ट्रोल, ट्रोल्स, ट्रोलिंग, ट्रोलर आणि त्यांचे कूळशीळ - उत्तरार्ध
पडघम - तंत्रनामा
प्रकाश बुरटे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 17 May 2017
  • पडघम तंत्रनामा ट्रोल Troll इंटरनेट ट्रोल Internet troll ट्रोलिंग Trolling ट्रोलर Trolling

विसाव्या शतकाच्या अखेरच्या वीस-तीस वर्षांत पुरुषप्रधानतेच्या विरोधात स्त्री-हक्काच्या जाणीवा, जीवाश्म इंधनांच्या (दगडी कोळसा, खनिज तेले, नैसर्गिक इंधन वायू) अक्षयतेच्या विरोधात त्यांच्या संपण्याची शास्त्रीय भाकिते, जागतिक तापमानवाढ आणि कैक वेळा सर्व सजीव सृष्टीचा विनाश करू शकणारी अण्वस्त्रांच्या रूपातील अणुशक्ती या चार महत्त्वाच्या घटना जागतिक क्षितिजांवर अवतरल्या. स्त्रीहक्क चळवळी, जीवाश्म इंधनांचे मर्यादित साठे पुरवून वापरणे, हवेतील हरितगृह वायूचे प्रमाण कमी करणारी पाऊले उचलणे, आणि अण्वस्त्रनिर्मितीस बंदी या चळवळींना भांडवलशाही आणि हुकूमशाही सदृश्य ‘साम्यवादी’ सत्तांचा व्यावहारिक पातळीवर विविध कारणांसाठी विरोधच होता.

अशा मुख्यतः चार घटकांनी पुरस्कृत झालेल्या लोकशाहीविरोधी विचारसरणीच्या काळात इन्टरनेट ट्रोल्सचा वावर जगभर वाढला आहे.

इंटरनेट ट्रोल्सचे वर्गीकरण
ब्लॉग, मेल, ट्विटर, फेसबुक आणि अशा पेव फुटलेल्या स्मार्ट मोबाईलवरील अनेक सोशल मीडियांमुळे अभिजनवादी संपादकांची ‘कटकट’ मिटली ही एक सोय नक्कीच झाली. दुसरी सोय म्हणजे सोशल मीडियावर एकच व्यक्ती पाहिजे तेवढे खरे-खोटे अकौंटस उघडू शकत होती. परिणामी मनाची लाज सोडलेल्यांना जनांचीही लाज बाळगायचे कारण उरले नाही. इंटरनेट ट्रोल्ससाठी सोशल मीडिया मोफत उपलब्ध झाला, ही तिसरी सोय होती. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, निवारा, उत्पन्न, उत्कर्षाची संधी याबाबत असमानता वाढताना इंटरनेटवापराबाबत मात्र ‘समानता आली. सोशल मीडिया मोफत उपलब्ध झाले असले तरी ती माध्यमे चालवणाऱ्या कंपन्याचा खर्च जाहिरातीमधून भागत होता. परिणामी, त्या कंपन्या सर्व काही खपवून घेऊ लागल्या. ही होती चौथी सोय. परिणामी, भासमान समानतेच्या विश्वात सगळी भीड चेपून इंटरनेट ट्रोलिंग चालू ठेवणे सहज शक्य झाले.

चारचार सोयी असणाऱ्या इन्टरनेट ट्रोलिंगचे आपणही पुढील चार प्रकारांत सोयीसाठी वर्गीकरण करूया : ट्रोलिंग - एक खेळ ; डावपेचात्मक ट्रोलिंग; लष्करी कारवाईसाठी ट्रोलिंग आणि राजकीय सत्तेसाठी ट्रोलिंग.

