पारदर्शक व्यवहाराचे श्राद्ध!
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • जनलोकपाल
  • Tue , 10 July 2018
  • पडघम देशकारण जनलोकपाल JANLOKPAL अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal काँग्रेस Congress भाजप BJP मल्लिकाजुर्न खरगे Mallikarjun Kharge

मनात यत्किंचितही आस्था नसलेल्या, पण मागे गडगंज संपत्ती ठेवून गेलेल्या पितरांचे श्राद्धकर्म त्यांच्या वंशजांकडून मोठ्या उत्सवात, धामधूमीत घातले जाते. त्यात निव्वळ कोरडेपणा असतो, हा भाग निराळा! कधी काळी मानवी स्वभावातील कौटुंबिक पातळीवरच दिसून येणारा हा पैलू आता भारतीय व्यवस्थेच्या अस्तित्त्वाचा अंगभूत घटक झाला आहे. जिवंतपणी मृत्यूच्या वेदना देणारी मंडळी मेल्यावर मायबापांच्या नावांनी भोजनावळी घालतात. चढाओढीने गावजेवणे घातली जातात. या पंगतीत मनसोक्त जेवण करणारे भोजनभाऊही या कृतघ्न मंडळींच्या पापाचे वाटेकरी असतात. अपेक्षित वेळी योग्य ती कर्तव्ये पार न पाडणाऱ्या कुपुतांना चार शब्द ऐकवण्याचे कष्ट न घेता, हे लोक अशा पंगतीत तृप्त ढेकर देतात आणि आयोजकाच्या दानतीची प्रशंसा करत सुटतात.

या असल्या उठवळ मंडळींचेच दांभिक स्वरूप सध्या राजकीय प्रक्रियेत पाहावयास मिळते. जनलोकपाल नियुक्तीसाठीची बैठक या आठवड्यात होणार आहे. या बैठकीत नियुक्ती प्रक्रिया पार पाडणाऱ्या समितीकडून लोकपालपदासाठी एक नाव निश्चित करण्यात येणार आहे. स्वच्छ व पारदर्शक कारभाराची जबाबदारी त्या पदावर सोपवून सगळे आपापल्या नित्य कर्मात रममाण होतील. येत्या काही काळात या लोकपाल निवडीचे ढोल-ताशे बडवण्यात येतील. श्रेय घेण्यावरून सत्ताधारी भाजप आणि सत्ताकांक्षी काँग्रेसमध्ये भांडणे लागतील. पण नियुक्तीची औपचारिकता पार पाडण्यासाठी किंबहुना त्या विधेयकानुसार पारदर्शक सार्वजनिक व्यवहाराचे श्राद्ध घालण्यासाठी राजकीय प्रक्रियेतील सर्व भावंडे शुभकार्याला एकत्र आल्यासारखे जमतील. इथे हवेत कोणाला स्वच्छ व पारदर्शक व्यवहार! 

सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार निर्मूलन करण्यात आला तर राजकीय पक्षांची पिढीजात दुकानदारी कशी चालणार, हा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांच्या धुरिणांनी केला नसेल असे नाही. त्यामुळेच व्यवस्थेत परिवर्तन घडवू शकणाऱ्या विधायक प्रवाहाचे श्राद्ध आता मोठ्या उत्साहात पार पाडले जाईल. स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कारभार या जनलोकपाल विधेयकाच्या निर्मितीमागील उद्दिष्टांचा मृत्यू तर केव्हाच झालेला आहे.

सशक्त जनलोकपाल विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर केमाल पाशा या क्रांतिकारकाने त्याच्या देशात केलेल्या क्रांतीसारखी क्रांती भारतात होणार, हा सर्वसामान्य जनतेचा भ्रम ज्या दिवशी संपला, त्याच दिवशी या चळवळीतील आत्म्याने स्वत:ची हत्या करुन घेतलेली आहे. उरला आहे केवळ शोभेचा सांगाडा. जनलोकपाल विधेयकाच्या नावाखाली जी-जी बुभुक्षित मंडळी ‘रामलीला’ करण्यास बसली त्या सर्वांचे उखळ पांढरे झाले, त्या दिवशी पारदर्शकतेचे थडगे बांधण्यात आले.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

आता केंद्रात सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार त्याची उत्तरक्रिया उरकणार आहे. या उत्तरक्रियेच्या प्रक्रियेत सहभागी काँग्रेसची यास हरकत असण्याचे कारण नाही. एका पाठोपाठ एक बाहेर पडणारे घोटाळे आणि त्यास जबाबदार लोकांना कठोर कायदेशीर कारवाईनुसार द्यावयाची शिक्षा खरोखरीच झाल्यास कसे चालेल, या विवंचनेत सर्वच पक्ष येत्या काळात या नियुक्तीचे स्वागत करतील.

काँग्रेसला या विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल ममत्व असण्याचे कारण नाही आणि भाजपला असल्या पारदर्शकतेच्या तत्त्वांशी देणेघेणे असण्याचे कारण नाही.  पण आता सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिले म्हटल्यावर करणार तरी काय? म्हणून तर लोकपाल नियुक्तीसंदर्भातील गत दोन बैठकांना दांडी मारलेल्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनाच आता बैठकीची वेळ ठरवण्याची फर्माईश सरकारने केली आहे.

यापूर्वीच्या दोन बैठकांना गैरहजर राहण्यामागे खर्गे यांनी, सत्ताधाऱ्यांनी या प्रक्रियेपासून विरोधकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, हे दिलेले कारण सर्वसामान्य मतदाराला पटेल एवढे मतदार आता दुधखुळे नक्कीच राहिलेले नाहीत. लोकसभेत त्यांना अजून अधिकृतपणे विपक्ष नेतेपदाचा दर्जा मिळालेला नाही. या नियुक्ती प्रक्रियेनिमित्त ते स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता आहे. आणि आगामी लोकसभेपूर्वी आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत? (पार्टी विथ डिफरन्स) हे सांगण्यास उत्सूक भाजपला खर्गे यांना सांभाळून घेण्याची संधी दवडायची नाही. म्हणून तर भाजप सरकारने ‘हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा, सोड ना अबोला’ असा प्रेमाचा राग आळवला आहे.

आता खर्गेसुद्धा या प्रेमगीताला तेवढाच प्रेमळ प्रतिसाद देतील आणि नियुक्तीचे चऱ्हाट संपेल. तोवर २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल. पुन्हा प्रचारसभांच्या आखाड्यात कोण किती पारदर्शक, असे सामने रंगतील. या सगळ्यात लोकपालचे आकांडतांडव करणारे केजरीवाल त्याचा उच्चारही करणार नाहीत. त्याच्या अंमलबजावणीपूर्वीच यांच्या कारभाराचे धिंडवडे चव्हाट्यावर आलेले आहेत. आता तोच मुद्दा उगाळून केजरीवाल हात दाखवून अवलक्षण करणार नाहीत. जमलेच तर पारदर्शकतेच्या थडग्यावर चार फुले व दोन अश्रू ढाळायला ते नक्की येतील.

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......