लिऑर झ्मिग्रॉड या संशोधिकेचे ‘आयडिऑलॉजिकल ब्रेन’ हे पुस्तक सध्या युरोप-अमेरिकेत ‘२०२५मध्ये प्रसिद्ध झालेले सगळ्यात महत्त्वाचे पुस्तक’ म्हणून गाजत आहे. ‘द गार्डियन’ आणि ‘द टेलिग्राफ’ या ख्यातनाम वर्तमानपत्रांनी ‘बेस्ट बुक ऑफ द इयर’ असा त्याचा गौरव केलाय. मानवी मेंदू आणि आयडिऑलॉजी याविषयी अतिशय मूलभूत संशोधन असलेल्या या पुस्तकाचा परिचय करून देणारा हा पहिला लेख...
.................................................................................................................................................................
अवतीभवती विविध ‘आयडिऑलॉजीं’ची दंगल चाललेली आपल्याला दिसते. कितीतरी आयडिऑलॉजीज, कितीतरी ‘इझम्स’! धर्मनिरपेक्षतावाद, लोकशाहीवाद, उदारमतवाद, भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद, नाझीझम, फॅसिझम आणि अराजकतावाद! या शिवाय गांधीवाद, आंबेडकरवाद, लोहियावाद… आणि विविध धर्मांच्या उत्थापनासाठी सुरू झालेल्या विचारधारा…
सगळीकडे विचारांची एकच दंगल उसळलेली! प्रत्येक आयडिऑलॉजीचे अत्यंत उत्कट समर्थक, बेभान समर्थक! आपल्या आयडिऑलॉजीवरून जीव ओवाळून टाकायला तयार असलेले, आपल्या आयडिऑलॉजीसाठी दुसऱ्याचा जीव घ्यायला तयार असलेले… एखाद्या शांतताचे गोडवे गाणाऱ्या आयडिऑलॉजीवर संपूर्ण विश्वास असलेले लोक विरोधकांचे खून करायला तयार होतात. साम्यवादाच्या समर्थकांनी मोठी मोठी हत्याकांडे केली! नाझीझमने तर थेट वंशच्छेद केला!
असे काय असते या आयडिऑलॉजींमध्ये?
कुठल्याही आयडियालॉजीमध्ये आदर्श जीवनाची संकल्पना केलेली असते, विचारांचा रस्ता दाखवलेला असतो. यामधून द्वेष कसा तयार होतो? हिंसा कशी तयार होते? प्रत्येक आयडिऑलॉजी मानवी जीवनाबद्दल आपण अंतिम सत्य सांगत आहोत, असे सांगते. एवढ्या आयडिऑलॉजीज आहेत म्हणजे एवढी सगळी ‘सत्ये’ आहेत! ही सगळीच ‘सत्ये’ सत्य कशी असतील? एवढे सगळे एकमेकांच्या विरोधातले विचारांचे रस्ते आदर्श जीवनाच्या गावाला जातात? मग या रस्त्यांचे प्रवासी विरोधी दिशेने चाललेल्या रस्त्यांवरच्या प्रवाश्यांचा द्वेष का करतात, त्यांच्या हत्या का करतात?
यावर तत्त्वज्ञांनी शेकडो पाने लिहिली आहेत. पण तेसुद्धा सगळे विचारच होते! आयडिऑलॉजीवर वैयक्तिक विचारांच्या पलीकडे जाऊन मेंदूचा अभ्यास करून काही कळेल का? न्यूरॉन्सचा अभ्यास, मेंदूमधील इलेक्ट्रिक चलनवलनांचा, बायोकेमिकल्सचा अभ्यास, मेंदूच्या रचनेचा अभ्यास एकत्रितपणे यावर काही प्रकाश टाकू शकेल का?
नवनवीन साधने आणि इमेजिंगसारखी तंत्रे उपलब्ध झाल्यामुळे मेंदू काम कसे करतो, याविषयी नवनवीन माहिती उपलब्ध झाली आहे आणि होते आहे. हृदयाचा ईसीजी असतो, तसा ब्रेनचा ईईजी असतो. एमआरआय, एफएमआरआय अशी तंत्रे वापरून मेंदूमधील विविध चलनवलने ‘लाईव्ह’ बघता येतात.
मग प्रश्न असा उभा राहतो की, एखाद्या धर्मवाद्याचा मेंदू एखाद्या निधर्मीवाद्याच्या मेंदूपेक्षा किंचित वेगळा असतो का? अतिरेकी आयडिऑलॉजीच्या आहारी जाणाऱ्या व्यक्तीचा मेंदू वेगळा असतो का? त्याचे इलेक्ट्रिक चलनवलन आणि बायोकेमिकल चलनवलन मवाळ विचारसरणी असलेल्या माणसापेक्षा वेगळे असते का? याचा अभ्यास करणाऱ्यांना ‘न्यूरो-सायन्टिस्ट’ आणि ‘न्युरो-सायकॉलॉजिस्ट’ म्हणतात, तर माणसाच्या राजकीय विचार व वर्तनाचा अभ्यास करणारे ‘पोलिटिकल न्यूरो-सायन्टिस्ट’ आणि ‘पोलिटिकल न्युरो-सायकॉलॉजिस्ट’.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
लिऑर झ्मिग्रॉड यापैकीच एक. २०१५ साली तिला दोन प्रश्नांनी हैराण केले. तेव्हा इंग्लंडमधील काही मुली आपला मुक्त, प्रगत, लोकशाहीवादी आणि समानतावादी समाज सोडून इराक-सिरिया सीमेवरील आयसिस या अतिरेकी संघटनेत सामील होण्यासाठी पळून गेल्या. या मुली स्वतः होऊन गेल्या, याचा अर्थ त्या काहीतरी अजून चांगले, काहीतरी आदर्शवत् शोधत होत्या. जिथे अमानवी जीवन आहे, जिथे स्त्रीसाठी नरकसमान आयुष्य आहे, तिथे काहीतरी आदर्शवत् आहे, असं या मुलींना का वाटलं असेल? त्याच सुमारास ब्रिटनने ‘युरोपियन युनियन’मध्ये राहावे की बाहेर पडावे, यावर जनमत चाचणी झाली. त्यात राष्ट्रवादी लोकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केले, तर सहकार्यावरच देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो, असा विचार करणाऱ्यांनी बाहेर न पडण्याच्या बाजूने मतदान केले.
आर्थिक स्थिरतेपेक्षा राष्ट्रवादाला महत्त्व देणाऱ्या लोकांचा आणि आर्थिक स्थिरतेमध्ये राष्ट्राचे हित बघणाऱ्या लोकांचा झ्मिग्रॉडने अभ्यास केला. पुढे ‘अतिरेकी राष्ट्रवाद’, ‘अतिरेकी समाजवाद’, ‘अतिरेकी लोकशाहीवाद’ यांच्या समर्थकांचाही तिने न्युरोसायकॉलॉजीच्या अंगाने अभ्यास केला.
तेव्हा तिच्या लक्षात आले की, मूळ प्रश्न आपल्या मतांबद्दल कट्टर (‘डॉग्मॅटिक’) आणि दुराग्रही असण्याचा आहे. कुठलाही सबळ पुरावा नसताना एखादी आयडिऑलॉजी संपूर्ण सत्य प्रतीत करते आहे, यावर विश्वास ठेवण्याचा आहे. एखादी आयडिऑलॉजी आदर्श जीवन तयार करेल, तिच्याकडे समाजापुढच्या सगळ्या प्रश्नांची संपूर्ण आणि समग्र उत्तरे आहेत, यावर प्रगाढ विश्वास असण्याचा आहे.
काही लोक कट्टर असतात, तर काही लोक कुठल्याही प्रश्नाचा खुल्या मनाने विचार करतात. या दोन प्रकारच्या लोकांच्या मेंदूमध्ये नक्की काय फरक असतो, यावर झ्मिग्रॉड संशोधन करत राहिली.
नुकतेच तिचे ‘आयडियालॉजिकल ब्रेन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ‘द गार्डियन’ आणि ‘द टेलिग्राफ’ या वर्तमानपत्रांनी ‘बेस्ट बुक ऑफ द इयर’ हा पुरस्कार या पुस्तकाला दिलाय. हा पुरस्कार देताना त्यांनी म्हटले आहे- “आजकालच्या ध्रुवीकरणाच्या जमान्यात, हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरते”. २०२५मध्ये प्रसिद्ध झालेले सगळ्यात महत्त्वाचे पुस्तक, अशी या पुस्तकाची ख्याती झाली आहे.
वयोमानाप्रमाणे आपल्या वाचनाचा परीघ वाढत गेला की, नंतर एखादे पुस्तक वाचून ‘काहीतरी नवीन मिळाले आहे’, असा अनुभव दुर्मीळ होत जातो. पुढे पुढे तर मानवी आयुष्याविषयी मूलभूत असे काही अपवादानेच मिळू लागते. अशा अवस्थेत ‘आयडिऑलॉजिकल ब्रेन’सारखे अतिशय मूलभूत संशोधन असलेले पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे.
लिऑर झ्मिग्रॉड वयाने लहान म्हणजे जेमतेम तिशीची आहे, परंतु तिचा आवाका आणि समज खूप मोठी आहे. आयडिऑलॉजीसारखा विलक्षण गुंतागुंतीचा विषय या लेखिकेने न्युरॉलॉजी, सायकॉलॉजी आणि फिलॉसॉफी या तीन अंगांनी लीलया हाताळला आहे.
आयडिऑलॉजीज कळतनकळत आपले आयुष्य, व्यक्तिमत्त्व, विचारशक्ती गिळंकृत करून टाकतात. त्याचबरोबर आयडिऑलॉजी कुठलीही असली, तरी हळूहळू राजकीय रंग पकडत जाते. माणसाचे जीवन कितीही नाही म्हटले तरी राजकीय रंग पकडतेच. झ्मिग्रॉडने तिच्या पुस्तकाच्या सुरुवातीला पोलंडची कवयित्री आहे विस्लावा झिंबोर्स्काची एक कविता दिली आहे – ‘चिल्ड्रन ऑफ अवर एज’.
“संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर,
जे जे काही घडते आयुष्यात
तुमच्या, आपल्या, त्यांच्या…
असतात त्या घटना राजकीयच…
असते त्यांच्यावर छाया राजकारणाची
या ना त्या प्रकारे
तुम्हाला आवडो अथवा न आवडो,
तुमच्या डीएनएला असतो राजकीय भूतकाळ
तुमची कातडी असते राजकीय साच्यात सांधलेली,
तुमच्या डोळ्यांवर आलेली असते राजकीय झापड…
तुम्ही जे बोलता त्याचे उठत राहतात प्रतिध्वनी,
तुमचे मौनसुद्धा बोलून जात असते खूप काही,
तुम्ही बोललात काय किंवा राखले जरी मौन तुम्ही,
दोन्ही बाबतीत तुम्ही राजकारणच बोलत असता.”
माणूस राजकारण करण्यासाठी जन्माला आलेला प्राणी आहे का? विविध आयडिऑलॉजी जगण्यासाठी जन्मलेला प्राणी आहे का?
झ्मिग्रॉडने या पुस्तकात आयडियालॉजी माणसाच्या मेंदूवर काय परिणाम करते, आणि उलट बघायला गेलं तर माणसाच्या मेंदूची जडणघडण त्याला आवडणारी आयडियालॉजी ठरवते का, याचा शास्त्रशुद्ध मागोवा घ्यायचा प्रयत्न केला आहे.
ती म्हणते की, “माणसाचा मेंदू हे जग समजून घेण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तो सतत कुणाचे तरी होऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला जेव्हा एखादी आयडिऑलॉजी सापडते, तेव्हा त्याला अत्यंत आनंद होतो.” थोडक्यात मानवी मेंदूला आयडिऑलॉजी आवडते, कारण प्रेम, आधार आणि सहजीवनाची गरज! इथे झ्मिग्रॉड एक प्रश्न विचारते – ‘हे सारे इतके सुंदर आहे, तर नक्की घोळ कुठे सुरू होतात?’
तिच पुढे म्हणते, आयडिऑलॉजी हा मुळात भावनांवर आधारलेला प्रकार आहे. त्याचबरोबर हा भावनात्मकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत स्फोटक विषय असतो. हा विषय भावनात्मकरित्या स्फोटक का होतो, याचे सुंदर विवेचन झ्मिग्रॉडने केले आहे. तिच्या म्हणण्याचा सारांश असा -
“आपल्या अनेक श्रद्धा असतात, आपले अनेक विश्वास असतात. आपल्यामध्ये श्रद्धा असतील, विश्वास असतील, तर आपल्याला या अनिश्चित जगात निश्चित असे काहीतरी आपल्या हाताला लागले आहे, असे वाटत राहते. आपल्याला या अनिश्चित जगात आपल्या आयुष्याबद्दल खात्री वाटत राहते.
“आपल्या श्रद्धा आणि आपले विश्वास हे दोन्ही आपल्या उत्कट भावनांबद्दल सायकॉलॉजिस्टना खूप काही सांगत राहतात. आपल्या श्रद्धा आपल्याला माणसांच्या जवळ घेऊन जातात. आपल्याला माणसांच्या साथीची ऊब मिळवून देतात. श्रद्धांमुळे आणि विश्वासांमुळे एरवी परके असलेले लोक आपल्याला आपले वाटू लागतात. अशा अनेक श्रद्धा आणि विश्वास एकत्र आले की, आयडिऑलॉजी बनते. ती आपल्याला जगण्याविषयी काही ‘सत्ये’, काही नैतिक तत्त्वे सांगते. यांच्यावर विश्वास ठेवत, ही सत्ये शेअर करत आपण आपल्या समाजात जगत राहतो. किती सुंदर! आपल्या श्रद्धा धार्मिक असोत अथवा धर्मनिरपेक्ष, पुरातन असोत अथवा आधुनिक, परंपरावादी असोत अथवा प्रतिगामी, आयडिऑलॉजीज आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय, चांगले काय आणि वाईट काय, सुष्ट कोण आणि दुष्ट कोण, नैतिक काय आणि अनैतिक काय याविषयी निर्णय करण्याविषयी सक्षम करतात.”
इथवर सारे छान असते. इथून पुढे आयडिऑलॉजी सांगण्यासाठी आणि तिच्या रक्षणासाठी, तिच्या लालन-पालनासाठी सत्तापीठे, धर्मपीठे आणि अर्थपीठे उदयाला येतात. ही सत्तास्थाने आयडिऑलॉजीबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतात. या सत्तापीठांच्या ‘मार्गदर्शना’खाली आपण आदर्श समाजनिर्मितीची स्वप्ने बघू लागतो. हळूहळू ही सत्तापीठे, भविष्यात आपल्या समाजावर कोणती संकटे येऊ शकतात आणि त्यापासून बचाव व्हावा म्हणून आपण काय करायला पाहिजे, हे सांगू लागतात.
कुणी म्हणतं- ‘इस्लाम खतरे में हैं’, कुणी म्हणतं- ‘हिंदू खतरे में हैं’. कम्युनिस्ट म्हणतात - या जगामधले गरीब खतरे में हैं. कॅपिटॅलिस्ट म्हणतात- गरिबांना मोफत पैसा वाटण्याच्या तत्त्वज्ञानामुळे माणसाचा प्रयत्नवाद खतरे में हैं! कुणी हिटलर म्हणतो - आर्यवंश खतरे में पडला, तर मानववंश खतरे में पडेल. आपले राष्ट्र धोक्यात आहे, हे तर सगळेच म्हणत राहताना दिसतात.
ही सत्तापीठे आपल्या अनुयायांसाठी ‘ड्रेस कोड’ ठरवतात. भगवी टोपी घाला, भगवा गमछा ओढा, पांढरी टोपी घाला, खादी वापरा… मग ही सत्तापीठे विविध कर्मकांडे ठरवतात. यांची संचलने असतात, सभा असतात. जन्मतिथ्या-पुण्यतिथ्या, सण-समारंभ असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी कर्मकांडे धूसर असतात. त्यांना स्वतःला काही अर्थ नसतो. त्यांना दिला जाईल तो अर्थ!
हे समूहामध्ये राहून एकत्रितपणे पाळता पाळता आपण रंगून जातो. आपले व्यक्तिमत्त्व कधी एकदा या ‘कुटुंबात’ विरघळून जाईल, असे आपल्याला वाटते. आपण आपले व्यक्तित्व सामाजिक एकत्रितपणावर उधळून टाकतो. आयडिऑलॉजी जगता जगता आपण संस्कृती जगतो आहोत, असा आपल्याला वाटू लागते. हळूहळू आपली आयडिऑलॉजी म्हणजेच आपल्या देशाची संस्कृती आहे, असा भ्रम आपल्याला होतो. एवढेच काय, सगळ्या मानवी विश्वाचे कल्याण आपली आयडिऑलॉजी करणार आहे, असे आपल्याला वाटू लागते. या विश्वाचे गुरू म्हणजे आपणच!
आपण आयडिऑलॉजी आणि संस्कृती यांची आपण गल्लत करू लागतो. उदाहरणार्थ, आपण ‘हिंदुत्ववादी’ असू, तर आपण विचार करतो की, आपले विचार म्हणजेच सनातन भारताचे विचार. आपले विचार म्हणजेच आपल्या प्राचीन आणि सुसंकृत पूर्वसुरींचे विचार. या उलट, आपण ‘लोकशाहीवादी’ असू तर आपण म्हणू लागतो की, वेदांतामध्ये सांगितली गेलेली सनातन सहिष्णुता ही खऱ्या अर्थाने लोकशाही तत्त्वज्ञानामध्येच प्रतिबिंबित होते आहे. आपला कोतेपणा वापरून आपण दुसऱ्याच्या कोतेपणावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या दोघांच्याही विचारांपेक्षा भारताची संस्कृती फार फार मोठी आहे, हे आपण विसरतो.
आपल्या कोतेपणामुळे गोंधळ वाढत जातो. हा सगळा गोंधळ पुढच्या अतिप्रचंड गोंधळाची सुरुवात असते. इथे झ्मिग्रॉड गोंधळ हाताबाहेर का जातो, हे सांगू लागते. ती म्हणते - “हातामध्ये एखादी फळांची पिशवी धरावी, तशी आपण आपली आयडिऑलॉजी धारण केलेली आहे, असे आपल्याला वाटत असते. आपल्याला वाटत असते की, आपण आपल्याला वाटेल, तेव्हा आपली आयडिऑलॉजी स्वीकारू शकतो, हृदयाशी धरू शकतो किंवा नाकारूसुद्धा शकतो.”
हे सगळे इतके सहज सोपे असते? अर्थातच नाही. झ्मिग्रॉड म्हणते- “We possess beliefs, yes, but we can also become possessed by them. With the powerful measurement tools, it is now possible to see the consequences of ideological rigidity all the way down to human perception, cognition, physiology and even neural processes.”
(“आपण जेव्हा एखादी श्रद्धा किंवा एखादा विश्वास स्वीकारतो किंवा धारण करतो, तेव्हा श्रद्धेने आणि त्या विश्वासानेसुद्धा आपला ताबा घेतलेला असतो. सध्या उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करून आपल्याला सिद्ध करता येते की, आपली आयडिऑलॉजी आपल्या मेंदूमध्ये कसे आणि कोणते बदल करते. आपण जसजसे आपल्या आयडिऑलॉजीबद्दल कट्टर होत जातो, तसतसे त्या कट्टरतेचे परिणाम आपल्या आकलनशक्तीवर होत जातात, आपली जाणीव बदलत जाते, आपला मेंदू पेशींच्या पातळीवर बदलत जातो आणि अगदी या पेशींमधील जैविक आणि रासायनिक प्रक्रिया बदलत जातात.”)
आपली आयडिऑलॉजी आपल्याला बदलून टाकते? आपल्या धारणा, आपल्या अनुभूती, आपले शरीरक्रियाविज्ञान आणि आपल्या न्यूरल प्रोसेसेस हे बदलवते? आणि हे सगळे सिद्धसुद्धा करता येते? म्हणजे? आपण आपल्या आयडिऑलॉजीचे मालक राहत नाही? आपण गुलाम बनतो तिचे? एखादा दारुडा दारूचा गुलाम बनलेला आपण पाहिलेला असतो. थोड्याबहुत फरकाने तशीच गुलामी? आयडिऑलॉजीची आणि तिने आपल्यात बिंबवलेल्या जीवनपद्धतीची गुलामी? परंतु आयडिऑलॉजी आदर्श जीवन जगता यावे म्हणून असते ना?
अत्यंत धक्कादायक!!!
मानवी मेंदू अर्थासाठी इतका तहानलेला असतो की, तो कुठलीही आयडिऑलॉजी अगदी पटकन ‘शोषून’ घेतो. आयडिऑलॉजी मागील विचार, तिचे नियम, तिचे कायदेकानू, तिची कर्मकांडे - सगळे सगळे शोषले जाते. या कर्मकांडांच्या प्रत्येक आवर्तनानंतर या विचारांची सवय प्रगाढ होत जाते. रस्त्यावर गाडीच्या चाकोऱ्या पडाव्यात त्याप्रमाणे आपल्या मेंदूमधील चेतापेशींचे सिग्नल्स कसे ‘फायर’ होणार, याच्याही चाकोऱ्या तयार होतात. ‘न्यूरल पाथवेज’च्या चाकोऱ्या पडत जातात. थोडक्यात, आपली आयडिऑलॉजी आपल्या मेंदूच्या पेशींमध्ये ‘उतरून’ येते.
आयडिऑलॉजीचे हे न्यूरॉन्सच्या पातळीवर उतरून येणे, हा प्रकार आपल्या स्वतःच्या विचारक्षमतेला निष्प्रभ करून टाकतो. आपण आपले विचार करण्यासाठी अक्षम होतो. आपण कुठल्यातरी आयडिऑलॉजीच्या आहारी जाणे, हा एक फक्त सामाजिक किंवा राजकीय प्रश्न नाहीये. हा आपल्या वैयक्तिक स्वास्थ्याचा आणि आपल्या तत्त्वज्ञानात्मक प्रगतीचासुद्धा प्रश्न आहे. झ्मिग्रॉड म्हणते- “Ideologies can endanger the health of our minds and our capacities of authenticity.”
आयडिऑलॉजी आपले मानसिक आरोग्य धोक्यात घालते आणि आपली सत्यप्रियता, आपला वैचारिक प्रामाणिकपणा, आपली स्वयंभू माणुसकीसुद्धा धोक्यात आणते. आपल्या नकळत आपले व्यवहारज्ञान, सदसद्विवेक आणि समाजकुशलता निरोप घेते. आपण जास्त जास्त राजकीय होत जातो. माणुसकी आणि प्रामाणिकपणापेक्षा आपण शाब्दिक कुरघोड्यांत धन्यता मानू लागतो. समोरचा माणूस, माणूस म्हणून कसा आहे, हे बघण्यापेक्षा आपण त्याला ‘लेबले’ लावू लागतो. आपले माणसांच्या वैविध्याने भरलेले जग हा उजवा आहे, हा डावा आहे, हा प्रतिगामी आहे, हा क्रांतीवादी आहे, हा परंपरावादी आहे, हा पुरोगामी आहे, हा कारस्थानी आहे, हा जातिवादी आहे, हा वंशवादी आहे, अशा ‘लेबलां’नी भरून जाते.
इथे झ्मिग्रॉड जॉर्ज ऑरवेलचे एक वाक्य उदधृत करते- “Political language…is designed to make lies sound truthful and murder respectable, and to give an appearance of solidity to pure wind.”
राजकीय भाषा खोट्याचे खरे भासवण्यासाठीच बनलेली असते. ती अगदी खुनालासुद्धा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बनलेली असते. ती वाऱ्यालासुद्धा शरीर असते, असे म्हणायला कमी करत नाही.
सगळा भाषेचा खेळ! हा खेळ माणूस खेळत राहतो आणि मग शेवटी वैचारिक आणि भावनिक गोंधळ, दांभिकपणा, अस्मितांचा अहंकार, आत्मवंचना आणि आत्मघातकी वृत्ती, एवढेच मागे उरते. एकाने दुसऱ्याला अंधभक्त म्हणायचे आणि दुसऱ्याने पहिल्याला ‘देशद्रोही’ म्हणायचे! ‘नमोरुग्ण’, ‘नमोपीडित’, ‘गांधीगुलाम’, ‘मुस्लीमपरस्स्त’ असे काहीबाही बोलत राहायचे! झ्मिग्रॉड म्हणते की, आयडिऑलॉजी राजकीय असो अथवा धार्मिक असो अथवा वंशवादी असो; या सगळ्या आयडिऑलॉजी शेवटी माणसाला ‘गुलाम’च बनवतात.
आयडिऑलॉजी कुठलीही असो, त्यांच्या आपल्या सदस्याला ‘गुलाम’ बनवण्याच्या ‘सायकॉलॉजिकल ट्रिक्स’ एकसारख्याच असतात. दोन्ही बाजूचे फसलेले अंधभक्त माणुसकी विसरतात. एक अंधभक्त माणुसकी विसरून गोध्राचं समर्थन करतो आणि दुसरा माणुसकी विसरून १९८४ सालचे शिखांच्या शिरकाणाचं. एक ‘मॉब लिंचिंग’चं समर्थन करतो आणि दुसरा नृशंस ‘आणीबाणी’चं. एक आपल्या नेत्याच्या रोजच्या फेकूपणाकडे दुर्लक्ष करतो आणि दुसरा आपल्या नेत्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा फायदा उठवण्याकडे.
हे झाले राजकीय आयडिऑलॉजींचे, परंतु याच्याही पुढे जाऊन झ्मिग्रॉड म्हणते की, आयडिऑलॉजी कितीही सत्यप्रिय, न्यायप्रिय, नैतिक, जीवनरसाने रसरसलेली आणि सुंदर असली, तरी ती आपल्या अनुयायाचे मन आणि मेंदू बदलल्याशिवाय राहत नाही.
मेंदू चाकोरीमध्ये गेलेली माणसे विचार काय आणि कसा करणार? एकाच पद्धतीने विचार करायला शिकलेली माणसे एकमेकांशी चर्चा करू शकत नाहीत. त्यांचे ‘गुलाम’ मेंदू दुसऱ्याने मांडलेल्या योग्य मुद्द्यांनाही ‘पूर्वग्रहदूषित मत’ म्हणून उडवून लावतात. गांधीवादी लोक राष्ट्राच्या जीवनामधील अहिंसेच्या मर्यादा मान्य करत नाहीत आणि ‘एकसंध भारत’ करायला निघालेले लोक भारतीय संस्कृतीची सखोल विविधता मान्य करत नाहीत. शेवटी, या ना त्या प्रकारे वैचारिक का होईना हिंसाचार सुरू होतो.
हळूहळू ‘फ्रस्ट्रेट’ झालेल्या आयडिऑलॉजीज समाजात ‘रॅडिकल’ म्हणजे मूलभूत बदल झाले पाहिजेत असे म्हणू लागतात. यातून अनेक विरोधाभास उभे राहतात. इथे झ्मिग्रॉड म्हणते- “Guns are lifted in the name of life. Slogans of peace are used to camouflage regressive violence. Terrorism can hijack the fight for freedom and demands for freedom appear terrorizing”.
जीवनाच्या संरक्षणासाठी बंदुका उचलल्या जातात, शांततेच्या घोषणा प्रतिगामी लोकांचा हिंसाचार लपवण्यासाठी दिल्या जातात, स्वातंत्र्याच्या नावाखाली आतंकवादाचा आसरा घेतला जातो आणि स्वातंत्र्याच्या मागण्या हिंसक आणि भीतीदायक रूपे धारण करताना दिसतात. प्रत्येक आयडिऑलॉजी मानवी जीवनातले ‘सत्य’ सांगता सांगता, खोटेपणा करू लागते. स्वातंत्र्याची भाषा करता करता आपल्या अनुयायांना गुलाम बनवून टाकते. ही मानवाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.
मग आपण काय करायचे? आयडिऑलॉजीज तर राहणार. माणूस त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. या सगळ्या गोंधळात कुठली आयडिऑलॉजी चांगली आणि कुठली आपायकारक हे कसे ठरवायचे? एखाद्या आयडिऑलॉजीचा समाजावर चांगला परिणाम होतो आहे की नाही, हे पाहून ती कशी आहे, हे ठरवणे अवघड जाते. एखादी आयडिऑलॉजी कशी आहे, हे ठरवायला किती शतके वाट पाहायची?
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
इथे झ्मिग्रॉड एक प्रस्ताव देते. ती म्हणते, एखाद्या आयडिऑलॉजीचा तिच्या अनुयायांवर काय परिणाम होतो आहे हे बघून ती कशी आहे, हे ठरवायला हवे.
एखाद्या आयडिऑलॉजीचा तिच्या उत्कट अनुयायांवर काय परिणाम होतो आहे, हे बघायलाच पाहिजे. त्यांचा मेंदू कसा बदलतो आहे, त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो आहे, हे बघायला पाहिजे. त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्यावर आणि लवचीकतेवर काय परिणाम होतो आहे, हे बघायला पाहिजे. हे अनुयायी वैचारिक बंधनांमध्ये जखडले जात आहेत का, त्यांच्या प्रतिक्रिया जास्त जास्त विचारहीन होत चालल्या आहेत का, ते जास्त जास्त हिंसाचाराकडे ओढले जात आहेत का, हेही पाहिले पाहिजे. झ्मिग्रॉड म्हणते, या निकषांचा विचार करण्याची वेळ आली आहे. तिचे म्हणणे असे की, मेंदूचे परिशीलन आता शक्य झाले आहे. तेव्हा आपले आदर्श, आपली प्रतीके आणि आपल्या आदर्श जीवनाच्या संकल्पना, यांबाबत पुनर्विचार व्हायला पाहिजे.
मानवी मेंदूचा हा अभ्यास अत्यंत उच्च दर्जाचे विश्लेषण आपल्याला उपलब्ध करून देतो आहे. झ्मिग्रॉड शेवटी म्हणते - “एखाद्या कोत्या आयडिऑलॉजीचे आपण जर अगदी उत्कट असे अनुयायी झालो, तर तो कोतेपणा आपल्या न्यूरॉन्समध्ये उतरतो. तिथून तो (हार्मोन्सद्वारा) आपल्या शरीरात उतरतो. आयडिऑलॉजी म्हणजे आपल्या भोवतीचे कोष नसतात. त्या आपल्या कातडीच्या आत उतरून येतात, आपल्या कवट्यांच्या आत घुसतात, आपल्या न्यूरॉन्समध्येसुद्धा घुसतात… आयडिऑलॉजजींचे पडसाद आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मेंदूमधील बायोकेमिकल चलनवलनामध्ये कसे उमटतात हे आता विज्ञानाद्वारे कळू लागले आहे. विविध आयडिऑलॉजीज आपल्या मेंदूचा ताबा आपल्या नकळत आणि अत्यंत घातक पद्धतींनी घेत असतात.”
आयडिऑलॉजींमुळे विचार, भावना आणि शरीर असा एकच गोंधळ उडतो. कोत्या आयडिऑलॉजींच्या घावांमुळे नुसते विचारच नाही, तर विचार करायची पद्धतदेखील बिघडत जाते. नुसते विचारांचेच नाहीत, विचारप्रक्रियेचेसुद्धा टवके उडतात. आणि याही पुढची गोष्ट म्हणजे आपला मेंदू इलेक्ट्रिकली आणि बायोकेमिकली ‘रीस्ट्रक्चर’ होतो. साध्या भाषेत बोलायचे, तर कोत्या आयडिऑलॉजीमुळे मेंदूचा ‘इलेक्ट्रिक लोच्या’ आणि ‘केमिकल लोच्या’ होतो!
..................................................................................................................................................................
या लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी पहा -
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment