अजूनकाही
‘इंडिया टुडे’ या इंग्रजीतील साप्ताहिकाची सुरुवात १९७०च्या दशकात झाली. त्या दरम्यान कोलकात्यातून निघणारे ‘संडे’ साप्ताहिक आणि हिंदीमधले ‘माया’ नावाचे साप्ताहिक यांचा खपही मोठा होता. दिल्ली आणि राज्याराज्यांमधल्या राजकारणातल्या भानगडी, चर्चा, गॉसिप हा या सर्वांच्या लोकप्रियतेचा प्रमुख आधार होता. बहुतांश मजकूर त्यावरच असे. हे शक्य होई. कारण त्या वेळी बहुतांश ठिकाणी काँग्रेसची सरकारे होती, आणि काँग्रेसचा कारभार म्हणजे ‘आठशे खिडक्या आणि नऊशे दारं’ या शाहीर साबळ्यांच्या गाण्यासारखा प्रकार होता. सरकारातल्या सर्व भानगडी काँग्रेसचेच मंत्री व नेते पत्रकारांना सांगत असत. किंबहुना, मीडियामध्ये स्टोरी छापवून आणून एकमेकांचे पतंग कापण्याचा उद्योग सतत चालू असे.
आज या प्रकारच्या साप्ताहिक-पाक्षिकांचे महत्त्व नि अस्तित्व नगण्य झाले आहे. टीव्ही व सोशल मीडियाचा प्रसार झाल्याने यांचे छापील संसार विस्कटले, हे तर खरेच आहे; पण सत्तापक्षातूनच मिळणाऱ्या आतल्या बातम्या बंद झाल्याने चटकदार मजकुराचे झरे आटले आहेत, हेही एक त्यामागचे मोठे कारण आहे. कोणत्याही सरकारांमधून माहितीचा एक काही बाहेर येऊ नये, असा कडेकोट बंदोबस्त आजच्या मोदी-युगामध्ये करण्यात आला आहे. तिकडे कर्नाटकात मात्र अजूनही सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात कसे शीतयुद्ध चालू आहे, त्याच्या बातम्या मात्र पूर्वपरंपरेला साजेशा रितीने येत असतात.
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा देईपर्यंत एकाही पत्रकाराला त्याची खबर नव्हती. त्यानंतरही त्यांनी नेमका का राजीनामा दिला, याचे ठोस कारण कोणालाही सांगता आलेले नाही. तर्क बरेच आहेत व ते खरेही असतील. पण आतली ठोस माहिती कोणाकडेही नाही. राजीनामा दिल्यापासून धनखड गायब आहेत. कोणालाही पत्ता लागत नाही. १९८०चा काळ असता, तर एव्हाना त्या चटकदार साप्ताहिकांमध्ये धनखड यांची धमाकेदार मुलाखत आली असती. आज मात्र धनखड हे नाव मीडियासाठी कायमचे बाद झाले आहे आणि त्यांच्याजागी कोण येईल, हे याच मीडियाला शेवटच्या क्षणापर्यंत कळले नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
दबलेल्या बातम्या, मूक मीडिया
सध्या, दिल्लीमध्ये भाजप आणि संघ यांच्यात रस्सीखेच चालू आहे. हा लेख लिहिला जाईपर्यंत भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड झालेली नाही. जे. पी. नड्डा यांची मुदत गेल्या जूनमध्ये संपली. त्याला तेरा महिने झाले. तरीही भाजप नवीन अध्यक्ष निवडू शकलेला नाही, पण संघाचे नेमके आक्षेप काय, मोदी-शाह यांचे प्रत्युत्तर काय हे जनतेला ठाऊक नाही. कारण मीडियाला भाजपचा कडेकोट गड भेदता आलेला नाही. तसे धाडसही तो करू शकत नाही.
पण तरीही बारीकबारीक घटना फुटत राहतात. त्यावरून भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, याचा अंदाज बांधता येतो. उदाहरणार्थ, गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे जाहिराती वगळता मीडियामध्ये फारसे दिसत नाहीत. त्यांच्यासंबंधीच्या बातम्या कमी झाल्या आहेत. राहुल गांधी यांनी ‘व्होट चोरी’चे आरोप करणारी पत्रकार परिषद घेतली. एरवीचा अनुभव असा की, योगी वगैरेंसाररखे प्रमुख मुख्यमंत्री अशा वेळी लगेच राहुल यांच्यावर तुटून पडतात. हिंदी वृत्तवाहिन्या त्याला जोरदार प्रसिद्धी देतात, पण देवेंद्र फडणवीस वगळता कोणीही राज्य पातळीवरचा ठळक नेता राहुलविरोधी मोहिमेत उतरलेला नाही. (आश्चर्याची बाब म्हणजे ज्या बंगळुरू शहरातील मतदारसंघाबाबत राहुल यांनी पुरावे दिले, तिथले तथाकथित फायरब्रॅंड नेते खासदार तेजस्वी सूर्या किंवा कर्नाटकातले इतर प्रमुख भाजपचे नेतेही या सर्व आरोपांबाबत गप्प आहेत.) असो.
मुद्दा असा की, गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांपर्यंत योगींना राष्ट्रीय मीडियामध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळत होती. पण लोकसभेत भाजपचे उत्तर प्रदेशात ‘पानिपत’ झाले. समाजवादी पक्षापेक्षाही कमी जागा मिळाल्या, परिणामी योगींचा भाव घसरला. त्यांना पद सोडायला सांगणार अशी हवा तयार झाली. त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी उचल खाल्ली. पण एकूण जातीय समीकरणे लक्षात घेऊन मोदी व शाह यांनी योगींना अभय दिले. मात्र तेव्हापासून एक झाले. मोदींनंतर योगीच असा जो एक प्रचार दिल्लीतील हिंदी पत्रकारांनी सुरू केला होता, तो बंद पडला.
‘मिशन टार्गेट’ योगी
योगींचे पद गेले नसले तरी त्यांच्याविरुद्धचा असंतोष जागृत राहील अशी व्यवस्था झालेली आहे. उत्तर प्रदेशात योगींचा करिश्मा आहे, असे भासवले जात असले, तरी अनेक जातींच्या संघटना व छोटे पक्ष यांचा टेकू त्यांना लाभलेला आहे. त्यातला एक महत्त्वाचा पक्ष आहे ‘अपना दल’. उत्तर प्रदेशातील ठाकूर व यादव यांच्या खालोखाल तुल्यबळ समाज आहे, कुर्मी अपना दल हा कुर्मीचा पक्ष आहे. त्याच्या नेत्या अनुप्रिया पटेल केंद्रात मंत्री आहेत व अमित शाह यांच्या विश्वासू मानल्या जातात. त्यांचे पती आशिष पटेल योगींच्या सरकारात मंत्री आहेत. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या पराभवानंतर अनुप्रिया पटेल यांनी मागास जातींना पुरेसे स्थान मिळत नसल्याची जाहीर तक्रार केली होती. त्यांचा पक्ष कायमच योगींना टोकत असतो. गेल्या महिन्यात मंत्री आशिष पटेल यांनी आपल्याच सरकारवर हल्ला चढवला. राज्य सरकारच्या माहिती खात्याचे १७०० कोटी रुपयांचे बजेट मीडियाला खरेदी करण्यासाठी खर्ची पडले आहे व या मीडियामार्फत सतत अपना दलाच्या विरोधातल्या बातम्या दिल्या जात असतात, असा आरोप त्यांनी केला. त्यांचा रोख अर्थातच योगींवर होता.
याच योगींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला याही सतत बंडखोरी करत असतात. गेल्या महिन्यात भाजप कार्यकर्त्यांवर अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल झाल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात त्यांनी दोनदा धरणे आंदोलन केले. आपल्याच सरकारच्या पोलिसांविरुद्ध कित्येक तास त्यांचे आंदोलन चालू होते.
मोदींनंतर त्यांची जागा घेण्याचे स्वप्न जे नेते पाहत आहेत, त्यात योगी प्रमुख आहेत. त्यांच्या फुग्याला कशी टाचणी लावता येऊ शकते, याचा जाहीर ‘डेमो’ अशा घटनांमधून दिला जात असतो. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मूक पाठराखण असल्याखेरीज असे प्रकार होऊ शकत नाहीत, हे कोणालाही कळेल. योगींचे पाय कापण्याच्या या राजकारणाची एरवी प्रचंड चर्चा झाली असती, पण भाजपच्या राजवटीत ती होत नाही. सध्याच्या कडेकोट राजवटीतून बाहेर अशी जेव्हा नुसती चुणूक दाखवली जाते, तेव्हा आतमध्ये बरेच काही घडत असणार हे उघड आहे.
दुबे बोले, संघ लागे
सप्टेंबरच्या १७ तारखेला मोदी वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांनी यापूर्वी वयाचा दाखला देऊन लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी, व्यंकय्या नायडू यांना निवृत्त केले, मग आता ते स्वतः तोच नियम स्वतःला लावणार का, असा प्रश्न गेले काही महिने चर्चेत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आडवळणाने त्याचा उल्लेख केला आहे. भागवत आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांना मोदी का डोईजड झाले आहेत, याची बरीच कारणे आहेत. पण त्याचा सारांश असा आहे की, ते भयंकर उपयुक्त वगैरे असले तरी संघाच्या अंकुशाच्या बाहेर गेले आहेत. खालच्या स्तरावर संघाच्या स्वयंसेवकांना एकीकडे मोदीच नेते हवे असले, तरी दुसरीकडे ते खरंच निवृत्त झाले तर महान योगी, त्यागी, तत्त्वनिष्ठ अशी त्यांची पूजा करायलाही तितकेच आवडेल. संघातील ही वरिष्ठ व कनिष्ठ स्तरावरची भावना मोदींपर्यंत नक्कीच पोचली असली पाहिजे.