वरील चार प्रकारच्या ट्रोलिंगपैकी पहिले ट्रोलिंग एक खेळ व्यक्तिगत उत्स्फूर्ततेतून येते. या उत्स्फुर्ततेची कारणे मात्र व्यक्तिगणिक भिन्न आहेत. परंतु सर्वसाधारण कारणे पुढील स्वरूपाची आहेत : १) आपल्यावर फार अन्याय झाल्याची रास्त किंवा अवास्तव भावना अनेक माणसांची असते. आपले कौशल्य, बुद्धिमत्ता, माणसांची पारख करण्याची कुवत या गुणांची पारख नसणाऱ्या समाजाला आणि समाजव्यवस्थेला ही माणसे जबाबदार धरतात. कधी ती जबाबदारी पालकांच्या गरिबीवर, त्यांना जन्माने मिळालेल्या जात-धर्म वास्तवावर किंवा अनुवंशिकतेने आलेल्या रूपाकडेही जाते. अशी माणसे कुणाची तरी शाब्बासकी मिरवून किंवा मान्यताप्राप्त माणसांची उणी-दुणी काढून स्वतःची कुवत नेहमी सिद्ध करू पाहतात. २) अनेक व्यामिश्र कारणांनी माणसांमध्ये न्यूनगंड तयार होतो, तो घालवण्याचा त्यांना एक मार्ग दिसत असतो. तो म्हणजे दुसऱ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे हे जमेल तेव्हा दाखवणे. ३) भोवताली ज्या मूल्यांची, ज्या व्यक्तींची, ज्या राजकीय पक्षांची... चलती असेल, त्या बाजूचा कायम आधार घेऊन, प्रसंगी त्यासाठी राबून स्वतःचे अस्तित्व ते स्वतःसाठी सिद्ध करू पाहतात. या प्रकारातील माणसे जेव्हा इंटरनेट ट्रोलिंगची वाहक बनतात, तेव्हा त्यांनी केलेली छेडछाड, अपमान, दमबाजी प्रत्यक्षात येण्याची शक्यता जवळपास नसते. शिवाय या ट्रोलिंगमागे कसलेही नियोजन आणि सातत्य नसते. किक आली की कुणाचे तरी पाय ओढायचे, कुणाची तरी टोपी उडवायची, कुणाला तरी घाबरवायचे आणि आपले समाधान करून घ्यायचे किंवा आपला न्यूनगंड काही काळासाठी विसरायचा प्रकार असतो.

परंतु ट्रोलिंगचे उरलेले तीन प्रकार हे पोटा-पाण्याचे व्यवसाय असतात. ही ट्रोल मंडळी भाडोत्री असतात. पोटाला लावणाऱ्या सत्तांच्या हुकमांचे ती ताबेदार असतात. डावपेचात्मक ट्रोलिंग, लष्करी कारवाईसाठी ट्रोलिंग आणि राजकीय ट्रोलिंग या प्रकारांनुसार ट्रोलिंगसाठी वाढते तंत्रज्ञानात्मक आणि भाषिक कौशल्य आवश्यक असते. त्याला मोबदलाही चांगला मिळतो, मदतीला रस्त्यावर राडा करणारी कुमक आणि छुपा किंवा उघड राजकीय पाठिंबादेखील आवश्यक असतो. कामाची वाटणी, दैनंदिन आढावा आणि मॅनेजमेंटजस या गोष्टी जेवढ्या हेरगिरी किंवा जाहिरातबाजीसाठी महत्त्वाच्या असतात, तितक्याच त्या ट्रोलिंगसाठीही महत्त्वाच्या असतात. एखादे उत्पादन ग्राहकांच्या गळी उतरविण्यासाठी जसे जाहिरात कंपनी कॅम्पेन चालविते, तसेच कॅम्पेनस या प्रकारची ट्रोलिंग चालवितात. गरजेनुसार सत्ताधीशांच्या मतांचा मारा सामान्य नागरिकांच्या रुपात ट्रोलिंग कधी करते. कधी सत्ताधीशांच्या विरोधकांना जरब बसवून गप्प करते. दोन्ही प्रकारचे मेसेजेस निवडक हजारो लोकांपर्यंत जातील एवढ्या मोठ्या मेलिंग लिस्टस या पगारी ट्रोल्सच्या असतात. तेथून ते मेसेजेस सामान्य लोकांपर्यंत वेगाने पोहोचतात. याचे कारण सामान्यांचे अजून भाषिक शिक्षण झालेले नसल्याने ते स्वतःची मते व्यक्त करू शकत नसले तरी हाती आलेल्या मेसेजेसमधून निवडून ते स्वतःची मते घडवून ती मते फॉरवर्ड करू शकतात. सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून पुन्हा अहिरावण-महिरावण उत्पन्न होऊन राम-रावणाची लढाई चालू राही, या कथेनुसार ट्रोल्सरूपातील अहिरावण-महिरावण वाढतात. त्याचा परिणाम भाडोत्री ट्रोल्सची मते सामान्य जनतेची आहेत असे आभासी चित्र उभे राहण्यात होतो. “लोकसभेच्या पुढील निवडणुका मोबाईलवर लढल्या जातील”, या भारतीय सत्ताधीशांच्या वक्तव्याचा आधार ट्रोल्सरूपातील अहिरावण-महिरावण हा आहे. अशाच कारणांसाठी दोन्ही प्रकारचे मेसेजेस परिणामकारकपणे पोहोचण्यावर जगभर देखरेख असते. या कामात नैतिकता आणि कायदेपालन यांना थारा नसतो. डावपेचांची परिणामकारकताच काय ती प्रचंड महत्त्वाची असते. कौटुंबिक ते राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील ट्रोल मंडळी जाती-धर्मांसाठी लढणारे सत्ताधीशांनी नेमलेले अनामिक आणि अदृश्य योद्धे असतात. जाती‘योद्धे’, धर्म‘योद्धे’, भाषा‘योद्धे’ राष्ट्रीय‘योद्धे’, आंतरराष्ट्रीय‘योद्धे’ अशी त्यांची स्पेशलायझेशन्स असतात. त्यांना पैसे भरपूर मिळतात, परंतु मान-सन्मान मात्र नसतो. त्यांना इतिहासात स्थान आणि नावदेखील नसते. काम झाले, की सत्ता हे ‘योद्धे’ दुर्लक्षित करते किंवा कचऱ्यासारखे फेकून देते. या मंडळींना थोडीसुद्धा सामाजिक प्रतिष्ठा नसते. त्यांचे काम गुप्ततेच्या आवरणात चालते.
 
इंटरनेट ट्रोलिंगचा जागतिक प्रसार
सध्या इंटरनेटवरील ट्रोलिंग गट जवळ जवळ प्रत्येक देशात कार्यरत आहेत. साधकबाधक चर्चा न घडू देता अन्यायग्रस्तांची बाजू घेणाऱ्या मतांचा सर्व मार्गांनी बिमोड करणे आणि कधी अन्यायकर्त्या सत्ताधीशाच्या मतांच्या कौतुकाचा प्रचंड मारा करणे हा इंटरनेट ट्रोलिंगचा लोकशाहीला धोकादायक खेळ जगभर चालू आहे. तो अनेकदा यशस्वी होताना दिसतो आहे. याचे कारण जागतिक बाजारपेठेत उद्योगांचा म्हणावा तसा विस्तार होत नसावा. परिणामी, सोयीची ध्येय-धोरणे कोणत्याही मार्गाने राबविण्याची धमक असणारी सरकारे सत्तेवर येणे त्यांना सोयीचे असावे. या मताची शास्त्रीय तपासणी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली असावी. इंटरनेट ट्रोलिंगच्या लोकशाहीविरोधी खेळामागे वरील कारण असेल अथवा नसेल, परंतु या खेळाला लाभणाऱ्या यशाच्या श्रेयात अनेक घटकांचा कमी-अधिक वाटा असतो, हे वास्तव नाकारता येत नाही. म्हणून यशाचे संपूर्ण श्रेय इंटरनेट ट्रोलिंगच्या पदरात टाकण्याचा बालीश प्रयत्न आपण करू नये. उलट, देश कोणताही असो इंटरनेट ट्रोलिंग हा यशाचा अनेक घटकांतील केवळ एक वाटेकरी असतो, हे पक्के भान ठेवावे. हे भान ठेवून आता प्रस्तुत लेखात अमेरिका, चीन, रशिया आणि भारत एवढ्याच देशांतील परिस्थिती अत्यंत मोजक्या उदाहरणांच्या मदतीने पाहूया.

जागतिक तापमान वाढीची कारणे मनुष्यनिर्मित आहेत, याबाबत जगभरच्या बहुसंख्य तज्ज्ञांचे एकमत आहे. परिणामी, जागतिक तापमान वाढीची कारणे निसर्गनिर्मित आहेत असे म्हणणारी लॉबी जगाच्या पातळीवर खूप अशक्त आहे. उदाहरणार्थ, फ्रान्समधील असे गट शासनाचे निर्णय लांबाविण्यास असमर्थ ठरले आहेत. परंतु अमेरिकेत मात्र जागतिक तापमानवाढ निसर्गनिर्मित अल्याचा अपप्रचार शासनाचे निर्णय लांबवू अथवा उलटवूदेखील शकतो. गेल्या दोन दशकांचा हा अमेरिकी इतिहास असल्याचे खणखणीत प्रतिपादन युरोपियन जर्नल ऑफ अमेरिकन स्टडीज यातील शोधनिबंधाने केले आहे . या लॉबीमागे अमेरिकेतील महाकाय तेलकंपन्या आणि त्यांचे तेवढेच महाकाय नफे आहेत, असे लेखकाचे प्रतिपादन आहे. खनिजतेल आणि बिल्डर यांच्या लॉबीची प्रतिनिधी व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपाने आता अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष बनली आहे. परिणामी अमेरिकेएवढी सशक्त विज्ञानविरोधी लॉबी जगात शोधून सापडणार नाही.

डोनाल्ड ट्रम्प याच्या कारकिर्दीला नुकतेच शंभरेक दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या निवडणुकीत ट्रम्प निवडून यावेत म्हणून रशियातील इंटरनेट ट्रोलिंग टोळ्या सक्रीय असल्याचे दावे आपण या लेखाच्या सुरवातीलाच दिले होते. अनेक अमेरिकन संशोधन संस्थामधील तज्ज्ञांचे संशोधन याला पाठिंबा देते आहे. येथे केवळ एका संदर्भाचा  उल्लेख संदर्भ-यादीत केला आहे.

गेरी किंग (Gary King) या हार्वर्डच्या राज्यशास्त्र तज्ज्ञाने अनेक तज्ज्ञांच्या मदतीने सिद्ध केलेले संशोधन असे सांगते की चीनी शासन स्वतःच्या सोयीसाठी दरवर्षी सोशल मीडियावर सुमारे ४४-४५ कोटी नोंदी (पोस्ट) प्रसृत करते . शासन-विरोधी मते तयार होऊ नयेत म्हणून सुमारे २० लक्ष व्यक्तींना प्रत्येक नोंदीमागे ५ सेंट एवढी रक्कम दिली जाते, असा या संशोधकांचा दावा आहे. सुटीच्या दिवसाच्या आसपास प्रसृत होणाऱ्या वीस लाख लोकांच्या कोट्यावधी नोंदी सामान्य लोकांच्या असल्याचा भास त्या नोंदी पक्केपणी निर्माण करतात.

भारतात जादूची कांडी फिरली आणि सोशल मीडियाने २०१३ या वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचाराचे रास्त पाढे आळवायला सुरुवात केली. ‘योगायोगा’ची बाब म्हणजे याच सुमाराला विरोधी पक्षांनी भारतातील औद्योगिक घराण्यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. टाटा मोटर्सच्या नॅनो मोटार कंपनीचे गुजरात शासनाने केलेले स्वागत याचे ठळक उदाहरण आहे. परंतु भाजपादेखील ट्रोलसेना वापरत असल्याचा दावा ही मात्र पुढची पायरी आहे. हा दावा पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ‘I Am a Troll : Inside the Secret World of the BJP’s Digital Army’ या स्वानुभवावर आधारीत पुस्तकात केला आहे. या पुस्तकाची परीक्षणे जवळपास सर्व महत्त्वाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून आलेली आहेत. भाजपाच्या यशात या ट्रोलसेनेचा काही वाटा असणे शक्य आहे. तसेच, गोरक्षकांचा आणि स्त्री-पत्रकारांना बलात्काराच्या धमक्या देणाऱ्या मंडळींचा दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी निषेध करूनदेखील त्यांच्या कारवाया देशभर चालू राहण्याचे इंगित राजकीय पाठिंबा याशिवाय दुसरे कोणते असू शकते?

सामान्य व्यक्ती हे करू शकते
जाहिराती केल्याने पैसे मिळतात हे वास्तव आहे. त्या फायद्यासाठी जाहिराती अटळ आहेत. अगदी त्याचप्रमाणे माणसात स्वार्थ असल्याने ट्रोलसेनांचा वापर केला जाणारच आहे. स्वार्थाचा उगम सजीवांच्या जगण्याच्या प्रेरणेशी निगडीत आहे. कळपांमध्ये किंवा टोळ्यांमध्ये राहून सुरक्षितता मिळवण्याची नैसर्गिक प्रेरणा अनेक प्राण्यांत आहे. स्वजातीय प्राण्यांवर हल्ला करताना अनेक उत्क्रांत सस्तन प्राण्यांच्या पाठीवरील केस ताठ उभे राहतात. ती नैसर्गिक प्रेरणा आहे. त्या अवस्थेत एक प्राणी दुसऱ्याच्या जीवावर उठू शकतो. उत्क्रांत होत होत माणूस प्राणी आजच्या स्थितीला पोहोचला आहे. प्राणीशास्त्रानुसार दोन पायावर उभे राहून ताठ चालू शकणारा माणूस आणि नियांडरथल माणूस हे आजच्या ‘शहाण्या’ माणसाचे (होमो सेपियन्स) पूर्वज आहेत. हे पूर्वज आणि आदिम शहाणी माणसे टोळ्यांनी राहत होती. जगण्याचे शहाणपण या माणसांना टोळ्या करून राहायला शिकवत होते; ती त्यांची नैसर्गिक प्रेरणा नव्हती. या फरकापलीकडे माणसांच्या टोळ्या आणि प्राण्यांचे कळप यामध्ये फार मोठे फरक नव्हते. म्हणूनच प्राणी पातळीवरील स्वजातीय हिंसा अनेक रूपे घेऊन मानवी इतिहासात अनेकदा अवतरलेली दिसते. आदिम अवस्थेच्या काळापासून भवतालाचे कुतूहल माणसांत जागे झाले. त्यातून मर्यादित ज्ञानाच्या आधाराने विश्वाच्या दिसलेल्या पसाऱ्याचा अर्थ लावता लावता भाषा, देव, आत्मा, धर्म, जाती, वंश या संकल्पना नव्याने त्याच्या हाती आल्या. या संकल्पनांच्या आधाराने माणसाने स्वतःच्या टोळ्या बांधल्या. आपल्या टोळीच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन झगडताना माणसाच्या पाठीच्या कण्यातून एक थंड आणि ‘पवित्र’शी शिरशिरी  उत्पन्न होते. ही शिरशिरी पाठीवरील केस ताठ उभे राहण्याची प्रतिमा आहे. अशा या अवस्थेत माणसाचे माणूसपण हरपते आणि त्याच्या हातून मानवहत्या घडतात. टोळी आणि टोळी प्रमुखाला मान देण्याच्या प्रथेतून ती ‘पवित्र’ शिरशिरी कनिष्ठांत उत्पन्न होऊ शकते. त्यासाठी शंखनाद, घोषणा, गर्जना, लष्करी संगीत यांचा वापर केला जाई. या काळातील टोळी आणि तिचा प्रमुख यांच्याबाबत निष्ठा असे. त्या निष्ठेचे उन्नत रूप म्हणजे राजेशाहीतील स्वामीनिष्ठा. राजेशाहीत आणि सरंजामशाहीत स्वामीनिष्ठा हा परवलीचा शब्द होता. राजे लोकांची राज्ये ही आधुनिक अर्थाने देश नव्हते. स्वतःची वर्तणूक कशीही असली तरी पदरी राखलेल्या भाटांकडून राजे मंडळी स्वतःला ईश्वराचे अंश म्हणवून घेत. तो आधुनिक टोळीचा आधार होता. औद्योगिक आणि फ्रेंचक्रांतीनंतर ‘राष्ट्र’ ही संकल्पना हळूहळू रुजू लागली. पूर्वी देश-परदेश या संकल्पना प्रदेश या अर्थाने वापरल्या जात. याची साक्ष काळ्या-पांढऱ्या रंगातील हिंदी चित्रपटातील गाणी नक्कीच देतील. राष्ट्र ही संकल्पना रुजल्यानंतर मात्र स्वामीनिष्ठेची जागा राष्ट्रनिष्ठेने घेतली. राष्ट्रनिष्ठेची शपथ घेऊन शत्रू देशांशी अमानुष लढाया करणे नित्याचे झाले. युद्धांच्या संदर्भात रवींद्रनाथ टागोर म्हणायचे “राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली माणुसकीला काळिमा फासणे मी कधीच खपवून घेणार नाही.” टोळीप्रमुखनिष्ठा ते राष्ट्रनिष्ठा यापैकी कोणत्याही आधारे टोळी युद्धे करणे माणुसकीला काळिमा फासणारे आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. माणसांमाणसांत जन्माधारीत जात, धर्म, राष्ट्र, मातृभाषा, अशा कारणांसाठी भिंती उभ्या करणे थांबविले पाहिजे. ते जमले नाही तर पुन्हा प्राणीपातळीकडे माणसाचा प्रवास नक्कीच होऊ शकतो. इंटरनेट ट्रोलिंग माणसाला प्राणी-पातळीकडे आणि अन्यायग्रस्ततेकडे नेणारा मार्ग आहे.

मानवजातीचा सभासद म्हणून प्रत्येक जण नक्कीच खालील गोष्टी टाळून प्राणी-पातळीकडील प्रवासाबाबत असहमती व्यक्त करू शकतो:
- स्त्री-पुरुष भेदभाव वाढवणारे लिखाण फॉरवर्ड न करणे

- भाषिक भेद हे मानवी समज वाढवतात, हे लक्षात घेऊन भाषिक फरकांच्या आधारे द्वेषमूलक लिखाण फॉरवर्ड न करणे

- देव, धर्म आणि देश यांच्यात फरक असणाऱ्या समूहांत द्वेष वाढेल असे लिखाण स्वतः न करणे आणि आपल्याकडे आलेले असे लिखाण फॉरवर्ड न करणे

- विचार न करता हाती आलेले लिखाण पुढे न पाठविणे

- भीतीची दहशत बसविणारे लिखाण न करणे आणि ते पुढे न पाठविणे.

- प्राणी-पातळीवरील टोळी मानसिकतेकडे स्वतःचा आणि परिचयातील इतर व्यक्तींचा प्रवास करू पाहणारे लिखाण पुढे न पाठविणे.

- गुन्हेगार वाटणाऱ्या किंवा आपणच ठरविलेल्या व्यक्तीला हाती कायदे घेऊन शिक्षा देण्यास पुढे न सरसावणे.

त्याऐवजी एक सुसंस्कृत माणूस या नात्याने आपण इतरांशी स्नेहाचे आणि आपुलकीचे संबंध जोडले पाहिजेत. नव्या संस्कृतीबाबत कुतूहल जागे ठेवून त्यातील माणूस्कीकडे नेणारा भाग स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. असे आपण केले तर आणि तरच मानवी संस्कृती काही सहस्रके टिकेल. नाही तर अण्वस्त्रयुद्धे, जागतिक तापमान वाढ असे मानवाचे शत्रू टपून बसलेले आहेतच.

……………………………………………………………………………………………

संदर्भ

 १. Jean-Daniel Collomb (2014); The Ideology of Climate Change Denial in the
United States; https://ejas.revues.org/10305
 २. Meghan Keneally (201-01-06) How Russia Used Trolls, Cyberattacks and Propaganda to Try to Influence Election; http://abcnews.go.com/Politics/russia-trolls-cyberattacks-propaganda-influence-election/story?id=44610568
 ३. Gary King, et.el.(2017-04-09); How the Chinese Government Fabricates Social Media Posts for Strategic Distraction, not Engaged Argument; http://gking.harvard.edu/files/gking/files/50c.pdf
 ४. The mental state of men ready and poised to kill has long fascinated scientists. The Nobel Prize winning ethologist, Konrad Lorenz, says such persons experience the ‘Holy Shiver’ (called heiliger Schauer in German) just moments before performing the deed. In his famous book On Aggression (https://monoskop.org/images/d/d0/Lorenz_Konrad_On_Aggression_2002.pdf), Lorenz describes it as a tingling of the spine prior to performing a heroic act in defence of their communities.

……………………………………………………………………………………………

लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.

prakashburte123@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Nivedita Deo

Wed , 17 May 2017

अतिशय उत्तम माहितीपूर्ण लेख आहे हा. मराठीमध्ये या विषयावर इतकं मुद्देसूद लेखन आजवर इतरत्र कुठे वाचायला मिळालं नव्हतं.