‘खऱ्या साहेबा’शी एकरूप होऊन परोपकारी जीवन जगत असतात. ते संतच खरे ‘जाणते’ म्हणजे ‘शहाणपणयुक्त ज्ञानी’ मानव असतात. अशा खऱ्या ‘जाणत्या माणसाचे पाय धरावे’ व त्याने जी साधना करून देवपण प्राप्त करून घेतले, ती साधना आपणही करावी, असा उपदेश श्रीरामदासांनी ‘मनाचे श्लोक’मध्ये करून ठेवला आहे. तो असा -

जनीं जाणता पाय त्याचे धरावे ।

म्हणे दास सायास त्याचे करावे ॥

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 30 March 2019

नमस्कार विजय बाणकर! लेख अगदी लक्ष्याचा अचूक वेध घेणारा आहे. विजय बाणकरांनी विजयबाण करांनी सोडलाय जणू! आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......