इतिहासाची भूतं हे न बदलणारं वास्तव आहे. ती प्रभावहीन करणं हाच व्यवहारी मार्ग आहे!
पडघम - सांस्कृतिक
पंकज घाटे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 07 December 2017
  • पडघम सांस्कृतिक टिपू सुलतान Tipu Sultan राणी पद्मिनी Rani Padmini ताजमहाल Taj Mahal बाबरी मशिद Babri Masjid आर्य Aryan सावरकर Savarkar

सध्या आपल्या देशात इतिहासाला चांगले दिवस नाहीत. ‘आम्ही सांगू तो इतिहास’ अशी भूतकाळावर स्वामित्व सांगणारी टिप्पणी सार्वत्रिक ऐकू येत आहे. येथील समाजमनाच्या मानगुटीवरून इतिहासाचं भूत अजून उतरलं नसल्याचा हा पुरावा समजण्यास हरकत नाही! भेदाभेद न विसरता चौदाव्या-अठराव्या शतकातील भांडणं आज हिरिरीनं लढणं हे इतिहासाच्या भुतानं येथील समाजमनाला झपाटल्याचं लक्षण आहे. आर्यांचं मूलस्थान, बाबरी मशीद–रामजन्मभूमी प्रश्न, ताजमहालची मालकी, ताजमहाल की तेजोमहालय?, टिपू सुलतानचं भारतीय इतिहासातील स्थान किंवा ‘पद्मावती’ सिनेमामुळे नुकताच उद्भवलेला वाद, ही इतिहासावर आपला हक्क सांगण्याच्या अनैतिहासिक मानसिकतेतून निर्माण झालेली वर्तमान अस्वस्थ करणारी काही उदाहरणं.

इतिहासकार हा समाजाची स्मृती जपण्याचं काम करत असतो. भारतीय मनाची जडणघडण नेमक्या कोणत्या ऐतिहासिक घडामोडींमुळे झाली आणि आधुनिक इतिहासलेखनामुळे व त्यात निर्माण झालेल्या गुण-दोषांमुळे नेमक्या कोणत्या स्मृती येथील समाजमनावर आपला प्रभाव टाकतात, हा प्रश्न आजच्या अस्वस्थ वर्तमानाचं कारण समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.     

भारतीय समाजमन ज्या ऐतिहासिक भूतकाळातून गेलं, त्याचा मोठा आक्रमक प्रभाव आजही अनुभवता येतो. आजच्या अस्वस्थ वर्तमानाची पार्श्वभूमी भारतीय समाजरचना आणि समाजमनाची गेल्या हजार वर्षांत झालेली उत्क्रांती यांत दिसते. सुरुवातीला याचा थोडक्यात आढावा घेऊ. इस्लामचा उदय झाल्यानंतर इस्लामी सैन्यानं दहा वर्षांच्या आतच अरबस्थान जिंकला. शतकभरात जवळपास सर्व अरबस्थान इस्लाममय झाला. पुढच्या सत्तर वर्षांत त्यांनी युरोपात स्पेन ते सहारा वाळवंट, असा मोठा भूप्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला. स्थापनेपासून दोनशे वर्षांच्या आतच या जिंकलेल्या प्रदेशातील सर्व धर्म आणि परंपरा नष्ट करून तिथं इस्लाम स्थापन केला. जगात इतका वेगानं विजयी होणारा आक्रमक धर्म दुसरा नाही. इस्लामच्या विजयाचा हा कार्यक्रम भारतात मात्र अपयशी ठरला. भारतात तुलनेनं थोड्या उशिरानंच इस्लामचा प्रवेश झाला. इ. स. ६३७ पासून अरबांनी सिंधवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. इ. स.  ७१२ नंतर हा प्रदेश अरबी सत्ताधीशांच्या हाती गेला. पुढची तीनशे वर्षं शांततेत गेली. इ. स. ९९८ ते १०३० या काळात गझनीच्या मुहम्मदानं भारतीयांच्या कायम स्मरणात राहणाऱ्या स्वाऱ्या केल्या.

प्रारंभीच्या या स्वाऱ्या लुटमारीच्या हेतूनं केलेल्या होत्या. हे काम सुलभ व्हावं म्हणून त्यानं पंजाबपर्यंतचा वायव्य भारताचा प्रदेश आपल्या अमलाखाली आणला. लगोलग गझनीनं तिथं धर्मांतराचा कार्यक्रम आरंभला. विशेषतः सोमनाथ मंदिराची लूट आणि विध्वंस, यामुळे ही स्वारी भारतीयांच्या कायम स्मरणात राहिली आहे. गझनीचं साम्राज्य त्याच्यामागून फार काळ टिकलं नाही. भारतीय राजांना बसलेल्या या पहिल्या तडाख्यातून त्यांनी काही धडा घेतला नाही आणि ते आपापसात संघर्ष करत बसले.

परिणामी घोरीच्या दुसऱ्या आक्रमणावेळी पहिला पराभव करूनही दुसऱ्या लढाईच्या वेळी (इ. स. ११९२) पृथ्वीराजाच्या पाठी कोणीही समर्थ राजे उभे राहिले नाहीत. महम्मद घोरीचा हा विजय भारतातील इस्लामी राजवटीची पायाभरणी करणारा ठरला. कुतुबुद्दीन ऐबकापासून गुलाम घराण्यानं विंध्य पर्वतापर्यंत आपल्या राज्याची सीमा आणून भिडवली. तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत भारतातील इस्लाम आक्रमणाची हीच सीमा होती. गुलाम घराण्याच्या अस्तानंतर खिलजी घराणं सत्तेवर आलं. अल्लाउद्दिन खिलजी आणि मलिक काफूर यांनी जवळपास सर्व हिंदू राजांचा पराभव करून तलवारीच्या बळावर दक्षिणेत इस्लाम आणला. इस्लामचा प्रसार यामुळे सुरू झाला असला तरी फारच थोडे हिंदू मुस्लिम धर्मात गेले. महंमद बीन तुघलकाच्या काळात त्यानं आपल्या राज्याची राजधानीच देवगिरीला हलवली; परिणामी इस्लामचा पाया दक्षिण भारतात पक्का झाला.

अरबांचं युरोपवरचं यशस्वी आक्रमण ते आफ्रिका जिंकण्यासाठी इस्लामनं घेतलेला वेळ (जवळपास ७०-८० वर्षं) आणि सिंध ते दक्षिण भारत जिंकून घेण्यासाठी लागलेला वेळ (जवळपास ६७० वर्षांपेक्षा जास्त) एका आक्रमक व विजयाची सवय लागलेल्या धर्माचं अपयशच सांगतो. हिंदू समाज जगातील अत्यंत मोजक्या चिवट जमातींपैकी एक आहे. हिंदूंचा धार्मिक इतिहास पहिला तर सहज दिसणारी बाब म्हणजे; बाहेरून जितका आघात होतो, तितका हिंदूंमधला कर्मठपणा वाढत जातो. धार्मिकदृष्ट्या खरं तर अनेक आक्रमणांना दिलेली ही सर्वांत निष्क्रिय प्रतिक्रिया हिंदूंना अधिक कर्मठ बनवते. या कर्मठपणामुळेच युरोप आणि आफ्रिकेत जसे इस्लामला विजय मिळाले, तसे सर्वंकष विजय भारतात मिळू शकले नाहीत. इस्लामला भारतात आल्यावर बसलेला हा धक्का आजही मुस्लिम मनात जिवंत असतो. गझनी आणि घोरीची आक्रमणं जसं हिंदू मन विसरू शकत नाही, तसा हा धक्का पचवणं मुस्लिम मनाला शक्य झालेलं नाही.

इस्लामच्या शिकवणुकीप्रमाणे सर्व जगाचे दोन स्पष्ट भाग पडतात - दार उल इस्लाम आणि दार उल हर्ब. पहिल्या भागात धर्माचं राज्य चालतं तर दुसऱ्यात अधर्माचं. दार उल हर्बचं परिवर्तन दार उल इस्लाममध्ये करणं हे प्रत्येक राज्यकर्त्याचं कर्तव्य आहे. भारतात आलेल्या प्रत्येक इस्लामी सत्ताधीशानं या दिशेनं काही प्रयत्न केले. हिंदूंची प्रचंड संख्या, शेती हा राज्याच्या उत्पन्नाचा मुख्य आधार हिंदूंच्या हाती होता. व्यापार मुख्यतः हिंदू-जैन व्यापाऱ्यांच्या हाती दीर्घकाळ राहिला. मध्ययुगाचा इतिहास तर धर्मवेडेपणानं भरलेला आहे. देवळे पाडणं, मूर्ती फोडणं, सक्तीचं धर्मांतर इत्यादी मार्ग वापरूनही भारताला इस्लामचा रंग चढू शकला नाही. ‘अनेक आक्रमणं होऊनही आम्ही टिकून राहिलो’, हे हिंदूंचं तीनेक हजार वर्षांचं ओझं आणि मुस्लिमांचं ‘आम्ही राज्यकर्ते म्हणून जे हजार वर्षं राज्य केलं ते फायदेशीर ठरलं’, हा हजारेक वर्षांच्या ओझ्याखाली दबून केलेला दावा, ही इतिहासाची भूतं बनून येथील समाजाच्या मानगुटीवर बसली आहेत.  

पंधराव्या शतकाच्या शेवटी पंजाब व दुआबात मध्यवर्ती सल्तनतीचा अंमल होता. मुख्य सुलतान दुर्बल झाल्यानंतर लगोलग सुभे स्वतंत्र होऊ लागले. दक्षिणेत शियाबहुल बहामनी राज्याचे तुकडे होऊन पाच राज्यं अस्तित्वात आली. कृष्णा आणि तुंगभद्रेच्या गाळाच्या सुपीक प्रदेशात विजयनगरचे बलिष्ठ हिंदू साम्राज्य उभं राहिलं. सहाशे ते सातशे वर्षांच्या या प्रवासात मुस्लिम हे राज्यकर्ते म्हणून भारतात प्रस्थापित झाले. राज्यकर्ते इस्लामधर्मीय असले तरी एकाच मध्यवर्ती सत्तेचं वर्चस्व सगळ्यांना मान्य नव्हतं. विशिष्ट भौगोलिक प्रदेशामुळे निर्माण झालेली प्रादेशिक राज्यं व मध्यवर्ती सत्ता यांच्यात कायम सत्तासंघर्ष चाले. दोन्हीकडे एकाच धर्माचे-इस्लामचे अनुयायी होते, ही वस्तुस्थिती ध्यानात ठेवली पाहिजे. अनेक प्रयोग करूनही इस्लामला आपली संख्या इथं वाढवता आलेली नाही. मध्ययुगापासून हा धार्मिक पराभव धार्मिक पंडितांनाही झोंबला आहे.

पारतंत्र्यात रगडलं जात असतानाही विजयनगरचं राज्य, छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंग, पहिला बाजीराव हिंदूंमध्ये निर्माण होतात. हा विलक्षण चिवटपणा धार्मिक अत्याचारांच्या काळात हिंदू समाजाला वरदान ठरलेला दिसतो. कित्येक शतकांची सातत्यपूर्णता असलेलं हिंदू मन, आक्रमक चेहरा असलेलं, परंतु भारतात इस्लामच्या पराभवाची बोच बाळगणारं मुस्लिम मन आणि या दोनही मनात असणारं आधुनिक मन यांच्यातला हा झगडा आहे. हिंदू आणि मुस्लिम या जमातींचा संबंध आला, तेव्हापासून ती दोन राष्ट्रंच होती हे गृहीतक यातूनच निर्माण झालं. मुख्यतः मध्ययुगात या मनांची जडणघडण झाल्यामुळे याच बाबी आता स्वातंत्र्यानंतर किंवा वर्तमानात अडथळा ठरलेल्या दिसतात. भारत फक्त हिंदूंचा किंवा मुस्लिमांचा देश आहे, या दोनही  भूमिका अनैतिहासिक आहेत.

प्रारंभी हिंदू हा शब्द एक भौगोलिक ओळख म्हणून वापरला जाई. चौदाव्या शतकानंतर हिंदूंनी या शब्दाचा वापर स्वतःसाठी क्वचितच केला. खूपच नंतरच्या काळात याचा धार्मिक अर्थ रूढ झाला. हिंदू म्हणवणाऱ्या व्यक्तीची स्वतःची ओळख/अस्मिता जात, पोटजात, त्याचे कुळाचार, भाषा आणि जातीमुळे करावा लागलेला व्यवसाय व त्याची कौशल्यं यामध्येच अडकलेली असते. यात भर पडते ती भारताच्या प्रचंड भौगोलिक विस्ताराची. त्याचप्रमाणे हिंदूही या प्रदेशात येणाऱ्या लोकांचा उल्लेख नेहमीच ‘मुस्लिम किंवा मुसलमान’ असा सर्रास करत नसत. त्यांचं मूलस्थान कोणतं यावर ती ओळख ठरत असे. उदाहरणार्थ अरब, अफगाण, तुर्क किंवा मुघल. यापैकी तुर्कांचा उल्लेख ‘तुरुष्क’ असा होत असे. यामुळे ते अरबांपेक्षा वेगळे आहेत हे दाखवलं जाई.

चौदाव्या-पंधराव्या शतकांत झालेल्या काही जागतिक पातळीवरील घडामोडीही आपल्याला इथं लक्षात घ्याव्या लागतील. अरब साम्राज्याचा अखेरचा अवशेष स्पॅनिश लोकांनी सन १४९२ मध्ये जिंकून पश्चिम युरोपातून अरबांचं जवळपास साडेसातशे वर्षांपेक्षा जास्त काळाचं वर्चस्व (इ. स. ७११ ते  इ. स. १४९२) संपुष्टात आणलं. याच काळात भारतात येण्याचा मार्ग आणि अमेरिका खंडाचा लागलेला शोध, यांमुळे युरोपियन देशांचा प्रवास व्यापारी सत्ता स्थापन करून त्यायोगे धर्मप्रसार करण्याकडे झाला. इ. स. १४९४च्या टॉर्डीसिलासच्या तहान्वये (Treaty of Tordesillas) पोपनं जग स्पेन आणि पोर्तुगीज यांच्यात विभागून दिलं. त्यामुळे भारतात स्पॅनिश लोक न येता, त्यांचे शेजारी पोर्तुगीज आले आणि भारताच्या किनारपट्टीवर स्थापित झाले. यानंतर भारतातील धार्मिक-राजकीय लढा हिंदू-मुसलमानांपुरता मर्यादित न राहता ख्रिस्ती सत्तांच्या आगमनामुळे तिरंगी बनला. तसंच भारतात ख्रिश्चन धर्मप्रसाराची पायाभरणी झाली.

