एक तृतीयांशहून अधिक बालकं लठ्ठपणाच्या समस्येला सामोरं जात आहेत!
पडघम - देशकारण
सतीश देशपांडे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 18 December 2018
  • पडघम देशकारण लठ्ठपणा Obesity

गुटगुटीत, बाळसेदार मूल कुणाला नको असतं! ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळं आता ‘लाडो’ घराघरात पोचलाय. आपलही बाळ अगदी लाडोसारखंच गुटगुटीत असावं असं अनेक आयांना वाटतं. एखाद्या आईचं मूल जरासं वजनानं कमी असलं की, त्याला अंगात मांस नसलेलं, खातपीत नसलेलं म्हणून हिणवलं जातं. दुसरीकडं मात्र बाळसेदार बाळ कौतुकाचा विषय बनतं. बाळ दिसायला गुटगुटीत असणं म्हणजे सशक्त असणं नव्हे, हे बऱ्याच पालकांना नीटसं समजत नाही. आणि बाळाला याबद्दलची समज असण्याचा प्रश्नच येत नाही.

साधारण वयाच्या सातव्या वर्षांनंतर बरीच मुलं सडपातळ होत जातात; पण काही मुलं तशीच गुटगुटीत राहतात. ही गुटगुटीत वाटणारी मुलं सशक्त असतातच असं नाही. त्यांच्यात चरबीचं प्रमाण वाढलेलं असतं. ते बाळसेदार दिसणारं मूल लठ्ठ झालेलं असतं. आपलं मूल लठ्ठ आहे, हे कित्येक पालक मान्य करायलाच तयार नसतात. आधी कौतुकाचा विषय बनलेलं मूल नंतर चेष्टेचा विषय बनतं. त्याचा त्याच्या मनावरही परिणाम होतो. घर, खेळाचं मैदान, शाळा अशा अनेक ठिकाणी स्थुल असणारी मुलं मागे पडतात. त्यांना वयानं मोठ्या माणसांसारख्या हृदयविकार, रक्तदाब, मधुमेहासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं. त्यांच्या वाढत्या वजनाकडं वेळीच लक्ष द्यावं लागणार आहे. लहान मुलं ही आपल्या देशाचं भविष्य आहेत, असं जर आपण म्हणत असू, तर या भविष्याला भेडसावणाऱ्या लहान मुलांमधील ओबेसिटीकडे गंभीरपणे पाहायला हवं.

लठ्ठपणा हा फक्त मोठ्या मुलांत, प्रौढ व्यक्तींमध्येच आढळतो. हा समज अगदी चुकीचा ठरला आहे. प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय बोरूडे बालकांमधील लठ्ठपणाच्या समस्येची काही कारणं सांगतात. बदलती जीवनशैली, पालकांमधील गैरसमज, याबद्दलचं नीटसं आकलन नसणं, आई-वडिलांकडून आलेला अनुवंशिक लठ्ठपणा, शाळा-क्लासेसमध्ये गुंतून पडलेली मुलं, मैदानी खेळाचा अभाव इत्यादी. आपल्या आजूबाजूला (obesogenic environment) हे सर्व नकळत घडतं. यात मुलांचा दोष नाही. आपणच मुलांना असं पर्यावरण निर्माण करून दिलंय की, त्यात मैदानी खेळाला खेळाला, व्यायामाला नगण्य स्थान आहे. फास्टफूड खायला घालून आपणच त्यांच्या जिभेला अशी चव दिलीय की, त्यांना सकस खायलाही नको वाटू लागलंय.

लहान मुलांच्या लठ्ठपणाला अनुवंशिकताही कारणीभूत आहे. आई-वडील लठ्ठ असतील तर मूलही तसंच वाढण्याची जास्त शक्यता असते. डॉ. संजय बोरूडे यांनी सांगितलेलं एक उदाहरण - जवळच्या नातेसंबंधांमध्ये लग्न केलेल्या एका कुटुंबाची ही गोष्ट. त्या कुटुंबात जन्माला आलेलं बाळ सुरुवातीला सामान्य बाळांसारखं वाटायचं, पण ते वषर्भरानं दर महिन्याला दोन ते तीन किलोनं वाढत गेलं. दीड वर्षांचं झालं तेव्हा ते २२ किलोंचं होतं. नायर हॉस्पिटलच्या पेडियाट्रिक अॅंड इंडोक्युनॉलॉजी विभागात उपचार चालू असताना त्या बाळाचा निव्वळ ओबेसिटीमुळे जीव गेला. त्या जोडप्याला दुसरं मूल झालं. तेही दीड वर्षांनंतर अशीच लक्षणं दाखवू लागलं. त्या बाळावर ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये उपचार केले. सर्जरी केली. प्रौढ व्यक्तीत आढळावेत अशा प्रकारचे अवयव त्या बाळात आढळले. आज ते बाळ नऊ वर्षांचं झालंय. निरोगी आहे. पण ओबेसिटीला आता वयाच्या कुठल्याच सीमारेषा राहिलेल्या नाहीत, हे या प्रकारानं दाखवून दिलंय. गुबगुबीत मान, गुबगुबीत गाल, सुटलेले पोट, सहजासहजी खाली वाकता न येणं, वाढणारा पोटाचा घेर, मांड्यांना मांड्या चिकटणं, अशी बाह्य लक्षणं दिसणारी लहान मुलंही आता भयंकर आजारांना सामोरी जात आहेत. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब हे आजार लहान मुलांत दिसू लागले आहेत. त्याचं प्रमाणही वाढतंय. 

चाईल्ड ओबेसिटीबद्दल शहरांधून आता बरंच बोललं-लिहिलं जातंय. रोटरी क्लब आणि  जे.टी. फाऊंडेशन यांनी दोन वर्षांपूर्वी पुणे आणि मुंबई शहरातील सहा हजार शालेय विद्यार्थ्यांचा एक सर्व्हे केला. त्यामध्ये ८ ते १४ वयोगटातील ३५ टक्के विद्यार्थी लठ्ठ आहेत. त्या व्यतिरिक्त १८ टक्के विद्यार्थी लठ्ठपणाकडं वाटचाल करताहेत, असं आढळलं. आणखी एक सर्व्हे डोळ्यांत अंजन घालणारा आहे. ‘नॅशनल डायबेटिस, ओबेसिटी अॅंड कोलेस्ट्रेरॉल फाउंडेशन’नं २०१४ साली केलेल्या पाहणीनुसार, मुंबईत २२.३ टक्के, दिल्लीत २२ टक्के, अलाहाबाद व आग्रा इथं १४.९ टक्के आणि जयपूर मध्ये १०.४ टक्के मुलं लठ्ठपणाचा त्रास सहन करत आहेत.

वरील पाहणी होऊन आता तीन वर्षांहून जास्त काळ झालाय. मुंबईतील ‘डाएटिशयन असोशिएशन’ही पाहणी करत असतं. त्यांच्या मते तर २०१५ सालात २४.८ टक्के मुलं मधुमेह आणि रक्तदाबानी आजारी होती. वरील दोन्ही-तिन्ही अभ्यासांचा आपण जर एकत्र विचार केला तर असं दिसून येईल की, देशभरात सरासरी २० ते २५ टक्के मुलं लठ्ठ आहेत आणि त्याशिवाय किमान १५ टक्के मुलं लठ्ठपणाकडं वाटचाल करत आहेत, असं म्हणायला जागा आहे. जर देशाची भावी पिढी एकतृतीयांशहून अधिक संख्येनं या समस्येला सामोरं जात असेल, तर भविष्य गंभीर आहे, हे सांगायला कुठल्या नव्या पाहणीची गरज नाही.

शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास असतो, पण तो घड्याळी अर्धा तास. बऱ्याचदा त्याच्यावरही इतर विषयांचं आक्रमण होतं. खेळाच्या तासात विद्यार्थांना किती खेळ, योगासने शिकवली जातात हा प्रश्नच आहे. काही अपवाद वगळता अनेक शाळांमधलं खेळाचं साहित्य वर्षानुवर्ष बंद कपाटात असतं. ग्रामीण भागात जसं शाळेभोवती मैदान असतं, तसं शहरात सर्वच शाळांतील मुलांना हक्काचं मैदान मिळत नाही. पुण्यात अशा कित्येक शाळा आहेत, ज्यांचं मैदान मुलांना खेळायला कमी आणि खाजगी कार्यक्रमांना भाडोत्री जास्त दिलं जातं.

शहरांपेक्षा ग्रामीण भागात परिस्थिती चांगली आहे. खेळ, मुलांची सुदृढता आणि शिक्षणाचा शाळेत कसा संबंध येतो, यावर काळेवस्ती- चांदापुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक भाऊराव ठवरे यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, “माझ्या दहा वर्षांच्या सेवेत मला ग्रामीण भागातील मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण कमी असलेलं पाहायला मिळालं आहे. याचं कारण म्हणजे ही मुलं लंगडी, लपाछपीपासून ते खो-खो, कबड्डीसारखे मैदानी खेळ खेळत असतात. खेळामुळं मुलं चपळ बनतात. त्यांच्यात एकाग्रता वाढते, नेतृत्वगुण वाढतात. मुलांचं शिक्षण हे खेळातून होत असतं. मुलं शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहावीत यासाठी आम्ही आमच्या शाळेत रोज सायंकाळी ४ ते ५ या वेळेत त्यांच्याकडून मैदानी खेळ, तसेच कृतियुक्त गोष्टी करवून घेतो.” खरं तर असं वातावरण प्रत्येक शाळेत लाभायला हवं. शहरात याची खूप आवश्यकता आहे. बकाल वाढलेल्या शहरी वस्त्यांत याची वानवाच आहे.

आई-बाबा सकस आहार घेत असतील, व्यायामाला-फिरायला जायला आवर्जून वेळ काढत असतील, आरोग्याकडं लक्ष देत असतील तर मूलही अनुकरण करतं. मुळात आई-वडिलांनाच जर कामाच्या व्यापातून स्वतकडं लक्ष देत नसतील, त्यांनाच जर आरोग्यभान नसेल तर मुलांनाही येणार नाही. लठ्ठपणाच्या समस्येचा आणि बौद्धिक प्रगतीचा खूप मोठा संबंध आहे. अनेक लठ्ठ मुलं शाळेत, मित्रमैत्रीणींत, नातेवाईकांत हेटाळणीचा विषय बनतात. त्यातून त्यांचं नैराश्य वाढतं. शरीरानं स्थुल असणाऱ्या मुलामुलींना शाळा आपले प्रतिनिधी म्हणून स्पर्धांना पाठवतातच असं नाही. आपोआपच भेद निर्माण होतो. खेळाच्या मैदानावर स्थुल मुलं फारशी येत नाहीत. निराश झालेली मुलं साहजिकच अभ्यासातही प्रगती करू शकत नाहीत. आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते. मला यश मिळतच नाही किंवा मला अमुक एक गोष्ट जमणारच नाही, असा न्यूनगंड निर्माण होतो.

ही समस्या सुरुवातीला विकसीत देशांमध्ये होती. आता विकसनशील देशांतही आढळत आहेत. “Does obesity affect school performance?” या प्रश्नाचं संशोधन करून उत्तर शोधण्यात आलंय. सीएनएन वृत्तवाहिनीनं त्यावर प्रकाश टाकला. त्यांची निरीक्षणं अशी- ‘लहान मुलांमधील लठ्ठपणा त्यांच्या शालेयच नव्हे तर महाविद्यालयीन जीवनावर आणि एकूणच करिअरवरही परिणाम करतो. त्यांच्यामध्ये प्रौढांना व्हावेत अशा आजारात प्रमाण वाढतंय. स्पर्धेमध्ये येणाऱ्या अपयशाचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय.’

लठ्ठपणाची समस्या जेव्हा गंभीर रूप धारण करते, तेव्हा अखेर शस्त्रक्रिया हाच उपाय राहतो. पण त्याअगोदर आपल्या हातात खूप साऱ्या गोष्टी असतात. डॉ. जयश्री तोडकर यांनी या विषयावर शास्त्रीय स्वरूपाचं काम केलं आहे. त्यांच्या मते, “गेल्या पंधरा वर्षांत आम्ही उपचार दिलेल्या १३ ते १४ या वयोगटातील मुलांची आणि मुलींची संख्या ही जवळपास एक हजारांहून जास्त आहे. प्रौढांच्या तुलनेमध्ये (जवळपास बारा हजारांहून जास्त) हा आकडा वयोगटानुसार खूप जास्त आहे. मुलांकडून व्यायाम, योगासनं करून घेणं, त्याच्या आहारावर नियंत्रण ठेवणं, त्यांचा बैठ्या कामातील वेळ करून मैदानी खेळांतील रूची वाढवणं, चपळ जीवनशैली स्वीकारणं, त्यांच्या सवयी बदलणं, हे बालवयातील लठ्ठपणावर परिणामकारक उपाय आहेत.”

अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक तर्फे ३ नोव्हेंबर २०१८ रोजी “Childhood Flourishing is Negatively Associated with Obesity” या विषयावर एका कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं. तिथं लठ्ठपणाचा psychosocial skill शी संबंध जोडून चर्चा झाली. भविष्यात जास्तीत जास्त क्रियाशील मनुष्यबळ घडवायचं असेल तर आज एक तृतीयांश पिढीला या समस्येपासून वाचवायला हवं, हे तिथल्या चर्चेचा सार होता.

आपल्याकडे अजून बालकांमधील लठ्ठपणा या विषयाचा आवाकाही समजलेला नाही, नि त्यासंदर्भात फारसं चिंतनही झालेलं नाही. उचललेली पावलंही खूपच तोकडी आहेत. महाराष्ट्र शासनानंही यासाठी पावलं उचलली आहेत. यासंदर्भात काम करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला आहे. त्याद्वारे शिबिरं घेण्याचा सरकारचा मानस आहे. सरकारी रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयं इथं ओबेसिटी क्लिनिक उघडण्याचंही सरकारनं जाहीर केलं आहे. पण हे सर्व अद्याप कागदोपत्री आहे. यावर गंभीर काम अद्यापही झालेलं नाही. अनेक देश आपल्या निरोगी भविष्यासाठी या विषयावर चिंतन करून त्याबद्दल काम करत आहेत. आपण जितका उशीर करू तितकीच समस्या अधिक गंभीर रूप धारण करणार आहे.  

संदर्भ :

१)https://edition-m.cnn.com/2012/06/14/health/obesity-affect-school-performance/index.html?r=http%3A%2F%2Fwww.google.com%2F

२) ‘ओबेसिटी मंत्रा’- डॉ. जयश्री तोडकर, संतोष शेणई , विश्वकर्मा पब्लिकेशन, पृष्ठ 96,97

३) https://www.sciencedaily.com/releases/2018/11/181102083441.htm

.............................................................................................................................................

लेखक सतीश देशपांडे मुक्त पत्रकार आहेत.

sdeshpande02@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Bhaskar rao Mhaske

Wed , 19 December 2018

सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी हा लेख उपयुक्त आहे. यातील अनेक मुद्दे आणखी डिटेल मांडावेत.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......