लिऑर झ्मिग्रॉड या संशोधिकेचे ‘आयडिऑलॉजिकल ब्रेन’ हे पुस्तक सध्या युरोप-अमेरिकेत ‘२०२५मध्ये प्रसिद्ध झालेले सगळ्यात महत्त्वाचे पुस्तक’ म्हणून गाजत आहे. ‘द गार्डियन’ आणि ‘द टेलिग्राफ’ या ख्यातनाम वर्तमानपत्रांनी ‘बेस्ट बुक ऑफ द इयर’ असा त्याचा गौरव केलाय. मानवी मेंदू आणि आयडिऑलॉजी याविषयी अतिशय मूलभूत संशोधन असलेल्या या पुस्तकाचा परिचय करून देणारा पहिला लेख २१ जुलै २०२५ रोजी ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झाला होता. हा त्याचा दुसरा भाग...
.................................................................................................................................................................
माणूस ज्या आयडिऑलॉजीच्या संपर्कात येतो, ती मानवी मन शोषून घेते आणि आपण जी आयडिऑलॉजी स्वीकारतो, तिचा आपल्या मेंदूमध्ये पेशींच्या पातळीवर निश्चित असा परिणाम होतो, हे आपण आधीच्या लेखात पाहिले. आजकाल मेंदूचे कार्य कसे चालते, हे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला ‘पाहाता’ येते. या आधीच्या काळात त्याचा अंदाज फक्त विचार करूनच करता येत असे. यातून हळूहळू रूपके वापरून मनाविषयी बोलायची पद्धत तयार झाली, असे झ्मिग्रॉड म्हणते. निश्चित काही माहिती नसली की, माणूस रूपक वापरून म्हणजे मेटॅफर्समध्ये बोलतो.
मनाबद्दलच्या अनेक रूपकांची उदाहरणे झ्मिग्रॉड आपल्याला देते. आयडिऑलॉजीजच्या आहारी गेलेल्या लोकांविषयी बोलताना वापरली जाणारी रूपके आपण पाहिली, तर आपल्या लक्षात हा मुद्दा येतो. उदा. आयडिऑलॉजीमुळे ‘हिप्नोटाईझ झालेले मन’, ‘रस्ता चुकलेले मन’, ‘खोट्या आदर्शांच्या मागे फसलेले मन’… अशी अनेक रूपके!
झ्मिग्रॉड म्हणते की, ही रूपके आपल्याला मानवी मनाबद्दल सगळं उलगडून सांगत आहेत, असा भास तयार करतात.
मोठे मोठे तत्त्वज्ञसुद्धा अशी रूपके वापरतात. इथे झ्मिग्रॉड हाना आरन्ट या तत्त्वज्ञाचे उदाहरण देते. हानाने हिटलरशाही अथपासून इतिपर्यंत पाहिली होती. माणसामध्ये एवढे क्रौर्य कसे तयार होते, याचे तिला आश्चर्य वाटत राहिले होते. तिला अडॉल्फ आईकमनबद्दल तर कमालीचे आश्चर्य वाटत होते. हा नाझींच्या स्टॉर्म ट्रूपर्स या संघटनेमध्ये अधिकारी होता. लक्षावधी ज्यूंच्या हत्येला कारणीभूत असलेला हा अधिकारी. त्याच्याविरुद्ध पुढे खटला चालला, इस्राइलने त्याला फाशी दिली. तो खटला ऐकण्यासाठी हाना उपस्थित राहिली होती. त्यानंतर तिने निष्कर्ष काढला की, आईकमनने ‘अॅब्सेंट माइन्डेडली’ ते सगळे केले, सारासार विचार करण्याची क्षमताच आईकमनकडे नव्हती.
हे उदाहरण देऊन झ्मिग्रॉड म्हणते की, ‘माइन्डलेस माइन्ड’सारखी रूपके वापरणे अत्यंत चुकीचे असते. अशी रूपके वापरल्यामुळे माणसाच्या वर्तनाला आयडिऑलॉजी कशी आणि किती जबाबदार असते, याची संपूर्ण दखल घेतली जात नाही. आयडिऑलॉजी माणसाचा संपूर्ण कॉन्शसनेस कसा बदलते, याची दखल इथे घेतली जात नाही.
आईकमनच काय पण एकंदरित सामान्य माणूससुद्धा तसा ‘थॉटलेस’, ‘माइन्डलेस’ आणि ‘सारासार विचार न करणारा’ असतो, असा हानाचा निष्कर्ष होता. कारण तिने हिटलरच्या पतनानंतर पुढे पूर्व जर्मनीचा ताबा स्टॅलिनच्या सोव्हिएत यूनियनने घेतलेला पाहिला होता. त्या काळात पूर्व जर्मनीमधील सामान्य माणसाचा प्रवास, हिटलरच्या वंशवादी हुकूमशाहीकडून स्टॅलिनच्या साम्यवादी हुकूमशाहीकडे झाला होता. थोड्याच काळात हिटलरच्या ‘आपलाच वंश श्रेष्ठ’ या तत्त्वावर आधारलेल्या नाझी ‘आयडिऑलॉजी’कडून जर्मन जनतेचा प्रवास ‘सगळी मानवी जमात समान’ या तत्त्वावर आधारलेला कम्युनिस्ट ‘आयडिऑलॉजी’कडे झाला होता.
‘वांशिक श्रेष्ठत्वा’वर विश्वास ठेवून क्रौर्य करणारे जर्मन लोक, लवकरच ‘मानवी समानते’चे तेवढेच कट्टर पाईक झाले. पूर्वी ते वांशिक श्रेष्ठत्वाच्या विरुद्ध असलेल्या लोकांच्या हत्या मान्य करत होते, आता ते मानवी समानतेच्या विरुद्ध असलेल्या लोकांच्या हत्या मान्य करू लागले. पूर्वी ते वांशिक श्रेष्ठत्वासाठी क्रौर्य करत होते, आता ते ‘मानवी समानते’साठी क्रौर्य करू लागले. हे सगळे पाहून सामान्य लोक ‘माईन्डलेस असतात, असा निष्कर्ष हानाला काढावासा वाटला. सोळाव्या शतकामधील इटालियन चाणक्य मॅकिआव्हेलीचासुद्धा हाच निष्कर्ष होता.
झ्मिग्रॉडचा याला विरोध आहे. कट्टर नाझी लोक कट्टर कम्युनिस्ट झाले हे खरे, परंतु हा बदल सोपा नव्हता, ‘माइन्डलेस’ नव्हता असे तिचे म्हणणे. ‘माइन्डलेस माइन्ड’ म्हणजे ‘फारसा विचार न करणारे मन’ ही संकल्पना झ्मिग्रॉडला मान्य नाही. मेंदू सतत विचार करत असतो. तो आयडिऑलॉजी का आणि कशा ‘शोषून’ घेतो, हा मेंदूवर संशोधन करून ठरवायचा विषय आहे, असे झ्मिग्रॉड म्हणते. रूपके वापरून वर्णन करण्याचा हा विषय नाही, असे तिचे म्हणणे आहे. मानवी मेंदू कसे काम करतो, हे नवीन तंत्रज्ञानामुळे ‘पाहणे’ शक्य असेल, तर रूपके कशाला वापरायची?
हा मुद्दा मांडून झाल्यावर झ्मिग्रॉडला आयडिऑलॉजी या संकल्पनेचा उगम आणि प्रवास कसा झाला, हे पाहणे आवश्यक वाटते. ‘आयडिऑलॉजी’ या शब्दाचा उगम कसा झाला, त्याचा मूळ उद्देश काय होता आणि पुढे त्यात काय काय बदल झाले, याचा फार सुंदर आढावा झ्मिग्रॉडने घेतला आहे.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
झ्मिग्रॉड म्हणते, आपल्याला मन, मेंदू आणि शरीर हे वेगवेगळे आहेत असे म्हणण्याची सवय असते. खरं तर, या तिन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न असतात. एकमेकांवर परिणाम करणाऱ्या असतात. मेंदू शरीरासारखाच अनेक पेशींचा बनलेला असतो. शारीरिक त्रासाचा मेंदूवर आणि विचारांवर परिणाम होत असतो. त्याच वेळी विचारांचाही मेंदूमधील पेशींवर परिणाम होत असतो. विचारांमुळे वेगवेगळी हार्मोन्स प्रसारित केली जाऊन विचारांचाही शरीरावर परिणाम होत असतो. अशा रीतीने मन, मेंदू आणि शरीर या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या प्रतलांवर एकमेकांवर परिणाम करत असतात.
यात पुढे ‘कॉन्शसनेस’चा विचार येतो. आयडिऑलॉजी कोण तयार करते असा प्रश्न समोर आला, तर आपल्याला पहिल्यांदा माणसाचा ‘कॉन्शसनेस’ असे उत्तर सुचते. म्हणजे काय? याला तीन उत्तरे आहेत-
१) आपल्या शरीरापलीकडचे अंतिम तत्त्व मानवाच्या मनात राहायला आलेला असते. हे तत्त्व म्हणजे ‘कॉन्शसनेस’ असा विचार काही धर्म मांडतात.
२) काही धर्म म्हणतात, मानवाचा ‘कॉन्शसनेस’ हा या जगातील अंतिम तत्त्वाचा अंश नसतो, तर त्या अंतिम तत्त्वाने तयार केलेला त्याच्यापेक्षा कमी प्रतीचा ‘कॉन्शसनेस’ असतो.
३) या उलट बुद्धिवादी लोक म्हणतात, मानवी मेंदूमधील बायोकेमिकल्सचे चलनवलन ‘कॉन्शसनेस’ तयार करते.
यातल्या पहिल्या दोन विचारांवर आपण श्रद्धा ठेवली की, मन, मेंदू आणि शरीर यांच्या नात्याकडे आपले दुर्लक्ष होते. या पहिल्या दोन प्रकारांत मनाबद्दलची, भावनांबद्दलची आणि आयडिऑजींबद्दलची चर्चा जास्त जास्त रूपकात्मक होत जाते. वाटते की, मन हे एक प्रकारचे भांडे आहे आणि त्यात भावना म्हणा, विचार म्हणा, आयडिऑलॉजी म्हणा धारण केल्या जातात आणि त्या पाहिजे तेव्हा बाहेरसुद्धा फेकता येतात. आपण धर्मविचार करू लागलो, तर विचार, भावना आणि आयडिऑलॉजी हे मानवी मनाचे, मेंदूचे आणि शरीराचे अविभाज्य भाग असतात, हे आपल्या फारसे लक्षात येत नाही असे झ्मिग्रॉड म्हणते.
पृथ्वीपलीकडील ‘कॉन्शसनेस’च्या संकल्पनेमुळे पहिल्या दोन प्रकारांतून जन्मलेल्या आयडिऑलॉजींना एक वेगळीच धार येते. आपल्या आयडिऑलॉजीचे देवाशी किंवा मोठ्या तत्त्वाशी नाते आहे, असे या आयडिऑलॉजीचे पाईक सांगू शकतात. आपली आयडिऑलॉजी म्हणजे निसर्गाच्या उत्क्रांतीच्या प्रेरणेचे एक रूप आहे किंवा चक्क देवाच्या इच्छेचे मूर्त रूप आहे, असे हे लोक सांगू लागतात. यासाठी कित्येक वेळा डार्विनचा उत्क्रान्तीचा सिद्धान्तसुद्धा वेठीला धरला जातो. आदर्श मानव किंवा ‘सुपरमॅन’ तयार करणे, हे उत्क्रान्तीचे उद्दिष्ट आहे आणि आपली आयडिऑलॉजी हे निसर्गाच्या त्या इच्छेचे एक रूप आहे असे वेगवेगळे नेते सांगू लागतात.
हिटलरच्या वांशिक वर्चस्ववादाचा पाया ‘सुपरमॅन’ची संकल्पना हाच होता. जर्मन वंश श्रेष्ठ आहे. तो जगाचा नेता व्हावा, ही उत्क्रान्तीची इच्छा आहे, असेच नाझीवाद सांगत राहिला. जर्मन आर्य वंश या जगाचा नेता होण्यातच जगाचे कल्याण आहे. बाकी सगळ्या वंशांचे अंतिम हित या आर्य वंशाचे सेवक होण्यातच आहे, असे सांगण्यात येत होते.
थोडक्यात, माणसाच्या व्यक्तित्वाची विभागणी आत्मा आणि शरीर अशी केली जाते. हिंदू धर्मात आत्मा ईश्वराचा अंश असतो, असे सांगितले जाते. पाश्चात्य धर्मात माणसाचा ‘सोल’ म्हणजे माणसाच्या व्यक्तित्वाचे साररूप, असे सांगितले गेले आहे. (Soul as an essence of personality). या प्रकारात देव, धर्म आणि आयडिऑलॉजी हे एकत्र येतात. माणसाला स्वतः विचार करण्यासारखे काही राहत नाही. फक्त जे सांगितलेले आहे, ते ऐकत राहायचे आणि त्याप्रकारे वागत राहायचे.
आत्मा, माणसाचे मन आणि त्याचे शरीर हे तिघे एकमेकांबरोबर कसे काम करतात हे इथे सांगितले जात नाही. रेने देकार्त या तत्त्वज्ञाने पहिल्यांदा या प्रश्नाचा विचार केला. आत्मा जडाच्या पलीकडील असेल, तर तो मेंदू आणि शरीर या जड गोष्टींवर कसे काम करतो? मन हे आत्मा आणि शरीर यांच्यामधला दुवा आहे असे मानले, तर मानवी मेंदूमध्ये नक्की कुठल्या भागामध्ये त्यांचा एकमेकांशी संपर्क होतो, असे प्रश्न देकार्तने स्वतःला विचारले. त्यासाठी त्याने मृत व्यक्तींच्या मेंदूंचा अभ्यासही केला. मन आहे, आत्मा आहे, हे सगळे मान्य! परंतु ते मेंदूमध्ये राहातात कुठे? एकमेकांशी त्यांचा संपर्क कुठे होतो? आणि, शरीर त्यांचे ऐकते म्हणजे नक्की काय करते?
देकार्त १५९६ साली जन्मला आणि १६५० साली मृत्यू पावला. म्हणजे युरोपामधील रेनेसान्सच्या काळात त्याचा जन्म झाला होता. रेनेसान्सची चळवळ म्हणजे पुनर्जागरणाची चळवळ. ग्रीक आणि रोमन तत्त्वज्ञानाच्या काळात म्हणजे, ईसपू पाचवे ते सहावे शतक ते ईस दुसरे ते तिसरे शतक या काळात, युरोपियन माणूस बुद्धी वापरून जगाविषयी निरीक्षणे नोंदवायला शिकला होता. हा जागरणाचा काळ. मधला काळ चर्चच्या धर्मवादाचा. या मधल्या काळानंतर चौदाव्या ते सोळाव्या शतकापर्यंत बुद्धीचे वर्चस्व पुन्हा एकदा स्थापन होत गेले. पुनर्जागरणाची चळवळ आकाराला आली. या काळात सगळ्या प्रश्नांचा बुद्धीच्या साहाय्याने पुन्हा एकदा विचार करण्याचा प्रघात पडला.
रेने देकार्तने प्रश्न विचाराला की, मन आणि आत्मा मेंदूमध्ये नक्की कुठे राहतात? देकार्तचा हा प्रश्न पुनर्जागरणाच्या चळवळीच्या बुद्धिवादामधून जन्माला आला होता.
देकार्तने मेंदूचा अभ्यास केला आणि त्याला दिसले की, मेंदू हा उजवा मेंदू आणि डावा मेंदू अशा दोन भागामध्ये विभागलेला असतो. फक्त ‘पिनियल ग्लॅन्ड’ हा एकच भाग विभागला गेलेला नाहिये. हेच ते मनाचे आणि आत्म्याच्या संपर्काचे स्थान असावे, असे देकार्तला वाटले. याला त्याने ‘सीट ऑफ द सोल’ असे नाव दिले. मेंदूमधले ‘आत्म्याचे सिंहासन’!
इथे आत्मा, मन आणि शरीर यांच्यातील संबधांमध्ये बुद्धीचा प्रवेश ही फार मोठी घटना मानली पाहिजे. देकार्तची भूमिका अशी होती की, माणसामधली आत्मा, मन आणि जड शरीर ही विभागणी आपण मान्य करू. परंतु आत्मा आणि शरीर एकमेकांशी संपर्क कसे करतात हे तरी बुद्धीने ठरवता येईल का? कारण ज्या अर्थी मेंदू हा शरीराचा भाग आहे, तेव्हा त्याच्याशी संपर्क साधताना आत्म्याला जडाचे काही नियम पाळावे लागत असणार. यातूनच मन ही गोष्ट मेंदूच्या चलनवलनामधूनच तयार झालेली गोष्ट आहे, हा बुद्धिवादी प्रस्ताव पुढे आला.
देकार्तचा आत्मा, मन आणि शरीर यांच्या संपर्काचा विचार सांगून झाल्यावर झ्मिग्रॉड आन्त्वान डेस्टूट द ट्रेसी (१७५४ ते १८३६) या फ्रेंच विचारवंताकडे येते.
हा देकार्तच्यापेक्षा एक पायरी पुढे गेला. देकार्तने मेंदूचा शास्त्रीय अभ्यास करून आत्मा, मन, मेंदू यांचा संपर्क कसा होतो, हे शोधण्याचा प्रयत्न केला. ट्रेसीने आयडिया या प्रकाराचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ट्रेसीने ‘आयडिऑलॉजी’ हा शब्द तयार केला. म्हणजे ‘सायन्स ऑफ आयडियाज’!
आयडिऑलॉजी हा शब्द आयडिया + लोगिया या ग्रीक शब्दांवरून तयार झाला आहे. ‘आयडिया’ या शब्दाचा ग्रीक अर्थ आहे - फॉर्म, पॅटर्न किंवा गोष्टींचे ‘दिसणे’. ‘लोगिया’ या शब्दाचा ग्रीक अर्थ आहे कार्यकारणभाव किंवा अभ्यास. (गोष्टींच्या मागचे कारण). थोडक्यात, आयडियांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे आयडिऑलॉजी! विचारांचा आणि संकल्पनांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे आयडिऑलॉजी!
ट्रेसी हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या मुक्त, बुद्धिवादी आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या विचारांच्या काळामधला विचारवंत होता. त्याला जाणवले की, एकंदरीत ज्या विचारप्रणाली त्या काळात चलनात होत्या, त्यांच्यावर दंतकथांचा आणि कट्टरतेचा फार मोठा प्रभाव आहे.
हा सगळा गुंता शास्त्रीय अभ्यास करून सोडवला पाहिजे, असे ट्रेसीला वाटले. त्यासाठी माणसाच्या मनात विचार येतात कुठून, हे ट्रेसीला शास्त्रीय अभ्यास करून शोधायचे होते. आयडिऑलॉजीचा आपण अशा शास्त्रीय प्रकारे विचार करत राहिलो तर एक सुंदरतेचे आणि उदात्ततेचे शास्त्र जन्माला येईल, असे ट्रेसीला वाटले होते.
त्याचा मुख्य विचार असा की, मानवी जीवनामधले सत्य मानवी संवेदनांमधून माणसापर्यंत पोहोचते. जगामधून माणसाला ज्या संवेदना प्राप्त होतात त्यातूनच विचार तयार होतात. म्हणजे, ट्रेसी ज्याला सत्य म्हणतो ते माणसाला येणाऱ्या अनुभवातूनच निर्माण होते. ते अनुभव घेण्यासारखे असते.
या उलट धार्मिक सत्याची संकल्पना असते. सत्य हे मानवाच्या पार्थिव जगाच्या पलीकडचे असते. उदा, ब्रह्म हे सत्य आहे. किंवा, ख्रिश्चन धर्माचे जीझस ख्राईस्टच्या व्यक्तित्वामध्ये अवतरलेले सत्य. ट्रेसीचे सत्य मानवी जगातून निर्माण होते. त्यामुळे ट्रेसीचे म्हणणे असे की, ज्या विचारांमुळे आणि ज्या आयडियाज मुळे मानवाचे कल्याण होते, ते सत्य. उदा. प्रेम हे सत्य आहे.
ट्रेसीच्या सत्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. ते अनुभवामधूनच निर्माण झालेले असते. त्यामुळे कुठल्याही अनुभवाची प्रमेये मांडता येतात, तशी त्याचीही प्रमेये मांडता येतात. ट्रेसीने अल्जिब्रामध्ये असतात तशी प्रमेये लिहून काढली.
संवेदनांमधून विचार = ज्ञान = सत्य.
त्याने या प्रमेयाचा पुढचा भाग लिहिला -
सद्गुण = आनंद = सुंदर जगण्याची इच्छा.
याच्या पुढचे प्रमेय ट्रेसीने लिहिले -
सुंदर जगण्याची इच्छा = स्वतंत्र्य = समानता = मानवता
या जगातील गोष्टी बघून म्हणजे आपल्या संवेदनांमधून विचार तयार होतात. या विचारातून ज्ञान तयार होते. ज्ञानामधून सत्य काय आहे, हे आपल्या लक्षात येते. सत्य लक्षात आले की, सद्गुण तयार होतात, सद्गुण तयार झाले की, आनंद तयार होतो आणि आनंद तयार झाल्यावर सुंदर जीवन तयार होते. सुंदर जीवन तयार व्हायचे असेल, स्वातंत्र्य, समानता आणि मानवता असायलाच लागतात, असा ट्रेसीच्या प्रमेयांचा अर्थ आहे. त्याच्या मते कुठल्याही आयडिऑलॉजीने या गोष्टी मानवाच्या आयुष्यात आणल्याच पाहिजेत.
सत्य हे माणसाला चांगुलपणाकडे नेते. प्रेम माणसाला चांगले बनवते. म्हणजे प्रेम हे सत्य आहे. त्यामुळे जी प्रेमाचे महत्त्व सांगते, तीच खरी आयडिऑलॉजी! याचाच दुसरा अर्थ असा की, जी आयडिऑलॉजी द्वेष पसरवते, जी आयडिऑलॉजी समाजामध्ये हिंसेचा दुर्गुण पसरवते, ती आयडिऑलॉजी खरी असू शकत नाही. जे ‘ज्ञान’ द्वेष आणि हिंसा पसरवते, ते ‘ज्ञान’ असू शकत नाही!
आज २०२५मध्ये झ्मिग्रॉड ट्रेसीचा विषय परत एकदा काढते आहे, कारण तिला आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ‘दिसू’ लागले आहे की, कुठल्या विचारांमुळे माणसाच्या मेंदूमध्ये कल्याणाची भावना तयार होते आहे. कुठल्या विचारांमुळे माणसाच्या मेंदूवर शांतता तयार करणारी हार्मोन्स स्रवली जातात. जे विचार, शांतता, प्रेम आणि समाधानाची हार्मोन्स तयार करतील ते खरे विचार, ते मानवी जीवनामधील सत्य विचार. बाकीचे विचार खोटे!
हे सारे मेंदूचा अभ्यास करून कसे बघता येते, हे पुढच्या लेखांमध्ये बघणार आहोत. परंतु त्याआधी आयडिऑलॉजीची संकल्पना कशी बदलत गेली, ‘सिलेक्टिवह सत्ये’ कशी धारण करत गेली, हे बघू.
ट्रेसीने एवढे नवे तत्त्वज्ञान आणल्यावर त्याबद्दल वाद होणे स्वाभाविक होते. त्याच्या आयडिऑजीच्या संकल्पनेचा पहिला संघर्ष नेपोलियनशी झाला. ट्रेसीने आपले विचार १७९६ साली प्रसिद्ध केले. सुरुवातीला नेपोलियन ट्रेसीच्या प्रेमात होता, परंतु नंतर १८००पर्यंत नेपोलियनच्या मनात सम्राट बनण्याचे विचार घोळू लागले.
ट्रेसीच्या आयडिऑलॉजीमुळे राष्ट्र हे जनतेच्या मतांप्रमाणे चालले पाहिजे, हा विचार पुढे येत चालला होता. इथे लोकांनी स्वतः विचार करायचा होता. त्यातच लोकांचे खरे कल्याण असणार होते. राष्ट्र लोकांचे असते. राष्ट्र हे कुठल्याही धर्मपीठाची किंवा कुठल्याही सत्ताधीशांची बटिक असू शकत नाही, हे ट्रेसीच्या आयडिऑलॉजीमध्ये अध्याहृत होते. कुठल्या हाडाच्या हुकुमशहाला आपल्या राज्यामधील प्रत्येक नागरिकाला आपले विचार मुक्तपणे ठरवू देणारी आयडिऑलॉजी आवडेल?
नेपोलियन म्हणू लागला की, ही सगळीच आयडिऑलॉजी अत्यंत अव्यवहार्य आहे. ट्रेसी वगैरे सगळी गँग म्हणजे पोकळ विचारवंत आहेत. सगळेच हुकूमशाहा विचारवंतांना हिणवत असतात. नेपोलियन म्हणू लागला की, या आयडिऑलॉजीमुळे समाजामधील सगळी ‘इल्यूजन्स’ निघून जातील. हा शब्द वापरताना नेपोलियनला एखाद्या राष्ट्राच्या समाजाच्या मनात असलेल्या अनेक वैभवशाली प्रतिमा अपेक्षित होत्या. आपला नेता जगातला सगळ्यात चांगला नेता आहे, आपले राष्ट्र जगातले सगळ्यात चांगले राष्ट्र आहे, आपला धर्म जगामधला सगळ्यात चांगला धर्म आहे, अशा अनेक प्रतिमा समाजमनात जिवंत असतात.
नेपोलियनचे म्हणणे असे की, या प्रतिमा खोट्या असल्यातरी समाजाला एकत्र बांधून ठेवतात. राष्ट्राला एक राष्ट्र म्हणून जिवंत ठेवतात. या प्रतिमांमुळे तर मानवी आयुष्यात आणि राष्ट्राच्या आयुष्यात ‘मॅजिक’ तयार होते. ही प्रतिमांची जादू राष्ट्राला जिवंत ठेवते. ही जादू म्हणजेच राष्ट्राच्या आयुष्यातली खरी मोहिनी! हे जग हा अत्यंत क्रूर प्रकार आहे. त्यामुळे राष्ट्रात स्थिरता हवी असेल लोकांना चांगल्या चांगल्या प्रतिमांमध्ये ‘हिप्नोटाईझ’ करून ठेवायला लागते, असे नेपोलियनचे म्हणणे होते.
खरं तर नेपोलियन राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी बोलत होता, पण त्याचे खरे लक्ष सत्तेवर होते. बोलताना तो बोलत होता की, ख्रिश्चन धर्मापेक्षा चांगली आयडिऑलॉजी कुणाला तयारच करता येणार नाही. तो म्हणत होता की, ख्रिश्चन धर्म माणसामधली सगळी द्वंद्व मिटवतो. त्यामुळे समाजात शांतता राखली जाते. हुक़ूमशाहांची सत्ता प्रतिमांवर अवलंबून असते. त्यामुळे नेपोलियन म्हणू लागला की, जे विचारवंत या प्रतिमा खोट्या आहेत हे सांगू लागतात, ते राष्ट्राचे शत्रू असतात. त्याला विचारवंतांचा फार राग येऊ लागला.
त्याचे एक वाक्य फार प्रसिद्ध आहे- ‘You don't argue with intellectuals, you shoot them.’ (‘विचारवंतांशी चर्चा करायची नसते. त्यांना गोळ्या घालायच्या असतात’.) हुकूमशाही वृत्ती असलेल्या लोकांना विचार आणि विचारवंत सहन होत नाहीत. आजसुद्धा हुकूमशाही प्रवृत्तीचे लोक विचारवंतांना गोळ्या घालताना आपण पाहतोच.
नेपोलियनला ख्रिश्चन धर्माविषयी, त्या धर्माच्या शांततेच्या आणि प्रेमाच्या संदेशाविषयी काही घेणेदेणे नव्हते. पॅरिसमधील निशस्त्र मोर्चावर रस्त्यात तोफ ठेवून नेपोलियनने तोफगोळे डागले होते. १८०४ साली त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी पोप त्याच्या मस्तकावर सम्राटपदाचा मुकुट ठेवायला आला होता. तेव्हा नेपोलियनने तो मुकुट पोपला आपल्या मस्तकावर ठेवू दिला नव्हता. त्याने तो आपल्या हातानेच आपल्या मस्तकावर ठेवला होता. माझी सत्ता माझी आहे, फ्रेंच लोकांची आहे, ख्रिश्चन धर्माने ती मला दिलेली नाही, असेच त्याला सुचवायचे होते.
त्याला ख्रिश्चन धर्माचा पुळका फक्त ट्रेसीच्या व्यक्तिवादाला विरोध करण्यासाठी आला होता. आजच्या जमान्यातल्या हुकूमशाहांना आपापल्या धर्माचा आणि राष्ट्रवादाचा पुळका फक्त लोकशाहीला आणि व्यक्तिवादाला ठोकून काढण्यापुरता येत असतो, हे आपल्याला अगदी सहज पाहायला मिळेल. पैशाचे राजकारण करताना या लोकांना धर्म आठवत नाही आणि राष्ट्राचे हितसुद्धा आठवत नाही.
नेपोलियन किंवा आजच्या हुकूमशहांकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की, मानवाची तशी फारशी प्रगती होतच नसते. या जगात त्याच त्याच इतिहासाची आवर्तने परत परत घडत राहिलेली आपल्याला दिसत राहतात.
नेपोलियनच्या या विचारविरोधी वृत्तीवर मादाम द स्टील या लेखिकेने टीका केली. ती म्हणाली नेपोलियनला ‘आयडिओफोबिया’ आहे. म्हणजे विचारांची, चर्चेची आयडिऑलॉजीची आणि मुख्य म्हणजे लॉजिकची भीती! त्यावर नेपोलियनने मादाम द स्टीलला तडीपार केले. आजसुद्धा आपल्या जगातल्या अनेक नेत्यांना विचार, चर्चा आणि लॉजिकची भीती वाटत असलेली आपल्याला दिसून येईल.
नेपोलियनच्या विरोधामुळे ट्रेसीची ‘आयडिऑलॉजी’ फ्रान्समध्ये बाजूला पडली. अमेरिकेचे तिसरे अध्यक्ष थॉमस जेफर्सन हे ट्रेसीचे मित्र होते. त्यांनी ट्रेसीची आयडिऑलॉजी अमेरिकेत नेली. अमेरिकेसारख्या व्यक्तिवादी देशातसुद्धा ट्रेसीच्या आयडिऑलॉजीला विरोध झाला. अमेरिकेचे राजकारण तेव्हा वंशवादात आणि राष्ट्रवादात गुरफटलेले होते. खरे तर अमेरिका पहिल्यापासून व्यक्तिवादाचे गोडवे गात आली आहे. परंतु तिलासुद्धा त्या काळी ट्रेसीचा विचार करणारा पराकोटीचा व्यक्तिवाद सहन झाला नाही.
अमेरिकेतून निराश होऊन ट्रेसीची आयडिऑलॉजी युरोपात परत आली, तेव्हा १८४६च्या आसपास तिला मार्क्स आणि एंगल्स या विचारवंतांचा विरोध झाला. मार्क्स आणि एंगल्स यांनी ‘आयडिऑलॉजी’ या शब्दाचा अर्थच बदलून टाकला. ‘माणसाने आपल्या समाजामधून आपल्या आत शोषून घेतलेले विचार, श्रद्धा आणि विश्वास म्हणजे आयडिऑलॉजी’, असा अर्थ त्यांनी तयार केला. आता जगामध्ये याच अर्थाने ‘आयडिऑलॉजी’ हा शब्द वापरला जातो.
मार्क्स आणि एंगल्स पुढे म्हणाले की, आयडिऑलॉजीमधील सगळे विचार, सगळ्या श्रद्धा आणि सगळे विश्वास जुलूम-जबरदस्तीने व्यक्तीवर थोपलेले असतात. समाजामधील आर्थिकदृष्ट्या सबळ लोक ज्या विचारांमुळे आपला आर्थिक फायदा होईल, ते विचार संकृती म्हणून सामान्य लोकांवर थोपत असतात. उदा. भारताचा विचार केला तर जे वरच्या वर्गाच्या हिताचे, ते खालच्या वर्गाच्या हिताचे, असे सांगितले गेले. खालच्या जातींनी वरच्या जातींची सेवा करणे, हेच त्यांच्या आणि संपूर्ण समाजाच्या हिताचे आहे, असे सांगितले गेले. तुम्ही गेल्या जन्मात चांगले वागला नाही म्हणून या जन्मात खालच्या जातीत जन्माला आलात. आता वरच्या जातींची सेवा केलीत तर पुन्हा वरच्या जातीत जन्म मिळेल.
ट्रेसीची आयडिऑलॉजी हा सत्याचा शोध होता. आता मार्क्स आणि एंगल्स म्हणू लागले की, आयडिऑलॉजी म्हणजे आर्थिकदृष्ट्या सधन वर्गाने आपल्या फायद्यासाठी पसरवलेला तद्दन खोटेपणा! इथे अन्यायच न्याय म्हणून खपवला जातो, असमानताच समाजिक स्थैर्यासाठी आवश्यक असलेली ‘व्यवस्था’ म्हणून खपवली जाते. जे वाईट आहे ते चांगले म्हणून खपवले जाते. इथे सगळे उलटे असते.
ट्रेसीच्या विचारात माणसाचा कॉन्शसनेस माणसामध्ये उपजतपणे आलेला असतो. मार्क्स आणि एंगल्स म्हणू लागले की, समाज माणसाला जे पढवेल तोच त्याचा कॉन्शसनेस! माणसाचे सगळे विचार, सगळ्या श्रद्धा, सगळे विश्वास समाजातून आणि संस्कृतीतून आलेले असतात. म्हणजे माणसाचा सगळा कॉन्शसनेसच समाजाचा आणि संस्कृतीचा बटिक असतो.
मार्क्स आणि एंगल्सच्या मते कुठलीही आयडिऑलॉजी म्हणजे एक खोटा कॉन्शसनेस असतो. Ideology can be equated with false consciousness: phantoms inhabiting the human brain. (आयडिऑलॉजी म्हणजे माणसाच्या मनावर स्वार झालेले विचारांची भूते असतात फक्त! माणसाला पढवल्या गेलेल्या विचारांची भुते!)
सामान्य माणसाला काहीच कळत नसते. या खोट्या आयडिऑलॉजी, त्याला तू कोण आहेस हे सांगतात, तुझी कर्तव्ये काय आहेत ते सांगतात. तुझ्यासाठी काय चांगले आहे ते सांगतात, तुझ्यासाठी काय वाईट आहे ते सांगतात. सगळी वैचारिक दादागिरी! माणसाला विचार करण्यासाठी काही वावच ठेवला गेलेला नसतो.
आर्थिक समानता आल्याशिवाय या सगळ्या वैचारिक भुतांपासून कुठल्याही व्यक्तीची सुटका होणार नसते, असे मार्क्स आणि एंगल्स सांगतात. त्यांनी आयडिऑलॉजी या प्रकाराला विरोध केला खरा, परंतु काही काळाने त्यांच्या समग्र विचारांनाच ‘मार्क्सवाद’नामक आयडिऑलॉजीचे स्वरूप प्राप्त झाले.
मार्क्स आणि एंगल्स यांना कळले नाही की, माणसाला आयडिऑलॉजीची इतकी गरज असते की, एक आयडिऑलॉजी नाकारताना माणूस त्याच्या नकळत दुसऱ्या आयडिऑलॉजीच्या अंगणात प्रवेश करत असतो. आयडिऑलॉजी हा प्रकार नाकारतानाच त्या विचारांचीही एक आयडिऑलॉजी बनत असते.
लवकरच आयडिऑलॉजी हा प्रकार मानवाच्या अभ्यासाचा विषय झाला. यात जीवनाबद्दलचे सत्य आपल्या हाताला लागेल की नाही, याबद्दल काहीच सांगता येईनासे झाले. तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्रामधील कित्येक रथी-महारथींनी हा गुंता सोडवायचा प्रयत्न केला आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये हेगेल, नीत्शे आणि फ्रॉईड; आणि विसाव्या शतकामध्ये सार्त्र, काम्यू, दू बॉइज् आणि मायकेल फूको यांनी या बाबतीत डोकेफोड केली आहे. त्यांच्या मतांबाबत आपण पुढे कधीतरी चर्चा करू.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
आजच्या विषयापुरते बोलायचे तर आपल्यासमोर तीन पद्धती आहेत. एक, ट्रेसीच्या ‘व्यक्तिवादा’ची; दुसरी, नेपोलियनच्या ‘प्रतिमावादा’ची आणि तिसरी, मार्क्स आणि एंगल्स यांच्या ‘जुलूम-जबरदस्तीने थोपलेल्या आयडिऑलॉजी’ची. यातील प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी ‘इन्साईट’ प्राप्त होते. यातील प्रत्येकाकडून आपल्याला मानवी जीवनाबद्दल काहीतरी महत्त्वाचे कळून येते. जाणवते की, इल्यूजन्सविषयी बोलताना नेपोलियन कुठेतरी खरे बोलतोय, थोपलेल्या विचारांविषयी बोलताना मार्क्स आणि एंगल्स कुठेतरी खरे बोलतायत आणि व्यक्तिवादी ट्रेसी तर खरे बोलतोच आहे. आता यातले नक्की सत्य काय? हे कसे ठरवायचे?
येथे लिऑर झ्मिग्रॉड म्हणते, आपल्या हाताला निश्चितपणे लागायला हवे असेल तर आपल्याला बुद्धीच्या परिघात राहायला हवे. त्यासाठी आपण ट्रेसीच्या विस्मृतीत गेलेल्या आयडिऑलॉजीच्या संकल्पनेचे पुनरुत्थान केले पाहिजे. आपला अभ्यास, मन आणि मेंदू यांच्यापर्यंत मर्यादित ठेवला पाहिजे. मेंदूचा आणि त्याच्यावर होणाऱ्या कुठल्याही आयडिऑलॉजीच्या परिणामांचा अभ्यास आपण अत्याधुनिक तंत्रे वापरून केला पाहिजे. नुसत्या पोकळ विचारांच्या मारामाऱ्या आता बास झाल्या. शास्त्राचा आधार घेऊन ज्या आयडिऑलॉजीचा मानवी मेंदूवर चांगला परिणाम होईल, ती आयडिऑलॉजी चांगली, असे आपण म्हटले पाहिजे. याबाबत तिने केलेला अभ्यास आपण पुढच्या लेखात पाहू.
आज आयडिऑलॉजी हा मूलतः राजकीय प्रकार झालेला आहे. नेपोलियनच्या ‘इल्यूजन्स’चा फायदा आजचे हुकूमशाहा उठवताना दिसतात. मार्क्स आणि एंगल्सच्या तत्त्वज्ञानाचा फायदा समाजवादी आणि साम्यवादी उठवताना दिसतात आणि ट्रेसीच्या व्यक्तिवादाचा उपयोग लोकशाही समाजव्यवस्था बांधण्यासाठी झालेला आपल्याला दिसतो.
आजच्या सोशल मीडियाच्या काळात नेपोलियनच्या ‘इल्यूजन्स’ची धार वाढत चालेली आहे. हुकूमशाही नेतृत्वांना जगभर धार येत चालली आहे. झुंडशाही तयार करून लोकशाहीचा मूलाधार असलेल्या व्यक्तिवादाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेपोलियनच्या इल्यूजन्सबरोबरच आता साम्यवादानेही राष्ट्रवादाचा आधार घेतलेला आहे. राष्ट्र मोठे, व्यक्तीने तिचे स्वातंत्र्य राष्ट्राच्या पायावर समर्पित केले पाहिजे, अशा चर्चा सुरू केल्या गेल्या आहेत. याच्या उलट व्यक्तिवादी लोक ‘संविधान महत्त्वाचे’ असे नारे देत आहेत. संविधान लोकांच्या इच्छेने तयार झालेले असते. संविधान व्यक्तीच्या व्यक्तित्वाची आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची हमी देत असते. व्यक्ती राष्ट्रासाठी असली, तर राष्ट्रसुद्धा व्यक्तीसाठी असते, असेही विचार लोकशाहीवादी लोक परत एकदा जोमाने मांडत आहेत. यातले नक्की खरे कोण?
या पार्श्वभूमीवर लिऑर झ्मिग्रॉडने सुरू केलेली आन्त्वान ट्रेसीच्या आयडिऑलॉजीची चर्चा महत्त्वाची ठरते. आणि त्याहीपेक्षा तिने आणि तिच्यासारख्या न्यूरोसायन्टिस्ट लोकांनी सुरू केलेला अभ्यास तर अजूनच महत्त्वाचा ठरतो.
..................................................................................................................................................................
या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी पहा -
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment