व्हेनेझुएलातील जनतेने अमेरिकेचा कट उधळला
पडघम - विदेशनामा
कॉ. भीमराव बनसोड
  • व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो आणि विरोधक जुआन गुआईडो
  • Wed , 13 February 2019
  • पडघम विदेशनामा व्हेनेझुएला Venezuela निकोलस माडुरो Nicolas Maduro जुआन गुआईडो Juan Guaido

सध्या व्हेनेझुएलामध्ये बऱ्याच राजकीय गडबडी चालू आहेत. ह्युगो चावेझनंतर तिथे सत्तेवर आलेले निकोलस माडुरो यांना सत्तेतून हुसकून लावण्याचे आटोकाट प्रयत्न अमेरिकेच्या सहाय्याने चालू आहेत. तसे हे प्रयत्न ह्युगो चावेझ सत्तेत होते तेव्हापासून चालू आहेत. तेथील विरोधक जुआन गुआईडो यांनी स्वत:ला ‘स्वयंघोषित राष्ट्रपती’ म्हणून जाहीर केल्याबरोबर अमेरिका-कॅनडासह युरोपातील फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड यांसारख्या देशांनी लगोलग पाठिंबा दिला आहे. पण तेथील जनेतेने व लष्कराने गुआईडो यांना पाठिंबा दिला नसल्याने सध्या त्यांना भूमिगत व्हावे लागले आहे. ते सध्या कोठे आहेत याचा पत्ता अमेरिकेशिवाय कोणालाच नाही.  

व्हेनेझुएलामध्ये २० मे २०१८ रोजी झालेल्या निवडणुकीत माडुरो यांना ६७.६ टक्के इतकी भरघोस मते मिळून ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. पण विरोधकांना ते मान्य नाही. कारण त्यांनी तेथील सामान्य पण बहुसंख्य कामगार-कष्टकरी जनतेच्या बाजूची, ह्युगो चावेझ यांचीच धोरणे राबवली आहेत. माडुरो हे चावेझ यांचे अनुयायी असल्याने त्यांच्याच मार्गाने ते जात आहेत आणि हीच बाब विरोधकांना खटकत आहे. त्यांना असे वाटत होते की, निदान चावेझ वारल्यानंतर तरी तेथील सत्ता आपणाला अंकित राहील आणि आपणाला पाहिजे तशी धोरणे राबवता येतील. पण तसे घडले नाही. सध्याचा अंक हा त्याचाच भाग आहे.

ह्युगो चावेझ १९९९ साली सर्वप्रथम सत्तेवर आले, तेव्हा त्यांनी तेथील कष्टकरी जनतेच्या हलाखीच्या जीवनाला अमेरिकन साम्राज्यवाद जबाबदार आहे हे जाणले. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम तेथील संपूर्ण अर्थव्यवस्था ज्या तेल उद्योगावर आधारित होती, त्यातील बहुराष्ट्रीय तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून त्या आपल्या देशाच्या ताब्यात घेतल्या. त्याचप्रमाणे तेथील अतिरिक्त जमिनीचे फेरवाटप करून त्या जमिनी भूमिहीन शेतमजूर, आदिवासी, व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वाटून टाकल्या. बेघरांना घरे दिली. शिक्षणाच्या सोयी केल्यामुळे शिक्षितांचे प्रमाण वाढले. आरोग्याच्याही चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्याने जनतेचे जीवनमान उंचावले.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4637/Maza-Talamay-Jeevan---Zakir-Hussain

.............................................................................................................................................

पण याच कारणाने अमेरिकेबरोबर स्थानिकचे धनिक जमीनदार, मध्यमवर्गीय लोक दुखावले गेले. साहजिकच समाजातील अशा विभागाने अमेरिकेच्या कारवायांना पाठिंबा देणे सुरू केले. तेथील तेल उद्योगापासून तर डॉक्टर्स, वकील, शिक्षक, वाहतूक, सरकारी नोकरवर्ग इत्यादी सर्व ट्रेड युनियन्सनी चावेझच्या विरोधात सार्वत्रिक संप केला होता. त्यावेळच्या बंडाळीचाच तो भाग होता. तेव्हा व्हेनेझुएलामधील सत्ता उलथून पाडणे ही बाब केवळ आजचीच नाही, तर ह्युगो चावेझपासूनची आहे.

पण चावेझच्या वेळी व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था सुदृढ होती. कारण तेव्हा तेलाचे आंतरराष्ट्रीय दर वाढलेले होते. तेथील तेलही उच्च प्रतीचे असल्याने ह्युगो चावेझ यांना जनहिताची धोरणे राबवणे सोपे गेले. पण आताची परिस्थिती तशी नाही. तेलाचे भाव कमी होत आहेत. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अशा अवस्थेत माडुरो यांना तेथील जनतेचे जीवनमान वाढवणे तर सोडाच, पण आहे ते टिकवणेही कठीण होत आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. चलनाचे मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे तेथील उच्च मध्यमवर्ग व श्रीमंत लोक विदेशात पलायन करत आहेत. जे देशात आहेत, ते विदेशी मदतीच्या सहाय्याने तेथील सत्तेच्या विरोधात काम करत आहेत.

तेलावर आधारित अर्थव्यवस्था काय व्हेनेझुएलाचीच थोडी आहे? जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था, मुख्यत: अरब देशातील अर्थव्यवस्था या तेलावरच आधारित आहेत. सौदी अरेबिया, कुवैत ही त्याची काही  उदाहरणे आहेत. मग व्हेनेझुएलाचीच परिस्थिती इतकी डबघाईला का आली? त्याचे कारण आहे अमेरिकेने टाकलेला बहिष्कार व केलेली नाकेबंदी.

बहिष्कार टाकून नाकेबंदी करणे एकप्रकारे त्या देशाविरूद्ध पुकारलेले युद्धच असते. तेलावर आधारलेली अर्थव्यवस्था असलेले, पण आपल्या अंकित न राहणारे इराक, सिरिया (व आता येमेन) यांसारख्या देशावर शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने प्रत्यक्ष सैनिकी हस्तक्षेप करून तेथील सत्ता आपल्याला अनुकूल करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला आहे. इराकच्या सद्दाम हुसेन यांना फाशी दिले तर लिबियाच्या कर्नल गडाफी यांचेही तसेच हाल केले. पण सिरियाच्या असाद यांच्याबाबत त्यांना अपयश आले. तो संघर्ष अजूनही चालूच आहे. सशस्त्र युद्धाच्या सहाय्याने या देशातील केवळ अर्थव्यवस्थाच नव्हे, तर खुद्द हे देशच या साम्राज्यवाद्यांनी उदध्वस्त केले आहेत, हे सगळ्या जगाला माहीत आहे. तेव्हा बहिष्कार व नाकेबंदी म्हणजे प्रत्यक्ष लष्करी हस्तक्षेपाने केलेल्या युद्धाची पहिली पायरी होय.

तूर्तास अमेरिकेला व्हेनेझुएलावर सशस्त्र हल्ला करण्याची गरज वाटत नसेल. शत्रू जर ‘गुळानेच मरत असेल तर विष कशाला?’ या अन्यायाने केवळ बहिष्कार व नाकेबंदी केल्याने जर सत्ता परिवर्तन होत असेल तर प्रत्यक्ष युद्ध कशाला? पण एखाद्या देशाची पूर्ण नाकेबंदी करणे हे काही साधेसुधे युद्ध नव्हे हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे.

उदाहरणार्थ आताच्या भांडवलशाहीपूर्व सरंजामी राजेरजवाड्यांच्या काळात शत्रूच्या एखाद्या किल्ल्याला महिनोनमहिने वेढा घालणे, हा त्यावेळी युद्धाचा सार्वत्रिक प्रकार होता. किल्ल्याभोवती असा वेढा घातला की, आतील कोणीही बाहेर येऊ शकत नव्हते व बाहेरून अन्नपाणी अथवा जीवनावश्यक कोणत्याही बाबींचा पुरवठा किल्ल्याच्या आतील लोकांना होऊ शकत नव्हता. किल्ल्यातील सैनिकांना जेवढे महिने या बाबी पुरतील इतका साठा त्यांनी करून ठेवला असेल तोपर्यंत ते आतच तग धरून राहत होते. पण तो साठा संपल्यांनतर तहानेने व्याकूळ व भूकेने जर्जर झालेल्या या सैनिकांना जीवाची पर्वा न करता बाहेर पडून एक तर युद्ध करावे लागत होते अथवा शत्रूंना शरण जाऊन मानहानीकारक तह करावा लागत होता. सध्या इराणविरुद्धही असेच बहिष्काराचे व नाकेबंदीचे अस्त्र उगारलेले आहे. त्यांच्याकडे असलेले तेल कोणीही आयात करू नये, असे फर्मानच अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी काढले आहे. त्याची झळ आपल्या भारतासारख्या देशालाही बसत आहे.

तेव्हा व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे त्याचे एकमेव कारण तेलाचे उतरते आंतरराष्ट्रीय भाव हे नसून अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी व्हेनेझुएलावर टाकलेला बहिष्कार व त्याची केलेली नाकेबंदी होय. या अस्त्राचा वापर त्यांनी क्युबाविरुद्धसुद्धा फार जोरकसपणे केला होता. पण क्युबा त्याला पुरून उरला. आजही तो त्याच्याशी झुंज देत आहे.

ज्या फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली हा संघर्ष होता ते मात्र आता हयात नाहीत. त्यांची उणीव माडुरो यांना विशेषत्वाने जाणवत असेल. कारण ह्युगो चावेझच्या वेळेस त्यांना सत्तेवरून हुसकून लावत असताना फिडेल कॅस्ट्रो यांची त्यांना फार मदत झाली होती. कॅस्ट्रो यांनी सैनिकी अथवा शस्त्रास्त्रांचीच मदत नव्हे, तर फार मोठा धीर व हिंमत चावेझ यांना दिली होती. त्यावेळेस त्यांनी संयम पाळण्याचा दिलेला सल्ला बहुमोल होता. ज्यावेळी ह्युगो चावेझ यांना तथाकथित बंडखोरांनी अज्ञात स्थळी पळवून नेले आणि त्यांच्याकडून राजीनाम्याची मागणी केली, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नका असे कॅस्ट्रो यांनी त्यांना सांगितले. पण बंडखोरांनी चावेझ व कॅस्ट्रो यांचा संबंध येऊ नये म्हणून त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवले. तेव्हा कॅस्ट्रो यांनी ह्युगो चावेझ यांच्या मुलीमार्फत त्यांच्याशी संपर्क ठेवून क्षणोक्षणी सल्ला देत आणि त्याप्रमाणेच वागून ह्युगो चावेझ यांनी तथाकथित बंडखोरांना जेरीस आणले. तोपर्यंत देशातील जनतेने राजधानी कारकास येथे प्रचंड मोर्चे काढून ह्युगो चावेझ यांना पाठिंबा दिला. लष्करसुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

आताही व्हेनेझुएलाची कष्टकरी जनता हाल-अपेष्टेत असली तरी तिचा माडुरो यांना भक्कम पाठिंबा आहे. आताही तिने राजधानी काराकासमध्ये प्रचंड निदर्शने करून माडुरो यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. लष्करही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्याच भरवशावर निकोलस माडुरो आजही सत्तेत आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया, चीन इत्यादी देशांचाही पाठिंबा आहेच. पण क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रो यांची सर त्यांना नाही हे नक्की.

.............................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................