बाबर भारतात आल्यानंतर इ. स. १५२६मध्ये इब्राहिम लोदीचा पराभव करून त्यानं दिल्लीवर सत्ता निर्माण केली. प्रारंभीच्या मुघलांना गमावलेल्या पिढीजात राज्याची ओढ वाटत असली तरी त्यांनी आपलं मुख्य लक्ष भारतात सत्ता बळकट करणं आणि तिचा विस्तार करणं यांकडे वळवलं. अकबराच्या काळात वैभवशाली मुघल साम्राज्याचा पाया रचण्यात त्याला यश आलं. जहांगीर आणि शाहजहान यांनी अकबराची महत्त्वाकांक्षा बऱ्याच अंशी सफल केली. दक्षिण भारतापर्यंत आपलं साम्राज्य स्थिर करण्याचं उरलेलं काम औरंगजेबानं राक्षसी रीतीनं पूर्ण केलं. दक्खनच्या शाह्या बुडवून आणि मराठा छत्रपती संभाजीला ठार मारून त्यानं एका अर्थानं मुघल साम्राज्याचा अंत निश्चित केला. त्यानंतर शतकभर मराठ्यांची सत्ता आणि प्रादेशिक राज्यं यांचा सत्तासंघर्ष सुरू झाला. पंधराव्या शतकात भारतात आलेल्या पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश या युरोपियन सत्तांपैकी ब्रिटिश श्रेष्ठ ठरले. मध्ययुगीन सरंजामी भारतीय सत्ताधीशांना आधुनिक अर्थकारणाची जोड असलेल्या ब्रिटिशांनी पराभूत केलं.

भारताच्या इतिहासाचा हा थोडक्यात घेतलेला आढावा ‘भारतीय मन’ मध्ययुगात कोणत्या ऐतिहासिक प्रक्रियेतून गेलं, त्याची जडणघडण कशा प्रकारे झाली हे समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. ब्रिटिश भारतातही ही प्रक्रिया आणखी वेगळ्या वळणावर गेलेली दिसते. १७ व्या व १८ व्या शतकात युरोपात विशेषतः इंग्लंडमध्ये मोठं परिवर्तन सर्वच क्षेत्रांत घडून आलं. मुख्यतः नवी शासनपद्धती, इंग्रजी शिक्षण आणि ख्रिस्ती धर्मप्रसार या तीन माध्यमांतून हा प्रबोधनाचा वारसा भारतात रुजला. भारतीय मध्यमवर्गाच्या मूल्यव्यवस्थेची आणि आधुनिक जाणिवांची जडणघडण या वैचारिक वारशावर झालेली दिसते.

या सर्व जुन्या आणि नव्या जाणिवांचा प्रभाव येथील इतिहासलेखनावर पडला. एकोणिसाव्या शतकात भारतीयांनी ‘भारतीय इतिहास’ लिहिण्याचा प्रारंभ यातूनच झाला. महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा झाल्यास बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, न्या. म. गो. रानडे, रा. गो. भांडारकर, नी. ज. कीर्तने, न्या. कृ. त्र्यं. तेलंग, विष्णुशास्त्री चिपळूणकर, वासुदेवशास्त्री खरे, राजारामशास्त्री भागवत, द. ब. पारसनीस, वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई आदींनी केलेलं इतिहासलेखन महत्त्वपूर्ण होतं.

‘एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र : मध्यमवर्गाचा उदय’ या डॉ. राजा दीक्षित यांनी लिहिलेल्या पुस्तकात इतिहासलेखनाच्या परंपरा - ज्या या काळात उदयाला आल्या त्यापाठी असलेल्या उद्दिष्टांचा आणि तत्कालीन अभिजनांचं त्यावरील सांस्कृतिक प्रभुत्व यांची चर्चा केली आहे. “सत्ताभ्रष्टांच्या वर्गाधिष्ठित मानसिकतेतून इतिहासप्रेमाचा उद्रेक झाला आणि मराठी अस्मिता जोपासणे हे महाराष्ट्रातील मध्यमवर्गाचे उद्दिष्ट बनले.” त्याच पुस्तकात पुढे इतिहास अभ्यासक डॉ. अरविंद देशपांडे यांचं “विश्लेषणाऐवजी विवेचन आणि विवेकाऐवजी अभिनिवेश हे मराठी इतिहासलेखनाचे व्यवच्छेदक घटक बनले.” हेही मत उदधृत केलं आहे.

वरील दोनही बाबी मुख्यतः महाराष्ट्रातील इतिहासलेखनाबाबत असल्या तरी भारतीय इतिहास संशोधनातील मुख्य प्रवाहांची प्रेरणा आणि त्यांचे त्यातूनच निर्माण झालेले दोष यांवर नेमका प्रकाश टाकतात. ब्रिटिश वर्चस्व आणि पाश्चात्य इतिहासलेखनाचा साम्राज्यवादी दृष्टिकोन यांच्याविरुद्ध राष्ट्रीयत्वाची भावना, ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक आव्हानाविरुद्ध ब्राह्मणी अस्मिता आणि मुस्लिमांच्या राजकीय आव्हानाविरुद्ध हिंदुत्वाभिमान या मुख्य चौकटीत राहून या काळात इतिहासाचं लेखन करण्याची परंपरा सुरू झाली. तत्कालीन उच्च मध्यमवर्गीय हितसंबंधांना पोषक असणाऱ्या या लेखनामुळे अनेक विकृती आणि मिथकांचा जन्म झाला.

आदिम काळापासून भारताचा सलगपणे स्पष्ट वृत्तान्त किंवा निरुपण मिळत नाही. त्यामुळे युरोपियनांनी लिहिलेल्या भारताच्या इतिहासावरच सध्याचं इतिहासलेखन आधारलेलं आहे. यामुळे ‘शोध’ आणि ‘पुनर्शोध’ असे शब्द वारंवार येतात.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपियन विद्वानांनी भारतीय भूतकाळ शोधण्याची जी जिज्ञासा बाळगली, तेव्हा त्यांच्या माहितीचा स्त्रोत येथील अभिजन वर्ग होता. देशाच्या विविध भागांवर सत्ता प्रस्थापित होत असताना आधुनिक काळात इतिहासलेखनाला सुरुवात झाली. भारताची चांगली माहिती झाल्यास त्यांवर अधिक ताबा ठेवता येईल आणि सत्तेच्या साम्राज्याचा पाया भक्कम होईल, या कल्पनेनं या कामास गती आली. ही माहिती देणाऱ्या वर्गाचे हितसंबंध, इतिहासकारांवरील युरोपियन इतिहासाच्या अभ्यासाचा असलेला प्रभाव, जेत्यांना येथील समाजाविषयी असलेले पूर्वग्रह आणि पारतंत्र्य जाचत असल्यामुळे प्राचीन वैभवाच्या अद्भुत वर्णनात रंगून जाण्याची भारतीय लोकांची अपरिहार्यता यांत इतिहासलेखन अडकल्यामुळे निर्माण झालेले दोष तसेच राहिले.

भारताचा अभ्यास करणाऱ्या युरोपियन विद्वानांनी भारतीय इतिहास ग्रंथांचा धांडोळा घेतला. त्यात युरोपच्या प्रबोधनाच्या परिचित कल्पनांमध्ये एकही उतरला नाही. भारतीयांचं भूतकाळाचं आकलन अथवा भारतीयांनी इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं असेल या बाबी त्यांनी गृहीत धरल्या नाहीत. युरोपात झालेल्या ऐतिहासिक स्थित्यंतराचे नियम भारतातील बदलांना लागू केल्यामुळे जी युरोपियन वैचारिक चौकट निर्माण झाली, त्यांत भारतीय इतिहास बसवण्याच्या प्रयत्नांत भारतीय इतिहासलेखकही अडकले. भारतीय साहित्याचा जो अनुवाद युरोपियन विद्वानांनी केला, त्यातही याचा प्रत्यय येतो.

उदाहरणार्थ, कामसूत्राचा अनुवाद ज्या सर रिचर्ड बर्टन यांनी केला; त्यांचं वैचारिक पोषण व्हिक्टोरियन काळाच्या मूल्यव्यवस्थेवर - नैतिकतेच्या कठोर कल्पनांवर झाल्यामुळे त्यांनी सदोष दृष्टिकोनातून या अनुवादाकडे पाहिलं. मध्ययुगातील युद्धांबाबत हिंदू-मुस्लिम हे परस्पर विरोधी समाज आहेत असं मानून फारसी साधनांमधील युद्धाच्या कारणांचा अनुवाद ‘धार्मिक युद्ध’ म्हणून इंग्रजीत करण्यात आला. यापाठी अन्य कारणांबरोबरच युरोपातील ख्रिस्ती-इस्लाम यांच्यातील धर्मयुद्धांचा संदर्भ असलेला दिसतो.

एकोणिसाव्या शतकात जेम्स मिलनं भारताच्या इतिहासाचे तीन कालखंडात वर्गीकरण केले – हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटिश काळ. राजघराण्यांच्या इतिहासावर भर असल्यामुळे अपरिहार्यपणे ती विभागणी मान्य झाली. याचंच रूपांतर नंतरच्या काळात प्राचीन युग (म्हणजे सुवर्णयुग!), मध्ययुग (म्हणजे तमोयुग!) आणि अर्वाचीन युग (म्हणजे ब्रिटिशांमुळे आधुनिक!) यांत झालं. युरोपच्या राष्ट्रवादी इतिहासमांडणीत प्राचीन काळ म्हणजे ग्रीक-रोमन संस्कृतीचा गौरवशाली काळ, मध्ययुग म्हणजे अंधारयुग आणि प्रबोधनकाळापासून आधुनिकतेचं आगमन झालं असं मानलं गेलं. भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांत हे दूषित वर्गीकरण इतकं घट्ट बसलं की, ते आजही प्रचलित आहे आणि धार्मिक राष्ट्रवादाच्या मुळाशी आहे.

परिणामी काहींच्या मते, हिंदू काळ हे भारताचं सुवर्णयुग होतं आणि मुस्लिम काळ तमोयुग होतं; तर दुसऱ्या मताप्रमाणे हा सिद्धांत उलटा केला पाहिजे. हे सिद्धांत युरोपचा इतिहास समोर ठेवून भारतीय इतिहास अभ्यासल्यामुळे निर्माण झालेले दिसतात. ‘इस्लाम खतरे में है’ ही हाक आणि ‘हिंदूंचे किंवा मुस्लिमांचे एक राष्ट्र’ हे संघर्ष याचाच पुढचा टप्पा आहेत. भारतीयांची ऐतिहासिक स्मृती (Memory) आणि अस्मिता (Consciousness) यामुळेच भूतकाळातील घटनांना वर्तमानात बदलण्याचा अट्टाहास बाळगते. उदाहरणार्थ बाबरी मशीद-रामजन्मभूमी प्रश्न.

ब्रिटिशांच्या वासाहतिक धोरणाचा भारतीय इतिहासलेखनावर मोठा प्रभाव पडला आहे. ‘भारत एक राष्ट्र नाही’ अथवा ‘हिंदू-मुस्लिम परस्परविरोधी समाज तसेच भिन्न राष्ट्रे आहेत’, असा सिद्धांत, त्यातूनच झालेला फोडा-झोडा रणनीतीचा आविष्कार, विशिष्ट प्रकारे – धार्मिक व जातीय निकषावर गणना करण्याचा प्रघात, त्यांचे त्याआधारे अल्पसंख्य आणि बहुसंख्य असं विभाजन, त्याद्वारे प्रशासनात व सार्वजनिक व्यवहारात त्यांचं महत्त्व वाढवणं, यांमुळे असे सामाजिक संबंध निर्माण झाले की, त्यांत दीर्घकाळ आणि सातत्यानं चालणारा संघर्ष अटळ बनला.

यात केवळ धार्मिकच नव्हे तर जातीय (अभिजन विरुद्ध बहुजन जाती किंवा ब्राह्मण विरुद्ध बहुजन), वर्गीय (भांडवलशाहीचे हस्तक), वांशिक (आदिद्रविड विरुद्ध आर्य), प्रादेशिकतेचे (उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत), तसेच भाषिक संघर्षाचे (तमिळ विरुद्ध संस्कृत) अनेक गडद रंग मिसळले गेले. इतिहासातील घटना-तथ्यं वर्तमानात वेठीला धरण्यात आली. दोनही बाजूंकडे दोनही बाजूंना छेद देणारे हवे तेवढे पुरावे असल्यामुळे हे सामने कधीही निर्णायक स्थितीत पोहोचले नाहीत.

भारतीयांनी भारतीय इतिहासाचा जो ‘शोध आणि पुनर्शोध’ घेतला त्यातून या उपखंडातील इतिहासलेखन समृद्ध झाले यात शंका नाही. मिलसारख्या साम्राज्यवादी इतिहासकारांचा भारताकडे पाहण्याचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन खोडून काढण्यासाठी आणि नव्याने इतिहासशोध घेण्यासाठी राष्ट्रवादी वृत्तीचे अनेक अभ्यासक, इतिहासकार पुढे आले. आपल्याकडे चांगलं इतिहासलेखन नाही. त्यामुळे भारतीयांमध्ये त्याची नव्यानं शास्त्रशुद्ध घडण होणं आवश्यक आहे, या तळमळीनं त्या काळातील एक पिढीच्या पिढी इतिहासलेखनाकडे वळली. १८५० नंतर विद्यापीठांची स्थापना झाल्यानंतर निर्माण झालेल्या अभ्यासकांच्या नव्या पिढीला या ऐतिहासिक जाणीवेचा अभाव दिसला. त्याचप्रमाणे युरोपच्या इतिहासाचे सिद्धांत बाजूला ठेवून इतिहासात घुसलेले अनेक अपसमज दूर करण्याचा प्रयत्न यांनी केला. राष्ट्रवादी इतिहासलेखन मुख्यतः खऱ्या व वैभवशाली भूतकाळाचं वास्तव दर्शन करण्याच्या हेतूनं वाटचाल करत होता.

त्यात अभिनिवेष बाळगून केलेलं लेखन आणि वस्तुनिष्ठ इतिहासलेखन असे दोन प्रवाह निर्माण झाले. हे केवळ लेखनापुरतंच मर्यादित राहिलं नाही. शास्त्रशुद्ध इतिहास लिहिण्यासाठी लागणारी ऐतिहासिक साधनं गोळा करून ती संपादित करून प्रकाशित करण्यासाठी अनेकांनी आपली सारी हयात घालवली. मराठ्यांच्या इतिहासाची साधनं गोळा करून ती प्रकाशित करणारी संशोधकांची एक मोठी रांग आपल्याला दिसते, तिच्यापाठी याच राष्ट्रवादी प्रेरणा होत्या. या मौलिक योगदानामुळे पुढील पिढीचा अभ्यासाचा मार्ग मोकळा झाला. डॉ. आर. जी. भांडारकर, वि. का. राजवाडे, सर जदुनाथ सरकार, डॉ. आर. सी. मुजुमदार, रियासतकार गो. स. सरदेसाई ही नावं विशेष उल्लेखनीय आहेत. साम्राज्यवादी इतिहासकारांचे आरोप आणि त्यांचे दूषित पूर्वग्रह खोडून काढण्याची आक्रमक आणि आव्हानात्मक भूमिका राष्ट्रवादी इतिहासकारांच्या एका प्रवाहानं घेतली.

यातील सर्वांत प्रेरणादायी ठरलेलं उदाहरण वि. दा. सावरकर यांनी लिहिलेल्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाचं आहे. आक्रमक आणि आकर्षक मांडणीमुळे अनेक पिढ्या अशा प्रकारच्या लेखनाकडे आकृष्ट झाल्या. राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे प्रादेशिक इतिहासलेखनाचा नवा प्रवाह उदयाला आला. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे भारताची प्रादेशिक संस्कृती आणि इतिहास वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे भारतीय इतिहासाची व त्याच्या लेखनाची वाटचाल प्रदेशविशिष्ट आहे.

१९५० नंतर काही नवे वैचारिक गट पुढे आले, ज्यांनी मार्क्सचा इतिहासविचार समोर ठेवून भारतीय इतिहासाची मार्क्सवादी दृष्टीनं चिकित्सा सुरू केली. श्रीपाद अमृत डांगे व रजनी पामदत्त यांनी प्रारंभी आणि दामोदर धर्मानंद कोसंबी, रामशरण शर्मा, इरफान हबीब, रोमिला थापर, बिपिनचंद्र यांनी हा इतिहासलेखनाचा प्रवाह समृद्ध केला. १९८० च्या दशकात रणजीत गुहा यांनी अंतोनिओ ग्रामची या मार्क्सवादी विचारवंताची ‘सबाल्टर्न’ संकल्पना समोर ठेवून भारतीय समाजाच्या संदर्भात त्याची मांडणी केली. यामुळे आजवर इतिहासलेखनाच्या कक्षेत न आलेला समाजाच्या उतरंडीत तळाकडे असलेला मोठा समूह, यामुळे भारतीय इतिहासलेखनाच्या जाणीवेचा एक भाग झाला. याकडे जास्त सहानुभूतीनं पाहणं लोकशाही समाजरचना दृढ होण्याच्या दृष्टीनं आवश्यक मानलं पाहिजे.

इतिहास लिहिण्याच्या आणि भूतकाळाकडे पाहण्याच्या या चौकटींचा उडत-उडत घेतलेला आढावा एकुणात वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक चौकटीच्या प्रेरणा, पुरावे हाताळण्याची पद्धत, लेखनाचे विषय, वास्तवाकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळी आहे. येथील समाजरचनाच मुख्यतः वर्ण, जात, धर्म, वर्ग, भाषा, प्रदेश यांच्या अस्मितेवर आधारलेली असल्यामुळे इतिहासलेखनात तिचा प्रवेश होणं स्वाभाविक आहे. मात्र यातून निर्माण झालेले सार्वत्रिक दोष वर्तमानात येथील समाजमन ढवळून काढताना दिसतात.

विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून भारतात आणि महाराष्ट्रात इतिहासाचा अभ्यास पुष्कळ झाला. निरनिराळ्या कालखंडातील राजकीय व सामाजिक घडामोडींच्या तपशिलांचे संशोधन आणि संकलन पुष्कळ झाले; परंतु येथील अभ्यासकांना ‘इतिहास’ या ज्ञानप्रकाराच्या मीमांसेत फारसा रस नव्हता. इतिहासाची मूलगामी तात्त्विक चर्चा करणारं महत्त्वपूर्ण लेखन अगदी मोजकं आहे. मराठीत याबाबतीत वि. का. राजवाडे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर, सदाशिव आठवले, दि. वि. काळे इत्यादी नावंच समोर येतात. त्यांचं लिखाणही जवळपास १९९०च्या आधीचं असल्यामुळे एकविसाव्या शतकात इतिहास विषयाची मूलगामी चिकित्सा करणारे ग्रंथ मराठीत नाहीत.

पारतंत्र्यात अस्मिता जागृतीसाठी इतिहासाचा वापर झाला; सोयीचे पुरावे वापरून प्रचारकी थाटाचं लिखाण करण्याची परंपराच निर्माण झाली. आधीच ठरवलेल्या आपल्या निष्कर्षाला सिद्ध करणारा पुरावा वापरणं आणि त्याविरुद्ध जाणारा नजरेआड करणं, इतिहासातील आपल्या आधीच्या पिढीची-जातीची-जमातीची चूक वर्तमानात निस्तरण्याचा फोल प्रयत्न करणं किंवा त्याच चुकीची शिक्षा तिच्या वारसांना वर्तमानात देण्याची विकृत मानसिकता, निव्वळ कल्पनेवर उभे असलेले तर्क (उदा. ताजमहाल की तेजोमहालय?), पुराव्याची मोडतोड, समग्रपणे पुराव्यांची छाननी न करता त्यातून सोयीस्कर अर्थ लावण्याचा अनभ्यस्तपणा, हिंदू-मुस्लिम संघर्षात एका पक्षाची भूमिका-बाजू घेऊन मांडणी, इतिहासात व्यक्तीचं मूल्यमापन करताना तिच्या कार्याच्या चिकित्सेपेक्षा तिच्यावर अवास्तव गुणगौरवाचं-महानायकाचं स्वरूप लादणं, समाजाला आकर्षित करणारी भूतकालीन प्रतीकं व राजकीय स्वार्थ, वर्तमानातील बाबी तत्कालीन इतिहासाला लावून केलेली मांडणी, आपण सिद्ध करतो तेच वास्तव आणि इतरांनी ते स्वीकारावं हा अट्टाहास, स्थानिक-प्रादेशिक-भारतीय इतिहास जागतिक इतिहासाचा एक भाग असल्याचं विसरून केलेलं लेखन, इत्यादी दोष निर्माण झालेले दिसतात. लोकशाही शासनप्रणालीमुळे एक गठ्ठा मतांचं आकर्षण आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यामुळे या दोषांचं रूपांतर न टाळता येणाऱ्या सामाजिक संघर्षात होतं आणि या बाबी त्याच लोकशाही मूल्यव्यवस्थेची विटंबना करण्यास हातभार लावतात.

वास्तविक पाहता, इतिहासाच्या वाटचालीचे कोणतेही नियम नाहीत. इतिहास हा स्फूर्ती घेण्यासाठी अथवा अस्मिता जागृत करण्यासाठी नाही. इतिहासाचा अभ्यास वर्तमानकाळ समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. परंतु एखाद्या समस्येवर उपाय शोधण्याचा दावा त्यातून करता येणार नाही. तसंच इतिहास आपलं भवितव्य किंवा ध्येय ठरवू शकणार नाही! प्रत्येक घटना एकेकटी येत नाही; तिच्यापाठी असलेल्या व्यापक मानवी व सामाजिक क्रियांच्या संदर्भातच ती पाहायला हवी.

पूर्वज भूतकाळाचे मालक होते; त्यांना हवा तसा तो काळ त्यांनी घडवला. आपण वर्तमानाचे धनी आहोत; भूतकाळाची ओझी आपण वाहण्याचं किंवा त्यामुळे निर्माण झालेल्या लहान-मोठ्या उद्रेकांमुळे विचलित होण्याचं कारण नाही. ज्या भारतीय ऐतिहासिक वास्तवात भारतीय मनाची जडणघडण झाली आणि त्यातून आज जी इतिहासाची भूतं निर्माण झालेली दिसत आहेत, ते एक न बदलणारं वास्तव आहे. ही भूतं गाडून टाकणं कठीण आहे; त्यांना प्रभावहीन करणं हाच जास्त व्यवहारी मार्ग सध्या आपल्यासमोर आहे!

इतिहासकार स्वतः समजतो त्यापेक्षा जास्त तो त्या काळाचे अपत्य असतो. त्याच्या काळात राहूनच त्याला भूतकाळ समोर आणावा लागतो. जुन्या इतिहासकारांचे कार्य निरुपयोगी म्हणून उडवून लावण्याऐवजी त्यांच्या काळातील अपूर्णता पुष्कळदा त्या काळाचीच होती हे मान्य करून बदलत्या विचारसरणीने त्यांच्याकडे पाहणे जास्त युक्त होईल. वास्तवाची पुनर्मांडणी करण्यापेक्षा भूतकाळ जास्त सुबोध व्हावा याकडे लक्ष केंद्रित करणे योग्य आहे. इतिहासाचा जिथे जिथे दुरुपयोग होण्याची शक्यता आहे, तिथे तो टाळला गेला पाहिजे आणि त्यासाठी भूतकाळाविषयीची जास्तीत जास्त माहिती हाती असली पाहिजे. इतिहासापासून होणारे अनर्थ चुकवण्यासाठी इतिहासाचाच उपयोग होऊ शकतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296

.............................................................................................................................................

लेखक पंकज घाटे रत्नागिरीच्या गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.

pankajghate89@gmail.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.