(मोदींच्या राज्यात) इतिहास कसा शिकवावा?
पडघम - सांस्कृतिक
पंकज घाटे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 23 May 2017
  • पडघम देशकारण इतिहास History पंकज माधव घाटे Pankaj Ghate

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी महाराष्ट्रातील सद्यकालीन आचरणास मराठ्यांचा विपर्यस्त केलेला इतिहास कारणीभूत होत आहे, अशा प्रकारची मांडणी करणारा ‘महाराष्ट्रातील इतिहासाची आबाळ व तिचे दुष्परिणाम’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. यामध्ये सद्यकालीन स्थितीचा यथार्थ बोध होण्यासाठी त्यांनी मराठ्यांचा इतिहास अभ्यासला; विपर्यस्त इतिहासलेखनामुळे त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्रास बाधले, बाधत आहेत व बाधतील अशी टिप्पणी त्यांनी केली होती. आज यात फारसा बदल करावा अशी स्थिती नाही.

इतिहास विसरणाऱ्या राष्ट्राला भविष्य माफ करत नाही, असे म्हटले जाते. भविष्यात राष्ट्राची वाटचाल कशी व्हावी, याचा विचार करणाऱ्यांना इतिहासाचे भान सतत ठेवावे लागते. भारतासारख्या देशात अस्मिता जपण्यासाठी इतिहासाची उजळणी बऱ्याचदा होते. यामुळे ऐतिहासिक प्रगतीचे ओझे प्रगतीच्या आड येताना दिसते.

इतिहास कसा शिकवावा, याचा विचार करताना इतिहास म्हणजे काय हे प्रारंभी समजावून घेऊ! इतिहास या शब्दाचा व्युत्पत्तीसिद्ध अर्थ ‘हे असे घडले’. हीच या शब्दाची परिपूर्ण व्याख्या आहे. यात घडलेल्या घटना जशा घडल्या तशाच स्वरूपात सांगणे अभिप्रेत असते. इतिहासातील घटना आणि व्यक्ती निर्जीवच असतात. तरीही इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानकाळाचे आकलन करून घेता येते. मर्यादित अर्थाने भविष्याचा वेध इतिहासाच्या अभ्यासाने शक्य असला, तरी भविष्य घडवणे इतिहासाला शक्य नसते. यासंदर्भात मार्क्सने म्हटले होते की, इतिहास काही करत नसतो, त्याच्याजवळ कसले गडगंज ऐश्वर्य नसते; तो लढाया करत नाही. सर्व घडते ते खऱ्या जिवंत माणसांकडून. भारतात आणि महाराष्ट्रात इतिहास हा विषय अतिशय संवेदनशील बनला आहे. या दृष्टीने मार्क्सचे मत लक्षात घेणे आवश्यक आहे.

इतिहासाचे चार अनुबंध आहेत – काळ, स्थळ, व्यक्ती आणि समाज. इतिहासाचे भान येण्यासाठी आणि तो शिकवताना हे चारही घटक महत्त्वाचे आहेत. व्यक्ती आणि समाज हे घटक काळ आणि स्थळ यांना आटोक्यात आणतात. कालगणनेमुळे काळ हा घटक आवाक्यात आला. काळ समजून घेण्यासाठी कालरेषा (Timeline) हे उपयुक्त साधन आहे. इतिहासाच्या सलगपणे चालू असणाऱ्या प्रवाहाची कल्पना या कालरेषेमुळे येते. एकाच वेळी अनेक घटना घडत असतात. यामुळे भविष्यात एखादी युगप्रवर्तक घटना कशी घडते, याची उत्तम जाण येऊ शकते.

परंतु याबाबत काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वच बाबतीत काळाचे मोजमाप परिपूर्ण नसते. विशेषतः प्रक्रियांच्या बाबतीत. उदाहरणार्थ- भारतातील राष्ट्रवादाचा उदय किंवा मध्यमवर्गाचा उदय. काळाचे भान नसेल तर काही मिथकेही तयार होतात. उदाहरणार्थ- ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले हे एक लोकप्रिय मिथक आहे. वास्तवात भारतावर ब्रिटिशांचे सर्वसाधारण वर्चस्व १२९ वर्षे होते. याचप्रमाणे आधुनिक भारताच्या इतिहासात १८५७च्या घटनेला भारताच्या आधुनिकतेचा प्रारंभ मानला जातो. परंतु रॉय, जांभेकर, लोकहितवादी, फुले यांनी एका अर्थाने आधुनिकतेचा प्रारंभ केला होता. भारतात रेल्वेची स्थापना त्या घटनेच्या आधी झाली होती. काळाचे भान नीटपणे न ठेवल्यास अशा मिथकांचा जन्म होतो.

या काळाप्रमाणे इतिहासाचा दुसरा अनुबंध आहे स्थळ. नकाशाचे आरेखन केल्यामुळे स्थळ हा घटक आवाक्यात आला. जगातील संस्कृतींचा उदय, विकास आणि अस्त यासंदर्भात भूगोल अतिशय महत्त्वाचा असतो. स्थळाचा विचार करताना काही बाबींचे भान ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ स्वातंत्र्यपूर्व भारत शिकवताना सध्याच्या भारताचे नकाशे वापरून शिकवणे अयोग्य आहे. ठिकाण जरी तेच असले तरी बदललेल्या भौगोलिक सीमांमुळे ऐतिहासिक आकलनात अपूर्णता येऊ शकते. याबाबत दुसरे उदाहरण सांगता येईल. मार्टिन ल्युथर याचा जन्म जर्मनीत झाला असे आपण म्हणतो. वास्तविक, ल्युथरच्या काळात जर्मनी नावाचा देशच अस्तित्त्वात नव्हता. त्याची निर्मिती फार पुढची आहे.

इतिहासाचे दोन मूर्त अनुबंध म्हणजे व्यक्ती आणि समाज. भारतासारख्या देशात इतिहास शिकताना आणि शिकवताना संवेदनशीलता बाळगावी असे हे दोन बंध आहेत. भारतीय समाज हा बहुतांश व्यक्तिपूजक आहे. व्यक्तीपेक्षा व्यवस्थेस महत्त्व देण्याची संस्कृती आपल्याकडे रुजली नाही, यांचा अनिष्ट परिणाम सगळ्या क्षेत्रात दिसतो. हे व अशा प्रकारचे अनिष्ट परिणाम समजावून घेण्यासाठी इतिहास असतो. इतिहास घडवण्यासंदर्भात महापुरुषांच्या त्यावरील प्रभावाबाबत कार्लाईलच्या वचनाचा उद्धृतात अनेकदा वापर होतो. परंतु महापुरुष काळाच्या कितीही पुढे होते असे आपण कितीही म्हणत असलो तरी, त्या काळाची एक मर्यादा त्यांच्या संपूर्ण कार्याला असतेच. याची अपरिहार्यता समजून घेणे, हे खरे इतिहासाच्या अभ्यासाचे उद्दिष्ट असावयास हवे.

इतिहासाचा शेवटचा अनुबंध समाज. इतिहासात गतकालीन समाजाचे घटक या नात्याने अनेक पिढ्यांच्या व्यवहारांचा विचार केला जातो. व्यक्ती आणि समाज यांच्या अन्योन्य संबंधांचा अभ्यास इतिहासात केला जातो. ‘इतिहास म्हणजे थोर पुरुषांचे चरित्रग्रंथ’, असे म्हणणाऱ्या कार्लाईलने फ्रेंच राज्यक्रांतीचे चक्र फिरवण्यात तेथील समाजाने मोठे योगदान दिले असे म्हटले आहे. भूतकालीन घटनांचा शोध ही एका अर्थाने सामाजिक प्रक्रिया असते. सध्याची समाजाची स्थिती ही याच सामाजिक प्रक्रियेच्या शोधाने उलगडली जाते.

प्रसिद्ध इतिहासकार एरिक हॉब्सबॉम यांनी ‘On History’ मध्ये समकालीन समाजाविषयी इतिहास काय सांगेल, असा प्रश्न विचारून त्याचे उत्तर दिले आहे. समकालीन समाजाविषयी जाणून घ्यायचे असेल, तर इतिहासकारांनी आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली पाहिजे. समकालीन समाजाबाबत शिकण्यास नाखूष असू नये. सुदैवाने येथील विद्यापीठे शिक्षणव्यवस्थेतील इतिहासकारांना या संधी देतात. हॉब्सबॉम यांना सुदैवाची वाटणारी ही बाब भारतीय समाजाला लागू केल्यास दुर्दैवाने त्याचे निष्कर्ष वेगळे दिसतील.

इतिहास शिकवताना पारंपरिक पद्धतीने विचार न करता नवीन रीतीने इतिहासाकडे पाहणे गरजेचे आहे. मुलांमध्ये इतिहासाबाबत तर्कशुद्ध आणि चिकित्सक दृष्टिकोन विकसित करून जागतिक इतिहासाचे भान निर्माण करणे, हे मुख्य उद्दिष्ट असावे. यावर आधारित अध्ययन पद्धती विकसित केल्या जाव्या. याचप्रमाणे सध्याचे बदलते आणि व्यामिश्र जग व त्यातून येणारी आव्हाने यांना सामोरे जाण्याची वृत्ती निर्माण करणे हे खरे आव्हान आहे.

स्टॅनफर्ड हिस्ट्री एज्युकेशन ग्रुपने ‘Reading Like A Historian’ नावाचा अभ्यासक्रम विकसित केला आहे. इतिहास शिकवताना इतिहासकाराच्या दृष्टीने मुलांना इतिहासाकडे पाहावयास शिकवणे या उद्देशाने याची निर्मिती झाली. मुख्यतः इतिहासाची प्राथमिक साधने (Primary Sources) वापरून लेसन प्लॅन तयार केले आहेत. विद्यार्थ्यांसमोर एक प्रश्न ठेवून त्यासंबंधी काही प्राथमिक साधने देऊन इतिहास शोधण्याचा प्रयत्न यात केला जातो.

इतिहासकाराच्या दृष्टीने मुलांना इतिहासाकडे पाहावयास शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ऐतिहासिक साधने वापरून शिकवणे. विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या विचारप्रवण करण्यासाठी याचा वापर व्हावा. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील मुद्द्यांना आव्हान देण्याबाबत अथवा त्यात भर टाकण्याच्या दृष्टीने विचार करावा. विद्यार्थ्यांना सतत प्राथमिक साधनांद्वारे प्रश्न निर्माण करण्यात आणि त्यांची उत्तरे शोधण्यात तसेच त्याचे महत्त्व पटवून देण्यात गुंतवून ठेवावे. याद्वारे त्यांच्या आकलन शक्तीला आणि चिकित्सक बुद्धीला चालना मिळेल. प्राथमिक साधनांचे योग्य रीतीने निर्देशन केलेली दुय्यम साधनेही याबाबत उपयुक्त ठरतील.

शिक्षकांचा तसेच विद्यार्थ्याचा इतिहासाबाबत दृष्टिकोन विकसित करण्यासंदर्भात लॉर्ड अॅक्टन यांनी इतिहासलेखनाबाबत सांगितलेली वचने लक्षात ठेवायला हवीत. विशिष्ट व्यक्तीबाबत आदर बाळगू नका. व्यक्ती आणि घटना वेगळ्या असू द्या. तुमची मते ही तुमचीच असू द्या. इतिहासातील कोणतीही व्यक्ती आपली सर्वांत आवडती असे मानू नका; मोठमोठ्या व्यक्तींच्या प्रतिष्ठेचा प्रभाव मनावर पडणार नाही असे पहा.

ऐतिहासिक घटनांचा अन्वयार्थ लावणे ही एक साधना असते. एकच घटना निरनिराळे इतिहासकार कसे हाताळतात हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिल्यास त्यांच्या मनात त्या घटनेच्या आकलनात एकांगीपणा येणार नाही. वर्तमान समजावा यासाठी भूतकाळ अभ्यासावा. नवीन पुरावा जसजसा येत जाईल तसतसे निष्कर्ष बदलले पाहिजेत आणि त्यात सुधारणा करण्याची तयारी दर्शवली पाहिजे. इतिहासकार वर्तमानात राहून भूतकाळाचे वर्णन करत असतो. विद्यार्थ्यांमध्ये याची जाणीव निर्माण करायला हवी. भूतकाळाचा शोध घेणे आणि त्याद्वारे इतिहासाचा अर्थ शोधायला शिकवणे म्हणजे इतिहास शिकवणे.

उदाहरणार्थ आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात गोपाळ गणेश आगरकर यांचे स्थान विद्यार्थ्यांना तपासायला दिल्यास काही प्राथमिक साधने त्यांच्यासमोर विचारार्थ ठेवता येतील. आगरकरांनी तरुणपणी आपल्या आईला पाठवलेले प्रसिद्ध पत्र की, ज्यातून त्यांच्या ध्येयवाद दिसून येतो. तसेच आगरकरांनी ‘सुधारक’मध्ये लिहिलेला एखादा समाजसुधारणाविषयक लेख आणि लोकमान्य टिळकांनी आगरकर गेल्यावर केसरीत लिहिलेला मृत्युलेख. ही साधने वापरून विद्यार्थ्यांनी आगरकरांचा शोध घ्यावा. असे अनेक घटक आपल्याला साधन पद्धती वापरून शिकवता येतील. याचप्रमाणे दुय्यम साधन म्हणून कुमार केतकर यांचे ‘कथा स्वातंत्र्याची’ यासारखे पुस्तक की, ज्यात प्राथमिक साधने योग्य रीतीने दर्शवली आहेत, हे वापरता येईल.

युनेस्कोने ‘Suggestions on The Teaching of History’मध्ये इतिहासाच्या शिक्षकांना इतिहास शिकवण्याबाबत काही सूचना केल्या आहेत. शांतता आणि लोकशाही संवर्धन यासाठी इतिहासाचा अभ्यास आवश्यक मानला आहे. यातील दोन बाबी लक्षात घेण्याजोग्या आहेत. पहिली to encourage students to draw their own conclusion आणि दुसरी to develop their critical power by working on historical sources. वरील दोन्ही बाबी विद्यार्थ्यांना केवळ घटना कशी घडली हे सांगण्यापेक्षा त्यापाठीमागील कारणे आणि परिणाम शोधणे महत्त्वाचे मानतात.  

इतिहास कसा शिकवावा याचा विचार करताना येणारी आव्हाने अध्ययन पद्धती, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण यामुळे निर्माण होत आहेत. नुसती घटना सांगणे म्हणजे इतिहास शिकवणे नाही. इतिहासात घटनांचा पुनर्विचार व पुनर्मूल्यांकन आवश्यक बाब असते. तरच इतिहासापासून शिकण्याची सवय लावून घेता येते. नवीन साधनांची उपलब्धी, बदलत्या संकल्पना, नव्या सामाजिक जाणीवा यामुळे इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक बनते. याचा पाठ्यपुस्तक निर्मिती करताना विचार केला जातो.

याबाबत महाराष्ट्राचा विचार करता फारशी उल्लेखनीय प्रगती नाही. गेल्या वर्षी दै. ‘लोकसत्ता’मध्ये किशोर दरक यांनी ‘गोठलेल्या पाठ्यपुस्तकाची गोष्ट’ हा लेख लिहिला होता. इयत्ता चौथीचे इतिहासाचे पाठ्यपुस्तक शिक्षणशास्त्रीय निकषांशी कशा प्रकारे विसंगत ठरते याची चर्चा त्यात होती. ही सामाजिक वृत्ती शिक्षणशास्त्रीय संकल्पनांबाबत नव्हे, तर ऐतिहासिकदृष्ट्याही विसंगत आहे. महाराष्ट्राच्या मानगुटीवरचा समंध अजून उतरला नाही असेच म्हणायला हवे.

विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या ‘जागर’ या पुस्तकामधील ‘राष्ट्रीय एकात्मता आणि इतिहासाचा अभ्यासक्रम’ हा लेख आजच्या इतिहास अभ्यासक्रमाच्या संदर्भात पाहण्यासारखा आहे. कुरुंदकर म्हणतात, “महंमद गझनीने सोमनाथ फोडला, हे सांगण्यासाठी शिक्षणक्रमात इतिहासाच्या अभ्यासाची गरज नसते. पण गझनीहून निघालेला महंमद सोमनाथपर्यंत येईपावेतो सुमारे ३०० मैल हिंदू राजवटीतून चालत आला, तरी त्याला कुणी प्रतिकार केला नाही; सीमा ओलांडून शत्रू शेकडो मैल चालत आत येतो, तरीही त्याला प्रतिकार होत नाही, इतकी गाफील व अंधश्रद्ध समाजरचना जिथे असते तिथे सोमनाथ केव्हाही फुटतो. तो बाराव्या शतकात फुटला असे नाही, तो गाफीलपणा राहिला, तर विसाव्या शतकात राष्ट्राचे सर्व मानबिंदू उद्ध्वस्त होऊ शकतात, हे भावी नागरिकांना समजावून देण्यासाठी इतिहासाची गरज असते.”

पुढे कुरुंदकर म्हणतात, “परंपरांची चिकित्सा करण्यासाठी इतिहास अभ्यासक्रमात असावा लागतो. ही चिकित्सा करूनच मागासलेले अंधश्रद्ध मन आधुनिक बनवता येते. इतिहासचिकित्सा असो, की धर्मचिकित्सा असो, चिकित्सा टाळून माणसाला आधुनिक करता येणार नाही. लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी इतिहासाच्या चिकित्सक अभ्यासाची सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे.”

इतिहासाच्या चुकीच्या अभ्यासाने अनेक मिथके तयार होतात. असहिष्णू समाजात अशा मिथकांचे प्रमाण जास्त असते. इतिहासाच्या प्रेरणा आणि कल्पना यामुळे स्वसमर्थन करणारी मिथके तयार होतात. याकडे दुर्लक्ष करणे ही राष्ट्रासाठी आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक बाब आहे. इतिहासकाराचे काम अशी मिथके दूर करण्याचे असते.

इतिहास कशा प्रकारे शिकवावा याबाबत काही बाबी सुचवता येतील-

१. प्राथमिक आणि दुय्यम साधने वापरून शिकवणे.

२. समकालीन प्रश्नाबाबत इतिहासाचा विचार करणे.

३. जागतिक संदर्भात राष्ट्रीय इतिहास अभ्यासणे, प्रादेशिक आणि स्थानिक इतिहास यांचा समावेश करणे.

४. ऐतिहासिक साधने वापरून अभ्यासक्रम बनवणे.

५. शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देणे.

६. शिक्षकांना ऐतिहासिक संशोधन करण्यास प्रवृत्त करणे.

७. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे. 

८. इतिहासाच्या अभ्यासाचे स्वरूप आंतरविद्याशाखीय असावे.

आज इतिहास शिकवण्याच्या बहुतांश पद्धती अत्यंत पारंपरिक आहेत. इतिहासाची चिकित्सा टाळून इतिहास शिकवता येणार नाही. इतिहासाचे पारंपरिक पद्धतीने जोपर्यंत अध्ययन केले जात आहे, तोपर्यंत इतिहास हा समाजकारणातला अडथळा बनून राहणार आहे. वैचारिक हुल्लडबाजी वैचारिक स्वातंत्र्याला मर्यादा घालते. असत्याला सत्याचा दर्जा मिळाला तर त्याचा समाजहितावर अनिष्ट परिणाम होतो. याची अपरिहार्यता ओळखण्याची वेळ आता आली आहे.

लेखक रत्नागिरीच्या गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.

pankajghate89@gmail.com 

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.