याला उत्तर देण्यासाठी निशिकांत दुबे यांना पुढे करण्यात आले. दुबे भाजपमधले अत्यंत वाह्यात आणि उपदव्यापी नेते आहेत. मोदी आणि शाह त्यांच्या शाब्दिक गुंडगिरीचा क्षेपणास्त्रासारखा वापर करून घेत असतात. त्यांना संसदेमध्ये मुख्यतः राहुल, सोनिया गांधी किंवा महुआ मोईत्रा अशांवर सोडले जाते. अलीकडेच त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. ‘एएनआय’ ही नावालाच वृत्तसंस्था आहे. प्रत्यक्षात ती भाजप आणि मोदींच्या चपराशासारखे काम करते. दुबे या मुलाखतीत म्हणाले की, मोदी नेतृत्वपदी नसतील तर भाजपला १५० देखील जागा मिळणार नाहीत. त्यामुळे मोदींच्या अंगात शक्ती आहे, तोवर त्यांनी नेतेपदी राहायला हवे.
हे बोलणे दुबे यांचे आहे, पण तो संदेश देणारे मोदी आहेत. संघाला व आपल्याच पक्षातल्या छुप्या असंतुष्टांना दिलेला स्पष्ट इशारा आहे. ‘व्यक्तीपेक्षा संघटना मोठी’ असे मनापासून मानणारे अनेक स्वयंसेवक आहेत. त्यांना आरंभापासून तशीच शिकवण मिळालेली असते. मोदी हेही एकेकाळी संघाचे प्रचारक होते. ते या शिकवणीपासून दूर आलेले आहेत, हे विरोधकांना व काही चिकित्सक पत्रकारांना आधीपासूनच दिसत होते, पण संघाच्या लोकांना ते बहुदा आता कळले असावे. मोदी आहेत म्हणूनच पक्ष आहे, हे दुबे नव्हे तर खुद्द मोदीच सांगत आहेत, हे स्वयंसेवकांच्याही आता लक्षात आले असेल.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
आज १९८० सालातल्यासारखा मीडिया नसल्याने दुबे यांच्या मुलाखतीची पुरेशी चर्चा व विश्लेषण झाले नाही. पण दुबेंच्या तोंडून दिल्या गेलेल्या या इशाऱ्याचा एक अर्थ असाही होतो की, मोदी हे बाहेर प्रचंड सर्वशक्तीमान व सत्ताधीश वाटत असले, तरी पक्षाच्या आत त्यांनाही दबाव जाणवेल व उत्तर द्यावे लागेल, इतपत जोर संघ नक्की लावू शकतो. मोदी यांनी तूर्तास तो झुगारला आहे, याचा अर्थ संघ स्वस्थ बसेल असे नाही. संघाचे धुरीण कधी तरी वेगळा मार्ग काढतीलच.
सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना थोडी उसंत दिली आहे. शस्त्रसंधी मीच केली असे सतत म्हणून आणि पाकिस्तानला अकारण नको इतके जवळ घेऊन त्यांनी मोदींना सहानुभूती मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. थोडक्यात, मोदींना हिरो होण्याची संधी दिली आहे. अमेरिकेसोबतचे संबंध ताणले गेले असताना मोदींच्या निवृत्तीचा प्रश्न संघात व पक्षात कोणी काढणार नाही. दिल्लीत झालेल्या संघ-मंथनात याचा परिणाम लगोलग दिसून आला. स्वयंसेवकांना हवे तोवर मी पदावर राहणार, मोदींना सांगण्याचा प्रश्नच नाही, असे म्हणून सरसंघचालक भागवतांनी तूर्तास निवृत्तीचा विषय दोन्ही बाजूनी संपवला आहे.
ताजा कलम - हा लेख लिहीत असतानाच १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून मोदींनी भाषण केले. त्यात त्यांनी शंभर वर्षे पूर्ण झालेल्या संघाचा ‘राष्ट्र निर्माण करणारी एनजीओ’ असे म्हणून गौरव केला. गेल्या दहा वर्षांत कोणत्याही प्रकारे संघाला महत्त्व न देणाऱ्या मोदींची ही हालचाल गमतीशीर आहे. ती आक्षेपार्ह आहेच. विरोधक त्यावर तुटून पडत आरएसएस नामे एनजीओच्या मिळकतीचा आणि टोलेजंग मालमत्तेच्या हिशेब विचारणार आहेत. त्यामुळे मोदींना भाजप परिवारात ‘हिरो’ व्हायची आणखी एक संधी मिळणार आहे, पण प्रत्यक्षात त्यात संघाला मनवण्याच्या धडपडीचा अंश अधिक आहे. मोदींच्या भाजपचे यश इतकेच की, ही ‘अंदर की बात’ बाहेर येणार नाही व त्यावर चर्चाही होणार नाही.
(‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या सप्टेंबर २०२५च्या अंकातून साभार)
.................................................................................................................................................................
लेखक राजेंद्र साठे ज्येष्ठ पत्रकार, संपादक आहेत. त्यांचे ‘द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी : अनेक मृत्यू एक बळी’ हे अनुवादित पुस्तक प्रकाशित झालेले आहे.
satherajendra@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment