'आजचा सुधारक'चे दयामरण आणि काही प्रश्न (भाग पहिला)
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • ‘आजचा सुधारक’ मासिकाचे काही अंक
  • Thu , 15 June 2017
  • पडघम सांस्कृतिक आजचा सुधारक Aajcha Sudharak दि.य. देशपांडे D.Y. Deshpande श्रीनिवास हेमाडे Shriniwas Hemade रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ Ravindra R. P.

जगातील दुरिते टिकून राहण्यासाठी, ती यशस्वी होण्यासाठी आणि सर्व प्रकारची दुरिते अधिक समृद्ध व्हावीत, यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज असते; ती म्हणजे चांगल्या माणसांनी काहीच करावयाचे नसते. - एडमंड बर्क (१७२९-१७९७)

आजचा सुधारक' या मासिकाचा अंत कर्मठ धर्मवादी चौकटीत झालेला नाही. तो नोकरशाहीच्या आडमुठ्या धोरणाने झाला आहे. या समाजात संवादाची माध्यमे भयानक विकसित होऊनही सुसंवादाचा अभाव, हा वैचारिक असहिष्णुतेचा, विवेकहीनतेचा पुरावा असून भारतीय प्रबोधन अजूनही अर्धवट राहिले आहे याच्या या सज्जड खुणा आहेत. 

युरोपात हजार वर्षांचे तमोयुग होते म्हणतात, तसा १० जून २०१७ हा महाराष्ट्राच्या वैचारिक जीवनातील 'तमोदिन' म्हटला पाहिजे.

एप्रिल १९९० पासून २७ वर्षे चालू असलेल्या 'आजचा सुधारक' या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकाचा शेवटचा छापील अंक आणि ई-अंक १० जून २०१७ रोजी  प्रकाशित झाला आणि या मासिकाचा अंत करण्यात आला\झाला! या मासिकाला दयामरण देण्यात आले. मासिकाचे व्यवस्थापन मंडळ, संपादक, संपादक मंडळ आणि वाचक यांच्या इच्छेविरुद्ध हे मरण मासिकावर लादावे लागले.

व्यवस्थापन आणि संपादक मंडळाने अंतिम अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला 'समापन समारंभ' असा शब्द वापरला आहे. संस्कृतमधील 'समापन' शब्दाचा अर्थ 'समाप्त, अंत' असा होतो. 'समारंभ' = सम + आरंभ असा होतो. एकदा आरंभ झाला की ज्याचा आरंभ झाला आहे त्याच्या 'असणे' या वस्तुतथ्यात 'सातत्य' गृहीत धरले आहे. प्रस्तुत संदर्भात 'मासिकाचा अंत असणे हे सतत राहील' ; म्हणजे हे मासिक कायमचे अंत पावले असून ते कधीही पुन्हा सुरू होणार नाही.    

दि.य. देशपांडे यांचे तात्त्विक योगदान

प्रा. दि. य. देशपांडे (जन्म : २४ जुलै, १९१७, मृत्यू : ३१ डिसेंबर, २००५) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक  होते आणि विवेकवादी तत्त्ववेत्ते म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित होते. (यानंतरचा उल्लेख दिय असा राहील.) तत्त्वज्ञानाचे अध्ययन आणि अध्यापन या जीवनप्रक्रियेचा परिपाक म्हणून अध्ययन आणि अध्यापन या रहाटगाडग्याबाहेर त्यांचे सामाजिक व वैचारिक योगदान काय? हे योगदान दोन प्रकारचे आहे. एकतर, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रीय लोकांसाठी; विशेषतः मराठी विद्यार्थी व अध्यापक मंडळींना इंग्लिशमधील अवघड जाणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या काही मूलभूत वैचारिक ग्रंथांचे मराठीकरण केले. वानगीदाखल सांगायचे तर 'देकार्त : चिंतने' (रेने देकार्त या आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक समजल्या जाणाऱ्या फ्रेंच तत्त्ववेत्त्याच्या  ‘Meditations’ या ग्रंथाचे भाषांतर, महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, १९७४), 'युक्तिवादाची उपकरणे' (मराठी साहित्य संघ, मुंबई, १९७६) हे दोन महत्त्वाचे ग्रंथ, आणि १) प्रज्ञावाद २) अनुभववाद आणि ३) कांट  ही पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञानासंबंधी अचूक माहिती देणारी त्रिखंडी ग्रंथमाला लिहिली. प्रत्येक खंडाची रचना दोन भागात एका विशिष्ट रीतीने केली असून पहिला भाग तत्त्ववेत्त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या तत्त्वज्ञान निर्मितीच्या पार्श्वभूमीचा व पूर्वसुरींच्या तत्त्वज्ञानाचा आहे. शक्य होईल तिथे त्यांच्या सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीचा परिचयही दिला आहे. दुसर्‍या भागात तत्त्ववेत्यांनी आपले तत्त्वज्ञान ज्या ग्रंथात, लघुग्रंथात मांडले, त्यातील त्यांचे तत्त्वज्ञान स्पष्ट करणार्‍या मुख्य निवडक वेच्यांचे, उतार्‍यांचे भाषांतर दिले आहे. हे भाषांतर दियंनी केलेले आहे. मराठी वैचारिक सारस्वतात ही अतिशय मौलिक भर आहे.

विवेकवाद (समकालीन विवेकवाद)

दियंनी मराठीतून विवेकवाद मांडला. त्यांच्या विवेकवादाला दोन तात्त्विक आधार होते. पहिला आधार तत्कालिन आधुनिक पाश्चात्य परंपरेतील विवेकवादी तत्त्वज्ञान व विज्ञान यांचा होता, तर दुसरा भारतीय परंपरेतील नवप्रबोधनकार आचार्य गोपाळ गणेश आगरकर (जन्म : १४ जुलै १८५६, मृत्यू : १७ जून १८९५) यांच्या विवेकवादाचा होता.

व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार, अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार आणि जातिव्यवस्था,  चातुर्वर्ण्य,  बालविवाह,  ग्रंथप्रामाण्य-धर्मप्रामाण्य,  केशवपन  इत्यादी अन्यायकारक परंपरांना विरोध करणे, राजकीय व सामाजिक  समता, स्वातंत्र्य, मानवनिर्मित विषमतेचा तीव्र निषेध, 'सर्वांना सारखे, मिळेल तितके समान सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे' हे आगरकरांच्या विवेकवादाचे साधारण स्वरूप होते. महाराष्ट्रातीत समाजपरिवर्तनाची प्रक्रिया केवळ विवेक, बुद्धिप्रामाण्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य या पायावरच गतिमान होऊ शकते असे आगरकरांचे मत होते. या साऱ्या समस्या आगरकरांच्या काळात अतिशय उग्र होत्या. त्यामुळे त्या त्यांनी ऐरणीवर घेतल्या.

युरोपात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयास आलेली भाषिक विश्लेषण चळवळ ही तत्कालिन आधुनिक तत्त्वज्ञानाचा भाग समजली जात होती (आणि आज तिचाच प्रभाव साऱ्या विचारविश्वावर आहे). ही भाषिक विश्लेषण चळवळ आणि इतर वैचारिक प्रवाहांनी, आधुनिक विज्ञानाने संपृक्त झालेला आधुनिक विवेकवाद, पाश्चात्य-युरोपीय विचारविश्वात आणि समाजजीवनात प्रभावी होता. (भारतात आधुनिकतेचे वारे केवळ राजकीय सुधारणांपुरते मर्यादित राहिले होते. म्हणून तर नंतर टिळक-आगरकर वाद झडला.) 

आगरकर स्वयंप्रज्ञ तत्त्ववेत्ते होते, पण त्यांना हे पाश्चात्य विवेकवादी तत्त्वज्ञान उपलब्ध झालेले नव्हते. कारण मुदलातच ते नव्हते. आगरकरांना उपलब्ध नसलेले हे आधुनिक पाश्चात्य विवेकवादी तत्त्वज्ञान दियंना त्यांच्या काळात उपलब्ध झालेले होते. या परंपरेतून भाषिक विश्लेषण चळवळीतून लाभलेली तात्त्विक विश्लेषणाची पद्धती दियंनी आगरकरी आशयाला आणि मांडणीला उपयोजित केली. त्यातून दियंचा स्वतंत्र भारतीय विवेकवाद आकाराला आला.

दियंचा विवेकवादाचा आशय ते पहिल्याच अंकातील 'विवेकवाद' या लेखमालेतील ‘विवेकवाद- १’ या लेखात स्पष्ट करतात : “विवेकवाद ही केवळ एक विचारसरणी नाही, ती एक जीवनपद्धती आहे. मनुष्याने आपले सर्व जीवन विवेकाने जगावे, विवेकाने त्याची सर्व अंगोपांगे नियंत्रित व्हावीत असे त्याचे प्रतिपादन आहे. विवेक म्हणजे विवेचक शक्ती किंवा भेद करण्याची शक्ती. सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय इत्यादींचा भेद ओळखण्याची ती शक्ती आहे. विवेकाच्या व्यापाराची अनेक क्षेत्रे आहेत....'विवेक’ हा शब्द 'reason' इंग्लिश शब्दाला पर्याय म्हणून येथे वापरला आहे. 'Reason' या अर्थी 'बुद्धि' हा शब्दही वापरला जातो, आणि 'rationalism' ला 'बुद्धिवाद' म्हटले जाते. परंतु हे शब्द गैरसमज निर्माण करणारे असल्यामुळे येथे 'विवेक' आणि 'विवेकवाद' हे शब्द पसंत केले आहेत."    

थोडक्यात, दियंचा विवेकवादाचा आशय आणि विषय भारतीय सामाजिक आणि वैचारिक सुधारणा हा होता आणि मांडणीची पद्धती पाश्च्यात्य होती. आगरकरी विवेकवादाचा पुरस्कार करून भारतीय समाजात चपखल बसणारा अत्याधुनिक पाश्चात्य धाटणीचा व्यापक सुधारणावादी विवेकवाद दियंनी मांडला. या अर्थाने दि.य. हे स्वतंत्र विचारांचे तत्त्ववेत्ते होते. त्यांची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली होती.

प्रा. दि. य. देशपांडे (जन्म : २४ जुलै, १९१७, मृत्यू : ३१ डिसेंबर, २००५)

तात्त्विक विचारांचे प्रशिक्षण

तात्त्विक विचारांचे प्रशिक्षण महाराष्ट्रीय जनतेला सार्वजनिकरीत्या देण्याचे काम तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. सुरेंद्र बारलिंगे, प्रा. मे. पुं. रेगे व प्रा. दि. य देशपांडे यांनी केले, असे म्हणता यावे. प्रा. श्रीनिवास दीक्षित, प्रा. एस. व्ही. बोकील, प्रा. शि. स. अंतरकर इत्यादि इतरही मान्यवरांनी ते केले आहे. पण त्यांचे कार्य अकादमिक क्षेत्रापुरते, त्यांच्या विद्यार्थीवर्गापुरते सीमित राहिले. या सर्वांपेक्षा वेगळे योगदान कॉ. शरद पाटील यांचे आहे. ते रूढ अर्थाने तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी किंवा प्राध्यापक नव्हते. पण शरद पाटील खुद्द तत्त्ववेत्तेच होते.

तर्कतीर्थ रॉयवादी-मार्क्सवादी होते, रेगे तर जवळपास तत्त्वज्ञानात्मक धार्मिक चिंतक होते, सुरेंद्र बारलिंगे यांची नीटशी ओळख महाराष्ट्राला झालेली नाही. त्यांचे भारतीय तत्त्वज्ञानाचे पुनराकलन, भारतीय नीतिशास्त्र आणि भारतीय सौंदर्यशास्त्र यांची जाण वेगळ्या वाटेने जाणारी आहे. त्यांचे दुसरे योगदान म्हणजे त्यांनी निखळ तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञानविषयक विचारांना समर्पित झालेली ‘परामर्श’ (मराठी) आणि ‘परामर्श’ (हिंदी) ही स्वतंत्ररीत्या प्रकाशित होणारी त्रैमासिके आणि त्यांचे इंग्लिश भावंड ‘इंडियन फिलॉसॉफीकल क्वार्टरली’ (आयपीक्यू) सुरू केली. प्रा. ग. ना. जोशी यांनी ‘भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास’ आणि ‘पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास’ असे खंड लिहिले.  

चार्वाक विचारांची आधुनिक ओळख हे आ.ह. साळुंखे, सदाशिव आठवले, राघवेंद्र कुलकर्णी, प्रदीप गोखले, डी. वाय. हाडेकर यांचे योगदान आहे. आ. ह. साळुंखे आणि प्रदीप गोखले यांनी तत्त्वज्ञानेतर नियतकालिकांमध्ये लेखन करून त्यांची मते, नवे विचारप्रवाह तत्त्वज्ञानेतर वाचकांपर्यंत पोहोचवले. पण यांनी नवे नियतकालिक सुरू केले नाही. त्यांनी इतरांची व्यासपीठे वापरली. गोखले ‘परामर्श’चे संपादक राहिल्याने त्यांना ते व्यासपीठही लाभले.

तर्कतीर्थ, रेगे यांनी प्राज्ञपाठशाळा आणि 'नवभारत'चे व्यासपीठ वापरले. त्यामागे केवलानंद सरस्वती यांचे बळ होते. बारलिंग्यांचे विचार अकादमिक वर्तुळात फिरत राहिले. त्यांच्या 'परामर्श' आणि 'आयपीक्यू' यांची पोहोच तत्त्वज्ञानाच्या क्षेत्राबाहेर गेली नाही. रेग्यांनी तत्त्वज्ञानाचा परिचय दिला, तो तत्त्वज्ञानाच्या क्षेत्राबाहेर पोहोचला पण हा परिचय तत्त्वज्ञानाच्या परंपरेच्या चौकटीत राहून झाला. ते तत्त्वज्ञानाचे उत्तम शिक्षक होते. प्रा. दि. य. देशपांडे हे तत्त्वज्ञानाचे जाणकार शिक्षक होते आणि त्यांना त्यांची एक तत्त्वज्ञानाची बैठक होती. म्हणून ते एका अर्थाने 'विचारसरणीचे प्रवर्तक' (School Guru) होते. त्यांनी परंपरेची चौकट सोडून विश्लेषक पद्धतीने तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला. 'आजचा सुधारक' हे त्यांचे स्वतंत्र व्यासपीठ होते.

प्रा. दि.य. देशपांडे यांची काही पुस्तके

समकालीन तत्त्वज्ञानात्मक भारतीय विवेकवाद

दियंच्या विवेकवादाला मी 'समकालीन तत्त्वज्ञानात्मक भारतीय विवेकवाद' (Contemporary Philosophical Indian Rationalism) म्हणेन. आधी 'समकालीन विवेकवाद' (Contemporary Rationalism) ही संकल्पना स्पष्ट करतो. 'समकालीन बुद्धिवाद' ही जिचा आशय अजून नीट भरता येत नाही अशी संज्ञा आहे. त्यामुळे तिचा वापर क्वचितच केला जातो.

विसाव्या शतकात आणि तेव्हापासून पाश्चात्य विचारविश्वात विविध प्रकारचा बुद्धिवाद उदयास येतो आहे. बुद्धिवादाचे मूळ तत्त्वज्ञानात आहे. बुद्धिवाद ही सैद्धान्तिक रचना असते आणि तिला व्यवहारीकतेची जोड असते. विसाव्या शतकात बुद्धिवाद केवळ तत्त्वज्ञान आणि साहित्य या क्षेत्राबाहेर पडून विविध सामाजिक विज्ञाने, मानव्य, कला, संगीत क्षेत्रातून आणि जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायन शास्त्र, भौतिकी विज्ञान, संगणक विज्ञान इत्यादी निसर्ग विज्ञान क्षेत्रातून येतो आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात बुद्धिवादी आविष्कारवाद, बुद्धिवादी फलवाद, भाषिक बुद्धिवाद असे बुद्धिवाद येऊ पाहत आहेत. त्या त्या ज्ञानक्षेत्रात 'यथार्थ सिद्धान्तास आवश्यक असलेला  सुयोग्य युक्तिवाद रचण्यासाठी तर्कशक्तीचा वापर करणे म्हणजे बुद्धीचा वापर करणे' हा त्या संबंधित क्षेत्राचा 'बुद्धिवाद'. 'क्षेत्रीय बुद्धीवादाची निकड' ही जाणीव विशेषतः १९५० नंतर आल्याने 'समकालीन' हे विशेषण १९५० नंतरच्या बुद्धिवादाला उद्देशून वापरले जाते. प्रत्येक ज्ञानक्षेत्रात स्वतंत्र बुद्धिवाद येऊ पाहत असून ढोबळमानाने या साऱ्या समूहाला 'समकालीन बुद्धिवाद' म्हटले जाते. युक्तिवादाचे अनुभवजन्य तर्कावर आधारित समर्थन असे त्याचे संक्षिप्त स्वरूप सांगता येते.              

भारतात असा बुद्धिवाद उदय पावला आहे, यात शंका नाही. पण सामाजिक क्षेत्रातही तो उतरला आहे, असेही नाही. सामाजिक व राजकीय क्षेत्रात तात्त्विक रूपाने महाराष्ट्रात, मराठीत बुद्धिवाद आणण्याचे श्रेय दियंकडे जाते.

दियं 'बुद्धि' आणि हा 'बुद्धिवाद' असे शब्द वापरत नाहीत, तर 'विवेक' आणि विवेकवाद' असे शब्द वापरतात. इथून त्यांच्या फरकाची सुरुवात होते. विवेकाला ते जीवनाचे सूत्र मानतात आणि विवेकी जीवन म्हणजे काय? हा विचार ते विवेकवादाचा केंद्रबिंदू मानतात. ही नवी ज्ञानरचना आहे. ती भारतात, महाराष्ट्रात, मराठीत नवीन आहे. ती १९९० ला मांडली गेली. म्हणून पाश्चात्य अर्थानेही ती 'समकालीन' आहे. ती 'भारतीय' आहे आणि 'तत्त्वज्ञानात्मक' पद्धतीने मांडली, म्हणून तिला 'समकालीन तत्त्वज्ञानात्मक भारतीय विवेकवाद' हे नाव शोभून दिसते, असे मला वाटते. ही ज्ञानरचना दियंनी 'नवासुधारक/आजचा सुधारक'मधून मांडली. म्हणून 'समकालीन तत्त्वज्ञानात्मक भारतीय विवेकवाद' आणि 'आजचा सुधारक' या दोन फरक करता येणाऱ्या, पण अलग न करता येणाऱ्या एकमेकात गुंतलेल्या वैचारिक कृती आहेत.

‘परामर्श’चे विशेषांक 

प्रा. दि.य देशपांडे यांचे विचार सुस्पष्ट करण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या 'परामर्श' या तत्त्वज्ञानविषयक मराठी नियतकालिकाने  त्यांच्या हयातीत ‘प्रा. दि.य. देशपांडे यांचे तत्त्वचिंतन’ या नावाचा विशेषांक दोन खंडांत (अंक १, मे १९९३ आणि ऑगस्ट १९९३ , संपादक : सुरेंद्र शिवदास बारलिंगे आणि प्रदीप प्रभाकर गोखले) प्रसिद्ध केला. पहिल्या खंडात दोन विभाग आहेत तर दुसर्‍या खंडात तिसरा विभाग आहे. त्याशिवाय दि.यं.नी अनुवाद केलेल्या लेखांचा वेगळा अंकही ("मूर, रसेल, फ्रेगे", अंक ४ फेब्रुवारी-एप्रिल २००६) 'परामर्श'ने प्रसिद्ध केला.

'आजचा सुधारक'   

दि.य. देशपांडे यांचे मुख्य योगदान 'आजचा सुधारक' च्या रूपात आहे. दि.य. देशपांडे यांनी एप्रिल १९९० मध्ये म्हणजे त्यांच्या त्र्याहत्तराव्या वर्षी जगण्याच्या उत्तरार्धात 'आजचा सुधारक' सुरू केला. त्यांच्या ग्रंथ निर्मितीप्रमाणेच तत्त्वज्ञानाचे अध्ययन आणि अध्यापन या जीवनप्रक्रियेचा परिपाक म्हणून त्यांच्या 'आजचा सुधारक' या तात्त्विक कृतीकडे पाहाता येते. 'आजचा सुधारक' हे त्यांनी त्यांच्या विवेकवादी विचारांना दिलेले जणू प्रात्यक्षिक होते.

दिय आणि त्यांच्या पत्नी प्रा. मनुताई नातू हे दोघेही विवेकवादी होते आणि त्यांना आगरकरप्रणीत विवेकवाद मान्य होता. तो त्यांना पुढे न्यायचा होता. 'काहीतरी करावे' असे त्यांच्या मनात असतानाच अचानक मनुताईंचे ०३ एप्रिल १९८८ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ०३ एप्रिल १९९० ला मनुताईंच्या दुसऱ्या स्मृतिदिनाला दियंनी सहकारी मित्रांच्या मदतीने विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे हे मासिक सुरू केले. प्रमुख पाहुणे प्रा. य. दि. फडके, अध्यक्षपदी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी होते. प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. राम शेवाळकर यांनी केले. दियंनी संपादकीय मनोगत, सहकारी लेखक प्रा. भा. ल. भोळे यांनी आपले विचार मांडले तर प्रा. प्र. ब. कुलकर्णी यांनी सभा संचालन केले होते.     

'आजचा सुधारक'चे मूळ नाव 'नवा सुधारक'  होते. ते डिसेंबर १९९० अंकापासून 'आजचा सुधारक' करण्यात आले. नवप्रबोधनकार आगरकर यांच्या ‘सुधारक’ या साप्ताहिकाचा समकालीन नवा अवतार म्हणून हे मासिक सुरू करण्यात आले. 'नवा सुधारक'च्या पहिल्या अंकाच्या  संपादकीयात दि. य. देशपांडे म्हणतात, 'नवा सुधारक' हा जुन्या 'सुधारक'चा नवा अवतार म्हणून आम्ही पाहात आहोत... आम्ही त्यांचेच काम पुढे चालवीत आहोत, अशी आमची भावना आहे. त्यांनी शंभर वर्षापूर्वी जे करण्याचा प्रयत्न केला, आणि जे त्यांनी मोठ्या प्रमाणात साध्यही केले, तेच कार्य आज आम्ही करीत आहोत... आगरकरांनी शंभर वर्षांपूर्वी जे कार्य करावयास आरंभ केला ते दुर्दैवाने अजून मोठ्या अंशाने अपुरेच राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवादी सर्वागीण सुधारणावादाची मुहूर्तमेढ रोवली, पण त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांनी केलेले काम छिन्नभिन्न होऊन गेले. ते गेल्यानंतर लवकरच महाराष्ट्राची स्थिती जवळपास पूर्वीसारखी झाली. आणि आज शंभर वर्षानंतर ती तशीच आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्र, बुवाबाजी इ. गोष्टी पूर्वीइतक्याच जोमाने सुरू आहेत. धर्माने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगूस आजही तेवढ्याच, किंबहुना अधिक तीव्रपणे चालू आहे. शनिवार, सोमवार, चतुर्थी, एकादशी इ. उपासतपासांना ऊत आला आहे. जुन्या देवळांचे जीर्णोद्धार होताहेत आणि नवीन मंदिरे बनताहेत. कुंभमेळे, गंगास्नान, यज्ञयाग हे सर्व जातिभेद अजून पूर्वीइतकेच तळ ठोकून आहेत आणि राजकारणात निवडणुकांच्या निमित्ताने त्याला उघडे आवाहन केले जात आहे. दलित आणि स्त्रिया यांवरील अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. जिकडे नजर फिरवावी तिकडे कालची स्थिती आजच्यापेक्षा बरी होती, असे म्हणण्याची पाळी आली आहे."

कोणत्या पार्श्वभूमीवर हे मासिक सुरू झाले आणि कोणत्या हेतूने सुरू झाले याची कल्पना या निवेदनामुळे येते. १९९० ची देशाची स्थिती आणि आजच स्थिती यात फारसा फरक पडलेला नाही. 

अशा प्रकारच्या परिस्थितीत समाजाला तत्त्वचिंतनाचे धडे देणे, समाजात काहीएक निश्चित तात्त्विक दृष्टिकोन निर्माण करणे, संवादाचे प्रशिक्षण देणे, वैचारिक उच्चदर्ज्याचे भान देणे हे काम आवश्यक असते. कारण, समाज मूलतः तात्त्विक संकल्पनांनीच घडत जातो. राजकारण, समाजकारण, अर्थकारण इत्यादी या तात्त्विक संकल्पनांचे केवळ वाहक असतात. तात्त्विक संकल्पना नीटपणे समजावून घ्यावयाच्या असतील तर समाजात काहीएक निश्चित तात्त्विक दृष्टिकोन निर्माण होणे, ही ज्ञानशास्त्रीय गरज असते. हा तात्त्विक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी प्रत्येकाला तात्त्विक प्रशिक्षणाची गरज असते. या संदर्भात आल्फ्रेड नॉर्थ व्हाईटहेड  (१८६१-१९४७) हा ब्रिटिश तत्त्ववेत्ता म्हणतो, "समाजातील सार्वजनिक शिक्षणव्यवस्था जोपर्यंत जनतेत तात्त्विक दृष्टिकोन निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत अस्सल लोकशाही समाज निर्माण होऊ शकत नाही. तत्त्वज्ञान म्हणजे निव्वळ उदात्त भावनांचा एकगठ्ठा कल्लोळ नसतो. कोणत्याही भावनिक प्रक्षोभात चांगले काही होण्यापेक्षा नुकसानच अधिक होते. तत्त्वज्ञान असे कधीही नसते. तत्त्वज्ञान हे नेहमी मानवी प्रतिभेचे एकाच वेळी समीक्षात्मक आणि परिशीलन करणारे, आशयघन व सामान्य स्वरूपाचे, सर्वांना उपयोगात आणता येईल असे, साधन असते. तत्त्वज्ञानात वस्तुस्थिती, सिद्धान्त, पर्याय आणि आदर्श यांना एकाच पारड्यात समान रितीने तोलले जाते. शक्यता आणि त्यांची वस्तुस्थितीशी केलेली तुलना यांचे ते निरपेक्ष सर्वेक्षण असते." (अॅडव्हेंचर्स ऑफ आयडीयाज १९३३). आता, भारतीय शिक्षणव्यवस्था असा तात्त्विक दृष्टिकोन निर्माण करत नसल्याने ते काम 'आजचा सुधारक' सारख्या नियतकालिकावर पडते.    

तत्त्वज्ञान हे नेहमी लोकांकडून लोकांसाठी निर्माण केले जाते. साहजिकच लोकांचेच प्रश्न सोडविणे, हे तत्त्वज्ञानाचे काम असते. एखाद्या सामाजिक प्रश्नाला तात्त्विक प्रश्नाचा दर्जा कधी लाभतो, हाच एक तात्त्विक प्रश्न असतो. राज्य म्हणजे काय ? या तात्त्विक प्रश्नाचे सामाजिक रूप ‘आदर्श राज्य म्हणजे नेमके कोणते राज्य?’ हे आहे. अशा प्रश्नांचे उत्तर कोणत्याही विषयाच्या वर्गात दिले जात नसते. दिले गेलेच तर ती उत्तरे संशयास्पद ठरतील, असे विरोधी वातावरण बाह्य जगतात असतेच. अशा वेळेस कठोर टीका, चिकित्सा आवश्यक असते आणि ती भारतीय शिक्षणव्यवस्थेच्या वर्गात शिकवली जात नाही, म्हणून वैचारिक साहित्यावर, साहित्यिकांवर आणि प्रकाशानांवर येते. तेच काम 'आजचा सुधारका' ने विवेकवादाची कास धरून केले.  

वैचारिक प्रकाशनांचा हेतू

वैचारिक नियतकालिके, मासिके इत्यादींचा एक मुख्य हेतू असतो. 'प्रदर्शित विचार अपेक्षित वाचकवर्गापर्यंत पोहोचला आहे, तो रुजला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून नवा जीवनाचा आकार निर्माण झाला आहे. किमान संबंधित वाचकांचा जीवनाकार तरी बदलला आहे;  पुढे जाऊन त्या वाचकांनी त्यांच्या पुढच्या पिढीला तो विचार दिला आहे, तो देताना समकालीन नवा विचार त्यात समाविष्ट केला आहे आणि मूळ विचार पुष्ट केला आहे', अशा प्रकारे त्या हेतूचे साधारण स्वरूप सांगता येते. आपल्या स्वीकृत विचारांच्या आशयात, घडणीत राहिलेल्या त्रुटी, उणीवा ओळखून त्यांनी सुधारणांच्या जागा नव्या आचार-विचारांनी भरल्या गेल्या आहेत. हे सातत्याने करत राहणे, हे विचारकांचे आणि वैचारिक प्रकाशनांचे नियतकार्य असते.

समाजाच्या सर्वांगीण वैज्ञानिक, भौतिक आणि वैचारिक प्रगतीला अतिशय काटेकोर चिकित्सा आवश्यक असते. एखादी कल्पना अथवा संकल्पना समजावून घेणे हे जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच ती तपासणे महत्त्वाचे असते. किंबहुना ती जास्त महत्त्वाची आणि मूलगामी कृती असते. तपासणे याचा अर्थ बदलेल्या तत्त्वज्ञानानुसार ही तपासणी करणे, गतकालीन विचारवंताच्या विचाराचा आजच्या विचाराशी कोणकोणत्या प्रकारे संबंध पोहोचतो, त्याचे ज्ञानात्मक मूल्य काय, त्याची समकालीन प्रस्तुतता कशात शोधात येईल व जोडता येईल हे पाहणे, हे चिकित्सेत अपेक्षित असते. ती गरज हे मासिक पूर्ण करत होते. इतर कोणत्याही वैचारिक मासिकापेक्षा 'आजचा सुधारक'ने हे कार्य अधिक सकसपणे केले आहे. जगण्यातील वेगवान गती लक्षात घेऊन 'आजचा सुधारक' हा 'उद्याचा सनातनी' होऊ नये याची जाणीव ठेवूनच 'आ. सु.’ने अनेक विषय हाताळले. अनेक नवे विचार, नवे परिप्रेक्ष्य मांडले. वाद मांडले. अनेक लेखमाला प्रसिद्ध केल्या. (माझी 'भारतीय वाद पद्धती' ही लेखमालाही ऑगस्ट २०१६ ते फेबुवारी २०१७ दरम्यान प्रसिद्ध झाली. 'भारतीय वाद पद्धतीच्या विधायक पुनरुज्जीवनाची गरज' हा सातवा भाग मार्च २०१७ च्या अंकात अपेक्षित होता.) अनेक विषयावर विशेषांक प्रसिद्ध केले.

दियंनंतर 'आजचा सुधारक'ला लाभलेले सर्व संपादक व संपादक मंडळ दिवाकर मोहनी, प्र. ब. कुलकर्णी, नंदा खरे, संजीवनी कुलकर्णी, अनुराधा मोहनी, प्रभाकर नानावटी, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ही मंडळी दि. यं.च्या विचाराने जाणारे, त्यांचा विवेकवाद पुढे चालवणारे होते/आहेत. या साऱ्या कामामुळे आजचा सुधारकचे महाराष्ट्राच्या वैचारिक जीवनातील महत्व अधोरेखित होते. 'आजचा सुधारक' मुळे महाराष्ट्रातील बौद्धिक  चळवळी, आंदोलने इत्यादींना तात्त्विक बैठक मिळाली, असेही म्हणता येते.

लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.