भेट ‘रॉजर फेडरर’ची-माझी स्मरते, अजुन त्या दिसाची...
पडघम - क्रीडानामा
भूषण निगळे
  • रॉजर फेडरर. लेखातील छायाचित्रं - गुंजन निगळे
  • Mon , 02 July 2018
  • पडघम क्रीडानामा रॉजर फेडरर Roger Federer Tennis टेनिस

विम्बल्डन आजपासून (सोमवारपासून) सुरू होतेय. महान टेनिस खेळाडू रॉजर फेडरर त्यात सहभागी होतोय. या पार्श्वभूमीवर या खेळाडूचा खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी नुकतीच मिळालेल्या एका चाहत्याचा हा लेख.

.............................................................................................................................................

यशाच्या शिखरावर, सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्ती आणि आपलं दुहेरी नातं असतं. एकसारखं या व्यक्तींना आपण मीडियात पहात असतो आणि समाजमाध्यमांतून त्यांच्याशी जवळीक अनुभवत असतो. त्याचबरोबर या व्यक्तींचं असाधारण कौशल्य, यशामागची खडतर साधना आणि त्यांचा व्यस्तपणा, या साऱ्यामुळे या व्यक्ती अप्राप्य, आपल्या सर्वसाधारण वर्तुळाबाहेरच्या वाटू लागतात. व्यावसायिक, जागतिक क्रीडा क्षेत्रातल्या खेळाडूंबद्दल तर ही भावना प्रकर्षानं जाणवते. म्हणूनच दिवाणखान्यात आणि खिशातल्या स्मार्ट फोनवर नेहमी ‘दिसणाऱ्या’ जगप्रसिद्ध खेळाडूला चुटपुटतं जरी प्रत्यक्षपणे पाहिलं तरी ती भेट मर्मबंधात जपून ठेवण्यात क्रीडारसिकांना आनंद वाटतो.

नेमकं असंच रॉजर फेडररच्या बाबतीत माझं झालं आहे. फेडररचा मी चाहता आहे (भक्त नव्हे!). त्याच्या नजाकतदार खेळावर, विजिगिषु वृत्तीवर आणि अंगभूत शालीनतेवर मी फिदा आहे. फेडररच्या उज्वल टेनिस कारकिर्दीनं माझ्यासारख्या जगातल्या कोट्यवधी चाहत्यांना उजळून टाकणारे क्षण दिले आहेत. गेले वीस वर्षं अथकपणे (मधला काही महिन्यांचा दुखापतींमुळे आलेला खंड सोडला तर) फेडरर व्यावसायिक टेनिस खेळत आहे. मात्र फेडरर आता ३६ वर्षांचा झाला आहे. पुढील किती वर्षं तो खेळू शकेल याबद्दलची अस्वस्थता चाहत्यांना भेडसावत असते. त्यामुळे गेली दोन-तीन वर्षं कसंही करून फेडररला प्रत्यक्ष खेळताना पाहावयालाच हवं असं तीव्रपणे मला वाटू लागलं. शेवटी या वर्षीच्या ‘स्टुटगार्ट ओपन’मध्ये फेडरर परत खेळणार असं कळताच हिय्या करून अंतिम सामन्याची तिकिटं काढली.

स्टुटगार्ट ओपनच्या जेतेपदानं फेडररला नेहमी हुलकावणी दिली आहे. गेल्या वर्षी तर फेडरर पहिल्याच फेरीत बाद  झाला होता. शिवाय गेली तीन-चार महिने फेडरर स्पर्धात्मक टेनिस खेळत नव्हता. स्टुटगार्टमध्ये त्याच्यासमोर तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांची रांग असणार होती. त्यामुळे यावेळी तरी तो अंतिम फेरीत पोचेल की नाही, याची धाकधूक होती. पण माझ्या सुदैवानं समोरचे अडथळे फेडररनं पार केले आणि शेवटी मिलास राओनिश या तगड्या कॅनेडियन खेळाडूबरोबर त्याची झुंज पक्की ठरली. मोठ्या उत्साहानं आणि उत्सुकतेनं मी स्टुटगार्टला सतरा जूनला अंतिम सामन्यासाठी दाखल झालो.

स्टुटगार्टचं टेनिस कोर्ट इतर एटिपी टेनिस कोर्टपेक्षा तुलनेनं बरंच छोटं आहे. पण जर्मन समाजाचं निसर्गप्रेम आणि पर्यावरणाबद्दल असलेली दक्षता कोर्टला पाहताच कळून येते. मेट्रो स्थानकापासून कोर्टपर्यंत पायी जायचा रस्ता प्रशस्त बागेतून जातो. मुख्य कोर्टाच्या आजूबाजूला भलेमोठे वृक्ष दिमाखानं उभे होते. गेल्या काही दिवसांच्या उकाड्याची जागा आता मंद झुळूकांनी घेतली होती. शेकडो प्रेक्षकांनी प्रवेशद्वारासमोर रांग लावली होती. स्थानिक लोक तर मोठ्या प्रमाणात होतेच, पण जगभरातून फेडररचे चाहते आलेले दिसत होते. शेजारच्या स्वित्झर्लंड (फेडररचा देश)पासून ते जपान, कॅनडा ते अगदी न्यूझीलंडपासून चाहते आले होते. सुरक्षा सोपस्कार लगेच पार पडले. मुख्य कोर्टाची वाट शोधत असतानाच फेडररचा प्रतिस्पर्धी राओनिश सराव करत असताना दिसला. तिकडे वळलो.

पाहताच धडकी भरावी असं राओनिशचं व्यक्तिमत्त्व वाटलं. जवळजवळ दोन मीटर (१९६ सेंमी) एवढी उंची, सुदृढ शरीर, तगडा बांधा, नळकांड्यांप्रमाणे लांबच लांब पाय, आणि काळा शर्ट, काळी पँट आणि काळे शूज घातलेला राओनिश उत्कटतेनं सराव करत होता. एकेकाळचा उगवता तारा असलेला राओनिश गेल्या दोन वर्षांत दुखापतींमुळे बेजार झाला आहे. सध्या आपला जम पुन्हा बसवण्याचा प्रयत्न करतोय. स्टुटगार्ट ओपनमध्ये त्याला सूर गवसलेला दिसला. धडाक्यात त्यानं अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सरावात त्याची जोमदार सर्व्हिस आणि आक्रमक देहबोली पाहून आज काही फेडररची खैर नाही असं क्षणभर वाटून गेलं.

त्यामानानं फेडररचं प्रथम दर्शन एकदम साधं वाटलं. शिडशिडीत बांधा, उन्हामुळे पूर्णपणे रापून गेल्यामुळे सावळा वर्ण, वयोमानानुसार केस जरी हटत चालले तरी डोक्यावर नेहमीचा हेडबँड, अचूकतेच्या स्विस परंपरेला जागत एकदम बरोबर लांबीवर आणत घातलेले पायमोजे, आणि एकाग्रतेशिवाय कुठलाही भाव न दाखवणारा चेहरा - असा फेडरर संथ पावलं टाकत मुख्य कोर्टवर येताच प्रेक्षागारात चैतन्याची एकच लाट पसरली, आणि उत्कंठेनं आम्ही प्रेक्षक सामना सुरू होण्याची वाट पाहू लागलो.

दूरचित्रवाणीवर आणि प्रत्यक्ष टेनिस (किंबहुना कुठलाही खेळ) पाहण्यात फार मोठा फरक असतो. टीव्हीवर तुकड्या-तुकड्यानं सामन्याचं प्रक्षेपण होत असतं. जाहिरातींचा मारा सतत होत असल्यामुळे सलगतेत खंड पडतो. लढतीचा एकसंध असा अनुभव येत नाही. तसंच सामना सुरू होण्याआधीचे महत्त्वाचे उपचार - बॉलबॉयस आणि बॉलगर्ल यांचे झंझावाती- दिमाखदार आगमन, खेळाडूंची आणि सामनाधिकाऱ्यांची सुरुवातीला करून देण्यात आलेली नाट्यमय ओळख, नाणेफेक, खेळाडूंचा सुरुवातीचा वॉर्म-अप सराव - हे सहसा आपल्याला दिसत नाही. यामुळे सामन्यात आणि आपल्यात अंतर राहतं. कारण वातावरण निर्मिती अधुरी राहते. प्रत्यक्ष पाहण्यात हे सारं दिसत असल्यामुळे झटकन आपण साऱ्या अनुभवाचा घटक बनतो, आणि समोरच्या वीर-अदभुत रसात कधी विरघळून जातो, हे कळत नाही!

म्हणूनच फेडरर-राओनिश सामना फार चटकन संपला असं वाटलं (जरी प्रत्यक्षात सव्वा तासाहून जास्त खेळ चालला.) राओनिश सरासरी ताशी २००-२२० किमी या वेगानं सर्व्हिस करत होता. म्हणजेच ही सर्व्हिस परतवायला फेडररपाशी अवघे २५० मिलिसेकंद होते. (पापणी लववायला आपण सरासरी ३००-४०० मिलिसेकंद घेतो, हे ध्यानी घेतल्यास सर्व्हिसच्या वेगाची जाणीव होते.) असं असूनही फेडरर कौशल्यानं सर्व्हिस अनेकदा लीलया परतवत होता आणि परतीचे गुणसुद्धा मिळवत होता. दोघा खेळाडूंमध्ये त्या दिवशी फारसं जरी अंतर नसलं तरी निर्णायक क्षणांवर फेडररचं वर्चस्व दिसून येत होतं. अभावानेच मिळणाऱ्या या संधी काबीज करण्याचं त्याचं कौशल्य वादातीत होतं.

सामना जसजसा रंगू लागला, तसतसा आम्हां प्रेक्षकांचा जल्लोष वाढू लागला. मात्र सर्व्हिस सुरू होण्याआधी विलक्षण शांतता असायची, इतकी की आजूबाजूच्या झाडांवरती असलेल्या पक्ष्यांचे आवाज ऐकता यायचे. खेळाडूंनी सर्व्हिस केल्यावर चेंडू विलक्षण वेगानं हवा कापत जात असताना त्याचा सप्पकन येणारा आवाज, रॅकेटचा फटका बसल्यावर रप्पकन होणारा टणत्कार, जोरानं घुमणारे खेळाडूंचे हुंकार आणि गुण संपताच समेवर आल्यासारखा आमचा टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट - या साऱ्यांची विलक्षण ध्वनीयोजना आमचा अनुभव समृद्ध करत होती.

म्हणूनच सामना लांबावा (पण फेडरर जिंकावा!) असं प्रेक्षकांना वाटत होतं. सामन्यात जरी रॅली रंगल्या नाहीत, अटीतटीचे क्षण जरी फार आले नाहीत तरी दोघं खेळाडूंचं नैपुण्य दिसून आलं. फेडररचे ड्रॉपशॉट्स, बॅकहॅन्ड मारताना दिलेली फिरकी (स्पिन), आणि असे करताना चेंडूचा वेग मंदावत राओनिशला जाळ्याकडे खेचण्याची फेडररची क्लृप्ती दिसून येत होती. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे फेडररचा तो प्रसिद्ध, एकहाती ‘टेक्स्टबुक’ बॅकहॅन्ड पाहता आला. स्थिर असलेलं त्याचं डोके, चेंडूवर योग्य क्षणी रॅकेट आणण्याचं त्याचं अफलातून टायमिंग आणि नजाकतदार, तरीशक्तिशाली फटका पूर्ण केल्यावर त्याचा फॉलो-अप (एखाद्या बॅलेनर्तकीची आठवण करून देणारा), हे सारे जवळून पाहता आलं.

शेवटी टायब्रेकरवर फेडररन दुसरा सेट आणि सामना जिंकला… आणि प्रथमच त्याच्या चेहर्‍यावर हास्य उमटलं. राओनिशनं मोकळ्या मनानं केलेलं हस्तांदोलन फेडररनं स्वीकारलं. हात उंचावून आम्हा प्रेक्षकांना फेडररनं अभिवादन केलं. एव्हाना प्रेक्षगारातला प्रत्येक जण उभा राहून टाळ्या वाजवत होता. पुरस्कार वितरण सोहळा संपेपर्यंत आम्ही सारे उभेच राहिलो. सोहळ्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंनी एकमेकांबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले. दोघांनी आयोजकांचे, प्रायोजकांचे, आणि विशेषतः स्वयंसेवकांचे आणि स्टेडियमच्या कर्मचार्‍यांचे आवर्जून आभार मानले. यात सौजन्याचा केवळ भाग नव्हता, खेळाडूंची भाषणं अस्सल वाटली. (फेडररचं स्वीस उच्चार असलेलं अस्खलित जर्मन ऐकण्यात मजा वाटत होती. त्याच्या नर्मविनोदाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. आपल्या विश्रांतीची आणि येणार्‍या विम्बल्डन स्पर्धेची सांगड घालत ‘माझी रजा खूप झाली, आता मला कामावर परत जायला पाहिजे’ असं फेडररनं म्हटलं त्यावेळी प्रेक्षकांत एकच खसखस पसरली.)

सामना संपला, पुरस्कार सोहळासुद्धा आटोपला. पुढे येणार आठवडा समोर दिसत होता. उद्या फेडररला नवीन स्पर्धा सुरू करायची होती. मात्र फेडरर कोर्टवर थांबून मुलांना स्वाक्षरी देत होता, बॉलबॉयस आणि बॉलगर्लस बरोबर हस्तांदोलन करत होता. हजारो प्रेक्षक शांतपणे उभे राहून फेडररला पाहत होते, त्याला डोळ्यात साठवत होते. माझी अवस्था तर पार दोलायमान झाली होती, फेडररच्या भारक्षेत्रानं मी पूर्णपणे प्रभावित झालो होतो.

एखाद्या उत्तम जमलेल्या मैफिलीनंतर; रंगलेले, विचारप्रवण असं भाषण संपल्यावर; एखादं अभिजात, मनोवेधक शिल्प पाहिल्यावर, किंवा सर्वांगसुंदर भूप्रदेश पाहिल्यानंतर जसं भारल्यासारखं वाटतं, कोणाशीही न बोलता जाणी‍वेची साथ सोडून नेणीवेत शिरावं; आताच जे अनुभवलं त्याचं विश्लेषण, पृथ्थकरण न करता उदात्ततेनं भरून अचंबित व्हावं, असं काहीसं मला झालं. मानवी क्षमता अंगभूत मर्यादा ओलांडून किती पुढे जाऊ शकतात, शक्ती आणि कौशल्य एकत्र येऊन सौंदर्याची निर्मिती कशी होऊ शकते, हे पाहता आलं. सर्वसाधारण आयुष्याच्या पातळीवर जाणारा असा अनुभव विरळा असतो, कारण आपल्या क्षेत्रात जगात सर्वोत्तम असणारी व्यक्ती आपलं कौशल्य दाखवत असते, हे प्रसंग फार क्वचितपणे आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला मिळतात!

घरी जायचे वेध आत सर्वांना लागले होते. शेवटी फेडररनं चाहत्यांचे पुन्हा एकदा आभार मानले आणि आपलं सामान उचलून तो कोर्टबाहेर जायला निघाला. कोर्टच्या बाहेर जाणाऱ्या दरवाजात शिरत असतानाच ‘फेडरर, फेडरर’ असं एक लहान मुलगी जोरजोरात ओरडू लागली. त्या मुलीला काही फेडररची स्वाक्षरी मिळाली नव्हती. फेडरर आता परत जातोय असं दिसताच तिच्या हिरमुसलेपणाचं रूपांतर रडण्यात झालं होतं. फेडरर क्षणभर थबकला, आणि मग वळून कोर्टवर परतला. स्मितहास्य करत त्यानं त्या मुलीच्या हातातला चेंडू घेतला आणि त्यावर सही केली.

फेडरर आता मला अजूनच जवळचा वाटू लागला!!

.............................................................................................................................................

लेखक भूषण निगळे हे साहित्यात रुची असलेले संगणक अभियंता आहेत. ते जर्मनीतील Hemsbach इथं राहतात.

bhushan.nigale@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 03 July 2018

शेवटचं वाक्य एकदम समर्पक! राजू आहेच मुळी लाघवी. -गा.पै.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......